Friday, March 28, 2014

देशभरात दरवर्षी एक हजार बिबळ्यांची शिकार (दै. सामना २२ व २३ आँक्टोबर २००२)

बातमीचा मूळ भाग


बातमीचा उर्वरित भाग.




सुंदर असे कातडे, नख्या, दात असे अवयव मिळविण्यासाठी देशामध्ये दरवर्षी एक हजार बिबळ्यांची शिकार करण्यात येते. शिकारीच्या या प्रमाणात अशीच वाढ होत राहिली तर २०२० सालापर्यंत देशातून बिबळ्याचे अस्तित्त्वच नष्ट झालेले असेल. वाघ, सिंह यांच्यासाठी केंद्र सरकारने खास संरक्षक प्रकल्प व अभयारण्ये उघडल्याने वनविभागाचे तुलनेने कमी लक्ष असलेल्या बिबळ्यालाच आता चोरट्या शिकार्यांनी आपले लक्ष्य केले आहे. यासंदर्भातील मी केलेली विशेष बातमी दै. सामनामध्ये दोन भागांत प्रसिद्ध झाली होती. या बातमीचा पूर्वार्ध २२ आँक्टोबर २००२ रोजी तर उत्तरार्ध २३ आँक्टोबर २००२ रोजी प्रसिद्ध झाला होता. या दोन्ही भागांच्या जेपीजी फाईल्स वर दिल्या आहेत.

देशभरात दरवर्षी एक हजार बिबळ्यांची शिकार

-          पूर्वार्ध

-        - समीर परांजपे

सुंदर असे कातडे, नख्या, दात असे अवयव मिळविण्यासाठी देशामध्ये दरवर्षी एक हजार बिबळ्यांची शिकार करण्यात येते. शिकारीच्या या प्रमाणात अशीच वाढ होत राहिली तर २०२० सालापर्यंत देशातून बिबळ्याचे अस्तित्त्वच नष्ट झालेले असेल. वाघ, सिंह यांच्यासाठी केंद्र सरकारने खास संरक्षक प्रकल्प व अभयारण्ये उघडल्याने वनविभागाचे तुलनेने कमी लक्ष असलेल्या बिबळ्यालाच आता चोरट्या शिकार्यांनी आपले लक्ष्य केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अस्तित्व संकटात आलेल्या प्राण्यांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या विभागाचे प्रमुख जाँन झेलर यांनी सामनाशी इ-मेल व्दारे दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, भारतामध्ये बिबळ्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होतेय याचे वस्तुनिष्ठ दर्शन १९९९ साली झाले. या वर्षात उत्तर प्रदेशमध्ये विक्रीकर अधिकार्यांनी पकडलेल्या एका ट्रकमध्ये १२० बिबळ्यांची कातडी, बिबळ्यांच्या ११८ नख्या, बिबळ्यांचे जननेंद्रिय, ७ वाघांची कातडी, वाघांच्या १३२ नख्या, वाघ व बिबळ्या यांची सुमारे १७५ किलो हाडे असा मुद्देमाल सापडला होता.
यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली की, उत्तर भारतातून बिबळ्याची शिकार केल्यानंतर त्यांच्या अवयवांचा चोरटा व्यापार नेपाळमार्गे तिबेटपर्यंत केला जातो. मुंबईतल्या बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूला असलेली वस्ती तसेच महाराष्ट्रातील काही खेड्यापाड्यांमध्ये बिबळ्यांनी माणासांची शिकार करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. बिबळे हे माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी सरसावले आहेत असा कांगावा काही मतलबी लोक करीत असले तरी चित्र मात्र त्याच्या अगदी उलटे आहे. भारतामध्ये सर्वत्र आढळणार्या बिबळ्याचे वर्णन प्रसिद्ध शिकारी जिम काँर्बेट याने भारतातल्या जंगलातल्या प्राण्यांमधील सर्वात सुंदर प्राणी असे केले आहे. सार्या देशभर आता जेमतेम १० हजार बिबळेच तग धरुन असावेत असा अंदाज आहे. देशातल्या पर्यावरणप्रेमींनीही बिबळ्यांच्या झपाट्याने संपणार्या अस्तित्त्वाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. चीन, जपान व पूर्व आशियाई देशांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी वाघांच्या अवयवांचा उपयोग करतात. परंतु अनेकदा चोरटे शिकारी बिबळ्यांचे अवयव हे वाघांचे अवयव म्हणून बाजारात खपवितात व वैदूंची फसवणूक करतात. आशियामध्ये बिबळ्याच्या कातडीपासून बनलेली वस्त्रे व वस्तू वापरण्याचे व्यसन आहे. या श्रीमंतवर्गाची लालसा पुरविण्यासाठीही बिबळ्यांची निर्घृणरित्या शिकार केली जाते. बिबळ्यांना खाद्याव्दारे विष घालणे, बंदुकीने गोळ्या घालून ठार मारणे असे मार्ग त्यासाठी वापरले जातात. भारतात बिबळे, वाघ यांसारख्या प्राण्यांना ठार करुन सुमारे ६० लाख डाँलरचा चोरटा व्यवसाय दरवर्षी केला जातो. त्यामुळेच भारतातील बिबळ्यांच्या सर्वच्या सर्व जातींचे अस्तित्व नष्ट होण्याचे संकट निर्माण झाले आहे.
----------------
बिबळ्यांच्या पाच जाती वाघांआधीच नष्ट होणार

उत्तरार्ध

-          -  समीर परांजपे

अस्तित्व संकटात आलेल्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी भारत सरकार दरवर्षी सुमारे ७० दशलक्ष डाँलर खर्च करुन विविध प्रकल्प राबविते पण फक्त वाघ, सिंह, हत्ती यांच्या संरक्षणावरच अधिक लक्ष केंद्रित करण्यात येते. बिबळ्यांचे अस्तित्व नष्ट होतेय याकडे कुणीही गंभीरपणे पाहात नाही. भारतातील बिबळ्यांच्या बिबळ्या, ढगाळ बिबळ्या, बिबळ्या मांजर अथवा वाघटी, हिमबिबळ्या, काळा बिबळ्या या पाचही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे सर्व इतक्या झपाट्याने होतेय की देशामध्ये वाघांच्या आधी बिबळेच नष्ट होण्याची दाट शक्यता आहे.
संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात दिसणारा बिबळ्या हा बिबळ्या प्रकारातील असून त्यालाच डोळ्यासमोर ठेवून सध्या सर्वत्र लिहिले बोलले जातेय. परंतु देशात बिबळ्यांचे अजून काही प्रकार संकटग्रस्त आहेत. त्याविषयीही जागृती निर्माण झाली पाहिजे. दिल्ली येथे राहणारे वाघांचे तज्ज्ञ वाल्मिक थापर यांनी सामनाला दूरध्वनीवरून सांगितले की, बिबळ्याला Leopard किंवा Panther Pardus (Linnapus) म्हणतात. बिबळे आकाराने वाघ व सिंहापेक्षा थोडे लहानच असतात, त्यांना कोणी कोंडीत पकडल्यास त्यांच्याशी अत्यंत क्रूरपणे लढण्यास ते समर्थ असतात. बिबळ्याची लांबी १ ते १.५ मीटर व वजन ६० किलोच्या आसपास असते. अर्धवाळवंटी, खडकाळ, वृक्षविरहित भागात जे बिबळा राहातात त्याचा कल मोठा आकार व फिकट रंगाकडे असतो. परंतु कमी उंचीवरील जंगल व डोंगराळ भागात राहाणारे बिबळे त्यामानाने लहान असतात.
भारतात बिबळ्या जंगलात
, खुरट्या झाडाझुडपात व पठारी प्रदेशात राहातात. ९२ ते ९५ दिवसांच्या गर्भवहनाच्या काळानंतर मादी बिबळ्यास एक ते चार पिल्ले होतात. पिल्ले सहा महिन्यांची होईपर्यंत आईच्या सोबत राहातात. बिबळ्यांचे आयुष्यमान २० वर्षांचे असते.
बिबळ्यांमधील ढगाळ बिबळ्या ( Clouded Leopard) ही जात अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, आसामच्या पूर्व भागातील सदाहरित दाट जंगलात आढळते. ते आपला उदरनिर्वाह छोटे सस्तन प्राणी, पक्षी, हरणे व बकरी यांची शिकार करुन करतात. ढगाळ बिबळे आकाराने लहान असतात. पण त्यांच्या शेपटीची लांबी खूप जास्त असते. त्यांच्या मानेवर तपकिरी, शरीरावर गडद किंवा जवळजवळ काळ्या रंगाचे छाप असतात. या छाप्यांमधल्या फिकट रंगामुळे त्यांना ढगाळ रुप प्राप्त होते. त्यावरुनच त्यांचे हे नाव प्रचलित झाले आहे. बिबळ्या मांजर (Leopard cat)  हा पाळीवर मांजराच्या आकाराचा व अत्यंत आकर्षक प्राणी असतो, त्यांच्या गेरुसारख्या पण राखाडीसर शरीरावर काळे अथवा गंजाच्या रंगाचे ठिपके शोभा आणतात. जंगलातील रानटी जीवनास रुळलेले बिबळ्या मांजर मानवी वस्तीतून कोंबडी तसेच इतर पाळीव प्राण्यांची लपून छपून शिकार करतो. देशात सर्वत्र बिबळ्या मांजरा सापडते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील जंगलात आढळणार्या काही बिबळ्यांची कातडी काळ्या रंगाची असल्याने त्यांना काळा बिबळ्या (Black Leopard )  म्हणतात. बिबळ्यांची ही जातही आपल्या अस्तित्त्वासाठी संघर्ष करीत आहे.
हिमबिबळ्या (Snow Leopard) हिमालयामध्ये ३ ते ४ हजार मीटर उंचीच्या प्रदेशात सापडतात. बिबळ्याच्या इतर संकटग्रस्त जातींपेक्षा जास्त संघर्ष हिमबिबळ्याला करावा लागतो. साधारण बिबळ्यांपेक्षा हिमबिबळे आकाराने जरी लहान असले तरी त्यांच्या लांब व जाड केसाळ शरीरामुळे ते जास्त मोठे वाटतात. त्यांचे जाडसर व मऊ व सुंदरसे शरीर पिवळसर पांढर्या रंगाचे असते व आजुबाजुच्या वातावरणात साजेसे असे फिक्या रंगाचे जवळजवळ असणारे ठिपके असतात. हे ठिपके फुलांसारखे दिसतात. थंडीच्या दिवसांत ते कमी उंचीच्या भागात स्थलांतर करतात. डोंगरी बकरे, ससे, मार्खोर हे प्राणी व तसेच अन्य पक्षी हे हिमबिबळ्यांचे भक्ष्य असते, देशभरात मानवी वस्त्यांच्या अतिक्रमणाने जंगलक्षेत्र कमी होऊन बिबळ्याच्या घरात माणूस वाटा मागू लागला व नैसर्गिक प्रवृत्तीने बिबळ्याने त्याच्यावर पंजा उगारला तर त्यात दोष कुणाचा हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही...
------------




No comments:

Post a Comment