Tuesday, March 11, 2014

व्यवस्थापनातील त्रुटींचे बळी! ( दै. दिव्य मराठी - १६ फेब्रुवारी २०१३)


महाकुंभमेळ्यांसारख्या धार्मिक यात्रांमध्ये गर्दीचे व्यवस्थापन फसल्याने १० फेब्रुवारी २०१३ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये चेंगराचेंगरी होऊन काही माणसे मरण पावली होती. त्या पार्श्वभूमीवर मी दै. दिव्य मराठीच्या १६ फेब्रुवारी २०१३च्या अंकात लिहिलेल्या लेखाची लिंक व जेपीजी फाईल.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-victims-of-leakages-in-management-4181251-NOR.html
----------
व्यवस्थापनातील त्रुटींचे बळी!
--------
समीर परांजपे
-------------
उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे दर 12 वर्षांनी भरणा-या महाकुंभमेळ्याचे अत्यंत चोख व्यवस्थापन केले जाते, या उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या दाव्याच्या चिंधड्या उडवणारी दुर्घटना गेल्या 10 फेब्रुवारी रोजी घडली. अलाहाबाद रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वरील पुलावर महाकुंभमेळ्याहून परत निघालेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन 36 हून अधिक लोक मरण पावले. ही घटना अलाहाबाद येथे भरलेल्या कुंभमेळा क्षेत्राच्या बाहेर घडली असली तरी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कुंभमेळा उत्सव आयोजन विभागाची सूत्रे त्यांच्याकडे होती.या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी 1 लाख रुपये भरपाई देण्याची तातडीने घोषणा करण्यात आली. अलाहाबाद महाकुंभमेळ्याहून परतणा-या भाविकांनी मोठ्या संख्येने अलाहाबाद रेल्वे स्थानकात गर्दी केली. लोकांची ही संख्या इतकी प्रचंड वाढली, की तिच्यावर नियंत्रण ठेवणारी सक्षम यंत्रणा रेल्वे प्रशासनापाशी नव्हती. परिणामी त्यातून चेंगराचेंगरीची दुर्घटना होऊन अनेक निरपराध नाहक बळी पडले, असा दावाही उत्तर प्रदेश सरकारने केला आहे. असे दावे- प्रतिदावे सुरू असले तरी देशामध्ये धार्मिक सोहळ्यांत घडणा-या चेंगराचेंगरीच्या घटना व त्यातून होणारी मोठी प्राणहानी यांची मालिका काही संपायला तयार नाही.
महाकुंभमेळ्याच्या सहा ते सात आठवड्यांत सुमारे 100 दशलक्ष भाविक अलाहाबाद येथे भेट देतील. ही भाविकसंख्या जगातील काही देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा निश्चितच अधिक आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती व्यवस्थित राखण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांकडून केला जातो. त्यात ते ब-याच प्रमाणात यशस्वी होतात. महाकुंभमेळ्याच्या आयोजन व्यवस्थापनाची तुलना अमेरिकेतील न्यूयॉर्क जवळच्या बेथेल येथे पार पडणा-या वुडस्टॉक म्युझिक अँड फेअरशी करता येईल. 1969मध्ये 15 ते 18 ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या या कार्यक्रमात सुमारे 5 लाख लोक सहभागी झाले होते. गेली अनेक वर्षे होत असलेल्या वुडस्टॉक म्युझिक अँड फेअरसाठी सुमारे 600 एकराच्या जमिनीवर तात्पुरत्या स्वरूपाच्या सोयी निर्माण केल्या जातात. एक शहरच तात्पुरते उभारले जाते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाकुंभमेळ्यासाठीही अगदी याच व्यवस्थापनशैलीत काम करण्यात येत असते.
अमेरिकेच्या उत्तर नेवाडा येथील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे दरवर्षी आठवडाभराचा बर्निंग मॅन फेस्टिवल आयोजिला जातो. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हा उत्सव सुरू होऊन त्याची सांगता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होते. या उत्सवाला 2010मध्ये 51,515 तर 2011मध्ये 50 हजार व 2012मध्ये सुमारे 60 हजार लोकांनी हजेरी लावली होती. त्याकरता विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. महाकुंभमेळ्याच्या तुलनेत बर्निंग मॅन फेस्टिवल तसेच वुडस्टॉक म्युझिक अँड फेअर यांचे स्वरूप लहान असले तरी त्यांच्या यशस्वी व्यवस्थापनातून महाकुंभमेळ्याच्या आयोजकांना काही धडे निश्चितच घेता येतील.
महाकुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाचा विचार करताना सौदी अरेबियात मक्का-मदिना येथे दरवर्षी आयोजण्यात येणा-या हज यात्रेचे उदाहरण डोळ्यासमोर तरळून जाते. 2012मध्ये हज यात्रेत सुमारे 4 दशलक्ष भाविक सहभागी झाले होते. या यात्रेत नोंदणी न केलेले अनेक भाविकही सहभागी झाले असल्याने भाविकांचा एकूण आकडा इतका मोठा झाला होता. त्यातून निर्माण झालेल्या समस्यांचा सामना हज आयोजन समितीला करावा लागला होता. हज यात्रेच्या सुरक्षेसाठी 2012मध्ये 1 लाख 20 हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे 10 हजार वाहने, 25 सिव्हिल डिफेन्स हेलिकॉप्टर्स, 20 पब्लिक सिक्युरिटी हेलिकॉप्टर्स तैनात केली होती. त्याचप्रमाणे 30 हजार टेहळणी कॅमेरे लावण्यात आले होते. हज यात्रेमध्ये चेंगराचेंगरी होऊ नये; तसेच अपघात टाळावेत, यासाठी तेथे अनेक सुविधा उपलब्ध करण्याकरता सौदी अरेबियाने गेल्या काही वर्षांत अब्जावधी डॉलर खर्च केले आहेत. हज यात्रेकरूंच्या कोट्याच्या संख्येत वाढ करावी, अशी 40 देशांनी केलेली विनंती सौदी अरेबियाने फेटाळून लावली होती. त्यासाठी हज यात्रेकरूंच्या सुरक्षेचे कारण देण्यात आले. पाकिस्तान, मलेशिया, तुर्कस्थान, इंडोनेशिया, नायजेरिया यासारख्या देशांमध्ये हज यात्रेला जाणा-या भाविकांसाठी अधिकाधिक सवलती देण्याचे धोरण तेथील सरकारांनी अवलंबले आहे. त्याचे श्रेय उपटण्यासाठी या देशांतील राजकारण्यांमध्ये स्पर्धा चालते. हज यात्रेसारख्या पवित्र कार्यामध्ये विविध देशांतून होणारा सरकारी व राजकीय हस्तक्षेप थांबल्यास या यात्रेचे अधिक उत्तम प्रकारे व्यवस्थापन करता येऊ शकेल, असे मत सौदी अरेबियाने व्यक्त केले आहे. नेमकी हीच गोष्ट महाकुंभमेळ्याच्या आयोजन व व्यवस्थापनाबाबत लागू होत नाही का?
व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर बॅसिलिकाच्या सेंट्रल बाल्कनीत येऊन पोप हे दरवर्षी नाताळनिमित्त संदेश देतात. त्याला ख्रिसमस इव्ह मास असे म्हणतात. याप्रसंगी हजारो लोक तिथे उपस्थित असतात. व्हॅटिकन सिटीतील सेंट बॅसिलिका व सेंट पीटर चौकामध्ये पोपच्या उपस्थितीत जे मास होतात, त्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज असते. एखाद्या माससाठी किती लोक येणे अपेक्षित आहे, त्यानुसार त्या कार्यक्रमाची जागा ठरवण्यात येते. सेंट पीटर बॅसिलिकामध्ये 15 हजार लोक मावू शकतात. त्यापेक्षा जास्त लोक येणे अपेक्षित असेल तर असे मासेस सेंट पीटर्स चौकात आयोजले जातात. व्हॅटिकन सिटीमध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टरद्वारे लोकांची तपासणी केली जाते.
कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे मासप्रसंगी पोपचे आगमन, त्यानंतरचा अभूतपूर्व सोहळा, सगळे कसे अतिशय शिस्तीत चालते. या कार्यक्रमात त्रुटी जरूर असतील; परंतु शिस्तीचा अभाव कुठेही दिसत नाही. जगभरातील ख्रिश्चन धर्मीयांसाठी परमोच्च आदराचे स्थान असलेले विद्यमान पोप बेनेडिक्ट सोळावे हे पोपपदाचा राजीनामा येत्या 28 फेब्रुवारीला देतील. त्यानंतर निवडण्यात येणारे नवे पोप, व्हॅटिकन सिटीमध्ये होणारा त्यांच्या प्रथमदर्शनाचा सोहळा हेदेखील कसे सुनियोजित आखणीनुसार पार पडते, याचा प्रत्यय लवकरच सर्वांना येईल.
प्रचंड गर्दी असणा-या या देशोदेशांतील कार्यक्रमांच्या व्यवस्थापनावर नजर टाकल्यानंतर आता पुन्हा महाकुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेकडे वळू. या महाकुंभमेळ्याचे उत्तम व्यवस्थापन व नियोजन केल्याचे श्रेय घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव पुढे सरसावले होते. मात्र, 10 फेब्रुवारीच्या चेंगराचेंगरीच्या घटनेने त्यांना चार पावले मागे जावे लागले आहे. महाकुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणा-या तात्पुरत्या शहरासाठी अनेक सोयी पुरवाव्या लागतात. महाकुंभमेळ्यात येणा-या लोकांसाठी 80 दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी पुरवावे लागते. त्याचप्रमाणे 25 हजार टन तांदूळ, 35 हजार शौचालये, 100 खाटांची सुविधा असलेली रुग्णालये, लघुस्वरूपाची 12 आरोग्य केंद्रे इत्यादी सोयीसुविधा पुरवाव्या लागतात.
महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी विकण्यात येणारे धान्य हे दारिद्र्यरेषेखालील लोकांना देण्यात येणा-या किमतीत विकण्यात येते. इतकी सारी व्यवस्था असूनसुद्धा व्यवस्थापनात काही त्रुटी राहून जातात. 10 फेब्रुवारी रोजी चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू ओढवला. ती घटना जेथे घडली ते अलाहाबाद रेल्वेस्थानक कुंभमेळ्याच्या कार्यकक्षेत नाही. महाकुंभमेळ्याहून घरी परतण्यासाठी निघालेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने त्या दिवशी 150 गाड्या सोडण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र 75 गाड्याच सोडण्यात आल्या.
त्यामुळे अलाहाबाद रेल्वेस्थानकांच्या फलाटांवर प्रचंड गर्दी झाली होती. जिथे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली त्या ओव्हरब्रिजवर सुमारे 6 हजार लोक गर्दीत अडकले होते. त्यातच गर्दीला हटवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी लाठीमार केला. त्याने अधिकच गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली व त्यात 36 हून अधिक जण मरण पावले. गर्दीला नीटपणे न हाताळल्यानेच ही दुर्घटना घडली. महाकुंभमेळ्यातील गर्दीचे नियोजन, शहरी गुंतागुंत, मेट्रोपोलिटन बिहेविअर यांचा अभ्यास करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे एक पथक अलाहाबादला आले आहे. महाकुंभमेळ्यासाठी तात्पुरत्या उभारलेल्या शहराचे व्यवस्थापन करताना प्रशासनाकडून राहून जाणा-या त्रुटींचाही अभ्यास हे शास्त्रज्ञ करणार आहेत. या अभ्यासाचे निष्कर्ष महाकुंभमेळाच नव्हे तर अशाच प्रचंड गर्दीच्या कार्यक्रमांच्या आयोजनातील व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरू शकतात.
sameer.p@danikbhaskargroup.com

No comments:

Post a Comment