Thursday, March 6, 2014

अस्थिरतेचा काळ आत्मपरीक्षणाचा ...



दै. दिव्य मराठीच्या ५ जानेवारी २०१२च्या अंकामध्ये मी लिहिलेला लेख व त्याची लिंक.
---------------------------------------------
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/solapur/260/05012013/0/4/
-------
अस्थिरतेचा काळ आत्मपरीक्षणाचा ...
-----
- समीर परांजपे
-------
माहिती-तंत्रज्ञानाच्या (आयटी) क्षेत्रामध्ये भारतीय तज्ज्ञांनी जागतिक स्तरावर आजवर नेत्रदीपक भरारी घेतली आहे. मात्र, 2008 मध्ये अमेरिकेमध्ये आलेल्या आर्थिक मंदीनंतर त्या देशातून आयटीसंदर्भातील कामाचे जे अन्य देशांत आऊटसोर्सिंग होते त्याला चाप लावला जावा, असा विचार तेथे बळावत चालला होता. आयटी क्षेत्रातील संशोधनविषयक फळ आकाश टॅब्लेट 3 च्या रूपाने देशवासीयांना मिळणार आहे. केंद्र सरकारने स्वस्त दरात देऊ केलेल्या आकाश टॅब्लेटची तिसरी आवृत्ती तयार करण्यासाठी मुंबईच्या आयआयटीमधील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा गट अहोरात्र संशोधनात गढून गेला आहे. आपल्या हृदयाच्या ठोक्यांचे मापन करण्याची यंत्रणा, वेब-कॅम, मातृभाषेतील पाठय़पुस्तकातील धडे ऑडिओ नोट्ससह ऐकण्याची सोय, सीमकार्ड स्लॉट या सार्‍या सुविधा आकाश-3 मध्ये असणार असून या प्रकारातील 50 लाख टॅब्लेट तयार करण्यात येतील. या टॅब्लेटमध्ये लिनक्स, अँड्रॉइड दोन्ही कार्यप्रणालीच्या सुविधा उपलब्ध असतील. देशातील विद्यार्थ्यांना बहुपयोगी ठरेल असा आकाश 3 टॅब्लेट असेल. भारतीय संगणकतज्ज्ञ हे प्रगतीचे पुढचे पाऊल टाकत असतानाच देशातील संगणक क्षेत्रातल्या कंपन्यांची विद्यमान स्थिती कशी आहे, नव्या वर्षात म्हणजे 2013 मध्ये भारतीय संगणक क्षेत्रातील कंपन्यांसमोर नेमकी कोणती आव्हाने असतील याचाही विचार होणे गरजेचे आहे.
संगणक क्षेत्रातील धुरिणांच्या मते, यंदाचे वर्ष हे भारतीय आयटी कंपन्यांसाठी आव्हानात्मक व काहीसे अस्थिरतेचे सावट असलेले असेल. मात्र, ही परिस्थिती ही सुसंधी मानून या काळात सदर कंपन्यांनी आपली स्पर्धाक्षमता, कौशल्य वाढवण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक केली पाहिजे. अस्थिरतेचा काळ हा आत्मपरीक्षणासाठी अधिक उपयोगी ठरतो. भारतीय आयटी कंपन्यांना आपली धोरणे, विकासाची गती, स्पर्धाक्षमता या गोष्टींचा या काळात शांतपणे विचार करता येईल व त्यानुसार स्वत:ला हितावह असणारे बदल कंपनीच्या धोरणात करता येतील. जागतिकीकरण व आंतरराष्ट्रीय व्यापार यातील सध्याचा कल लक्षात घेता संगणक क्षेत्रातील विकासाची गतीही काहीशी मंदावली आहे. त्या परिणामापासून भारतीय आयटी क्षेत्राला वेगळे काढता येणार नाही. भारतीय संगणक क्षेत्रातून गेल्या वर्षी झालेल्या निर्यातीचे प्रमाण 16 टक्के इतके होते. यंदाच्या वर्षी हेच प्रमाण 11 टक्क्यांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता विदेशांमध्ये आपल्या उत्पादनांची निर्यात आणखी कशी वाढेल, याबरोबरच इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीमध्ये योग्य गुंतवणूक करणे, आपल्याकडील संगणकतज्ज्ञांच्या गुणवत्तेत वाढ करणे या बाबींकडेही भारतीय आयटी कंपन्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया वेगाने होण्यासाठी आयटी उत्पादनाशी निगडित करांमध्ये काही सवलती देणे, छोट्या स्वरूपाच्या कंपन्यांना प्रोत्साहन देणे, अशा गोष्टी केंद्र सरकारने करणे आवश्यक आहे. आरोग्यसुविधा व विमा या दोन क्षेत्रांमध्ये आयटीशी संबंधित ज्या सेवा लागतात त्यांच्या विस्ताराला भारतामध्ये तसेच विदेशातही मोठी संधी आहे. भारतीय कंपन्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. देशातील पायाभूत सुविधांची कमतरता हादेखील आयटी कंपन्यांना भेडसावणारा एक प्रश्न आहे. आंध्र प्रदेशचे उदाहरण घेतले तर असे लक्षात येईल की, तिथे असणार्‍या वीजटंचाईने हैदराबादमधील आयटी कंपन्यांना जेरीला आणले आहे. त्याचप्रमाणे या शहराला जोडणार्‍या रस्त्यांचे जाळे अधिक विस्तारले जाणे व मजबूत करणे आवश्यक आहे. दळणवळणाच्या सोयी उत्तम असतील तर औद्योगिक विकासाला वेगाने चालना मिळते हे विकाससूत्र आहे. मात्र, अशा अनेक अडचणी असूनदेखील आंध्र प्रदेशमधील आयटी व आयटीइएस (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इनेबल्ड सर्व्हिसेस) क्षेत्राने गेल्या वर्षी तब्बल 53,206 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल केली. उलाढालीचा 50 हजार कोटी रुपयांचा पल्ला या राज्यातील कंपन्यांनी पहिल्यांदाच ओलांडला आहे. भारतीय आयटी क्षेत्रातून होणार्‍या निर्यातीत आंध्र प्रदेशचा वाटा 12 टक्के आहे व दशातील अशा प्रकारच्या निर्यातीत अग्रेसर असलेल्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेशचा चौथा क्रमांक लागतो. ही आकडेवारी लक्षात घेता हे दिसून येते की, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिच्यावर मात करून भारतीय आयटी तज्ज्ञ व कंपन्या प्रगती साध्य करू शकतात. फक्त या प्रगतीचा वेग वाढावा यासाठी केंद्र सरकारनेही मदतीचा हात देण्याची गरज आहे.
देशामध्ये सरकारी प्रशासकीय यंत्रणा तसेच लघु स्वरूपाच्या कंपन्यांमध्ये कार्यक्षम व जलद कारभारासाठी आपल्या सेवांचे संगणकीकरण करण्याचे सत्र गेल्या काही वर्षांपासून जलदगतीने सुरू झाले आहे. साहजिकच भारतीय कंपन्यांना देशांतर्गत व्यवसायाच्या अनेक संधी खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रातील देशांतर्गत उलाढाल यंदाच्या वर्षी 13 ते 14 टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल. मात्र, 2011-12 मध्ये हीच देशांतर्गत उलाढाल 17 टक्के (रकमेच्या स्वरूपात - 91800 कोटी रुपये) व 2010-11 मध्ये 78600 कोटी रुपये इतकी होती. यंदाच्या वर्षीही संगणक कंपन्यांचा प्रगतीचा वेग हा मंदावलेलाच राहणार हे यातून दिसून येते. गेल्या वर्षी आर्थिक उलाढालीचा आढावा घेतला तर इन्फोसिस, विप्रोला सोसाव्या लागलेल्या आर्थिक नुकसानीचे प्रमाण इतर भारतीय आयटी कंपन्यांच्या तुलनेत जास्त होते. टीसीएससारख्या काही कंपन्यांना तुलनेने कमी तडाखे बसले. टीसीएसने गेल्या वर्षी 10 अब्ज डॉलरहून अधिक महसुली उत्पन्न मिळवले. ही स्थिती पाहता विदेशात व्यवसायाच्या वाढीव संधी शोधण्यासाठी भारतीय आयटी कंपन्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याबाबत त्यांना अनेक परदेशी आयटी कंपन्यांशीही स्पर्धा करावी लागेल. विदेशी व भारतीय आयटी कंपन्यांचे थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून साकारले जाणारे प्रकल्प व त्यातून निर्माण होणारा महसूल ही गोष्टही भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपकारक ठरणार आहे. 100 अब्ज डॉलर इतकी भांडवली गुंतवणूक असलेल्या भारतीय आयटी उद्योगामध्ये संशोधन व विकास या पैलूंवर अधिक केंद्रित करावे लागणार आहे. जागतिक बाजारपेठेत तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर नवनव्या सॉफ्टवेअरची गरज लागत असते. अशी सॉफ्टवेअर, त्याचप्रमाणे संगणक व त्याच्याशी संलग्न नवनवी उपकरणे विकसित करून त्याद्वारे जागतिक बाजारपेठेत वर्चस्व निर्माण करणे, यासाठी भारतीय कंपन्यांनी कंबर कसून कामाला लागणे आवश्यक आहे.
sameer.p@dainikbhaskargroup.com

-------------

No comments:

Post a Comment