Monday, May 12, 2014

बेहाल नायजेरिया - दै. दिव्य मराठी - ६ एप्रिल २०१४


बेहाल नायजेरिया


- समीर परांजपे
sameer.p@dainikbhaskargroup.com


नायजेरियाच्या उत्तर भागातील बोर्नो, योबे व अदमावा हे तीन धगधगते प्रांत आहेत. उत्तर नायजेरियामध्ये स्वतंत्र इस्लामी देश निर्माण करण्याचे ध्येय उराशी बाळगून बोको हराम या अतिरेकी संघटनेने या भागात 2009 सालापासून नायजेरियाच्या सरकारी यंत्रणा तसेच स्थानिक लोकांविरोधात मोठय़ा प्रमाणावर घातपाती कारवाया सुरू केल्या. त्यामुळे आजवर तेथील लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.





आफ्रिका खंडातील काही देशांचा अपवाद वगळता बाकीचे देश शापिताचे आयुष्य जगत आहेत. त्यात नायजेरियाचाही समावेश आहे. निसर्गाची अवकृपा ही कोणत्याही देशाच्या प्रगतीला बाधा आणणे स्वाभाविक असते. मात्र मानवनिर्मित आपत्तींमुळेही देश कसा भकास होऊ शकतो, याचे नायजेरिया हे जिवंत उदाहरण आहे. नायजेरियाच्या उत्तर भागातील बोर्नो, योबे व अदमावा हे तीन धगधगते प्रांत आहेत. उत्तर नायजेरियामध्ये स्वतंत्र इस्लामी देश निर्माण करण्याचे ध्येय उराशी बाळगून बोको हराम या अतिरेकी संघटनेने या भागात 2009 सालापासून नायजेरियाच्या सरकारी यंत्रणेविरोधात मोठय़ा प्रमाणावर घातपाती कारवाया सुरू केल्या. या तीन प्रांतातील हजारो इस्लामेतर धर्मियांना तेथून हुसकावून लावण्याचे सत्रही या अतिरेकी संघटनेने सुरू केले. त्याच्या परिणामी आजवर बोर्नो, योबे व अदमावा या प्रांतातून लाखो लोक विस्थापित होऊन नायजेरियाच्या अन्य भागांमध्ये आश्रयाला आले आहेत. ही मानवनिर्मित आपत्ती इतकी भीषण आहे की, गेल्या वर्षीपासून या तीन प्रांतांमध्ये नायजेरियाचे विद्यमान अध्यक्ष गुडलक जॉनाथन यांनी आणीबाणी लागू केली. बोको हरामचे दहशतवादी उत्तर नायजेरियातील गावे-शहरांवर रॉकेट हल्ले चढवितात. तेथील इस्लामेतरांची घरेदारे जाळून राख करतात. या महिन्यात बोको हराम अतिरेक्यांच्या हल्ल्यातून मैदुगरी येथील लष्करी छावण्याही सुटल्या नाहीत. बोको हराम अतिरेक्यांच्या तावडीत सापडूनही सहीसलामत सुटका झालेल्या लितू या युवतीने केलेले कथन अंगावर काटा आणणारे आहे. लितूने म्हटले आहे, ‘गेल्या वर्षी बोको हराम अतिरेक्यांनी माझ्यासह दोन युवतींना पळवून नेले. 11 दिवस डांबून ठेवल्यानंतर त्यांनी मला एका माणसाकडे नेले. त्या माणसाने मी मुस्लिम आहे की ख्रिश्चनधर्मीय, याबद्दल चौकशी केली. त्यानंतर त्याने मला इस्लाम धर्म स्वीकारण्याची गळ घातली. त्याला मी आवडले होते. मुस्लिम धर्म स्वीकारल्यास माझ्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती.’ लितूला काही दिवसांनी बोर्नो प्रांतातील सांबियाच्या जंगलक्षेत्रात अतिरेक्यांची जी छावणी होती, तिथे नेण्यात आले. या भागात बोको हरामच्या अतिरेक्यांनी अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले आहेत. एकाही मुस्लिम धर्मियाने सरकारी नोकरी करायची नाही, असा या अतिरेक्यांचा फतवा आहे. सरकारी नोकरीत असलेल्या मुस्लिम धर्मियाला अत्यंत निर्घृणपणे ठार मारले जाते. या अतिरेक्यांसाठी काम करण्यास नकार देणाऱयांचे धारदार शस्त्रांनी गळे चिरले जातात. बायका-मुले यांचाही अपवाद केला जात नाही. बोको हराम अतिरेक्यांच्या तावडीत लितू 15 दिवस होती. तिच्यासह सहा बंदिवानांनी सुटकेसाठी एक भन्नाट युक्ती केली. अतिरेक्यांकडे असलेल्या वाहनांपैकी एका व्होल्क्स वॅगनमध्ये बसून त्यांनी पलायन केले. बोको हराम अतिरेक्यांना हे लक्षात येताच त्यांनी वॅगनचा पाठलाग केला व पलायन करणाऱया सहा जणांवर ते गोळीबार करीत होते. व्होल्क्स वॅगन बामा शहराच्या सीमेजवळ आल्यावर अतिरेकी मागे फिरले. वॅगन सुरक्षित ठिकाणी पोहोचली त्या वेळी लितू, वॅगन चालवणारा माणूस व अजून एक व्यक्ती असे तिघेच जिवंत उरले होते! लितू सुदैवी होती म्हणून जिवंत राहिली; पण जे हजारो अश्राप जीव बोको हरामच्या दहशतवादाला बळी पडले, त्यांची तर गणतीच नाही. बोर्नो, योबे व अदमावा या तीन प्रांतातून जे विस्थापित नायजेरियाच्या अन्य भागांत निर्वासित छावण्यांमध्ये राहात आहेत त्यांचे हाल तर कुत्रा खात नाही, अशी अवस्था आहे. पिण्याचे पाणी, शौचालय अशा मूलभूत सुविधांची या छावण्यांमध्ये तोकडी व्यवस्था आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत बोर्नोमधून 13 लाख, योबेमधून 7 लाख 70 हजार, तर अदामावामधून दहा लाख लोक विस्थापित झालेले आहेत. मुळात हे तिन्ही प्रांत नायजेरियातील सर्वात अविकसित भाग आहेत. पोटाची खळगी भरण्याइतकाही रोजगार मिळत नसल्यामुळे तेथील लोकांमध्ये असंतोष धुमसत होता. त्यातच त्यांची माथी विषारी धर्मप्रचार करून भडकावली गेली. असंतुष्ट लोकांनी शस्त्रZ हाती धरून दहशतवादाचा मार्ग पत्करला. बोको हराम संघटनेला नेमके हेच हवे होते. धर्म ही अफूची गोळी आहे, हे कार्ल मार्क्सचे विधान नायजेरियातील या तीन प्रांतांच्या स्थितीकडे पाहून पटते. नायजेरियातील ज्या भागांत बऱयापैकी विकास झालेला आहे, तेथेही उत्पात घडवण्याचा बोको हराम अतिरेक्यांचा डाव आहे. नायजेरियात उद्योगधंदा, नोकरीसाठी अनेक भारतीय गेलेले आहेत. त्यात अनेक मराठी माणसांचाही समावेश आहे. काही भारतीय नागरिकांच्या तीन-तीन पिढय़ा नायजेरियात राहिलेल्या आहेत. बोको हराम अतिरेक्यांच्या कारवायांमुळे नायजेरियात भविष्यात प्रचंड उलथापालथी झाल्या तर त्याची भारत सरकारलाही गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. नायजेरियाचे विद्यमान अध्यक्ष गुडलक जॉनाथन हे बोको हराम अतिरेक्यांचा मुकाबला किती खंबीरपणे करतात, यावरच त्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे

Sunday, May 4, 2014

एव्हरेस्ट चढाईचा जीवघेणा धंदा - दै. दिव्य मराठीची रसिक रविवार पुरवणी - ४ मे २०१४.

लेखाचा मूळ भाग



लेखाचा उर्वरित भाग



एव्हरेस्टवरील कचरा हटविण्याच्या प्रयत्नांत शेर्पांची बहुमोल मदत असूनही नेपाळ सरकारला त्याची फारशी कदर नाही असे शेर्पांना वाटतेधंदेवाईक वृत्तीच्या दुश्चक्रात सापडलेल्या एव्हरेस्ट मोहिमांमध्ये शेर्पांपासून गिर्यारोहकांपर्यंतचे सारेच घटक सध्या असंतुष्ट आहेतत्यात नैसर्गिक आपत्तीही आपला रंग दाखवून जातातत्या विळख्यातून एव्हरेस्टची सुटका कधी होणार

एव्हरेस्ट चढाईचा जीवघेणा धंदा ( दै. दिव्य मराठी - रसिक पुरवणी - ४ मे २०१४)

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-everest-trekking-by-sameer-paranjape-divya-marathi-4602137-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/04052014/0/1/


- समीर परांजपे


एव्हरेस्ट. हिमालयाच्या कुशीत विसावलेले जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर - ८८४८ मीटर. जगातील गिर्यारोहकांनी त्याचा माथा सर करण्याचे १९ व्या शतकापासून पाहिलेले स्वप्न अखेर २९ मे १९५३ रोजी पूर्ण झाले. त्या दिवशी एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोरगे यांनी एव्हरेस्टचा माथा सर केला. या घटनेला येत्या २९मे रोजी ६१ वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत जगभरातील असंख्य कसलेले गिर्यारोहक, साहसी वृत्तीचे व गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेले पर्यटक यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यात विविध वयोगटाच्या स्त्राe-पुरुष गिर्यारोहकांचा समावेश आहे. दरवर्षी एव्हरेस्टच्या मोहिमांदरम्यान विविध प्रकारचे विक्रमही नोंदविले जातात. गिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार आहे की नाही याबद्दल जगभर जरी वाद सुरु आहे. मात्र निसर्गातील प्रतिकुलतेशी गिर्यारोहणात झुंजल्याशिवाय कोणत्याही शिखर किंवा सुळक्याचा माथा सर करताच येत नाही या वस्तुस्थितीबाबत मात्र कोणाचेही दुमत नक्कीच नाही. एव्हरेस्ट शिखरावर दरवर्षी एप्रिल ते जून महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापर्यंत अनेक चढाई मोहिमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सहभागी होणाऱया गिर्यारोहकांची सरासरी संख्या दरवर्षी तीनशे ते चारशे इतकी असते. त्यातील काही जणांच्या हाती यश किंवा अपयश लागते. काही जणांचा चढाई दरम्यान अपघातात मृत्यू ओढवितो. मात्र एव्हरेस्टचा माथा सर करायचाच ही जिद्द अनेकांच्या मनात अभंग उरते. यंदाच्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमांचा हंगाम सुरु होण्याच्या प्रारंभीच गेल्या १८ एप्रिल रोजी या शिखराच्या पश्चिम धारेवरील एक मोठा हिमनग कोसळून या शिखराच्या कॅम्प एक खाली खुंबु हिमनदीत हिमप्रपात झाला. त्यामुळे बर्फाखाली गाडले जाऊन १६ शेर्पा गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. एव्हरेस्ट शिखराला स्थानिक शेर्पांनी देवत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळे एव्हरेस्टदेव यंदा चढाई मोहिमांना अनुकूल नसल्यानेच हा अपघातरुपी अपशकून झाला अशी धार्मिक समजूत या शेर्पांनी करुन घेतली. त्यातूनच मग यंदाच्या वर्षी नेपाळमार्गे एव्हरेस्ट मोहिमांमध्ये सहभागी होण्यास शेर्पांनी स्पष्ट नकार दिला. धार्मिक कारणांची ढाल या पवित्र्यासाठी पुढे करण्यात आली असली तरी त्यामागे शेर्पांची अनेक आर्थिक कारणेही दडलेली आहेत.
१८ एप्रिल रोजी झालेल्या अपघातानंतर एव्हरेस्टच्या १९ हजार फुट उंचीवर असलेल्या बेसकॅम्पवर सुमारे ४०० शेर्पा जमले होते. त्यांनी शिखर चढाई मोहिमांसाठी देशा-विदेशांतून आलेल्या गिर्यारोहकांबरोबर सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिल्याने अनेक गिर्यारोहक अत्यंत निराश भावनेने माघारी फिरले.
१९९०च्या दशकाच्या मध्यापासून एव्हरेस्ट चढाई मोहिमांचे मोठय़ा प्रमाणावर व्यापारीकरण झाले आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये अशा अनेक गिर्यारोहण संस्था आहेत की ज्या एखाद्या गिर्यारोहकाकडून हजारो डॉलर मानधनाच्या रुपात घेऊन त्याच्या एव्हरेस्ट मोहिमेची संपूर्ण तयारी करुन देतात. ही आखणी करुन देण्यामध्ये नेपाळमधील गिर्यारोहण संस्था वा एखादी व्यक्ती मध्यस्थ म्हणून भूमिका बजावतात. एव्हरेस्टवर चढाई करणाऱया प्रत्येक गिर्यारोहकाकडून नेपाळ सरकार दहा हजार डॉलर इतकी रॉयल्टी आकारत असते. अठरा एप्रिल रोजी झालेल्या अपघातात मरण पावलेल्या शेर्पांच्या अंत्यविधीसाठी नेपाळ सरकारने प्रत्येकी फक्त ४०० डॉलर इतकी तुटपुंजी रक्कम देण्याचे जाहीर केल्याने शेर्पा समुदाय संतप्त झाला होता. दरवर्षी एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांबरोबर मदतनीस व मार्गदर्शकाच्या रुपाने सहभागी होणाऱया शेर्पांना दर हंगामात प्रत्येकी सरासरी दोन ते आठ हजार डॉलरचीच कमाई होत असते. त्याची परिणती म्हणजे एव्हरेस्ट बेसकॅम्पला सुमारे ४०० शेर्पांनी जमून यंदा एव्हरेस्ट चढाई मोहिमांत सहभागी न होण्याचा निर्णय एकमुखाने जाहीर केलाकातावलेल्या शेर्पांपैकी काही जणांनी गेल्या वर्षी एव्हरेस्ट चढाईसाठी गेलेल्या तीन युरोपीयन गिर्यारोहकांच्या तंबूंवर दगडफेक तसेच त्यांना मारहाणही केली होती.
एडमंड हिलरी व शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी एव्हरेस्टचा माथा सर केला, त्या व त्या आधीच्या एव्हरेस्ट चढाई मोहिमांच्या आखणीत साधेपणा होता. हिलरी व नोर्गे यांनी एव्हरेस्ट शिखरावर ज्या साऊथ कोलमधून चढाई केली तो मार्ग आता चढणीच्या दृष्टीने बराचसा सोपा झालेला आहे. त्या मार्गाने चढाई करणाऱया गिर्यारोहकाबरोबर मदतीसाठी प्रशिक्षित गिर्यारोहक सोबत असतात. त्याशिवाय हवामानाचा अचूक अंदाज अत्याधुनिक साधनांद्वारे त्वरित कळतो. एव्हरेस्ट चढाईदरम्यान काही जीवघेणा प्रसंग उद्भवलाच तर मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर त्वरित उपलब्ध असते. संपर्कासाठी सॅटेलाईट फोन तसेच अतिउंचावर प्रकृतीसंदर्भात निर्माण होणाऱया समस्या टाळण्यासाठी प्रभावी औषधे व उपकरणेही गिर्यारोहकांना आता उपलब्ध असतात.
नेपाळ आणि चीनचा प्रांत असलेल्या तिबेटच्या सीमेवर एव्हरेस्ट शिखर उभे असून त्याच्यावरील चढाई मोहिमांत आजवर २७५हून अधिक गिर्यारोहक विविध अपघातांत मरण पावले आहेत. या शिखरावर १९९०च्या दशकात झालेल्या अपघातांमध्ये २०००च्या दशकात मात्र काही प्रमाणात घट झाली होती. ही गोष्टही एव्हरेस्टचा माथा सर करणाऱया गिर्यारोहकांसाठी उत्साहवर्धक ठरली होती. पाश्चिमात्य देशांतील एव्हरेस्ट मोहिम मार्गदर्शक कंपन्या गिर्यारोहकांकडे क्लायंट या दृष्टीनेच बघत असतात. एखाद्या एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांबरोबर किती शेर्पा व मार्गदर्शक सहभागी होणार आहेत, त्यानूसार त्या गिर्यारोहकांना ४० ते ९० हजार डॉलरपर्यंत शुल्क आकारले जाते. त्यातही स्थानिक शेर्पा मार्गदर्शकांपेक्षा पाश्चिमात्य मार्गदर्शकांचे शुल्क अधिक असते. एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकाबरोबर सहभागी होण्यासाठी पाश्चिमात्य मार्गदर्शक १० ते ३५ हजार डॉलरपर्यंत शुल्क आकारु शकतो. एव्हरेस्टवर चढाई करणाऱया व्यक्तीने गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक समजले जाते. मात्र हाती आलेले गिऱहाईक सहजासहजी सोडावयाचे नाही या धंदेवाईक हेतूने एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या पर्वतारोहणाचा कोणताही अनुभव नसलेल्या व्यक्तींनाही एव्हरेस्ट चढाई मोहिमांत सहभागी करुन घेत असल्याची तसेच एव्हरेस्टवर जाऊ इच्छिणाऱयांपैकी काही लोक आपण प्रशिक्षित गिर्यारोहक असल्याचे खोटे दाखले सादर करीत असल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. या गोष्टींकडे कानाडोळा करणाऱया एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या धंदेवाईक वृत्तीवर एडमंड हिलरी यांनीही २००८ साली केलेल्या एका भाषणात कोरडे ओढले होते.
एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या व नेपाळमधील मध्यस्त संस्था यांच्यामध्ये जे एखाद्या चढाई मोहिमेसंदर्भात होणाऱया काँन्ट्रक्टमध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत याकडे बऱयाच गिर्यारोहकांचे बारीक लक्ष नसते. पाश्चिमात्य देशांतील एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या गिर्यारोहकांकडून मोहिमेसाठी ५० हजार डॉलर इतके शुल्क घेत असतील तर त्यातील फक्त ३५ हजार डॉलर इतकीच रक्कम नेपाळमधील मोहिम आखणी करणाऱया मध्यस्थाला दिली जाते. प्रत्यक्ष मोहिमांत सहभागी होणाऱया शेर्पांना मिळणारा मोबदला तुटपूंजा वाटल्याने काही शेर्पांनी मोहिम आखणीसाठी नेपाळमध्ये मध्यस्थी करणाऱया कंपन्या सुरु केल्या आहेत. या कंपन्या एव्हरेस्ट चढाई मोहिमेसाठी प्रत्येक गिर्यारोहकाकडून सुमारे ३७००० डॉलर मोबदला घेतात. त्यात या गिर्यारोहकाला मोहिमेत आपल्या बरोबर दोन शेर्पा मदतनीस घेऊन जाण्याची सुविधा असते. या कंपन्यांना या व्यवहारात प्रत्येक गिर्यारोहकामागे किमान २ ते ३ हजार डॉलर इतका नफा मिळतो. यात एव्हरेस्टचा माथा सर करु पाहाणाऱया नवख्या गिर्यारोहकांची मानसिकताही काही वेळेस समस्या निर्माण करते. एव्हरेस्ट चढाई मोहिमेसाठी आपण जेवढे जास्त पैसे मोजू तितकी आपली मोहिम यशस्वी होण्याची खात्री अधिक असते असे मनाने घेतलेल्या नवख्या गिर्यारोहकांमुळे या मोहिमांना अधिक बाजारु स्वरुप आले आहे. नेपाळमधील पर्यटन व्यवसायातून मिळणाऱया एकूण उत्पन्नामध्ये गिर्यारोहणातून मिळणाऱया महसुलाचा चार टक्के वाटा आहे. एव्हरेस्टवरील चढाई मोहिमा आयोजित करुन देणाऱया संस्था नेपाळमधील मध्यस्थ संस्थांकडे मोबदला कमी करण्यासाठी तगादा लावतात. जो मध्यस्थ कमी मोबदल्यावर मोहिम न्यायला तयार होईल त्याच्याकडे आपले क्लायंट पाठविण्याकडे एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्यांचा कल असतो. या घासाघीशीच्या प्रवृत्तीमुळे प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी होणाऱया शेर्पांनाही कमी मोबदला मिळतो. या व्यवहारात नेपाळमधील काही स्थानिक उद्योजक गडगंज श्रीमंत झाले. त्यांनी पर्यटकांसाठी हॉटेल उघडली. काहींनी विमाने विकत घेऊन ती गिर्यारोहकांसाठी उपलब्ध करुन दिली. मात्र शेर्पांमधील बहुसंख्य जण मात्र अपुऱया उत्पन्नामुळे नाराज आहेत. यंदाच्या वर्षी एव्हरेस्टच्या माथ्यावर जाण्यासाठी ३३४ गिर्यारोहकांनी नेपाळ सरकारकडे नोंदणी केली होती. त्यांच्याकडून रॉयल्टीच्या रुपात नेपाळ सरकारने तब्बल ३.३ दशलक्ष डॉलरचा महसुल यंदा मिळविला. त्या रकमेतील तीस टक्के भाग हा एव्हरेस्ट परिसराच्या विकासासाठी नेपाळ सरकार खर्च करणार आहे. मात्र एव्हरेस्ट मोहिमांचा फळफळलेला व्यवसाय हा नेपाळ सरकारला दुभत्या गायीसारखा वाटतो. मात्र त्या व्यवसायात गुंतलेल्या शेर्पांच्या कल्याणासाठी काही उत्तम योजना राबवाव्यात असे तेथील सरकारला वाटत नाही ही खंत शेर्पांच्या मनात आहे. गेल्या वर्षी एव्हरेस्टवर ज्या दुर्घटना घडल्या त्यानंतर प्रत्येक आरोहण तुकडीसाठी एक लायझन ऑफिसर देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र यंदाच्या वर्षी एव्हरेस्टवर जाणाऱया ३९ मोहिमांसाठी फक्त तीनच लायझन ऑफिसर सरकारने उपलब्ध करुन दिले याबद्दल शेर्पांच्या मनात राग आहे.
नेपाळच्या पूर्व भागात राहाणारे शेर्पा हे एव्हरेस्ट मोहिमांमधील महत्त्वाचा घटक असतात. एव्हरेस्टवर चढाई करणाऱया गिर्यारोहकांचा स्वयंपाक करणे, त्यांचे सामान वाहून नेणे. विविध चढ-उतारांवर दोर बांधणे, शिडय़ा रोवणे ही कामे शेर्पा करतात. त्याचबरोबर मोहिमेमध्ये अचूक दिशादिग्दर्शन करणे, नैसर्गिक आपत्तीत एखादा गिर्यारोहक सापडला तर त्याला मदतीचा हात देणे ही कामे शेर्पा मंडळी करतात. चढाई दरम्यान गिर्यारोहणाची साधने व अन्य सामान एका छावणीतून पुढच्या छावणीमध्ये नेण्यासाठी त्या दरम्यान शेर्पांना अनेक फेऱया माराव्या लागतात. हे लक्षात घेता गिर्यारोहकापेक्षा शेर्पांच्याच जीवाला अधिक धोका असतो. एव्हरेस्टवरील खुंबु हिमनदीतून मार्ग काढत असताना तर संकटे दत्त म्हणून उभी ठाकतात. त्यात अनेकदा पहिला बळी जातो शेर्पांचाच. या सगळ्या अडचणींतून मार्ग काढून मोहिम यशस्वी झाल्यास त्यातून शेर्पांना प्रत्येकी २ ते ८ हजार डॉलर इतकी कमाई होते. अनेकदा पाश्चिमात्य मार्गदर्शकांइतका मोबदलाही अत्यंत कुशल शेर्पांना मिळू शकतो. परदेशी गिर्यारोहक अनेकदा शेर्पांशी नीट वागत नाहीत. १९२२ साली जॉर्ज मॅलरी सहभागी असलेल्या एव्हरेस्ट चढाई मोहिमेदरम्यान हिमप्रपातात ७ शेर्पा मरण पावले होते. त्या दुर्घटनेसंदर्भात एव्हरेस्ट तळछावणीला जो निरोप पाठविण्यात आला होता त्यात म्हटले होते सारे गौरवर्णीय गिर्यारोहक सुरक्षित आहेत!’ असे अनेक प्रसंग ओढवूनही शेर्पा मंडळींनी आपल्या मनमिळावू स्वभावाची कास कधी सोडली नव्हती. पण 18 एप्रिलच्या घटनेनंतर एव्हरेस्टच्या बेसकॅम्पला संतप्त तरुण शेर्पांचा घोळका नेपाळ सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत होता, त्यांना राजकीय फूस असावी अशी शंका या हंगामात आलेल्या अनेक विदेशी गिर्यारोहकांच्या मनात डोकावली होती. यंदा एव्हरेस्ट मोहिमांवर शेर्पांनी घातलेला बहिष्कार मागे जरी घेतला गेला तरी गेल्या तीन आठवडय़ांतील घडामोडींचा विपरित परिणाम मोहिम आखणी व्यवसायावर होणार हे नक्की. त्यातून एव्हरेस्ट मोहिमांसाठी आकारण्यात येणाऱया शुल्कातही भविष्यात मोठी वाढ होण्याचा संभव आहे.
एव्हरेस्ट शिखरावर दरवर्षी जाणाऱया मोहिमांमुळे या शिखरावर कचरा साठण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सोळा वर्षांचा असलेला अर्जुन वाजपेयी हा २२ मे २०१० रोजी एव्हरेस्टचा माथा सर करणारा सर्वात कमी वयाचा भारतीय गिर्यारोहक ठरला होता. आपल्या या अनुभवांवर आधारित ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड - माय एव्हरेस्ट ऍडव्हेंचरया पुस्तकात वाजपेयीने म्हटले आहे की, एव्हरेस्ट शिखर व त्या परिसरातील पर्यावरणाची नासाडी रोखण्यासाठी तो प्रदेश सागरमाथा नॅशनल पार्ककडे सुपूर्द करण्यात आला. तसेच १९७९ साली हा भाग राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आला. १९९८ साली एव्हरेस्ट पर्यावरण संरक्षक मोहिमेंतर्गत गिर्यारोहकांच्या एका तुकडीने सुमारे दीड टन कचरा एव्हरेस्टवरुन खाली आणला होता. त्यामध्ये गिर्यारोहकांनी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, ऑक्सिजनच्या रिकाम्या नळकांडय़ा, बॅटरी व अन्य प्रकारचा मानवी कचरा होता. या मोहिमेनंतरही अजून बराच कचरा एव्हरेस्टच्या विविध कॅम्पवरती शिल्लक होताच. एव्हरेस्टवर वाढणाऱया कचऱयाची समस्या लक्षात घेऊन नेपाळ सरकारने गिर्यारोहकांकडून चार हजार डॉलर इतकी अमानत रक्कम घेण्यास सुरुवात केली. गिर्यारोहकांनी जेवढी साधनसामुग्री बरोबर नेली असेल ती सर्व सामग्री त्यांनी एव्हरेस्टवरुन खाली येताना आणली तरच त्यांना ही अमानत रक्कम परत दिली जाते. असे उपाय योजूनही अजून एव्हरेस्टवरील कचऱयाची समस्याही दूर झालेली नाही. एव्हरेस्टवरील कचरा हटविण्याच्या प्रयत्नांत शेर्पांची बहुमोल मदत असूनही नेपाळ सरकारला त्याची फारशी कदर नाही असे शेर्पांना वाटते. धंदेवाईक वृत्तीच्या दुश्चक्रात सापडलेल्या एव्हरेस्ट मोहिमांमध्ये शेर्पांपासून गिर्यारोहकांपर्यंतचे सारेच घटक सध्या असंतुष्ट आहेत. त्यात नैसर्गिक आपत्तीही आपला रंग दाखवून जातात. त्या विळख्यातून एव्हरेस्टची सुटका कधी होणार?


Saturday, May 3, 2014

वेट लाँस प्रोग्रँम थ्रू पाँवर एक्सरसाईज अँड पाँवर योगा - वैशाली मतकरी हिच्या करिअरबद्दल लिहिलेला दै. लोकसत्ताच्या विवा पुरवणी - ११ जून २०१० रोजीचा लेख.


लेखाचा मूळ भाग



लेखाचा उर्वरित भाग




दै. लोकसत्ताच्या विवा पुरवणीमध्ये मी ४ जून २०१० ते आँक्टोबर २०१० या कालावधीत यंग अचिव्हर नावाचे सदर चालवित असे. सर्वसामान्यांपेक्षा करिअरमध्ये वेगळी व चमकदार कामगिरी करणार्या युवतींचा या सदरात परिचय करुन देण्यात आला होता. दै. लोकसत्ताच्या ११ जून २०१०च्या विवा पुरवणीतील यंग अचिव्हर काँलममध्ये प्रसिद्ध झालेला हा दुसरा लेख. त्याची जेपीजी फाईल वर दिली आहे. वैशाली मतकरी या कुशल व्यायाम प्रशिक्षिकेची ही कहाणी आहे.


वेट लाँस प्रोग्रँम थ्रू पाँवर एक्सरसाईज अँड पाँवर योगा


-         समीर परांजपे
-         paranjapesamir@gmail.com


सकाळी ८.५३ची लोकल पकडायची आहे... आँफिस गाठायचे असते सकाळी साडेनऊ वाजता. त्यात हा ठाणे ते सीएसटी प्रवास...लेडिज डब्यातली ती कचकच. सकाळी लवकर उठून दोन्ही वेळचा स्वयंपाक करा...मुलांचे डबे तयार ठेवा...त्यांना शाळेसाठी तयार करा...एक ना दोन हजार कामे...पुन्हा संध्याकाळी तोबा गर्दीच्या लोकलमध्ये स्वत:ला कोंबा...धक्के खात घरी या...स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ आहे कुठे? हे प्रातिनिधीक मनोगत आहे प्रत्येक नोकरदार स्त्रीचे...एक वेळ शहरे, गावे बदलतील...वाहतुकीची साधने बदलतील पण साता जन्माला पुरुन उरलेली ही घाईगर्दी काही टळणार नाही...ज्या महिला नोकरी, व्यवसाय करीत नाहीत...गृहिणीचे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडतात त्यांचाही दिनक्रम असाच घरच्या कामांनी गजबजलेला असतो. नोकरदार असो वा नसो महिलांना स्वत:कडे पाहाण्यास, आरोग्याची काळजी घेण्यास पुरेसा वेळ असा मिळतच नाही...सदोदित दुसर्यांसाठी रहाटगाडग्याला जुंपून घ्यायचे हीच तर त्यांची जीवनशैली. कोणीही कितीही माँडर्न असो किंवा धनिक का असेना, महिलांची जीवनशैली थोड्याफार फरकाने सारखीच असते.
आरोग्य उत्तम राखण्यासाठी रोज व्यायाम केला पाहिजे असे एखाद्या महिलेला सांगितले तर ती पहिला प्रश्न विचारणार की घरचे व नोकरीचे सांभाळू की स्वत:चे लाड पुरवत बसू?  याला उत्तर असे की, मुळात असा नकारात्मक विचार करणे चुकीचे आहे. आजच्या ओढगस्तीच्या जीवनाता शरीर सुदृढ राहाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा करायलाच हवा. त्याने आपल्या शरीरातील उर्जा टिकून राहाते. मग हे करण्यासाठी जिम्नॅशिअममध्ये जायचे का? की घरच्या घरी योगासने करायची? या प्रश्नाचे उत्तर ज्याला जसे जमेल तसा त्याने व्यायाम करावा हे आहे. आता इथे गरज पडते जिम ट्रेनरची. त्यातही आता स्पेशलायझेशन आहे. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे जिम ट्रेनर असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाणारा व्यायाम शास्त्रशुद्ध असतो. जिम ट्रेनर हा करिअरसाठी एक उत्तम पर्याय आहे. वैशाली मतकरीची या क्षेत्रातील कामगिरी बघितली की हे तुम्हालाही पटेल.
वैशाली मतकरी ही पूर्वाश्रमीची वैशाली धोकटे, तिची आई रोहिणी धोकटे यांचे करिअरही वेगळ्या वाटेवरचे आहे. १९७०च्या दशकातील गोष्ट आहे. माहिमच्या सिटीलाईट जवळील प्रसिद्ध तळवलकर जिममध्ये रोहिणीताई नोकरी करीत. त्यावेळी घरोघरी जाऊन आपल्या व्यायामशाळेची माहितीपत्रके वाटणे, लोकांना व्यायामाचे महत्व पटवून देणे अशी महत्त्वाची कामे त्या करीत. जिम्नॅशिअममध्ये येणार्या महिलांना वेळप्रसंगी मार्गदर्शन करावे लागे. रोहिणीताईंची कामातील तन्मयता बघून तळवलकर जिमच्या मधुकर तळवलकरांनी त्यांना तुम्ही महिलांना व्यायामाचे प्रशिक्षण द्याल का असे विचारले. रोहिणी धोकटे यांनी त्यास होकार दिल्याने त्यांना तळवलकरांनी जिम ट्रेनरचे रितसर प्रशिक्षण दिले. त्यावेळेपासून तळवलकर जिममध्ये येणार्या महिलांना व्यायामाचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी रोहिणीताईंनी उचलली. एकदम वेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपले करिअर केले. वैशाली लहानपणापासून आई कार्यरत असलेल्या वेगळ्या क्षेत्राकडे कुतुहलाने पाहात होती. वैशाली रुईया काँलेजची विद्यार्थीनी. वैशाली एसवायबीएमध्ये शिकत होती. त्या वर्षी तिची आई काही कामानिमित्त लंडनला गेली होती. त्यामुळे तळवलकर जिममध्ये तीन महिने फिमेल जिम ट्रेनरची जागा रिकामी होती. तशी वैशाली नेहमीच संध्याकाळी आईबरोबर जिममध्ये जात असे. तिथे कसे काम केले जाते याची तिला बर्यापैकी माहिती झाली होती. तीन महिने आपण हे ट्रेनरचे काम करुया असे तिच्या मनाने घेतले. मधुकर तळवलकर, प्रशांत तळवलकर यांच्याकडून योग्य ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तळवलकर जिममध्ये येणार्या महिलांना वैशाली व्यायामाचे धडे देऊ लागली. तसे हे काम तिने काही महिन्यांसाठीच स्वीकारले होते. पण म्हणतात ना लहानपणापासून पाहिलेल्या एखाद्या गोष्टीचा कळत-नकळत मनावर प्रभाव पडत असतो. वैशालीला जिम इन्स्ट्रक्टरचे काम मनापासून आवडले होते. तिने विचारांती याच क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
वैशालीला पहिल्यापासून विविध खेळांची आवड होती. रुईया काँलेजमध्ये शिकत असताना ती बॅडमिंटन टीममध्ये होती. काँलेजच्या महिला क्रिकेट टीमची कॅप्टन होती. हिंदु काँलनीतील दादर भगिनी समाजामध्येही ती बँडमिंटन खेळायची. तिच्यात अजून एक विशेष गुण होता तो म्हणजे अभिनयाचाय मोरुची मावशी, भ्रमाचा भोपळा, पाऊलखुणा या व्यावसायिक नाटकांमध्ये तिने कामेही केली होती. १९८७-८८चा सुमार असेल. एका बाजूला काँलेज शिक्षण सुरु होते तर दुसर्या बाजूला वैशालीचे जिम इन्स्ट्रक्टर म्हणून करिअर आकाराला येत होते. तिची कामाप्रती असलेली निष्ठा व तन्मयता पाहून तळवलकरांनी एक मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर टाकली. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा जुहू येथे बंगला आहे. त्याच्याच जवळपास तळवलकर जिमची शाखा होती. १९८८-८९ साली वैशाली तिथे हेड जिम इन्स्ट्रक्टर म्हणून रुजू झाली. जुहू हा सेलिब्रिटींचा एरिया असल्याने तिला अनेक नामवंत लोकांना व्यायामाचे प्रशिक्षण देता आले. त्यामध्ये अनिल कपूरची पत्नी सुनिता, तब्बू, भाग्यश्री पटवर्धनची आई, सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी अशा अनेकांचा समावेश होता. १९९३ साली वैशालीचा राजेश मतकरींशी विवाह झाला. राजेश हा स्वत: उत्तम हाँकीपटू आहे. प्रख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांचा राजेश हा पुतण्या. त्यामुळे साहजिकच वैशाली रत्नाकर मतकरींची चुलत सून झाली. वैशाली आधीच नाटकात कामे करीत होतीच, त्यानंतरही नाटकाशी असलेली तिची नाळ अशी कायम राहिली. विवाहानंतर तिने तळवलकर जिमच्या मुलुंड शाखेत काम करायला सुरुवात केली. नवर्याच्या नोकरीतील बदलीमुळे बेळगाव दोन वर्षे तिचे वास्तव्य झाले. बेळगावमध्ये राहात असलेल्या जागेत एक गॅरेजही होते. त्या गॅरेजमध्ये योग्य बदल करुन वैशालीने तिथे एक छोटेसे जिम सुरु केले. या जिमचे उद्घाटन रत्नाकर मतकरी यांच्या हस्तेच झाले होते. १९९४ ते १९९६ अशी दोन वर्षे हे जिम चालले. सुमारे ४० मेम्बर होते त्यात. १९९६ साली वैशाली ठाण्यास राहावयास आली. त्यात तिने घरात व्यायामाचे क्लासेस सुरु केले. वेट लाँस प्रोग्रँम थ्रू पाँवर योगा असे या क्लासेसचे स्वरुप होते. या क्लासेसना चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर वैशाली मतकरीने ठाण्यात अनेक ठिकाणी जागा रेन्टने घेऊन क्लासेस चालविले. तिथे प्रत्येक ठिकाणी तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. मुख्य म्हणजे तिच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे ती नावाजली गेली. आता ती पर्सनल जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते. संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन तिला पाँवर योगाद्वारे व्यायामाचे प्रशिक्षण देते. ज्येष्ठ नागरिकांसाठीही तिने व्यायामाचे महत्त्व पटवून देणारा कार्यक्रम तयार केला आहे. सामाजिक कार्याचीही तिला आवड आहे.
एकदा माणूस एखादी गोष्ट शिकला की, त्या क्षेत्रात अत्याधुनिक गोष्टी काय आल्या आहेत, नवीन संशोधन काय झाले आहे याची माहिती घेण्याची उत्सुकता न दाखविता आहे त्याच स्वरुपात गोष्टी रेटून नेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. या प्रकारच्या लोकांपेक्षा वैशाली मतकरी वेगळी आहे. जिम व योग या क्षेत्रामध्ये जे जे नवीन प्रवाह आले आहेत त्याचा तिने पद्धतशीर अभ्यास केला आहे.

वैशाली म्हणते `जिम इन्स्ट्रक्टर या व्यवसायाचा फायदा असा की, इतरांना फिट ठेवताना स्वत:लाही आपण फिट ठेवू शकतो. सध्याचे जीवन अत्यंत तणावाचे झाले आहे. तणावामुळे अनेक विकार होऊ शकतात. स्थुलपणा ही पण अनेकांसाठी मोठी समस्या बनते. उपवर मुली, विवाहित महिला यांना वजन कमी करायचे असते. त्यासाठी मग कोणी जिममध्ये जातो, कोणी योगासने करतो. कोणताही व्यायाम करा पण तो नियमित व दररोज करणे आवश्यक आहे. योगशास्त्र व्यायामाच्या दृष्टीने अधिक उत्तम आहे. वैशालीने मुंबई विद्यापीठातून योगशास्त्रात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. लीना मोगरे यांचा योगाबद्दलचा एक कोर्सही तिने केला आहे. व्यायाम व आता विशेष पाँवर योगाबाबत नवनवीन माहिती मिळविण्यावर तिचा सतत भर असतो. उत्तम शिक्षण घेतलेले असून रुटिन करिअर न करता जिम इन्स्ट्रक्टर म्हणून स्वत:ला घडविणे ही प्रक्रिया तशी सोपी नाही. वैशाली म्हणते की, जिम इन्स्ट्रक्टर क्षेत्रात महिलांना खूप मोठी संधी आहे. इथे अधिक मेहनत घेतली तर उत्तम करिअर घडविता येते. वैशालीनेही तेच केले आहे...