Friday, March 7, 2014

नोकरभरती भ्रष्टाचार रोखा.



दै. दिव्य मराठीच्या ७ सप्टेंबर २०११च्या अंकात मी लिहिलेला हा लेख.
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-government-recruitment-corruption-2409156.html
---------
 
नोकरभरती भ्रष्टाचार रोखा.
----------

समीर परांजपे
----
शासकीय नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो अशी चर्चा नेहमीच होते. विविध महामंडळे, विविध खात्यांपैकी काही ठिकाणी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या करण्याचे लोणही फैलावू लागले आहे महाराष्ट्रामध्ये शून्याधारित अर्थसंकल्पीय संकल्पनेमुळे राज्य सरकारी नोकरभरतीच्या प्रक्रियेला काहीशी खीळ बसली होती. त्यामुळे अनेक वर्षे अत्यावश्यक पदे सोडता मध्यम व कनिष्ठ स्तरावरील शासकीय पदांची भरतीच थंडावली होती. त्यातच विविध खात्यांतर्गत कर्मचाºयांना योग्य वेळेत बढती मिळण्यासाठी जी प्रक्रिया राबवली जायला हवी होती ती पण अत्यंत संथगतीने चाललेली होती. याबाबतचा रोष राज्य सरकारी कर्मचाºयांनी प्रसंगोपात व्यक्त केलेला आहे. शासकीय नोकरभरतीतील भ्रष्टाचाराबाबत जनतेमध्ये असंतोष आहे ही जाणीव सरकारदरबारी झाल्यानंतर काही प्रमाणात त्यावर उपाय योजणे सुरू झाले आहे.
महाराष्ट्राच्या वन खात्याच्या इतिहासात प्रथमच वनरक्षकांच्या भरती प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घटना चंद्रपूर येथील आहे. वनरक्षकांच्या भरती प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी चंद्रपूरच्या वनाधिकाºयांनी हा निर्णय घेतला आहे. असे व्हिडिओ चित्रीकरण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ज्यांच्या हातात भरती करण्याची सारी सूत्रे आहेत त्या अधिकाºयांवरही वचक राहील. त्याचप्रमाणे एकंदर प्रक्रियेविषयी पारदर्शकता निर्माण होईल. यापुढेही जाऊन भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांपैकी ज्यांना या व्हिडिओ चित्रीकरणाची सीडी हवी असेल ती त्यांना नाममात्र शुल्क आकारून वन खात्यातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. थोडक्यात, वनरक्षकांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झालेला आहे असा एखाद्या उमेदवाराला संशय आला तर ही सीडी पाहून तो आपल्या मनाची खात्री करून घेऊ शकेल. आता ही सीडीच अयोग्य पद्धतीने तयार करण्यात आली आहे, असा आरोप करणारा एखादा महाभाग त्यात निघेलही.
गेल्या ३० जून रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार चंद्रपूर विभागात वनरक्षकांच्या ३६ जागांसाठी भरती प्रक्रिया लवकरच पार पाडण्यात येईल. या पदासाठी पूर्वी घेण्यात येणारी लेखी परीक्षा नव्या नियमांनुसार यापुढे घेण्यात येणार नाही. वनरक्षक पदाच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्तीची चाचणी देण्यासाठी  भरती प्रक्रियेतील पूर्वीच्या निकषांमध्ये नमूद केलेल्या विशिष्ट मैल अंतरापेक्षा नव्या नियमानुसार जास्त मैल अंतर चालून दाखवावे लागणार आहे. पूर्वी या पदासाठीच्या उमेदवारांना ४५ मिनिटांत पाच कि.मी. अंतर चालून जाण्याची चाचणी पार पाडावी लागत होती. मात्र आता नवीन नियमांनुसार चार तासांच्या कालावधीत पुरुष उमेदवारांनी २५ कि.मी. व महिला उमेदवारांनी १६ कि.मी. अंतर चालून जायचे आहे.
चंद्रपूर भागातील ३६ वनरक्षक पदांच्या भरतीसाठी वन खात्याकडे ३२०५ अर्ज आले आहेत. उमेदवारांची शारीरीक तंदुरुस्ती उत्तम आहे की नाही हे पाहण्यासाठी होणारी ही चालण्यासंदर्भातील चाचणी येत्या १२ सप्टेंबरला पार पडेल. या चालण्याच्या चाचणीमध्ये स्त्री व पुरुष उमेदवारांसाठी अर्थातच स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. वनरक्षकांच्या ३६ जागांपैकी प्रत्येक जागेकरिता अंतिम मुलाखत प्रक्रियेसाठी गुणवत्तेचा विचार करून तीन उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. त्या तीनपैकी प्रत्येकाला नीट पारखून मगच एका पात्र उमेदवाराची निवड केली जाईल.
भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या पद्धतीचे बारकाईने अवलोकन करून तसेच ती कितपत प्रभावी ठरतेय याचा अभ्यास करून ही पद्धत केंद्र व राज्य सरकारमधील विविध पदांच्या भरतीवेळी अमलात आणता येईल का, याचा विचार जरूर केला जावा. व्हिडिओ चित्रीकरण वगैरे इतकी सारी दक्षता घेऊनही जर चंद्रपूर भागातील वनरक्षक पदाच्या भरतीमध्ये भ्रष्टाचार झालाच तर सरकारी बाबू कोणतेही नियम आपल्याला हवे तसे वाकवू शकतात हेच पुन्हा सिद्ध होईल.
वन खात्यामधील भ्रष्टाचाराला अनेक तोंडे असून त्याला आवर घालणे अशक्य नसले तरी ते सोपेही नाही. मात्र गेंड्याची कातडी पांघरणाºया शासकीय यंत्रणेला तेवढी संवेदनशीलता दाखवणे काळाच्या व जनभावनेच्या रेट्यामुळे भागच पडणार आहे.
-------------

No comments:

Post a Comment