Tuesday, March 11, 2014

बंदीचा फेरा (दै. दिव्य मराठी - ५ आँगस्ट २०१२)


बंदीचा फेरा
एक था टायगर या सलमान खानच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानमध्ये बंदी आल्यावर नेहमीप्रमाणे निषेधाचे सूर ऐकायला येऊ लागले. भारत व पाकिस्तानमधील चित्रपटसृष्टीमध्ये मोठी दरी आहे. दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंध अधिक जिव्हाळ्याचे होण्यासाठी या दोन्ही चित्रपटसृष्टींनी संयुक्तरित्या चित्रपटनिर्मिती करण्यास हरकत नाही असे मत व्यक्त करणारा लेख मी २५ आँगस्ट २०१२ रोजी दै. दिव्य मराठीमध्ये लिहिला होता. त्याची जेपीजी फाईल पुढे दिली आहे.
-          समीर परांजपे
सलमान खान व कॅटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित एक था टायगर या हिंदी चित्रपटाच्या पाकिस्तानातील प्रदर्शनावर तेथील सेन्साँर बोर्डाने बंदी आणली. दहशतवादाचा मुकाबला करण्याबाबतचे तसेच पाकिस्तानातील राष्ट्रीय संस्था तसेच सुरक्षा यंत्रणा यांचे संदर्भ असलेल्या कथानकांच्या चित्रपटांचे बारकाईने परीक्षण करण्याचे पाकिस्तानचे धोरण आहे. एक था टायगर चित्रपटामध्ये पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणांविषयी त्या देशाच्या दृष्टीने काही आक्षेपार्ह उल्लेख असल्याने ही बंदी घालण्यात आल्याचे पाकिस्तानच्या सेंट्रल बोर्ड आँफ फिल्म सेन्साँरचे उपाध्यक्ष मुहंमद अश्रफ गोंडाल यांनी सांगितले. या आधीचे ताजे उदाहरण एजंट विनोद या चित्रपटाचे आहे. राँ या भारतीय गुप्तहेर संस्थेच्या एजंटची भूमिका सैफ अली खानने या चित्रपटात केली असून त्यात पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय़बद्दलही उल्लेख होते. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावरही पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली होती. अश्लील संवाद व कामुक दृश्ये असल्याचे कारण देऊन डर्टी पिक्चर व ओसामा बिन लादेनचा संदर्भ असल्याने तेरे बिन लादेन या चित्रपटावरही पाकिस्तानमध्ये बंदी आली.
भारत व पाकिस्तानमधील प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण शिरते. त्याला बाँलिवूडच्या चित्रपटांचे प्रदर्शन हा विषयही अपवाद नाही. भारतातील चित्रपटसृष्टी गेल्या शंभर वर्षात जितकी बहरली, इथे विविध विषयांवर जितके चित्रपट निर्माण होतात तेवढी प्रगती १९४७ सालानंतर स्वतंत्र अस्तित्त्व लाभलेली पाकिस्तानी चित्रपटसृष्टी आजपावेतो करु शकलेली नाही. १९६०चे दशक हे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णयुग होते. याच काळात पाकिस्तानमध्ये रंगीत चित्रपटांचे युग सुरु झाले. झहीर रैहान यांचा २६ एप्रिल १९६४ रोजी प्रदर्शित झालेला संगम हा पाकिस्तानातील पूर्ण लांबीचा पहिला रंगीत चित्रपट होता. माला हा चित्रपट तेथील पहिला सिनेमास्कोप रंगीत चित्रपट होता. पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील मंडळीही भारतातील ठिकाणे, संदर्भांना विसरलेली नव्हती. पाकिस्तानातील काय प्राँडक्शनने बनविलेला बाँम्बेवाला हा चित्रपट २६ मे १९६१ रोजी त्या देशात झळकला. त्याला भारतीय संदर्भ असूनही त्यावर पाकिस्तानी सेन्साँर बोर्डाने आक्षेप घेतला नव्हता. मात्र कोणाच्या तरी ही चूक लक्षात आली! पाकिस्तानी सेन्साँर बोर्डावर मग तेथील काही घटकांनी तुफानी टीका केली. पाकिस्तानी चित्रपटांच्या बाबींमध्ये तेथील राजकारण्यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात झाली ती बाँम्बेवालाच्या निमित्ताने.
१९६५, १९७१ व नंतर अनेक वर्षांनी कारगिलच्या मुद्यावरुन भारत व पाकिस्तानमध्ये झालेले युद्ध, २००८मध्ये मुंबईवर झालेला हल्ला, या प्रसंगांमुळे परस्परांच्या कृती व कलाकृतींकडे अधिकच संशयाने पाहिले जाऊ लागले. पाकिस्तानमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णय १९६५च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. त्यावळी अयुब खान हे पाकिस्तानचे सत्ताधीश होते. अर्थात या निर्णयाला काही भारतीय चित्रपट अपवाद ठरलेच. भारताची फाळणी झाली त्यावेळी पंजाब प्रांतातील काही भाग पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आला. भारतात सोनी महिवाल हा पंजाबी चित्रपट तसेच मुघले आझम या चित्रपटांच्या प्रदर्शनास पाकिस्तानने प्रथम बंदी घातली होती. पण पाकिस्तानी रसिकांची मागणी लक्षात घेऊन या दोन्ही चित्रपटांवरील बंदी लगेचच उठविण्यात आली होती.
भारत व पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, जिव्हाळ्याचे व्हावेत असा संदेश देणारा हिना हा चित्रपट आर. के. फिल्मने १९९१मध्ये बनवला. तो दिग्दर्शित केला रणधीर कपूर यांनी. या चित्रपटात नायकाची भूमिका ऋषी कपूर यांनी तर नायिकेची भूमिका झेबा बख्तियार हिने केली होती. महेश भट्ट यांनी सामाजिक कामांनिमित्त पाकिस्तानचा काही वेळा दौरा केलेला होता. ते बनवत असलेल्या हिंदी चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांना भूमिका देण्याचे भट्ट यांनी जाहीर केले होते. पाकिस्तानी अभिनेता अतिफ अस्लम व अभिनेत्री मीरा हिला हिंदी चित्रपटामध्ये संधी देण्याचा त्यांनी शब्द दिला होता. पाकिस्तानातील चित्रपटसृष्टीला लागलेली घरघर संपावी यासाठी तेथील तरुण कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी २००५ सालापासून जोरात प्रयत्न सुरु केले होते.
गलितगात्र झालेल्या पाकिस्तानी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी मिळाली ती जनरल परवेझ मुशर्ऱफ यांच्या कारकिर्दीत (२००३ ते २००९). पाकिस्तानात भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यावरील बंदी मुशर्ऱफ यांनी २००८मध्ये उठवली. त्यानंतर पाकिस्तानमध्ये शाहरुख खान याची प्रमुख भूमिका असलेला माय नेम इज खान हा चित्रपट प्रदर्शित झाला. पाकिस्तानी दिग्दर्शक शोऐब मन्सूर याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच असलेला खुदा के लिए हा चित्रपट भारत व पाकिस्तानमध्ये एकत्रितरित्याच प्रदर्शित झाला होता. ही सुरुवात तर चांगली झाली, पण अजूनही पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील विशिष्ट गट हे भारतातील हिंदी चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होण्यास कडवा विरोध करत असतात. हिंदी चित्रपट पाकिस्तानी चित्रपटांना खाऊन टाकतील ही भीती त्यांना नेहमी सतावत असते. मूळ गोष्ट अशी आहे की, अगदी व्हीसीआर आल्याच्या जमान्यापासून हिंदी चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर पायरसी होऊन दुबई व आखातातील काही देशांत त्यांच्या व्हिडीओ कॅसेट तयार करण्यात येत असत. विद्यमान काळात भारतात एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक आठवड्याच्या आतच त्याच्या पायरेटेड सीडीज तस्करीच्या मार्गाने पाकिस्तानात पोहोचलेल्या असतात. ही स्थिती पाहाता पाकिस्तानी चित्रपटांच्या अस्तित्त्वावर गदा येईल, हे कारण काही पटत नाही. अन्य मार्गांनीही पाकिस्तानी चित्रपटांवर संकट ओढवू शकते. याकरिता पाकिस्तानी चित्रपटसृष्टीने आपला पाया अधिक भक्कम करण्यासाठी सशक्त प्रयत्न करायला हवेत. भारत व पाकिस्तानमध्ये चित्रपट, नाटक व अन्य ललित कलांच्या देवाणघेवाणीतून जे स्नेहबंध तयार होतील, त्याने या दोन्ही देशांतील कटुता कमी होण्यास मदतच होईल.


No comments:

Post a Comment