Monday, January 18, 2016

स्वगत जगण्याचे, वास्तवातल्या 'बेलवलकरां'चे...दै. दिव्य मराठीच्या ३ जानेवारी २०१६च्या रसिक पुरवणीतील माझा लेख




दै. दिव्य मराठीच्या ३ जानेवारी २०१६च्या रसिक पुरवणीत कलाकार किशोर नांदलस्कर व दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांच्यावर मी व विकास नाईक यांनी कलाकार जनार्दन परब यांच्यावर पुढील लिहिलेली व्यक्तिचित्रे आज प्रसिद्ध झाली आहेत. त्याची लिंक सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-samir-paranjape-rasik…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/03012016/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/03012016/0/4/
-------------
स्वगत जगण्याचे, वास्तवातल्या 'बेलवलकरां'चे...
---------
समीर परांजपे/विकास नाईक
-------
‘टु बी ऑर नॉट टु बी दॅट इज द क्वेश्चन…’
हे वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ नाटकातले आप्पा बेलवलकरांच्या तोंडचे तुटलेपणाच्या- एकटेपणाच्या भावनेला वाट मोकळी करून देणारे अजरामर स्वगत. एकेकाळी नाट्यसृष्टी गाजवलेला हा ‘नटसम्राट’ नुकताच चित्रपटरूपात झळकला आहे. त्याच्याच वेदनेशी नातं सांगत नाटक-सिनेमांत ठसा उमटवलेले काही कलावंत काळाच्या ओघात स्वत:चं अस्तित्व जपू पाहताहेत. त्यांचे एकटेपण नात्यांतील दुराव्यातून अथवा आजारपणातून आलेले असले तरीही, समाज म्हणून आपणही या गुणीजनांचं देणं लागतो, या भावनेतून मराठी चित्र-नाट्यसृष्टीतल्या वास्तवातल्या ‘आप्पा बेलवलकरांच्या’ जगण्याचा हा अंतर्मुख करणारा पट…
---------
समाधानी, तरीही एकटा ‘‘सन्नाटा’’
कलाकार किशोर नांदलस्कर यांचे व्यकितचित्र
- समीर परांजपे
‘कुणी या तुफानाला घर देता का घर’ या ‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकर यांच्या स्वगताच्या धर्तीवर बोलायचे, तर ‘कुणी या विनोदाला घर देता का घर’ अशी माझी काही काळ अवस्था होती... परळमधील भोईवाडा येथे दहा बाय दहाच्या घरात माझा उभा जन्म गेलेला... माझा परिवारही तिथेच वाढला. कुटुंबातल्या सदस्यांची संख्या वाढली, त्यामुळे जागा अपुरी पडू लागल्याने परळच्या घराजवळील राममंदिरामध्ये मी रोज रात्री झोपत असे. हे एका वार्ताहराच्या लक्षात आले आणि वर्तमानपत्रात तशी बातमी ठळकपणे झळकली.
त्यानंतरच काय ती सूत्रे हलली आणि कलावंतांसाठी असलेल्या दहा टक्के कोट्यातून मला हा बोरिवलीचा फ्लॅट मिळाला...
अलीकडे गाजलेल्या ‘सिंघम’ चित्रपटात राजकारण्याची ऐशीतैशी करून बाहेर पडणाऱ्या इन्स्पेक्टर अजय देवगणला सलाम ठोकणाऱ्या काही सेकंदाच्या भूमिकेतही चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे, मराठी-सिनेमांत आपल्या सहजसुंदर अभिनयाने वावरलेले किशोर नांदलस्कर गतआयुष्यातलं एक एक पान उलगडत होते... आवाजात कंप होता... शब्दांत ओलावा... आणि साथीला घर भरून राहणारे एकटेपण...
‘एकलेपणाची आग लागली या जीवा’ हे नाट्यगीत मनात सारखे घोळवतच मुंबईच्या बोरिवली उपनगरातील चिकूवाडी परिसरातल्या एका सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटकडे मोर्चा वळविला होता. बंद दार उघडण्यासाठी बेल वाजवून आपण आल्याची वर्दी द्यावी, अशा तयारीने थोडा पुढे सरसावलो. फ्लॅटचे दार सताड उघडे होते.
‘जिस देश मे गंगा रहता है’ या चित्रपटात ‘सन्नाटा’ची भूमिका साकारणारे, ‘वास्तव’मध्ये लक्षवेधी भूमिका साकारलेले किशोर नांदलस्कर साक्षात समोर उभे होते. साधासा शर्ट, लेंगा या वेषात. वन बेडरुम हॉल अशी रचना असलेल्या या छोट्या फ्लॅटमध्ये अ‌वघे पाऊणशे वयोमानाचे, मिश्कील स्वभावाचे नांदलस्कर सध्या एकटेच राहतात. घरात शिरताच भिंतीला टेकून ठेवलेली सतार नजरेला पडते. तर भिंतीवर संत ज्ञानेश्वर आणि एका योगी महाराजांची तैलचित्रे लावलेली. सन्नाटा म्हणजे, नीरव शांतता. त्यालाच छेद देत व माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून नांदलस्कर म्हणाले, ‘माझ्या मर्जीनेच एकटा राहतो इथे. तीन मुले आपापल्या प्रपंचात व्यग्र आहेत. विवाहसौख्य फारसे नाही लाभले. मानसिक-भावनिक क्लेशही झाले खूप. पण तक्रार नाही माझी कोणाबद्दल. माझा एक मुलगा येऊन-जाऊन असतो इथे. मला काही हवे-नको ते पाहायला. काही वर्षांपूर्वीपासून माझा कल अध्यात्माकडे झुकलाय. आयुष्यभर नाटक-चित्रपटांतून अनेक भूमिका केल्या. आताही अधूनमधून असतो. पण आता स्वत:च्या पसंतीने भूमिका स्वीकारतो.’
एकलेपणाच्या आगीने या विनोदसम्राटाच्या जिवाची खरंच खूप तगमग होत असेल का? एकटेपणाचं-तुटलेपणाचं दु:ख मनातच साठून राहात असेल का? काही अंदाज येत नव्हता. आपल्या घराकडे चौफेर नजर फिरवून स्वगत म्हटल्यासारखे किशोर नांदलस्कर म्हणाले, ‘२००८पासून इथे राहायला आलोय. आयुष्यातले हे नवे पर्व सुरू झाले, तेही वयाच्या उतरणीला.’ पण हे सांगताना त्यांच्या आवाजातील कातरता काही लपत नव्हती. बोलता बोलता नांदलस्कर जुन्या आठवणींत रंगून गेले. त्यात त्यांनी वडील खंडेराव नांदलस्कर हे केशवराव दात्यांच्या नाटक कंपनीत स्त्रीपार्टी करायचे, हे सांगून अभिनयाच्या गोडीमागचं रहस्य उलगडलंच; पण कमाल काश्मिरी नावाच्या दिग्दर्शकाने ‘दर्द-ए-दिल’ नावाचा िहंदी चित्रपट बनवायला घेतला, त्यात तीन नायक होते, त्यापैकी एक आंधळा नायक मी साकारत होतो, त्या चित्रपटाचे चार-पाच दिवस चित्रीकरण झाले आणि ते बंदच पडले... असेे फारसे कुणाला ज्ञात नसलेले तपशील सांगून आश्चर्याचा धक्काही दिला.
बोलण्याच्या ओघात गतस्मृतींना उजाळा देताना त्यांनी कारकिर्दीचा पट उलगडला.
त्यातून आपल्याला ध्यानात येतं की, पोलिसनामा, विच्छा माझी पुरी करा, चल आटप आता पुरे, नवरे सगळे गाढव अशा व्यावसायिक नाटकांबरोबरच सुमारे शंभर चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यातले बावीस-तेवीस चित्रपट हिंदी आहेत. ‘जिस देश मे गंगा रहता है’मधील ‘सन्नाटा’ असो, वा ‘वास्तव’मध्ये संजय नार्वेकरच्या वडिलांची केलेली भूमिका; त्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले. पण त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर ते चमकले अजय देवगणच्या गाजलेल्या ‘सिंघम’मध्ये. त्यांना शिपायाच्या काही सेकंदाच्या संवादविरहित रोलमध्ये बघितल्यानंतर, ‘अरे, हे आपले नांदलस्कर’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांच्या परिचितांमध्ये-चाहत्यांमध्ये उमटली होती.
आठवणींत रमलेल्या नांदलस्करांनी या भेटीत मनातली एक सलही बोलून दाखवली. म्हणाले, ‘अॅटेनबरोच्या ‘गांधी’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आपल्याकडे गांधी फंड योजना सुरू झाली होती. त्यात तुटपुंजे मानधन मला मिळत होते. त्यानंतर हे मानधन मिळायचे बंद झाले. त्यानंतरच्या काळात ज्येष्ठ कलावंतांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती-वेतनासाठी राज्याच्या सांस्कृतिक खात्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र कुणास ठाऊक, त्याचे पुढे काहीही झालेले नाही’...अर्थात, हे सांगताना त्यांचा सूर कटू नव्हता, तर त्यात विनम्रता होती. ही विनम्रता एकटेपणाच्या अपरिहार्य सोबतीमुळे येत असेल का एखाद्यात? हा प्रश्नही मनात येऊन गेला.
मनासारखं बोलून झाल्यावर नांदलस्करांचा निरोप घेऊन निघणार, इतक्यात त्यांचा मुलगा आला. तो येताच नांदलस्करांचा चेहरा चांगलाच खुलला. बाबांना भेटायला आलो, असे तो मला म्हणाला. आता त्यांच्या सोबतीला कुणीतरी त्यांचा जिवाभावाचा आहे, या समाधानाने घराबाहेर पडलो... तोवर ‘सन्नाटा’ने एकलेपणा बोलका केलेला होता...
---------
तरीही ‘प्रकाश’ उमेदीचा
दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांचे व्यक्तिचित्र
- समीर परांजपे
अर्धांगवायूच्या आजारपणातून थोडं सावरल्याचा त्यांचा तो काळ होता... वर्षभराचे थकलेले मानधन मिळावे, या हेतूने ते निर्मात्याच्या भेटीला गेले होते. निर्मात्याने त्यांची भेट तर घेतली; पण ‘तुझं नाव तेवढं नाटकांच्या बोर्डवर लिहिलंय त्यात समाधान मान, पैसे वगैरे काही मिळणार नाहीत.’ अशी अपमानास्पद वागणूक देऊन त्यांची बोळ‌वण केली... दिग्दर्शक या नात्याने बावन्नहून अधिक नाटकं खात्यावर जमा असलेले ते एकटेपणा आणि तुटलेपणाची भावना मनात घेऊन घरी परतले...
वन रुम किचनच्या भाड्याच्या घरातला हा दोघांचा संसार... घरात शिरलं की तिथे समोरच्या टेबलावर मांडलेली काही सन्मानचिन्हं नजरेस पडतात. पण जागा अपुरी असल्याने बाकीची सन्मानचिन्हं स्वयंपाकघरामध्ये छतालगत माळ्याचा काँक्रिटचा ओटा आहे, त्यावर मांडून ठेवलेली... बाकीच्या जागेत घरातले सामानसुमान आणि असंख्य पुस्तके... मुंबईतल्या गोरेगाव उपनगरातल्या या साध्याशाच घरात राहताहेत, फार्सिकल नाटकांचे बादशाह अशी एकेकाळी ख्याती मिळवलेले व नाट्य दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर आणि त्यांची पत्नी नीना... नाट्यसृष्टीतल्या असंख्य नवोदितांना यशाची वाट दाखवलेले बुद्धिसागर आता अर्धांगवायूच्या आजारपणातून सावरताहेत... पुन्हा एकदा उमेदीनं नव्या आयुष्याला सुरुवात करू पाहताहेत... परंतु, आजारपणाच्या काळात आप्तस्वकीयांनी दिलेल्या वागणुकीतून वाट्याला आलेल्या एकटेपणाची साथ अजूनही सुटलेली नाही... तुटलेपणाची सल आजही मनातून पुरती गेलेली नाही... नाटक हाच बुद्धिसागरांचा व्यवसाय, श्वास, आणि आयुष्यही.
वर्तमानपत्रातल्या नाटकांच्या जाहिरातींत कलावंतांबरोबरच या दिग्दर्शकाचे नाव पाहून आवर्जून त्याच्या नाटकाला जाणारे प्रेक्षक होते. ज्या वेळेस ‘बायकोच्या नकळत’, ‘लफडा सदन’, ‘जागो मोहन प्यारे’ ही प्रकाश बुद्धिसागर यांनी दिग्दर्शित केलेली मराठी व्यावसायिक नाटके रंगमंचावर तुफान सुरू होती, त्याच काळात बुद्धिसागरांना अचानक अर्धांगवायूचा पहिला झटका आला. त्यातून ते बरे झाले. मात्र २००८मध्ये आलेल्या दुसऱ्या झटक्याने त्यांंच्या आयुष्याची दिशाच पार विस्कटली. मागचे काही आठवेनासे झाले. आपण लिहिलेल्या एकांकिका, दिग्दर्शित केलेली व्यावसायिक नाटके, नातेवाईक सगळे विस्मृतीत गेले. ओळख होती फक्त पत्नीची. म्हणजे, तिचे नाव-गावही ते विसरले होते. पण त्या विस्मृतीच्या काळात ते फक्त पत्नी नीनालाच ओळख दाखवत होते. या बिकट काळात आप्तस्वकीयांकडून त्यांची फसवणूकही झाली. एरवी सतत मागे-पुढे करणाऱ्यांनी त्यांच्यापासून अंतर राखले; पण अभिनेता मोहन जोशी, प्रशांत दामले, बॅकस्टेज आर्टिस्ट आणि अनेक अनोळखी नाट्यरसिकांनी त्यांना मदतीचा हातही पुढे केला. माणूस एकटा असतो म्हणजे कसा असतो आणि आपल्या माणसांपासून दुरावतो म्हणजे कोणत्या अवस्थेत राहतो, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना या बिकट क्षणांनी दिला. प्रकाश बुद्धिसागर हे आता ६२ वर्षांचे आहेत.
एक वेळ तर अशी आली होती की, संकटांची मालिकाच बुद्धिसागरांवर कोसळत होती. वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्काचा वाटा प्रकाश यांना मिळू नये, यासाठी त्यांच्या सख्ख्या नातेवाइकांनी कारस्थाने केली. या कारस्थानांना वाचा फोडण्यासाठी त्याचा दोन पाने भरतील इतका तपशील अभिनेता मोहन जोशी यांनी आपल्या ‘नटखट’ या आत्मचरित्रात दिलेला आहे. मधल्या काळात विस्मृतीच्या गर्तेत सापडलेल्या प्रकाश बुद्धिसागरांची स्मृती उपचारांनंतर हळूहळू परत आली. ते हिंडू-फिरू लागले. आजारपणातून उठल्यावर त्यांच्याकडे काही नाटके दिग्दर्शनासाठी आली. पण नाटकाच्या तालमींना सुरुवात व्हायची आणि पाच-सहा दिवस उलटले की, निर्माता ते सारे बंद करायचा. कारण ‘नाटक काढून घ्या त्यांच्याकडून, नाहीतर निर्माता म्हणून तुम्ही साफ बुडाल.’ असे निर्मात्यांचे कान भरले जायचे. पुन्हा उभे राहू पाहणाऱ्या बुद्धिसागरांना हे सारेच अनपेक्षित होते... तरीही नेटाने त्यांनी परिस्थितीशी सामना केला. बरे झाल्यानंतर बुद्धिसागर यांनी अनेक नाट्यस्पर्धांसाठी परीक्षक म्हणूनही काम पाहिले. पुन्हा पहिल्याइतकी नव्हे, पण नाट्यक्षेत्राशी संबंधित गोष्टींत त्यांची थोडी लगबग सुरू झाली. प्रकाश व नीना बुद्धिसागर यांच्याशी बोलताना एखाद्या नाटकाची आठवण निघाली की, प्रकाश काही वेळ विचार करायचे.
नाटकाबद्दल आठवून सांगायला लागायचे. एखाद्या तपशिलापाशी ते अडकले की, नीना तो तपशील पूर्ण करायच्या. त्यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट नक्की जाणवली की, बुद्धिसागर आता कोणत्याही व्यावसायिक नाटक, मालिकेचे दिग्दर्शन करण्यासाठी पूर्ण सक्षम आहेत. ‘नटसम्राट’ चित्रपटाचा विषय गप्पांच्या ओघात आला, त्या वेळी बुद्धिसागर सहज सांगून केले की, ‘आईशपथ’ या एकेकाळी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात नाना पाटेकरांनी भूमिका केली होती. अर्थात, आजही वर्तमानपत्रात नाटकांच्या संपूर्ण पानभर पसरलेल्या जाहिराती बघितल्या की, आपलेही एकेकाळी या जाहिरातींमध्ये नाव होते, या विचाराने ते अस्वस्थ होतात. निरोप देताना अगदी ऑटोरिक्षापर्यंत सोबत येतात. तिथून निघताना माझ्या मनात विचार आला, हे अंधाराचे जाळे लवकर फिटू दे आणि प्रकाशाचे राज्य नाट्यसृष्टीत पुन्हा येऊ दे..
-------------- संघर्ष जगण्याचा
कलाकार जनार्दन परब यांचे व्यक्तिचित्र.
- विकास नाईक
ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नं. २च्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीमध्ये ते एकटेच उभे होते... आपल्याच विचारात... ना गर्दीचं त्यांच्याकडे लक्ष, ना त्यांचं गर्दीतल्या कुणाकडे. ‘नमस्कार परबदादा’ म्हटल्यावर ते भानावर आले. भरदार पांढरी मिशी, तुळतुळीत टक्कल, फिकट निळ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा खादीचा सदरा, किरमिजी रंगाची पँट, खांद्यावर बऱ्यापैकी जड काळ्या रंगाची बॅग, पायात साध्याशा चपला... खोल आवाजात नमस्काराचा प्रतिसाद...
‘क्रांतिवीर’ चित्रपटातील ‘उजडे चमन’ ही भूमिका साकारणाऱ्या जनार्दन परबांना पाहताच नाना आणि त्यांचा तो ‘बता ये किसका खून है? इसमें हिंदू का कौनसा और मुसलमान का कौनसा?’ हा गाजलेला मेलोड्रॅमॅटिक सीन झर्रकन डोळ्यांपुढे सरकून गेला. ओळख झाल्यावर जवळच्याच एका हॉटेलात पोहोचलो. हातानेच खुणा करून हल्ली बोलताना आणि चालताना दम लागतो, असे सांगून काही क्षण ते शांत बसून राहिले. पाणी पिऊन झाल्यावर हॉटेलच्या आढ्याकडे पाहात म्हणाले, ‘माझ्याकडे काय काम काढलंत? हल्ली कुणालाच आमची आठवण होत नाही.’ ‘काहीही नाही, सहज. नवीन काय सुरू आहे?’ या माझ्या प्रश्नावर उसासा सोडत परबदादांनी, ‘झी’ मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची आठवण सांगितली. म्हणाले, ‘त्या कार्यक्रमात मी दिसलो आणि अनेकांना धक्का बसला. कारण मी ढगात गेलो, अशीच अनेकांनी इतरांची समजूत करून दिली होती. तेव्हाही मी हेच म्हणालो होतो की, माझा स्ट्रगल मी जिवंत आहे, हे सांगण्यासाठी सुरू आहे...’ शंभर टक्के कोकणी व्यक्तिमत्त्व शोभणारे परबदादांचे वडील गिरणीत काम करीत असताना दशावतारी नट होते. हीच आवड परबांनी विल्सन महाविद्यालयातून पदवीधर होताना जोपासली आणि हळूहळू मराठी रंगभूमी-चित्रपटांतून ते भूमिका साकारू लागले. महिंद्रा युजिन्समधील नोकरी आणि अभिनय ही कसरत बरीच वर्षे यशस्वीरीत्या सांभाळली... विजयाबाई मेहतांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करताना परब म्हणाले, विजयाबाईंनी ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाटकामुळे माझ्यासारख्या छोट्या अभिनेत्याला ओळख दिली. भारतातील हे पहिले नाटक जे भारताच्या सीमा ओलांडून जर्मन, इग्लंड या देशांमध्ये सादर करण्यात आले. या नाटकामध्ये मला वेगवेगळ्या प्रकारच्या सहा भूमिका साकारण्यास मिळाल्या होत्या.
अशोक सराफ, नाना पाटेकर यांच्यासोबत ‘मुद्राराक्षस’, ‘अभिज्ञान शाकुंतलम’मध्ये भूमिका साकारणारे जनार्दन परब काही क्षण भूतकाळात रमले. काशिनाथ घाणेकर वगळता मराठी रंगभूमी किंवा चित्रपटातील सर्व आघाडीच्या कलाकारांसोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे, असे ते म्हणाले. मात्र, ऐन उमेदीत असताना पत्नीचा मृत्यू आणि त्यानंतर आलेले आजारपण परबांना आयुष्याची खरी ओळख देऊन गेले. २००२मध्ये जनार्दन परब यांना अर्धांगवायूचा झटका आला. याच काळात ते मुंबई सोडून आपल्या गावी निघून गेले. एकटेच देवघरात बसून असायचे. स्वत:शीच संवाद चालायचा. गतआयुष्याची उजळणी व्हायची. या सहा वर्षांच्या अज्ञातवासात शरीराने अधू असले तरीही जात्याच तैलबुद्धीच्या परबांनी ‘देवाक काळजी आसा’ या मालवणी-मराठी चित्रपटाची कथा लिहिली. सामान्य माणसाच्या मनात असलेल्या परमेश्वर या संकल्पनेवर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे परब सांगतात. तर ‘वयल्याची तुटली दोरी, खायलो बोंब मारी’ या नाटकात कोकणातील देव-देवस्कीवर भाष्य केले आहे.
आज वयाच्या सत्तरीत असलेल्या या अभिनेत्याला ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या ब्रेख्तियन थिअरीवर आधारित नाटकातील अनुभवातून जावे लागत आहे. रक्ताच्या नात्यांपेक्षा जपणूक केलेली नाती अधिक घट्ट असतात, हे वास्तव परब प्रत्येक क्षणी अनुभवत आहेत. आयुष्यात एक क्षण असा आला की, नात्यांत आलेल्या कटुतेमुळे परब यांच्यावर स्वत:च्या मालकीच्या घरातून बाहेर पडण्याची वेळ ओढवली, हक्काचं छप्पर सोडावं लागलं. तेव्हा खरं तर काही क्षण त्यांनी ‘अप्पा बेलवलकरांची’च वेदना जणू अनुभवली...
नाट्यपरिषदेचे अध्यक्ष असताना मोहन जोशी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोव्याला चालले होते, परंतु वाटेत आवर्जून कणकवलीस थांबले. परबांचं घर शोधलं. सपत्निक घरी जाऊन तातडीची मदत म्हणून त्यांनी पंचवीस हजार रुपये देऊन परबांना मुंबईला येण्यास विनवले.
सध्या जोगेश्वरीला बहिणीकडे राहात असलेले परब म्हणतात, जीवनातील हीसुद्धा एक मजा आहे, सत्याला सामोरे जाताना हसत हसत जायलाच हवे. मी तर एक सामान्य माणूस आहे. आंधळे प्रेम आणि माझे संस्कार कदाचित कमी पडले असावेत... असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा मनोमन त्यांनी एकटेपणाचा स्वीकार केल्याचेही जाणवते. अर्थात, एकटेपणातही स्वाभिमानी आयुष्य जगण्याचा आग्रह धरणारे जनार्दन परब शूटिंगच्या निमित्ताने आजही सकाळची साडेसहाची शिफ्ट करण्यासाठी पहाटे साडेचारला घर सोडतात...