Monday, March 24, 2014

डाॅ. व्दारकानाथ कोटणीस यांची स्मृतीच माझ्या आयुष्याचा आधार - क्यो चिंग लान - दै. सामना - ११ जानेवारी १९९९

 बातमीचा मूळ भाग
बातमीचा उर्वरित भाग.



भारत ही देखील माझी मातृभूमीच आहे. येथे माझी सर्व जिव्हाळ्याची माणसे राहातात. त्यांना भेटण्यासाठी व डाॅ.व्दारकानाथ कोटणीसांची स्मृती ज्या देशाने जपलीय, त्या भारताच्या मातीला वंदन करण्यासाठी मी येथे आले आहे...हे भावस्पर्शी उद्गार आहेत १९३७ साली जपानने चीनवर आक्रमण केल्यानंतर जखमी निर्वासितांच्या उपचारांसाठी भारतातून चीनमध्ये गेलेले डाॅ. व्दारकानाथ कोटणीस यांच्या पत्नी क्यो चिंग लान यांचे. प्रदीर्घ काळानंतर क्यो चिंग लान या  भारतभेटीसाठी मुंबईमध्ये १० जानेवारी १९९९ रोजी आल्या होत्या. त्यावेळी त्यांची भेट मी घेतली होती. त्यावेळी मी त्यांच्याशी केलेल्या बातचितीवर आधारित बातमी दै. सामनाच्या ११ जानेवारी १९९९च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. या बातमीची जेपीजी फाईल वर दिली आहे.

डाॅ. व्दारकानाथ कोटणीस यांची स्मृतीच माझ्या आयुष्याचा आधार - क्यो चिंग लान
- समीर परांजपे
भारत ही देखील माझी मातृभूमीच आहे. येथे माझी सर्व जिव्हाळ्याची माणसे राहातात. त्यांना भेटण्यासाठी व डाॅ. व्दारकानाथ कोटणीसांची स्मृती ज्या देशाने जपलीय, त्या भारताच्या मातीला वंदन करण्यासाठी मी येथे आले आहे...हे भावस्पर्शी उद्गार आहेत १९३७ साली जपानने चीनवर आक्रमण केल्यानंतर जखमी निर्वासितांच्या उपचारांसाठी भारतातून चीनमध्ये गेलेले डाॅ. व्दारकानाथ कोटणीस यांच्या पत्नी क्यो चिंग लान यांचे. त्या आज प्रदीर्घ काळानंतर भारतामध्ये आल्या आहेत.
मुंबईतील सहार विमानतळावर क्यो चिंग लान यांनी दै. `सामना'शी बोलताना आपल्या गतस्मृतींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या  डाॅ. कोटणीस यांची निरंतर आठवण हीच माझ्या आयुष्याचा आधार आहे. क्यो चिंग लान यांचे वय ८२ वर्षांचे आहे. प्रकृती अतिशय ठणठणीत. स्वागतासाठी आलेल्या सर्वांचे त्यांनी मनमोकळ्या हास्याने कौतुक केले.
डाॅ. व्दारकानाथ कोटणीस हे संपूर्ण देशाला ललामभूत ठरलेले व्यक्तिमत्त्व होते. ७ जुलै १९३७ रोजी जपानने चीनवर आक्रमण केले. अंतर्गत दुफळीने जर्जर बनलेल्या चीनला जपानी आक्रमणाने प्रचंड धक्का बसला होता. तेव्हा चांग-काय-शेकचा खोमेटांग व माओच्या कम्युनिस्ट पक्षाने एकत्र येऊन चीनवर जपानने केलेल्या आक्रमणाचा प्रतिकार करायचे ठरविले. जपानी आक्रमणात चीनचे अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. अनेकांना पांगळे व्हावे लागले. या सर्व व्यक्तींना वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी पं. जवाहरलाल नेहरु यांनी केलेल्या आवाहनानूसार भारतातून डाॅक्टरांचे पथक चीनला रवाना झाले. तेव्हा त्यात मानवतेच्या भावनेतून स्वयंप्रेरणेने सहभागी झाले होते डाॅ. द्वारकानाथ कोटणीस.
चीनमधील युद्धग्रस्तांवर अत्यंत खडतर परिस्थितीत डाॅ. व्दारकानाथ कोटणीसांनी वैद्यकीय उपचार  केले होते. या सर्व धावपळीचा कोटणीसांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला. ९ डिसेंबर १९४२ रोजी अत्यंत आजारी अवस्थेत डाॅ. व्दारकानाथ कोटणीसांचे चीनमध्येच निधन झाले. चीनच्या मुक्कामात क्यो चिंग लान यांच्याशी कोटणीसांचा प्रेमविवाह झालेला होता. जखमी युद्धग्रस्तांना वैद्यकीय उपचार देण्याकामी पारिचारिका या नात्याने क्यो चिंग लान या सीमाभागात  शुश्रूषाकार्यात सहभागी झाल्या होत्या. त्याच दरम्यान त्यांची डाॅ. कोटणीसांशी भेट झाली होती.
डाॅ. व्दारकानाथ कोटणीस हे आंतरराष्ट्रीय बंधुत्त्वाचे प्रतीक आहेत. त्यांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी सोलापूर या त्यांच्या जन्मगावी १९८५ साली क्यो चिंग लान यांच्या हस्ते डाॅ. कोटणीसांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र शासनानेही डाॅ. कोटणीसांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिटाचे अनावरण केले होते.
डाॅ. कोटणीसांच्या पत्नी क्यो चिंग लान या आगामी तीन आठवड्यांपर्यंत मुंबईत असणार आहेत. त्यांचे स्वागत करायला आज विमानतळावर डाॅ. कोटणीसांच्या भगिनी डाॅ. वत्सला कोटणीस, मनोरमा कोटणीस, त्यांचे भाऊ विठ्ठल कोटणीस आदी कुटुंबीय उपस्थित होते. क्यो चिंग लान यांना पाहून साक्षात डाॅ. द्वारकानाथ कोटणीसांची प्रतिमाच आपल्यासमोर जिवंत झाली, असे डाॅ. वत्सला कोटणीस यांनी सांगितले. क्यो चिंग लान या आपल्या नव्हाळीच्या लोकांना भेटण्यासाठी मुंबईत आल्या असून त्यांचे अन्य कोणतेही कार्यक्रम नाहीत.
डाॅ. व्दारकानाथ कोटणीस या मानवतेचे मंदिर असलेल्या व्यक्तीचे महात्म्य त्यांच्या निर्वाणानंतर अनेकांनी गायले. कोटणीसांच्या कार्याने भारावून त्यांचा जीवनपट ख्वाजा अहमद अब्बास यांनी ए मॅन हू डिड नाॅट कम बॅक या चरित्रग्रंथातून मार्मिकपणे साकारला. अब्बास यांच्या पटकथेवरच व्ही. शांताराम यांनी डाॅ. कोटणीस की अमर कहानी हा हिंदी चित्रपट निर्माण केला व भारतातील लहान-थोरांना डाॅ. कोटणीसांचे भव्य दर्शन घडविले. डाॅ. व्दारकानाथ कोटणीस व क्यो चिंग लान या दांपत्याला इंग-व्हा हे पुत्ररत्न झाले होते.इंग-व्हाचा अर्थ भारत-चीन. आज विश्वबंधुत्वाचे, मानवतेचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी क्यो चिंग लान पुन्हा भारताच्या दौर्यावर आल्या आहेत.

No comments:

Post a Comment