Tuesday, March 11, 2014

मुंबईतील किल्ल्यांचा रोचक इतिहास ( दैनिक दिव्य मराठी - १२ जून २०१२)

मुळात पुरातत्त्व शास्त्रज्ञ हे गुंफा, पुरातन मंदिरे व अन्य प्रार्थना स्थळे, वास्तू यांच्याकडे जास्त लक्ष देतात, पण किल्ल्यांकडे फारसे पाहात नाहीत, अशी ओरड नेहमी होत असते. या टीकेला छेद देत भा. वि. कुलकर्णी यांनी किल्ल्यांचा खास अभ्यास केला. व त्यातून मुंबई परिसरातील अर्थात एकेकाळच्या फिरंगाणातील किल्ले हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे परीक्षण मी दैनिक दिव्य मराठीच्या १२ जून २०१२च्या अंकात केले होते. त्या लेखाची ही लिंक.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-history-of-mumbai-forts-2182094.html
-------------------------
मुंबईतील किल्ल्यांचा रोचक इतिहास
------------------
- समीर परांजपे
------------
महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व खात्याचे उपसंचालक भा. वि. कुलकर्णी यांनी लिहिलेले ‘मुंबई परिसरातील अर्थात एकेकाळच्या फिरंगणातील किल्ले’ हे पुस्तक इतिहास संशोधन व लेखनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महाराष्ट्रात साडेतीनशेहून अधिक किल्ले आज अस्तित्वात आहेत. इतिहासकाळापासून युद्धांमध्ये जे किल्ले साफ नामशेष झाले त्यांची संख्याही अगदीच नगण्य नाही. नामशेष किल्ल्यांची मूळ ठिकाणे शोधणे हे खूप किचकट काम असते. त्यात संशोधकाचा कस लागतो. भा. वि. कुलकर्णी यांनी लिहिलेले पुस्तक हे ‘स्थानीय इतिहास’ प्रकारात मोडते. अनेक कथा, दंतकथा, गाणी तसेच अस्सल ऐतिहासिक पुरावे, कागदपत्रे यांतून इतिहासाचे दुवे मिळत राहतात. इतिहास संशोधकाला त्यातून विश्वासार्ह पुराव्यांची, माहितीची निवड करून आपले संशोधन मांडावे लागते. स्थानिक पातळीवरील वास्तुविशेषांचे व घटनांच्या इतिहासाचे लेखनही शास्त्रीय पद्धतीने होणे आवश्यक असते. ही शिस्त या पुस्तकात पाळण्यात आली आहे. मुळात पुरातत्त्व शास्त्रज्ञ हे गुंफा, पुरातन मंदिरे व अन्य प्रार्थना स्थळे, वास्तू यांच्याकडे जास्त लक्ष देतात, पण किल्ल्यांकडे फारसे पाहात नाहीत, अशी ओरड नेहमी होत असते. या टीकेला छेद देत भा. वि. कुलकर्णी यांनी किल्ल्यांचा खास अभ्यास केला. 
ऐतिहासिक माहिती देण्याबरोबरच पुरातत्त्व शास्त्रदृष्ट्या त्या त्या किल्ल्याची वास्तुशास्त्रीय माहिती समजुतीच्या नकाशांसह देण्याचे तंत्र अवलंबत कुलकर्णी यांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. महाराष्ट्रात एखाद्या पुरातत्त्व शास्त्रज्ञाने किल्ले या वास्तुविशेषाचा इतक्या सखोलपणे अभ्यास केल्याचे व त्यावर पुस्तक लिहिल्याचे बहुधा हे पहिलेच उदाहरण आहे. ‘मुंबई परिसरातले किल्ले’ असे या पुस्तकाचे नाव असले तरी हा परिसर बराच विस्तारलेला आहे. एके काळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकणातील सर्व भूप्रदेशाचा या परिसरात समावेश होतो. हा परिसर मराठी भाषेत ‘फिरंगाण’ या   नावाने ओळखला जात असे. फिरंगाणातील काही प्रातिनिधिक किल्ल्यांची निवड करून त्यांच्या वास्तुविशेष व इतिहासाचे विश्लेषण कुलकर्णी यांनी या पुस्तकात केले आहे.
फिरंगाणातील बहुसंख्य किल्ले हे पाश्चिमात्यांनी उभारलेले आहेत. या किल्ल्यांची काही खास स्थापत्यशैली होती का? या प्रश्नाचा मागोवा घेणे ओघाने आलेच. सर्वसाधारणपणे स्थापत्य किंवा वास्तूंची शैली ही कलात्मक असू शकते आणि प्रत्येक कला किंवा स्थापत्य संप्रदाय आपापली वैशिष्ट्ये टिकवून धरताना आढळतो. काळाच्या ओघात दोन शैलींमध्ये वैशिष्ट्यांची देवाणघेवाणही होते आणि या मिलाफातून निराळी शैली उदयाला येते. विशेषत: धार्मिक स्थापत्यात मूळ संकल्पित ढोबळ स्वरूप टिकून राहिलेले आढळते. देशपरत्वे किंवा हवामानपरत्वे त्यात फारसा फरक पडत नाही. म्हणून भारतातील चर्चच्या वास्तूही गॉथिक शैलीत बांधलेल्या आढळतात. पण किल्ल्यांसारख्या संरक्षक आणि लष्करी स्थापत्यात असे घडू शकते का? याला उत्तर अर्थातच ‘नाही’ असे आहे. कारण लष्करी स्थापत्याचे उद्दिष्टच मुळी संरक्षणाचे, कठीण काळात तगून राहण्याचे आणि म्हणूनच गरजेनुसारी असते. समान गरजांना समान उपाययोजना असतात हे सत्य लक्षात घेता, उत्तर कोकणपट्टीतील एतद्देशीय व पाश्चिमात्यांनी बांधलेले किल्ले ढोबळ मानाने सारखेच असायला हवे होते. पण तसे ते नाहीत. किंबहुना पाश्चिमात्यांनी बांधलेले किल्ले एतद्देशीय किल्ल्यांपेक्षा अगदी सहजपणे वेगळे ओळखू येतात. फिरंगाणाचा इतिहास लक्षात घेता किल्ल्यांचे जे प्रयोजन होते तेच साध्य करण्यासाठी काही ठिकाणी एकाकी बुरुजांची, चौक्यांची योजनाही पोर्तुगीजांनी केल्याचे लक्षात येते. या स्थापत्याचे नमुने आणि अशा स्थापत्यांची माहिती देण्यासाठी या पुस्तकात ‘एकाकी बुरुज व इतर अवशेष’ हा खास विभाग कुलकर्णी यांनी लिहिला आहे. या पुस्तकाच्या पहिल्या तीन भागांत किल्ल्यांचा क्रम दक्षिण मुंबईतून सुरुवात करून उत्तर टोकापर्यंत आणि नंतर ठाणे व ठाण्याच्या दक्षिणेकडील किल्ले असा ठेवला आहे. चौथ्या भागात त्यांच्या स्थापत्याचे विवरण वेगळ्या क्रमाने करण्यात आले आहे. या पुस्तकातील पहिल्या भागात पाश्चिमात्यांनी बांधलेले किल्ल्यांचे विवरण असून त्यामध्ये बॉम्बे कॅसल, सेंट जॉर्ज, शिवडी, शीव, रीवा, धारावी, वरळी, वांद्रे, वेसावे, घोडबंदर, वसई, मांडवी, केळवेची पाणगढी, टेहेळणी बुरूज व चौकी, केळव्याजवळील माहीमचा किल्ला, शिरगाव, तारापूर, ठाणे, बेलापूर येथील किल्ल्यांच्या वास्तुविशेषांचे विश्लेषण आहे. पुस्तकामधील दुसºया भागात एतद्देशीयांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये माहीम, वसईजवळील धारावी, अर्नाळा, तांदुळवाडी, मनोर, अशेरी, डहाणू, दुर्गाडी, कर्नाळा, तर तिस-या भागामध्ये नामशेष किल्ल्यांच्या यादीतील माझगाव, जीवधन, दातिवरे, पारसिक, कांबा, पनवेल या किल्ल्यांच्या इतिहासाचा मागोवा लेखकाने घेतला आहे. तर पुस्तकातील चौथ्या भागात बुरूज व इतर अवशेषांमध्ये उसरणीचा बुरूज, बेलापूर येथील बुरूज, दांडा येथील अवशेष, एडवणची चौकी, पारगाव येथील माडी, मथाणे येथील वास्तू, कोरे येथील अवशेष, खटाळी येथील अवशेषांचे विश्लेषण केले आहे.
आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब करत लिहिलेले हे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने अलीकडेच प्रसिद्ध केले आहे. सरकारी प्रकाशन किती उत्तम असू शकते, याचाही हे पुस्तक उत्तम नमुना ठरावा. मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अन्य भागांतही असे दुर्लक्षित अनेक किल्ले असून, त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने या पद्धतीचीच संशोधनपर पुस्तके प्रकाशित करावी असा विचार कुलकर्णी यांचे पुस्तक वाचताना मनात आला.   
----------

No comments:

Post a Comment