Thursday, September 28, 2017

बापजन्म या चित्रपटाचे दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवर २८ सप्टेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेले परीक्षण - समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाईटवरील मराठी सिनेकट्टा या सेगमेंटमध्ये दि. २८ सप्टेंबर २०१७ रोजी बापजन्म या नवीन मराठी चित्रपटाचे मी लिहिलेले हे परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. त्या परीक्षणाचा मजकूर व त्याच्या मजकूराची वेबलिंकही पुढे दिली आहे.
---
बापजन्म - पितृप्रेमातील ओलाव्याचे हृदयस्पर्शी चित्रण
----
चित्रपट - बापजन्म
----
- समीर परांजपे
---
रेटिंग - तीन स्टार
--
कलाकार - सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपूटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन, अकर्श खुराणा
पटकथा, लेखन, दिग्दर्शक - निपुण धर्माधिकारी
निर्माते - सिक्स्टिन बाय सिस्क्टी फोर प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सुमीतलाल शाह
संगीत आणि पार्श्वसंगीत - गंधार संगोराम
चित्रपट प्रकार - फॅमिली ड्रामा
--
पुण्यातील निपुण धर्माधिकारी याने पटकथा, लेखन व दिग्दर्शन अशा तीनही जबाबदाऱ्या सांभाळलेला बापजन्म चित्रपट औत्सुक्याचा िवषय नक्कीच होता. कारण निपुण हा युवा रंगकर्मी व प्रयोगशील दिग्दर्शक त्याने आजवर केलेल्या कामगिरीने लक्ष वेधून घेत होता. ‘फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या युवांपैकी ‘आश्वासक ३०’ युवक-युवतींच्या यादीमधेही निपुण धर्माधिकारीच्या नावाचा समावेश झालेला होता तो त्यामुळेच. ‘नाटक कंपनी’ या स्वत: स्थापन केलेल्या युवा रंगकर्मींच्या नाट्यसंस्थेमार्फत निपुण धर्माधिकारी याने ‘दळण’, ‘लुज कंट्रोल’, ‘सायकल’ या एकांकिकांसह ‘एक दिवस मठाकडे’ या दीर्घांकाचे दिग्दर्शन केलेले होते. केले आहे. युवा गायक राहुल देशपांडे याच्यासमवेत ‘संशयकल्लोळ’, ‘मानापमान’ आणि ‘सौभद्र’ ही संगीत नाटके वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शित केली व युवा पिढीला त्या नाटकांकडे आकर्षित केले होते. प्रभाकर पेंढारकर यांच्या ‘रारंगढांग’ या कादंबरीचे व प्रकाश नारायण संत यांच्या ‘वनवास’ या कथासंग्रहाचे ऑडिओबुक करण्यातही त्याचा मोलाचा वाटा आहे. ‘नौटंकी साला’ या चित्रपटाचे लेखन केले असून आता त्याने बापजन्म हा चित्रपटही दिग्दर्शित केला. इतकी उत्तम पार्श्वभूमी असलेल्या निपुणने बापजन्मतील मुख्य भूमिकेसाठी सचिन खेडेकर या चतुरस्त्र अभिनेत्याची केलेली निवड अचुक होती हे हा चित्रपट बघितल्यानंतर लक्षात येते. सचिन खेडेकर यांनी बापजन्ममध्ये साकारलेल्या पात्राचे नाव भास्कर पंडित आहे. एक योगायोग असा आहे की, अस्तित्व या मराठी िचत्रपटात सचिन खेडेकर यांनी साकारलेल्या पात्राचे नाव श्रीकांत पंडित होते. कच्चा लिंबू या चित्रपटातही मी साकारलेल्या पात्राचे नाव श्रीकांत पंडित आहे. हा `पंडित'योग लक्षात ठेवून बापजन्म चित्रपट बघायला सुरुवात केल्यानंतर खेडेकर हे अभिनयपंडित आहे हे जाणवते.
कथा - भास्कर पंडित हे निवृत्त झालेले गृहस्थ. ते असतात भारतीय गुप्तचर यंत्रणेमध्ये सिक्रेट एजंट. मात्र त्यांना आपली खरी ओळख कोणालाच देता येत नाही. सेवेत त्यांनी तशी शपथही घेतलेली असते. आपल्या कामाचे खरे स्वरुप कोणालाही कळू नये म्हणून सेवेत असताना व नंतरही ते मुग्धता पाळून असतात. ते सिक्रेट एजंट (गुप्तचर) आहेत हे त्यांची पत्नी रजनी, एक मुलगा, एक मुलगी, नातेवाईक, शेजारीपाजारी यांनाही माहित नसते. ते कधीही कोणालाही आपल्या कामाबद्दल सांगताना मी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कार्यरत आहे असे सांगत असतात. भास्कर पंडितांना खरेतर लग्न करायची इच्छाही नसते परंतु गुप्तचर यंत्रणेतील त्यांचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की, `लग्न केलेस, मुलेबाळे झाली की लोकांच्या दृष्टीने आपण सामान्य आयुष्य जगतोय असे सिद्ध होते. ते आपल्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. लग्न हे आपल्याला एक चांगले कव्हर म्हणून उपयोगी येते.' त्यामु‌ळे ते पहिल्यांदा याच विचाराने लग्न करतात. पण जसजशी मुलेबाळे होतात, संसार वाढतो ते आपल्या कुटुंबाविषयी ते अजून काहीसे हळवे होतात. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्यातील कर्तव्यकठोर गुप्तचर जागा असतो. त्यामुळे मनात खूप असूनही ते आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र राहात असूनही आपण तुमच्या फार जवळ नाही असे वर्तनातून मुद्दामहून दाखवत असतात. त्यामुळे होते काय की, त्यांचा एक मुलगा व मुलगी यांच्या मनात त्यांच्या विषयी फारसे प्रेम उरत नाही. आपले वडिल आपल्याला फारसा वेळ देत नाहीत, खूप कोरडेपणाने वागतात हे त्या मुलांना दिसत असते. त्याचा या मुलांना त्रास होत असतो. त्याचबरोबर भास्कर पंडितांची पत्नी रजनी तिला देखील आपल्या नवऱ्याचा सहवास फार लाभत नसतो. त्यांच्यातील संवाद खूप कमी झालेला असतो. किंबहुना भास्कर पंडितांनीच तो मुद्दामहून कमी केलेला असतो. वर्षामागून वर्षे उलटतात. भास्कर पंडित आता सेवानिवृत्त आहेत. त्यांची पत्नीही स्वर्गवासी झालेली आहे. ते, त्यांचा नोकर माऊली व टायगर नावाचा कुत्रा यांच्यासमवेत ते एका बंगल्यात राहात असतात. त्यांच्या दोन मुलांपैकी मुलगा विक्रम लंडनला आहे. तर मुलगी वीणा लग्न होऊन दुसऱ्या शहरात राहायला गेली आहे. भास्कर पंडित एकटे राहात असले तरी ते माणुसघाणे नाहीत. ते रोज सकाळी मॉर्निंग वॉक करतात, आपल्या बंगल्यासमोर राहाणाऱ्या व अल्झायमर ग्रस्त असलेल्या आपटे नावाच्या वृद्ध गृहस्थांबरोबर वेळ घालवितात. खूप काही चांगली कामे रोज करतात. त्यांचे स्वत:चे एक शेड्युल ठरलेले आहे. पण तरीही हल्ली त्यांना आपल्या मुलाबाळांची आठवण तीव्रतेने होऊ लागली आहे. मुलांच्या मनात आपल्याविषयी तिरस्कार आहे हे माहित असूनही त्यांनी आपल्याला घरी येऊन भेटावे असे सतत त्यांना वाटते आहे. पंडितांचे गेल्या काही दिवसांपासून डोके दुखते आहे. म्हणून ते डॉक्टरकडे जातात. वैद्यकीय तपासण्यांतून पंडितांना ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान होते. मात्र या कर्करोगावर वैद्यकीय इलाज करुन घ्यायला ते राजी होत नाहीत. असेच सुरु राहिले तर फारतर एक वर्ष जगाल असे डॉक्टर भास्कर पंडितांना सांगतात. मात्र त्यामुळे पंडित हबकत नाही. आपण जोवर जिवंत आहोत तोवर आपल्या मुलाबाळांनी एकदातरी भेटावे यासाठी काहीतरी युक्ती ते शोधू लागतात. एकदा ते रात्री असेच आपल्या बंगल्यात बसले आहेत. त्यांनी आपल्या दैनंदिनीत आपल्या मृत्यूबद्दल लिहून ठेवले आहे. ते सहज आदल्या दिवशीच्या दैनंदिनी नोंदीवर लक्ष केंद्रित करतात. त्यानंतर त्याच्या आधीच्या दिवसाची नोंद वाचतात...मग त्याच्याही आधीच्या दिवसाची. असे करत करत ते संपूर्ण एक वर्ष मागे जातात. त्यांच्या असे लक्षात येते की आपण रोज तेच ते जगतो आहेत. त्यांना आता काही वेगळे करायचे आहे. आपल्या मुलाबाळांना पुन्हा आपल्या जवळ आणण्यासाठी ते मग एक योजना आखतात. आपला नोकर माऊलीला भरीला पाडून त्याला आपली मुलगी वीणा व मुलगा विक्रम यांना फोन करायला लावतात. भास्कर पंडित यांचे निधन झाले असून तुम्ही ताबडतोब निघून या असा निरोप माऊली या दोघांना देतो. त्यामुळे भास्कर पंडितांच्या मुलांपैकी विक्रम अापल्याला येणे शक्य नाही असे सांगतो. तर दुसऱ्या शहरात राहाणारी मुलगी वीणा ही आपल्या छोट्या बाळाला घेऊन वडिलांच्या घरी मोठा प्रवास करुन येते. घरात भास्कर पंडितांचे पार्थिव ठेवलेले असते. शेजारपाजारचे तसेच ज्येष्ठ नागरिक मित्रांपैकी अनेक जण जमा झालेले असतात. भास्कर पंडितांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना स्मशानभूमीत नेले जाते. पण भास्कर पंडित काही मेलेेले नसतात. ते नाटक करत असतात. त्या नाटकामध्ये त्यांनी गुप्तचर यंत्रणेतील आपल्या जुन्या सहकाऱ्याला व माऊलीला सहभागी करुन घेतलेले असते. भास्कर पंडित आखलेल्या योजनेप्रमाणे स्मशानातून कोणाच्याही नकळत व्यवस्थित सुंबाल्या करतात. सर्वांना डोळ्यासमोर हेच दिसते की विद्युतदाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत पण तसे काही झालेले नसते. ते आपटे या आपल्या शेजारच्या बंगल्यामध्ये लपून राहातात. आपटेंचा मुलगा हा आपटेंच्या शेजारच्याच बंगल्यात राहात असतो. पण आपल्या वडिलांना तो सोबत ठेवत नसतो. आपल्या वडिलांवर देखभालीच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी त्याने आपटेंच्या घरात सीसीटीव्ही लावलेले असतात. पण एकाच ठिकाणी कॅमेरा नसतो तो म्हणजे आपटेंच्या अडगळीच्या खोलीत. भास्कर पंडितही आपल्या बंगल्यात असेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतात. आपण मेल्याची बातमी कळल्यानंतर आपली मुले घरी आली तर ती कोणत्या पद्धतीने वागतात, त्यांना खरच वडिलांविषयी जिव्हाळा आहे का हेही त्यांना पाहायचे असते. स्मशानभूमीतून सुंबाल्या केल्यानंतर भास्कर पंडित आपट्यांच्या अडगळीच्या खोलीत जाऊन लपतात व तिथून लॅपटॉपवर आपल्या घरात नेमके काय चालले आहे हे सीसीटीव्हीच्या मदतीने पाहू लागतात. वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकूनही आधी यायला तयार नसलेला विक्रम परदेशातून पुण्यामध्ये अंत्यसंस्काराच्यावेळी हजर होतो. तो त्याच्या मुलीबरोबर आलेला असतो. वडिल आता या जगात नाहीत या जाणीवेने विक्रम व वीणा दु:खी झालेले असतात पण तसे ते एकदम दाखवत नाहीत. कारण त्यांच्या पासून लांब लांब राहात आलेले वडिलच त्यांच्या मनात घर करुन बसलेले असतात. विक्रम व वीणाच्या भावभावनांचे दर्शन भास्कर पंडित आपट्यांच्या अडगळीच्या खोलीत राहून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लॅपटॉपवर ऑनलाइन पाहाताना त्यांना या मुलांच्या मनात माजलेली खळबळ कळू लागते. भास्कर पंडित यांनी रचलेले हे नाटक अखेरीस उघडकीस येते का? त्यांची मुले भास्कर पंडितांच्या जवळ येतात का? पंडित कर्करोगाचे बळी ठरतात का? असे काही प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी बापजन्म हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय - बापजन्म या चित्रपटाचे खरे नायक आहेत ते सचिन खेडेकर. सिक्रेट एजंट म्हणून कर्तव्यकठोर असलेल्या पण पत्नी व मुलांच्या आठवणीने कातर होणाऱ्या भास्कर पंडितांची भूमिका सचिन खेडेकर यांनी अप्रतिम साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेला काही नकारात्मक गोष्टींची झालर आहे. वीणा या मुलीचा प्रेमविवाह होतो. पण तिचा नवरा हा पंडित यांना हवा तसा उच्चशिक्षित व उच्चपदस्थ नसल्याने त्यांना मुलीची का‌ळजी वाटते. त्यांचा या प्रेमविवाहाला विरोध असतो. परंतु प्रेमविवाह झाल्यानंतरही ते मुलीच्या नवऱ्याला कोणालाही कळू न देता परस्पर भेटून चार शब्द सुनावून येतात. आपली मुले लहान असताना त्यांना फारसा वेळ देता येत नाही याची खंत बाळगून पंडित ज्या देशात सिक्रेट मिशनवर असतील तेथून परतताना मुलांसाठी खेळणी, भेटवस्तू घेऊन येतात. मात्र त्यांचे पितृप्रेम हे नेहमी त्यांच्या कठोर वागण्यामुळे झाकोळले जाते व मुले त्यांच्यापासून अजून दूर जातात. कॅन्सर झाल्याचे कळल्यानंतर जे उरलेसुरले आयुष्य आहे त्यात मुलाबा‌ळांना पुन्हा आपल्या जवळ आणण्यासाठी पित्याची जी धडपड चालते ती सचिन खेडेकर यांनी उत्तम प्रकारे दाखविली आहे. त्यांचा अभिनय हाच या चित्रपटाचा यूएसपी आहे. त्यांचे सहकलाकार सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपूटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन, अकर्श खुराणा यांनी आपल्याला दिलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. हा चित्रपट अभिनयदृष्ट्या कुठेही कमी पडत नाही.
दिग्दर्शन - बापजन्मची पटकथा, लेखन व दिग्दर्शन हे सारे निपुण धर्माधिकारी यानेच केलेले असल्याने त्याला चित्रपटात नेमके काय मांडायचे आहे याचे उत्तम भान होते. पण ती पटकथा पडद्यावर मांडताना त्याने काही प्रमाणात सिनेमॅटिक लिबर्टीही घेतली. ती मान्य करायला हवी. भास्कर पंडित मेला असल्याचे नाटक करत असूनही व ते जिवंत असल्याचे साध्या निरीक्षणातूनही कोणाला कळू शकले असते असे असतानाही त्यांचे कथित पार्थिव घरात व नंतर स्मशानभूमीत नेल्यावर त्यांची मुले, शेजारीपाजारी कोणालाच कसा संशय येत नाही हा एक प्रश्न मनात डोकावतो. दुसरे स्मशानात मृत व्यक्तीबाबत डॉक्टरने दिलेला मृत्यूदाखला दाखवून स्मशानभूमी कार्यालयात दाखवून त्याची नोंद करावी लागते तो प्रकार भास्कर पंडितांच्या बाबतीत कसा टळला असाही प्रश्न मनात आला. त्याशिवाय आपटेंच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचे दर्शन त्यांच्या घरात लावलेल्या सीसीटीव्हीद्वारे शेजारीच राहाणाऱ्या आपट्यांच्या मुलाला आपल्या टीव्ही स्क्रीनवर होत असते. आपट्यांच्या अडग‌ळीच्या खोलीत सीसीटीव्ही नसेल पण अन्य खोलीत असलेल्या सीसीटीव्हीमुळे आपट्यांच्या मुलाला एकदा तरी भास्कर पंडित सीसीटीव्हीत कैद झालेले दिसले असतील. दिवसभर भास्कर पंडित काही अडग‌ळीच्याच खोलीत लपून राहात नाहीत. असे वास्तववादी प्रश्न मनात येऊन व ते कथेतले कच्चे दुवे आहेत हे लक्षात येऊनही निपुण धर्माधिकारीच्या कुशल दिग्दर्शनाने या सग‌ळ्या शंकांवर मात केली आहे. मातृप्रेमावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. मात्र पितृप्रेम हाच केंद्रबिंदू घेऊन चित्रपट बनविणे हे तसे तुलनेने सोपे काम नाही. अगदी पुरुषप्रधान समाज असला तरी भावनिकदृष्ट्या पितृप्रेमापेक्षा मातृप्रेमाकडेच लोक अधिक झुकतात. त्यामुळेही अशा विषयावर चित्रपट बनविणे हे चित्रपट चालण्याच्या दृष्टीनेही तसे आव्हानात्मकच होते. हे सारे धोके पत्करून निपुण धर्माधिकारी याने चित्रपटाची मांडणी चांगली केली आहे. भास्कर पंडितांचे पात्र पूर्ण विकसित केले आहे. तसेच सहकलाकारांनाही व्यवस्थित वाव दिला आहे. उगीच पात्रांची भाऊगर्दी केलेली नाही. नर्मविनोदी संवादातून काही प्रसंग छान खुलवले आहेत. वेगळ्या संकल्पनेवरचा बापजन्म हा कौटुंबिक चित्रपट पितृप्रेमाचे महत्व प्रेक्षकांच्या मनावर ठसवून जातो. 
संगीत - बापजन्म या चित्रपटाचे संगीत व पार्श्वसंगीत गंधार संगोराम याने दिले आहे. या चित्रपटात मन शेवंतीचे फुल हे गाणे असून ते दिप्ती माटे हिने गायले आहे. दिप्ती माटे म्हणजे गायक राहुल देशपांडे याची बहिण. प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे यांची नात. दिप्तीने या गाण्याद्वारे चित्रपटाच्या पार्श्वगायनक्षेत्रात पहिले पाऊल ठेवले आहे. मन शेवंतीचे फुल हे गाणे उत्तमच जमले आहे. त्यानंतरचे दुसरे गाणे आहे ते म्हणजे `गंध अजूनही'. ते जयदीप वैद्य याने गायले असून ते देखील श्रवणीय झाले आहे. ही गीते क्षितीज पटवर्धन याने लिहिली असून गीत व संगीत यांचा मेळ चित्रपटात चांगला जमला आहे. गंधार संगोराम याच्या कामगिरीवर भावी काळात प्रेक्षक नक्कीच लक्ष ठेवून असतील.                        http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-bapjanma-5706953-PHO.html

घुमा या चित्रपटाचे दि. २८ सप्टेंबर रोजी दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटला प्रसिद्ध झालेले परीक्षण - समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाईटवरील मराठी सिनेकट्टा या सेगमेंटमध्ये दि. २८ सप्टेंबर २०१७ रोजी घुमा या नवीन मराठी चित्रपटाचे मी लिहिलेले हे परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. त्या परीक्षणाचा मजकूर व त्याच्या मजकूराची वेबलिंकही पुढे दिली आहे.
---
घुमा - विषमतेने वेढलेल्या आयुष्यांची गाथा
--
- समीर परांजपे
---
रेटिंग - चार स्टार
--
कलाकार - शरद जाधव, पूनम पाटील, आदेश आवारे, प्रमोद कसबे, तेशवानी वेताळ, शशांक दरणे, नंदकिशोर गोरे.
पटकथा, दिग्दर्शक - महेश रावसाहेब काळे
निर्माते - एमएएसएस फिल्म्स, ड्रीम सेलर फिल्म्स
संगीत - जसराज-हृषिकेश-सौरभ
चित्रपट प्रकार - फॅमिली ड्रामा
--
फॅँड्री, सैराटसारख्या आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे कम्युनिकेशन स्टडीजचे पदव्युत्तर शिक्षण झाले ते अहमदनगरच्या न्यू आर्टस, सायन्स, कॉमर्स कॉलेजमध्ये. ख्वाडा या चित्रपटाचा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे मासकॉममधील शिक्षणही याच महाविद्यालयातून झाले. हीच परंपरा महेश रावसाहेब काळे यानेही कायम ठेवली. याच महाविद्यालयातून महेशनेही हाच पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याने दिग्दर्शक म्हणून आपला पहिलावहिला केला तो म्हणजे घुमा. नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडे व महेश रावसाहेब काळे या तिघांत एक समान धागा असा आहे की त्यांनी तद्दन मसालापट न करता आशयघन मराठी चित्रपट बनविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. महेश रावसाहेब काळे याने मास्टर ऑफ कम्युनिकेशन स्टडी करत असताना २०१३ साली रुपया व २०१४ साली वट अमावस्या हे दोन लघुपट केले होते. २०१४ रोजी त्याच्या रुपया या लघुपटाला कोलकाता येथे नॅशनल स्टुडंट फिल्म अॅवॉर्ड (एनएसएफए) मिळाले होते. या लघुपटाला इतर अनेक महोत्सवांतही पुरस्कार मिळाले. भाऊराव कऱ्हाडे ख्वाडा चित्रपट बनवत असताना त्यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून महेशने काम केले आहे. या अनुभवानंतर महेश या युवा दिग्दर्शकाने चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार केला. त्याला समाजात असलेली विषमता, अस्वस्थता यांच्याकडे घुमासारख्या आशयघन चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष वेधायचे आहे. आपल्या दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात महेश रावसाहेब काळे कमालीचा यशस्वी झाला आहे हे आवर्जून सांगितले पाहिजे. 
कथा - देशातल्या खेडापाड्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच बिकट असते. आपली शेती ही पर्जन्यमानावर अवलंबून असलेली. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या नीट सोयीही नाहीत. बीिबयाणांचा दर्जा चांगला असेलच असे नाही. मूठभर श्रीमंत शेतकरी वगळता मध्यम किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर अनेकदा आर्थिक संकट उभे असते. त्यात निसर्गराजाच्या लहरीपणाचा तडाखा बसला तरी पीकपाण्याच्या होणाऱ्या नुकसानाने या शेतकऱ्याचे कंबरडेच मोडते. कर्जाच्या ओझ्याखाली वाकलेला, दबलेला शेतकरीराजा मग आपल्या बळावर ताठ कण्याने उभा तरी कसा राहाणार? भारत हा कृषीप्रधान देश आहे असे पाठ्यपुस्तकांत जरुर म्हटले आहे परंतु प्रत्यक्षात देशात सर्वात दुर्लक्षित क्षेत्र आहे ते शेतीचेच. ही सगळी पार्श्वभूमी घुमा या चित्रपटातील नामदेव कठाळे या शेतकऱ्याच्याही पाचवीला पुजली आहे. हा अल्पभूधारक शेतकरी. नामदेव हा अनेक आघाड्यांवर विविध प्रश्नांना तोंड देत जगत असतो. त्यात जसे शेतीचे प्रश्न आहेत तसे भावकीचेही. नामदेवचे कुटुंब चौकोनी आहे. त्याची बायको संजी, दोन मुले विकास आणि गुणी. कुटुंब मर्यादित असूनही गरीबीमुळे जे हाल होतात ते नामदेवच्या संसाराच्या बाबतीतही टळत नाहीत. त्याचा मोठा मुलगा विकास. त्याला शिक्षणात अजिबात रस नाही. नववी झाल्यानंतर त्याने शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे. तो मोटर, मोटरसायकल दुरुस्तीचे काम करतो. मेकॅनिकचे काम करुन आपला उदरनिर्वाह चालेल असे त्याला वाटते. नामदेवचा छोटा मुलगा गुणी हा अभ्यासात हुशार आहे. तो गावच्या शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत आहे. ही शाळा मराठी माध्यमाची आहे. गुणी हा अभ्यासात हुषार आहे. त्याला शालेय अभ्यासक्रमातील विषयांमध्ये चांगली गती आहे. गुणी हा हुषार आहे याची नामदेवला पुरेपूर जाणीव आहे. मोठा मुलगा विकास पुढे शिकला नाही याची नामदेवच्या मनात खंत असते. त्यामुळे गुणीने तरी शिकून खूप मोठे व्हावे यासाठी नामदेवची विलक्षण धडपड सुरु आहे. नामदेवची वडिलोपार्जित शेती आहे. मात्र त्या शेतजमिनीवरुन नामदेवचा भाऊ हरीभाऊ याने वाद उकरून काढला आहे. त्याने नामदेवच्या मालकीच्या जमिनीचा काही भागावर आपला हक्क सांगितला आहे. नामदेव त्या शेतभागात गेला असता हरीभाऊने त्याला हुसकावून लावले होते. हा सलही नामदेवच्या मनात आहे. गावात मराठी माध्यमाची जी शाळा आहे ती इयत्ता चौथीपर्यंतच आहे. पाचवी ते दहावी इयत्तेची शाळा ही नामदेवच्या गावापासून दोन किमी लांब आहे. त्यामुळे गुणी व त्याच्यासारख्याच चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर या लांब अंतरावरच्या मराठी माध्यमाच्या शाळेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नामदेव हा काही स्वत: फार शिकलेला नाही. त्याची बायकोही निरक्षर आहे. गावाच्या जवळ एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु झालेली आहे. त्या शाळेत पंचक्रोशीतील बागायतदारांची मुले, गावच्या सरपंचाचा मुलगा हे जात असतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सर्वच प्रकारच्या सुविधा आहेत. तेथील शिक्षण हे आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्यांनाच परवडू शकते हे साध्या डोळ्यांनी दिसणारे सत्य नामदेवही पाहात असतो. दुसऱ्या बाजूला नामदेवच्या गावातल्या मराठी माध्यमाच्या शा‌ळेची दुरवस्था झाली आहे. एकतर कमी शिक्षकवर्ग व त्यातच त्यांच्याकडे तुटपुंजी संसाधने आहेत. या शाळेत गरीब घरातलीच मुले शिकायला येत असतात. याचे कारण या शाळेत फी अगदी कमी आहे. ती गरीब विद्यार्थ्यांना परवडू शकते अथवा शिष्यवृत्त्यांचा सहारा. शाळेच्या कामाव्यतिरिक्त या शाळेतील शिक्षकांवर अनेक सरकारी योजनांच्या, निवडणुकांच्या कामांचे ओझेही आहेच. त्यामुळे येथील शिक्षकवर्ग त्या कामाच्या ओझ्याखालीही दबून गेलेला आहे. या सगळ्या चरकातून निघाल्यानंतर मग जो काय वेळ उरेल तो ते या विद्यार्थ्यांना शिकविणे, त्यांची पटसंख्या कमी पडत असली तर सरकारी नियमांप्रमाणे आवश्यक पटसंख्या दाखविण्यासाठी गावातील शाळेत न येणाऱ्या मुलांना जबरदस्तीने काही दिवस तरी शाळेत आणून बसवणे हे सारे उद्योग तेथील शिक्षकांना करावे लागतात. ही स्थिती बहुतेक गावांतील प्राथमिक शाळांमध्ये आहे. अशा वातावरणात देखील नामदेवचा लहान मुलगा गुणी हा उत्तम शैक्षणिक प्रगती करतो. गुणीचे इंग्रजी विषयाचे आकलन चांगले आहे. तो आपले वडिल नामदेव यांना विविध सरकारी फॉर्म्स भरण्यासाठी मदत करतो त्यावेळी त्याच्या इंग्रजी भाषेच्या आकलनाची चुणूक नामदेवला कळून येते. गुणीने खूप शिकावे असे वाटत असताना नामदेवच्या मनात एक विचार आकार घेऊ लागतो तो म्हणजे गावाजवळील इंग्रजी शाळेत गुणीने शिकायला जायला हवे. गुणीने इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतले तर त्याची प्रगती आणखी जोमाने होईल असेही त्याला वाटत असते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुणीला प्रवेश मिळविण्यासाठी आता नामदेव प्रयत्न करु लागतो. दुसऱ्या बाजूला तो गावातील मजूरीची कामे करुनही आपल्या संसाराला पैका जोडत असतो. त्याची बायको संजी ही देखील मोलमजूरीचे काम करायची. नामदेवचा मोठा मुलगा मेकॅनिकचे काम करीत असला तरी तो घरामध्ये खर्चासाठी काहीही रक्कम देत नसतो. त्यावरुनही नामदेव त्याला अधूनमधून बोलायचा पण सर्वात मोठी खंत ही की विकासने शिक्षण अर्धवट सोडले. मुले उत्तम शिकली तर त्यांना आपल्या सारखे मोलमजूरी करुन जगावे लागणार नाही हे नामदेवला ठामपणे कळलेले असते. इंग्रजी शा‌ळेत गुणीला प्रवेश मिळवून देेण्यासाठी नामदेव गावातील अधिकाऱ्याशी बोलतो. या अधिकाऱ्याचा नातेवाईक जव‌ळच्या इंग्रजी शाळेत कर्मचारी असतो. तो संदर्भ घेऊन नामदेव एक दिवस इंग्रजी शाळेत चौकशीसाठी जातो. तेव्हा त्याला कळते की मुलाला पाचवी इयत्तेत प्रवेश मिळवून द्यायचा असेल तर एका वर्षाची तीस हजार रुपये फी भरावी लागेल. नामदेवच्या पुढे मोठे संकट उभे राहाते. मोलमजूरी करुन, शेती करुन जे उत्पन्न हाती येते त्यातून एवढी मोठी रक्कम उभारणे शक्यच नसते. तरीही नामदेव हार मानत नाही. तो प्रयत्न करीत राहातो. नामदेव आपला मुलगा गुणी याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी धडपडतोय याची गावातले टवाळ लोक चेष्टा करीत असतात. सरपंचालाही असे वाटते की त्याचा मुलगा इंग्रजी शाळेत जातो आहे, या गोष्टीची बरोबरी नामदेव करायला निघाला आहे. सरपंचही मनातून नाही म्हटले तरी दुखावतोच. गुणीला इंग्रजी शाळेत प्रवेश मि‌ळवून देण्यासाठी पाचवी इयत्तेकरिता जी तीस हजार रुपयांची फी भरावी लागणार आहे ती निम्मी आधी व काही काळाने निम्मी अशी भरली तरी चालणार आहे अशी आश्वासक माहिती नामदेवला इंग्रजी शाळेतल्या ओळखीच्या कर्मचाऱ्याकडून मिळते तेव्हा त्याला काहीसा दिलासा मि‌ळतो. पण नामदेवपुढे त्याचवेळी अजून दोन संकटे दत्त म्हणून उभी राहातात. पहिले संकट म्हणजे त्याचा भाऊ हरीभाऊ हा नामदेवला एक लिगल नोटिस पाठवितो. वडिलोपार्जित जमिनीपैकी जो नामदेवचा हिस्सा आहे त्यातील काही भागही आपलाच आहे असा दावा या नोटिशीत हरीभाऊने केलेला असतो. नामदेवचा त्या जमिनभागावर काहीही हक्क नाही असे सांगत त्याच्यावर खटला गुदरण्याची तयारी हरीभाऊने या नोटीशीद्वारे केलेली असते. ही नोटिस बघून नामदेवच्या पायाखालची जमिन सरकते. तो सरपंचाकडे जातो व या समस्येवर मार्ग काढा म्हणून त्याला गळ घालतो. हरिभाऊला सरपंच समज देतो व आपापसात तोडगा काढून हे भांडण मिटवा असे सांगतो. सरपंचाचे ऐकून हरिभाऊ नोटीस मागे घेण्यास तयार होतो पण वकीलासाठी जो काही खर्च झाला आहे तो नामदेवने दिला तरच हा वाद मी मिटवेन अशी भूमिका हरीभाऊ घेतो. सरपंचालाही नामदेवबद्दल असूया असतेच. तो या गोष्टीचा फायदा घेऊन असा निर्णय लादतो की, वकील, कायेदशीर प्रक्रिया याचा झालेला खर्च नामदेवने हरीभाऊला द्यावा. नामदेव अखेर हे मान्य करतो. वकीलावर झालेल्या खर्चापोटी किती पैसे द्यायचे हे जेव्हा तो वकीलाला विचारतो तेव्हा बारा हजार रुपये द्यावे लागतील असे उत्तर येते. कारण तुझी केस ऑलरेडी कोर्टाच्या बोर्डावर आता चढली असल्याने ती रद्द करायला हवी. या सगळ्या प्रक्रियेमुळे खर्च वाढला असे वकिल बिनदिक्कत खोटे नामदेवला सांगतो. न शिकलेल्या नामदेवाला ते खरे वाटते. आपल्या संसारासाठी जपून इथेतिथे जपून ठेवलेली रक्कम गोळा करुन नामदेव त्या वकीलाचे पैसे देऊन टाकते. अशा रितीने हरीभाऊने लादलेले संकट तर निवारले जाते. पण आता दुसरा प्रश्न कायम उरतोच की गुणाला इंग्रजी शाळेत प्रवेश द्यायचा तर जी निम्मी रक्कम म्हणजे पंधरा हजार रुपये भरायचे आहेत ते कुठून उभे करायचे? पुन्हा जीवाची तगमग, घालमेल हे सारे नामदेव अनुभवू लागतो. वडिल आपल्याला इंग्रजी शाळेत घालू पाहात आहेत हे गुणीला अजिबात आवडलेले नसते. त्याला ती गावची शाळा, तिथले शिक्षक, मित्र हे प्रिय असतात. पण तो जेव्हा एकदा वडिलांबरोबर गावानजिकच्या इंग्रजी शाळेत सहज म्हणून जातो तेव्हा तेथील विस्तिर्ण मैदान, भव्य वर्ग, टाय, बुट घातलेले व कडक इस्त्रीचे गणवेश परिधान केलेले विद्यार्थी, ते इंग्रजीतून करीत असलेले संभाषण हे सारे पाहून गुणी देखील काही क्षण भारावून जातो. नाम्याने तर ठरविलेलेच असते की काही झाले तरी गुणीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवीत प्रवेश मिळवून देणार म्हणजे देणारच. आता तो प्रवेशासाठी आवश्यक असलेले पंधरा हजार जमविण्याच्या मागे लागतो. पैसे तर अपुरे असतात त्याच्याकडे. आपल्या वडिलांची ही चाललेली ही धडपड नामदेवचा मोठा मुलगा विकास पाहात असतो. त्यालाही आतून कुठेतरी वाटते की आपणही काही जबाबदारी उचलली पाहिजे. तो आपल्या कमाईतून साठविलेले काही हजार रुपये नामदेवच्या हवाली करतो. अशा रितीने पंधरा हजार रुपये नामदेवकडे जमतात. त्याला विलक्षण आनंद होतो. तो गुणीच्या प्रवेश मुलाखतीच्या दिवशी आनंदाने पत्नी, गुणीसह इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो. पालक व पाल्याची शाळेच्या मुख्याध्यापिका मुलाखत घेत असतात. त्या गुणीला इंग्रजीतून काही प्रश्न विचारतात. त्याला तो बिनचुक उत्तरे देतो. पाचवी इयत्तेच्या प्रवेशासाठी दोनच जागा शिल्लक असतात. या मुलाखतीदरम्यान नामदेवला समजते की शाळेच्या विकास फंडासाठी दहा हजार रुपये व फीच्या एकुण रकमेपैकी निम्मी म्हणजे पंधरा हजार रुपये असे पंचवीस हजार रुपये तातडीने भरले तरच गुणीला या शाळेत प्रवेश मिळू शकतो. पण इतके पैसे त्याच्याजवळ नसतात. त्यामुळे तो खूप हताश होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे संकट निवारुन गुणीला या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवी इयत्तेत प्रवेश मिळतो का? असा प्रश्न निर्माण होतो. त्याची उकल होण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. 
अभिनय - घुमा या चित्रपटात नामदेव या परिस्थितीने गांजलेल्या शेतकऱ्याची भूमिका शरद जाधव यांनी केली आहे. आपल्या गरिब परिस्थितीमुळे जसे संसाराला नीट हातभार लावू शकत नाही तसेच मुलांनाही चांगल्या शाळेत शिक्षण देता येत नाही ही बोच त्याला सतत लागलेली आहे. त्यातून होणारी जीवाची तगमग शरद जाधव यांनी अप्रतिम अभिनयातून उभी केली आहे. यातील दुसरी महत्वाची व्यक्तिरेखा आहे गुणी या मुलाची. आदेश आवारे याने सहजाभिनयाने गुणीचा चुणचुणीतपणा, हुशारी तसेच समंजसपणा साकारला आहे. गावातील बागायतदारांकडे अमाप पैसा आहे त्यामुळे त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊ शकतात पण आपण गरीब असल्याने या शाळेचे तोंडही आपला मुलगा पाहू शकत नाही ही विषमता नामदेवच्या मनाला खात असते. ही विषमता भेदण्यासाठी तो ज्या खंबीरपणे उभा राहातो तो क्षण भारी आहे. नामदेवची बायको संजीची भूमिका पूनम पाटीलने केलेली आहे. प्रमोद कसबे (विकासची भूमिका करणारा कलाकार), तेशवानी वेताळ (विकासच्या मनाला भावलेली मुलगी प्रगती), शशांक दरणे (सरपंच), नंदकिशोर गोरे (हरिभाऊ) या सहकलाकारांच्या भूमिकाही नैसर्गिक अभिनयाचा अविष्कार आहे. ही सारी पात्रे त्या गावातील अस्सल मातीतील वाटतात. कुठेही त्यांना ओढूनताणून ग्रामीण बाज चढविला आहे असे वाटत नाही. 
दिग्दर्शन - राहुल रावसाहेब काळे या दिग्दर्शकाच्या पहिल्याच मराठी चित्रपटाला वास्तववादाचा प्रखर स्पर्श आहे. नामदेव या शेतकऱ्याच्या जगण्याचे, त्याच्या आपल्या कुटुंबाप्रतीच्या इच्छा आकांक्षांचे चित्रपट दर्शन दाखविताना सत्याची जमिन राहुलने अजिबात सोडलेली नाही. समाजात जी भीषण आर्थिक, सामाजिक विषमता आहे त्याचे चटके जितके दुर्बल घटकास लागतात तितके ते कोणासही लागत नाही. आपला आर्थिक स्तर, सामािजक स्तर मेहनतीच्या बळावर उंचावू पाहाणाऱ्या दुर्बलांचा समाजात नेहमीच उपहास केला जातो. शेतकऱ्यांच्या जगण्यामध्ये परिस्थितीने जी विदारकता आली आहे त्याचेही हृदयविदारक दर्शन या चित्रपटात घडते. शिक्षणामुळेच आपल्या मुलांचे जीवनमान चांगले होईल या विचाराने झपाटलेला नामदेव हा विकासाची आस लागलेला चातक पक्षी वाटतो. ते सारे बारकावे राहुलने इतक्या नेटकेपणाने घुमा चित्रपटात टिपले आहेत की क्या बात है! नामदेव राहातोय त्या गावचा निसर्ग, तेथील माती, जमिन यांची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्ये, नामदेव ज्या ठिकाणी काम करतोय त्या खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणच्या सुरुंगस्फोटाची दृश्ये ही या चित्रपटाला अधिक उंचीवर नेतात. जमिनीवर राहून जमिनीवरचे सांगणारा हा चित्रपट आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटात महेश रावसाहेब काळे याने उत्कृष्ट दिग्दर्शनाचा षटकार मारला आहे. त्याच्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असतील भविष्यात. ग्रामीण पार्श्वभूमीचा, ग्रामीण बोलीचा हा चित्रपट नेटका झाला कारण त्याची पटकथा बांधेसूद आहे हेही श्रेय महेशचेच.
संगीत - घुमा चित्रपटाला जसराज, हृषिकेश, सौरभ या त्रयीने संगीत दिले असून त्यातील गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. त्यातील गाणी अजय गोगावले, प्रियांका बर्वे, मुग्धा हसबनीस यांनी गायली आहे. प्रियांका बर्वे हिने गायलेली लावणी फक्कड झाली आहे. दिग्दर्शन, संगीत, छायाचित्रण, संकलन सर्वच बाबतीत उजवा असलेला घुमा हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा असाच आहे.                                                                         http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-ghuma-5706987-PHO.html

Monday, September 25, 2017

फास्टर फेणेच्या पुस्तकांची ऑडिओ बुक्स लवकर भेटीला...समीर परांजपे. दै. दिव्य मराठी, २५ सप्टेंबर २०१७


दिव्य मराठीच्या दि. 25 सप्टेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची लिंक व मजकूर पुढे दिला आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/25092017/0/4/
--
फास्टर फेणेच्या पुस्तकांची ऑडिओ बुक्स लवकर भेटीला...
- समीर परांजपे
मुंबई, दि. 25 सप्टेंबर - `फास्टर फेणे' हा या मराठी चित्रपटाचा टिजर यूट्युबवर झळकला आणि फास्टर फेणेच्या भूमिकेत अमेय वाघ शोभून दिसेल या विषयावर सोशल मिडियामध्ये उदंड चर्चा सुरु झाली. फास्टर फेणेच्या चित्रपटाची हवा तयार झाली असताना दुसऱ्या बाजूला परदेशातील काही फास्टर फेणेप्रेमी फास्टर फेणेवर भा. रा. भागवत यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे ऑडिअो बुक करण्याची योजना आखत आहेत.
यासंदर्भात भा. रा. भागवत यांचे पुत्र रवि भागवत यांनी `दिव्य मराठी'ला सांगितले की, विदेशातील काही फास्टर फेणेप्रेमींची अशी इच्छा आहे की, फास्टर फेणेवरील पुस्तकांचे ऑडिओ बुकमध्ये रुपांतर करावे. यासंदर्भात त्यांच्याशी बोलणी सुरु असून आताच सर्व माहिती उघड करता येणार नाही. या मंडळींशी फास्टर फेणेवरील किती व कोणत्या पुस्तकांचे ऑडिओ बुकमध्ये रुपांतर करायचे याबद्दल सध्या माझी चर्चा सुरु आहे.
फास्टर फेणेवर एक मराठी अॅनिमेशन फिल्म सिरिजही तयार होणार होती. त्यासाठी चार वर्षांपूर्वी काही जणांनी रवि भागवतांशी संपर्क साधला होता. मात्र त्या मंडळींकडून पुढे त्याबाबत काही न झाल्याने ही अॅनिमेशन फिल्म बनविण्याचा प्रकल्प अजूनही प्रत्यक्षात आलेला नाही.
फास्टर फेणेवर भा. रा. भागवत यांनी जितकी पुस्तके लिहिली होती त्यातील बहुतांश पुस्तके त्यांनीच प्रकाशित केली होती. त्यानंतर २००१मध्ये ही पुस्तके पुण्याच्या उत्कर्ष प्रकाशनने प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात उत्कर्ष प्रकाशनच्या सूत्रांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी भा. रा. भागवतांनी फास्टर फेणेवर लिहिलेल्या २० पुस्तकांचा संच आम्ही प्रकाशित केला आहे. लहान मुलांना फास्टर फेणेविषयी अजूनही आकर्षण असल्याने या पुस्तकांना मागणीही चांगली आहे. फास्टर फेणेवरील या २० पुस्तकांच्या संचाची किंमत १२०० रुपये इतकी आहे. त्यामध्ये फुरसंुगीचा फास्टर फेणे, आगे बढो फास्टर फेणे, बालबहाद्दूर फास्टर फेणे, जवानमर्द फास्टर फेणे, फास्टर फेणेचा रणरंग, ट्रिंग ट्रिंग फास्टर फेणे, फास्टर फेणेची एक्स्प्रेस कामगिरी, फास्टर फेणे टोला हाणतो, फास्टर फेणेची काश्मिरी करामत, प्रतापगडावर फास्टर फेणे, गुलमर्गचे गुढ आणि फास्टर फेणे, चिकुचे जाळे आणि फास्टर फेणे, फास्टर फेणेची डोंगरभेट, फास्टर फेणेच्या गळ्यात माळ, चक्रीवादळात फास्टर फेणे, चिकू, िचंपाझी आणि फास्टर फेणे, विमानचोर विरुद्ध फास्टर फेणे, जंगलपटात फास्टर फेणे, टिक टॉक फास्टर फेणे, फास्टर फेणे डिटेक्टिव्ह अशी वीस पुस्तके आहेत.
फास्टर फेणेची लोकप्रियता लक्षात घेता या पुस्तकांचे इंग्रजीत रुपांतर होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने बाळ उर्ध्वरेषे व शांता पुराणिक यांनी फास्टर फेणेच्या सहा पुस्तकांचा केलेला इंग्रजी अनुवाद उत्कर्ष प्रकाशनने प्रसिद्ध केला असून पुस्तकरुपात ग्रंथदुकानांत व इ-बुक स्वरुपात बुकगंगा या साइटवरही उपलब्ध आहे. या पुस्तकांनाही चांगली मागणी असल्याचे उत्कर्ष प्रकाशनच्या सूत्रांनी सांगितले.
फास्टर फेणेवर बनली होती १९८३ साली मालिका
फास्टर फेणेवर डीडी नॅशनल चॅनेलवर १९८३ साली फास्टर फेणे ही मालिका सुरु झाली होती. त्यात फास्टर फेणेची भूमिका सुमीत राघवन याने केली होती. या मालिकेला अनेक वर्षे झाली तरी त्या मालिकेची अनेकांच्या मनात असलेली आठवण अजूनही कायम आहे.

नदी वाहते या चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे. दै. दिव्य मराठी वेबसाइट - २२ सप्टेंबर २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेन्टमध्ये 22 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेला नदी वाहते या नव्या चित्रपटाचा रिव्ह्यू त्याच्या वेबपेज लिंकसह पुढे दिला आहे.
-----
नदी वाहते - जीवनदायिनी नदीचे तत्व व महत्व यांचे प्रवाही दर्शन
----
- समीर परांजपे
---
रेटिंग - चार स्टार
--
कलाकार - पूनम शेटगांवकर, आशा शेलार, हृदयनाथ जाधव, अभिषेक आनंद, जयंत गाडेकर, भूषण विकास, महादेव सावंत, गजानन झारमेकर, विष्णुपद बर्वे, वसंत जोसलकर, शिव सुब्रमण्यम
पटकथा/संवाद/दिग्दर्शन - संदीप सावंत
निर्माते - संदीप सावंत, नीरजा पटवर्धन
कला दिग्दर्शन व वेशभूषा - नीरजा पटवर्धन
पार्श्वसंगीत – तुषार जयराज
--
कोणत्याही प्रदेशातील नद, नद्या हे तेथील जीवनवाहिन्या असतात. माणसाला जगण्यासाठी जे अत्यावश्यक घटक लागतात त्यामध्ये पाण्याचा समावेश होतो. पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नद्यांना माणसाने खरेतर जपायला पाहिजे. त्या प्रदुषित होणार नाहीत याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पण तसे होत नाही. विकासाच्या नावाखाली माणसाने नदी, समुद्र, विहिरी, झऱ्यांसारखे जलस्रोत यांच्या नैसर्गिक चलनवलनात इतका हस्तक्षेप केलेला आहे की, त्यातून उभे राहिलेले नैसर्गिक संकट एक दिवस माणसालाच गिळेल की काय अशी स्थिती भविष्यात येऊ शकते. निसर्ग माणसाला भरभरुन देत असतो. पण त्याच निसर्गाला माणूस ओरबाडायला निघाल्यानंतर तो कधी ना कधी उग्र स्वरुप धारण करणारच. जगातील बहुतांश मानवसंस्कृती नदीकाठी वसलेल्या दिसतील. आदिमकाळापासून नदीशी असलेला माणसाचा हा भावबंध मनस्पर्शी आहे. नदी वाहते हा चित्रपट नेमके याच भावबंधाचे दर्शन घडवितो. संदीप सावंत यांनी १३ वर्षांपूर्वी श्वास हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. श्वासने मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा जागतिक लोकमान्यता मिळवून दिली. या चित्रपटातून संदीप सावंत यांच्यातील अभ्यासू व अफाट दिग्दर्शक दिसून आला होता. त्याच दिग्दर्शकाचा नदी वाहते हा चित्रपट येणार म्हटल्यानंतर प्रेक्षकांच्याही अपेक्षा उंचावल्या होत्या. या साऱ्या अपेक्षा नदी वाहते हा चित्रपट पूर्ण करतो हे आवर्जून सांगायला हवे.
कथा - या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली आहे ती अंती या नदीनेच. या नदीभोवतीच सारी कथा फिरते. सारा चित्रपट कोकणात घडतो. अंती नदीच्या शेजारी वसलेल्या एका गावात ही कथा प्रवाही होते. अंती नदीमुळे आपल्या गावाला काय काय फायदे झाले आहेत याची नेमकी जाण असणारे लोक इतर गावांप्रमाणेच या गावातही कमी संख्येनेच असतात. यातील अनघा हे एक पात्र. अंती नदीवर तिचे नितांत प्रेम असते. अंती नदीमुळे या परिसराला जी निसर्गवैविध्य लाभले आहे त्याबद्दल ती या नदीची ऋणी आहे. ही नदी एकप्रकारे तिची सखी आहे. ती या नदीशी बोलते, तिच्याशी संवाद साधते. तीसहून अधिक गावांतून वाहणारी ही नदी भविष्यातही अशीच प्रवाहित राहावी व तिने आपल्या काठावरील लोकांचे आयुष्य असेच उजळत राहावे अशी तिची मनोमन इच्छा असते. अनघासारखेच या गावामध्ये काही समविचारी लोक असतात. त्यात अनघा, तिची आई, भाऊ, आकाश, प्रकाश, मंगेश, गुरुजी, तुकाराम अशा लोकांचा समावेश असतो. कोकणातील या नदीच्या किनारी असलेल्या गावांतील जमिनींची अवस्था मात्र बिकट आहे. काही विशिष्ट ऋतू सोडले तर या जमिनींमध्ये पिके घेण्यासाठी स्थानिक शेतकरी उदासीन आहेत. शेतजमिनीतून जे उत्पन्न येते त्यातून कुटुंबाचे पूर्णपणे भरणपोषण होणार नाही ही त्यांच्या मनात असलेली पहिली नकारात्मक भावना. विशिष्ट पिके घेतल्यानंतर शेतीमध्ये आणखी प्रयोग करण्याविषयी त्यांच्या मनात असलेली अनास्थाही प्रबळ आहे. त्यामुळे शेती करण्यापेक्षा शहरात जाऊन नोकरी केलेली बरी अशा मानसिकतेने या गावांतील माणसे पछाडलेली आहेत. त्यामुळे कोणी त्यांची शेतजमिन विकत घेतली तर लगेच ते तो व्यवहार करुन पूर्ण होतात. याचे कारण जमिन विकल्यानंतर मिळणारे पैसे. मात्र हे पैसे आयुष्याला पुरणार नाहीत याची त्यांना कदाचित जाणीव असली तरी खेद नसतो. अंती नदीच्या तीरावरील गावाच्या शेतजमिनी अशाच पटापट विकल्या जात आहेत. अनघा राहात असते त्या गावात देखील अंती नदीच्या किनाऱ्यावरील जमिनींचा असाच होताना तिला व समविचारी लोकांना बघावे लागत आहे. हे सारे रोखण्यासाठी व अंती या जीवनदायी नदीचा उपयोग करुन कोकणातील गावात नंदनवन कसे फुलवता येईल याचा विचार अनघा व तिचे समविचारी लोक करत आहेत. अंती नदीच्या वरच्या अंगाला एक बडा उद्योगपती भव्य टुरिस्ट रिसॉर्ट सुरु करणार असल्याची बातमी येऊन धडकते. आणि मग त्या दिशेनेच भराभर घटना घडू लागतात. अंती नदीवर भव्य धरण बांधून पाणी अडवायचे अशी या उद्योगपतीची योजना असते. तिथे जे टुरिस्ट रिसॉर्ट सुरु होईल त्यामध्ये पर्यटकांचा ओघ लागेल व त्यातून आपला व्यवसाय आणखी भरभराटीला आणायचा अशी या उद्योजकाच्या मनात योजना असते. त्याला आपल्या उद्योगाचा ब्रँड पुढच्या दहा वर्षांत खूप स्ट्राँग करायचा असतो. त्यामुळे त्यासाठी हा टुरिस्ट प्रॉजेक्ट त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे अंती नदीच्या किनारी असलेल्या गावांमधील जमिनी विकत घेऊन या प्रकल्पाला कसा आकार देता येईल याचा विचार हा उद्योगपती करीत असतो. पण हे वाटते तितके सोपे नसते. त्यासाठी नदीकिनारी मोक्याच्या जागी असलेल्या जमिनी स्थानिक लोकांनी या उद्योजकाला विकणे नितांत आवश्यक असते. मग त्यासाठी हा उद्योजक आपले जाळे टाकतो. त्यात एका गावचा सरपंच सामील होतो. सरपंचाच्या हाती गावची बऱ्यापैकी सत्ता असल्याने तो आपल्या बाजूला जास्तीत जास्त लोक वळविण्यासाठी प्रयत्न करु लागतो. गावामध्ये अंती नदीचे पाणी पाईपलाइनद्वारे गावातील प्रत्येक घरात पोहोचविण्याची एक योजना पुढे येते. त्या योजनेच्या मंजुरीसाठी ग्रामसभा बोलावली जाते. पण आयत्यावेळेला ग्रामसभेत महिलांची उपस्थिती कमी असल्याचे कारण दाखवून ही योजना मंजूर होऊ शकत नाही असा निर्णय शासकीय अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. या सगळ्या कारस्थानामागे सरपंच व त्याचे बगलबच्चेच असतात. अंती नदीच्या किनाऱ्यावरील जमिनी त्या उद्योजकाच्या घशात कशा जातील यासाठी सरपंच आडूनआडून खूप प्रयत्न करत असतो. अंती नदीवर भव्य धरण बांधायची योजना व्यवहार्य नाही. त्यामुळे नदीचा प्रवाह अडून या जीवनदायिनीच्या किनाऱ्यावरील गावांत जे निसर्गसौंदर्य आहे व जीवनमान आहे ते सारे उध्वस्त होईल हे सत्य अनघा, मास्तर व त्यांच्यासारख्या काही समविचारी लोकांना पटलेले असते. ते आपल्यापरीने गावकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण ते प्रयत्न तोकडे पडताना दिसतात. पण तरीही या संकटाला दूर पळवून लावण्यासाठी योग्य तोडगा शोधायला हवाच यासाठी ते धडपडत असतात. टुरिस्ट रिसॉर्टच्या प्रोजेक्ट हेडला हे लोक जाऊन भेटतात. त्याला अंती नदीवर भव्य धरण बांधू नका अशी विनंतीही करतात. पण तो बधत नाही. त्यामुळे आता हेच गावकऱ्यांसमोर आपल्या कृतीने काही चांगले निर्माण करुन दाखविण्याच्या ध्येयाने कामाला लागतात. अंती नदीकिनारी असलेल्या नाम्या नावाच्या माणसाच्या शेतजमिनीत ते विविध पिकांचे प्रयोग सुरु करतात. अनघाने आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करुन पिकविलेल्या अनेक भाजा बाजारात विकतात. आपली शेतजमिन ही अत्यंत महत्वाची असून तिची उत्तम मशागत केली तर वर्षभर ती आपल्याला पुरेल इतके उत्पन देऊ शकते हे अंती नदीच्या किनाऱ्यांवरील गावांतल्या रहिवाशांना पटावे म्हणून हे समविचारी लोक झटत असतात. त्यासाठी अंती नदीवर छोटे छोटे बंधारे बांधण्याचा विचारही त्यांच्या मनात येतो. तसा बंधारा ते एके ठिकाणी बांधतातही पण गावकरी येऊन तो बंधारा पुन्हा उखडतात. पण अनघा, मास्तर व त्यांचे समविचारी लोक थकत नाहीत ते पुन्हा हा बंधारा बांधतात. अंती नदीच्या तीरावरील गावांमध्ये जी निसर्गसंपदा आहे त्याकडे लोकांनी आकृष्ट व्हावे म्हणून तिथे निसर्गशिबिरे, साहसशिबिरे यांचे आयोजन व्यावसायिक तत्वावर करुन त्यातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो याचीही चुणूक ते गावकऱ्यांना दाखवू इच्छितात. हे त्यांचे सारे प्रयत्न पूर्ण होतात का हा प्रश्न महत्वाचा आहेच पण त्याचे उत्तर शोधण्याचे काम दिग्दर्शकाने प्रेक्षकांवर सोडले आहे. नदी ही माणसासाठी जीवनरेखा आहे हा विचार या साऱ्या कथेतून प्रबळ होत राहातो. 
अभिनय - या चित्रपटामध्ये कोणीही नायक नाही किंवा नायिका नाही. मात्र मुख्य भूमिकेत आहे ती अंती नदी. नदी बोलू तर शकत नाही मात्र तिच्या खळाळत्या पात्राचे चित्रपटभर दिसणारे दर्शन प्रेक्षकांशी संवाद साधत राहाते. मला वाचवा आणि तुम्हीही वाचा हे या अंती नदीचे सांगणे आहे. तिचे हे मनोगत ज्यांना कळते अशी माणसे अर्थातच संख्येने कमी आहेत. पण अंती नदीचा प्रवाह निरंतर असाच वाहता राहावा म्हणून ही संवेदनशील माणसे जी धडपड करतात ती खरच हृदयस्पर्शी आहे. त्या धडपडीतूच सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम अभिनय केला आहे. पूनम शेटगांवकर (अनघा), आशा शेलार (आई), हृदयनाथ जाधव (भाऊ), अभिषेक आनंद (आकाश), जयंत गाडेकर (अप्पा नाईक), भूषण विकास (कचरे), महादेव सावंत (तुकाराम), गजानन झारमेकर (प्रकाश), विष्णुपद बर्वे (मंगेश)
वसंत जोसलकर (गुरुजी), शिव सुब्रमण्यम( प्रोजेक्ट हेड) या सगळ्या कलाकारांनी अगदी नैसर्गिक अभिनय केला आहे. कोकणातील माणसांचा भाबडेपणा, इरसालपणा, प्रयोगशीलतेबद्दल असलेला आळस, एकमेकांवर असलेले प्रेम, दुश्वास यावर आजवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकांत, चित्रपट, मालिकांत भरपूर काही दाखविले गेले आहे. पण नदी वाहते या चित्रपटात कोकणी माणसाचे टोकाला जाऊन अतिशयोक्त दर्शन घडवायचे टाळण्यात आले आहे. त्यातील माणसांचे रंग, रुप, मातीचे दर्शन हे सारे वास्तववादी आहे. त्या वास्तववादी दर्शनाला धक्का न लागेल असाच अभिनय या सर्व कलाकारांनी केल्याने चित्रपटाचे दर्शनमूल्य अधिक वाढले आहे. त्यात अजून एका व्यक्तिचा तितकाच मोलाचा वाटा आहे ती म्हणजे नीरजा पटवर्धन. नीरजा यांनी या चित्रपटासाठी उत्तम कला दिग्दर्शन केले आहे. कोकणी माणूस नेमका कसा जगतो हे त्याच्या वेशभूषेतूनही प्रतित होते. त्याचे नेमके दर्शन नीरजा यांनी घडविले आहे. 
दिग्दर्शन - संदीप सावंत हे अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक आहे हे त्यांच्या श्वास चित्रपटातून प्रेक्षकांना कळलेच होते. मुळात ते अत्यंत अभ्यासू आहेत. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास केल्याशिवाय ते चित्रपट दिग्दर्शित करायला सज्ज होत नाहीत. तेही कोकणातलेच असल्याने तेथील माती, निसर्गाशी त्यांचा गहिरा संबंध आहे. अंती नदीच्या किनाऱ्यावरील गावांत राहाणाऱ्या माणसांचे भावविश्व साकारताना संदीप सावंत यांनी वास्तवदर्शनावर अधिक भर दिला आहे. संयत शैलीच्या त्यांच्या दिग्दर्शनाने सारा चित्रपट समतोल झाला आहे. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, निर्मिती ही सारी अंगे संदीप सावंत यांनीच पेलली आहेत. पण ते कोणत्याही बाबतीत कुठेही उणे पडलेले नाहीत. अंती नदी हेच चित्रपटाचे मुख्य पात्र आहे हे भान ते प्रेक्षकांना वारंवार आणून देतात. या चित्रपटाच्या चौकटींमध्ये त्यांनी अंती नदीची विविध रुपे व त्या रुपांमध्ये मिसळलेले गावातील लोक ज्या पद्धतीने साकारले आहेत त्यावरुन इतकेच म्हणता येईल की हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट झाला आहे. नदीचे तत्व व महत्व अशा पद्घतीने खूपच कमी चित्रपटांतून दिसले आहे. श्वासने मराठी चित्रपटांच्या क्षेत्रात इितहास घडविला होता. नदी वाहते हा चित्रपट मराठी चित्रपटांची आशयघनता आणखी उंचावर नेऊन ठेवेल यात शंका नाही.
संगीत - या चित्रपटात गाणी नाहीत पण चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे अतिशय प्रभावी आहे. हे पार्श्वसंगीत तुषार जयराज यांनी दिले आहे. चित्रचौकट अधिक जिवंत करण्यात हे पार्श्वसंगीत मोलाचा हातभार लावते. ते कुठेही अनाठायी वाटत नाही. या चित्रपटाचे कॅमेरामन संजय मेमाणे, संकलक नीरज व्होरालिया, सिंक साउंड व साउंड डिझाईन करणारे सुहास राणे, साउंड डिझाईन व मिक्सिंग करणारे मंदार कमलापूरकर या सर्वांच्या एकत्रित कामगिरीनेच नदी वाहते हा प्रभावी चित्रपट बनला आहे. त्यामुळे या सर्वांचा उल्लेख करणे आवश्यक ठरते. असे उत्तम आशयाचे मराठी चित्रपट अधिक संख्येने यायला हवेत. त्यांना उदंड रसिकाश्रय लाभला पाहिजे. मराठी चित्रपट सातासमुद्रापार गेला अशा नुसत्या गप्पा मारुन उपयोग नाही, तशी कामगिरीही चित्रपटातून दिसावी लागते. संदीप सावंत यांच्या दिग्दर्शनात ती ताकद नक्कीच आहे.        http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-nadi-vahate-directed-by-sandeep-sawant-5699779-PHO.html?ref=ht

अनान या चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे. दै. दिव्य मराठी वेबसाईट २२ सप्टेंबर २०१७

अनान या चित्रपटाचा दिव्य मराठी ऑनलाइनच्या मराठी कट्टा सेगमेंटमध्ये दि. 22 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेला रिव्ह्यू. सोबत त्याची वेबपेज लिंकही दिली आहे.
----
प्रार्थना बेहरेचा निराशा करणारा चित्रपट `अनान'
----
चित्रपट - अनान
----
- समीर परांजपे
---
रेटिंग - दोन स्टार
--
कलाकार - प्रार्थना बेहरे, ओमकार शिंदे, सुखदा खांडकेकर, सुयोग गोरे, उदय नेने, शिल्पा तुळसकर, यतिन कार्येकर, उदय सबनीस, स्नेहा रायकर, राजेंद्र शिसतकर, प्राजक्ता माळी
दिग्दर्शक - राजेश कुष्टे
पटकथा- संवाद - राजेश कुष्टे, मुकेश जाधव
निर्माते - हेमंत भाटिया
संगीतकार - सौरभ-दुर्गेश
चित्रपट प्रकार - फॅमिला ड्रामा
--
लोकांना काहीसे आडवळणी वाटू शकतील असे शब्द निवडून त्या शब्दांची शीर्षके चित्रपटांना देण्याचा प्रवाह सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सुरु आहे. त्याच प्रवाहातील अनान हा चित्रपट आहे असे कोणालाही वाटू शकते. पण प्रत्यक्ष िचत्रपट बघितल्यानंतर ते एका शब्दाचे लघुरुप असल्याचे लक्षात येते. अर्धनारीनटेश्वर या शब्दाचे लघुरुप म्हणजे अनान. अर्धनारीनटेश्वर ही संकल्पना शंकराशी जोडली गेली आहे. त्यामुळे अनानमधे शंकराचे महत्व वर्णन केलेले आहे, त्याचे तांडवनृत्य आहे व असे अजून बरेच काही आहे. पण या चित्रपटात एक महत्वाची गोष्ट नाही ती म्हणजे त्याच्या कथेमध्ये प्राणच नाही. चारही चाकांमधली हवा गेल्यानंतर जशी गाडी दिसेल तसा हा चित्रपट आहे. कथाच धड नाही तर मग चित्रपट विधड होणारच. हे सारे लक्षात घेऊनच प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायचा धोका पत्करायला हवा. माणसाला कंगाल झाल्यामुळे जेवायलाही त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात, साहजिकच त्याची उपासमारही होते. या स्थितीला अन्नानदशा असे म्हटले जाते. चित्रपटाचे उत्तम भरणपोषण करु शकणारी कथा व दिग्दर्शन यांचा अभाव असल्याने अनान चित्रपटाची `अनान'दशा झाली आहे.
कथा - पोर्णिमेची रात्र आहे. निबिड जंगलातून एक माता आपल्या पोटाशी बाळाला कवटाळून धावत आहे. त्या मातेचा व तिच्या बाळाचा जीव घेण्यासाठी तीन क्रुरकर्मा सुरे, कुऱ्हाडी परजून त्यांच्या मागे धावत आहेत. त्यांच्या मते हे बाळ म्हणजे पापाचे फळ आहे. त्यामुळे त्यांना या बाळाला संपवायचे आहे. मात्र त्या मातेला आपल्या बाळाचा जीव वाचवायचा आहे. ती त्यासाठी जीवाच्या आकांताने वाट फुटेल ितथे जात आहे. तिच्या मागे लागलेले तीन हल्लेखोर तिला गाठणारच इतक्यात तिला रस्त्याच्या कडेला एक मंदिर दिसते. त्या मंदिराच्या ओसरीवर ती आपले बाळ ठेवते व तिथून निघून जाते. निबिड जंगलात हे सारे घडत असताना जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून एक कार चालली असल्याचे दृश्य दिसते. त्यामध्ये एक प्रसिद्ध गायिका-नृत्यशिक्षिका वसुधा व त्यांचे सहकारी नारायण असे दोघे असतात. या कारमध्ये काही बिघाड होतो. गाडीमध्ये काय बिघाड झाला आहे हे पाहाण्यासाठी नारायण आपली कार नेमके या मंदिरापाशी थांबवितात. त्यावेळी त्यांना मंदिरातून एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायला येतो. वसुधा व नारायण या बाळाला उचलून आपल्या सोबत घेतात. त्याचवेळी नेमके ते तीन हल्लेखोर या गायिकेला व नारायणला पाहातात व त्यांच्या रोखाने शस्त्रे परजून चाल करुन येतात. वसुधा व नारायण दोघेही घाईघाईने गाडीत बसतात व गाडी भरधाव वेगाने हाकतात. हल्लेखोरांच्या हातून ते बाळ अशा रितीने वाचते पण या बाळाची आई हल्लेखोरांच्या हाती सापडते. ते तिला ठार मारतात. या घटनेनंतर एकदम २१ वर्षानंतरचा घटनाक्रम दाखविला आहे. त्या बाळाचे नाव नील ठेवण्यात आले असून वसुधाने उत्तमरित्या वाढविलेले आहे. नील ही नृत्यात तरबेज झाली आहे. ती दिसायलाही देखणी आहे. मात्र तिच्या आयुष्यात एक शारिरिक शल्य आहे. ती हरमॅफ्रोडाइट म्हणजे द्विलिंगी आहे. त्यामुळे तिच्या मनात एकाच वेळेला पुरुष व स्त्रीच्या भावना आहेत. तिच्या वाट्याला हे जे जगणे आले आहे त्यामुळे ती दु:खी देखील आहे. लहानपणी आपल्याला ठार मारायला काही हल्लेखोर आले होते ही माहितीही तिचे पालन केलेल्या वसुधाकडून तिला ती मोठे झाल्यावर मिळते. त्यामुळेही ती काही प्रमाणात धास्तावलेली असते. हरमॅफ्रोडाइट असणाऱ्यांचे प्रमाण समाजात तसे कमी आहे. पण ज्यांच्या वाट्याला हे जीणे येते ते त्या व्यक्तीला अस्वस्थ करणारे असते. त्यामुळेही नीलला वसुधा खूप जपत असते. दुसऱ्या बाजूला क्रिस देव नावाची एक मुलगी आपल्या एका प्रॉजेक्टसाठी जर्मनीहून भारतात येते. ती भगवान शंकरावर संशोधन करणार असते. अर्धनारीनटेश्वर हे शंकराचेच एक रुप. क्रिसला भगवान शंकरावर एक म्युझिकल प्ले देखील करायचा असतो. ती भारतातील तिच्या जय नावाच्या मित्राच्या आठ महिन्यांपासून संपर्कात असते. भारतात आल्यानंतर क्रिस जय व त्याच्या मित्रांना भेटते. त्यात जयचा मित्र युवराज देखील असतो. युवराज हाच या चित्रपटाचा नायक आहे. युवराजचे वडिल हे उद्योगपती असतात. त्यांचा व्यवसाय फार चांगला चाललेला नसतो. ते कर्जात बुडालेले असतात. त्यातून बाहेर निघण्याचा त्यांना एकच मार्ग दिसत असतो तो म्हणजे आपला कॅनडा येथे स्थायिक झालेला मित्र दिक्षित याच्या मुलीशी युवराजचा विवाह लावून देणे. युवराजने दिक्षितांच्या मुलीशी लग्न केल्यास हे कर्ज फेडण्यासाठी दिक्षित युवराजच्या वडिलांना मदत करणार असतात. एक प्रकारे युवराजच्या वडिलांनी त्याचा सौदाच केलेला असतो. युवराज हा उत्तम नर्तक आहे. त्याने नृत्याच्या प्रचार व प्रसारासाठी आपले आयुष्य वाहून घ्यायचे ठरविले आहे. त्यामुळे तो या लग्नासाठी राजी नसतो. क्रिस देव ही अापल्या प्रोजेक्टसाठी युवराज, जय व त्यांच्या आणखी एका मित्राला घेऊन भारतातील विविध शिवमंदिरांमध्ये जाते. तिथे ती वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेते. शंकराच्या विराट स्वरुपाविषयी माहिती जमविण्याचे तिचे काम जोरात सुरु असते. तिच्या संशोधनाला वेग आलेला असतो. हे सारे घडत असताना नीलच्या घरी वेगळेच नाट्य सुरु असते. नीलचे संगोपन केलेली वसुधा दरवर्षी १५ दिवस कोणालाही न सांगता अज्ञात स्थळी जात असते. तशी ती यावेळीही जाते. कथेच्या ओघात ती गोष्टही नंतर स्पष्ट होते. वसुधावर मनापासून प्रेम करणारा कोणी एक चाहाता असतो. तो आता स्वर्गवासी झाला आहे. पण तो व वसुधा जिथे जिथे भेटले त्या सर्व स्थळांना ती दरवर्षी पंधरा दिवसांच्या भ्रमंतीत भेटी देऊन आपल्या गतस्मृती जाग्या करत असते. ती याच कारणासाठी पंधरा दिवस बाहेर गेलेली असताना वसुधाच्या घरी ज्या नृत्य प्रशिक्षण घेणाऱ्या मुली असतात त्यातील एका मुलीसोबत लैंगिक भावना उद्दिपित होऊन नील नको ते कृत्य करताना पाहून नारायण संतप्त होतो. तिला खूप रागावतो. त्यामुळे दु:खी झालेली नील वसुधाचे घर सोडून निघून जाते. ती रस्त्यातून चाललेली असताना काही गुंड तिची छेड काढतात. आणि नेमका तिथे युवराज पोहोचतो व तिची सुटका करतो. युवराज नीलला घेऊन क्रिसकडे येतो. त्याच्या विनंतीवरुन क्रिस नीलला आपल्या घरी राहू देते. क्रिसचा रिसर्च प्रोजेक्ट सुरु असताना त्यातून तिला जो म्युझिकल प्ले साकारायचा आहे त्याची तयारीही सुरु असते. या म्युझिकल प्लेमध्ये शंकराचे तांडव साकारण्याची कल्पना पुढे येतेे. शंकर केवळ संतप्त असताना तांडव करतो असे नाही तर आनंदी असतानाही तो तांडव करतो. हे सारे लक्षात घेऊन युवराज व क्रिस हे उत्तम नृत्यांगनेच्या शोधात असतात. युवराजने पूर्वी नीलचा नृत्याविष्कार पाहिलेला असल्याने ती त्याच्या लक्षात असते. तिने या म्युझिकल प्लेमध्ये काम करावे अशी त्याची इच्छा असते. पण तिचा ठावठिकाणा माहित नसल्याने युवराज तिचा शोध घेत असतो. पण ती अचानक एका क्षणी त्याला गवसल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता म्युझिकल प्लेची तयारी जोरात सुरु होते. दरम्यान नीलला लहानपणी ज्याने ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या दाजी नावाच्या हल्लेखोराला नीलची खरी ओळख पटते. नीलच्या पाठीवर जन्मापासून एक विशिष्ट खूण आहे. तशी खुण असलेली मुलगी म्हणजे नीलच असल्याची माहिती त्याला गोंदण करणाऱ्या एका माणसाकडून मिळते. तेव्हापासून तो नीलला ठार मारण्यासाठी तिच्या मागावर आहे. मात्र त्याचे प्रयत्न काही वेळेस अयशस्वी ठरतात. म्युझिकल प्लेच्या तयारी दरम्यान युवराज हा नीलच्या प्रेमात पडतो. नीलच्या मनातही ही भावना आहेच पण हरमॅफ्रोडाइट असल्याने आपल्यात पुरुष व स्त्री या दोघांची लक्षणे आहेत त्यामुळे हे प्रेम सत्यात साकार होणे कठीण आहे हे तिला माहित असते. नील त्यामुळेही द्विधा मनस्थितीत असते. क्रिसबरोबर घरात राहात असताना नीलमधील पुरुषी भावना जाग्या होतात. दोघांमध्ये संबंध प्रस्थापित होतो. त्यातून क्रिसला नील ही हरमॅफ्रोडाइट असल्याचे कळते व ती तसे पुढे युवराजलाही सांगते. पण युवराजला त्याने काहीच फरक पडत नाही. युवराजच्या वडिलांची कर्जे फेडण्याची ऐपत नसल्याने ते दिक्षितांच्या मुलीशी युवराजने लवकरात लवकर लग्न करावे या मागे लागलेले असतात. दिक्षितांची मुलगी युवराजबद्दल पझेसिव्ह झालेली असते. युवराजच्या आयुष्यात नील आल्याने ती अस्वस्थ असते. शेवटी वडिलांनी खूप दडपण आणल्याने युवराज दिक्षितांच्या मुलीबरोबर साखरपुडा करण्यास राजी होतो. नेमके त्याच वेळेला क्रिसच्या घरातून नील कुठेतरी निघून गेल्याचे कळते. तिचा जीव धोक्यात आहे हेही लक्षात येते. दाजी नावाचा तो हल्लेखोर नीलच्या मागे हात धुवून लागलेला असतो. नीलला एकटे गाठून तो तिला ठार मारणार इतक्यात नीलमधील पुरुषी अंश जागा होतो. ती अंगात बळ एकवटते व दाजीलाच त्याच्याकडील सुऱ्याने खलास करते. हे सगळे झाल्यानंतर पुढचे दृश्य हे म्युझिकल प्लेचे आहे. त्यामध्ये युवराज व नील उत्तम तांडवनृत्य करतात. क्रिस देव करीत असलेला संशोधन प्रकल्प अशा रितीने पुर्णत्वाला जातो. युवराज दिक्षितांच्या मुलीशी साखरपुडा झालेला असला तरी आपल्या नीलवरील प्रेमापायी ती सारी बंधने झुगारतो. नील ही हरमॅफ्रोडाइट असली तरी युवराज तिला आपला जीवनसाथी म्हणून स्वीकारतो. नीललाही युवराजच्या खऱ्या प्रेमाची अनुभूती मिळते. नीलला पूर्ण स्त्री म्हणून जगायची आस असते ती देखील अशा रितीने पूर्ण होते.
अभिनय - एखादी व्यक्ती हरमॅफ्रोडाइट दुसऱ्या शब्दांत द्विलिंगी आहे अशी व्यक्तिरेखा मराठी चित्रपटांत खूपच अभावाने आली असेल. त्यामुळे नील या हरमॅफ्रोडाइट व्यक्तीची भूमिका साकारणाऱ्या प्रार्थना बेहरे हिला अभिनयासाठी खूप वाव होता. प्रार्थना ही स्वत: उत्तम शास्त्रीय नृत्यांगना आहे. या चित्रपटाचा नायक ओमकार शिंदे हा उत्तम शास्त्रीय नर्तक आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर चित्रपटात उत्तम संगीत, शास्त्रीय नृत्य या गोष्टींना खूपच वाव होता. कथेचा बाज बरा असला तरी तिची एकुण मांडणी इतकी ढोबळ व ढिसाळ आहे की, नील व युवराज यांच्या व्यक्तिरेखा अतिशय कमकुवत झाल्या आहेत. त्यांच्या तोंडी असलेले संवाद हे मराठीला हिंदीची फोडणी दिल्यासारखे आहेत. हिंदी वळणाने या चित्रपटातील सगळे कलाकार मराठी बोलत राहातात. एक दोन गाण्यांत ओमकार शिंदे व प्रार्थना बेहरे यांनी उत्तम शास्त्रीय नृत्य केले आहे. पण ते त्यांचे कौशल्य वगळता अभिनयात त्यांचा काहीही प्रभाव पडत नाही. हरमॅफ्रोडाइट व्यक्तीची जी तगमग आहे ती देखील प्रार्थना बेहरेच्या अभिनयातून नीटशी व्यक्त होत नाही. चित्रपटात युवराजचे आईवडील, दिक्षित ही व्यक्तिरेखा, दिक्षितांची मुलगी, क्रिस देव ही संशोधक ही सारी पात्रे कचकड्याच्या बाहुल्या वाटू लागतात, इतका त्यांचा अभिनय व पडद्यावर वावरणे कच्चे आहे. त्यातील एक म्हणजे युवराजचे वडिल. या भूमिकेसाठी यतीन कार्येकरसारखा दिग्गज अभिनेता उगीचच खर्ची घातला आहे. वसुधा या गायिकेच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर आहे. पण तिच्याही अभिनयाला निदान या चित्रपटात तरी फारसा वाव नाही. सुमार दर्जाचा चित्रपट असेच त्याचे वर्णन करावे लागेल.
दिग्दर्शन - नटरंग, आयना का बायना, डब्बा ऐसपैस यासारख्या सिनेमांमधून आपले योगदान दिलेले राजेश कुष्टे यांनी अनान या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकले आहे. गेली १५ वर्ष नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपटविश्वाशी ते निगडीत आहेत. आता एवढी उत्तम पार्श्वभूमी असल्याने त्यांच्याकडून निश्चितच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार. पण ती अनानचे दिग्दर्शन करताना पूर्ण झालेली नाही. या चित्रपटाची पटकथा- संवाद - राजेश कुष्टे, मुकेश जाधव यांनी मिळून लिहिले आहेत. या चित्रपटाची गाणीही राजेश कुष्टे यांनी लिहिली आहेत तसेच एक गाणेही त्यांनी गायले आहे. म्हणजे चित्रपटाच्या प्रत्येक अंगावर कुष्टे यांचे नियंत्रण होते. आपला चित्रपट कसा बनतोय याचीही त्यांना संपूर्ण जाणीव असणारच. पण असे असूनही रटाळ होण्यापासून या चित्रपटाला वाचवू शकले नाहीत. हरमॅफ्रोडाइट व्यक्तिची गोष्ट सांगणे हेच या चित्रपटाचे वेगळेपण होते. पण त्यात प्रेमापासून सगळा इमोशनल मसाला भरल्याने ती व्यक्ती बाजूलाच राहाते व पडद्यावर वेगळेच काही सुरु होते. या चित्रपटाची फोटोग्राफी, साऊंड इफेक्ट्स उत्तम आहेत पण दिग्दर्शन कमजोर असल्याने व्यक्तिरेखा सपाट झाल्या आहेत. काही वेळा दृश्यांची, घटनांची संगतीच लागत नाही. 
संगीत - अनान चित्रपटाला सौरभ-दुर्गेश या जोडीने संगीत दिले आहे. जाहिरातींसाठी संगीत देणाऱ्या या जोडीने अनान चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे. या चित्रपटात एकुण पाच गाणी आहेत. दिग्दर्शक राजेश कुष्टे यांनी यातील गाणीही लिहिली असून त्यातील नारनशिली हे गाणे ते स्वत: गायले आहेत. अनान चित्रपटात (१) `गंधी सुगंधी'-(गायक - सोनू निगम, आनंदी जोशी), (२) `एक सूर्य तू' (गायक - सौरभ शेट्ये, आनंदी जोशी), (३) ‘काहे तू प्रित जगायी’ – (गझलगायक – पूजा गायतोंडे), (४) `तांडव' (गायक - रवींद्र साठे), (५) ‘नारनशिली’ (गायक – राजेश कुष्टे) ही पाच गाणी आहेत. त्यापैकी काहे तू प्रित जगायी ही गझल झाली आहे. तांडव गाणेही छान जमले आहे. मात्र इतर गाणी फार लक्षात राहातील अशी शाश्वती नाही. सौरभ-दुर्गेश जोडीने आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटात जी कामगिरी बजावली आहे ती खूप चमकदार नसली तरी दुर्लक्षित करण्याइतकी देखील खचितच नाही.                            https://googleweblight.com/i?u=https%3A%2F%2Fm.divyamarathi.bhaskar.com%2Fnews%2FBOL-MB-movie-review-of-marathi-film-annan-5701650-PHO.html%3Fref%3Dht&hl=en-IN

Friday, September 15, 2017

विठ्ठला शप्पथ या चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी वेबसाइट, १५ सप्टेंबर २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी सिनेकट्टा या सेगमेन्टसाठी `विठ्ठला शप्पथ' या चित्रपटाचे मी १५ सप्टेंबर २०१७ रोजी केलेले परीक्षण. त्या मजकूराची वेबलिंकही सोबत दिली आहे.                           http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-vitthala-shappath-5696001-PHO.html
-----
विठ्ठला शप्पथ - कल्पनाशून्यतेचा अजून एक अविष्कार
----
चित्रपट - विठ्ठला शप्पथ
----
- समीर परांजपे
---
रेटिंग - एक स्टार
--
कलाकार - मंगेश देसाई, अनुराधा राज्याध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, विजय निकम, राजन ताम्हाणे, प्रणव रावराणे, राजेश भोसले, विजय साईराज, कृतिका गायकवाड
कथा, पटकथा, दिग्दर्शक -चंद्रकांत पवार
संवाद – चंद्रकांत पवार, कौस्तुभ सावरकर, भानुदास पानमंद
संगीत – चिनार-महेश
निर्माते - गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी
श्रेणी - फॅमिली ड्रामा
--
मराठी चित्रपटांमध्ये विविध प्रयोग होत आहेत हे जसे खरे आहे तसेच या क्षेत्रात वाईट दर्जाचे चित्रपटही तितकेच निर्माण होत आहे. किंबहुना वाईट दर्जाच्या मराठी चित्रपटांची संख्या चांगल्या मराठी चित्रपटांपेक्षा नक्कीच जास्त आहे. पुरेसे भांडवल हाती असले की चित्रपट निर्माण करण्यासाठी पुढे सरसावायला निघालेले लोक आपल्या हातात जी कथा आहे ती नेमकी कोणत्या दर्जाची आहे, त्यातून काही चांगला चित्रपट निर्माण होणार आहे का, याचा सारासार विचारही करीत नाही. होते काय की काही कोट्यवधी रुपये खर्चून एखादा मराठी चित्रपट तर तयार होतो, त्यातून कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक व इतर आघाड्यांवरील लोक यांना रोजगार मिळतो. पण अंतिमत: हा मराठी चित्रपट न चालल्याने त्यातील कलाकारांच्या कारकिर्दीत एका अपयशाची नोंद तर होतेच शिवाय निर्माता बुडित खात्यात जातो. काही हौशी निर्माते असतात ज्यांना चित्रपट चालला काय नाही चालला काय याने काहीच फरक पडत नाही, पण काही निर्माते असेही असतात त्यांना या क्षेत्रात काही वेगळे करायचे असते त्यांची पार दैना होते चित्रपटाच्या अपयशामुळे. सध्या जे मराठी चित्रपट येत आहेत त्यामध्ये सरधोपट पण नाही तर विषय आपटून आपटून धोपटलेल्या विषयांवरच बनविलेले चित्रपट येत आहेत त्यामध्ये विठ्ठला शप्पथ हा चित्रपट अग्रक्रमावर राहिल. या चित्रपटाला सुरुवात तर आहे पण कथा इतकी भरकटत जाते की काही म्हणजे काही कळत नाही. सगळे ढोबळ चित्रण...प्रेक्षकाकडे चित्रपट पाहाताना डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय उरत नाही.
कथा - एक गावासारखे गाव असते. तिथे चांगली व वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीची माणसे नांदत असतात. त्या गावामध्ये रामचंद्र म्हणजे तात्या हे विठ्ठलभक्त असतात. तो सत्प्रवृत्तीचा माणूस असतो. रामचंद्र यांचा मुलगा कृष्णा हा उनाडटप्पू. या गावचा सरपंच नागेश्वर याचा खल प्रवृत्तीचा मुलगा मन्या याच्याबरोबर दिवसभर जे तरुणांचे टोळके उनाडक्या व गुंडगिरी करत फिरायचे त्यामध्ये कृष्णा पण सामील असतो. कृष्णा हा मन्याला जिगरी दोस्त मानत असतो. आपल्यासाठी मन्या जीवाचीही बाजी लावेल असा विश्वास कृष्णाला असतो. गावातील किंवा पंचक्रोशीतील जमिनजुमला, मालमत्ता यांच्या खरेदीविक्रीच्या प्रकरणात बिल्डरांना मदत करणे, जमिनीचे व्यवहार बिल्डरांच्याच बाजूने कसे होतील यासाठी जमीन, मालमत्ता विकणाऱ्यांना धाकदपटशा दाखविणे असले उद्योग मन्या व त्याचे मित्र करीत असतात. कृष्णाही त्यात सामील असतो. या गुंडगिरीतून जो पैसा मिळायचा त्यातून जीवाची मुंबई करण्यापासून अनेक ऐषोआराम मन्या, त्याचे साथीदार मिळवत असतात. कृष्णालाही हे सारे आवडत असते. आपण अपमार्गाने पैसे कमावतो आहोत याची यापैकी कोणालाही लाज नसते. रामचंद्र व त्यांची पत्नी जानकी हे भाविक वृत्तीचे असतात. विठ्ठलभक्तीत कायम रंगलेले असतात. आपला मुलगा कृष्णाने चांगल्या मार्गाला लागून हळुहळू घराची सारी जबाबदारी अंगावर घ्यावी असे त्यांना वाटत असते. पण कृष्णा बेदरकार असतो. त्याला आईवडिलांचे मन अजिबात कळत नसते. गावामध्ये एक जमिन असते. ती असते गावकीची. या जमिनीवर जुन्या काळामध्ये एक विठ्ठल मंदिर असते. काळाच्या ओघामध्ये हे मंदिर पडलेले असते. त्याचे भग्नावशेषही जमिनीवर कुठे दिसत नसतात. पण पिढ्यानपिढ्या ही माहिती पुढे संक्रमित झालेली असते की या जमिनीवर पूर्वी कधीकाळी एक विठ्ठलमंदिर होते. ही जमिन गावकीची असली तरी ती असते सरपंच नागेश्वर याच्या ताब्यामध्ये. ही जमिन आपलीच आहे असा त्याचा दावा असतो. तो त्या जमिनीकडे कोणालाही फिरकूही देत नसतो. रामचंद्र व त्यांच्या काही सहकाऱ्यांना असे वाटत असते या गावकीच्या जमिनीवर पूर्वीच्या काळी जसे विठ्ठल मंदिर होते तसे आता नव्याने विठ्ठल मंदिर बांधले जायला हवे. त्यासाठी सरपंचाकडे जातात पण त्यांना तेथून हाकलून देण्यात येते. अपमानित झाले असले तरी रामचंद्र विठ्ठल मंदिर बांधण्यासाठीचा प्रयत्न सुरु ठेवण्याचा निर्धार करतात. ते व काही गावकरी सरपंचाने हडपलेल्या गावकीच्या जागेवर विठ्ठल मंदिर बांधण्यासाठी हालचाली सुरु करतात, त्यामध्ये सरपंच त्यांच्या वाटेत अनेक अडथळे निर्माण करतो. याच वेळेस एक घटना घडते. जोशीकाका नावाच्या गृहस्थांची मालमत्ता त्यांनी आपल्यालाच विकावी अशी अग्रवाल बिल्डरची इच्छा असते. मात्र प्रत्यक्षात जोशीकाका हे ती मालमत्ता दुसऱ्यालाच विकणार असल्याचे कळल्यावर अग्रवाल खवळतो. ही मालमत्ता कोणत्याही परिस्थितीत आपल्यालाच विकावी यासाठी जोशीकाकांना येनेकेनप्रकारेण वठणीवर आणण्यासाठी तो मन्याला सुपारी देतो. मन्या व त्याचे गुंड मित्र हे जोशीकाकांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना धमकावितात. जोशी यांनी अग्रवाल िबल्डरला मालमत्ता विकली आहे अशी कागदपत्रे तयार करुन त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी मन्या व त्याचे साथीदार काही दिवसांनी त्यांच्या बंगल्यावर जातात पण ते आत जात नाहीत. मन्या बंगल्याच्या आतमध्ये फक्त एकट्या कृष्णाला जोशीकाकांशी बोलायला पाठवितो. कृष्णा आतमध्ये जातो तेव्हा त्याच्या लक्षात येते की तो तिथे येण्यापूर्वी जोशीकाकांचा कोणीतरी खून केलेला आहे. पण जोशीकाकांच्या मृतदेहावरील रक्त कृष्णाच्या हाताला लागते. कृष्णाचा रक्ताळलेला हात व जोशीकाकांचा मृतदेह त्या बंगल्यातील नोकर एकत्र पाहातो व त्याला असे वाटते कृष्णानेच हा खून केला आहे. कृष्णाला जोशीकाकांच्या खूनाच्या आरोपाखाली अटक होते. इथे खून झाला आहे कळल्यानंतर मन्या व त्याचे साथीदार कृष्णाची साथ सोडून देतात. त्याचा संपर्कही टाळतात. दुसऱ्या बाजूला कृष्णाचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये म्हणून सरपंच हा आपल्या गावातील व पंचक्रोशीतील सर्व वकिलांना धमकावतो. त्यामुळे कृष्णाला वकीलही मि‌ळत नाही. पण त्याच वेळेला वाघमारे हे डॅशिंग वकील मात्र कृष्णाचे वकीलपत्र घेतात. न्यायालयामध्ये बिनतोड युक्तिवाद करुन, सारे पुरावे सादर करतात. जोशीकाकांच्या खऱ्या खुन्यांना पकडण्यात येते. त्यामुळे साहजिकच कृष्णाची खूनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता होते. हे सारे घडत असताना कृष्णाचे वडील रामचंद्र व आई जानकी हे मानसिकदृष्ट्या खूप खचलेले असतात. तरीही आपल्या मुलाला काहीही करुन या आरोपाच्या बालंटातून सोडवायचेच या निर्धाराने रामचंद्र उभे राहातात. प्रसंगी जमिन, राहाते घर विकेन पण मुलाला सोडवून आणेन असे ठरवून ते न्यायालयाची पायरी चढतात. सरतेशेवटी कृष्णावरील सावट दूर झाल्याने आता रामचंद्र पुन्हा गावकीच्या जमिनीवर विठ्ठलमंदिर बांधण्याच्या आपल्या जुन्या मनसुब्याकडे परत वळतात. तुरुंगातून बाहेर आलेला कृष्णा आता खूप बदललेला असतो. आता कायम चांगल्या व कायद्याच्या मार्गानेच चालायचे हे त्याने ठरविलेले असते. तो मन्याबरोबर पूर्वी गुंडगिरी करत असताना त्याची नैना नावाच्या मुलीबरोबर दोनदा तीनदा भेट झालेली असते. नैनाची छेड काढल्याने तिने कृष्णाच्या मित्रांना खूप झापलेले असते. त्यामु‌ळे कृष्णा हा एक टपोरी मुलगा आहे हीच प्रतिमा तिच्या मनात असते. कृष्णा तुरुंगातून सुटून आल्यानंतर आपल्या वडिलांच्या विठ्ठल मंदिर उभारणीच्या कामामध्ये त्यांना साथ द्यायचे ठरवितो. कायद्याचा आधार घेऊन यासाठी काय करता येईल याची विचारणा करण्यासाठी तो एका स्वयंसेवी संस्थेत आलेला असताना त्याला तिथे नैना भेटते. ती या संस्थेत सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असते. ती कृष्णा आरटीआयद्वारे त्याच्या गावातील गावकीच्या जमिनीचे सारे तपशील तहसीलदारांकडून मागविता येईल असे सांगते. त्यानूसार अर्ज केल्यानंतर तहसीलदार ही जमिन गावकीची असल्याचे ग्रामपंचायतीला कळवितात. त्यामुळे सरपंच नागेश्वरच्या अंगाचा ति‌ळपापड होतो. तो ही जमिन गावकऱ्यांना विठ्ठल मंदिर बांधण्यासाठी मिळू नये म्हणून अजून कारस्थाने रचू लागतो. हे सारे घडत असताना कृष्णा व नैना यांच्यामध्ये प्रेम फुलू लागते. या सगळ्याला कथानकाला कलाटणी मिळते ती आमदार सूर्यभान जाधवराव यांच्यामुळे. नैना ही त्यांची मुलगी असते. तिचे कृष्णावर असलेले प्रेम आमदारसाहेबांना मान्य नसते. त्यांच्या लेखी कृष्णा हा अत्यंत गरीब घरातला मुलगा असतो. आपल्या ऐश्वर्यात वाढलेल्या मुलीला हा मुलगा कसा सांभाळणार ही चिंता असते. मग ते एक डाव टाकतात. कृष्णाला खिंडीत गाठतात. ते कृष्णाला असा पेच टाकतात की, `गावकीच्या जमिनीवर विठ्ठल मंदिर व्हावे ही तुझ्या वडिलांची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यात मध्ये येणारे सारे प्रशासकीय अडथळे, सरपंचाची दादागिरी मी एका क्षणात हटवतो. हे विठ्ठल मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर त्या मंदिरावर सोन्याचा कळसही माझ्या खर्चाने चढवितो पण त्या बदल्यात कृष्णाने नैनापासून दूर निघून गेले पाहिजे. हे मंदिर बांधून झाल्यानंतर लगेचच कृष्णाने हे गावही सोडून जायला पाहिजे.' आता कृष्णा द्विधा मनस्थितीत सापडतो...एका बाजूला वडिलांची इच्छा तर दुसऱ्या बाजूला नैनाचा प्रेमळ सहवास...नक्की कोणाला दूर लोटायचे? कृष्णा या स्थितीत नेमका काय निर्णय घेतो? गावात विठ्ठल मंदिर गावकीच्या जमिनीवर बांधले जाते का? असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यांची उकल होण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय - या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत विजय साईराज आहे. दाक्षिणात्य चित्रपटांत जसे नायक असतात तसे व्यक्तिमत्व विजय साईराज यांना लाभले आहे. गावातला मुलगा जसा बोलतो, वागतो तसेच हुबेहुब साकारु शकेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. पण कृष्णा हा नायक साकारताना विजय साईराज यांनी ती व्यक्तिरेखा भीषण स्वरुपात साकार केली आहे. त्यांची संवाद म्हणताना होणारी गडबड, त्यांना अभिनयाचा फारसा नसलेला गंध हे सारे पडद्यावर जाणवत राहाते. ते अर्धा चित्रपटभर गॉगल घालून वावरतात. त्यावरुन ते या चित्रपटाचे नायक असावेत अशी मनात प्रेक्षक खूणगाठ बांधतो. पण त्यांच्या भूमिकेला कसलाच आकार उकार नाही. सगळा सपाट, धोपट मामला. त्यांची नायिका नैना हिची भूमिका साकारलेली कृतिका गायकवाड हिला अभिनयाची पार्श्वभूमी असल्याने तिने ही भूमिका काहीतरी बरी केली आहे. अर्थात दिग्दर्शकाच्या सांगण्याप्रमाणेच चित्रपटात अभिनय करायचा असल्याने तिने त्या बरहुकुम काम केले आहे. पण कृतिका गायकवाड नायिकेच्या रुपात काही दृश्यांत पडद्यावर खुलून दिसली आहे हे मान्य करावे लागेल. नायकाचाच अभिनय सोसो असल्यामुळे व कथाच कमजोर असल्याने या चित्रपटाचा पत्त्याचा बंगला धाडकन कोसळला आहे. तो सावरण्याची संधीच मिळालेली नाही. एक अलबेलासारख्या उत्तम चित्रपटात मा. भगवान यांची अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या मंगेश देसाई यांनी रामचंद्र यांनी शेंडाबुडखा नसलेली भूमिका का स्वीकारली असावी असा प्रश्न चित्रपट पाहाताना पडत राहातो. अनुराधा राज्याध्यक्ष (पात्राचे नाव - जानकी), उदय सबनीस (नागेश्वर), विद्याधर जोशी (सूर्यभान जाधवराव), संजय खापरे (वाघमारे वकील), अंशुमन विचारे (मन्या), विजय निकम (अग्रवाल बिल्डर), राजन ताम्हाणे, केतन पवार (पका), प्रणव रावराणे, राजेश भोसले आदी कलावंतांच्या भूमिका बेतास बात झाल्या आहेत. निर्जिव आशयाचा रटाळ चित्रपट असेच त्यातील कलाकारांच्या अभिनयाचेही वर्णन करता येईल. त्यात वाघमारे वकील दाखविला आहे तो तर दामिनी या िहंदी चित्रपटात वकील झालेल्या सनी देओलची कॉपी मारतो. तसा थेट उल्लेख नसला तरी कल्पनाशून्यतेला काही मर्यादा आहे की नाही असे ते सारे पाहाताना जाणवत राहाते.
दिग्दर्शन - या चित्रपटाची कथा, पटकथा, िदग्दर्शन हे चंद्रकांत पवार यांनी केले आहे. चित्रपटाच्या संवादलेखनातही ते आहेतच. विठ्ठला शप्पथमधून त्यांना एक दिग्दर्शक म्हणून नेमके काय सांगायचे आहे तेच कळत नाही. मुळात कृष्णाच्या भूमिकेसाठी विजय साईराज यांची त्यांनी केलेली निवड हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा सर्वात मोठा चुकीचा निर्णय. त्यानंतर चित्रपटाच्या कथेमध्ये दाक्षिणात्य चित्रपटाच्या स्टाइलचा मसाला मिसळताना त्यांनी दिग्दर्शक म्हणून जी चित्रपटाची मिस‌‌ळ केली आहे ती सारीच बेचव झाली आहे. विठ्ठला शप्पथमधील एकही पात्र धडपणे विकसित होत नाही. त्यांचे संवादही कधी कधी अगम्य दिशेने जातात. कृष्णा हा नायक तर काही संवाद तोंडातल्या तोंडातच बोलतो. विठ्ठलभक्ती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू ठेवून केलेली मांडणी अधिक ठोसपणे व आशयघनतेने केली असती तर हा चित्रपट बरा झाला असता. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन या सगळ्याच आघाड्यांवर कामगिरी करण्याच्या प्रयत्नांत दिग्दर्शकाच्या हातून हा चित्रपट चांगला झालेला नाही. 
संगीत - या चित्रपटाला चिनार-महेश यांनी संगीत दिले असून मंगेश कागणे, क्षितीज पटवर्धन या चित्रपटाची गाणी गायली आहेत. ती राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, आदर्श शिंदे, प्रवीण कुँवर यांच्यासारख्या चांगल्या गायकांनी गायली आहेत. तरीही ती गाणी फार लक्षात राहतील अशी झालेली नाहीत. थोडक्यात विठ्ठला शप्पथ या चित्रपटाच्या कोणत्याच अंगाबद्दल फार चांगले बोलण्याची सोय नाही. 
--

'उबुंटू' चित्रपटाचे परीक्षण - सपाट दिग्दर्शन, हाती येथे फक्त निराशा - समीर परांजपे - दिव्य मराठी वेबपेज - १५ सप्टेंबर २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा या सेगमेन्टसाठी `उबुंटू' या चित्रपटाचे दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी मी केलेले हे परीक्षण. त्याची वेबलिंकही सोबत दिली आहे. 
http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-ubuntu-5695508-PHO.html
'उबुंटू' - सपाट दिग्दर्शन, हाती येथे फक्त निराशा
----
- समीर परांजपे
---
रेटिंग - दोन स्टार
--
कलाकार - शशांक शेंडे, सारंग साठ्ये, उमेश जगताप, भाग्यश्री संकपाळ, कान्हा भावे, अथर्व पाध्ये, आरती मोरे, शुभम पवार, आर्या हाडकर, पूर्वेश कोटियन, चैत्राली गडकरी, आर्या सौदागर, बाळकृष्णा राउळ, योगिनी पोफळे, स्मृती पाटकर, कल्पना जगताप, सतीश जोशी
मुळ कथा - भालचंद्र कुबल
कथाविस्तार, पटकथा, दिग्दर्शक, निर्माता - पुष्कर श्रोत्री
संवाद - पुष्कर श्रोत्री, अरविंद जगताप, पराग ओझा
संगीत – कौशल इनामदार
श्रेणी - फॅमिली ड्रामा
--
मराठी चित्रपट आशयघन होत चालले आहेत अशी चर्चा असताना गेल्या चार पाच वर्षात या चित्रपटांना आडवळणी वाटावीत अशी शीर्षके देण्याचा एक प्रवाह अवतरला. फुंतरु, बंदुक्या अशा आडवळणी नावांचे चित्रपट गेल्या काही महिन्यांत झळकले आहेत. याच प्रवाहातील नवा चित्रपट म्हणजे उबुंटू. जरा वेगळे शीर्षक देऊन प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणे हा एक उद्देशही त्यामागे असू शकतो. उबुंटू हे नाव ऐकल्यावर हे नेमके काय बुवा? असा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात येेणे स्वाभाविक आहे. जागतिक स्तरावरील मानवतेला जोडणारा बंध म्हणजे उबुंटू. मानवतावादी विचारांचे तत्वज्ञान प्रभावीपणे मांडण्यासाठी आफ्रिकेत १९८०, १९९०च्या दशकात उबुंटू हा शब्द जास्त प्रमाणात वापरला जाऊ लागला. दक्षिण आफ्रिकेचे महान नेते नेल्सन मंडेला यांच्या कार्याशी उबुंटू हा शब्द अशारितीने जोडला गेला आहे की, उबुंटू म्हटले की मंडेलांचे कार्य अशी दुसरी पर्यायी ओळखही या शब्दाला मिळाली. मानवतेशी जोडणाऱ्या उबुंटूच्या तत्वाचा गाभा आपल्या चित्रपटातून दिसावा या उदात्त हेतूने अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी त्याच शीर्षकाचा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे. पुष्कर श्रोत्री व प्रसाद ओक या दोघांनी मिळून २००९ साली `हाय काय नाय काय' हा विनोदी मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्याला प्रेक्षकांचा जेमतेमच प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आठ वर्षांनी प्रसाद ओक यांनी त्यांचा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे `कच्चा लिंबू'. प्रसाद ओक यांच्या उत्तम दिग्दर्शनाचे कौतुक झाले पण कच्चा लिंबूला प्रेक्षकांनी अगदी क्षीण प्रतिसाद दिला. प्रसाद ओक यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपट दिग्दर्शनातील जोडीदार पुष्कर श्रोत्री यांनी उबुंटू दिग्दर्शित केला तो त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट. परंतु उबुंटू बघितल्यानंतर हाती फक्त निराशा आणि निराशाच येते. 
कथा - उबुंटू चित्रपटाची सुरुवात होते ती ढोबळेवाडी गावातील जळणाऱ्या गंजीच्या दृश्याने. अण्णा नावाच्या गृहस्थाच्या शेतातील गवताची गंजी जळतेय असे पाहून खूप लोक तिथे जमा होतात. ही गंजी कशी ज‌ळाली असेल याचा तर्कवितर्क सगळे करत असतात. त्यात शोध असा लागतो की, अंतवक्र, बर्हिवक्र भिंगाचा प्रयोग करताना ढोबळेवाडीच्या शाळेचे विद्यार्थी एका कागदावर भिंगातून सूर्यकिरण एकत्रित करण्याचा प्रयोग करत होते. त्यातून कागदाचा तो कपडा जळाला. हवेने जवळच्याच गंजीवर उडाला व घेतला पेट गंजीने. विद्यार्थ्यांच्या प्रयोगातून झालेल्या नुकसानीने ढोबळेवाडीचे सरपंच व गावकरी मुलांवर नाराज होतातच शिवाय ते या गोष्टीचे सारे खापर या विद्यार्थ्यांना शास्त्रीय ज्ञान मिळावे म्हणून प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकाच्या डोक्यावर फोडायला निघतात. ढोबळेवाडी हा गाव तसे दुर्गम भागात आहे. तिथे मोबाइलची रेंज व्यवस्थित मिळणे हे देखील कधीकधी मुश्किल होऊन बसते. त्याचप्रमाणे गावात बाहेरुन येणाऱ्या एसटींची संख्याही अगदी तुरळक. अशा या ढोबळेवाडीत असलेली शाळा आहे एकशिक्षकी. आपल्या लहानपणी खूप खडतर अवस्थेत शालेय शिक्षण घ्यावे लागले, तसे इतर विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये या विचारापोटी ढोबळेवाडीतील शिक्षक ध्येयवादाने तिथे शिकवत असतात. शाळेमध्ये पटसंख्या खूपच कमी आहे. जेमतेम पंधरा विद्यार्थी शाळेत येतात. सरकारी नियमानूसार ३५ विद्यार्थी संख्या असली तरच ही शाळा चालू ठेवली जाऊ शकते अन्यथा ढोबळेवाडीची एकशिक्षकी शाळा बंद करुन या गावापासून आठ किमीवर दूर असलेल्या एका गावातील शाळेत विद्यार्थ्यांना पाठवावे लागणार असते. नेमके या वस्तुस्थितीकडे गावचे सरपंच लक्ष वेधतात. शाळेत विद्यार्थ्यांची आवश्यक संख्येइतकी उपस्थिती नसेल तर शाळा बंद करावी लागेल असा इशाराही स्पष्टपणे सांगतात. शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकाला काही दिवसांची मुदतही सरपंच व गावकऱ्यांकडून दिली जाते. इथे चित्रपटाच्या कथानकाला वेगळे वळण मिळते. ढोबळेवाडीची शाळा बंद पडू नये म्हणून प्रयत्नांची शिकस्त करण्याचे शिक्षक व शाळेतील विद्यार्थी ठरवितात. नेमके इथेच कथानकाला वेगळे वळण लागते. या शाळेतले एकमेव शिक्षक मुलांना विविध विषय शिकवत असतात. भूगोल हा विषय शिकवताना ते मुलांना उबुंटू या संकल्पनेचा परिचय करुन देतात. जागतिक स्तरावरील मानवतेला जोडणारा बंध म्हणजे उबुंटू. याच तत्वाचा आधार घेऊन एकमेकांना सहाय्य करुन आपण शाळेला कायमचे बंद होण्यापासून वाचवायचे असा विचार हे विद्यार्थी करु लागतात. हे देखील मानवतेचेच कार्य आहे हे या मुलांच्या मनावर ठसलेले असते. या विद्यार्थ्यांमधे अब्दुल हा हुशार विद्यार्थी असतो. त्याची बहिण सलमा ही देखील शाळेत येत असते. अचानक हे दोघेही शाळेत यायचे बंद होतात. अब्दुलला त्याचा मामा सांगलीला त्याच्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी घेऊन जातो. दुसऱ्या बाजूला सलमाचे लग्न तिची आई ठरविते. हे लग्न दोन वर्षांनी होणार असते. अब्दुल आपल्या मामाच्या हाॅटेलमधे जे काम करेल त्यापोटी त्याला जो पगार मिळेल तो पैसा सलमाच्या लग्नकार्यासाठी उपयोगी पडू शकतो असा विचार अब्दुलच्या आईने केलेला असतो. अब्दुलचे सांगलीला निघून जाणे हे त्या शाळेतील त्याच्या वर्गमित्रांसाठी धक्कादायकच असते. शाळेमधे समजा इन्स्पेक्शन झाले तर त्यावेळी शैक्षणिक अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नांना बिनचूक उत्तरे फक्त अब्दुलच देऊ शकेल अशी सगळ्यांना खात्री वाटत असते. इन्स्पेक्शनमधे घेतलेल्या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक दिसली व तसा अहवाल इन्स्पेक्शन करणाऱ्याने दिला तर ढोबळेवाडीची शाळा बंद होण्याचा धोका टळणार असतो. याच दरम्यान शिक्षकाच्या गरोदर असलेल्या पत्नीची तब्येत नाजूक होते. तिच्यावर एक महत्वाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होऊन बसते. शिक्षकाला तसा दूरध्वनी येताच ते चार पाच दिवस आपली पत्नीला ज्या गावी रुग्णालयात दाखल केले आहे तिथे जायला निघतात. नेमके याच चार पाच दिवसांत शाळेतील काही विद्यार्थी एक योजना आखतात. शाळा बंद पडायला नको असेल तर इन्स्पेक्शनच्या वेळी अब्दुल हा विद्यार्थी शाळेत हवाच असा विचार मनात प्रबळ होऊन गौरी ही विद्यार्थीनी व संकेत हा विद्यार्थी ढोबळेवाडीहून पहाटेची एसटी पकडून सांगलीला जायचा मनसुबा आखतात. मात्र आपल्या या हालचालींची गंधवार्ता ते आपले विद्यार्थीमित्र वगळता अन्य कोणालाही कळू देत नाहीत. म्हणजे आपल्या घरच्या मंडळींनाही नाही. त्यासाठी शाळेतले विद्यार्थी सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या एकत्र ठेवतात व त्यातून कोण सांगलीला जाणार याची एक चिठ्ठी काढली जाते. ती निघते गौरीच्या नावाची. पण गौरीला एकटीला सांगलीला जाऊ देण्यास तिचे वर्गमित्र तयार होत नाहीत. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला संकेत हा मग तिचे मन वळवून तिच्यासोबत सांगलीला जायला निघतो. ती दोघे सांगलीला एसटीबसने रवाना होतात. इथे ढोबळेवाडी शाळेतील त्या दोघांच्या मित्रांना रहस्य उलगडते ते म्हणजे ज्या सर्वांच्या नावाच्या चिठ््ठ्या तयार केल्या असे गौरीने भासविले होते, त्या प्रत्येक चिठ्ठीवर गौरीचेच नाव तिने लिहिलेले होते. हे सत्य समोर येताच हे वर्गमित्र हबकतात. गौरी व संकेत ढोब‌‌ळेवाडीहून जेव्हा एसटीने सांगलीला पोहोचतात त्यावेळी ते एवढे मोठे शहर बघून ते काहीसे गांगरतात. ते तिथल्या अनेक हॉटेलमध्ये अब्दुलची चौकशी करतात पण काहीच थांगपत्ता लागत नाही. गौरी व संकेत निराश होतात. मग विचार करताना त्यांना लक्षात येते की काही विशिष्ट भागात खिमा-पाव हा पदार्थ मिळतो अशी हॉटेल्स आहेत. आपण त्या ठिकाणी अब्दुलची चौकशी करु. ते अशा भागात फिरत असताना त्यांना अचानक अब्दुलचा मामा रझाक दिसतो. ते रझाकला गावच्या शाळेची सग‌ळी परिस्थिती सांगतात व अब्दुलला आम्ही पुन्हा ढोबळेवाडीला घेऊन जायला आलोय म्हणून विनंती करतात. पण रझाक हा अत्यंत बेरकी असतो. त्याने अब्दुलला हरकाम्या केलेले असते. तो आपल्या हाॅटेलमधे अब्दुल नाही म्हणून बिनदिक्कतपणे खोटे सांगतो व या गौरी व संकेतला वाटेला लावतो. पण तो खोटे बोलतो आहे हे या मुलांच्या लक्षात येते. ते पोलिसांची मदत घेतात. रझाकच्या हॉटेलमधे अब्दुल आहे का याची तपासणी करायला आलेल्या पोलिस हवालदाराला रझाक पैसे व खिमा पावचे पार्सल देऊन खिशात टाकतो. रझाक त्यानंतर आपल्या हॉटेलमधील एका नोकराला फोन करुन सांगतो की, अब्दुल जिथे आहे तिथेच त्याला रोखून ठेव. अब्दुल हा दुकानातून जवळच एका दर्ग्याजवळ चहा द्यायला गेलेला असतो. रझाकचा नोकर तिथे अब्दुलला शोधून काढतो व त्याला कुठेही हलू देत नाही. इथे अब्दुलची वाट बघत असणारे गौरी व संकेत पुन्हा हताश होतात. पण त्यांना रझाकचा संशयही आलेला असतो. या सगळ्या घडामोडीत गौरी व संकेतची दुपारची एसटी चुकते. त्यामुळे ढोबळेवाडीत मोठा गोंधळ उडणार हे आता या दोघांनाही लक्षात आलेले असते. इथे ढोबळेवाडीत आपली मुले रात्री उशीरापर्यंत घरी आलेली नाहीत म्हणून गौरी व संकेतच्या घरचे प्रचंड अस्वस्थ होतात. या मुलांना शोधण्यासाठी गावकरी पंचक्रोशीत शोधाशोध करु लागतात. पण मुलांचा ठावठिकाणा लागत नाही. इथे गौरी व संकेत अख्खी रात्र सांगली शहरात एकाकी अवस्थेत काढतात. अब्दुलचा मामा रझाक याला काही उपरती होऊन तो रझाकला ढोबळेवाडीला परत जाऊ देतो का? गौरी व संकेत अब्दुलला ढोबळेवाडीला परत आणण्यासाठी सांगलीला जातात त्या गोष्टीसाठी शिक्षकाला सरपंच व गावकरी जबाबदार धरतात का? अब्दुल अखेर ढोबळेवाडीस परत येतो का? ढोबळेवाडीची शाळा बंद होण्यापासून अखेर वाचते की वाचत नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांची उकल होण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय - उबुंटू या चित्रपटात सारंग साठ्ये यांनी शिक्षकाची केलेली भूमिका अतिशय समंजस झाली आहे. ते एकशिक्षकी शाळेतले शिक्षक म्हणून खरच शोभतात. या शिक्षकाचा ध्येयवाद त्याच्या अभिनयातून प्रतीत होतो. या एकशिक्षकी शा‌ळेतील विद्यार्थी गौरी (कलावंत - भाग्यश्री संकपाळ), संकेत (कान्हा भावे) या दोघांच्या भूमिका ठाकठीक झाल्या आहेत. त्यांनी अब्दुल (अथर्व पाध्ये) या आपल्या वर्गमित्राला सांगलीत जाऊन पुन्हा ढोबळेवाडीत आणण्याची चालविलेली धडपड आपल्या अभिनयातून ठीकठाक दाखविली आहे. पण या दोघांना असलेले संवाद व त्यांच्यावर चित्रीत झालेली दृश्ये ही काहीवेळेस हास्यास्पद स्तरावर जातात. त्यामुळे या त्यांच्या धडपडीचे गांभीर्य खूप कमी होते. सलमा (आरती मोरे), शुभम पवार (विकास), चंदू (आर्य हडकर), माधव (पूर्वेश कोटियन), चैत्राली गडकरी (अंकिता), मंजू - (आर्या सौदागर), बाळकृष्ण (बाळकृष्णा राऊळ), गौरीची आई (योगिनी पोफळे), सरपंच (शशांक शेंडे), सरपंचाची बायको (स्मृती पाटकर), अब्दुलची आई (कल्पना जगताप) या सहकलाकारांच्या भूमिका ठाकठीक झाल्या आहेत. मुळ कथा, कथाविस्तार, पटकथा व दिग्दर्शनातील विस्कळीतपणामुळे या भूमिकांना स्वत:चा बाज नीट गवसलेला नाही.
दिग्दर्शन - पुष्कर श्रोत्री हे मराठी चित्रपट, नाटक, मालिकांमधील नाणावलेले अभिनेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या भूमिका केल्याने प्रेक्षकशरण भूमिका व अभिजात भूमिका यांच्यात नेमके काय अंतर आहे हे त्यांना नक्कीच नीट माहिती आहे. अभिनेता म्हणून त्यांनी आजवर जे कौशल्य दाखविले आहे, जो अनुभव घेतला आहे त्याचे पाठबळ घेऊनच ते दिग्दर्शक म्हणून पुढच्या प्रवासाला सज्ज झाले. भालचंद्र कुबल यांनी लिहिलेली उबुंटूची मूळ कथा ही कागदावर वाचताना कदाचित पुष्कर श्रोत्रींना नक्कीच आकर्षक, मनोवेधक वाटली असेल पण तिचा कथाविस्तार करताना व ती पडद्यावर साकारताना श्रोत्री कमी पडले आहेत. उबुंटू या चित्रपटाचा मध्यंतरापर्यंतचा भाग हा काही प्रमाणात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो पण उत्तरार्धात असे प्रसंग, संवाद आहेत की जे रटाळ झाले आहेत. कथा, पटकथा, संवाद लिहिणाऱ्यांचे तसे जे अपयश आहे तसेच ही घसरगुंडी रोखू न शकलेल्या दिग्दर्शकाचेही ते अपयश आहे. या चित्रपटाचा कथाविस्तार, पटकथा, दिग्दर्शन पुष्कर श्रोत्रींचे असून निर्माताही तेच आहेत. या चित्रपटाच्या संवादलेखनातही त्यांचा सहभाग आहे. इतक्या आघाड्यांवर एका व्यक्तीने सहभागी होऊन उत्तम चित्रपट निर्माण केल्याची उदाहरणे असतीलच. पण उबुंटूच्या बाबतीत हे गणित पुष्कर श्रोत्रींना जमलेले नाही. चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारा आकाशवाणीच्या सांगली केंद्राचा संबंध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा येणारा संबंध हे अनाकलनीय आहे. ते कथेत विजोड वाटते. खेदाने नमुद करावे लागेल की उबुंटूच्या मांडणीचा आत्मा दिग्दर्शक म्हणून पुष्कर श्रोत्रींना गवसलेलाच नाही. त्यामुळे लहान मुलांची ही कथा पडद्यावर रंगवून एक सुंदर चित्रपट निर्माण करण्याची संधी वाया गेली आहे. हा धड मुलांचाही चित्रपट होत नाही, धड मोठ्यांचाही चित्रपट नाही. बालबुद्धीचा चित्रपट मात्र नक्की वाटतो. 
संगीत - उबुंटू चित्रपटाला संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील गाण्यांपैकी एक गाणे हे विद्यार्थ्यांचे प्रार्थनागीत आहे. ते अतिशय सुंदर झाले आहे. पूर्वी उंबरठा या चित्रपटात एक प्रार्थनागीत होते ते म्हणजे `गगन सदन तेजोमय...' या प्रार्थनागीतानंतर बरेच वर्षात चांगले प्रार्थनागीत मराठी चित्रपटात ऐकायला मिळाले नव्हते. ते उबुंटू चित्रपटात ऐकायला मिळाले. फक्त या प्रार्थनागीताचे शब्द इथे सांगत नाही. प्रत्यक्ष ऐकल्यानंतर ते अनुभवा. या चित्रपटातील बाकीची गाणी खूप लक्षात राहतील अशी खात्री देता येत नाही. उबुंटूमधील गाणी श्रीरंग गोडबोले, समीर सावंत यांनी लिहिली आहेत. तर अजित परब, मुग्धा वैशंपायन, अनुराग इनामदार, विदित पाटणकर, वेदांत चिम्मालागी, मुग्धा हसबनीस यांनी ती गायली आहेत. 
---