Wednesday, May 25, 2016

दिल्लीतील पाव व ब्रेडमध्ये कर्करोगकारक घटक असल्याचा आक्षेप सीएसई या संस्थेने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीच्या दि. २५ मे २०१६च्या अंकात मी लिहिलेल्या लेखाची ही फाइल



दिल्लीतील पाव व ब्रेडमध्ये कर्करोगकारक घटक असल्याचा आक्षेप सीएसई या संस्थेने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीच्या दि. २५ मे २०१६च्या अंकात मी लिहिलेल्या लेखाची ही फाइल व मुळ लेखाचा मजकूर व वेब पेज लिंक.
----
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/25052016/0/6/
---
दर्जा ठरविण्याची आलेली `सुसंधी'
---
दिल्लीतील ब्रेड व पावाच्या नमुन्यांमध्ये कर्करोगकारक रसायने सापडल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेन्ट (सीएसई) या स्वयंसेवी संस्थेने एका पाहाणीतून काढल्यामुळे खळबळ माजणे स्वाभाविकच आहे. केएफसी, डॉमिनोज, स्लाइस ऑफ इटली, हार्वेस्ट गोल्ड, ब्रिटानिया, पिझ्झाहट, मॅकडोनाल्डसह एकुण ३८ कंपन्यांच्या पाव, बन, ब्रेड यांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक पॅकबंद पावांमध्ये पॉटॅशियम आयोडेट, पोटॅशियम ब्रोमेट ही कर्करोगकारक रसायने सापडली या सीएसइने केलेल्या दाव्याची केंद्रीय आरोग्य खाते सर्वंकष चौकशी करणार आहे. त्यातून जे निष्कर्ष सरकारच्या हाती येतील ते त्वरित जनतेच्या माहितीसाठी जाहीर झाले पाहिजेत. सीएसईने आक्षेप घेतलेल्या पाव, ब्रेडच्या उत्पादनांमधील अनेक ब्रँड हे बहुराष्ट्रीय आहेत. त्यांच्या उत्पादनांविरुद्ध सीएसईने केलेला दावा जर खरा ठरला तर या कंपन्यांविरोधात भारतामध्ये वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मात्र या दाव्यात फारसे तथ्य न आढळल्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नजरेत भारताबद्दलची प्रतिमा अजून खालावण्याची शक्यता आहे. सीएसईने ज्यांच्या उत्पादनांवर आक्षेप घेतला आहे त्यांत देशी उत्पादकही अाहेत. त्यांच्यावरील आक्षेप खोटे ठरले तर, तेही सरकारला घरचा आहेर देऊ शकतात. नेस्टले कंपनी बनवत असलेल्या मॅगी नूडल्सबाबत केंद्र सरकार व विविध राज्ये कशी तोंडावर आपटली होती हा इतिहास तर ताजा आहे. मॅगीच्या नूडल्सच्या उत्पादनात शिसे व अन्य घटकांचे मानवी आरोग्यास अपायकारक ठरु शकेल इतके प्रमाण असल्याचा दावा उत्तर प्रदेशच्या अन्न व औषधी नियंत्रण प्राधिकरणाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मॅगी नूडल्सची दोन लाख पाकिटे विक्रीप्रक्रियेतून माघारी बोलावण्याचा आदेश नूडल्स कंपनीला या प्राधिकरणाने दिला होता. त्यानंतर मॅगी नूडल्सच्या विरोधात जे वादळ उठले त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरले. विदेशी कंपन्यांची नूडल्स कशी विषारी असतात असा प्रचार करत एका अध्यात्मिक बाबाने आपली स्वदेशी नूडल्स बाजारात आणली. मॅगी नूडल्सच्या वादात दिल्ली, उत्तर प्रदेशपासून विविध प्रयोगशाळांचे अहवाल हे काही वेळेस परस्परभिन्न आल्याने आपल्याकडे वस्तुंच्या दर्जा ठरवण्याबाबत समान धोरण नसल्याचेही लक्षात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी नूडल्सवरील िवक्री बंदी हटविल्यानंतर या उत्पादनाच्या विक्रीमध्ये भारतात आणखी वाढ झाली. याचा अर्थ स्पष्ट होता की, मॅगीच्या विरोधात काही संस्था किंवा प्रयोगशाळांनी घेतलेले आक्षेप सामान्य जनतेने फारसे मनावर घेतले नव्हते इतका या ब्रँडच्या दर्जाबाबत तिच्या मनात विश्वास निर्माण झालेला आहे. भारतात सध्या वातावरण असे आहे की, कोणतीही व्यक्ती, संस्था उठते व नावडत्या उत्पादनांच्या दर्जाबाबत आक्षेप घेते. भारतात विकल्या जाणाऱ्या स्वदेशी व विदेशी ब्रँडच्या सर्व लहानमोठ्या वस्तू, खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जी मानके आहेत ती आपल्या देशातही अत्यंत काटेकोरपणे पाळली जातील याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. किंवा अशी मानके स्वत: तयार केली पाहिजेत की ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मि‌‌‌ळेल. पण यापैकी फारसे काही करण्यास केंद्र सरकार उत्सुक नसल्याने व राज्य सरकारेही आंधळेपणाने निर्णय घेत असल्याने मॅगी प्रकरणात जी नाचक्की झाली त्याचीच पुनरावृत्ती ब्रेड, पाव यांच्या दर्जाबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत त्याबाबतही होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. पिठावर प्रक्रिया करण्यासाठी पोटॅशियम आयोडेट तर पाव लुसलुशीत करण्यासाठी पोटॅशियम ब्रोमेट वापरले जाते. या दोघांच्याही वापरावर जगातील अनेक देशांत बंदी आहे. हे घटक आपण पाव बनवताना वापरत असल्याचा दावा मॅकडोनाल्ड, ब्रिटानिया आदी उत्पादकांनी केला आहे. मॅगीच्या प्रकरणात तोंडघशी आपटलेली भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएअाय) ही केंद्र सरकारची संस्था पाव, ब्रेड उत्पादनांबाबत सीएसइने घेतलेल्या आक्षेपांबाबत नेमकी काय भूमिका घेते हेही महत्वाचे ठरणार आहे. पाव, ब्रेड यांच्याबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची मानके निश्चित करण्याची मोठी संधी सरकार व एफएसएसएआयकडे चालून आली आहे. या दोघांनीही ही संधी वाया दडवू नये.

Monday, May 2, 2016

१ मे २०१६ रोजी दै. दिव्य मराठीच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा लेख - सफाईदूत



१ मे २०१६ रोजी दै. दिव्य मराठीच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा लेख - सफाईदूत
----------
१ मे २०१६ रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिन होता. त्यानिमित्त दै. दिव्य मराठीच्या रसिक या रविवार पुरवणीत १ मे २०१६ रोजी मी सफाई कामगारांच्या स्थितीबद्दल एक रिपोर्ताज लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाइल, तो लेख प्रसिद्ध झालेल्या पानाची तसेच लेखाच्या मजकुराची लिंक पुढे दिली आहे तसेच सविस्तर लेखही....
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-samir-paranjape-about…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/01052016/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/01052016/0/6/
----
सफाईदूत
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
आनंद व्यक्त व्हावा, पण प्रसंगावधान राखून... या माफक अपेक्षेला "रसिक’च्या संवेदनशील वाचकांचा आक्षेप असू नये. तसा तो असणारही नाही, याची खात्री आहे. याच विश्वासाच्या बळावर यंदाचा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा प्रयत्न आहे. एरवी, ढोल-ताशे बडवून, इतिहासाचे गोडवे गाऊन, रोशणाई आणि आतशबाजी करून दिवस साजरा करता येतो, पण यंदाच्या महाराष्ट्र दिनाला किनार आहे ती, मराठवाडा-विदर्भातल्या भीषण दुष्काळाची आणि कामगार दिनाला संदर्भ आहे तो, वर्षागणिक बेदखल होत चाललेल्या संघटित-असंघटित श्रमिकांचा. याच श्रमिकांमधला सर्वात तळाचा, दर दिवशी जीव धोक्यात घालून शहर-गाव स्वच्छ ठेवणाऱ्यांचा वर्ग आहे, सफाई कामगारांचा. आज प्रातिनिधिक स्वरूपात त्याची दखल घेणे, हे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे आहे. या घटकेला दुष्काळी भागातून उद्याच्या आशेवर शहरांकडे स्थलांतर करणाऱ्या चिंताग्रस्त कुटुंबांची संख्या वाढतेच आहे. महाराष्ट्र दिनाचा आनंद साजरा करताना त्यांच्या कष्टप्रद जगण्याची दखल घेणे, हे सहवेदना जपणे आहेे...
वेळ पहाटे साडेपाचची. रेल्वे स्थानकातून कांदिवली पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर थोडे उजवीकडे वळून कोणा बजाजांचे नाव दिलेली महानगरपालिकेची शाळा. शाळेच्या पुढे एक अरुंद गल्ली. तिथे मुंबई महानगरपालिकेच्या किमान १० ते १२ कचरागाड्या जणू एका शिस्तीत उभ्या. म्हणजे एकदम चिडीचूप उभ्या.
ती चिडीचूप शांतता चिरत गाड्यांच्या दिशेने निघालो. तिथे सुमारे पन्नास एक कामगारांचा घोळका उभा होता. त्यांच्या मधोमध उभा राहून एक जण काहीतरी भाषण केल्यासारखे त्वेषाने बोलत होता. घोळक्याच्या जवळ गेलो. विचारले, अालमुत्तु आहे का? ज्याला विचारले, त्याची नजर माझ्याकडून त्या भाषण करणाऱ्याकडे गेली. तसा निरोपही गेला. आलमुत्तु आमच्या दिशेने आला. येतायेताच आलमुत्तु म्हणाला, ‘मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांपैकी मोटरलोडिंगच्या हंगामी कामगारांनी अाता अचानक काही तासांचा संप सुरू केला आहे.’
आलमुत्तु सांगत होता, ‘मुंबई महानगरपालिकेच्या कायमसेवेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांचे हाल कुत्रा खात नाही. वर्षातील २४० दिवस जर एखाद्याने काम केले तर त्याला त्या नोकरीत कायम करणे, कायद्याने बंधनकारक आहे. कायद्यातील याच पळवाटेचा फायदा घेत महापालिका हंगामी कामगाराला वर्षभरात २१० दिवस काम देते आणि त्याला कायम हंगामीच ठेवते. आता आता कुठे हंगामी सफाई कामगाराला दर दिवसाची ३५० ते ६०० रुपये मजुरी मिळू लागली आहे. २००४मध्ये मी याच खात्यात हंगामी म्हणून लागलो, तेव्हा दिवसाची ५० रुपये मजुरी मिळायची. आता ती वाढली असली तरी प्रत्यक्ष हंगामी कामगाराच्या हातात किती पैसे पडतात? मधला कंत्राटदार आणि महापालिकेतील अधिकारी पैसे खातो.
आलमुत्तू तामीळ. त्याचे आईवडील तामीळनाडूचे. मात्र त्याचा जन्म मुंबईतील मालवणीतला. तो मुंबईतून तामीळनाडूला शिकण्यासाठी गेला. तेथील त्याची शिक्षणकमाई म्हणजे दहावीत येऊन नापास. या बळावर तो महानगरपालिकेत २००४मध्ये हंगामी सफाई कामगार म्हणून लागला. आलमुत्तू हा कामगार नेते मिलिंद रानडे यांच्या ‘कचरा वाहतूक श्रमिक संघा’चा पहिल्यापासून सदस्य. चळवळ्या व अस्वस्थ. त्यामुळे कांदिवली भागातील हंगामी सफाई कर्मचाऱ्यांचे पुढारपण त्याच्याकडे आपसूकच आले. त्याला नाव विचारले, तर त्याने ठसक्यात पूर्ण नाव सांगितले, ‘आलमुुत्तू दुराईस्वामी हरिजन.’ हसून म्हणाला, हे ‘हरिजन’ नाव म. गांधींनी दिलेले. तामीळनाडूत आमच्या जातीला परायन म्हणतात. तामीळनाडूत आमच्या वाडवडिलांवर अन्याय झाले, म्हणून मुंबईसारख्या शहरांत आलो; पण कचरा, सफाई कामाची साथसंगत काही सुटली नाही. त्याच बरोबर हंगामी कामगार म्हणून होणारी पिळवणूकही टळली नाही. पूर्वी जातीच्या नावावर छळले जायचे, आता पदाच्या आधारे तेच होतेय...’
मुंबई महानगरपालिकेच्या सफाई खात्यात जे हंगामी कामगार आहेत त्यांना हक्कांच्या सुट्ट्यांचे पैसे, वेतनात मिळालेली वाढ, अशा तीन-चार गोष्टींचे पैसे गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेलेच नाहीत. ही रक्कम पालिकेने मंजूर केलेली असली तरी ती त्यांना द्यायची असते, कंत्राटदारांनी. मुंबईतील इतर महापालिका वॉर्डांंमध्ये उशिरा का होईना कंत्राटदारांनी कुंथत कुंथत ही रक्कम हंगामी कामगारांना नुकतेच देणे सुरू केले होते. पण कांदिवली भागातील कंत्राटदार ती द्यायचेही नाव काढेना. त्यामुळेच संपाचे हत्यार कांदिवलीच्या कामगारांनी अचानक उपसले होते. नेमके या संघर्ष प्रतलाभोवती अचानक आम्ही जाऊन पोहोचले होतो.
या हंगामी सफाई कामगारांत एक चुणचुणीत कामगार होता. वय ३५ वर्षे. त्याचे नाव उमाकांत कदम (नाव बदलले आहे.) तो मूळचा रत्नागिरीचा. पण म्हणाला की, माझेही कोणी कोकणात नाही. गाव फक्त सांगायला आहे. माझाही जन्म मुंबईतलाच. दहावी झालो अाणि पालिका सफाई खात्यात कंत्राटदाराकडे हंगामी कामगार म्हणून लागलो. १५ वर्षं झाली आता.’ उमाकांत सांगत होता, ‘पालिकेमध्ये जे कायमसेवेतील सफाई कामगार आहेत, त्यांना आता किमान ३० हजारांपर्यंत वेतन आहे. त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेणाऱ्या, मरमर काम करणाऱ्या हंगामी कामगारांना मात्र ९ ते १२ हजार रुपयांपर्यंतच वेतन देऊन गप्प केले जाते? हा कसला न्याय आहे?’
“आम्ही मोटरलोडिंग करतो म्हणजे वाड्यावस्ती, सोसायट्यांमधून कचरा गोळा करून कचरा गाड्यांमध्ये भरतो. तो मग डंपिंग ग्राउंडला रवाना होतो. या कचऱ्यात फुटक्या काचांपासून ते प्रसंगी मानवी विष्ठेपर्यंत वाट्टेल ते असते. ही सगळी घाण मनावर साचवत काम करताना टीबी, त्वचारोग असे सगळे सगेसोयरेही आमच्याकडे वस्तीला येतात...लोकांना वाटते, गटारात उतरून घाण उपसणाऱ्यालाच रोग होतात. असे नाहीये... घाण कुठेही असो, उघड्यावर की जमिनीच्या पोटात, ती साफ करणाऱ्याच्या आरोग्याचे बारा वाजतातच. हंगामी कामगार आजारी पडला की, महापालिका कायमसेवेतील कर्मचाऱ्याला जशा सुविधा देते, त्या प्रमाणात आम्हाला सुविधा देत नाही. एखाद्याला उपचार झेपत नसतील तर तो तसाच धडपडत परवडेबल हॉस्पिटल धुंडा‌ळत राहतो...’ उमाकांत बोलतच होता. त्याला बोलताना अडवणे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे होते...
म्हणून एवढेच विचारले की, ‘चांगले बोलतोस... नेतृत्व का करत नाहीस संघटनेत...’ त्यावर दिवसा हंगामी सफाई कामगार आणि संध्याकाळी मुकादम म्हणून काम करणाऱ्या उमाकांतने दिलेले उत्तर काळीज चिरून गेले... म्हणाला, मी लिडरगिरी करायला लागलो तर मुकादमाचे काम पहिले हातातून जाईल.
आणि काम नीट करत नाही, अशी सबब दाखवून कंत्राटदार कधीही कामावरून काढून टाकेल. त्यासाठी तो कायदा नीट राबवतो... म्हणून मी लिडरगिरीत पडत नाही...’ हे सांगताना उमाकांत मिश्कील हसला... त्याच्या तोंडातला एक चांदीचा दात उठून दिसला.
बोलण्याची ही लांबण सुरू असतानाच आलमुत्तू आम्हाला सोडून पुन्हा कामगारांकडे वळला. ते मग घोळक्याने कांदिवली महानगरपालिका विभागीय कार्यालयात आपल्या मागण्यांसाठी चर्चा करण्याकरिता निघून गेले...
दिवस तोच. वेळ दुपारी दोन वाजताची. ठिकाण होते, कांदिवली पश्चिमेला असलेली शंकर गल्ली. तिथे नव्याने बांधलेल्या फुटपाथवरील गटारांची झाकणे उघडून काही हंगामी कामगार आतली घाण बाहेर काढत होते. गटारात डोकावून पाहिले, तर सगळा सुका कचरा होता...आलमुत्तूने माझी नजर ओळखली. म्हणाला, ‘पुढे चल.’ शंकर गल्लीत एक देऊळ आहे. तिथे रस्त्यावरली चार-पाच गटारे उघडून ठेवली होती. आत वाकून बघितले तर आजूबाजूच्या इमारतींमधून वाहून आलेला मैला गटारात पसरलेला. गटारे साफ करणाऱ्या कामगारांपर्यंत पोहोचलो. गटारात उतरलेला प्रत्येक कामगार उघडा होता. पायात काहीही नव्हते. हाफ चड्डीवर असलेला तो हातात फावडे घेऊन आतली घाण गटाराच्या टोकावर ठेवलेल्या घमेल्यात ओतत होता. त्याचा दुसरा साथीदार ते घमेले गटारीच्या बाजूला रिकामे करत होता. घाणीचे छोटे छोटे डोंगर साचत होते... तेवढ्यात गटाराच्या समोरच्या सोसायटीत राहणारी एक बाई कामगारांपाशी आली. म्हणाली, ‘ओ ती तुम्ही घाण बाहेर काढताय ना ती सोसायटीच्या थोडी पुढे नेऊन टाका... आम्हाला त्रास होतो याचा...’ हे ऐकताच गटारात काम करणारा तो कामगार तिला पटकन म्हणाला, ‘ही तुमच्या सोसायटीचीच घाण आहे...’ तशी ती बाई फणकाऱ्याने पुढे निघून गेली.
तो गटारात काम करणारा कामगार तसाच पुढे निर्विकारपणे काम करत राहिला. हातात हँडग्लोव्हज नव्हते, तोंडाला मास्क नव्हता, पायात गमबूट नव्हते. कारण कंत्राटदाराने या कामगारांना ते कधी दिलेलेच नाही. कंत्राटदार वर्षातून एकदाच त्यांना या ‘चैनीच्या’ वस्तू पुरवतो, असेही कळले. ऋतू बदलला की तुम्ही आम्ही लगेच कपड्यांचा पॅटर्नपण बदलतो. उन्हाळ्यात कॉटनचे कपडे, डोक्यावर टोपी, थंडी आली की कानटोपी, स्वेटर आणि पावसाळ्यात नानारंगी छत्री काय आणि विंडशिटर, रेनकोट असे बरेच काहीबाही घालतो आपण... गटारात काम करत असलेला तो कामगार पाहताना माझ्या डो‌ळ्यासमोर सगळे ऋतू झळकून गेले. हा इतका ‘निचले तपके का’ माणूस आहे का जगाच्या दृष्टीने, की याला ऊन, पाऊस, थंडी यापैकी कशाकशाचा म्हणून त्रास होत नाही? ज्या शहर, गावाने केलेली घाण हा नोकरी म्हणून का होईना साफ करतोय, त्याला त्या घाणीपासून वाचण्यासाठी संरक्षक साधने पालिकेने द्यायला नकोत? ती मिळतात की नाही याकडे दक्षतेने पाहणे, हे दक्ष लोकांच्या राजवटीत व्हायला नको? मोठमोठ्या विकासाच्या, तत्त्वाच्या उजव्या-डाव्या गप्पा मारतो, पण या देशात हजारो-लाखो सफाई कामगार जीवावर उदार होऊन रोज आपण केलेली घाण काढत असतात. आपण त्यांना माणूस म्हणून प्राथमिक सुविधाही देत नाही. विकासाच्या दिव्यदृष्टीत या सफाई कामगारांचे स्थान काय, हे सत्ताधारी कधी सांगत नाहीत, असे नाना तऱ्हेचे विचार येत होते मनात. माझ्यासमोरचा तो हंगामी कामगार मात्र निर्विकार होता. गटारात उतरून काम करत असल्याने त्याचे पाय घाणीने माखलेले होते. फक्त पायच का तर जवळजवळ सारे अंगच... घाणीमुळे गंधाशी जोडलेल्या संवेदना हरवलेला तो कामगार मध्येच आजूबाजूला नजर फिरवत होता. कारण घरातले सर्व बाहेर गेले होते म्हणून त्याने आज आपल्या मुलाला कामाच्या ठिकाणी सोबत आणले होते... आपला बाप काय काम करतोय, याकडे त्याच्या पोराचे लक्षही नव्हते. ते त्या गटाराच्या भोवती मस्त हुंदडत, खेळत होते. भूक लागली म्हणून मध्येच बॉनबॉर्न बिस्किटाचा पुडा घेऊन खात होते, गटाराला चकरा मारत होते...आपल्या भविष्याच्या परिघाभोवती ते पोर नकळत घुमत होते का? स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई असे ठळकपणे रंगविलेली एक भिंत आमच्या समोर होती. त्या भिंतीसमोरच पब्लिकने केलेल्या घाणीत हे वेगळे चित्रही उमटले होते...
मुंबईतील असो वा नागपूर-सोलापूरमधील असो, कायमसेवेतील असो वा हंगामी सफाई कामगार असो, त्यांच्या पगारात जो असायचा तो फरक असेल, पण घाणीच्या संपर्काची व त्यामुळे ओढवणाऱ्या आपत्तींची त्यांच्यावरील संकटतीव्रता मात्र एकच आहे. शेवटी, मनुष्यदेह हा कायम व हंगामी सेवा अशी काही फारकत आरोग्याबाबत करत नाही. कामगार दिन, महाराष्ट्र दिन एकाच दिवशी १ मे रोजी येतो. चांगले आहे. पण ज्यांच्या नावाने हा दिवस पाळला जातो, त्यांच्यावर वर्षभर अन्यायच होताना दिसतो आहे. ही अन्यायाची घाण हंगामी नव्हे तर कायमस्वरूपी साफ व्हायला हवी. अर्थात, घाण तर साफ व्हायलाच हवी; पण मनेही साफ व्हायला हवीत... कायमची...!