Friday, July 28, 2017

`शेंटिमेंटल' या मराठी चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी वेबसाइट - २८ जुलै २०१७.

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवर मराठी कट्टा या सेगमेंटमध्ये शेंटिमेंटल या नव्या मराठी चित्रपटाचे मी दि. 28 जुलै 2017 रोजी केलेले परीक्षण. त्याची लिंक व मूळ मजकूर पुढे दिला आहे.
---
`शेंटिमेंटल' - पोलिसांच्या जीवनशैलीचा क्लिअर एक्स-रे
----
- समीर परांजपे
---
चित्रपट - शेंटिमेंटल
-
रेटिंग - ३ स्टार
--
कलावंत - अशोक सराफ, उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुवीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर,उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी. 
निर्माता - अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके
कथा, पटकथा , संवाद, दिग्दर्शन – समीर पाटील
संगीत – मिलिंद जोशी
श्रेणी - फॅमिली ड्रामा 
---
पोलिसांच्या जीवनावर आधारित `शेंटिमेंटल' हा नवा मराठी चित्रपट पाहाताना काही गोष्टी आठवल्या. चित्रपटांमध्ये पोलिसांना एकतर भ्रष्ट दाखविले जाते. किंवा पोलिस किती चांगले काम करतात याचे आदर्शवादी चित्रण मराठी, हिंदी वा अन्य भाषांतील चित्रपटांमध्ये केले जाते. शेंटिमेंटल चित्रपटामुळे गतकाळातील पांडू हवालदार या चित्रपटाची आठवण होणे स्वाभाविक आहे. १९७५ साली झळकलेल्या व दादा कोंडके यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात पांडू हवालदाराची भूमिका दादा कोंडके व त्यांच्या पोलिस सहकाऱ्याची भूमिका अशोक सराफ यांनी केली होती. त्यात अशोक सराफ यांनी साकारलेला पोलिस हवालदार लाचखोर दाखविला होता. शेंटिमेंटलमधील अशोक सराफ यांनी साकारलेला पोलिस उपनिरीक्षक हा थोडाफार हात मारणारा पण दिलदार मनाचा व सर्वांची काळजी करणारा आहे. 
कथा - पोलिसांच्या जीवनशैलीचे दर्शन घडविणारी, त्यांच्या व्यथांवर भाष्य करणाऱ्या शेंटिमेंटल चित्रपटाची कथा फिरते आहे मुंबई पोलिसांभोवती. चित्रपटाची सुरुवात छान केली आहे. मुंबई पोलिस दलामध्ये ४० हजारांहून अधिक पोलिस असले तरी त्यातील सुमारे २१ हजार पोलिस व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेत गर्क असतात. बाकीचे पोलिस सव्वा कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असतात. त्यातून कामादरम्यान येणारे प्रचंड ताणतणाव, पोलिसांना रजा मंजूर करुन घेताना करावी लागणारी यातायात, पुरेसा पगार नसल्याने पोलिसांमध्ये बळावलेली हप्ताखोर वृत्ती, त्यातून वरपासून खालपर्यंत होणारा प्रचंड भ्रष्टाचार. असे पोलिसांच्या जीवनपद्धतीचे एकेक दर्शन छोट्याछोट्या प्रसंगातून प्रारंभीच घडवत हा चित्रपट आपल्याला घेऊन जातो अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर पोलिस ठाण्यामध्ये. तिथे आपल्याला प्रल्हाद घोडके (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), दिलीप ठाकूर (सहाय्यक पोलीस निरीक्षक), सुभाष जाधव – (पोलीस निरीक्षक), सुनंदा साळोखे, डी. एन. नगर पोलीस चौकीचे मुख्य पोलिस अधिकारी दणाईत असे सारे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यानूसार भेटतात. त्यातील प्रल्हाद घोडके हे सहाय्यक पोलिस निरीक्षक सेवेतून निवृत्त व्हायला फक्त दोन वर्षे शिल्लक आहेत. एमपीएससी परीक्षा देऊन अगदी नव्याने पोलिस निरीक्षक बनलेला सुभाष जाधव हा पोलिसी खात्यातला अनुभवांना अजून सरावलेला नाही. त्यामुळे त्याच्यातला नवथरपणा कामातही जाणवतो. सुभाष जाधव सुनंदा साळोखे ही महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या एकमेकांच्या प्रेमात आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर हा अतिशय व्यवहारी अधिकारी. हप्तेही चलाखीने घेतो व पोलिसाच्या नोकरीचे फायदेही. या डी. एन. नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी संदीपान जांभळे यांच्या हाताखाली बाकीचे पोलिस कर्मचारी कार्यरत असतात. व या पोलिस ठाण्याचा प्रमुख अधिकारी असतो ते म्हणजे दणाईत साहेब. या सगळ्यांची एक उतरंड ठरलेली असतात. वरच्या पदावरील माणसाने आदेश द्यायचा व कनिष्ठ स्तरावरील माणसाने तो आदेश पाळताना चाकराला पडचाकर शोधायचा. पोलिसांच्या रोजच्या दिवसाची सुरवात होते कोणाच्या तरी खूनाच्या बातमीने व दिवस सरतो कुणावर तरी झालेल्या बलात्काराच्या बातमीने. त्यामुळे त्यांची मने पार बधीर झालेली असतात. पोलिसांमधील माणूसकी कमी होऊन त्याची जागा प्रत्येकावर संशय घेणे याच मनोवृत्तीने घेतलेली असते. पोलिस क्वार्टर्समधील घरे ही वाईट स्थितीत आहेत. पोलिसांच्या अपुऱ्या उत्पन्नामुळे त्यांचे कुटुंबिय सुखी नाहीत, कितीही हप्ते खाल्ले तरी नोकरीतील तणावामुळे तब्येतीही ठीक नाहीत अशा कात्रीत सापडलेल्या पोलिसांचे प्रतिनिधी आपल्याला या चित्रपटातील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात दिसू लागतात. काही ज्वेलर्सकडे झालेल्या चोरी प्रकरणी पोलिस तपास सुरु असतो. दिलीप ठाकूर, प्रल्हाद घोडके, सुभाष जा‌धव ही पोलिस मंडळी मनोज पांडे या मूळचा बिहारी पण आता विरारमध्ये राहात असलेल्या गुंडाचा माग काढत असतात. मनोज पांडेला अटक करण्यात तसेच त्याच्याकडून चोरी केलेल्यापैकी अर्धा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश येते. पण बाकीचा अर्धा मुद्देमाल मनोज पांडे याने बिहारमधील मोतीहारी या आपल्या गावच्या घरी लपवून ठेवलेला असतो. हे सत्य चौकशीतून पुढे येताच डी. एन. नगर पोलिस ठाण्यातून एक पथक बिहारला जायला निघते. पोलिसांच्या रोजच्या ताणतणावाच्या कामातून थोडी मोकळीक या दृष्टीने दिलीप ठाकूर, प्रल्हाद घोडके, सुभाष जा‌धव हे तिघे बिहारच्या दौऱ्याकडे पाहू लागतात. सोबत मनोज पांडे या चोरालाही साहजिकच घेतलेले असते. हे चौघे ट्रेनने बिहारला रवाना होतात. मनोज पांडे चोर का बनला याची कहाणीही या तिघा पोलिसांना या प्रवासातच तो सांगतो. मनोजच्या ओळखीचे लोक गाडी जशी बिहारच्या हद्दीत प्रवेश करते तसे भेटू लागतात. मोतीहारी येथे मनोज पांडेच्या घरी गेल्यानंतर त्याचे आजोबा म्हणजे ताऊजी या चौघांचे उत्तम स्वागत करतात. आपल्या घरातील मुलीचे लग्न असून ते आटपल्यानंतरच तुम्ही सर्वांनी मुंबईला परत जायचे असा प्रेमळ आग्रह ताऊजी दिलीप ठाकूर, प्रल्हाद घोडके, सुभाष जा‌धव यांना करतात. मनोज पांडे चोर असून त्याच्याबरोबर आलेले तिघेजण हे पोलिस आहेत हे सत्य ताऊजींपासून हे सगळेजण लपवून ठेवतात. मनोज हा उच्चशिक्षित पण परिस्थितीमुळे चोर बनलेला असतो. तो आपल्या बरोबरील पोलिसांना गुंगारा न देता त्यांना आपल्या घरात लपविलेला चोरीचा बाकीचा दाखवतो. ते दागिने ताब्यात घेऊन मनोज पांडेसह तीनही पोलिस अधिकारी मोतीहारीवरुन मुंबईत परत येण्यासाठी सज्ज होतात. पण त्या आधीच अनेक घटना घडतात. इतके दिवस आपल्या घरात राहिलेले तीन जण हे पोलिस अधिकारी आहेत हे ताऊजींना कळते का? मनोज पांडेकडून सर्व दागिने मिळविल्यानंतर या तीनही पोलिसांचा त्यांच्या खात्याकडून गौरव होतो की त्यांना तुच्छतेची वागणूक दिली जाते? असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे मिळविण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय - `शेंटिमेंटल' या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे अशोक सराफ यांनी साकारलेला प्रल्हाद घोडके हा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. अशोक सराफ यांनी ही भूमिका ज्या सहजतेने केली आहे त्यामुळे या चित्रपटात प्रसन्नता आली आहे. सराफ यांनी साकारलेला पोलिस हा वास्तवातील वाटतो. त्याच्या सांसारिक चिंता, त्याची इतर सर्वांबद्दल असलेली कणव, आत्मीयता हे सर्व अशोक सराफ यांनी उत्तमरित्या दाखविले आहे. दिलीप ठाकूर (सहाय्यक पोलीस निरीक्षक) या पात्राच्या भूमिकेतील उपेंद्र लिमये, सुभाष जाधव – (पोलीस निरीक्षक)च्या भूमिकेतील विकास पाटील या कलाकारांनी अशोकमामांना उत्तम साथ दिली आहे. मुंबई पोलिसांचे पथक तपासासाठी िबहारमधील मोतीहारी या गावी जाते त्यावेळी मनोज पांडे याचे ताऊजी म्हणजे रघुवीर यादव यांनी अस्सल बिहारी माणूस जो काय ठसक्यात उभा केला आहे तो लाजवाबच आहे. बिहारमधील वातावरण, तेथील पोलिस यांचे चित्रपटात झालेले चित्रीकरण हे वास्तवाला धरुन आहे. त्यामुळे काही प्रसंगात हसता हसता पुरेवाट होते. मनोज पांडे या चोराची भूमिका सुयोग गोऱ्हे याने केली आहे. बसस्टॉप हा सुयोगचा पहिला मराठी चित्रपट. त्या तुलनेत त्याची शेंटिमेंटल चित्रपटातील भूमिका मोठी आहे. तिला त्याने योग्य न्याय दिला आहे. सुनंदा साळोखेच्या भूमिकेतील पल्लवी पाटील, रमेश वाणी, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी, माधव अभ्यंकर आदी कलाकारांनी अशोक मामा व त्यांच्यासोबतचे दोन पोलिस अधिकारी यांना अभिनयाच्या कामात उत्तम साथ दिली आहे. चित्रपट कधी गंभीर होतो तर कधी विनोदी वळण घेतो. ते प्रसंग साकारण्यात कलाकार कुठेही कमी पडत नाही हे या चित्रपटाचे मोठे यश आहे.
दिग्दर्शन - या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. पोलिसांचे वास्तव जीवनदर्शन चित्रपटात घडविताना देखील चित्रपटात पुरेपूर मनोरंजन ठासून भरण्याचे कौशल्य पाटील यांना साधले आहे. पोलिसांमधील माणुसकी दाखवितानाच त्यांच्यातील खाबुगिरी वृत्तीही तितक्याच बेधडकपणे समीर पाटील यांनी दाखविली आहे. पोलिस किती वाईट व पोलिस किती चांगला यापैकी कोणतीही एक बाजू न घेता त्यांनी दोन्ही बाजू संयमाने दाखविल्या. हा तोल बऱ्याच जणांना सांभाळता येत नाही. या चित्रपटात बिहारमधील जे प्रत्यक्ष चित्रण आहे तेही खूप महत्वाचे आहे. बिहारमध्ये अशा प्रकारे चित्रीकरण होणारा हा बहुधा पहिलाच मराठी चित्रपट असावा. या चित्रपटाच्या अखेरीस प्रल्हाद घोडके हे पात्र सर्वांनाच उद्देशून जे भाषण करते त्यात पोलिसांच्या व्यथांबरोबरच त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी काय करायला हवे याबद्दल सुंदर चिंतन आहे. त्यात पोलिसांनी नोकरी करत असताना सेंटिमेंटल राहाणेही कितीही गरजेचे आहे हे सांगितलेले आहे. समीर पाटील यांनी हा चित्रपट करताना पोलिसी जीवनशैलीचा खूप बारकाईने विचार केला आहे हे जाणवत राहाते. मनाला आल्हाद देतानाच दुसऱ्या बाजूला चटकेही देणारा हा चित्रपट आहे. त्याचे श्रेय दिग्दर्शकालाही आहेच. त्यामुळेच हा चित्रपट जणू पोलिसांच्या जीवनशैलीचा क्लिअर एक्स-रे बनला आहे.
संगीत - शेंटिमेंटल या चित्रपटाला मिलिंद जोशी यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील गीते ही मिलिंद जोशी, दासू वैद्य, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. ती गाणी अवधूत गुप्ते, बेला शेंडे, शान, निहिरा जोशी देशपांडे, पावनी पांडे यांनी गायली आहेत. मिलिंद जोशी यांनी बिहारमधील वातावरणाचा ठसका, झटका एका आयटम साँगमधून बरोबर पकडला आहे. ते गाणे हा या चित्रपटाचा आकर्षणबिंदूच आहे.                                                                                                                         http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-infog-movie-review-of-marathi-film-shentimental-5656473-PHO.html

भेटली तू पुन्हा या मराठी चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी वेबसाइट २८ जुलै २०१७.

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटच्या मराठी कट्टा सेगमेंटसाठी भेटली तू पुन्हा या नव्या मराठी चित्रपटाचे मी केलेले परीक्षण 28 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध झाले. त्या लेखाचा मजकूर व वेबलिंक पुढे देत आहे.
---
भेटली तू पुन्हाचा प्रवास आहे कंटाळवाणा...
----
- समीर परांजपे
---
चित्रपट - भेटली तू पुन्हा
--
रेटिंग - २ स्टार
--
कलावंत - वैभव तत्ववादी, पूजा सावंत, गिरीश ओक, किशोरी अंबिये, अभिजित चव्हाण, मीनल बाळ, गणेश हजारे, विश्वास सोहोनी, भारत सावळे
निर्माता - गणेश रामदास हजारे
कथा, पटकथा , संवाद – संजय जमखंडी
दिग्दर्शक - चंद्रकांत कणसे
संगीत – चिनार महेश
श्रेणी - कौटुंबिक चित्रपट
---
बिफोर सनराईज हा १९९५ साली झळकलेला अमेरिकी चित्रपट. रोमँटिक ड्रामा अशी जातकुळी असलेल्या हा चित्रपट रिचर्ड लिंकलॅटर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटावर आधारलेला मुंबई पुणे मुंबई हा सतीश राजवाडे दिग्दर्शित मराठी चित्रपट २०१० साली झळकला होता. मुंबई पुणे मुंबईमध्ये रेल्वेचा प्रवास नसला तरी मुलगा व मुलगी यांच्या आधी अनोळखी व मग जुळलेल्या नात्याची वीण व्यवस्थित दाखविली होती. भेटली तू पुन्हा चित्रपटातही मुलगा व मुलगीही आहे...त्यांनी एकत्र केलेला प्रवास आहे. त्यातून दोघांमध्ये प्रेमाचे नाते फुलते का हाही कथागाभा आहे...पण भेटली तू पुन्हा हा चित्रपट कोणत्याच अंगाने फुललेला नाही. भेटली तू पुन्हा या चित्रपटाला तशाच जातकुळीच्या मुंबई पुणे मुंबई या बहारदार चित्रपटाची सर येणे तर शक्यच नाही.
कथा - आलोक भावे हा मुलगा. सेटल झालेला. करिअरही चांगल्यापैकी मार्गी लागलेले. तो लग्नासाठी मुली पाहाण्याचा सतत कार्यक्रम करत असतो. तब्बल ३५ हून अधिक मुली त्याने पाहून झालेल्या असतात. पण त्यातील एकही त्याला पसंत पडत नाही. मुलगी पसंत न पडण्याची त्याची म्हणून काही कारणे असतात. ती खूप वेगवेगळी असतात. याच मुलींमध्ये अश्विनी नावाची एक मुलगी असते. तिला पाहाण्याचा कार्यक्रम होतो. अश्विनी ही मुलगी अगदी साधीसरळ असते. डो‌ळ्यांवर चष्मा, साडी परिधान केलेली, चेहरा अगदी सोज्ज्वळ अशी ही साध्या राहाणीमानाची मुलगी आलोकला अजिबात पसंत पडत नाही. तो तिला नकार देतो. त्यानंतरही तो मुली पाहाण्याचे कार्यक्रम करत राहातोच. खरतर आलोकने अश्विनीला लक्षात ठेवण्याचे काही कारण नसते. पण असा एक प्रसंग घडतो की अश्विनी त्याच्या समोर अचानक येते. आलोक हा एका कंपनीत कामाला आहे. तो कामानिमित्त गोव्याला निघालेला आहे. त्याला गोव्यात वॉस्कोला जायचे आहे. आपला मित्र चंद्रचूड देशपांडे याला सांगून अालोक पुण्याहून गोव्याला जाणाऱ्या रेल्वेगाडीतील जागेचे रिझर्व्हेशन करतो. या गाडीत त्याच्या डब्यात नेमके त्याला भेटते पुन्हा अश्विनी. ती त्याच गाडीने गोव्याला चाललेली असते. तिला गोव्यात मडगावला जायचे आहे. अशा रितीने आलोक व अश्विनीचा एकत्र प्रवास सुरु होतो. या प्रवासादरम्यान आलोकला हे लक्षात येते की, घरगुती वळणाची, साध्या राहाणीमानाची म्हणजे थोडक्यात काकुबाई असे समजून आपण जिला नकार दिला ती अश्विनी प्रत्यक्षात अत्यंत बिनधास्त, मोकळ्या स्वभावाची मुलगी आहे. अश्विनी या रेल्वे प्रवासात गाडीमध्ये खूप धमाल करते. त्या साऱ्या गमतीत ती आलोकलाही सामावून घेते. त्यामुळे आलोकला हा प्रवास खूप आवडतो. तो कधी संपूच नये असे वाटते. या प्रवासात सतत काही ना काही घडत राहाते. एका स्थानकावर गाडी थांबली असताना डब्यातील अंध विद्यार्थ्यांना स्टेशनबाहेर सोडण्यासाठी अश्विनी मेनगेटपर्यंत जाते. तेवढ्यात गाडी सुटते. तिची गाडी चुकल्याने ती खूप हताश होते. हे सारे पाहात असलेला आलोकही ती गाडी सोडतो. त्यानंतर आलोक व अश्विनी मिळेल ते वाहनाने गोव्याला जायला निघतात. आता प्रवासात एक वळण असे येते की जिथे मडगाव व वॉस्को या ठिकाणी जाण्याकरित दोन वेगवेगळे रस्ते समोर येतात. आता आलोक व अश्विनी या दोघांनाही आपापल्या मार्गाने जावे लागणार आहे. ही कदाचित त्यांची पुन्हा झालेली पण शेवटचीही भेट असेल. याआधी आपणच नाकारलेली अश्विनी ही मुलगी गोव्यापर्यंतच्या प्रवासादरम्यान आलोकला आवडायला लागलेली असते. तो आपल्या भावना तिच्याकडे व्यक्त करणार तेवढ्यात अश्विनी त्याला सांगते की तिचे ऋग्वेद साठे नावाच्या मुलाबरोबर लग्न ठरलेले आहे. ही गोष्ट कळल्यावर आलोकला प्रचंड धक्का बसतो. मात्र तरीही नानाप्रकारे प्रयत्न करुन आलोक आपल्या मनातील अश्विनीप्रती असलेल्या खऱ्या भावना तिच्यापर्यंत पोहचविण्यात यशस्वी होतो. आलोकचे आपल्याविषयीचे बदललेले मत ऐकून अश्विनीला काय वाटते? अश्विनीचे ऋग्वेद साठेबरोबर लग्न होते का? अश्विनी आलोकच्या प्रेमाला नकार देते की त्याचा स्वीकार करते? असे प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांचा उलगडा चित्रपट पाहाताना होईलच.
अभिनय - आलोकच्या भूमिकेत वैभव तत्ववादी आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नृत्य व अभिनयाची उत्तम जाण असलेले जे युवा कलाकार आहेत त्यामध्ये वैभव हा अधिक उजवा आहे. त्याने आलोक याची भूिमका चांगली केली आहे. अनेक मुलींना नाकारणारा व स्वत:च्याच मस्तीत असणारा आलोक जसा त्याने छान रंगविला आहे तसेच आपण याआधी नाकारलेली अश्विनी जेव्हा त्याला मनापासून आवडायला लागते ते परिवर्तनही त्याने व्यवस्थित दाखविले आहे. सग‌ळ्यात कमाल केली आहे ती पूजा सावंतने. ती एक व्हर्सटाइल अभिनेत्री आहे. तिने अश्विनीच्या भूमिकेला असलेले विनोदी पैलू छानरितीने उलगडून दाखविले आहेत. आता या चित्रपटाची गंमत अशी आहे की, त्या त्या कलाकारांच्या वाट्याला आलेले प्रसंग कितीही हास्यास्पद असले तरी या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ते सुसह्य केलेले आहेत. गिरीश ओक ( पात्राचे नाव - श्री. भावे), किशोरी अंबिये (सौ. भावे), अभिजित चव्हाण (चंद्रचूड देशपांडे), मीनल बाळ (रोहिणी डांगे), गणेश हजारे ( प्रभाकर सारंग), विश्वास सोहोनी (गोऱ्हे), भारत सावळे (प्रवासी) या कलाकारांनी वैभव तत्ववादी व पूजा सावंतला बरी साथ दिली आहे.
दिग्दर्शन - भेटली तू पुन्हा या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद हे संजय जमखंडी यांनी लिहिताना ते अशा पद्धतीने लिहिले आहेत की त्यातून फक्त आणि फक्त भीषण दर्जाचाच चित्रपट निर्माण होईल. या कथेला पुण्यापासून गोव्यापर्यंत रेल्वे व अन्य वाहनाने आणताना दिग्दर्शकाची खूपच दमछाक झालेली आहे आणि ती चित्रपटात वारंवार दिसते आहे. मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात आलोकने आपल्याला नकार दिला होता हे अश्विनी चित्रपटात इतक्या वेळा सांगते की त्याचा कंटाळा यायला लागतो. त्याचबरोबर आलोक व अश्विनीचे रेल्वेप्रवासादरम्यान जे अवखळ प्रसंग आहेत त्यातील काहींचा दर्जा हा बालिश आहे. त्यात प्रसंगांमध्ये कुठेही दिग्दर्शकाचे कौशल्य जाणवत नाही. रेल्वेगाडी चुकल्यानंतर गोव्याला जाईपर्यंत आलोक, अश्विनी कर्नाटकातही अलगदपणे जाऊन येतात. कानडी भाषिकही चित्रपटात डोकावून जातात. गोव्याला जाताना एका निसर्गरम्यस्थळी आपण जात आहोत असे सांगून अश्विनी व आलोक जिथे जातात ते बोरिवली कान्हेरी गुंफांचे लोकेशन असते. ते लोकेशन ज्याला लक्षात येते ते प्रेक्षक या गोष्टींवर खदाखदा हसतात. सांगायचा मुद्दा असा की कितीही सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली असो, चित्रपटात दृश्ये दाखविताना जशी कपड्यांची कंट्युनिइटी नीट सांभाळावी लागते, तशी लोकेशन्सचीही. याचे भान चंद्रकांत कणसे यांना हा चित्रपट दिग्दर्शित करताना राहिलेले नाही. त्यामुळे हा चित्रपट कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शनाच्या अंगाने अतिशय ढिला झालेला आहे. फक्त कलाकारांच्या अभिनयामुळेच या चित्रपटात काही राम शिल्लक आहे. या अभिनयामागेही दिग्दर्शकाचे कौशल्य किती असेल याचीही शंका येते. बाळबोधपेक्षाही वाइट दिग्दर्शन आहे या चित्रपटाचे. त्यामुळे (भीषण चित्रपटा) भेटू नको पुन्हा कधीही... असे म्हणण्याची पाळी प्रेक्षकांवर आली आहे.
संगीत - या चित्रपटाची गीते ही मंगेश कांगणे यांनी संगीत चिनार महेश यांनी दिले आहे. ही गाणी स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, निखील मोदगी, सिद्धार्थ महादेवन यांनी गायली आहेत. पण अगदी खरे सांगायचे तर एकही गाणे लक्षात राहात नाही.                                                                                                                                                    http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-movie-review-of-marathi-film-bhetali-tu-punha-5656460-PHO.html

Sunday, July 23, 2017

बालगंधर्वांच्या प्रदीर्घ वास्तव्याचा साक्षीदार असलेला माहिम येथील बंगलाही आता जाणार काळाच्या पडद्याआड! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 15 जुलै 2017



दै. दिव्य मराठीच्या दि. 15 जुलै 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीचा मजकूर, जेपीजी फाइल व वेबलिंक सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/15072017/0/1/
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/15072017/0/9/
----
बालगंधर्वांच्या प्रदीर्घ वास्तव्याचा साक्षीदार असलेला माहिम येथील बंगलाही आता जाणार काळाच्या पडद्याआड!
- आज, १५ जुलै रोजी बालगंधर्वांच्या निधनाला झाली ५० वर्षे पूर्ण
- मुंबईतील बालगंधर्वांच्या एकेक स्मृतिखुणा झाल्या पुसट
- समीर परांजपे
मुंबई, दि. 15 जुलै - ज्यांनी आपल्या अवीट मधुर गायकीने अवघ्या महाराष्ट्राला रिझविले ते नटश्रेष्ठ नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या निधनाला १५ जुलै रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेची महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्तुळात फारशी दखल घेतली गेली नाही ही लज्जास्पद गोष्ट आहे. बालगंधर्व आपल्या अखेरच्या काळात मुंबईतील माहिम भागात आशिया मंझिल (आताचे अग्रवाल भवन) या वास्तूत राहात होते ती वास्तूही तीन वर्षांपूर्वी एका बिल्डरने विकत घेतली अाहे. तिथे काही काळाने नवी गगनचुंबी इमारत उभी राहिल व बालगंधर्वांची मुंबईमध्ये वास्तूच्या रुपात उभी असलेली एकमात्र आठवणही काळाच्या पडद्याआड नाहीशी होईल.
माहिम पश्चिमेला वीर सावरकर मार्गावर कापड बाजाराच्या नजिक अग्रवाल भवन हा एकमजली बंगला उभा आहे. ही वास्तू आता जीर्ण झाली आहे. बालगंधर्व राहायचे त्यावेळी या बंगल्याचे नाव आशिया मंझिल होते. त्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर बालगंधर्व त्यांची दुसरी पत्नी गोहरबाईसह राहायचे. हा बंगला सरकारी मालमत्ता होती. बालगंधर्वांच्या मृत्यूनंतर हे घर शासनाने पूर्णपणे ताब्यात घेतले आणि नारायण कटारिया या सिंधी गृहस्थाला विकले. कटारिया यांच्याकडून रामेश्वर दयाल अग्रवाल यांनी १९८१ साली खरेदी केला. त्यानंतर आशिया मंझिलचे नाव बदलून ते अग्रवाल भवन ठेवण्यात आले. २०१३ साली अग्रवाल भवन हा बंगला अग्रवाल यांच्याकडून एम. जे. बिल्डर्स यांनी विकत घेतला. आता नजिकच्या काळात हा बंगला पाडून साहजिकच तिथे नवी इमारत बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. या बंगल्यात पूर्वी बालगंधर्व ज्या पहिल्या मजल्यावर राहात होते तो मजला आता रिकामाच असतो. तिथे कोणीही राहात नाही. तळमजल्याला जेटली नावाचे कुटुंब अजूनही राहाते.
या वास्तूसंदर्भात `तो एक राजहंस' या पुस्तकात लेखक बाळ सामंत यांनी काही माहिती दिली आहे. त्यानूसार बालगंधर्व माहिमच्या काद्री महलमधून १९४७च्या सुमारास आशिया मंझिलमध्ये राहायला गेले. त्याअाधी ते माहिमच्या चर्चच्या मागे अरब मंझिलमध्ये राहात होते. आशिया मंझिल ही इमारत माहिम बाजारासमोर अगदी रस्त्यावरच आहे. या काळात हे घर घेण्याचा व्यवहार बालगंधर्व यांची दुसरी पत्नी गोहरबाईच्या अंगाशी आला. आशिया मंझिल विकत घेण्यासाठी एका मुस्लिम व्यक्तीशी गोहरबाईने करार करुन विसारादाखल पंचवीस हजार रुपये दिले. परंतु खरेदीचा हा करार पूर्ण होण्यापूर्वीच ती मुस्लिम व्यक्ती पाकिस्तानात निघून गेल्याने भारत सरकारने आशिया मंझिल निर्वासिताची मालमत्ता म्हणून जप्त करुन ताब्यात घेतले. ते घर जप्तीतून मुक्त व्हावे म्हणून बालगंधर्वांनी जंगजंग पछाडले. त्यासाठी त्यांनी दिल्लीला डॉ. केसकर, काकासाहेब गाडगीळ यांच्याशी पत्रव्यवहार केला. सरतेशेवटी काकासाहेब गाडगीळांच्या प्रयत्नाने महिना ऐंशी रुपये भाड्याने ते घर बालगंधर्वांना राहायला मिळाले. घर खरेदीचा मुस्लिम व्यक्तीशी केलेला व्यवहार गोहरबाईच्या नावाने झालेला होता. तो पूरा न झाल्याने बालगंधर्वांचे पंचवीस-तीस हजार रुपये गेले ते गेलेच. या बंगल्यात वास्तव्य करीत असताना त्यांची तब्येत फारच बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतून पुण्यात हलविण्यात आले. पुण्यातच त्यांना १५ जुलै १९६७ला अंत झाला. 
महापालिकेने ऐतिहासिक माहितीचा नीलफलकही लावला नाही.
१९५२ साली बालगंधर्वांच्या एका पायात दोष उत्पन्न झाला. त्यामुळे त्यांना एक पाय ओढीत चालावे लागे. १९५५ साली त्यांचे दोन्ही पाय अधू झाल्याने त्यांचे जगणे संपूर्णपणे परावलंबी झाले. आशिया मंझिलमध्ये वरच्या मजल्यावर जी एक मोठी खोली होती, त्यातील लाकडी पलंगावर बालगंधर्व बसून असत. त्यांच्या शेजारच्या खोलीत गोहरबाई व तिची नाते‌वाईक आशम्मा वगैरे मंडळी राहात असत. बालगंधर्व एकटेच असले म्हणजे तुकारामाच्या गाथेतील अभंग वाचत बसलेले असत. त्यांची आर्थिक अवस्था अतिशय हालाखीची होती. १९ नोव्हेंबर १९६३ रोजी रात्री साडेबारा वाजता गोहरबाईचे निधन आशिया मंझिलमध्येच झाले. त्यानंतर बालगंधर्व अगदीच एकाकी व दयनीय अवस्थेत या वास्तूत जगत होते. बालगंधर्व पूर्वी आशिया मंझिल हे नाव असलेल्या व त्यानंतर अग्रवाल भवन हे नाव धारण केलेल्या बंगल्यात राहात होते असा नीलफलक मुंबई महानगरपालिकेला त्या वास्तूजवळ लावता आला असता पण ती सुबुद्धीही पालिकेला झाली नाही.

मराठी रंगभूमीच्या क्षितिजावर आविष्कार प्ले स्टोअर, रंगवाचा या दोन नव्या त्रैमासिकांचा उदय - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी दि. 18 जुलै 2017


दै. दिव्य मराठीच्या दि. 18 जुलै 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेजलिंक, जेपीजी फाइल व मुळ मजकूर सोबत देत आहे
-----
मराठी रंगभूमीच्या क्षितिजावर आविष्कार प्ले स्टोअर, रंगवाचा या दोन नव्या त्रैमासिकांचा उदय
नियतकालिकांना घरघर लागलेली असताना मराठी नाट्यसंस्थांनी केले अनोखे धाडस
- समीर परांजपे
मुंबई, दि. 18 जुलै - मराठी रंगभूमीला वाईट दिवस आले आहेत, मराठी नियतकालिकांना घरघर लागली आहे अशी चर्चा एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूस रंगभूमीविषयक घडामोडीला वाहिलेल्या दोन नव्या मराठी नियतकालिकांचा अलीकडेच उदय झाला आहे. मुंबईतील अाविष्कार या नाट्यसंस्थेच्या वतीने `आविष्कार प्ले स्टोअर' व कोकणातल्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृितक प्रतिष्ठानच्या वतीने `रंगवाचा' ही नवी त्रैमासिके प्रसिद्ध करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नाट्यविषयक घडामोडींच्या विश्लेषणासाठी रंगकर्मी व प्रेक्षकांना दोन नवी हक्काची लेखनव्यासपीठे उपलब्ध झाली आहेत.
मराठी रंगभूमीच्या अलीकडच्या काळातील इतिहासात अत्यंत दुर्मिळ म्हणावी अशीच ही घटना आहे. `अाविष्कार' या संस्थेने जून महिन्यात आपल्या `आविष्कार प्ले स्टोअर' या नव्या त्रैमािसकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. त्याची किंमत अवघी पाच रुपये ठेवण्यात आली आहे. हे त्रैमासिक सुरु करण्यामागची मनोभूमिका सांगताना `अाविष्कार' नाट्यसंस्थेचे प्रमुख अरुण काकडे यांनी सांगितले की, अाविष्कार सांस्कृतिक केंद्राचे आविष्कार प्ले स्टोअर त्रैमासिक हे नवे रुप आहे. प्रख्यात अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी अाविष्कार प्लेस्टोअरचा पहिला अंक प्रसिद्ध करण्यात आला. नाट्यविषयक माहिती, घडामोडी, नाटकाच्या विविध अंगांची चर्चा देणाऱ्या मासिक/त्रैमासिकांची एक मोठी परंपरा आपल्याकडे होती परंतु दुर्दैवाने सध्या लोप पावत चालली आहे. त्या परंपरा पुन्हा उज्ज्वल स्वरुपात पुढे यावी यासाठी `आविष्कार'ने आविष्कार प्ले स्टोअर हे नवे त्रैमासिक सुरु केले आहे. या अंकामध्ये सुलभाताई देशपांडे यांच्या आठवणी सांगणारा गोविंद निहलानी यांनी लिहिलेला विशेष लेख, गोष्टी सांगितल्या पािहजेत हा जयंत पवार लिखित लेख आहे. या त्रैमासिकाचे संपादक अरुण काकडे असून संपादक मंडळात दीपक राजाध्यक्ष, युगंधर देशपांडे, पराग ओझा, कृणाल आळवे यांचा समावेश आहे.
कोकणातल्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृितक प्रतिष्ठानच्या वतीने `रंगवाचा' या त्रैमासिकाचा पहिला अंक फेब्रुवारीमध्ये व त्यानंतर दुसरा अंक मेमध्ये प्रसिद्ध झाला. आता तिसऱ्या अंकाच्या मजकुराची जुळवाजुळव सुरु आहे. `रंगवाचा' हे नवे रंगभूमीविषयक त्रैमासिक का सुरु करावेसे वाटले याविषयी संपादक वामन पंडित यांनी म्हटले आहे की, गेली चार दशके मराठी रंगभूमीसंबंधात वैयक्तिक व संस्थात्मक काम करताना दस्ताऐवजीकरणाचा अभाव सतत अस्वस्थ करीत राहिला. नुसती अस्वस्थता बाळगून राहण्यापेक्षा निदान आपल्या परीने काही काम सुरु करावे ही रंगवाचा नियतकालिक प्रकाशित करण्यामागची मुळ प्रेरणा आहे. आजच्या जमान्यात मुद्रित नियतकालिकाची आवश्यकताच काय असेही या क्षेत्रातील थोरा-मोठ्यांचे म्हणणे होते. तरीही वसंतराव आचरेकर सांस्कृितक प्रतिष्ठानने हे नियतकालिक सुरु करण्याचा माझ्या हट्टाला मान्यता दिली. मासिक नाही निदान त्रैमासिक सुरु करुन ते निरंतर चालविता येईल का याची चाचपणी करुन निर्णय पक्का केला. दरम्यान रंगवाचा हे नाव रंगकर्मी अतुल पेठे यांनी सुचविले. अनेक घडामोडीनंतर रंगवाणी त्रैमासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला व आमचे प्रयत्न सार्थकी लागले.
रंगभूमीविषयक नियतकालिके भराभर बंद पडली...
मराठी रंगभूमीच्या इतिहासात रंगभूमी या विषयाला वाहिलेली काही नियतकालिके सुरु झाली व कालांतराने अस्तंगत झाली. यात सर्वात पहिले जे लक्षणीय नियतकािलक होते त्याचे नावच `रंगभूमी' होते. १९०७ ते १९१६ या कालावधीत रंगभूमी नियतकालिकाचे प्रकाशन नित्यनेमाने होत असे. त्यानंतरचे महत्वाचे नियतकािलक म्हणजे मुंबईतील गिरगाव येथील साहित्य संघाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणारे `साहित्य' नियतकालिक. सुधीर दामले हे संपादक असलेले नाट्यदर्पण हे नियतकालिकही मराठी रंगभूमीवरील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींबद्दल रसिकतेने लिहित असे. एनसीपीएमध्ये फोर्ड फाऊन्डेशनने दिलेल्या अनुदानातून संगीततज्ज्ञ अशोक रानडे यांनी एक मराठी नियतकालिक सुरु केले होते. त्यात मराठी नाटक, संगीत, नृत्य आदी सर्व कलांबद्दल उत्तम लेख असायचे. साहित्य नियतकालिक वगळता बाकीची सर्व नियतकालिके काही ना काही कारणांनी कालांतराने बंद पडली. मराठी रंगभूमीवरील घडामोडींची प्रकर्षाने दखल घेणाऱ्या नियतकालिकांची उणीव जाणवत असताना ती पोकळी भरुन काढण्यासाठी `आविष्कार प्ले स्टोअर' व `रंगवाचा' या दोन नव्या त्रैमासिकांचा उदय झाला.

Friday, July 21, 2017

सृजनाला सलाम! - दहा क्लासिक या अनिता पाध्ये लिखित पुस्तकाचे परीक्षण - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी १८ जुलै २०१७ची मधुरिमा पुरवणी



दै. दिव्य मराठीच्या दि. १८ जुलै २०१७च्या अंकातील मधुरिमा या पुरवणीमध्ये मी केलेले हे पुस्तक परीक्षण. त्याची वेबपेज लिंक, टेक्स्टलिंक, जेपीजी फाइल व मुळ मजकूर पुढे दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-write…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/m…/246/18072017/0/8/
---
स्लग : पुस्तकांच्या गावा
-------------------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-------------------
सृजनाला सलाम!
------------------
असे काही चित्रपट असतात, जे आपल्या मनात कायमस्वरूपी घर करून बसतात. गतकाळातल्या आठवणींचा, नात्यांतल्या गोडव्याचा एक भाग होऊन जातात. त्या चित्रपटांची कथा, पटकथा, संगीत, संवाद, कलाकारांचा अभिनय; इतकेच नव्हे, तर त्यांची वेषभूषा, रंगभूषा यापैकी प्रेक्षकांना आपापल्या रुचीप्रमाणे काहीही आवडू शकते. किंवा अख्खा चित्रपटही ते डोक्यावर घेऊ शकतात. व्यावसायिक चौकटीतल्या उत्तम चित्रपटाची प्रत्येकाची संकल्पना निराळी असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनही काही चित्रपट त्यापलीकडेही म्हणजे, ‘क्लासिक्स’ दर्जात मोडतात. ते कधी टीव्हीवर झळकले, तर प्रेक्षक ते आवर्जून पुन्हा पाहतात. त्या चित्रपटांविषयी बोलतात. ही नेमकी नस ओळखून चित्रपटांच्या सुजाण अभ्यासक अनिता पाध्ये यांनी क्लासिक्स सदरात मोडणारे दहा हिंदी चित्रपट निवडले, व हे चित्रपट नेमके बनले कसे, यामागची निर्मिती कथा एकेका प्रकरणात वाचकांना उलगडून दाखविली. त्यातूनच तयार झाले आहे, ‘दहा क्लासिक्स’ हे पुस्तक. 
दो बिघा जमीन, प्यासा, दो आँखे बारह हाथ, मदर इंडिया, मुगले आजम, गाइड, तिसरी कसम, आनंद, पाकिजा, उमराव जान या दहा चित्रपटांच्या निर्मितीची प्रक्रिया वाचताना, त्या काळात आपण नकळत भ्रमंती करायला लागतो. याचे कारण, अनिता पाध्ये यांची चित्रवाही लेखनशैली. पूर्वीच्या काळी घडलेला एखादा प्रसंग मांडताना त्या अत्यंत समर्पक व मोजक्या शब्दांत त्याबद्दल लिहून जातात. या पुस्तकाच्या मनोगतात अनिता पाध्ये यांनी म्हटले आहे की, ‘निरनिराळे दहा आशय-विषय व निरनिराळे दहा सर्जनशील, प्रतिभावंत दिग्दर्शक कलाकार असलेल्या दहा निवडक क्लासिक चित्रपटांचा निर्मिती प्रवास लिहिण्याचा मी निर्णय घेतला. बिमल रॉय, गुरुदत्त, विजय आनंद, व्ही. शांताराम, हृषिकेश मुखर्जी, मेहबुब खान, कमाल अमरोही, के. असिफ, मुजफ्फर अली या दिग्गज दिग्दर्शकांच्या प्रत्येकी एका चित्रपटाची निवड केली.'
‘दो बिघा जमीन’मध्ये फरफट झालेल्या शेतकऱ्याची व्यथा आहे, तर ‘दो आँखे बारह हाथ’मध्ये मानवतेचा संदेश आहे. ‘मदर इंडिया’मध्ये स्वाभिमानी, आदर्श स्त्री आणि प्रेमळ परंतु प्रसंगी कठोर होणाऱ्या आईची कहाणी आहे. ‘आनंद’मध्ये जगण्याचे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. ‘मुगले आजम’मध्ये कर्तव्यनिष्ठ मुघल बादशाह आणि नर्तिकेवर प्रेम करणारा राजपुत्र यांच्यातील तात्त्विक संघर्ष आहे. ‘पाकिजा’मध्ये गणिका असणाऱ्या गायिकेची अनोखी प्रेमकथा पाहायला मिळते. ‘गाइड’मध्ये नकळतपणे अध्यात्माकडे ओढल्या जाणाऱ्या तरुणाची कथा आहे, तर ‘तिसरी कसम’मध्ये गाडीवानाची असफल प्रेमकथा आहे. ‘प्यासा’मध्ये स्वार्थी जगापासून दूर जाऊ पाहणाऱ्या कविमनाच्या तरुणाची मनोव्यथा आहे.
असे निरनिराळे पैलू असलेले चित्रपट घेऊन त्यांचे अंतरंग उलगडून दाखविताना अनिता पाध्ये यांची लेखणी चिकित्सकही होते. त्याचा फायदा असा की, वाचकाला त्यामुळे बरीच विविधांगी माहिती मिळत जाते. ‘आनंद मरा नही, आनंद मरते नही' असे सर्वांना सांगून गेलेला ‘आनंद' चित्रपटाचा नायक साकारला राजेश खन्ना यांनी. पण त्या भूमिकेसाठी आधी हृषिकेश मुखर्जी यांनी शशी कपूरची निवड केली होती, हे आपल्याला माहीतही नसते. आनंद चित्रपटातील भूमिका हातची जाऊ नये, म्हणून इतर वेळेला घमेंडीने वागणाऱ्या राजेश खन्ना याने हृषिकेश मुखर्जी यांच्यासमोर नमते घेतले होते. या चित्रपटातील आनंदची भूमिका ही आपल्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरणार आहे, याची राजेश खन्नाला कल्पना आली होती. मात्र, राजेशच्या सेटवर उशिरा येण्याला कंटाळून हृषिकेश मुखर्जी यांनी ‘आनंद’ चित्रपटाचे चित्रीकरण कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राजेश खन्ना याने हृषिकेश मुखर्जी यांचे मन रमेश देव यांच्या मदतीने वळविल्याने हा बाका प्रसंग टळला होता. असे अवघड प्रसंग प्रत्येक चित्रपट निर्मितीमध्ये येतात. या अडथळ्यांवर मात करून जो निर्माता, दिग्दर्शक, कलाकार तो चित्रपट पूर्ण करतात, उत्तमरीतीने तयार करतात, त्यांच्या मेहनतीला दाद ही द्यायलाच हवी. नेमका तोच प्रयत्न ‘दहा क्लासिक्स’ या पुस्तकात करण्यात आलेला आहे.
विजय आनंद यांनी दिग्दर्शित केलेला ‘गाइड’ हा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटांना पडलेले वास्तववादी पण गोड स्वप्न होते. ‘गाइड’ चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, दिग्दर्शक विजय आनंद यांनी प्रेक्षकांना अध्यात्माची ओळख करून देण्याचा, अध्यात्म सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी साधू झालेल्या राजू गाइडद्वारे प्रेक्षकांना त्यांनी प्रवचन दिले नाही, किंवा अध्यात्माचे डोसही पाजले नाहीत. शेवटच्या वीस मिनिटांमध्ये भारतीय जीवन, तत्त्वज्ञान, मानव आणि परमात्मा यांच्यातले नाते आदी गोष्टींद्वारे अध्यात्मासारखा अत्यंत गहन विषय त्यांनी सोप्या शब्दांमध्ये सांगितला आहे. उलटपक्षी राजू गाइडला उलगडत गेलेले विश्वाचे रहस्य, गावकऱ्यांविषयी त्याच्या मनात निर्माण झालेली करुणा, त्यातून येणारी अनुभवसिद्धता हे सारे विजय आनंद यांनी दिग्दर्शक या नात्याने अभिनेता देव आनंदकडून सुंदरपणे साकारून घेतले आहेत. चित्रपटांची एक मर्यादा असते, पण ‘गाइड’मध्ये जी सखोलता आहे, ती अन्य भारतीय चित्रपटांमध्ये सहसा आढळत नाही. या व अशा अनेक निरीक्षणांसह अनिता पाध्ये यांनी त्यांना क्लासिक वाटणाऱ्या दहा चित्रपटांची निर्मितीकथा सांगताना वाचकांना त्या चित्रपटाचे मर्मही सांगितले आहे.
‘मदर इंडिया’ हा अजून एक अजरामर चित्रपट. त्यातील नर्गिसची भूमिका कोण विसरेल? आतापर्यंत चित्रपटांमध्ये आईची अनेक रूपे वेगवेगळ्या दिग्दर्शक-लेखक जोडीने साकारली. परंतु "मदर इंडिया'मधली आईची अत्यंत प्रभावी व्यक्तिरेखा नंतरच्या कुठल्याच चित्रपटात दिसली नाही आणि आईची व्यक्तिरेखा चित्रपटात असणे गरजेचे अाहे, असे मानणाऱ्या एकाही निर्माता-दिग्दर्शकाच्या मनात हिरोऐवजी आईची मध्यवर्ती भूमिका असणारा चित्रपट बनविण्याचा विचार काही काळ तरी आला नाही, ही खरंच आश्चर्यकारक गोष्ट आहे, असे म्हणावे लागेल. म्हणूनच मदर इंडिया व त्याचे दिग्दर्शक मेहबूब खान यांचे चित्रपटक्षेत्रातले स्थान आजही अबाधित आहे. यापुढेही ते कायम राहील, यात शंका नाही.
या पुस्तकातील इतर सात क्लासिक चित्रपटांबद्दल नेमके काय लिहिले आहे, याचा आढावा इथे विस्तारभयास्तव घेणे शक्य नाही. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रख्यात पटकथा लेखक सलीम खान यांनी म्हटले आहे की, चित्रपटक्षेत्राची मनोरंजक तसेच वास्तववादी माहिती जाणून घेण्यासाठी "दहा क्लासिक्स' हे पुस्तक वाचकांना नक्कीच उपयोगी ठरणार आहे. जेव्हा एखादा लेखक आतली गोष्ट सांगत असतो, तेव्हा त्याने त्याबाबत नीट अभ्यास केलेला असतो. त्याची या गोष्टींकडे पाहण्याची एक खास नजर असते. सदर पुस्तकात हे सारे गुण अाहेत.
एकंदरीतच, ‘दहा क्लासिक्स’ या पुस्तकाचे प्रत्येक पान वाचून संपवताना सलीम खान यांनी पुस्तकाच्या प्रारंभी व्यक्त केलेली भावना वाचकांच्याही मनात सहजपणे उत्पन्न होईल, असा परिणाम लेखिकेने निश्चितच यशस्वीपणे साधला आहे. 
पुस्तकाचे नाव : दहा क्लासिक्स
लेखिका : अनिता पाध्ये
प्रकाशक : देवप्रिया पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या : ३२१
किंमत : ‌~ ४८०/-

उमा भेंडे : सोज्ज्वळ रुपाची मराठमोळी नायिका - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी दि. २१ जुलै २०१७


अभिनेत्री उमा भेंडे यांच्यावर मी लिहिलेला विशेष लेख दि. २१ जुलै २०१७ रोजी दै. दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाचा मुळ मजकूर, वेबपेजलिंक, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
Epaper http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/241/20072017/0/10/
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-MB-uma-bhendesimpale-…
----
उमा भेंडे : सोज्ज्वळ रुपाची मराठमोळी नायिका 
--
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
--
१९६३ साल. माधव शिंदे हे थोरातांची कमळा हा चित्रपट दिग्दर्शित करीत होते. ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद भालजी पेंढारकर यांनी लिहिलेले होते. यातील थोरातांच्या कमळाच्या म्हणजे नायिकेच्या भूमिकेत वंदना यांची निवड झाली होती. पण काही कारणाने त्यांना ते काम करता आले नाही. मग ही भूमिका उमा भेंडे यांच्याकडे चालून आली आणि त्यांनी तिचे सोने केले. या चित्रपटातील माझ्या ओठांत रंगीत गाणी, झुळझुळे नदी ही बाई, माथ्यावरती ऊन किती तापले आदी गाणी जशी रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहिली तसाच लक्षात राहिला तो उमा भेंडे यांचा सहजसुंदर अभिनय. थोरातांची कमळा हा चित्रपट प्रदर्शित झाला तो कालावधीही लक्षात घ्यायला हवा. त्यावेळी कोल्हापूर हे मराठी चित्रपटनिर्मितीसाठी जणू नंदनवनच होते. १९४०च्या आधीपासून कोल्हापूर परिसरात भालजी पेंढारकर हे चित्रतपस्वी मराठी चित्रपट बनविण्यात मश्गुल होते. भालजी पेंढारकरांचा ओढा ऐतिहासिक चित्रपट बनविण्याकडे अधिक. त्यातही शिवकाळावर चित्रपट बनविणे हा तर त्यांचा निजध्यास. कोल्हापूरमध्ये भालजी पेंढारकरांच्या हाताखाली जयप्रभा स्टुडिओमध्ये अनेक दिग्गज कलाकार घडले. त्यात चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचना अशा अनेकांचा समावेश होता. त्यानंतरच्या दुसऱ्या पिढीतील जे कलाकार भालजी पेंढारकर यांच्या हाताखाली घडले त्यात उमा भेंडे यांचा समावेश होता. मराठी चित्रपटसृष्टीत सोज्ज्वळ चेहेऱ्याच्या तसेच सशक्त अभिनय करणाऱ्या नायिकांची एक परंपरा आहे. त्यामध्ये सुलोचना, जयश्री गडकर, सीमा देव, आशा काळे अशा काही अभिनेत्रींचा समावेश होतो. या परंपरेतीलच एक अभिनेत्री म्हणजे उमा भेंडे या होत्या. थोरातांची कमळा या चित्रपटातील भूमिकेमुळे उमा भेंडे यांचे सोज्ज्वळ व्यक्तिमत्व व अभिनय क्षमता ही रसिकांपुढे प्रकर्षाने आली.
उमा या मुळच्या कोल्हापूरच्या. त्यांचे वडील अत्रे यांच्या कंपनीत कामाला होते. तर आई रमादेवी प्रभात कंपनीत कामाला होती. अशा कलासक्त घरामध्ये १९४५ साली जन्म झालेल्या या मुलीला नृत्य, नाटक, मेळे यामध्ये काम करण्यास घरातून कोणी मज्जाव करणे शक्यच नव्हते. उमा भेंडे त्यांच्या लहानपणी मिरजकर यांच्याकडे कथ्थक आणि भरनाट्यमचे शिक्षण घेत होत्या. त्याच जोडीला त्यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या नृत्याच्या परीक्षाही दिल्या. वयाच्या पाचव्या वर्षी उमा यांनी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाच्या मेळ्यात केलेल्या गारुडी नृत्याचे खूपच कौतुक झाले. या बालकलाकाराला २००-३०० बक्षिसे त्या काळात मिळाली. कोल्हापूरात मेळ्यांमध्ये नाटकेही होत. त्यातही उमा यांनी बालवयात कामे केली होती. या गुणांची पारख करुन भालजी पेंढारकरांनी उमा भेंडे यांना आकाशगंगा या चित्रपटात छोट्या सीतेची भूमिका देऊ केली व त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा अशा रितीने श्रीगणेशा झाला.
आकाशगंगा हा चित्रपट करताना उमा यांचे मुळ नाव अनुसया हेच पडद्यावर झळकले होते. त्यानंतर त्यांनी अंतरीचा दिवा या चित्रपटात काम केले. हा चित्रपट लता मंगेशकर यांनी बनविला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्या तो बघायला गेल्या तर त्यात त्यांचे नाव कुठेच दिसले नाही. त्यामुळे अनुसया हैराण होणे स्वाभाविक होते. अखेर त्यांनी काहीशा दबल्या आवाजातच भालजी पेंढारकर यांच्याकडे चौकशी केली की, मी चित्रपटात काम करुनही श्रेयनामावलीत माझे नाव कुठेही दिसले नाही असे का? त्यावर भालजी पेंढारकर हसले व म्हणाले ` चित्रपटाच्या जाहिरातीत नवतारका उमा असे जे नाव झळकते आहे ते तुझेच आहे.' चित्रपटसृष्टीत नव्याने आलेल्या अनुसया साक्रीकर हिचे अनुसया हे नाव लता मंगेशकर यांना काहीसे जुने वाटले होते. त्यामुळे लतादिदिंनी ते बदलून उमा केले. 
उमा भेंडे यांच्या चित्रपट कारकिर्दीचा विचार केला तर १९५९ ते १९७९ पर्यंत त्यांनी नायिका म्हणून खऱ्या अर्थाने आपली कारकिर्द गाजवली. त्यांनी तामिळ, तेलुगु, हिंदी, छत्तीसगढी अशा भाषांतील चित्रपटांतही कामे केली. उमा भेंडे यांचा नायिका म्हणून झळकलेला पहिला चित्रपट कोणता असे विचारले तर चटकन उत्तर मिळेल ते म्हणजे थोरातांची कमळा. हे उत्तर बरोबर आहे पण वस्तुस्थिती थोडीशी निराळी होती. `यालाच म्हणतात प्रेम' या चित्रपटामध्ये त्या नायिका म्हणून झळकणार होत्या. त्यांचे नायक होते अरुण सरनाईक. पण योग असा होता की या चित्रपटाआधी त्या `थोरातांची कमळा'मधून नायिका म्हणून प्रेक्षकांसमोर आल्या. त्यानंतर क्षण आला भाग्याचा, शेवटचा मालुसरा, पाहू रे किती वाट, स्वयंवर झाले सीतेचे, आम्ही जातो आमुच्या गावा, मल्हारी मार्तंड, दैव जाणिले कुणी, मधुचंद्र, अंगाई, धरतीची लेकरं, काका मला वाचवा, भालू अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारुन रसिकांना आनंद दिला. सोज्ज्वळ व्यक्तिमत्वामुळे उमा भेंडे यांना हिंदी चित्रपटांतूनही काम करण्याची संधी मिळाली. हर हर महादेव, ब्रह्मा, विष्णू यासारख्या पौराणिक चित्रपटांतून उमा भेंडे यांनी कामे केली. त्याचप्रमाणे दोस्ती, एक दिल सौ अफसाने, खिलाडी, एक मासूम सारखे हिंदी चित्रपटही त्यांनी केले. पण त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतले वातावरण काही फारसे मानवले नाही. त्यांना खलनायिकेच्या भूमिका करायच्या होत्या पण त्यांची ती इच्छा काही पूर्ण झाली नाही.
` नाते जडले दोन जीवांचे' या चित्रपटाच्या निमित्ताने उमा यांची प्रकाश भेंडे यांच्याशी भेट झाली. आणि खरोखरच दोन जीवांचे नाते जडून ते विवाहबद्ध झाले. प्रकाश व उमा भेंडे यांनी स्थापन केलेल्या श्री प्रसाद चित्र संस्थेने निर्मिलेल्या चटकचांदणी, भालू, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार अशा अनेक चित्रपटांना उत्तम यश मिळाले. १९८० साली प्रदर्शित झालेल्या भालू या चित्रपटाची निर्मिती उमा भेंडे यांनीच केली होती तर दिग्दर्शन राजदत्त यांचे होते. कथा, पटकथा, संवाद बाबा कदम यांनी लिहिले होते. या चित्रपटातील भालू हा कुत्रा एक महत्वाचे पात्र होतेच परंतु उमा भेंडे, प्रकाश भेंडे हे दांपत्य तसेच नाना पाटेकर, निळू फुले आदी कलाकारांनी केलेल्या कसदार अभिनयाने हा चित्रपट सर्वांच्याच लक्षात राहिले. त्यामुळे उमा व प्रकाश भेंडे हे नाव घेताक्षणी रसिकांना आजही भालू हा चित्रपट चटकन आठवतो. अशा या उमा भेंडे यांना २०१२ साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 
उमा व प्रकाश भेंडे दांपत्याबद्दल अजून एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. प्रकाश भेंडे हे उत्तम चित्रकार आहेत. २००८ साली प्रकाश भेंडे यांचे `सोल ब्रिदिंग' या शीर्षकाचे एक चित्रप्रदर्शन भरले होते. त्याचे उद्घाटन त्यांनी पत्नी उमा भेंडे यांच्या हस्ते केले होते. `माझ्या चित्रकला साधनेत उमाची मला खूप मोठी मदत आजवर झालेली आहे. विविध चित्रसंकल्पनांबाबत मी नेहमी तिच्याशी सातत्याने चर्चा करत असे. त्यामुळे मी चितारलेल्या चित्रांची पहिली दर्शक व समीक्षकही तिच असते.' या शब्दांत प्रकाश भेंडे यांनी त्यावेळी आपल्या पत्नीविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. अशा कलासक्त भेंडे दांपत्याने मराठी चित्रपटसृष्टी व कलाक्षेत्राकरिता महत्वाचे योगदान दिले आहे. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओला वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी १७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली. त्यामुळे कोल्हापूरातील भालजी पेंढारकर युगातील एक दुवा आता योग्य प्रकारे जतन होईल. पण भालजी पेंढारकर युगातील दुव्यांपैकी एक असलेल्या उमा भेंडे यांचे बुधवारी निधन झाले. आता हा दुवा मात्र उमा भेंडे यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांच्या आठवणींच्या माध्यमातूनच प्रेक्षक दीर्घकाळ आपल्या मनाच्या कप्प्यात जतन करुन ठेवतील.
--

ती आणि इतर या चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे, दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंट, २१ जुलै २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी ती आणि इतर या नव्या चित्रपटाचे मी केलेले हे परीक्षण. त्या लेखाची वेबलिंक मी पुढे दिली आहे. 
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-REV-REV-movie-review-…
---
Movie Review : 'ती आणि इतर' अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी कथा
- समीर परांजपे | Jul 21, 2017, 14:44 PM IST
---
चित्रपट - ती आणि इतर
रेटिंग - 3 स्टार
कलावंत - सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, अविष्कार दारव्हेकर, भुषण प्रधान, प्रिया मराठे, सुमन पटेल, गणेश यादव
कथा/ संवाद - शांता गोखले
दिग्दर्शन - गोविंद निहलानी
संगीत - वसुदा शर्मा
निर्माता - प्रकाश तिवारी, पुनीत सिंह, दयाल निहलानी, धनंजय सिंह
श्रेणी- फॅमिली ड्रामा
--
अर्धसत्य, आक्रोश, द्रोहकाल यासारखे वास्तववादी विषय आपल्या चित्रपटांद्वारे मांडणारे प्रगल्भ दिग्दर्शक गोविंद निहलानी हे 'ती आणि इतर' हा आपला पहिलावहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करणार असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. निहलानी यांनी दिग्दर्शित केलेली तमस ही दुरचित्रवाहिनीवरील मालिका देखील समाजाचे वास्तव दाखविणारी होती. लेखिका मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्रजी नाटक 'लाईटस् आऊट'वर 'ती आणि इतर' हा मराठी चित्रपट आधारलेला आहे.
गोविंद निहलानी यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे या चित्रपटासाठी कॅमेरामन म्हणून काम केले होते. त्यानंतर तब्बल ४५ वर्षांनी निहलानी 'ती आणि इतर'च्या निमित्ताने पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीशी संलग्न झाले आहेत. हा चित्रपट केल्यानंतरचा तुमचा पुढचा प्रकल्प काय असेल असे प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर गोविंद निहलानी म्हणाले की, यापुढे मला अजून एखादा मराठी चित्रपट करायला आवडेल. हे सगळे लक्षात घेऊनच प्रेक्षक `ती आणि इतर' चित्रपट बघायला जाणार आहे.
कथा 
अनिरुद्ध गोडबोले आणि त्याची बायको नयना गोडबोले हे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. नयना गायिका देखील असते. त्आयांना हे. अनिरुद्ध व नयनाला दोन अपत्ये आहेत. मध्यमवयीन सुखी माणसांचा जसा संसार असतो तसा या गोडबोले दांपत्याचाही आहे. नयानाचा संसार सुखाने चाललेला असला तरी तिला एक खंत असते ती म्हणजे तिचा नवरा अनिरुद्ध तिला फारसा वेळ देत नाही. तो सतत कामात मग्न असतो. गृहिणी म्हणून घरात बसून राहाण्यापेक्षा ती आपला गायनाचा छंद जोपासते. त्यातूनच नयनाच्या गाण्यांचा नुकताच एक सोलो अल्बम प्रकाशित होतो. या अल्बमचे रसिक भरभरुन स्वागत करतात. हे यश साजरे करण्यासाठीच अनिरुद्ध व नयना आपल्या घरी एका छोटेखानी पार्टीचे आयोजन करतात. या पार्टीत गोडबोले दांपत्याच्या जवळची अगदी मोजकी मंडळी सहभागी झालेली असतात. त्यामध्ये त्यांचा फॅमिली फ्रेंड भास्कर, त्याची पत्नी माधवी, नयनाची मैत्रिण व व्यवसायाने पत्रकार असलेली जानकी, मित्र मोहन हे सहभागी झालेले असतात. ते गोडबोले यांच्या घरातील डिनर टेबलपाशी बसून छान गप्पा मारत असतात. ही चर्चा सुरु असताना अचानक एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज सर्वांना ऐकायला येतो. तो आवाज ऐकून गोडबोलेंच्या घरातले सारेच जण विचलित होतात. हा नेमका कोणाचा आवाज होता यावर चर्चा सुरु होते. ही महिला नेमकी कुठून ओरडत होती, ती कोण आहे हे शोधून काढायला पाहिजे असे मत पत्रकार असलेली जानकी व्यक्त करते. तर त्या महिलेच्या प्रकरणात आपण पडायला नको असे शु्द्ध पांढरपेशा वृत्तीचे मत भास्कर व्यक्त करतो. तर भास्करची पत्नी प्रिया म्हणते की, अडचणीत असलेल्या त्या महिलेला आपण मदत केली पाहिजे. शेवटी गोडबोलेंच्या घरातून पोलिसांना दूरध्वनी केला जातो व त्यांना बोलाविले जाते. अनिरुद्ध व नयना ज्या इमारतीत राहात असतात तिच्यासमोर अर्धवट बांधकाम होऊन तशीच राहिलेली एक इमारत असते. आजूबाजूच्या परिसरातील घरकाम करणाऱ्या मुली, महिला किंवा अन्य भागातील महिलांना या इमारतीत आणून त्यांच्यावर स्थानिक गुंड लैंगिक अत्याचार करीत असतात. त्यांच्या छळाला महिला खूप कंटाळलेल्या असतात पण गुंडांच्या दहशतीमुळे कोणी या गैरप्रकारांविरोधात ब्र काढायला धजावत नसतो. अनिरुद्ध व नयनाच्या इमारतीतल्या लोकांनाही गुंडांच्या उच्छादाबद्दल सर्वच माहिती असते पण त्या विरोधात कोणीच काही हालचाल करीत नाही. कारण प्रत्येकाला स्वत:च्या जीवाची काळजी असते. गोडबोलेंच्या घरातून दूरध्वनी आल्यानंतर पोलिस इन्स्पेक्टर रमाकांत गावंडे चौकशीसाठी येतात. तेही गोडबोले दांपत्य व त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांनाच समजवायला लागतात की असे प्रकार होत असतात पण त्याविरोधात चौकशी केली की, एकही माणूस खरी माहिती सांगायला पुढे येत नाही. अप्रत्यक्षपणे ते त्या गुंडांचीच बाजू घेत असतात. गोडबोले राहात असलेल्या इमारतीमधील लोकांकडेही पोलिस समोरच्या इमारतीतील गैरप्रकारांबद्दल चौकशी करतात पण ते सर्वच जण मुग गिळून बसलेले असतात. पार्टी सुरु असताना ज्या महिलेचा ओरडण्याचा आवाज येतो तिला मदत करण्यासाठी गोडबोले व त्यांच्या घरी जमलेली मंडळी खरच पुढाकार घेतात का? या सर्व प्रकरणात पोलिसांची नेमकी भूमिका काय असते? ज्या गुंडांच्या गैरप्रकाराविरोधात आवाज उठविला जातो ते गुंड गोडबोले दांपत्याशी कसे वागतात? या गुंडांपासून वाचण्यासाठी असे अनेक प्रश्न या कथानकातून निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा. 
मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबे आपण आखून घेतलेल्या चौकटीत जगत असतात. त्यांना हादरवणारी घटना जेव्हा घडते तेव्हा ते त्या अन्यायाविरोधात उभे ठाकतात की गप्प राहातात याचे मनोविश्लेषक चित्रण ती आणि इतर या चित्रपटातील प्रत्येक दृश्यातून दिसते. महिलांवरील अत्याचार गपगुमान बघत राहाणारा समाज हा निर्जिव असतो. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजाने ठोस कृती केली पाहिजे हा संदेश या चित्रपटातून प्रभावीपणे देण्यात आला आहे.
अभिनय 
'ती आणि इतर' चित्रपटामध्ये अनिरुद्ध गोडबोले याची भूमिका सुबोध भावे याने अत्यंत समंजसपणे साकारली आहे. गृहिणी असलेली व यशस्वी गायिका बनलेली नयना गोडबोले हिच्या मनाची घालमेल सोनाली कुलकर्णी हिने उत्तम साकारली आहे. आपल्या इमारतीच्या समोरच्या इमारतीत एक महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडत असूनही आपण तिला वाचविण्यासाठी काहीच करु शकत नाही याची अगतिक जाणीव तिला प्रकर्षाने झाली आहे. हीच जाणीवपत्रकार जानकीच्या भूमिकेतील अमृता सुभाष, भास्करची पत्नी म्हणजे माधवीच्या भूमिकेतील प्रिया मराठे यांनी प्रभावीपणे व्यक्त केली आहे. भूषण प्रधान, अविष्कार दारव्हेकर, सुमन पटेल हे आपापल्या भूमिकांना न्याय देतात
दिग्दर्शन 
गोविंद निहलानी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्या पूर्वपरिचित शैलीला अनुसरून अत्यंत प्रगल्भतेने केले आहे. त्यांनी एकाही पात्राला जास्तीचा अभिनय करु दिलेला नाही. रोजच्या आयुष्यात आपण ज्या स्वाभाविकपणे बोलतो, वागतो नेमका तोच टोन या चित्रपटातील कलाकारांनी राखायला हवा यासाठी गोविंद निहलानी विलक्षण आग्रही असल्याचे ते करून घेण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसते. समाजातील महिलांची वास्तव स्थिती या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणण्याचा गोविंद निहलानी यांचा प्रयत्नही यशस्वी होताना दिसतो. 'सायलेन्स इस नॉट अन ऑप्शन...' ही टॅगलाइन चित्रपट सार्थच ठरवतो. 
संगीत 
'ती आणि इतर' या चित्रपटाचे संगीत वसुदा शर्मा यांनी दिले आहे. ते चित्रपटाच्या माहोलला साजेसे आहे. या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेते, दिग्दर्शक सचिन यांनी शफक या टोपणनावाने लिहिलेली 'बादल जो घीर के आये' ही उर्दू गझल अदिती पौल यांनी गायली आहे. ती सुरेखच जमली आहे. मंदार चोळकर लिखित 'आतुर मन' हे गाणे गायिका अंकिता जोशीने गायले आहे. ही गाणी या चित्रपटाची खुमारी वाढवितात.

बसस्टॉप या चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे, दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंट - २१ जुलै २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी बसस्टॉप या नव्या चित्रपटाचे मी केलेले हे परीक्षण. त्या लेखाची वेबलिंक मी पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-REV-REV-movie-review-…
---
Movie Review : कथेचा कोणताही स्टॉप नसल्याने गुंत्यात हरवलेला 'बसस्टॉप'
- समीर परांजपे | Jul 21, 2017, 14:42 PM IST
---
चित्रपट - बसस्टॉप
रेटिंग- 2 स्टार
कलावंत - अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, सुयोग गोरे, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी
कथा, पटकथा , संवाद , दिग्दर्शक - समीर हेमंत जोशी
संगीत - सौरभ, जसराज आणि ऋषिकेश
निर्मिती - श्रेयश जाधव
श्रेणी- फॅमिली ड्रामा 
--
आजच्या युवकांची विचार करण्याची पद्धत, त्यांना असलेली जबाबदारीची जाणीव ही अनेक प्रसंगात दिसते. पण युवकांमध्ये उथळपणा, बेजबाबदार वृत्ती, बेदरकारपणाही आढळतो. या त्यांच्या गुणदोषांचा एकत्रितपणे विचार करुन त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी म्हणजे त्यांचे आई-वडील, आजी-आजोबांनी या युवकांना नीट समजून घ्यायचे असते. त्याचबरोबर वडीलधारी माणसे आपल्याला नीट काही गोष्टी समजावून सांगत असतील तर त्या नीट ऐकून त्यातील चांगल्या गोष्टी अंगी बाणविण्याचे भान युवकांनी दाखवायला पाहिजे. हे दोन पिढ्यांतील जे सामंजस्य आहे ते कसे साधले जावे यावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे बसस्टॉप.
कथा 
एका कॉलेजमधील तरुण मुले-मुली. त्यात देवेन हा अभ्यासू, प्रामाणिक असून अनुष्का नावाच्या मुलीवर प्रेम करत असतो. अनुष्काही त्याच्या प्रेमात असते. बाबांची लाडकी असणारी अनुष्का सर्व मर्यादा सांभाळून वागणारी, नीट शिक्षण घेऊन करिअर घडविण्यावर भर असलेली सरळ रेषेत आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवते. याच कॉलेजातील किशोर या तरुणाला अभ्यासात आणि शिक्षणातही विशेष रस नाही. पैशाच्या व्यवहारातही तो चालू असतो. एकापेक्षा अधिक मुलींना आपल्या प्रेमात पाडणे, फ्लर्टिंग करणे हा त्याचा आवडता उद्योग. त्याचे वडील 'आबा' ही त्यामुळे त्रस्त झालेले आहेत. विनित हा त्याच कॉलेजमधील अजून एक विद्यार्थी. तो ज्या मुलीवर प्रेम करतो ती शरयू नंबर एकची बिलंदर मुलगी आहे. शरयूचे बाबा मेघराज हे कडक शिस्तीचे आहेत. शरयू घरातून निघते तेव्हा पंजाबी ड्रेस घालून निघते. पण बाहेर गेल्यानंतर वेस्टर्न आउटफिट्समध्ये वावरते. शरयू मुलांबरोबर फ्लर्टिंग करते. त्यांच्याशी प्रेम करण्याचे नाटक करते. या मुलांकडून पैसे उकळते व मौजमजा करते. विनित हा शरयूवर मनापासून प्रेम करत असतो. शरयूला गिफ्ट देण्यासाठी तो वडिलांच्या वस्तू चोरुन विकतो. तिला एकदा आयफोनही भेट म्हणून देतो. विनित हा शरयूसाठी फक्त 'कामापुरता मामा' असतो. सुमेध या तरुणाचे मैथिलीवर मनापासून प्रेम आहे. पण ते बहुतेक एकतर्फी आहे असाच सगळा माहोल आहे. मैथिलीचे वडिल गोविंद हे प्रागतिक विचारसरणीचे आहेत. आपल्या मुलीने सारासार विचार करुन निर्णय घ्यावेत, स्वत:चा योग्य जीवनसाथी तिने स्वत:च शोधावा यासाठी ते तिला नेहमी प्रोत्साहन देत असतात. गोविंद (मैथिलीचे वडील), आबा (किशोरचे वडील), मेघराज (शरयूचे वडील), सतीश (अनुष्काचे वडील) हे चौघेजण आपल्या मुलांवर नियंत्रण राहावे, त्यांनी आपल्या संस्कार व मर्यादेत राहावे म्हणून प्रयत्न करत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना त्यांची मुले किती प्रतिसाद देतात? या चित्रपटात ज्या जोड्या आहेत त्यापैकी किती जणांचे प्रेम सफल होते? आधीची पिढी व युवा पिढी यांच्यामध्ये जी जनरेशन गॅप आहे ती दरी कमी करण्यासाठी पालक व त्यांची मुले पुढाकार घेतात का? या दोन पिढ्या खरच एकमेकांना समजून घेण्यात यशस्वी होतात का? असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. 
अभिनय 
बसस्टॉप हा मराठीतील मल्टिस्टारर चित्रपट आहे. त्यात अमृता खानविलकर (शरयू), अनिकेत विश्वासराव ( देवेन), हेमंत ढोमे- (किशोर), सिद्धार्थ चांदेकर (विनीत), पूजा सावंत (अनुष्का) ,रसिका सुनील (मैथिली), अक्षय वाघमारे (अभिषेक), सुयोग गोरे ( सुमेध), अविनाश नारकर ( गोविंद - मैथिलीचे वडील), संजय मोने (जितूभाई), शरद पोंक्षे (आबा -किशोरचे वडील), 
उदय टिकेकर (मेघराज - शरयूचे वडील), विद्याधर जोशी (सतीश - अनुष्काचे वडील) यांनी चांगली कामगिरी केली आहे. पण या चित्रपटात एकाच वेळेला तीन-चार कथानके सुरु असल्याने तसेच मुलांच्या चार वडीलांचीही समांतर कहाणी सुरु राहिल्याने एक वेळ अशी येते की, कथेचा गडबडगुंडा होऊन प्रेक्षक भांबावून जातो. बसस्टॉप चित्रपट पाहाताना कथेचा नेमका स्टॉप कोणता हे प्रेक्षकाला लक्षात राहिनासे होते. 
दिग्दर्शन 
समीर हेमंत जोशी हे तर खरे कसलेले दिग्दर्शक. त्यांनी युथफुल व मल्टिस्टारर चित्रपट करण्याच्या दृष्टीने कलाकारांची केलेली निवड योग्यच होती. या युथची जीवनशैली दाखविण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्नही प्रामाणिक आहे पण या चित्रपटात इतकी पात्रे आहेत की दिग्दर्शकाला त्यातील बरीच पात्रे व्यवस्थित पडद्यावर फुलविता आलेली नाही. दोन पिढ्यांतील गॅपची गोष्ट सांगताना, ती गॅप मिटवण्यासाठीच्या प्रयत्नांचे चित्रण दाखविताना हा चित्रपट दिग्दर्शकाच्या हातून निसटला आहे. खूप तरुण कलाकार असले म्हणजे चित्रपट प्रसन्न व युथफूल होतोच असे नाही. प्रश्न उभे करुन त्याची उत्तरे शोधता शोधता हा चित्रपटच कथानकाच्या गुंत्यात अडकून प्रेक्षकांसमोर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आयुष्यात अनेक बसस्टॉप येतात, जिथे आपण थांबतो, दुसरी बस पकडतो किंवा कधी चुकीची बस पकडतो. पण योग्य बसस्टॉपला उतरणे हे देखील महत्वाचे असते. प्रत्येकाच्या विशेषत: तरुणांच्या आयुष्यातील थांब्यांची पर्यायाने बसस्टॉप्सची ही कहाणी मनाला भावत नाही हेच खरे.
संगीत 
या चित्रपटातील युथफुल गाणी हा प्लस पॉइंट आहे. त्याचे श्रेय हृषिकेश, सौरभ-जसराज आणि आदित्य बेडेकर या नव्या दमाच्या संगीतकारांना आहे. `मूव्ह ऑन', `आपला रोमान्स', `घोका नाही तर होईल धोका' आणि `तुझ्या सावलीला' ही गाणी तरुणाईला भुरळ घालणारी आहेत. हृषिकेश-सौरभ-जसराज या त्रिकुटाने संगीतबद्ध केलेले `मूव्ह ऑन' हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून रोहित राऊत आणि प्रियांका बर्वे या जोडीने ते गायले आहे. तसेच क्षितीज पटवर्धन लिखित आणि श्रुती आठवले व जसराज जोशीच्या आवाजातले `आपला रोमान्स' हे गाणे देखील तरुणाईलाही आवडण्यासारखे आहे. आदित्य बेडेकरने संगीत दिग्दर्शित केलेले योगेश दामले लिखित `तुझ्या सावलीला' आणि `घोका नाहीतर होईल धोका' या गाण्यांपैकी रुपाली मोघे आणि सागर फडके या जोडीने `तुझ्या सावलीला' या गाण्याला स्वरसाज चढवला असून, `घोका नाहीतर होईल धोका' हे गाणे सागर फडके याने गायले आहे.

ना धड सायको ना धड थ्रीलर - मांजा चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी वेबसाइटचे मराठी कट्टा सेगमेंट, दि. २१ जुलै २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी मांजा या नव्या मराठी चित्रपटाचे मी केलेले हे परीक्षण. त्या लेखाची वेबलिंक मी पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-REV-REV-marathi-film-…
---
Movie Review : ना धड सायको ना धड थ्रीलर
समीर परांजपे | Jul 21, 2017, 14:46 PM IST
---
चित्रपट - मांजा
रेटिंग - 2 स्टार
कलावंत - अश्विनी भावे, सुमेध मुद्गलकर, रोहित फाळके, अपूर्व अरोरा, शिवानी टांकसाळे, मोहन कपूर, डेन्झिल स्मिथ
कथा, पटकथा,दिग्दर्शन - जतीन वागळे
संगीत - शैल- प्रीतेश
निर्मिती - त्रिलोक मल्होत्रा, के. आर. हरीश (इंडिया स्टोरीज)
श्रेणी - सायको थ्रीलर
---
'पाठलाग' हा १९६४ साली आलेला मराठी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला मराठी रहस्यपट. राजा परांजपे निर्मित व दिग्दर्शित हा चित्रपट इतका गाजला, की त्यावरून दिग्दर्शक राज खोसला यांनी हिंदीमध्ये `मेरा साया' हा चित्रपट निर्माण केला. रहस्यपट म्हटले, की प्रत्येक वेळेला आल्फ्रेड हिचकॉकची साक्ष काढण्याची काही आवश्यकता नाही. हिंदीपेक्षा मराठीत सायकोथ्रीलर व रहस्यपटांची संख्या तुलनेने कमीच आहे. 'पाठलाग'नंतर बऱ्याच वर्षांनी 'रानभूल', 'चेकमेट', 'रिंगा रिंगा' असे चांगले मराठी रहस्यपट येऊन गेले. पण मराठीतील चांगला सायकोथ्रीलर असे नाव घ्यायचे असेल तर ते विजू माने दिग्दर्शित 'ती रात्र' या चित्रपटाचे घ्यावे लागेल. हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सायकोथ्रीलरची मराठीत तशी वानवा होती. ही उणीव थोड्या प्रमाणात का होईना 'मांजा' हा सायकोथ्रीलर म्हणवणारा चित्रपट भरुन काढेल असे वाटले होते पण या चित्रपटात थ्रीलही नाही आणि सायकोगिरी पण फार नाही.
कथा
लोणावळ्याचे एक हायस्कूल कम ज्यूनियर कॉलेज. जयदीप नावाच्या आपल्या मुलाची अॅडमिशन घेण्यासाठी त्याची आई समिधा या कॉलेजच्या प्रिन्सिपलना भेटायला आलेली आहे. समिधा व तिचा पती सिद्धार्थ (सिद्धार्थ हे पात्र पडद्यावर येत नाही. सिद्धार्थचे सारे तपशील हे जयदीप, समिधा यांच्या परस्परसंवादातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.) हे दोघे आर्किटेक्ट. त्यांचा प्रेमविवाह झालेला असतो. मात्र ज्यावेळी जयदीप या मुलाचा जन्म होतो त्यानंतर मात्र सिद्धार्थचे वागणे संपूर्णपणे बदलते. त्याची समिधाला मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. पण एक दिवस सिद्धार्थ जयदीपलाच मारायला उठतो तेव्हा नवऱ्याबरोबरचे नाते आता संपवायलाच हवे हा समिधाचा विचार पक्का होतो. ती जयदीपला सोबत घेऊन सिद्धार्थच्या घरातून कायमची बाहेर पडते. त्याच्याशी कायमचे नाते तोडते. समिधा आपला मित्र सौरभ व त्याची पत्नी वीणा यांच्या लोणावळा येथील हॉटेलमध्ये गेस्ट रिलेशन्स मॅनेजर म्हणून काम करु लागते. सौरभ समिधाला समजावतोही, की आर्किटेक्ट असणे हे तुझे खरे करिअर आहे. तू ते काय सोडते आहेस? पण समिधाचा निर्धार कायम असतो. तिला नव्या कार्यक्षेत्रात काम करुन आपल्या साऱ्या जुन्या आठवणी विसरायच्या असतात. तिचा मुलगा जयदीप हा बराचसा अबोल आहे. 
सिद्धार्थ व समिधामध्ये जेव्हा जेव्हा भांडणे व्हायची, ती विकोपाला जायची तेव्हा त्या गोष्टींचा लहानपणापासून जयदीपच्या मनावर परिणाम झालेला असतो. त्यामुळे तो बराचसा अबोल, काहीसा भित्रा व निर्णयशक्ती बळकट नसलेला मुलगा बनतो. अशा या जयदीपला समिधा जीवापाड सांभाळत असते. जयदीप ज्या हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ११ वी इयत्तेत प्रवेश घेतो तिथे त्याला विक्रांत म्हणजे विकी हा विद्यार्थी भेटतो. विकी व जयदीप दोघेही सायन्स शाखेत शिकत आहेत. विकी हा अत्यंत बोलका, समोरच्यावर चटकन प्रभाव पाडणारे देखणे व्यक्तिमत्व लाभलेला व आपल्याला हवी ती गोष्ट कोणत्याही मार्गाने मिळविण्याची मानसिक तयारी असलेला असा मुलगा आहे. तो जयदीपचे मानसिक दौबर्ल्य हेरतो व त्याला आपल्या प्रभावाखाली घेण्याचा प्रयत्न करतो. तो प्रथम त्याच्याशी छान दोस्ती करतो. त्याला कॉलेज, घर या व्यतिरिक्त बाहेरचे जग दाखविण्याचा प्रयत्न करतो. जयदीप या गोष्टी सहजासहजी स्वीकारत नाही. पण त्याला हे बाहेरचे जग काही प्रमाणात आवडू लागते. विकी जयदीपच्या घरी जायला सुरुवात करतो. जयदीपची आई समिधाशी ओळख करुन घेतो. माया नावाच्या मुलीवर विकी मनापासून प्रेम करत असतो. मात्र माया ही जयदीपची आई समिधा हिचा मित्र सौरभची मुलगी आहे हे जेव्हा विकीला कळते तेव्हा त्याचे विचार बदलतात. तो जयदीप व माया एकमेकांच्या जवळ कसे येतील यासाठी वरकरणी प्रयत्न करु लागतो. त्यासाठी प्लॅन आखू लागतो पण त्याच्या मनात दुसराच विचार शिजत असतो. जयदीपला सोबत घेऊन फिरताना विकी त्याला आपल्या क्रौर्याच्या काही कथा ऐकवतो. 
मायाला मी सांगितलेल्या ठिकाणी तुझ्यासोबत घेऊन ये, माझे तिच्यावर प्रेम आहे, तिच्यापर्यंत ते पोहोचविण्यासाठी ही एकांताची जागाच योग्य आहे असे विकी जयदीपला सांगतो. त्यानंतर एक दिवस जयदीपला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील एका पुलावर नेऊन तिथून खाली ढकलून देण्याची धमकीही देतो. त्यामुळे जीवाचा थरकाप उडालेला जयदीप मायाला सोबत घेऊन त्या एकांत ठिकाणी येतो. त्या ठिकाणी विकी पोहोचतो का? जयदीपची आई समिधा ही आपल्या मुलाची डोळ्यात तेल घालून काळजी घेत असते. विकी जयदीपला कैचीत पकडत असताना त्या गोष्टींची चाहूल समिधाला लागते का? विकीचे मायावर खरच प्रेम असते की अजून काही भावना त्याच्या मनात दडलेल्या असतात? विकीच्या गैरकृत्यांचा जयदीप बळी ठरतो का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय
अश्विनी भावेसारखी समर्थ अभिनेत्री लाभून सुद्धा तिने केलेली समिधाची भूमिका फारशी रंगू शकलेली नाही याचे कारण त्या भूमिकेला जे अनेक पदर आहेत तेच नीट उलगडले गेलेले नाहीत. आईच्या भूमिकेतील समिधा काही वेळाने खोटी वाटू लागते असेही काही प्रसंग ओढूनताणून या चित्रपटात आले आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या बालक पालक या चित्रपटामधीलमधील अव्याचे अभ्यासू पात्र साकारणारा बालकलाकार रोहित फाळकेने त्याच्या अभिनयाने त्यावेळी सगळ्यांना भुरळ घातली होती. मांजामध्ये जयदीपची रोहित फाळकेनी केलेली भूमिका चांगली झाली आहे. कायम मानसिक दडपणाखाली असलेला, आत्मविश्वास गमावलाय असे वाटणारा जयदीप जेव्हा त्याच्या आईने दिलेल्या पाठबळामुळे काहीसा खंबीर बनतो ते व्यक्तिमत्वातले परिवर्तन रोहित फाळकेने उत्तमरित्या दाखविले आहे. या चित्रपटात विकी हा खलनायक असला तरी तोच खरा नायक आहे असे म्हणावे लागेल. विकीची भूमिका निळ्याशार डोळ्यांच्या सुमेध मुद्गलकर याने चांगली केली आहे. त्याने डोळे, शारीराभिनयातून त्याचे पॅरासाइट असणे नेमकेपणाने दाखविले आहे. कलाकारांची कामगिरी चांगली पण कथानक ढिसाळ असा मांजाचा मामला आहे. आपल्या मुलाचे आयुष्य हे पतंगासारखे असते. त्या पतंगाला नियंत्रणात ठेवतो तो मांजा. मांजा जर आईच्या हातात असेल तर पतंगावर नियंत्रण राहाते. मांजाला ढिल दिली तरी बोट कापते, मांजा अधिक घट्टपणे पकडून ठेवला तरी बोट कापते. कसेही असले तरी पतंगावर नियंत्रण राखणे महत्वाचे. समिधा आपल्या प्रेमाचा, कणखरतेचा मांजा आपल्या हाती ठेवून मुलगा जयदीपच्या आयुष्याचा पतंग भरकटू नये म्हणून काळजी घेते अशी ही सारी कथा आहे. पण हे कथानकच इतके विस्कळीतपणे मांडले आहे की मांजा चित्रपटाचा पतंग भरकटू लागतो. तो नियंत्रणात राहात नाही.
दिग्दर्शन
जतीन वागळे यांनी मांजाचे जे दिग्दर्शन केले आहे ते करताना त्यांच्यावर पाश्चिमात्य चित्रपटांचा फारच प्रभाव असावा असे वाटते. मुळात समिधा व तिचा मुलगा जयदीप यांची जीवनशैली उच्चमध्यमवर्गीय गटातील आहे हे चित्रपटात न सांगताही लक्षात येते. सध्या श्रीमंत, मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीयांमध्ये इंग्रजीचा प्रभाव बराच वाढला आहे. आजचा युवकही मराठीतून बोलताना अनेक इंग्रजी शब्दही त्यात वापरतो. हे सर्व मान्य करुनही या चित्रपटात सुमारे एक चतुर्थांश संवाद इंग्रजी आहेत हे जरा खटकते. जतीन वागळे यांनी अशा धाटणीने चित्रपट करुन पहिला रसभंग केला. दुसरा रसभंग त्यांना विकी ज्या पद्धतीने चित्रपटाच्या अखेरीस वागतो ते अधिक गडद रहस्यात्मकरित्या दाखविता आले असते. पण या चित्रपटाचा शेवट ढोबळ पद्धतीने केला आहे. त्यामुळे एक चांगला सायकोथ्रीलर होण्याची शक्यता जतीन वागळे यांनी वाया घालवली.
संगीत
या चित्रपटाला शैल- प्रीतेश यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटात एकच गाणे आहे. खलप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आता देवीच साक्षात अवतरली आहे असे वाटायला लावणारे गाणे चित्रपटात मध्येच असे घुसडले आहे की, ते अत्यंत हास्यास्पद वाटते. हे गाणेही रटाळ आहे.