Thursday, March 6, 2014

`अलबेला' भगवान




प्रख्यात अभिनेते मास्टर भगवान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मी ५ आॅगस्ट २०१२ रोजी दै. दिव्य मराठीमध्ये मी लिहिलेला लेख.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-actor-bhagavan-bollywood-3615970-NOR.html
-----------
`अलबेला' भगवान
-----
समीर परांजपे 
----------------
भोली सूरत दिल के खोटे
नाम बडे और दर्शन खोटे...

गाण्याचे बोल ऐकू येऊ लागतात. शुभ्र पडद्यावर कृष्णधवल प्रतिमा ठेका धरू लागतात. एक हात हवेत उंचावून कमरेला झटके देत स्थूल देहयष्टीचा नायक पायांनी हळुवार ताल धरत नाचू लागतो. गाण्याचा ठेका व नायकाचा पदताल यांच्यातच गुंगून गेलेली नायिका त्याचे अनुकरण करू लागते. आणि पडद्यावर हे सारे थक्क होऊन पाहणारा प्रेक्षक तरी आपल्या खुर्चीवर स्थिर असतो कुठे? त्याचेही पाय गाण्याच्या बोलावर थिरकत असतात. कोणी खुश होऊन पडद्यावर चिल्लरखुर्दाचा दौलतजादा करत असतो, कोणी हातातला रुमाल, डोक्यावरची टोपी उडवत, मोठ्याने शीळ घालत गाण्याच्या बेहोशीत डुंबून जातो. हे गाणे होते 1951 मध्ये झळकलेल्या ‘अलबेला’ चित्रपटातील. नायक होते मास्टर भगवान आणि नायिका होती गीता बाली. या चित्रपटाला संगीत  दिले होते सी. रामचंद्र यांनी. त्यांच्या साथीला स्वर होता लता मंगेशकर यांचा... ‘अलबेला’ चित्रपट येऊनही आता तब्बल 61 वर्षे उलटून गेली आहेत, पण त्या चित्रपटातील ‘भोली सूरत दिल के खोटे’, ‘शाम ढले खिडकी तले, सिटी बजाना छोड दो...’ अशा सा-याच गाण्यांची जादू भावी पिढ्यांवर आपले मायाजाल पसरत चालली आहे. अलबेला म्हणजे मा. भगवान. शरीर व आत्म्याचा असतो तसाच हा अतूट बंधच जणू.

मा. भगवान यांचा जन्म 1 ऑगस्ट 1913 चा. भगवान आबाजी पालव. गिरणगावामध्ये रुळलेला हा मुलगा पुढे जाऊन चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणार आहे, हे चित्रपटांचा मनापासून तिटकारा असणा-या त्यांच्या वडलांच्या कधी मनातही आले नसेल. भगवान यांना तरी आपल्या भविष्यातील यशोशिखराची चाहूल कशी लागावी? ते अंतर्ज्ञानी थोडेच होते? पण काळाने हे सिद्ध केले की चित्रपट हा त्यांच्या अंतर्यामी ठासून भरलेला होता. मालवणजवळील पोईब हे भगवानांचे मूळ गाव. भगवान यांचे वडील मिलमजूर होते. त्यांना कुस्तीचा शौक होता. आपला मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला मिलमध्ये चिकटवून द्यायचे, हे त्यांनी पक्के ठरवले होते. भगवान यांनी मात्र कधीही नोकरी करायची नाही असा दृढनिश्चय केला होता. भगवान यांना शिकण्याची हौस होती. मात्र वडलांनी मागे लावलेला कुस्तीचा व नोकरीचा लकडा यामुळे भगवान यांना उबग येई. ते तालमीत जात. व्यायाम करत. त्याने शरीर बांधेसूद झाले. वयही तरुण. पण काळाच्या ओघात शिक्षणाला रामराम ठोकला आणि प्रवास सुरू झाला एका वेडाचा...

हे वेड होते अर्थातच चित्रपटाचे. दादरला रणजित स्टुडिओसमोर उभे राहून ईश्वरलाल, बिलिमोरिया ब्रदर्स या नटांना पाहण्याचा छंदच भगवान यांना जडला. तो जमाना होता मूकपटांचा. त्यातील मा. विठ्ठल हे तर भगवान यांचे दैवतच होते. त्याचबरोबर मुंबईत लागणारा कोणताही इंग्रजी मूकपट बघायची संधी ही स्वारी सोडत नसे. त्यांना लहानपणापासून नाचाची आवड होती. मूकपटांत जी हाणामारीची दृश्ये असायची त्यांची सहीसही नक्कल भगवान व त्यांचे मित्र मिळून शिवाजी पार्कमधील मातीमध्ये हुंदडताना करत असत. मग कोणी नायक होई, कोणी खलनायक. दिवस चालले होते. आयुष्याला निश्चित आकार काही येत नव्हता. मात्र एका क्षणी भगवान यांच्या मनाने निश्चित केले की जायचे तर चित्रपटातच! मग मूकपटांत भूमिका मिळवण्यासाठी स्टुडिओंच्या वा-या सुरू झाल्या. कधी कोणी कोरडीच विचारपूस करी. कोणी स्टुडिओच्या दरवाजातून हाकलून देई. तरीही भगवान उमेद राखून प्रयत्न करतच राहिले. त्यांना मूकपटांत भूमिका मिळू लागल्या. ललिता पवार यांच्यासारख्या जबरदस्त अभिनेत्रीबरोबर त्यांना भूमिकाही मिळाल्या. मूकपटांच्या जमान्यात स्थिरावताना भगवान यांनी कॅमेरा चालवणे, चित्रपटाचे संकलन अशा विद्याही हस्तगत केल्या. मूकपटांचा जमाना जसा ओसरू लागला, तसे त्या चित्रपटांतील रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले नायक, पण नीटपणे संवाद म्हणू न शकणारे नायक व नायिका कालबाह्य होऊ लागले. भगवान यांनी काळाची ही पावले ओळखली होती. 1938 ते 1949 या काळात भगवान यांनी कमी खर्चात बनलेल्या अनेक स्टंट व अ‍ॅक्शनपटांचे दिग्दर्शन केले. हे चित्रपट कामकरी, कष्टकरी वर्गात लोकप्रिय होते, पण त्या काळच्या प्रतिष्ठित   वर्गाकडून भगवान यांच्या या चित्रपटांना नाके मुरडली जात. भगवान हे कलावंत, दिग्दर्शक, संकलक, निर्माता अशा अनेक भूमिका एकसाथ लीलया वठवत होते. त्यांनी ‘जागृती’ ही चित्रनिर्मिती संस्था सुरू केली होती. भगवान यांनी याच ओघात मद्रासमध्येही जाऊन दोन तामिळ चित्रपट केले होते. तेथे त्यांना सी. रामचंद्र हे अत्यंत प्रतिभाशाली संगीत दिग्दर्शक भेटले. हा एक सुवर्णयोगच होता. सी. रामचंद्र व मास्टर भगवान जोडीने पुढे चित्रपटसृष्टी अक्षरश: गाजवली. ‘जागृती’ चित्रपट संस्थेमार्फत भगवान यांनी अच्छा जी, अफलातून, जीते रहो यासारखे चित्रपट बनवले. चेंबूरमधील राज कपूरच्या स्टुडिओला लागूनच भगवान यांचा आशा स्टुडिओ उभा राहिला. आशा हे त्यांच्या पत्नीचे नाव. भगवान यांच्या कामाचा पसारा वाढत चालला होता. स्वत:च्या सहा गाड्यांचा ताफा घरासमोर उभा राहिला. एक दिवस राज कपूरने भगवान यांना छेडले, ‘दादा, आता बस करा स्टंट, देमार, पोशाखी चित्रपट. आता नव्या जमान्याचे, उत्तम कथेचे सामाजिक चित्रपट काढा.’ भगवान यांनी राज कपूरचे बोल एखाद्या आव्हानासारखे पेलले.  त्यातूनच निर्माण झाला ‘अलबेला’सारखा इतिहास घडवणारा चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन, मुख्य नायकाची भूमिका केली होती मा. भगवान यांनीच.

हा चित्रपट गिरगावमधील लॅमिंग्टन रोडवरील पांढरपेशांच्या वस्तीत असलेल्या चित्रपटगृहांत धो धो चालला. मा. भगवान राज कपूर, देव आनंद, दिलीपकुमार यांच्यासारखेच एकदम लब्धप्रतिष्ठित नट बनले. यशही आपापला शिक्का घेऊन येते ते असे. 1956 मध्ये भगवान ‘भला आदमी’ नावाचा चित्रपट बनवत होते. त्यातील चार गाण्यांसाठी त्यांनी आनंद बक्षी यांना करारबद्ध केले. चित्रपटात गीतकार म्हणून बक्षी यांना मिळालेले हे पहिलेवहिले काम. या चार गाण्यांचे त्यांना 150 रुपये मानधन मिळाले होते. त्यातील ‘धरती के लाल ना कर इतना मलाल, धरती तेरे लिए तू धरती के लिए’ हे गाणे खूप गाजले होते. किशोरकुमारला घेऊन केलेला ‘भागमभाग’ हा भगवानदादांचा आणखी एक स्मरणीय चित्रपट. मा. भगवान यांना चित्रपटांनी यश, वैभव, कीर्ती सारे सारे मिळवून दिले. मात्र अनेक कारणांमुळे ही समृद्धी टिकू शकली नाही. आशा स्टुडिओ विकावा लागला, ‘अलबेला’चे हक्क एकाला फक्त 88 हजारांत विकण्याची नामुष्की ओढवली. दादर पूर्वेला असलेल्या शिंदेवाडीतील लल्लुभाई मॅन्शनमध्ये ते अखेरच्या काळापर्यंत राहत होते. पण कर्जबाजारी झाल्यामुळे घराबाहेर असलेल्या सहा गाड्याही गेल्या. ही अशी परिस्थिती का, कोणामुळे ओढवली? पण सारे हलाहल मा. भगवान यांनी एकट्याने पचवले. त्यांनी त्याचा दोष कधीही दुस-यावर टाकला नाही. यशाभोवती फेर धरून नाचणारे अनेक असतात. अपयश एकाकी असते. भगवान यांच्या हाती फारसे काम राहिले नाही. एकेकाळी इतिहास निर्माण करणारे भगवान यांचे नृत्यावर थिरकणारे पाय थकले. आयुष्यात किस्मत की हवा, कभी नरम कभी गरम याचा पुरेपूर अनुभव घेतलेल्या मा. भगवान यांनी 4 फेब्रुवारी 2002 रोजी अखेरचा श्वास घेतला. या जगात देव भलेही 33 कोटी असतील; पण ‘अलबेला’ भगवान एकच झाला, तो म्हणजे मा. भगवान! ही जाणीव देऊन एक पर्व अस्ताला गेले!

No comments:

Post a Comment