Tuesday, August 22, 2017

आरती या नव्या मराठी चित्रपटाचे मी दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटमधील मराठी कट्टा या सेगमेंटसाठी दि. 19 आँगस्ट 2017 - समीर परांजपे

आरती या नव्या मराठी चित्रपटाचे मी दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटमधील मराठी कट्टा या सेगमेंटसाठी दि. 19 आँगस्ट 2017 रोजी केलेले परीक्षण. त्याची ही लिंक व मजकूर.                                        http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-aarati-5673859-PHO.html
---
आरती - असीम त्यागाच्या लोकविलक्षण गोष्टीची सरधोपट मांडणी
----
- समीर परांजपे
---
चित्रपट - आरती
--
रेटिंग - २.५ स्टार
--
कलावंत - अंकिता भोईर, रोशन विचारे, उमेश दामले, आसावरी असूडकर, सपना कारंडे, प्रियांका करंदीकर,सुप्रित कदम, तृप्ती गायकवाड, आशुतोष दीक्षित, आर जे रिया, सुजित यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे, राधिका देशपांडे, विनोद सिंग.
पाहुण्या कलाकार - वहिदा रेहमान
निर्माती /दिग्दर्शक /कथा - सारिका मेणे
संवाद - प्रभाकर भोसले
संगीत – प्रशांत सातोसे व सुजित -तेजस
श्रेणी - फॅमिली ड्रामा
वास्तववादी घटनांवर आधारित चित्रपट बघताना एक वेगळा दृष्टिकोन ठेवावा लागतो. त्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखांमध्ये कुठेही काल्पनिक रंग मिसळलेला असला किंवा अवास्तव वाटणारे पदर त्या भूमिकेला असले तर रंगाचा बेरंग होऊ शकतो. वास्तववादी घटनांवर आधारित असा दावा करत बनविलेले जाणारे काही चित्रपट इतके भीषण असतात की ते िचत्रपट पाहाणेही अंगावर काटा आणणारे असते. अशा बऱ्याच चित्रपटांची उदाहरणे देता येतील. पण त्या विषयात न जाता आरती या चित्रपटाबद्दल जाणून घेऊ. आरती या मुलीला झालेल्या अपघातानंतर ती मानसिक व शारिरिकदृष्ट्या संपूर्ण विकल झाली. ती संपूर्णपणे परावलंबी झाली. तिला तिच्या अस्तित्वाची फार जाणीवही राहिली नव्हती. असा स्थितीत तिच्या प्रियकराने तिची जीवापाड काळजी घेतली. एक दोन दिवस नव्हे तर काही महिने. तिच्या शुश्रुषेत तो रात्रंदिवस मग्न झालेला होता. त्याचे सारे जग आता आरतीची देखभाल हेच झाले होते. आजच्या काळात जिथे सख्खा भाऊ आपल्या भावाला विचारत नाही, तिथे केवळ प्रेमाच्या नात्याने प्रियकर आपल्या अपघाताने विकल झालेल्या प्रेयसीची इतकी काळजी वाहातो ही कहाणीच लोकविलक्षण आहे. 
कथा - आरती या चित्रपटाची दिग्दर्शिका सारिका मेणे हिचा सख्खा भाऊ सनी पवार व सनीची मैत्रिण आरती मकवाना यांची वास्तव कथा आरती या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. २००६ सालची गोष्ट अाहे. आरती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे सहलीला गेली होती. ती ज्या गाडीतून प्रवास करत होती त्या गाडीला अपघात झाला. त्यात पुढच्या सीटवर बसलेल्या आरतीच्या मेंदूला मार लागला. ती बेशुद्ध झाली. त्यानंतर काही वेळ पुन्हा शुद्धीत आली. सनी व त्याच्या घरच्यांना आरतीच्या अपघाताबद्दल कळताच ते तातडीने भाईंदरला धावले. तिथे स्थानिक रुग्णालयात आरतीवर उपचार सुुरु असताना आरती परत कोमात गेली. तिला जसलोक रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे ती सहा महिने कोमात होती. त्यावेळी सनी पवार हा रात्रंदिवस तिच्यासोबत होता. आरतीची मनोभावे शुश्रूषा करुन मैत्रीचे नाते निभावत होता. ती कोमातून त्यानंतर बाहेर आली तेव्हा तिच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता. आरतीची अवस्था दोन वर्षांच्या बाळासारखी होती. अशा अवस्थेत ती सुमारे साडेतीन वर्ष जगली. त्या सर्व काळात सनी पवार तिच्या सोबत सावलीसारखा राहिला. आरतीवर उपचार चालू असताना तिच्या स्थितीबद्दल व तिची मनोभावे शुश्रूषा करणारा तिचा प्रियकर सनी या दोघांबद्दल वृत्तवाहिन्यांवरुन व वृत्तपत्रांतून बातम्या झळकल्या. त्यातून असंख्य व्यक्ती व संस्थांकडून आर्थिक मदत मिळून आरतीवर एक मोठी शस्त्रक्रिया होऊ शकली. त्यानंतर तिला काही काळाने रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. त्यानंतरही अारतीची खूप काळजी सनी पवार घेत होता. या सगळ्या कालावधीत सनी पवारचे शिक्षण थांबलेले होते. अखेर आरतीची आई व सनीचे आई-बाबा, कुटुंबातील इतर सदस्यांनी सांगितल्यामुळे तसेच समाजसेवा हेच आपले आयुष्य जगण्याचे ध्येय असल्याचे लक्षात आल्याने सनी पवारने एमएसडब्ल्यूला प्रवेश घेतला. समाजसेवेचा हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करुन सनी पवारने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यालाच वाहून घेतले. आरतीच्या तब्येतीत काहीही सुधारणा होण्याची शक्यता नाही असे डॉक्टरांनी सनी पवारला स्पष्टपणे सांगितलेच होते. त्याप्रमाणे आजाराशी झुंजत असलेली आरती एक दिवस मरण पावली. आरतीच्या आजारपणाच्या साडेतीन वर्षात सनी पवारने एक प्रियकर, एक मित्र म्हणून त्याग केला तो अलौकिकच होता. आरती मकवाना व सनी पवारमध्ये जे सच्चे प्रेम होते त्याची गाथा म्हणजे हा चित्रपट आहे.
अभिनय - हा चित्रपट जिच्या भोवती फिरतो ते पात्र म्हणजे आरती. आरतीची भूमिका अंकिता भोईर हिने केली आहे. हा अंकिताचा पहिलाच चित्रपट. रोशन विचारे हा सनी पवारच्या भूमिकेत आहे. ही दोन्ही मुख्य पात्रे अभिनयक्षेत्रात अगदी नवखी आहेत. आणि ते त्यांच्या कामातूनही स्पष्टपणे जाणवते. सनी पवारच्या वडिलांचे काम केलेले उमेश दामले हे एकमेव कसलेले कलाकार या चित्रपटात आहेत. त्यांच्या कामातून ते स्पष्टपणे जाणवते. नाजनीनची भूमिका केलेली राधिका देशपांडे हिची अभिनयाची चांगली समज तिच्या कामातून लक्षात येते. आसावरी असूडकर (सनीची आई), सपना कारंडे (आरतीची आई ), प्रियांका करंदीकर (सानिका ) सुप्रित कदम (जयेश), तृप्ती गायकवाड (दिपाली), आशुतोष दीक्षित (अमित), आर जे रिया (आरतीची बहीण) सुजित यादव (मॅडी), तेजस बने (तेजस), मेघाली जुवेकर (जुही), प्रांजली वर्मा (बबली) कांचन पगारे (शेजारचे काका), विनोद सिंग (डॉ. राजपाल) या सर्व कलाकारांचा अभिनय फारच प्राथमिक दर्जाचा झाला आहे. हौशी रंगभूमीवर काम करणारे कलाकार ज्या पद्धतीने काम करतील त्याप्रमाणे या सर्वांची कामे झाली आहेत. अभिनयाचा उच्च दर्जा वगैरे या चित्रपटात अपेक्षित करु नये. या चित्रपटात ख्यातनाम अभिनेत्री वहिदा रहेमान पाहुण्या कलाकार म्हणून झळकल्या आहेत. आरतीच्या आजाराची व तिच्यावर सुरु असलेल्या उपचारांकरिता आर्थिक मदत गोळा करण्याची जी सनी पवारची धडपड सुरु होती त्याची माहिती वहिदा रहेमान यांना वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून ती मिळाली. त्यांनी सनी पवारला दूरध्वनी करुन अारतीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त केली पण आपण कोण बोलतोय हे वहिदा रहेमान यांनी सनी पवार कधीही कळू दिले नाही. वहिदा रहेमान यांच्याकडून नियमितपणे आरतीवरील उपचारांसाठी विशिष्ट आर्थिक मदत मिळत होती. आरतीचे निधन झाल्यानंतर वहिदा यांना खूपच वाईट वाटले. त्यांनी ज्यावेळी गरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी मिनिम ही संस्था सुरु केली त्यावेळी त्यांनी आवर्जून सनी पवारला मदतीसाठी आपल्या सोबत घेतले. सनी पवार व आरती यांच्यावर आरती हा मराठी चित्रपट बनविण्यास वहिदा रहेमान यांनीच िदग्दर्शिका सारिका मेणे िहला प्रोत्साहन दिले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रारंभीच वहिदा रहेमान या चित्रपटाविषयी दोन मिनिटे प्रेक्षकांशी हितगुज करतात. तसेच गरजू लोकांना मदत करण्यासाठी वहिदा रहेमान यांनी जे मिनिम फाऊंडेशन सुरु केले आहे त्या फाऊंडेशनने आरती हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे. एखाद्या मराठी चित्रपटात वहिदा रहेमान दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्या दोन मिनिटेच पडद्यावर दिसतात पण त्या अल्पकाळातही सारा पडदा व्यापून टाकतात. 
दिग्दर्शन - आपला भाऊ सनी व त्याची मैत्रिण-प्रेयसी आरती यांच्या अतुट प्रेमाचीच वास्तववादी कहाणीच पडद्यावर साकारायची असल्याने सनीची बहिण व या चित्रपटाची दिग्दर्शिका सारिका मेणे हिच्याकडून उत्तम दिग्दर्शनाबाबत खूप अपेक्षा असणे साहजिकच आहे. या साऱ्या घटनेचे बारीकसारीक तपशील सारिका मेणे हिला माहित असल्याने ती कथा पडद्यावर मांडताना ती त्यातील प्रत्येक पात्र अत्यंत उत्तमपणे उभे करेल असे वाटले होते. पण या चित्रपटात उमेश दामले वगळता बहुतांश नवोदित कलाकार घेतल्याने अभिनयाचा दर्जाला पहिला फटका बसला. या चित्रपटाचा मध्यंतराआधीचा भाग हा खूपच विस्कळीत आहे. उत्तरार्धात आरतीच्या आजारपणाची सारी गाथा आहे. तिच्या उपचारांसाठी सनीची चाललेली धावपळ, त्याची आरतीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत मिळविण्याकरिता चाललेली घालमेल हे सारे प्रसंग उत्तरार्धात असल्याने तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पण तरीही संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या मनाची पकड अजिबात घेत नाही. याचे कारण दिग्दर्शनातही खूपच नवखेपणा आहे. आरतीचा आजार व सनीची धडपड या घटकांना पडद्यावर योग्य न्याय देण्यात सारिका मेणे दिग्दर्शक म्हणून कमी पडल्या आहेत. या चित्रपटाचे संवादही खूपच ढोबळ आहेत. ते म्हणताना बऱ्याच कलाकारांच्या चेहेऱ्यावर निर्जिव भाव असतात. त्यामुळे एका भावनाशील चित्रपटातील भावनाच संकोचल्या आहेत. 
संगीत - या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू काय असेल तर ते या चित्रपटाचे संगीत. प्रशांत सातोसे, तसेच सुजित-तेजस जोडगोळीने या चित्रपटासाठी जी गाणी केली आहेत ती सगळीच्या सगळी श्रवणीय आहेत. ही गाणी सुजित यादव, तेजस बने यांनी लिहिली आहेत. तर हरिहरन, दिपाली साठे, आदर्श शिंदे, प्रशांत सातोसे, सुजित यादव यांनी ती गायली आहेत. आरती चित्रपटाची सारी गाणी स्वतंत्रपणे ऐकली तर ती कानसेनांना नक्कीच आवडतील. प्रशांत सातोसे, तसेच सुजित-तेजस या संगीतकारांच्या भविष्यातील वाटचालीकडे यापुढे रसिकांचे नक्कीच लक्ष राहिल.

बस्तर...एक सूडकथा - दै. दिव्य मराठी, २० ऑगस्ट २०१७ - समीर परांजपे


दै  दिव्य मराठीच्या दि. २० आँगस्ट २०१७ रोजी रसिक पुरवणीसाठी लिहिलेल्या लेखाची जेपीजी फाइल वेबपेज लिंक व मजकूर सोबत दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sameer-paranjpe-writes-on-bastar-reporter-santosh-yadaw-5674109-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/20082017/0/2/
----
बस्तर...एक सूडकथा
----
समीर परांजपे | Aug 20,2017 6:00 AM IST
--
प्रभादेवीचे भूपेश गुप्ता भवन. या वास्तूत छत्तीसगडच्या बस्तरमधील सध्याच्या स्थितीबद्दल एक डोळे उघडणारा कार्यक्रम होत होता. तिथे पोहोचल्यावर एका व्यक्तीला शोधत होतो. त्याचे नाव संतोष यादव. त्याच्याच धाडसाचा हा लेखाजोखा...
बस्तर म्हटले की बऱ्याच लोकांना आजही प्रश्न पडतो ते नेमके आहे कुठे? मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड की अजून कुठल्या राज्यात? आपल्या देशाबद्दलचे आपले भौगोलिक ज्ञान जर इतके अगाध असेल तर मग बस्तरमध्ये प्रत्यक्षात काय चाललेय याची जाणीव असणे तर खूपच दूरची गोष्ट...त्यामुळे आधी सामान्य ज्ञानाच्या काही गोष्टी समजून घेऊ. प्रभादेवी, लालबाग, परळ, एल्फिन्स्टन, लोअर परळ हा भाग पूर्वीचा गिरणगाव. कष्टकरी वर्गाचा. कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी, कामगार संघटनांनी हा भाग पूर्वी पक्का बांधलेला होता. या कम्युनिस्टांच्या वैचारिक मंथनाची हक्काची जागा होती व आहे ते म्हणजे प्रभादेवीचे भूपेश गुप्ता भवन. अशा या वास्तूत छत्तीसगडच्या बस्तरमधील सध्याच्या स्थितीबद्दल एक डोळे उघडणारा कार्यक्रम होत होता. तिथे पोहोचल्यावर एका व्यक्तीला शोधत होतो. त्याचे नाव संतोष यादव. उंचीला पाच फूट तीन इंच. सावळा वर्ण. सामान्य माणूस जसा दिसेल तसाच तोही होता, पण बोलायला लागल्यानंतर त्याचे वेगळेपण जाणवायला लागले.
संतोष यादवची सर्वोच्च न्यायालयाने गेल्या २७ फेब्रुवारी रोजी जामिनावर सुटका केली. माओवादी संघटनेशी संबंधित असणे, माओवादी गटांना मदत व पाठिंबा देणे या दोन आरोपांवरून छत्तीसगड पोलिसांनी त्याला २९ सप्टेंबर २०१५ रोजी छत्तीसगड विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्याद्वारे अटक केली होती. संतोष यादव हा मुक्त पत्रकार आहे. ऑगस्ट २०१५मध्ये छत्तीसगड येथील दरभा पोलिसांनी माओवाद्यांना पकडण्यासाठी जो सापळा रचला होता, तेव्हा तेथे एका माओवादी बंडखोराच्या मागे संतोष यादव उभा असल्याचे छत्तीसगड पोलिस विशेष कृती दलाचे कमांडर महंत सिंग यांना आढळून आले होते. संतोष यादव हा माओवादी नक्षलवाद्यांविषयी सहानुभूती बाळगून आहे, असा पोलिसांना असलेला संशय या एका गोष्टीमुळे आणखीन बळावला. दरभा परिसरातील माओवादी नेता शंकर याच्याशी संतोष यादवचे देशद्रोही संबंध आहेत या संशयावरून त्यांनी संतोषला अटक केली.
छत्तीसगड पोलिसांच्या लेखी आरोपी असलेल्या संतोष यादवला ओळख परेडदरम्यान कमांडर महंत सिंग यांनी ओळखण्यात असमर्थतता व्यक्त केली. या ओळख परेडचा मेमो १ जानेवारी २०१६ रोजी काढण्यात आला होता. संतोष यादवला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची बातमी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असलेल्या कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्सने (सीपीजे) ट्विटरवर दिली त्या वेळी मर्यादित वर्तुळात का होईना समाधान व्यक्त झाले. 
सीपीजेने डिसेंबर २०१६मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, आपल्या धडाडीच्या पत्रकारितेमुळे संतोष यादवला तुरुंगात जावे लागले. संतोष यादवचा ‘खरा गुन्हा’ हा होता की, बस्तरमध्ये मानवी हक्कांचे जे उल्लंघन होत आहे त्याविषयी संतोष सडेतोडपणे लिहीत होता. छत्तीसगडमध्ये ज्यांना अटक केली जायची त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांची तो जगदलपूर कायदे सल्ला गट तसेच मोफत खटला लढवण्याची तयारी असलेले वकील यांच्याशी गाठ घालून द्यायचा. 
संतोष यादवला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली, तेव्हा देशभर पत्रकारांनी निदर्शने केली. याचे अजून एक कारण असे होते की, बस्तरच्या स्थितीबद्दल जे पत्रकार लिहितात त्यांना माहिती मिळवण्याकरिता सूत्रांशी संपर्क करून देणे तसेच पत्रकारांना जी माहिती मिळे त्याची खातरजमा करण्यासाठी संतोष यादव हा भरवशाचा माणूस होता. पोलिस किंवा माओवादी या दोघांकडूनही जर पत्रकारांना काही त्रास झाला तर त्यावर तोडगा काढण्यासाठी संतोष यादवच पुढाकार घ्यायचा. असे त्याचे काही ‘गुन्हे’ होते. त्यामुळे छत्तीसगड पोलिसांनी संतोष यादववर शस्त्रास्त्र कायदा १९५९, स्फोटक वस्तू कायदा १९०८, बेकायदेशीर कृत्यविरोधी कायदा १९६७, छत्तीसगड विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा २००५ इतक्या कायद्यांखाली त्याच्यावर गुन्हे दाखल केले व त्याला अटक केली. तब्बल १७ महिने तो तुरुंगात खितपत पडलेला होता. त्या कालावधीत तुरुंगात त्याच्याशी पोलिसांनी जे वर्तन केले त्याबद्दलही तो बोलला. 
संतोष यादव सांगत होता, ‘छत्तीसगडच्या दक्षिण भागातील बस्तर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती खूप बदलत चालली आहे. तिथे विकासाच्या नावाखाली आलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी असा कारभार सुरू केला आहे की, स्थानिक जनतेच्या मनात असंतोष आहे. छत्तीसगडमध्ये सुमारे ५० टक्क्यांहून अधिक वन क्षेत्र आहे. लोह, अभ्रक, कोळसा अशा अनेक खाणी या भागात आहेत. बस्तरमध्येही विशाल वन क्षेत्र होते. मात्र, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रकल्पांमुळे तिथे वननाश तर होतच आहे, पण प्रकल्पांसाठी ज्या स्थानिक आदिवासींच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्यांना या प्रकल्पांमधील नोकरीत अजिबात प्राधान्य देण्यात येत नाही.
त्यामुळे स्थानिक आदिवासींनी आपली जमीन देऊनही त्यांना फायदा तर काहीच नाही, शिवाय बेरोजगारी तर पाचवीला पुजलेली आहे. विकासाच्या नावाखाली बस्तरमधील नैसर्गिक संपत्ती व खनिजांची लूट सुरू झाली आहे. या लुटीला विरोध करणाऱ्या आदिवासींच्या आवाजाला नक्षलवादाचे नाव देण्यात येत आहे. बस्तरच्या आदिवासींचे आपल्या मुळांशी घट्ट नाते आहे. त्यांना येथील जमीन, वन क्षेत्र सोडून इतर ठिकाणी कुठेही जायची इच्छा नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जे प्लांट सुरू केले आहेत त्यातील नोकरदारांमध्ये दुसऱ्या राज्यातील लोकांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे आपल्या अधिकारांवर गदा येत असल्याची भावना आदिवासींमध्ये आहे. अगदी खरे सांगायचे तर नक्षलवादी व सरकार यांच्यात बस्तरचा आदिवासी भरडला जात आहे. आदिवासी महिला, मुलींवर लैंगिक अत्याचाराची प्रकरणे घडत आहेत. या साऱ्या संकटांतून या आदिवासींना बाहेर काढायला हवे. आमचा आवाज बुलंद करण्यासाठीच आम्ही मुंबईमध्ये आलो आहोत.’ 
बस्तर एकता नेटवर्क या संस्थेच्या वतीने भूपेश गुप्ता भवनमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात मानवी अधिकार कार्यकर्ते प्राध्यापक हरगोपाल, वकील ईशा खंडेलवाल, मुंबई उच्च न्यायालयातील वकील अनुभा रस्तोगी यांनी बस्तरमधील स्थितीबाबत नेमकी वस्तुस्थिती सांगितली. दूरदेशीचा हुंकार मुंबईत अशा रीतीने खूप दिवसांनी प्रकट झाला. 
paranjapesamir@gmail.com

Thursday, August 17, 2017

कच्चा लिंबू या चित्रपटाचे परीक्षण - दै. दिव्य मराठी वेबसाईट ११ ऑगस्ट २०१७.- समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटमधील मराठी कट्टा या सेगमेंटसाठी कच्चा लिंबू या नव्या चित्रपटाचे ११ ऑगस्ट २०१७ रोजी मी केलेले हे परीक्षण. त्याचा मूळ मजकूर व वेबलिंक पुढे दिली आहे.
--
आईवडिलांच्या नि:स्वार्थ प्रेमाची अऩुभूती देणारा 'कच्चा लिंबू'
----
- समीर परांजपे
---
चित्रपट - कच्चा लिंबू
--
रेटिंग - ४ स्टार
--
कलावंत - रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम, सचिन खेडेकर, अनंत महादेवन
निर्माता - मंदार देवस्थळी
दिग्दर्शक - प्रसाद ओक
कथा - जयवंत दळवी
पटकथा, संवाद – चिन्मय मांडलेकर
संगीत – राहुल रानडे
श्रेणी - फॅमिली ड्रामा
---
प्रख्यात नाटककार व लेखक जयवंत दळवी यांच्या दुर्गी या नाटकावर आधारित उत्तरायण हा चित्रपट २००५ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी आता जयवंत दळवींच्या ऋणानुबंध या कादंबरीवर आधारित `कच्चा लिंबू' हा नवा मराठी आला आहे. `कच्चा लिंबू'चे दिग्दर्शन अभिनेता प्रसाद ओक याने केले असून त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे व विशेष म्हणजे तो चित्रपट कृष्णधवल रंगात आहे. जयवंत दळवी यांचे बहुतांश लेखन अस्सल आहे म्हणजेच ते कोणत्याही अन्य भाषेतील साहित्यकृतींवर आधारलेले नाही. त्यांनी ऋणानुबंध या स्वत: लिहिलेल्या कादंबरीवर आधारित नातीगोती हे नाटक लिहिले होते. नातीगोती हे गतिमंद मुलांच्या समस्या मांडणारे नाटक नाही तर गतिमंद मुलगा जन्माला आलेल्या आई-वडिलांचे भावविश्व उकलणारे, हे एक मन व्याकूळ करणारे नाटक आहे. हे नाटक रंगभूमीवर येताच या नाटकावर अनेक पारितोषिकांचा वर्षाव झाला होता. पण नातीगोती नाटकामध्ये न अडकता हे नाटक ज्यावरुन बेतले त्या जयवंत दळवींच्या ऋणानुबंध कादंबरीला प्रमाण मानून हा चित्रपट बनविण्यात आला आहे. हे कथानक घडते तो काळ १९६०-७०च्या दशकातील आहे.
कथा - ही कथा घडते तो काळ १९६०-७०च्या दशकातील आहे. ही कथा मुंबईतील गिरगाव (चर्नीरोड) या त्यावेळच्या अस्सल मराठमोठ्या भागात चाळीत राहाणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात घडते. या चा‌ळीतील एका खोलीत मोहन काटदरे व त्यांची पत्नी शैला काटदरे हे राहात असतात. त्यांना मुलगा हा मतिमंद आहे. शैला हिचे लग्न जुळत नसते. सरतेशेवटी तिला मोहन काटदरे यांचे स्थळ सांगून येते. मोहन हा शैलापेक्षा बुटका आहे. एवढी एक गोष्ट सोडली तर मोहन हे टपाल खात्याच्या तार विभागात कायमस्वरुपी नोकरीत आहेत. त्यामु‌ळे त्यांच्या बुटकेपणाकडे दुर्लक्ष करुन शैला मोहन काटदरे यांना लग्नासाठी होकार देते. त्यांचा विवाह होतो. गिरगावच्या चाळीत त्यांचा संसार सुरु होते. लग्नानंतर एक-दोन वर्षातच शैलाला दिवस जातात. तिला मुलगा होतो. त्याला ते लाडाने बच्चू असे म्हणत असतात. हा मुलगा दोन वर्षांचा होईपर्यंत तो गतिमंद आहे हे या दांपत्याच्या ध्यानात येत नाही. पण ते जेव्हा कळते त्यानंतर ते आपला मुलगा बरा व्हावा म्हणून आटापिटा करीत असतात. आपल्या खिशाला परवडतील ते सारे वैद्यकीय उपचार काटदरे दांपत्य बच्चूसाठी करतात. या उपचारांनंतरही तो बरा होत नाही हे दिसल्यानंतर ते विविध गुरुंकडे जातात, नवस बोलतात पण कशानेही गुण येत नसतो. मोहन काटदरे तारविभागात कायम रात्रपाळी करायचे व सकाळी घरी यायचे व सकाळी शैला काटदरे आपल्या नोकरीवर जायची. त्यामुळे सकाळी बच्चूला मोहन व रात्री बच्चूला त्याची आई शैला सांभाळायची. त्यांच्या नोकरीच्या वेळांमुळे बच्चूला सांभाळायच्या वेळेची विभागणीच या दोघांनी करुन घेतली होती. बच्चू गतिमंद असल्याने काटदरे दांपत्याच्या आयुष्यात अन्य सर्वसामान्य संसारी माणसांप्रमाणे सुखाचे दिवस येणे कठीण होते. बच्चूच्या नंतर दुसरे अपत्य होण्यासाठी काटदरे दांपत्य प्रयत्न करीत नाही. कारण बच्चूचे आपल्यानंतर कोण करणार? त्यामुळे त्याच्यासाठी आर्थिक तजवीज करुन ठेवली पाहिजे या विचाराने मोहन काटदरे हे कार्यालयीन काम संपल्यानंतर टायपिंगची इतर कामे करुन अधिक पैसे मिळवत असतात. ते हे पैसे नीट साठवून त्यातून आपल्या गतिमंद मुलाच्या भविष्यासाठी तरतूद करण्याची धडपड करतात. बच्चू झाल्यानंतरच्या पंधरा वर्षांत स्वत:वर पैसे खर्च करण्याचे मोहन काटदरे विसरुन गेले आहेत. ते पत्नीला नीटसे शरीरसुखही देऊ शकत नाहीत कारण शरीर त्यासाठी तयार असले तरी मन हे बच्चूच्या विवंचनेत गुंतले आहे. बच्चूसाठी मोहन काटदरे यांनी स्वत:ला गाडून घेतले आहे. शैलाचेही आपल्या मुलावर, नवऱ्यावर अतिशय प्रेम आहे. पण माणसाच्या मानसिक गरजांबरोबर शारिरिक गरजा देखील असतात. शैलाच्या शारिरिक गरजा नवऱ्याकडून पूर्ण होत नाहीत, आई म्हणूनही तिच्या वाट्याला नीट सुख नाही. त्यामुळे मनाचा प्रचंड कोंडमारा झालेली शैला आपले कार्यालयातले साहेब श्रीकांत पंडित यांच्याकडे आपले मन मोकळे करते. श्रीकांत पंडित शैला काटदरेला मदत करायचे ठरवितात. तिला कार्यालयामध्ये बढती मिळावी म्हणून शिफारस करतात. बच्चू या पंधरा वर्षाच्या गतिमंद मुलाचा सांभाळ करता करता काटदरे पती-पत्नी यांची मने उद्ध्वस्त झालेली आहेत. त्या मनावर फुंकर घालून, त्यांना थोडे सुखाचे दिवस दिसावेत म्हणून श्रीधर पंडित आपल्या परीने धडपडतात. या सग‌ळ्या माहोलमध्ये मोहन काटदरेच्या कार्यालयातील वेंकट नावाचा सहकारी बच्चूवर आपल्या मुलासारखे प्रेम करत असतो. मात्र वेंकटने आपला आजारी मुलगा कृष्णाला झोपेच्या ५५ गोळ्या दुधात मिसळून ते प्यायला लावलेले असते. त्यानंतर कृष्णा मरण पावतो. वेंकटला आता या कृत्याचा प्रचंड पश्चाताप होत असल्याने हे सारे तो एकदा मोहनला सांगून टाकतो. मोहन या अनुभवाने हादरतो. पण बच्चूमुळे होणाऱ्या त्रासापासून कायमची सुटका करुन घेण्यासाठी मोहनला वेंकटने सांगितलेल्या सत्यातून एक मार्गही दिसू लागतो. दरम्यान शैलाला एक आस लागलेली आहे की, तिला तिच्या वाट्याचे थोडेतरी सुख उपभोगायचे आहे जे आजवर दुरावले आहे. त्यामुळे श्रीराम पंडितांनी सुचविल्याप्रमाणे कंपनीच्या इन्स्पेक्शनचे कारण देऊन शैला दोन दिवस लोणावळ्याला पंडितांबरोबर फिरण्याची योजना आखते. त्या दोन दिवसांत तिला मानसिक, शारिरिक अशी दोन्ही सुखे पंडितांकडून मिळवावी असा मोह होतो. ती मोहन काटदरे यांना खोटे सांगून लोणावळ्याला जायला निघते. दुसऱ्या बाजूला वेंकटने आपला मुलगा कृष्णाला कसे संपविले तो तपशील डोक्यात घेऊन त्याच मार्गाने बच्चूला कायमचे संपविण्यासाठी मोहन काटदरे उंदीर मारायचे औषध विकत घेतात. शैला लोणावळ्याला गेली आहे त्या दोन दिवसांतच हे औषध दुधातून बच्चूला पाजून साऱ्या दु:खातून सुटका करुन घ्यायचा बेत मोहन मनात आखतो...काटदरे कुटुंबाच्या आयुष्यालाच एक वेगळे वळण लागणार असते. श्रीकांत पंडित यांच्या बरोबर शैला लोणावळ्याला जाऊन दोन दिवस राहाते का? आयुष्यात पारखी झालेली सुखे ती या मुक्कामात पंडितांकडून मिळवते का? मोहन काटदरे उंदरांना मारायचे औषध दुधात मिसळून ते बच्चूला प्यायला देऊन मारतात का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उकल होण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
अभिनय - मुंबईतील गिरगाव या साठ-सत्तरच्या दशकातील मराठमोळ्या मध्यमवर्गीय चाळकरी कुटुंबातील नोकरदार माणसे जसे जगत असत तसेच साऱ्या चित्रपटभर शैला काटदरेच्या भूमिकेतील सोनाली कुलकर्णी व मोहन काटदरे यांच्या भूमिकेतील रवि जाधव वावरले आहेत. सोनाली कुलकर्णी ही कसलेली अभिनेत्री आहे. याआधी मुक्तापासून अनेक चित्रपटांमध्ये तिने आपल्या सशक्त अभिनयाने बहार आणली होती. त्यामुळे शैला काटदरे या भूमिकेतील मध्यमवर्गीय व मध्यमवयीन मराठी नोकरदार स्त्री तिने उत्तमच साकारली आहे. पण जास्त कौतुक हे रवि जाधव यांचे आहे. रवी जाधव हे स्वत: ख्यातनाम दिग्दर्शक आहेत. ते रुढार्थाने अभिनेते नव्हेत. मात्र कच्चा लिंबूमध्ये त्यांनी मोहन काटदरेची प्रमुख भूमिका केली आहे. मोहन काटदरे हे पात्र आपल्या गतिमंद मुलाच्या भोवतीच फिरत राहाते. आयुष्यातल्या साऱ्या इच्छा बाजूला सारलेले मोहन काटदरे रवि जाधव यांनी तरलतेने साकारले आहेत. रवि जाधव यांच्या अभिनय कामगिरीमुळे सोनाली कुलकर्णी हिच्या भूमिकेला अधिक उठाव आला आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये. म्हणून रवि जाधव यांच्या अभिनयाला सलाम...ते सोनाली कुलकर्णीच्या अभिनयापेक्षा मनाला जास्त भिडतात. गतिमंद बच्चूची भूमिका मनमीत पेमने सर्वसामर्थ्यानिशी केली आहे. गतिमंद मुलाचे शारिरिक हावभाव, त्याचे बोलणे, त्याचे वागणे हे बारकाईने व अचूकतेने दाखविण्यात मनमीत यशस्वी ठरला आहे. मनमीत आपल्या भूमिकेत कमी पडला असता तर या चित्रपटाचा डोलारा डळमळीत झाला असता. पण तसे झालेले नाही. शैला काटदरेच्या साहेबाची म्हणजे श्रीकांत पंडित याची भूमिका सचिन खेडेकर यांनी प्रगल्भतेने केली आहे. शैलाला आधार देणारा श्रीकांत पंिडत हा माणूस हे सर्व निरपेक्षतेने करत असतो हे प्रेक्षकांना आधी लक्षात येत नाही. पण ते नंतर एका प्रसंगात कळते. तो जो कलाटणीपर्यंतचा प्रवास आहे तिथपर्यंत प्रेक्षकांना सचिन खेडेकर यांनी अगदी आपल्या अभिनयाने सहजरित्या नेले आहे. मोहन काटदरे यांचा सहकारी वेंकट हा आपला मुलगा कृष्णाची आठवण सारखी का काढतो याबद्दलचे कारण कळेपर्यंत वेंकटच्या भूमिकेतील अनंत महादेवन यांनी प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच ताणली जाईल असा अभिनयाविष्कार दाखविला आहे. या कथेतील कोणतेच पात्र सर्वस्वी सुखीही नाही व दु:खीही नाही. हे सारे कंगोरे घेऊनच कलावंत या चित्रपटात वावरले आहेत.
दिग्दर्शन - अभिनेता प्रसाद ओक याच्या कारकिर्दीला अनेक वर्षे झाली. त्या काळात त्याने विविधांगी भूमिकाही केल्या होत्या. पण त्याला दिग्दर्शन करायचे होते. पण काही ना काही कारणाने ही संधी मिळत नव्हती. काही वर्षांपूर्वी ऋणानुबंध या कादंबरीवर चित्रपट करायचे त्याने मनावर घेतले. चिन्मय मांडलेकर याच्याकडून पटकथा व संवाद लिहून घेतले. मधल्या काळात अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करुन अखेर ऋणानुबंध कादंबरीवर त्याने कच्चा लिंबू हा चित्रपट दिग्दर्शित केला. पहिल्या पदार्पणातच प्रसाद ओक याने अतिशय परिपक्व दिग्दर्शन केलेले आहे. बच्चू या गतिमंद मुलामुळे मने पार उद्‌्ध्वस्त झालेल्या काटदरे कुटुंबाचे चित्रण करायचे होते. काटदरे दांपत्याच्या जीवनात काही वाईट म्हणजे कृष्णवर्णीय व काही बऱ्या म्हणजे धवल गोष्टीही आहेत. पण काटदरेंची मने उद्ध्वस्त झाली अाहेत हे दाखविण्यासाठी व ते प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यासाठी प्रसाद ओक यांनी कच्चा लिंबू चित्रपटातील सात-आठ रंगीत दृश्ये वगळता बाकीचा सारा चित्रपट कृष्णधवल ठेवला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेला हा प्रयोग वेगळा व त्यांची कलात्मकता दाखविणारा आहे. जयवंत दळवींच्या आणखी काही साहित्यकृतींवर प्रसाद ओक यांना भविष्यात चित्रपट बनवायचे आहेत. त्या प्रकल्पांची सुरुवात म्हणून कच्चा लिंबू चित्रपटाकडे पाहाता येईल. थोडक्यात पहिल्याच प्रयत्नात प्रसाद ओक यांनी सिक्सर मारली आहे. साठ-सत्तरच्या दशकातील मुंबईतील वातावरण उभे करताना तेव्हाचे सारे तपशील कच्चा लिंबूमध्ये दिग्दर्शकाने अतिशय बारकाईने व अचूक दाखविले आहेत. त्यामुळे चित्रपटात वास्तववादी रंग भरले जातात.
संगीत - कच्चा लिंबू या चित्रपटाला राहूल रानडे यांनी संगीत दिले असून गाणी संदीप खरे यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाच्या अखेरीस एक गाणे येते ते म्हणजे `माझे आई बाबा माझे आई बाबा स्पेशल आईबाबा देवाजीचे दोन हात सारे आई बाबा.' हे गाणे अवधूत गुप्ते याने अतिशय तरलपणे गायले असून त्या गाण्यातून या चित्रपटाचे जणू काही सारे सारच उलगडते. संगीत व पार्श्वसंगीताचा अचूक वापर ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.                 http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-marathi-film-kaccha-limboo-movie-review-5666775-PHO.html

'मला काहीच प्रॉब्लेम नाही!' या चित्रपटाचे परीक्षण - दै. दिव्य मराठी वेबसाईट ११ ऑगस्ट २०१७.- समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटमधील मराठी कट्टा या सेगमेंटसाठी मला काहीच प्रॉब्लेम नाही! या नव्या चित्रपटाचे ११ ऑगस्ट २०१७ रोजी मी केलेले हे परीक्षण. त्याचा मूळ मजकूर व वेबलिंक पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-MB-movie-review-of-ma…
---
'मला काहीच प्रॉब्लेम नाही!' बघून होतो भ्रमनिरास
---
- समीर परांजपे
---
चित्रपट - मला काहीच प्रॉब्लेम नाही!
--
रेटिंग - २ स्टार
--
कलावंत - गश्मीर महाजनी,स्पृहा जोशी, निर्मिती सावंत, विजय निकम, कमलेश सावंत, मंगल केंकरे, सतीश आळेकर, सीमा देशमुख, साहिल कोपर्डे, आरश गोडबोले, स्नेहलता वसईकर, विनोद लव्हेकर
निर्माता - पी. एस. चटवाल, रिचा सिन्हा आणि रवि सिंग, करण बेलोसे, सुरभी हेमंत, गणेश रेवडेकर
दिग्दर्शक - समीर विद्वांस 
कथा - रवि सिंग 
पटकथा, संवाद - कौस्तुभ सावरकर 
संगीत – ह्रषिकेश-सौरभ-जसराज
श्रेणी - फॅमिली ड्रामा
समीर विद्वांस हे नाव घेतले त्याने दिग्दर्शित केलेले काही दर्जेदार चित्रपट आठवू लागतात. त्याने `डबल सीट', `टाईम प्लीज' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याशिवाय `वायझेड' या चित्रपटाची कथा लिहीली आहे. क्लासमेट्स', `लग्न पाहावे करुन' यांसारख्या चित्रपटांसाठी पटकथा लिहिली आहे. समीर विद्वांसच्या नवा गडी नवं राज्य या नाटकाचे शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. लोकमान्य - एक युगपुरूष या चित्रपटात समीर विद्वांस याच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली होती. हे जरा सविस्तर अशासाठी सांगितले की, नाटक-चित्रपट या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या माणसाकडून काही किमान चांगल्या अपेक्षा असतात. त्या घेऊन प्रेक्षक त्याचा नवीन सिनेमा पाहायला जातात. समीर विद्वांस याचे दिग्दर्शन असलेला मला काहीच प्रॉब्लेम नाही! हा चित्रपट मोठ्या अपेक्षेने बघायला जावे व भ्रमनिरास व्हावा अशी पाळी प्रेक्षकावर येते. 
कथा - अजय हा या चित्रपटाचा नायक तर केतकी या चित्रपटाची नाियका. दोघांचेही वय २५च्या आतले आहे. चित्रपट सुरु होतो तो मॅरेज कोर्टामधील रजिस्ट्रारच्या रुमपाशी. तिथे बाहेर एका बाकड्यावर नायक व नायिका बसलेले आहेत. ते थोड्या वेळातच रजिस्ट्रारसमोर सह्या करुन नोंदणी पद्धतीने विवाह करणार आहेत. नेमका याचवेळी सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो. अजय, केतकी व त्या दोघांंचाही जिगरी मित्र सागर एका इराण्याच्या हॉटेलमध्ये बसलेले आहेत. परस्परांशी लग्न करावे की न करावे याचा निर्णय अजय व केतकीला घ्यायचा असतो. त्या दोघांना भेटून अवघे तीन महिने झाले आहेत. त्यांच्या घरच्यांना या दोघांच्या प्रेमाविषयी माहिती आहे. अजय आहे विदर्भातला. नागपूरला त्याचे आई, वडिल, भाऊ, भावजय असा परिवार राहात असतो. तर केतकी आहे कोकणातली. तिला शिक्षणासाठी तिच्या आईवडिलांनी मुंबईत पाठविलेले असते. त्यामुळे मुंबईच्या आधुनिक वातावरणात मोठी झालेल्या केतकीचे विचारही पुरोगामी तसेच स्त्रीच्या स्वातंत्र्याला, स्वतंत्र विचाराला सर्वोच्च प्राधान्य देणारे असतात. केतकी व अजय या दोघांचे आई-बाबा जेव्हा लग्नाची बोलणी करायला भेटतात तेव्हा त्यांच्यात मानपान व अनेक मुद्द्यांवरुन खूप मतभेद होतात. त्यामुळे अजय व केतकी यांचा विवाह होणे काहीसे मुश्किल होऊन बसते. हा पूर्वी घडलेला प्रसंग फ्लॅशबॅकमध्ये आठवून अजय व केतकी पुन्हा वर्तमानात येतात. आता पुढचा प्रसंग आहे अजय व केतकी यांच्या रजिस्टर मॅरेजचा. हे लग्न करताना अजय व केतकी हे दोघेही आपल्या आईबाबांना अजिबात कळवत नाहीत. लग्न करुन मोकळे होतात. लग्न झाल्यानंतर भराभर काळाची पाने उलटत जातात. केतकीला मुलगा होतो. त्याचे नाव तनय ठेवण्यात येते. आता केतकी व अजय यांच्या लग्नाला सात वर्षे झालेली आहे. अजय एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. केतकीसुद्धा एका कंपनीत सिनिअर पोजिशनला आहे. ते दोघेही रात्रंदिवस मेहनत करत असतात. आपल्या स्वकमाईतून अजय व केतकीने मुंबईत एक मोठा फ्लॅटही विकत घेतला आहे. आपापल्या नोकरीत सुस्थिर, एक मुलगा असा राजा-राणी-छकुला असा छान त्रिकोणी संसार सुरु आहे. हा संसार सुखी आहे असे चित्र बाहेरुन पाहाणाऱ्याला दिसते. पण या संसारात अजय व केतकी यांच्या परस्परांविषयी काही तक्रारी आहेत. त्यातही केतकीच्या अजयविषयी काही जास्त तक्रारी आहेत. अजय हा सतत कामामध्ये बिझी असतो. तो आपल्याशी नीट संवाद साधेनासा झाला आहे, तनय या मुलाला अजय अजिबात वेळ देत नाही अशी केतकीची तक्रार आहे व ती योग्य आहे. दुसऱ्या बाजूला केतकी ही अत्यंत स्पष्टवक्ती आहे. मात्र तिला जेव्हा एखादी वाईट गोष्ट पटत नाही तेव्हा ती खूपच त्रागा करते. अगदी फटाफट बोलते. नेमका याच गोष्टीचा अजयला त्रास होत असतो. केतकीच्या समोर गेल्यानंतर अजयला नेहमी आपण अपराधी असल्यासारखी भावना मनात येत राहाते. तर दुसऱ्या बाजूला अजयला आपण सतत डॉमिनेट करतो आहोत अशी भावना केतकीच्या मनात साठून राहाते. पण त्यांच्या त्यांच्या मनातील भावना ते बोलून व्यक्त करत नाहीत. सारी वाफ मनातच साचून ठेवतात. त्यामुळे गेली वर्षभर त्यांच्यातील संवाद खूपच तुटक झाला आहे. एकाच घरात राहात असूनही ते परस्परांना अनोळखी वाटावेत अशा अवस्थेला आलेले आहेत. आपण एकमेकांशी बोलून आपल्यातले वाद मिटविले पाहिजेत असे एका बाजूला केतकी सांगत असताना अजय त्यावर फारशी प्रतिक्रियाच देत नसतो. त्यामुळे एक दिवस भांडणाच्या ओघात केतकी अजयकडे घटस्फोट मागते. या दोघांमधील नाते आता संपण्याच्या बेतात असताना अचानक अजयचे आईबाबा, भाऊ, वहिनी हे सारे नागपूरहून अजयच्या घरी येऊन ठेपतात. गेली सात वर्षे त्यांनी अजयशी धरलेला अबोला ते तोडतात. अजयचे आई-बाबा आपला मुलगा व सुन, नातवाला घेऊन कोकणात केतकीच्या आईवडिलांकडे जातात. गेली सात वर्षे केतकीही आपल्या आई-बाबांच्या संपर्कात नसते. त्यामुळे अजय व केतकी या दोघांकडील कुटुंबे आता अबोला संपवून परस्परांशी जोडली गेली आहेत. कोकणातील चार-पाच दिवसांच्या मुक्कामात अजय व केतकीचे आईबाबा पूर्वी राहिलेले मानपानाचे सोपस्कार आपल्या मर्जीने पूर्ण करतात. काही पूजा, शांती वगैरे करतात. पण हे सारे केतकीच्या स्वभावाला काही पटत नसते. ती तसे आपल्या माहेर व सासरकडच्यांना बोलून दाखविते. अजय व केतकीचा सुखी संसार सुरु आहे असेच सर्वांना वाटत असते. मात्र मुंबईतून कोकणात दोन-चार दिवसांसाठी येण्याआधी आपला मित्र सागरचा सल्ला अजय व केतकीला आठवत राहातो तो म्हणजे `तुम्ही दोघेच कुठेही बाहेर फिरायला जाऊन या. आपल्यात नाते शिल्लक राहिले आहे किंवा नाही याचा प्रामाणिक शोध घ्या. नाते टिकवावेसे वाटले तर टिकवा अन्यथा वेगळे व्हा.' हा सल्ला आठवून अस्वस्थ होणारी केतकी एक दिवस माहेर व सासरच्यांना सांगून टाकते की, आम्हा दोघांत अनेक मतभेद निर्माण झाले असून संसार मोडायच्या बेतात आलेला आहे. त्यावर सर्वजण विचार करुन अजय व केतकी या दोघांनाच काही दिवसांसाठीच दोघांचीच स्पेस द्यायचे ठरवितात. तनयला या चार-पाच दिवसांत त्याचे कोकणातील आजोबा-आजी सांभाळणार असतात. मग केतकी व अजय हे दोघेच कोकणातून मुंबईला आपल्या घरी परततात. त्यानंतर हे दोघे परस्परांशी मोकळेपणाने संवाद साधतात का? ते घटस्फोट घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहातात का? असे काही प्रश्न कथानकाच्या ओघात निर्माण होतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी हा चित्रपट पाहाणे श्रेयस्कर ठरेल. 
अभिनय - गश्मीर महाजनी हा अभिनेता म्हणून समंजस आहे. त्याने या चित्रपटात केलेली अजयची भूमिका ही कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन या चारही गोष्टी जशा सांगतील तशी वठवली आहे. मुळात िचत्रपटाची कथा विस्कळीत आहे. त्यामुळे त्यातील पात्रांची रचना, त्यांचे वागणे यांचा गडबडगुंडा झाला आहे. अजयची व्यक्तिरेखा ही कथेतील दोषांमुळे भरकटलेली आहे. त्यामुळे गश्मीरने अभिनयात चांगली चुणूक दाखवूनही त्याने साकारलेला अजय हा प्रेक्षकांच्या मनावर हवा तसा ठसत नाही. आपल्या संसारात काही गोष्टींची उणीव आहे ही अजयच्या मनात असलेली तगमग त्याच्या चेहेऱ्यावर, देहबोलीत फारशी जाणवत नाही. तोच प्रॉब्लेम केतकीची भूमिका करणाऱ्या स्पृहा जोशी हिचा झाला आहे. केतकी ही करिअर ओरिएंटेड असण्याबरोबरच संसाराला जपणारी मुलगी दाखविली आहे. पण संसार करताना नवऱ्याबरोबर आपला उत्तम संवाद असावा, त्याने आपल्याकडे व मुलगा तनयकडे नीट लक्ष द्यावे ही केतकीची अपेक्षा निश्चितच चुकीची नाही. पण संसारसुखाच्या काही कल्पना घेऊन जगणाऱ्या केतकीला अख्ख्या चित्रपटात तिचा सूरच सापडत नाही. कारण तिचे पात्रच अर्धेकच्चे लिहिले गेले आहे. त्यामुळे स्पृहा जोशी ही उच्च अभिनयक्षमतेची नायिका लाभूनही केतकीचा काहीच प्रभाव चित्रपटात पडत नाही. अजय व केतकी ही दोन्ही मुख्य पात्रे संपूर्ण सपाट आहेत. हा दोष दिग्दर्शकापेक्षा चित्रपटाची कथा लिहिणाऱ्याचा जास्त आहे. त्याचबरोबर केतकीचे आईवडिल, अजयचे आईवडिल, अजयचा भाऊ, केतकीची आत्या, आत्याची मुलगी अशी पात्रे या चित्रपटात येतात त्यातील काही पात्रे अक्षरश: वायफळ वाटतात. ती त्या ठिकाणी का आहेत हेच कळत नाही. त्यामुळे अभिनयाबाबतही यातील बहुतांश कलाकारांकडून फारशी उजवी कामगिरी झालेली नाही. 
दिग्दर्शन - मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना समीर विद्वांसला आपण एका अत्यंत ठिसूळ कथेवर चित्रपट बनवतो आहे याचे भान नक्कीच असणार. डबल सीटसारखा उत्तम चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या समीर विद्वांसने मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटाच्या केलेल्या दिग्दर्शनात काहीही नाविन्य दिसत नाही. राम जाणवत नाही. ठिसूळ कथा व ढिसाळ मांडणी या शब्दांत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे वर्णन करता येईल. या िचत्रपटाचा पूर्वार्ध बरा झाला आहे. त्यात या चित्रपटाला काहीतरी कथा आहे असे वाटायला लागलेले असते. पण मध्यंतरानंतर उत्तरार्ध सुरु होतो तेव्हा चित्रपटाचे कथानक जे गडगडते ते तो चित्रपट अजिबात सावरत नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध अनाकलनीय आहे. रटाळ आहे. समीर विद्वांस असाही चित्रपट दिग्दर्शित करु शकतो हा त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का आहे. चित्रपटाचा शेवट ज्यारितीने केलाय तो प्रकारही पुन्हा अचंबित करणारा आहे. 
संगीत - मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटाला ह्रषिकेश-सौरभ-जसराज यांनी संगीत दिले आहे. गुरू ठाकूर आणि वैभव जोशी यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी, अभय जोधपूरकर, श्रृती आठवलेबरोबरच संगीत दिग्दर्शक जसराज जोशी यांचे स्वर लाभले आहेत. इतका सगळा जामानिमा असूनही या चित्रपटातील एकही गाणे मनात गुंजी घालत नाही. उत्तम साधने असून सुद्धा वाईट चित्रपट कसा काढता येतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-MB-movie-review-of-ma…

'डाँ. तात्या लहाने' चित्रपटातील एक गाणे 324 गायकांनी गाऊन केला रिले सिंगिंगचा नवा गिनीज बुक रेकॉर्ड - दै. दिव्य मराठी १७ आॅगस्ट २०१७ - समीर परांजपे



दै. दिव्य मराठीच्या दि. 17 आँगस्ट 2017च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही बातमी. या बातमीचा मूळ मजकूर, वेबपेजलिंक व जेपीजी फाइल सोबत दिली आहे. 
Epaper http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/17082017/0/4/
---
'डाँ. तात्या लहाने' चित्रपटातील एक गाणे 324 गायकांनी गाऊन केला रिले सिंगिंगचा नवा गिनीज बुक रेकॉर्ड
भारतीय चित्रपटस्रष्टीत झाला अशा प्रकारचा पहिलावहिलाच प्रयोग
वाशी, दि. 17 आँगस्ट (विशेष प्रतिनिधी) - मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचे डीन व प्रख्यात नेत्रतज्ऩ डाँ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित 'डाँ. तात्या लहाने - अंगार - पाँवर दी विदिन' या चित्रपटातील एक गाणे महाराष्ट्रातील विविध भागांतील 324 गायक-गायिकांनी आज रिल सिंगिंग प्रकाराने गायले व नवा गिनिज बुक रेकाँर्ड प्रस्थापित केला.
याआधी 270 गायक व गायिकांनी रिले सिंगिंग एकत्रितरित्या केले असल्याचा जागतिक विक्रम गिनिज बुकात नोंदविला गेला होता. तो विक्रम आज संध्याकाळी नवी मुंबईतील वाशी येथे असलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात मोडला गेला.
डॉ. तात्याराव लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा "डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन" हा सिनेमा ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. "डॉ. तात्या लहाने ... अंगार पॉवर इज विदीन" सिनेमाचे दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले असून त्यांच्याच विराग मधुमालती एंटरटेनमेंट अंतर्गत सिनेमाची निर्मिती केली आहे.
या बहुचर्चित रिले सिंगिंगसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ३२४ गायकांची निवड करण्यात आली होती. सात ते सत्तर वर्षापर्यंतचे गायक रिले सिंगिंगसाठी सज्ज झाले होते. त्या गायकांमधे कोल्हापूरचे आमदार सुजित मिंचेकर यांचाही सहभाग होता.
या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले की, डाँ. तात्याराव लहाने हे ध्येयवेडे आहेत.काही माणसे प्रसिद्धीसाठी जगतात, काही लोक विक्रमासाठी जगतात पण तात्याराव लहाने हे आपल्या कार्याशीच कटिबद्ध आहेत. ते अहोरात्र कार्यमग्न असतात. त्यांनी नेत्रशस्त्रक्रिया करुन हजारो लोकांना पुन्हा द्रष्टी प्रदान केली. डाँ. तात्याराव लहाने यांचे समाजकार्य महान आहे. त्यांनी केलेली समाजाची सेवा अलौकिक आहे.
'काळोखाला भेदून टाकू...जीवनाला उजळून टाकू!...' हे विराग यांनी लिहिलेले १०८ शब्दांचेे गाणे ३२४ गायकांनी सलग ३ वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत एक शब्द एक गायक या पद्धतीने गायले. 'डाँ. तात्या लहाने - अंगार पाँवर इज विदिन' या चित्रपटातील हे गाणे रिले सिंगिग पद्धतीने गाऊन नवा गिनिज बुक रेकाँर्ड प्रस्थापित केला. रिले सिंगिंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या ऑडिशन्समध्ये मुंबई/ठाणे(१२५), पुणे (१८), नाशिक(१२), सांगली(७), धुळे(२०), जळगाव(३०), जालना(६), अकोला(११), अमरावती(१७), नागपूर(११), वाशिम(१५), लातूर(१६), परळी(२), कोल्हापूर(८) सोलापूर (३) मधून ३२४ उत्तम गायक या उपक्रमात सहभागी झाले होते. डॉ लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी सादर करण्यात येणारे रिले सिंगिंग भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच झाले. या कार्यक्रमाला अभिनेत्री अलका कुबल याही उपस्थित होत्या . अलका कुबल यांनी या चित्रपटात डाँ. तात्याराव लहाने यांच्या आईची भूमिका केली असून डाँ. लहाने यांची भूमिका अभिनेता मकरंद अनासपूरे यांनी केली आहे. या सिनेमाची कथा-पटकथा- संवाद विराग यांनी स्वतः लिहिले असून सिनेमाचं संगीत 'एक हिंदुस्थानी' या संगीतकाराने केलं आहे.

वहिदा रहेमान यांची मुलाखत - दै. दिव्य मराठी १५ ऑगस्ट २०१७. - समीर परांजपे



दै. दिव्य मराठीच्या दि. 15 आँगस्ट 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीचा मूळ मजकूर, वेबपेज लिंक व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/15082017/0/7/
---
मराठी चित्रपटात काम करण्याचा सध्या तरी विचार नाही - वहिदा रहेमान
`आरती' हा नवा मराठी चित्रपट बनविण्यासाठी दिग्दर्शिका सारिका मेनेला दिले वहिदा यांनी प्रोत्साहन
- समीर परांजपे
मुंबई, दि. 15 ऑगस्ट - मी सुमारे सात भाषांतून काम केले आहे. सध्या अतिशय चांगले कथानक व आशय असलेले मराठी चित्रपट येत आहेत.काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपटामध्ये काम करण्याबद्दल मला एका गृहस्थांनी विचारणा केली होती पण ते त्यावेळी काही जमले नाही. सध्या मराठी चित्रपटांत काम करण्याविषयी अजून तरी मला कोणी विचारलेले नाही. मी ही त्याबाबत काहीही ठरविलेले नाही असे प्रख्यात अभिनेत्री वहिदा रहेमान यांनी `दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
वास्तव घटनेवर `आरती' हा नवा मराठी चित्रपट बनविण्यासाठी दिग्दर्शिका सारिका मेने यांना वहिदा रहेमान यांनी खूप प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे या चित्रपटासंदर्भात प्रसारमाध्यमांशी वहिदा रहेमान यांनी मंगळवारी संवाद साधला. त्यानंतर `दिव्य मराठी'शी बोलत होत्या.
गाईडमध्ये आपण साकारलेली `रोझी' ही बंडखोर होती. गेल्या काही वर्षांत प्रदर्शित स्त्रीवादी सिनेमे मुख्यत: स्त्री दिग्दर्शकांनीच दिग्दर्शित केले आहेत. त्याबद्दल काय वाटते? सध्याच्या हिंदी चित्रपटांत दाखविली जाणारी बंडखोर स्त्री ही तुम्ही साकारलेल्या रोझीची पुढची आवृत्ती आहे असे वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना वहिदा रहेमान म्हणाल्या की, गाईड चित्रपट १९६५ रोजी झळकला. म्हणजे त्या घटनेला आता ५२ वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षांपूर्वी बनविलेल्या गाईडची कथा त्या काळाच्या मानाने खूपच प्रागतिक व पुरोगामी होती. गाईडमधील नायिका रोझी आपल्या पतीला सोडते. साऱ्या बंधनातून मुक्त होते. राजू गाईडबरोबर राहायला लागते. रोझीमध्ये होत असलेले हे परिवर्तन बघताना ते कुठेही सवंग वाटत नाही. याचे श्रेय सर्वस्वी दिग्दर्शकाला द्यायला हवे. आज फिर जिने की तमन्ना है हे गाईडमध्ये रोझीच्या तोंडी असलेले गाणे हे भारतीय चित्रपटातील पहिले फेमिनिस्ट गाणे आहे. रोझी ज्यावेळी पडद्यावर आली तेव्हा समाजात इतकी मोकळीक नव्हती. आजच्या चित्रपटांमधील नायिका खूपच बोल्ड आहे. ती काळानूसार जाणारी आहे. मला आज सिनेमात दिसणारी स्वत्वाची जाणीव असलेली नायिका ही गाईडच्या रोझीचेच नेक्स्ट व्हर्जन वाटते.
माझा गाईड हा सर्वात आवडता चित्रपट आहे. मी देव आनंद यांच्याबरोबर सहा तर दिलीपकुमार यांच्या बरोबर चार चित्रपट केले. तसेच सुनील दत्त, मनोजकुमार, अमिताभ बच्चन अशा आणखी नायकांबरोबरही मी कामे केली आहेत. पण सर्वात आवडते नायक विचाराल तर मला देव आनंद जास्त आवडतात. राज कपूर हे अभिनेत्यापेक्षा दिग्दर्शक म्हणून अधिक श्रेष्ठ होते. दिलीपकुमार हे अभिनेते म्हणून लाजवाबच व सर्वश्रेष्ठच आहेत असेही वहिदा रहेमान यांनी `दिव्य मराठी'शी बोलताना पुढे सांगितले.
आरतीला वहिदा रहेमान यांनी आपले नाव उघड न करता केली वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत व आरतीवर मराठी चित्रपट बनावा म्हणून दिग्दर्शिकेला दिले प्रोत्साहन...
दिग्दर्शिका सारिका मेने हिचा सख्खा भाऊ सनी पवार व सनीची मैत्रिण आरती यांची वास्तव कथा आरती या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. २००६ सालची गोष्ट अाहे. आरती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे सहलीला गेली होती. ती ज्या गाडीतून प्रवास करत होती त्या गाडीला अपघात झाला. त्यात पुढच्या सीटवर बसलेल्या आरतीच्या मेंदूला मार लागला. ती बेशुद्ध झाली. त्यानंतर काही वेळ पुन्हा शुद्धीत आली. सनी व त्याच्या घरच्यांना आरतीच्या अपघाताबद्दल कळताच ते तातडीने भाईंदरला धावले. तिथे स्थानिक रुग्णालयात आरतीवर उपचार सुुरु असताना आरती परत कोमात गेली. तिला जसलोक रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे ती सहा महिने कोमात होती. त्यावेळी सनी पवार हा रात्रंदिवस तिच्यासोबत होता. आरतीची मनोभावे शुश्रूषा करुन मैत्रीचे नाते निभावत होता. ती कोमातून त्यानंतर बाहेर आली तेव्हा तिच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता. आरतीची अवस्था दोन वर्षांच्या बाळासारखी होती. अशा अवस्थेत ती सुमारे साडेतीन वर्ष जगली. त्या सर्व काळात सनी पवार तिच्या सोबत सावलीसारखा राहिला. आरतीवर उपचार चालू असताना तिच्या स्थितीबद्दल वृत्तवाहिन्यांवरुन वहिदा रहेमान यांना माहिती मिळाली. त्यांनी सनी पवारला दूरध्वनी करुन अारतीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त केली पण आपण कोण बोलतोय हे वहिदा रहेमान यांनी सनी पवार कधीही कळू दिले नाही. वहिदा रहेमान यांच्याकडून नियमितपणे आरतीवरील उपचारांसाठी विशिष्ट आर्थिक मदत मिळत होती. आरतीचे निधन झाल्यानंतर वहिदा यांना खूपच वाईट वाटले. त्यांनी ज्यावेळी गरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी मिनिम ही संस्था सुरु केली त्यावेळी त्यांनी आवर्जून सनी पवारला मदतीसाठी आपल्या सोबत घेतले. सनी पवार व आरती यांच्यावर आरती हा मराठी चित्रपट बनविण्यास वहिदा रहेमान यांनीच दिग्दर्शिका सारिका मेने हिला प्रोत्साहन दिले.