Thursday, March 6, 2014

नाते हमीदचे ‘वीर-झाराशी’...


मुंबईतील मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेला हमीद नावाचा युवक फेसबुकवरुन प्रेम जुळलेल्या आपल्या पाकिस्तानातील प्रेयसीला भेटायला अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानमध्ये गेला होता. त्या युवकाचा आता काहीही थांगपत्ता लागत नाहीये. त्याची ही प्रेमकहाणी यश चोप्रा यांच्या वीर-झारा या चित्रपटाशी काहीशी मिळतीजुळती आहे. त्यावर आधारलेला मी लिहिलेला लेख १ मार्च २०१४च्या दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झाला. त्या लेखाची लिंक व जेपीजी फाईल.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/01032014/0/7/


--- 

नाते हमीदचे वीर-झाराशी’...
-----------
स्लग - वेधक
----
- समीर परांजपे
sameer.p@dainikbhaskargroup.com
---------
ब्लर्ब - पाकिस्तानातील आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईत राहणारा एक उच्चशिक्षित युवक भारतातून अफगाणिस्तानला गेला व तेथून घुसखोरी करून पाकिस्तानात शिरला. या युवकाचा शोध लावावा म्हणून त्याच्या आईने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मंगळवारी निकाली काढली. ‘वीर-झाराचित्रपटाशी काहीशी मिळतीजुळती हमीदची कहाणी नक्कीच दर्दभरी आहे.
----
मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण घेतलेला व मुंबईत राहणारा युवक हमीद नेहल अन्सारी व पाकिस्तानातील कोहात भागातील युवती यांच्या प्रेमाची कहाणीही फेसबुकच्या साक्षीने फुलली. ती कहाणी सुफळ होण्याच्या आतच त्या पाकिस्तानी मुलीच्या पालकांनी तिचे लग्न ठरविल्याची बातमी धडकल्याने हमीद अस्वस्थ झाला. त्याने त्या मुलीला पाकिस्तानात जाऊन भेटायचे ठरविले. त्यानंतर हमीद भारतातून अफगाणिस्तानातील काबूल येथे 4 नोव्हेंबर 2012 रोजी दाखल झाला. अफगाणिस्तानातून बेकायदेशीरपणे सीमा पार करून हमीद पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतात पोहोचला. तेथून तो कोहातला जाऊन आपल्या प्रेमिकेची भेट घेणार होता व तिला कायमचे भारतात घेऊन येण्यासाठी प्रयत्न करणार होता. आपण कुठे आहोत, याचे अपडेट्स हमीद आपल्या फेसबुक पेजवर देत असे. मात्र 10 नोव्हेंबर 2012 नंतर त्याचे फेसबुकवर प्रकट होणेही थांबले. त्यानंतर आजतागायत त्याचा थांगपत्ता कोणालाही लागलेला नाही. हमीदच्या अशा गायब होण्याने भयंकर अस्वस्थ झालेली त्याची आई फौजिया यांनी त्याला शोधण्याकरिता मदत मागण्यासाठी केंद्र सरकार, पाकिस्तानची दिल्लीतील वकिलात या सर्वांचे उंबरठे झिजवले. मात्र भारत व पाकिस्तान सरकारकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे समाधान न झालेल्या फौजिया यांनी अखेर सर्वोच्च न्यायालयाकडे नोव्हेंबर 2013मध्ये दाद मागितली. गेल्या 25 फेब्रुवारी रोजी फौजियाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्याने पुन्हा हमीदच्या कहाणीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. वैध कागदपत्रांशिवाय पाकिस्तानात प्रवेश करणाऱया भारतीयांना पाकिस्तानी पोलिस तुरुंगात डांबतात. हमीदलाही अशाच प्रकारे अटक झाली असण्याची शक्यता असून त्याला शोधण्यासाठी केंद्र सरकारने पाकिस्तानकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी या याचिकेत फौजियाने केलेली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारने दिलेल्या माहितीतून असे स्पष्ट झाले की, हमीदला शोधण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आलेले आहेत, तरीही त्याचा थांगपत्ता लागत नाही. या उप्पर केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयही काही करू शकत नाही, असे मत व्यक्त करून हमीदची आई फौजिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली. हमीदच्या कहाणीवरून आठवण होते, ती 1991मध्ये प्रदर्शित झालेल्या हिना 2004मध्ये आलेल्या वीरझाराया दोन चित्रपटांची... मात्र हमीदच्या कहाणीचा नूर हा हिनापेक्षा वीरझाराचित्रपटाशी अधिक जवळीक साधणारा आहे. प्रेमकथा फुलविण्याचे विलक्षण कसब असलेले यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या वीर-झाराचा मुख्य गाभा भारतीय सैन्यातील स्क्वाड्रन लीडर वीरप्रताप सिंग (शाहरुख खानने ही भूमिका केली आहे.) व पाकिस्तानी युवती झारा हयात खान (प्रीती झिंटा) यांच्यातील प्रेमकहाणी हा आहे. झारा आपली शीखधर्मीय दाई बेबे हिच्या अस्थींच्या विसर्जनासाठी भारतात आलेली असताना वीरप्रतापशी तिची ओळख होते. वीरप्रताप तिच्या प्रेमात पडतो. झाराचा पाकिस्तानातील एका मुलाशी साखरपुडा झालेला आहे, याची माहिती वीरप्रतापला झारा भारतातून पाकिस्तानात परत जाण्यासाठी निघालेली असताना कळते. झारा पाकिस्तानात परतते. मात्र तिला लक्षात येते की, आपल्यालाही वीरप्रताप आवडू लागलेला आहे. काही दिवसांनंतर झाराचे लग्न होणार असल्याची बातमी वीरप्रतापला कळते व तो अस्वस्थ होतो. तो तिला भेटण्यासाठी मिळेल त्या मार्गाने भारतातून पाकिस्तानात जातो. नेमके तिथे पाकिस्तानी पोलिस वीरप्रतापला भारताचा हेर समजून तुरुंगात डांबतात. त्याला आजन्म कारावासाची शिक्षा पाकिस्तानी न्यायालय ठोठावते. त्यानंतर कोणताही गुन्हा नसताना 22 वर्षे कारावास भोगलेल्या वीरप्रतापची मुक्तता करा, अशी दाद अखेर पाकिस्तानी वकील सामिया सिद्दिकी पाकिस्तानी न्यायालयाकडे मागते. सामियाच्या प्रयत्नांनी वीरप्रतापची मुक्तता होऊन त्याची झाराबरोबर भेट होते. वृद्धावस्थेतील वीरप्रताप झाराला घेऊन अखेर भारतात परततो. आयुष्यात उशिरा का होईना त्यांची कहाणी सुफळ होते. वीरप्रतापप्रमाणे हमीदची प्रेमकहाणी यशस्वी होईल वा न होईल, तो नंतरचा प्रश्न आहे. पण त्या आधी हमीद पाकिस्तानातून भारतात पुन्हा सुखरूप परतू दे, इतकीच इच्छा आता त्याची आई फौजिया व मित्रपरिवाराची असणार, हे नक्की.
--------

No comments:

Post a Comment