Saturday, March 15, 2014

प्रतिकूल स्थितीतील धाडसी स्त्रीवादी लेखन. (दैनिक सामना - ७ डिसेंबर १९९७)


पुणे येथील एस. एन. डी.टी. विद्यापीठाच्या मराठी विभागात कार्यरत असणार्या डाॅ. विलास खोले यांनी स्वत:च्या प्रदीर्घ प्रस्तावनेसह ताराबाई शिंदे लिखित `स्त्री-पुरुषतुलना' या पुस्तकाची संशोधित व संपादित आवृत्ती प्रतिमा प्रकाशनतर्फे प्रकाशित केली. या पुस्तकाला असलेली डाॅ. विलास खोले यांची ६० पानी प्रस्तावना हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य अाहे. या प्रस्तावनेत खोले यांनी प्रबोधनाच्या १९व्या शतकात महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणेच्या विचारांना बळ येत असतानाच स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्याच वर्गातून कोण कसे पुढे येत गेले याची निरीक्षणे सुक्ष्मपणे नोंदविली अाहेत. ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या `स्त्री-पुरुषतुलना' या पुस्तकाचे परीक्षण मी दैनिक सामनाच्या ७ डिसेंबर १९९७च्या अंकातील उत्सव या रविवार पुरवणीत केले होते.

प्रतिकूल स्थितीतील धाडसी स्त्रीवादी लेखन.
- समीर परांजपे

१९ वे शतक हे मराठी साहित्याच्या दृष्टीने नवनवीन लेखन व लेखनप्रकार हाताळणारे शतक अाहे. या शतकामध्ये स्त्रीवाद्यांच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडल्या. महात्मा ज्योतीबा फुले (१८२७-१८९०) यांच्या लेखणीने स्त्रियांचे विविध प्रश्न, शेतमजूर, श्रमिक या तळागाळ्यातल्या लोकांसाठी जागृती केली. त्याअाधी १८२३ ते १८९२ या कालावधीत लोकहितवादींनी आपल्या शतपत्रांमधून हिंदू धर्मातील दांभिक चालीरितींवर कडाडून हल्ले चढविले. नाशिक येथे मिशनरी कार्य करणार्या मिसेस फरार यांनी १८३५ साली कुटुंबपरिवर्तननीती हा ग्रंथ लिहून हिंदू पुरुष स्त्रियांना कसे गुलामासारखे वागवत याचे मर्मभेदी चित्रण केले होते. मराठीतला हा एका स्त्रीने लिहिलेला पहिला ग्रंथ. महात्मा फुले यांनी फरारबाईंकडून स्फूर्ती घेऊन मुलींसाठी शाळा काढली. याच शाळेतील एक विद्यार्थीनी मुक्ताबाईंनी  ज्ञानोदयमध्ये १८५५च्या सुमारास मांग, महारांच्या दु:खाविषयी निबंध लिहून त्या समाजाच्या व्यथांना वाचा फोडली. या सुधारकी वळणाच्या पार्श्वभूमीचा फायदा निश्चितच ताराबाई शिंदे यांना १८८२ साली `स्त्री-पुरुषतुलना' हे पुस्तक लिहिताना मिळाला.
पुणे येथील एस. एन. डी.टी. विद्यापीठाच्या मराठी विभागात कार्यरत असणार्या डाॅ. विलास खोले यांनी स्वत:च्या प्रदीर्घ प्रस्तावनेसह ताराबाई शिंदे लिखित स्त्री-पुरुषतुलना' या पुस्तकाची संशोधित व संपादित आवृत्ती प्रतिमा प्रकाशनतर्फे प्रकाशित केली. या पुस्तकाला असलेली डाॅ. विलास खोले यांची ६० पानी प्रस्तावना हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य अाहे. या प्रस्तावनेत खोले यांनी प्रबोधनाच्या १९व्या शतकात महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणेच्या विचारांना बळ येत असतानाच स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्याच वर्गातून कोण कसे पुढे येत गेले याची निरीक्षणे सुक्ष्मपणे नोंदविली अाहेत.
ताराबाई शिंदे यांच्या स्त्री-पुरुषतुलना' या पुस्तकातील निम्म्याहून अधिक जागा ही पुरुषांच्या ठायी असणार्या दुर्गुणांची चर्चा करण्यासाठी खर्च पडली अाहे. पुरुषांनी स्त्रियांना शास्त्र-पुराणांचे दाखले दाखवून घरात कोंडून ठेवले, अनन्वित शारीरिक अत्याचार करायचे हे दृश्य १९ व्या शतकात घरोघऱी दिसत असे. (अाजही हे प्रकार वेगळ्या स्वरुपात सुरुच अाहेत.) यातूनच सहनशीलतेचा बांध फुटून ताराबाईंनी तत्कालीन पुरुषांच्या वर्तनाचा परखड शब्दांत पंचनामा या पुस्तकात केला अाहे. कुटुंबजीवनात पती म्हणून पत्नीकडूनच पातिव्रत्याची अपेक्षा करणारा पुरुष स्वत: परस्त्रीवर वाईट नजर ठेवतो, मूल नाही म्हणून अधिक बायका करण्याची प्रवृत्ती, बायकोचा वस्तुवत विचार, तिला गुलामाप्रमाणे वागविणे, वृद्धापकाळातही पुनर्विवाहाची तयारी असणे असे गैरवर्तन पुरुष करीत असत. ताराबाईंच्या मते वडील या नात्याने पुरुष मुलींचे विवाह सोयीने व स्वार्थानेच लावून देत असत. सासरा, दीर म्हणून विधवेच्या केशवपनास तसेच तिला निर्दय वागणूक देण्यास पुरुष अाघाडीवर असत. सार्वजनिक जीवनात नोकर म्हणून पुरुष अप्रामाणिकपणा, बेईमानी, राजद्रोह इत्यादी गैरवर्तन करी. नागऱिकशास्त्रवेत्ते, बुवाबाजी करणारे, भटजी, सुधारक, सर्वसामान्य पुरुष या सर्व भूमिकांमधून पुरुषवर्गाने १९ व्या शतकात स्त्रीला जे नाडले होते त्याचा खरपूस समाचार ताराबाई शिंदे यांनी या पुस्तकातून घेतला अाहे.
ताराबाई शिंदे यांचे स्त्री-पुरुषतुलना' हे मराठीतील असे पहिले लेखन अाहे की, ज्यात एक स्त्री केवळ धीटपणानेच नव्हे तर सुसंगतपणे स्त्री-पुरुष नात्यासंबंधी व तिच्या अखंड शोषणाविषयी अत्यंत परखडपणे प्रश्न विचारते अाहे. त्यातील काही प्रश्न ऐतिहासिक तर काही प्रश्न राजकीय स्वरुपाचे अाहेत. अापली परंपरा, अापले उद्योगधंदे साफ बुडविणारे अाणि देशाचे दिवाळे काढणारे पुरुष सार्या हक्कांचे अािण स्वातंत्र्याचे मक्तेदार अाणि स्त्रिया त्यांच्या गुलाम या व्यवस्थेच्या प्रतिकारातून ताराबाईंचे लेखन अवतरले असून या विषयावर न्या. रानडेंपासून र. धों. कर्वे यांच्या पर्यंत कोणीही विस्ताराने लिहिलेले नाही. मात्र अशा लेखनाची दृष्टी ताराबाई शिंदेंना लाभली होती.
 ताराबाईंनी `स्त्रीपुरुषतुलना' हे पुस्तक लिहिताना ऐतिहासिक ग्रंथ, पुराणे, रामायण-महाभारत इथपासून पंडित कवी श्रीधर ते समकालीन ललित साहित्य येथवरचे आधार अापल्या प्रतिपादनासाठी घेतले अाहेत. देशातील समकालीन सामाजिक, अार्थिक स्थितीची त्यांना उत्तम जाण अाहे. ताराबाई शिंदे या पुस्तकात एका ठिकाणी १९व्या शतकातील स्थितीचे वर्णन करताना म्हणतात `सांप्रत पहिली सुदशा जाऊन आपल्या देशास अवदसा येऊ लागली. पाचपाचशे रुपयांचे शालू, पैठण्या गेल्या. धनवड, नागपूर, बर्हाणपूर, सोलापूर, अहमदाबाद या पैठण्या लोपल्या अाणि त्यांच्याऐवजी घरोघऱ पातळाचे सोळा हात तुकड्यांची निशाणी लावली.' अशा या खानदानी मराठा कुटुंबात वाढलेल्या ताराबाई शिंदे यांच्या `स्त्री-पुरुषतुलना'या लेखनाचे महात्मा फुले यांनी आपल्या `सत्सार' या अनियतकालिकाच्या दुसर्या अंकात मनापासून कौतुक केले अाहे.
ताराबाई शिंदेंसोबत पं. रमाबाईंचे नाव घेतले जाते. `स्त्रीपुरुषतुलना' हे धाडसी पुस्तक लिहिल्यानंतर इतर स्त्रियांनी त्यांना दिलेला प्रतिसाद हा थंड होता. पं. रमाबाई, डाॅ. अानंदीबाई जोशी, काशीबाई कानिटकर या सर्वांनी अापल्या लेखनाता `स्त्री-पुरुषतुलना' या पुस्तकाची दखल घेतलेली असले तरीदेखील ताराबाईंच्या लेखनातील अाशय, सौम्य प्रकृतीच्या लेखिकांना मानवला का? कळत नकळत त्याही ब्राह्मणी मूल्यव्यवस्थेच्या प्रभावाखालीच वावरत होत्या का? असे काही प्रश्न त्यामुळे निर्माण होतात.
१८९०मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले व सत्यशोधक समाजाच्या कार्याला अोहोटी लागली. १९१६ पर्यंत स्त्रियांसाठी वेगळ्या विद्यापीठाची मागणी करण्यापर्यंत समाजाच्या मानसिकतेत अनुकूल बदल घडत होते. १८८२मध्ये `स्त्री-पुरुषतुलना'चे लेखन ताराबाई शिंदेंनी केल्यानंतरच काही महिन्यांत म्हणजे जून १८८२मध्ये `पुरुषतुलना' या दुसर्या पुस्तकात ताराबाईंनी स्त्रीधर्म म्हणजे काय अशा प्रश्न उपस्थित करुन त्यासंबंधात खुलासा करणारे विस्तृत विवेचनही केले आहे. तसेच `स्त्रीधर्मनीती' या पुस्तकात स्त्रीने स्त्रीधर्माला अनुसरुन कोणत्या नीतीचे पालन करावे याचे दिग्दर्शन केलेले अाहे. पण दोघांचाही सुरु १९व्या शतकात नाडल्या गेलेल्या स्त्रीला त्या संकटापासून मुक्त करण्याचाच अाहे.
ताराबाईंनी `स्त्री-पुरुषतुलना' या पुस्तकात पुरुषांना दुषणे लावताना जी विशेषणे वापरली अाहेत त्याने तत्कालीन मराठी भाषेच्या शैलीवरही प्रकाश पडतो. त्या पुरुषांना सतीप्रथेबद्दल विचारतात `तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्ही सती का जात नाही?'  स्त्रियांना भोगवस्तू समजणार्या पुरुषांना त्या सवाल करतात ` अरे, देवासारख्यांनी स्त्रियांची खुशामत केली, तेथे तुम्ही (पुरुष) कोण कोण्या झाडाचा पाला? सर्वात स्त्रीचे वर्चस्व स्त्रीचे. तिच्याकरिताच सारे वैभव अाहे. स्त्रिया जर नसत्या तर झाडाची पाने चावीत पुरुष तुम्ही रानोरान भटकत फिरला असता!' यावरुन लैंगिक भेदावरुन उच्च-नीचता ठरविण्यास असलेला विरोध ताराबाई शिंदे प्रकट करतात.
ताराबाईंचे `स्त्री-पुरुषतुलना' हे पुस्तक १९व्या शतकातील स्त्रीच्या स्थितीचे वर्णन करणारे अाहे हे  पुस्तक वाचणार्याने व त्याची समीक्षा करणार्याने प्रथम लक्षात ठेवायला हवे. कारण ताराबाई शिंदे यांनी केलेल्या विवेचनाला आजच्या स्त्रीवादी समीक्षेचे निकष लावले तर फार मोठा घोटाळा होऊ शकतो. १८८१मध्ये भ्रूणहत्या करणार्या सुरत येथील विजयालक्ष्मी खटल्याची `टाइम्स आॅफ इंडिया'मधील बातमी, विजयालक्ष्मी खटल्याचा निकाल ज्यामुळे ताराबाईंना हे पुस्तक लिहावेसे वाटलेे, या खटल्यावरील २७ मे १८८७चा टाइम्स आॅफ इंडियाचा अग्रलेख, विजयालक्ष्मी खटल्यासंदर्भात समकालीन वृत्तपत्रांनी केलेली चर्चा, विजयालक्ष्मीप्रकरणी जुलै १८८१मध्ये सार्वजनिक सभेने सरकारला लिहिलेले पत्र, मुक्ताबाईंचा निबंध, स्त्रीशिक्षणविरोधी एक पद, ताराबाई शिंदे प्रत व डाॅ. स. ग. मालशे प्रत अशी पूरक आठ परिशिष्टे डाॅ. विलास खोले यांनी `स्त्रीपुरुषतुलना' या पुस्तकाच्या संशोधित व संपादित आवृत्तीला जोडली अाहेत. इतिहास संशोधनाच्या सर्व पद्धती उपयोगात अाणले गेलेले विलास खोलेंचे हे पुस्तक वाचनीय व मननीय आहे.
पुस्तकाचे नाव - `स्त्रीपुरुषतुलना'
लेखिका - ताराबाई शिंदे
संपादित व संशोधित आवृत्ती - संपादक - डाॅ. विलास खोले,
पृष्ठे - २००, किंमत - १२५ रुपये, प्रतिमा प्रकाशन, पुणे.

No comments:

Post a Comment