Tuesday, March 11, 2014

कासव जत्रा ( दै. दिव्य मराठी - १० फेब्रुवारी २०१३)



ऑलिव्ह रिडले कासवे नोव्हेंबर ते मार्च या हंगामात प्रजननासाठी समुद्रकिना-यावर येतात. कासवांनी अंडी दिल्यानंतर 55 ते 60 दिवसांच्या दरम्यान कासवांची पिल्ले वाळूतून बाहेर येतात. सृजनाच्या या अनोख्या क्षणाचे साथीदार होता यावे यासाठी किरात ट्रस्टच्या पुढाकाराने व वायंगणी ग्रामस्थांच्या सहयोगाने 12 ते 17 फेब्रुवारी २०१३  या कालावधीत कासव जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त दै. दिव्य मराठीच्या १० फेब्रुवारी २०१३च्या अंकामध्ये मी लिहिलेल्या लेखाची लिंक व जेपीजी फाईल.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-tortoise-olive-4175199-NOR.html
--------------
कासव जत्रा
----------
समीर परांजपे
----------
मुंबईपासून ते केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टी भागामध्ये सागरी जीव, वनस्पतींचे वैविध्य असून त्यांच्या संरक्षणासाठी सरकार तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने अनेक प्रकल्प हिरीरीने राबवले जात आहेत. त्यातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणाबाबत सुरू असलेले प्रकल्प लक्षणीय ठरले आहेत. ऑलिव्ह रिडले ही कासवांची दुर्मिळ प्रजाती देशात ओदिशा, गोवा आणि कोकणात आढळते. ओडिशामधील गहिरमाथा येथे ऑलिव्ह रिडले कासवे मोठ्या संख्येने किना-यावर येऊन अंडी घालतात. या समुद्रकिना-यावर 1991मध्ये एका आठवड्याच्या कालावधीत या प्रजातीच्या 6 लाख कासवांनी अंडी घातल्याचे आढळून आले होते. त्या शिवाय कोरोमंडेल किनारी भाग व श्रीलंकेतील काही ठिकाणी सागरकिनारी ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालतात. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी, तसेच देवगड येथील तांबळडेग, गोव्यातील मोरजीचा समुद्रकिनारा येथे ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालण्यासाठी येतात. याशिवाय कोकण, गोवा किनारपट्टी भागात हॉक्सबिल टर्टल, ग्रीन टर्टल अशा अन्य प्रजातींची कासवेही आढळून येतात.
ऑलिव्ह रिडले कासवे नोव्हेंबर ते मार्च या हंगामात प्रजननासाठी समुद्रकिना-यावर येतात. कासवांनी अंडी दिल्यानंतर 55 ते 60 दिवसांच्या दरम्यान कासवांची पिल्ले वाळूतून बाहेर येतात. सृजनाच्या या अनोख्या क्षणाचे साथीदार होता यावे यासाठी किरात ट्रस्टच्या पुढाकाराने व वायंगणी ग्रामस्थांच्या सहयोगाने येत्या 12 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत कासव जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सुहास तोरसकर आणि त्यांच्या सहका-यांनी चालवलेल्या कासव संवर्धनाच्या मोहिमेला पर्यटनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा कासव जत्रेमागे महत्त्वाचा हेतू आहे. ऑलिव्ह रिडलेच्या पिल्लांच्या निरीक्षणाबरोबरच वायंगणी किना-यावरची डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारीचा अनुभव, वायंगणी- कोंडुरा जंगल ट्रेल, कासव संवर्धनाचे फिल्म शो, प्राणी-पक्षी तज्ज्ञांशी गप्पा, दशावतार खेळ, अस्सल मालवणी पदार्थांचा आनंद मेळावा असे कार्यक्रम या कासव जत्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत.
कासवाच्या प्रमुख प्रजातीपैकी ऑलिव्ह रिडले कासवे अधिकतर कोकण, गोवा किनारपट्टीवर अंडी घालायला येतात, असे निरीक्षण आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालतात. या अंड्यांपासून बनवलेल्या पदार्थांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये खूप मागणी असते. त्यामुळे अंडी चोरीला जाऊ नयेत, तसेच कुत्रे किवा अन्य प्राण्यांनी या अंड्यांचे भक्षण करू नये, यासाठी गावकरी या अंड्यांची विशेष काळजी घेतात. अंडी ज्या ठिकाणी घातली आहेत तिथे संरक्षक जाळे बसवतात आणि 55 ते 60 दिवसांनी पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना वन विभागाच्या कर्मचा-यांच्या देखरेखीखाली समुद्रात सोडले जाते. वायंगणी येथे 12 ते 17 फेब्रुवारीदरम्यान ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले वाळूतून बाहेर येतील, असा अंदाज कासव अभ्यासकांनी वर्तवला आहे. त्यामुळे तोच कालावधी कासव जत्रेसाठी ठरवण्यात आला. यंदा वायंगणी किना-यावर 73 अंड्यांची बॅच सापडली आहे.
कासवाची पाठ जेवढी कठीण असते तितकेच ते दीर्घायुषी असते. कासव शंभर वर्षांपर्यंत जगू शकते. परंतु बहुतेक कासवे आपल्या आयुष्याच्या सीमेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच विनाकारण मारली जातात. ऑलिव्ह रिडले मादी कासव समुद्रकिनारी एकांत ठिकाणी वाळूमध्ये खड्डा खोदून अंडी घालते. एका वेळी कमीत कमी 70 ते जास्तीत जास्त 100 पर्यंत अंडी घालते. अंडी घालताना मादी सतत अश्रू ढाळत असते. अर्थात, वेदना होतात म्हणून नव्हे; तर अनावश्यक मीठ बाहेर टाकण्यासाठी. त्यानंतर पुन्हा ती खड्डा रेतीने भरते, ते अंड्यांना उष्णता मिळण्यासाठी. अंडी घातल्यानंतर मादी कासव पुन्हा समुद्रात जाते. आपली अंडी आणि त्यातून निघणारी पिल्ले यांना ती पुन्हा कधीच पाहत नाही. नैसर्गिकपणेच या कासवांच्या जगण्याचा दर 50 टक्के असतो. त्यातही माणसाची वाढलेली हाव, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी, जगभरात कासवाचे मांस आणि अंड्यांना असलेली मागणी यामुळे वाळूतील ही अंडी सर्रास पळवण्याचे प्रकार वाढून कासवांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.
ओडिशात गहिरमाथा समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवे लाखोंच्या संख्येने अंडी घालण्यासाठी येतात. पर्यावरणप्रेमींनी शासनाच्या सहकार्याने प्रभावी उपाययोजना केल्याने आता हा किनारा कासवांसाठी सुरक्षित बनला आहे. अशाच प्रकारचे प्रयत्न वायंगणी समुद्रकिना-यावर सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत. या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऑलिव्ह रिडले कासवांचा नैसर्गिक जननदर जो जेमतेम 40 ते 50 टक्के होता, तो 75 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. या कामी ग्रामस्थांच्या सहकार्याप्रमाणेच देवगड येथील प्राणीपे्रमी प्रा. नागेश दफ्तरदार यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे सुहास तोरसकर सांगतात.
ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणाचे प्रयत्न कोकणामध्ये वायंगणीच्या अगोदर वेळास व तांबळडेग येथे सुरू झाले. सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहका-यांनी वेळास येथे कासव व त्यांच्या पिल्लांच्या संरक्षणाचे कार्य हाती घेतले. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने वेळास येथे सागरी कासव संशोधन, संवर्धन आणि माहिती केंद्राची स्थापना केली आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या वेळास येथील घरट्यांचा या केंद्राच्या माध्यमातून अभ्यास करण्यात येत आहे. या गावाच्या किनारपट्टीवरील कासवांच्या घरट्याचे तापमान, त्यामध्ये होणारा बदल, सोडली जाणारी पिल्ले, त्यांचे वजन, आकार, हवामानातील फरक आणि कासवांना अंडी घालण्यासाठी लागणारा काळ आदी गोष्टींची माहिती शास्त्रीय पद्धतीने गोळा केली जात आहे. याच माहितीच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कासवांच्या संवर्धन कार्याबाबत योग्य ती दिशा ठरवता येऊ शकेल. गेल्या दोन वर्षांपासून सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे स्थानिकांच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील कासव संरक्षण, संवर्धन प्रकल्प चालवण्यात येत होता. या प्रकल्पाला संयुक्त राष्ट्रांच्या ग्लोबल एन्व्हॉयरमेन्ट फॅसिलिटी कार्यक्रमांतर्गत सहकार्य लाभले होते. त्यातूनच पुढे कासव मित्र मंडळाची स्थापना झाली. सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे हा प्रकल्प वेळास, केळशी, आंजर्ले, कोळथरे व दाभोळ या पाच गावांत राबवण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत गेल्या दोन वर्षांत ऑलिव्ह रिडले कासवांची एकूण 212 घरटी संरक्षित करून 8975 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने आयोजलेला कासव महोत्सव 9 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यात कासवांच्या संरक्षणाबाबत लोकजागृती करणारे कार्यक्रम पार पडत आहेत.
कोकणातील देवगड येथे तांबळडेग किना-यावर अंडी घालण्यासाठी येणा-या ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांच्या व नंतर त्यातून निघणा-या पिल्लांच्या संरक्षणासाठी प्रा. नागेश दफ्तरदार यांच्या पुढाकाराने 1993मध्ये प्रयत्न सुरू झाले. त्याला वनविभागानेही मोलाचे सहकार्य केले. 1972 सालच्या वन्यजीव रक्षण कायद्याच्या शेड्युल एकमध्ये हायली प्रोटेक्टेड वन्य जिवांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये ऑलिव्ह रिडले कासवेही आहेत. त्यांच्या संरक्षणासंदर्भात लोकजागृती करण्याच्या हेतूने कोकणात जे प्रयत्न सुरू आहेत त्यांना सर्वांनी भक्कम पाठबळ द्यायला हवे.
sameer.p@dainikbhaskargroup.com

No comments:

Post a Comment