Wednesday, March 12, 2014

स्मरण `रामदास' दुर्घटनेचे! (दैनिक दिव्य मराठी - १४ जुलै २०१२)

१७ जुलै १९४७मध्ये मुंबईहून रेवसला निघालेली रामदास बोट बुडून सुमारे ६२५ लोक मरण पावले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील या भीषण सागरी दुर्घटनेला १७ जुलै २०१२ रोजी ६५ वर्षे पूर्ण झाली. रामदास दुर्घटना कशी घडली याचे अत्यंत शास्त्रीय विश्लेषण समुद्रजीवनाला वाहिलेले पहिले मराठी मासिक ‘दर्यावर्दी’ने आपल्या ऑ गस्ट, सप्टेंबर १९४७च्या दोन अंकांतील लेखांमध्ये केले होते. त्या लेखांच्या आधारे दै. दिव्य मराठीच्या १४ जुलै २०१२च्या अंकामध्ये मी लिहिलेल्या लेखाची ही लिंक. व मासिक ‘दर्यावर्दी’चे रामदास दुर्घटनेशी संबंधित मुखपृष्ठ व लेखांची काही छायाचित्रेही सोबत दिली आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-memories-of-ramdas-boat-accident-samir-paranjape-3524843.html

---------------

स्मरण `रामदास' दुर्घटनेचे!
------------------
- समीर परांजपे
--------------
17 जुलै 1947चा तो दिवस. मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे जाण्यास निघालेली ‘रामदास’ बोट मुंबई बंदरापासून अवघ्या 9 मैलांवर असलेल्या ‘काश्या’च्या खडकाजवळ  प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली. तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणा-या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे 625 जण समुद्रात बुडून मरण पावले. या भीषण दुर्घटनेतून 232 उतारूंचा सुदैवाने जीव बचावला. त्यात रामदास बोटीचा कप्तान शेख सुलेमान हा होता. रामदास बोट बुडाली ती सकाळच्या वेळेत. या बोटीतील प्रवाशांपैकी ज्यांना उत्तम पोहता येत होते, ते त्या दिवशी दुपारी तीन वाजता ससून डॉकच्या किना-याला लागले. त्यांच्याकडूनच या अपघाताची माहिती मुंबई बंदरातील अधिका-यांना मिळाली. नाहीतर तोपर्यंत या गंभीर घटनेची कोणाला गंधवार्ताही नव्हती. रामदास बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक हे परळ, लालबाग या गिरणगाव परिसरातील तसेच गिरगाव भागातील होते. हे सारे मूळ कोकणवासी असल्याने रामदास अपघातातील हानीमुळे मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी जिल्ह्याची सारी कोकणपट्टी हवालदिल झाली होती. महाराष्ट्राच्या व देशाच्या प्रवासी जलवाहतुकीच्या इतिहासातील एक भीषण दुर्घटना अशी नोंद झालेल्या रामदास बोटीच्या अपघातानंतर प्रवासी जलवाहतुकीबाबतच्या नियमांत आमुलाग्र सुधारणा झाल्या. अत्याधुनिक दूरसंचार उपकरणे प्रवासी बोटींवर दिसू लागली.

‘रामदास’ बोट सन 1936मध्ये बांधली गेली. ती 406 टन वजनाची होती. 1942मध्ये ती युद्धकार्यासाठी सरकारने घेतली होती. ‘रामदास’वर वायरलेसची व्यवस्था नव्हती. मुंबई किना-यालगत फेरी करताना रामदासवर 1050 उतारूव 42 खलाशी घेण्याची परवानगी होती. ज्या वेळी गोवा वगैरे भागात ही बोट जाई तेव्हा 615 उतारू व 10 हॉटेलचे नोकर व 42 खलाशी नेण्याची परवानगी असे. साधारणत: रेवसला इतके लोक मुंबईहून एका वेळेस कधीच जात नसत. पण 17 जुलै 1947रोजी गटारी अमावस्या असल्याने त्या दिवशी गावातील घरी जाण्यासाठी उतारूंची खूप गर्दी झाली होती. रामदास बोटीची त्या वर्षीच नाविक अधिका-यांकडून पाहणी करण्यात आली होती व बोट चांगल्या स्थितीत असल्याचे तिला प्रमाणपत्रही मिळाले होते. सरकारी वर्गवारीत ही बोट 9व्या प्रतीची होती. बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर सुमारे दहा वर्षांनी म्हणजे 1957मध्ये मुंबईतील बेलॉर्ड पिअरच्या समुद्रकिना-यावर वाहात आले होते.

ही दुर्घटना घडली त्याच्या बातम्या व अनेक लेख वृत्तपत्रे, मासिकांच्या तत्कालीन अंकांमध्ये प्रसिद्ध झालेले होते. मात्र या दुर्घटनेची संपूर्ण सागरीशास्त्रदृष्ट्या चिकित्सा करणारा तसेच या दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशांची नेमकी स्थिती काय झाली होती, याचा बारकाईने वेध घेणारा मजकूर ‘दर्यावर्दी’ मासिकाच्या 1947 सालच्या ऑ गस्ट व सप्टेंबर महिन्याच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला होता. 1940मध्ये द्वैमासिक स्वरूपात दर्यावर्दी मासिक प्रसिद्ध होऊ लागले. मार्च 1943मध्ये काही कारणांमुळे या नियतकालिकाचे प्रकाशन काही काळ थांबले व त्यानंतर एप्रिल-मे 1945 पासून पुन्हा हे मासिक प्रकाशित व्हायला लागले. त्याचे प्रकाशन आजतागायत सुरू आहे. ‘दयावर्दी’चे संस्थापक व संपादक जि. शं. सरतांडेल होते. या मासिकाच्या प्रत्येक अंकाच्या मुखपृष्ठावर ‘समुद्रजीवनविषयक पहिले मराठी मासिक’ असा सार्थ उल्लेख पाहायला मिळतो. मात्र दयावर्दी या मासिकाची मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिणा-या रा. के. लेले यांनीही दखल घेतलेली नाही, इतकी उपेक्षा या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या मासिकाच्या वाट्याला आली होती. प्रख्यात चित्रकार मुळगावकर व क्वचित प्रसंगी दिनानाथ दलाल हे ‘दयावर्दी’ची मुखपृष्ठे तयार करीत असत. सागरी प्रवास, तसेच कोळी, खलाशी यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित रंगीत चित्रांनी ‘दयावर्दी’ची मुखपृष्ठे सजलेली असायची. अभ्यासकांकडून पूर्णपणे दुर्लक्षित झालेल्या ‘दर्यावर्दी’ मासिकाने रामदास बोट अपघाताबाबत प्रसिद्ध केलेले दोन अंक, त्यातील मजकूर, दुर्मिळ छायाचित्रे हे संदर्भसाहित्य म्हणून अत्यंत मोलाचे असून ते पुन:प्रकाशात आणणे हाच या लेखाचा मूळ हेतू आहे.

‘दर्यावर्दी’च्या ऑ गस्ट 1947च्या अंकाच्या मुखपृष्ठावर मुळगावकर यांनी चितारलेले रामदास बोट दुर्घटनेवरील चित्र आहे. वादळात सापडलेल्या तसेच खवळलेल्या समुद्रात बुडत असलेली रामदास बोट व तो प्रसंग आठवून आक्रोश करणारी माता व तिच्या कुशीत एक भयकंपीत झालेले छोटे मूल असा तपशील या चित्रामध्ये आहे. या मुखपृष्ठावर ‘खळवलेल्या दर्यात उडी टाकून ‘रामदास’मधील बुडत्या उतारूंना वाचवणा-या धाडसी कोळ्यांची खास मुलाखत’ असा या अंकातील लेखाचा सारांश देण्यात आला आहे. या अंकाचे मुखपृष्ठ केशरी व हिरव्या अशा दोन रंगात आहे. दयावर्दीच्या या अंकामध्ये रामदास दुर्घटनेसंबंधी संपादकीयसह एकूण चार लेख आहेत. ‘रामदास’ बोटीला जलसमाधी’ असे या अंकाच्या संपादकीयाचे शीर्षक आहे. त्याचे सारसूत्र असे होते की, ‘ 1927च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ‘तुकाराम’ आणि ‘जयंती’ या बोटी कोकण किना-यावर एकाएकी झालेल्या ताशी 50 मैल वेगाने जाणा-या चक्रीवादळाच्या झंझावातात सापडून बुडाल्या. त्यानंतर सुमारे वीस वर्षांनी 1947मध्ये रामदास बोट बुडून भीषण अपघात झाला. रामदास बोटीचा अपघात हा अचानक आलेल्या वादळामुळेच घडला आहे, असे काही बचावलेल्या उतारूंच्या मुलाखतीवरून दिसून आले. रेवसला जाणारी रामदास बोट दररोज दुपारी सव्वा वाजता मुंबईस परत येते. बोटीची वेळ होऊन दोन-तीन तास झाले तरी ती का आली नाही याची कंपनीने चौकशी करणे जरूर होते. पण अपघातस्थळाची अवस्था पाहून रेवसचे कोळी परतल्यानंतरच ‘रामदास’च्या अपघाताची माहिती सर्व संबंधितांना कळली! त्यानंतर मग मदतयंत्रणेची धावाधाव सुरू झाली. यावरून अद्ययावत साधनांनी युक्त अशा मुंबई शहरापासून अवघ्या 10-12 मैल असलेल्या रेवससारख्या बंदरी तारायंत्रांचे अगर टेलिफोनचे साधन नसावे हे आश्चर्य आहे.’

‘दर्यावर्दी’च्या ऑ गस्ट 1947च्या अंकामध्ये ‘खवळलेल्या समुद्रात उडी टाकून 75 उतारूंना जीवदान देणारे रेवसचे धाडसी दर्याबहाद्दर’ या शीर्षकाचा लेख आहे. रामदास अपघातासंबंधी वेगळी माहिती देणा-या या लेखामध्ये म्हटले आहे ‘17 जुलै 1947च्या सकाळी रेवस येथून मुंबईला रोजच्या प्रमाणे ताजी मासळी घेऊन कोळ्यांची गलबते येत होती. नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही कोळी पाच गलबते हाकारून निघाले. त्यांच्या गलबतांवर सुमारे दोन हजार रुपयांची मासळी होती. रेवसपासून अंदाजे तीन सागरी मैलांवर आल्यावर त्यांना समुद्राकडील वातावरणात फरक दिसला. दर्या तुफान झाला होता. आकाशात एकाएकी काळेकुट्ट ढग येऊन अंधार पसरू लागला होता. वादळाच्या काळ्या रेषा क्षितिजावर दिसू लागल्या होत्या. या चिन्हांवरून पुढे जाऊ नये, असे या कोळी बांधवांना वाटले व त्यांनी आपली गलबते सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा रेवस बंदरात आणली. पण लगेच एका तासाने चमत्कार झाला. वादळी चिन्ह नाहीशी होऊन सृष्टीने सौम्य स्वरूप धारण केले. तेव्हा आता मुंबईला जाण्यास हरकत नाही, असा विचार करून कोळी मंडळीने आपली गलबते मुंबईच्या मार्गाने पुन्हा हाकारली. पाच गलबतांचा तांडा मुंबईच्या दिशेने पुन्हा निघाला. रेवसपासून चार-साडेचार मैलांवर त्यांची गलबते आली असतील नसतील तोच त्यांच्या दृष्टीला चमत्कारिक दृश्य दिसले. समुद्राच्या पृष्ठभागावर असंख्य माणसे पोहत असून त्यांच्यातच प्रेते वाहात चालली आहेत, असे भीषण दृश्य कोळ्यांनी पाहिले. त्यांना या प्रकाराचा काहीच उलगडा झाला नाही. एवढी माणसे एकाएकी कुठून आली याचा ते विचार करू लागले. पण ती वेळ विचार करायची नव्हती. कोळी बंधूंनी आपली गलबते झपाझप त्या बाजूला नेली. जी माणसे समुद्रात पोहत जीव वाचवण्यासाठी धडपडत होती, त्यांना त्यांनी भराभर आपल्या गलबतांवर घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी या कोळी बांधवांनी आपल्या गलबतातील 2 हजार रुपयांची मासळी समुद्रात फेकून दिली. माणसाच्या जीवितांपुढे त्यांनी आपल्या मालाची पर्वा केली नाही. जिवंत माणसांना वाचविण्यासाठी काही कोळ्यांनी समुद्रात उड्या टाकून भराभर माणसांना गलबतांवर चढविण्यास सुरुवात केली. हे बुडणारे प्रवासी रामदास बोटीवरीलच होते. कोळी मंडळींनी दृष्टीच्या टापूत दिसतील तेवढ्या माणसांना म्हणजे 75 जणांना वाचविले व त्यांना घेऊन ही पाचही गलबते रेवसला त्यादिवशी दुपारी एक वाजता पोहोचली. या वाचविलेल्या प्रवाशांना रेवसच्या कस्टम अधिका-यांच्या हवाली करण्यात आले. रेवस येथील कस्टमच्या अधिका-यांनी ही बातमी तारेने संबंधितांना कळविण्यासाठी त्वरेने अलिबागला धाव घेतली.’

‘दर्यावर्दी’च्या ऑ गस्ट 1947च्या अंकामध्ये रामदास बोटीच्या दुर्घटनेतून वाचलेल्या विश्वनाथ कदम या त्यावेळी 16 वर्षे वय असलेल्या मुलाची विस्तृत मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात त्याने रामदास बोटीचा अपघात नेमका कसा घडला व तो त्यातून वाचून स्वत:च पोहत किना-याला कसा लागला याची अंगावर काटा आणणारी कथा आहे. त्याचप्रमाणे ‘रामदास’ची करुण कहाणी’ या लेखामध्ये दुर्घटनेचा सारा घटनाक्रम, बोटीचे व्यवस्थापन, सागरी मार्गातील अडथळे, वादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती या सगळ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून आढावा घेण्यात आला आहे. ‘दयावर्दी’ मासिकाच्या सप्टेंबर 1947च्या अंकात ‘रामदास’ बोटीचा शोध कसा लावला? या विषयावर उरणच्या कोळ्यांची खास मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे सगळे लेख व ‘दर्यावर्दी’ मासिकाचे आजवरचे सारे अंक हे देशातील जलवाहतुकीच्या इतिहासाचा अभ्यास करणा-यांच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहेत.
------------




2 comments:

  1. परांजपे सर, हा दर्यावर्दी मासिकाचा अंक/त्याची जेपीजी इमेज मला मिळू शकेल का? मिळाल्यास आभारी राहीन.

    ReplyDelete