Tuesday, March 11, 2014

आस्था अन् अनास्था! ( दै. दिव्य मराठी - ८ एप्रिल २०१२)



महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात स्थापन केलेल्या टॉलस्टॉय फार्मच्या पुन:उभारणीसंदर्भात त्या देशातील गांधीवादी नागरिकांनी सुरू केलेल्या हालचालींना आता वेग आला आहे. दुस-या बाजूला महात्मा गांधी यांच्या नावाने अमृतसर येथे स्थापन करण्यात आलेला क्षेत्रीय श्री गांधी आश्रम आर्थिक दुरवस्थेच्या चक्रात सापडला आहे. या वस्तुस्थितीवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख मी ८ एप्रिल २०१२ रोजी दै. दिव्य मराठीच्या अंकात लिहिला होता. त्या लेखाची ही लिंक.
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-mahatama-gandhi-tolstoy-farm-south-africa-3081104.html
-------------
आस्था अन् अनास्था!
----------------
महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात स्थापन केलेल्या टॉलस्टॉय फार्मच्या पुन:उभारणीसंदर्भात त्या देशातील गांधीवादी नागरिकांनी सुरू केलेल्या हालचालींना आता वेग आला आहे. दुस-या बाजूला महात्मा गांधी यांच्या नावाने अमृतसर येथे स्थापन करण्यात आलेला क्षेत्रीय श्री गांधी आश्रम आर्थिक दुरवस्थेच्या चक्रात सापडला आहे. एका बाजूला गांधींच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी धडपड सुरू आहे. दुस-या बाजूला गांधी स्मृतींची पद्धतशीर परवड सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गचे कौन्सिलर एल. व्ही. पार्टिज यांच्याकडून महात्मा गांधी यांचे मित्र हर्मन कलेनबॅच यांनी   रुडपोर्ट नं. 49 या नावाने आधीपासून ओळखली जाणारी 1100 एकर जमिनीची मालमत्ता 30 मे 1910 रोजी खरेदी केली होती. या जागेमध्ये हजारएक फळझाडे होती. लिओ टॉलस्टॉय यांच्या साहित्याने प्रभावित झालेल्या कलेनबॅच व महात्मा गांधी यांनी या जागेचे नामकरण टॉलस्टॉय फार्म असे केले. वर्णद्वेषविरोधी लढ्यामध्ये सहभागी होणा-यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच स्वयंपूर्ण आयुष्य जगण्याकरिता टॉलस्टॉय फार्ममध्ये महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काही कार्यक्रम राबवण्यात येत असत. या वास्तूत गुजराती, तामिळी, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, पारशी असे विविध भाषा-धर्मांचे लोक एकत्र राहत असत. महात्मा गांधी यांनी टॉलस्टॉय फार्ममधून 2 जानेवारी 1913 रोजी आपला मुक्काम हलवला. त्यानंतर तेथे कलेनबॅच व काही दक्षिण आफ्रिकी नागरिक राहत होते.
दक्षिण आफ्रिकेतील गांधीजीप्रणीत सत्याग्रह आंदोलनाचे पर्व संपल्यानंतर टॉलस्टॉय फार्ममध्ये राहत असलेल्या बहुतांश कुटुंबांनीही तेथून आपला मुक्काम हलवला होता. 1970 च्या दशकात तर तेथे कोणीच न उरल्याने टॉलस्टॉय फार्म निर्मनुष्य झाला होता. तेथील वास्तूचा वापरही होत नसल्याने तिला अवकळा आली होती. गांधी विचारांच्या प्रसारासाठी पुन्हा एकदा टॉलस्टॉय फार्मचा वापर होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील गांधीवादी कार्यकर्ते व महात्मा गांधी रिमेम्बरन्स ऑर्गनायझेशनचे प्रमुख मोहन हिरा यांनी पुढाकार घेतला आहे. आता अहमद कथराडा फाउंडेशन व दक्षिण आफ्रिकेतील भारतीय दूतावासाने टॉलस्टॉय फार्मची नीट निगा राखण्यासाठी व तेथील वास्तूची पुन:उभारणी करण्यासाठी सहकार्याचा हात देऊ केला आहे. हा विषय आत्ता चर्चेत यायचे कारण असे की, गेल्या 2 एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकेतील लेनासिया येथे 27 वी वार्षिक गांधी पदयात्रा काढण्यात आली. त्यात दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले अनेक भारतीय सहभागी झाले होते. जोहान्सबर्ग सिटी सेंटरमधील मूळ गांधी हॉल हा 1970 च्या दशकात विकण्यात आल्यानंतर लेनासिया येथे नवीन गांधी हॉल बांधण्यासाठी निधी संकलन करण्याकरिता या गांधीयात्रेची सुरुवात त्या वेळी करण्यात आली होती. या गांधीयात्रेत मधली काही वर्षे खंडही पडला होता. यंदाच्या वर्षी टॉलस्टॉय फार्मची पुन:उभारणी करण्याचा विषय या यात्रेच्या केंद्रस्थानी असला तरी या प्रक्रियेत काही अडथळे आहेत. हा फार्म असलेला परिसर आता विटा बनवण्याच्या कारखान्याच्या मालकीचा आहे. त्या कंपनीशी चर्चा करूनच त्या जमिनीवर टॉलस्टॉय फार्मची पुन:उभारणी करावी लागणार असल्याने हा हेतू नक्की तडीस जाईल का, याविषयी काहींच्या मनात मात्र शंका आहे. 
या पार्श्वभूमीवर अमृतसर विभागामध्ये असलेल्या क्षेत्रीय श्री गांधी आश्रमाच्या दुरवस्थेची ही कहाणी आहे. खादीचे उत्पादन करून त्याची विक्री करणे व त्याद्वारे गांधी विचारांचाही प्रसार करणे हे काम या संस्थेतून गेली 45 वर्षे चालत आले आहे. खादी विक्री हा काही या संस्थेचा व्यवसाय नाही, पण त्यातून काही वर्षांपूर्वीपर्यंत वार्षिक सहा कोटी रुपयांची होत असलेली आर्थिक उलाढाल गेल्या काही महिन्यांपासून वेगाने घसरून आता फक्त काही लाख रुपयांपर्यंत खाली आली आहे. पंजाब, जम्मू-काश्मीर, श्रीनगर, लखनऊ अशा 10 व्यावसायिक विभागांमध्ये या संस्थेतून खादी कापड विक्रीसाठी पाठवले जायचे. संस्थेकडे काही वर्षांपूर्वीपर्यंत विणकर, अन्य कामगार असे मिळून 6 हजार लोक संलग्न होते. आता हीच संख्या फक्त 700 वर आलेली आहे. क्षेत्रीय श्री गांधी आश्रमाला या दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी किमान 3 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची गरज आहे. या संस्थेची अशी अवस्था होण्याबाबत व्यवस्थापन व कामगार एकमेकांना दोष देत आहेत. व्यवस्थापनाने निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप कर्मचारी करतात, तर कर्मचारी धडपणे काम करीत नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. थोडक्यात, स्वावलंबनाचे धडे शिकवणा-या महात्मा गांधी यांच्या नावाने उघडलेल्या संस्थेतील विद्यमान नरपुंगवांनी मनमानी कारभार चालवला आहे. हा त्या महात्म्याच्या विचारांचा पराभव नसून त्यांच्या नावावर पोळी भाजून घेणा-या लोकांची ही सारी कारस्थाने आहेत. महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या आश्रमांचे व्यवस्थापन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते आजतागायत किती आदर्श पद्धतीने केले गेले याची माहितीही लोकांसमोर यायला हवी. राजकोट येथील कस्तुरबा धाम येथे ठेवण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या खासगी वापरातील काही वस्तू या संस्थेच्या दोन विश्वस्तांनी अमेरिकेतील लिलावात विकल्याचा आरोप गेल्या वर्षी जून महिन्यात झाला होता. यादी करायला बसले तर अशा अनेक घटनांचा उल्लेख करता येईल. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींशी संबंधित वास्तूची पुन:उभारणी करण्याचे प्रयत्न सुरू असताना भारतात मात्र गांधीस्थळांच्या व्यवस्थापनाबाबत अक्षम्य हेळसांड होत आहे. त्यात एक आशेचा किरण असा की, गांधींच्या विचारांचा व साहित्याचा अभ्यास करण्यासाठी जळगावमध्ये प्रख्यात उद्योगपती भवरलाल जैन यांनी पुढाकार घेऊन गांधी तीर्थ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची अभ्यासवास्तू उभारली आहे. गांधी तीर्थचे लोकार्पण अलीकडेच राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाल होते. मात्र असे सुखद प्रसंग सध्याच्या काळात फारच विरळा आहेत.

No comments:

Post a Comment