Tuesday, May 30, 2017

`खलनायक' सयाजी शिंदे बनले कनवाळू `शेतकरी'! - दै. दिव्य मराठी दि. ३० मे २०१७ - समीर परांजपे



दै. दिव्य मराठीच्या दि. ३० मे २०१७च्या अंकात आज प्रसिद्ध झालेली ही विशेष बातमी.
--
`खलनायक' सयाजी शिंदे बनले कनवाळू `शेतकरी'!
`धोंडी' चित्रपटातील भूमिकेने घडविला प्रतिमापालट
- समीर परांजपे
मुंबई, दि. २९ मे - आजपावेतो असंख्य चित्रपटांतून भ्रष्ट राजकारणी, उलट्या काळजाचा खलनायक अशा भूमिका साकारणारे प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपलीही चंदेरी पडद्यावरील प्रतिमा बदलायचे ठरविले आहे. ते चक्क कनवाळू शेतकऱ्याची भूमिका धोंडी नावाच्या मराठी चित्रपटात साकारत अाहेत. हा चित्रपट ९ जून रोजी प्रदर्शित होणार अाहे. एका शेतकऱ्याचाच मुलगा असलेल्या सयाजी शिंदे यांना वास्तवात आलेले अनुभव ही भूमिका साकारण्यासाठी खूप उपयोगी पडले आहेत.
सातारा जिल्ह्यातील वेळे-कामटी या गावी जन्म झालेल्या सयाजी शिंदे यांचे वडील शेतकरी होते. सयाजी शिंदे यांनी पदवीधर झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या जलसंधारण खात्यात वॉचमन म्हणून नोकरीला सुरुवात केली. त्यामुळे शेती व तिला लागणारा पाणीपुरवठा या विषयाचा त्यांचा संबंध कायम होता. अभिनयाच्या क्षेत्रात उतरल्यानंतर या नोकरीशी नाते सुटले पण आपण मुळचे शेतकरी असल्याच्या भावनेशी त्यांची नाळ तशीच कायम राहिली. त्यातूनच पावसाची कायम वक्रदृष्टी असलेल्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातल्या दिवडी गाव जलसंधारणाच्या कामासाठी सयाजी शिंदे यांनी दत्तक घेतले. या गावपरिसरातील पांढरवाडी येेथे आपल्या आईची बीजतुला करुन गेल्या वर्षी जून महिन्यात सयाजी शिंदे यांनी बीजारोपण करुन वृक्षारोपण अभियानाला प्रारंभ केला. सुमारे ८ हजार झाडे या गाव परिसरात लावण्याचा संकल्प केला होता. मात्र पांढरवाडी सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांची सहा महिन्यातच काही समाजकंटकांनी कत्तल केली. हे सगळे वास्तवातील अनुभवांचे पदर शेतकऱ्याची भूमिका साकारताना सयाजी शिंदे यांच्या मनात रुंजी घालत असावेत.
धोंडी चित्रपटात शेतकऱ्याची भूमिका करताना सयाजी शिंदे यांना ते मुळातले शेतकरी असण्याच्या पार्श्वभूमीचा खूप उपयोग झाला. या चित्रपटात आपल्या वडिलांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी दहा वर्षांचा एक मुलगा काय काय करामती करतो, याची वेधक कथा धोंडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. निरागस बालमन, नातेसंबंध, बदलती नैसर्गिक परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या अशा मुद्द्यांवरही हा चित्रपट भाष्य करतो. सॉईल इव्हेंट्स अँड एंटरटेन्मेंटची निर्मिती व बोलपट एंटरटेन्मेंट आणि ओशन ९ हे प्रस्तुतकर्ते असलेल्या धोंडी चित्रपटाचे दिग्दर्शन मोनिष उद्धव पवार यांनी केले आहे. स्वत: मोनिषही शेतकऱ्याचेच पुत्र आहेत.
---
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/ahmed…/…/30052017/0/9/

Monday, May 29, 2017

मराठीतही अवतरतोय क्रीडापटांचा प्रवाह...समीर परांजपे , दै. दिव्य मराठी २९ मे २०१७



दै. दिव्य मराठीच्या २९ मे २०१७च्या अंकात मी केलेली अजून एक विशेष बातमी प्रसिद्ध झाली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/ahmed…/…/29052017/0/5/
---
मराठीतही अवतरतोय क्रीडापटांचा प्रवाह...
अॅथलेटिक्सवरील चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत अभिनेता मिलिंद शिंदे
मुंबई, दि. २५ मे (समीर परांजपे) - चक दे इंडिया, दंगल यांसारखे खेळांवर बनविलेले हिंदी चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर मराठीतही आता तो प्रवाह नव्याने येऊ घातला आहे. अॅथलेटिक्सवर एक मराठी चित्रपट बनविण्यात येत असून प्रख्यात अभिनेता मिलिंद शिंदे हा त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. या िचत्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. यानिमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर मराठीत क्रीडापट बनत आहे.
महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ असलेली कुस्ती ‘तालीम’ या चित्रपटातून गेल्या वर्षी दिसली होती. कबड्डी या खेळावरील सुर-सपाटा हा मंगेश कंठाळे दिग्दर्शित चित्रपट हाही एक महत्वाचा मराठी क्रीडापट आहे.
दंगल चित्रपटाच्या काही दृश्यांचे जिथे चित्रीकरण करण्यात आले होते त्याच पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियममध्ये मिलिंद शिंदे यांनी आपल्या मराठी चित्रपटातील अॅथलेटिक्सच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या दृश्यांचे चित्रीकरण नुकतेच केले. बालेवाडीतील स्टेडियममध्ये यानिमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. पुण्यातील बालेवाडीतील शिवछत्रपती स्टेडियममध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सध्या होऊ लागले आहे. दंगल या हिंदी चित्रपटातील रेसलिंग सिक्वेन्सचे चित्रीकरण दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये करण्यात आले होते. अॅथलिट मिल्खा सिंग यांच्या जीवनावरील भाग मिल्खा भाग हा हिंदी चित्रपट २०१३ साली झळकला होता.
अॅथलेटिक्सवर मिलिंद शिंदे दिग्दर्शित मराठी चित्रपटातील नायक हा शिवछत्रपती पुरस्कारात डावललेला खेळाडू अाहे. तो काही निमित्ताने आपल्या गावी गेल्यानंतर तिथे तो चोऱ्या करणाऱ्या तीन मुलांना अॅथलेटिक्सकडे आकर्षित करुन राष्ट्रीय स्तराचे खेळाडू कसे बनवतो याची धमाल कथा या चित्रपटात अाहे. राधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. किरण बेरड यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे एका दूरचित्रवाहिनीवर काही वर्षांपूर्वी लक्ष्मणरेषा नावाची कबड्डी या खेळावरील मराठी मालिका प्रक्षेपित झाली होती. त्यात मिलिंद शिंदे यांनी कबड्डी प्रशिक्षकाची भूमिका केली होती. भारतीय कुस्तीगीर व या खेळातील ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जीवनावरही मराठी चित्रपट बनविण्याचे प्रयत्न सुरु होते.
मिलिंद शिंदे यांनी सांगितले की, `अॅथलेटिक्सच्या राष्ट्रीय स्पर्धेचं चित्रीकरण करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक हवा होता. महाराष्ट्रीत नाशिक, रत्नागिरी आणि पुणे याच ठिकाणी ही सुविधा आहे. नाशिक, रत्नागिरी इथं जाऊन चित्रीकरण करणं शक्य नव्हतं. त्याशिवाय बालेवाडी स्टेडियममध्ये असलेली भव्यता चित्रीकरणासाठी महत्त्वाची होती. या स्टेडियममध्ये चित्रीकरणाचा अनुभव फार कमाल होता,' 
--
खेळ व खेळाडूंचा हिंदी व मराठी चित्रपटांतील सहभाग
विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या जीवनावरील `सचिन : ए बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट सध्या तुफानी चर्चेत आहे. याआधी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावरील ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा हिंदी चित्रपट पडद्यावर झळकला होता. दारासिंग रंधावा या मुळच्या भारतीय पहिलवानाने अनेक पंजाबी, हिंदी चित्रपटांत तसेच मालिकांत कामेही केली. मराठी मातीतल्या मल्लखांब व कबड्डी या खेळांवरील चित्रपट तयार करुन ते प्रदर्शित करण्याची योजना असल्याचे ‘चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ने (सीएफएसआय) ठरविले होते. विविध खेळांवर आधारित सात चित्रपट सीएफएसआयतर्फे एकावेळी तयार करण्याचे काम सुरु असून ते लवकरच बालप्रेक्षकांना पाहाता येतील. चक दे इंडिया हा हिंदी चित्रपट हॉकीला व दंगल हा चित्रपट रेसलिंगला केंद्रस्थानी ठेवून बनविण्यात आला होता. इक्बाल, मेरी कोम, ऑल राऊंडर, बॉक्सर, जो जिता वही सिकंदर, लगान, धन धना धन गोल, स्टम्प्ड या हिंदी या चित्रपटांना क्रीडा पार्श्वभूमी आहे. बेंड इट लाइक बेकहॅम या इंग्रजी चित्रपटात भारतीय कुटुंबातील फुटबॉलवेड्या तरुणीची कहाणी होती. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी ‘सावली प्रेमाची’ या मराठी आणि ‘मालामाल’ या हिंदी चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या होत्या. त्याशिवाय क्रिकेटपटू सलीम दुर्रानी, सैयद किरमानी, विनोद कांबळी व अजय जडेजा यांनीही चित्रपटात काम केले आहे. त्याशिवाय धडाकेबाज क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी कभी अजनबी थे या हिंदी चित्रपटात काम केले होते. संदीप पाटील यांचा मुलगा चिराग याने वजनदार या मराठी चित्रपटात भूमिका साकारुन हा वारसा कायम राखला.

वाचकांनी शेरेबाजीने खराब केलेल्या पुस्तकांचे मुंबईत आगळे प्रदर्शन ३० मे पासून - दै. दिव्य मराठी २९ मे २०१७ - समीर परांजपे



---------

दै. दिव्य मराठीच्या दि. 29 मे 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली ही मी केलेली विशेष बातमी
-------
वाचकांनी शेरेबाजीने खराब केलेल्या पुस्तकांचे मुंबईत आगळे प्रदर्शन ३० मे पासून
विलेपार्लेच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाचा वाचकजागृतीसाठी अनोखा उपक्रम
- समीर परांजपे
मुंबई, दि. 29 मे - `हे उरलंसुरलं फारस चविष्ट, रुचकर नाही किंबहुना बेचवच आहे.' अशी बेधडक शेरेबाजी एका अनामिक वाचकाने केली आहे पु. ल. देशपांडे यांच्या उरलंसुरलं या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर...वाचकांनी अशा प्रकारच्या ताळतंत्र सोडून केलेल्या तसेच प्रसंगी तालेवारही शेरेबाजी केलेल्या पुस्तकांचे एक आगळे प्रदर्शन मुंबईतील विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयात उद्या म्हणजे ३० मेपासून पुढे आठवडाभर आयोजिण्यात येत आहे. वाचकांनी शेरेबाजी केलेल्या मराठी पुस्तकांचे हे अशा प्रकारचे राज्यातील पहिलेच प्रदर्शन आहे. शेरेबाजी करुन पुस्तके खराब करु नका असा संदेश या प्रदर्शनातून वाचकांना देण्यात येणार आहे.
यासंदर्भात श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथपाल मंजिरी वैद्य यांनी सांगितले की, पुस्तकावर वाचकांनी शेरेबाजी करणे हे मुळात चुकच आहे. त्यामुळे पुस्तकाचे जे मुळ सौंदर्य असते ते नष्ट होते. आमच्या ग्रंथालयात वाचकांनी शेरेबाजी करुन खराब केलेल्या पुस्तकांतून ५० हून अधिक पुस्तकांचे प्रदर्शन आम्ही मुद्दामहून आयोजित करीत आहोत.शेरेबाजीमुळे पुस्तकांची गेलेली रया बघून वाचकांना काही बोध होईल व असे प्रकार भविष्यात थांबतील हा आशावाद मनात धरुनच आम्ही या आगळ्यावेगळ्या पुस्तकांचे प्रदर्शन श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयात आयोजित केले आहे.
या पुस्तकांमध्ये अनामिक वाचकांनी नमुनेदार शेरेबाजी केली आहे. ती काही वेळेस सकारात्मक आहे तर बहुतांशी नकारात्मकच आहे. सफर बहुरंगी रसिकतेची या गंगाधर गाडगीळ यांच्या पुस्तकावर एका वाचकाने असा शेरा लिहिला आहे `गं. गा. यांची लेखनशैली खूपच निरस, कंटाळवाणी आहे. वाचताना रमून जाणे होत नाही.' फाऊंटन हेड या कादंबरीचा शिखर या नावाने अनुवाद करणाऱ्या मोहनतारा पाटील यांच्या लेखनशैलीबद्दल लिहिताना एका वाचकाने तिरकसपणे पुस्तकावर लिहून ठेवले आहे `भाषांतर करणे या फंदात पाटीलबाईंनी न पडलेले बरे.' राजा राजवाडे यांच्या `हास रे घुम्या' या पुस्तकाच्या एका पानावर वाचकाचा शेरा असा आहे `हे पुस्तक वाचून जो हसेल त्याचा जाहीर सत्कार करावा.' वि. स. खांडेकर रजत-स्मृति पुष्पांतर्गत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादन करुन प्रसिद्ध केलेल्या `अजून येतो वास फुलांना' या वि. स. खांडेकरांच्या पुस्तकावर वाचकशेरा असा आहे की, `अजून येतो सुरेख वास फुलांना. हा वास घ्यायलाच हवा.' पुणं एक साठवणं या श्याम भुर्के लिखित पुस्तकाच्या पानावरील एक वाचकशेरा आहे तो म्हणजे 'ही साठवण फारशी आनंददायक नाही. बरेचसे लेखन अतिरंजित अवास्तव आहे. श्री. भुर्के उगाचच भुरके मारीत आहेत!' प्रा. माधव का. देशपांडे लिखित `सन्त आणि सायन्स' या पुस्तकावर एका वाचकाने लिहून ठेवले आहे ` सणसणीत व सडेतोड भाषेत लिहिलेले हे सुंदर पुस्तक. ज्याला झेपेल त्यानेच वाचावे. हृदयविकार असणारांनी वाचू नये.'
वाचकांनी पानोपानी केलेल्या शेरेबाजीतून दृष्टिकोन (लेखक - भारतकुमार राऊत), सर्व प्रश्न अनिवार्य - रमेश इंगळे उत्रादकर, कपटी कंदार आणि कताचा मनोरा - नारायण धारप, अमेरिकेतील धावपळ -डॉ. अनंत लाभसेटवार, फाळणीचे दिवस - गो.मा. कुलकर्णी, गाठ पडली ठका ठका - शांताबाई शेळके अशी अनेक पुस्तकेही सुटलेली नाहीत. ती सारी या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
मारुती चितमपल्लींना पाहावी लागली आपल्या पुस्तकावरील शेरेबाजी
प्रख्यात पक्षीतज्ज्ञ व लेखक मारुती चितमपल्ली गेल्या पाच मार्च रोजी विलेपार्ले येथे एका पुस्तक प्रकाशन समारंभासाठी हवे होते. त्यांना त्यांच्या आता दुर्मिळ असलेल्या रानवाटा या पुस्तकाची श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयातील प्रत काही संदर्भासाठी हवी होती. या प्रतीवर वाचकांनी खूप उलटसुलट शेरेबाजी केली होती. शेवटी जिथे शेरेबाजी केली आहे त्या ठिकाणी पांढरे कागद चिटकवून हे पुस्तक मारुती चितमपल्ली यांना देण्यात आले. तरीही काही ठिकाणची शेरेबाजी लपविणे शक्य नव्हते. ते पुस्तक बघून चितमपल्ली यांना काय बरे वाटले असेल असा विचार त्यावेळी संबंधितांच्या मनात येऊन गेला होता.
---
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/29052017/0/3/

Thursday, May 25, 2017

मराठीसह इतर भाषिक काही पुस्तके मोफत वाचण्याची संधी! - संमीर परांजपे, १८ मे २०१७ दै. दिव्य मराठी


मराठीसह इतर भाषिक काही पुस्तके मोफत वाचण्याची संधी!

#नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियासाठी आयआयटी खरगपूरने केले खास अॅप
#५ हजार मराठी पुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध; वर्षभरात मराठी पुस्तकांची संख्या २ लाखांपर्यंत नेणार, #केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याचा उपक्रम
मुंबई, दि. 18 मे
- समीर परांजपे
प्रायमरी ते पीजी या शैक्षणिक स्तरातील विद्यार्थी, वाचक यांच्यासाठी आता अगदी मोफत उपलब्ध आहेत भारतीय भाषांसह विविध भाषांतील सुमारे ६७ लाख पुस्तके, नियतकालिके, थिसिस व लेख व तेही फक्त एका क्लिकवर. ही किमया साधली आहे पश्चिम बंगालमधील आयआयटी खरगपूरने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रकल्प असलेल्या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (एनडीएलआय) या महाप्रकल्पासाठी नुकत्याच विकसित केलेल्या खास अॅपमुळे. हा अॅप स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करुन घेतल्यानंतर वाचकांना अन्य भाषांतील पुस्तकांबरोबरच ५ हजारांहून अधिक मराठी पुस्तके डिजिटल रुपात वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत.
एनडीएलआयच्या वेबसाइटवर मराठी बुक्स असे सर्च ऑप्शन दिल्यानंतर सध्या ५ हजारांहून अधिक मराठी पुस्तके वाचकांना पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होतात. या मराठी पुस्तकांची संख्या येत्या वर्षभरात दोन लाखांपर्यंत जाईल. त्यात विषयांच्या विविधतेनूसार आपल्याला डिजिटल स्वरुपात ती पुस्तके वाचता येतात. इतिहास व भूगोल असा विषयाच्या पुस्तकांवर क्लिक केले असता शंकर वामन दांडेकरांनी संपादित केलेली ज्ञानेश्वरी, वि. ल. भावे यांनी लिहिलेल्या मराठी दप्तर या पुस्तकाचे काही खंड इथपासून विज्ञानावरील अनेक विषयांची मराठी पुस्तके इथे उपलब्ध आहेत.
नॅशनल डिजिटल लायब्ररी आॅफ इंडिया या प्रकल्पामध्ये देशातील सुमारे १०० विविध संस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये देशातील विविध राज्यांतील अग्रगण्य शासकीय ग्रंथालये तसेच शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. देशभरातील कोणत्याही विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेली पुस्तके डिजिटल स्वरुपात मोफत उपलब्ध करुन देण्यासाठीही (एनडीएलआय) प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. अँड्राॅइडची सुविधा असलेल्या मोबाइलधारकांनाच हा अॅप डाऊनलोड करुन घेता येईल. पुढे इतर प्रकारच्या स्मार्टफोनसाठी ही सुविधा विकसित करण्यात येईल. एनडीएलआयचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी वाचकानेhttps://ndl.iitkgp.ac.in वा या साइटवर जाऊन स्वत:ची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी झाल्यानंतर वाचकाला त्याच्या आवडीचे पुस्तक विषय, लेखकाचे नाव, भाषा या क्रमानूसार शोधता येईल. ते केवळ मोफत वाचता येईलच असे नव्हे तर ते पुस्तक डाऊनलोडही करुन घेता येईल. इतकेच नव्हे तर हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर एनडीएलआयच्या वेबसाइटवर विविध विषयांवरची ऑडिओ व व्हिडिओ स्वरुपातील लेक्चर्सही ऐकता येण्याची सोय उपलब्ध आहे.
मराठी भाषेतही अॅप कार्यान्वित करणार
नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या साइटवर ऑडिओ बुक्स करण्याकडेही या वेबसाइटची वाटचाल सुरु आहे. आयआयटी खरगपूरने विकसित केलेले हे अॅप सध्या इंग्लिश, हिंदी व बंगाली भाषेत असून ते काही महिन्यांतच मराठी व अन्य भाषांतही कार्यान्वित होणार आहे.

रंगभूषेचे सम्राट कृष्णा बोरकर - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी दि. १७ मे २०१७


कालवश झालेले रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांच्यावर दै. दिव्य मराठीच्या दि. 1१७ मे २०१७च्या अंकात मी लिहिलेला विशेष लेख पुढे देत आहे. लेखासोबत त्या पानाची वेबलिंकही देत आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-sachin-parajanpe-writes-about-emperor-krishna-borkar-5599924-NOR.html
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/17052017/0/8/

---
रंगभूषेचे सम्राट कृष्णा बोरकर
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
मराठी नाट्य तसेच चित्रपटसृष्टीमध्ये सुमारे ७० वर्षांहून जास्त काळ कार्यरत असलेले प्रसिद्ध रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांच्या निधनामुळे या कलेतील एक माहिर मोहरा आपण गमावला आहे. असं म्हणतात गोवा व कोकणाच्या भूमीत माणसे नाटकाचे वेड घेऊनच जन्माला येतात. कृष्णा बोरकर यांचे घराणे मुळचे गोव्यातील बोरी गावचे. पोर्तुगीजांच्या राजवटीतील छळाला कंटाळून अनेक गोवेकरांनी कोकणात स्थलांतरित होणे पसंत केले. कृष्णा बोरकरांचे पूर्वजही त्यातलेच. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचखरी गावी आपला मुक्काम हलविला. कोकणातील प्रत्येक माणसाला मुंबईचे आकर्षण असतेच. त्याच बरोबर अनेकांनी पोट भरण्यासाठीही मुंबईची वाट धरलेली असते. कृष्णा बोरकरांचे वडिल वारल्यानंतर त्यांची आई आपल्या मुलांना घेऊन मुंबईला आली. बोरकर कुटुंब अशा रितीने कायमचे मुंबईकर झाले.
कृष्णा बोरकरांना लहानपणापासूनच नाटकाविषयी असीम जिव्हाळा. गावाला दशावतारीचे खेळ व्हायचे तेव्हा लहानगा कृष्णा ते पाहाण्यात रंगून गेलेला असायचा. एखाद्या नटाला केली जाणारी रंगभूषा व एखादा पुरुष नट स्त्रीभूमिका करीत असताना त्याला केली जाणारी रंगभूषा यातील जो महत्वाचा फरक आहे तो कृष्णाला लहानपणापासून नीट उमगू लागला होता. दशावतारीच्या वेळेस नटाची रंगभूषा सुरु असताना तिचे निरीक्षण कृष्णा न कंटाळता करत असे. याच रंगांशी आपल्याला आयुष्यभर खेळायचे आहे हे तेव्हा त्यांच्या गावीही नसेल.
भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्रात रंगभूषा, वेशभूषा, देखावे या सगळ्यांना नेपथ्य ही एकच संज्ञा वापरली आहे. मराठी नाट्यपरंपरेचा पाया विष्णुदास भावे यांनी घातला. त्यानंतर मराठी रंगभूमी चोहोअंगानी बहरली. नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, दिग्दर्शन अशा प्रत्येक गोष्टीचेच विशेषीकरण झाले. मराठी रंगभूमीवर रंगभूषा या विषयात पंढरीनाथदादा जूकर तसेच कृष्णा बोरकर या दोन नावांना गेली पन्नास वर्षे तरी समर्थ पर्याय नव्हता. मराठी रंगभूषेच्या इतिहासात डोकावले तर अगदी १९०४ पर्यंत पिवळी माती, सफेती, काव आदी गोष्टींचा वापर करुनच नटांची रंगभूषा करण्यात यायची. मराठी रंगभूमीवर आप्पासाहेब टिपणीस, कारखानीस यासारखे सुशिक्षित अभिनेते आल्यानंतर त्यांनी इंग्रजी पुस्तके वाचून रंगभूषाशास्त्राचा विकास घडविला. महाराष्ट्र नाटक मंडळीचे एक अभिनेते वामनराव उर्फ मामा भट यांनी आपला नटाचा पेशा त्यागून रंगभूषेसाठी लागणाऱ्या रंगांचा कारखाना काढला. निव्वळ रंगभूषाकार म्हणून वावरलेले नाना जोगळेकर यांचीही रंगभूषेसाठी लागणारी उत्पादने पूर्वी प्रसिद्ध होती. ही सारी पार्श्वभूमी पंढरीनाथ जूकर व कृष्णा बोरकर यांना पुण्याईसारखी लाभली होती.
कोकणातून मुंबईत आल्यानंतर कृष्णा बोरकर राहात होते त्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजव‌‌ळील कलकत्तावाला चाळीमध्ये शेजारी एक कलासक्त व्यक्ती राहात असे. तिचे नाव पांडुरंग हुले. हे गृहस्थ नाटक कंपन्यांचे पडदे रंगविण्याचे काम करायचे. हुलेंमुळेच कृष्णा बोरकरांचे पाऊल खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीच्या अंगणात पडले. सुडाची प्रतिज्ञा या कामगार रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकातून कृष्णा बोरकरांना वयाच्या अकराव्या वर्षी प्रथमच स्वतंत्रपणे रंगभूषा करण्याची संधी मिळाली. भुलेश्वर येथे विविध प्रकारचे ड्रेस भाड्याने देण्याची काही दुकाने पूर्वी होती. आता तशी दुकाने दादरला दिसतात. भुलेश्वरच्या यापैकी एका दुकानात कृष्णा बोरकरांनी काम करुन अजून अनुभव घेतला. महाराष्ट्र नाटक कंपनीचे वेषभूषाकार कमलाकर टिपणीस यांच्या ओळखीने कृष्णा बोरकरांना एका चित्रपटाची रंगभूषा करण्याचीही संधी मिळाली.
व्यावसायिक मराठी नाटकांचे हक्काचे रंगभूषाकार ही त्यांच्या कारकिर्दीची पुढची पायरी होती. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी िदग्दर्शित केलेल्या पृथ्वी गोल आहे हे कृष्णा बोरकर यांचे स्वतंत्र रंगभूषाकार म्हणून पहिले व्यावसायिक नाटक होते. बोरकर यांचे घट्ट नाते जु‌ळले ते प्रख्यात अभिनेते-नाटयनिर्माते प्रभाकर पणशीकर व मोहन वाघ यांच्याशी. वाघ व पणशीकर यांनी सुरु केलेल्या नाट्यसंपदा या संस्थेच्या नाटकांसाठी बोरकरांनी रंगभूषाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे प्रभाकर पणशीकर व मोहन वाघांचे काही जमेना. त्यामुळे मोहन वाघांनी नाट्यसंपदातून बाहेर पडून चंद्रलेखा या नाट्यसंस्थेची स्थापना केली. चंद्रलेखामध्ये पुढे कित्येक वर्षे कृष्णा बोरकरांनी रंगभूषाकार म्हणून काम केले. गारंबीचा बापू, गुड बाय डॉक्टर, गरुडझेप, स्वामी, हे बंध रेशमाचे, गरुडझेप, दीपस्तंभ, गगनभेदी, रणांगण अशा अनेक नाटकांसाठी कृष्णा बोरकरांनी रंगभूषा केली. यातील काही नाटके ऐतिहासिक, काही सामाजिक. प्रत्येक नाटकाचा, त्यात काम करणाऱ्या अभिनेत्याचा बाज लक्षात घेऊन कृष्णा बोरकरांनी रंगभूषा केली. ती करताना त्यात विविधताही आणली. ‘रणांगण’ नाटकातील १७ कलाकार आणि ६५ प्रकारच्या रंगभूषा करण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले. केशवराव दाते, बाबुराव पेंढारकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम, वसंत शिंदे , मधुकर तोरडमल, डॉ. काशिनाथ घाणेकर, यशवंत दत्त आणि अन्य दिग्गज कलाकारांची रंगभूषा बोरकर यांनी केली होती. त्याशिवाय रंगशारदा, श्री रंगशारदा या नाट्यसंस्थांच्या नाटकांसाठी बोरकरांनी केलेली रंगभूषा हा एक स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.
राजकमल स्टुडिओच्या ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’ ‘मौसी’ आदी चित्रपटांसाठी बोरकरांनी साहाय्यक रंगभूषाकार म्हणूनही काम केले. त्यावेळी या स्टुडिअोचे मुख्य रंगभूषाकार होते बाबा वर्दम. जेव्हा कृष्णा बोरकरांनी स्वतंत्रपणे रंगभूषाकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना पूर्ण पाठबळ दिले ते याच वर्दमांनी. ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकात मधुकर तोरडमल तर ‘सुख पाहता’ या नाटकात अभिनेते यशवंत दत्त यांना सहा वेगवेगळ्या भूमिकेसाठी कृष्णा बोरकरांनी केलेली रंगभूषा ही वाखाणण्याजोगीच होती.
१९९२च्या २४व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत त्यांना उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून पारितोषिक मिळाले होते. गुडबाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांच्या रंगभूषेकरिता नाट्यदर्पण पुरस्कार तसेच भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. इतर अनेक संस्थांनी दिलेल्या पुरस्कारांचा उल्लेख करायचा म्हटला तरी ती मोठी यादी होईल. कृष्णा बोरकर जीवनाच्या शाळेत जास्त शिकले. जीवनाच्या रंगभूमीवर लोक मुखवटे चढवून कसे जगतात, त्यांच्या चेहेऱ्यावर एक व मनात दुसरेच रंग कसे असतात हे सारे त्यांना मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीत वावरताना नीट लक्षात आले. पण बोरकर जास्त रमले ते मराठी नाटकांतच. ८५ वर्षे वय असूनही त्यांचा उत्साह पंचविशीच्या तरुणासारखा असायचा. मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस या विभागात ते विद्यार्थ्यांना रंगभूषा हा विषय प्रात्यक्षिकांसह शिकवत असत. वयोपरत्वे त्यांनी मराठी नाटकांतील रंगभूषेच्या कामातून निवृत्ती घेतली होती पण नवे रंगभूषाकार घडविण्याचा उत्साह दांडगा होता. अभिनेता असो वा अभिनेत्री त्यांच्या चेहेऱ्याला खऱ्या अर्थाने रंगरुप देणारा कृष्णा बोरकर यांच्यासारखा रंगभूषाकार काळानेच घडविला होता. काळच त्यांना आपल्यातून दूर घेऊन गेला. मराठी नाटकांच्या रंगभूषेच्या इतिहासातील एक सुवर्णपान मिटले. 

Wednesday, May 3, 2017

अयोग्य जनहित याचिकांना वेसण! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी ३ मे २०१७




दै. दिव्य मराठीच्या दि. ३ मे २०१७च्या अंकातील प्रासंगिक सदरात माझा प्रसिद्ध झालेला हा लेख.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-sameer-paranjape-writes-about-public-interest-litigation-5588633-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/03052017/0/6/
----
अयोग्य जनहित याचिकांना चाप!
---
- समीर परांजपे
paranjapesamir
---
न्यायाधीशांची चौकशी करण्यासंदर्भातल्या कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मक वैधतेविषयी प्रश्न उपस्थित करणारी सुरज इंडिया ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष राजीव दहिया यांनी केलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलीच. शिवाय या संस्थेला व तिच्या अध्यक्षांना आता यापुढे आयुष्यभरात कधीही जनहित याचिका दाखल करता येणार नाही असा आदेशही दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इतका कठोर निर्णय यासाठी घेतला की, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व राजस्थान उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात आरोप करणाऱ्या तब्बल ६४ जनहित याचिका २०१० सालापासून सुरज इंडिया ट्रस्टने दाखल केल्या होत्या. पण या साऱ्या जनहित याचिका अयोग्य वाटल्याने त्या वेळोवेळी फेटाळण्यात आल्या होत्या. अशा जनहित याचिका करुन सर्वोच्च न्यायालयाचा अमुल्य वेळ वाया घालविल्यामुळे शिक्षा म्हणून सुरज इंडिया ट्रस्टला २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. सरन्यायाधीश जे. एस. केहर, न्या. डी. वाय. चंद्रचूड व न्या. संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाने कायद्यातील तरतुदींचा आपल्या स्वार्थासाठी वापर करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व व्यक्तिंना जरब बसेल अशी आशा करायला हरकत नाही. जनहिताचे रक्षण करण्यासाठी कोणताही नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना न्यायालयात जनहित याचिकेद्वारे थेट दाद मागता येईल अशी तरतुद राज्यघटनेच्या ३२ व्या कलम करण्यात आलेली आहे. एखाद्या ज्वलंत प्रश्नावर तोडगा शोधण्यासाठी कार्यकारी व विधिमंडळाकडून कोेणतीही परिणामकारक पावले उचलली जात नाहीत किंवा त्या प्रश्नाकडेच दुर्लक्ष केले जाते, माहिती दडविली जाते तेव्हा सामान्य जनतेच्या हाती जनहित याचिका हे एक महत्वाचे अस्त्र असते. मात्र त्या अस्त्राचा दुरुपयोग असल्याची प्रकरणे वाढू लागल्याने सर्वोच्च न्यायालयाला त्याबाबत कठोर भूमिका घेणे क्रमप्राप्त झाले. देशामध्ये असलेल्या स्वयंसेवी संस्थांचा वापर राजकीय नेते, पक्ष तसेच हवशे-गवशे आपल्या स्वार्थी हेतूंसाठी करतात. स्वयंसेवी संस्थांपैकी अनेकांचा कारभार हा गडबडघोटाळ्याचा असतो. स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्ती जेव्हा जनहित याचिका दाखल करतात व तिच्या गुणवत्तेविषयी न्यायालयात ठोस युक्तिवाद करु शकत नाहीत, ती सारी प्रक्रियाच न्यायालयाचा विनाकारण वेळ खाणारी असते. त्याला वेसण बसणे गरजेचेच होते. कोणत्याही जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने कार्यकारी व विधिमंडळाच्या अधिकारांवर गदा येत नाही असा महत्वपूर्ण निकाल एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १० एप्रिल २००८ रोजी दिला होता. मात्र बेछुट आरोप केलेली जनहित याचिका फेटाळून लावली जाईल अशी तंबीही तेव्हा न्यायालयाने दिलेली होती. या पूर्वीच्या निकालाचे नेमके भान सुरज इंडिया ट्रस्टला उरले नाही. आपली ताजी जनहित याचिका कशी योग्य आहे हे समजावून सांगण्यासाठी न्यायालयाने या ट्रस्टचे अध्यक्ष राजीव दहिया यांना कामकाजादरम्यान दीड तास दिला होता. पण दहियांच्या युक्तिवादात काहीच राम नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना धडा शिकविला. न्याययंत्रणेमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो असा दहिया यांना अहंगंड होता. त्यांचे विमान सर्वोच्च न्यायालयाने जमिनीवर आणले. सर्वोच्च न्यायालय याचिकाकर्त्यांच्या हेतूंची खूपच बारकाईने तपासणी करीत आहे. घरमालकाविरोधात ३३ वर्षे विविध न्यायालयात योग्य कारणांमुळे खटला हारल्यानंतरही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात खटल्याचे घोडे दामटणाऱ्या एका भाडेकरुला सर्वोच्च न्यायालयाने १ मार्च रोजी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. निरर्थक याचिका दाखल करुन न्यायालयाचा अमुल्य वेळ वाया घालविल्याबद्दल गेल्या फेब्रुवारी महिन्यात बिहारमधील राजदचे आमदार रविंद्रसिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने १० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. अशाच एका प्रकरणात महाराष्ट्रातील एका प्राध्यापकालाही १ लाख रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. ही सारी उदाहरणे आजूबाजूला घडत असतानाही न्यायालयात उठसूठ धाव घेणाऱ्यांची संख्या कमी होत नाही हे दुर्दैवच आहे. एखादी समस्या सोडविण्यासाठी कार्यकारी, विधिमंडळ यांच्याकडे पुरेसे प्रयत्न करण्याचा, या यंत्रणांना काही वेळ देण्याचा संयमही सध्या अनेकांना राहिलेला नाही. त्यातच देशात विविध न्यायालयांत लक्षावधी खटले वर्षानुवर्षे निकालाविना तुंबून राहात असून त्यामुळेही लोकांच्या मनात निराशा दाटून येते. त्यातून जनहित याचिकेच्या माध्यमातून तरी झटपट न्याय मिळेल अशी पळवाट काढली जाते. मात्र दस्तुरखुद्द सर्वोच्च न्यायालयात १५९८ जनहित याचिका अजूनही निकाली निघालेल्या नाहीत. त्यातील एक याचिका तर २३ वर्षे जुनी आहे. न्याययंत्रणेत असलेल्या त्रुटी दूर केल्यास सामान्य याचिका तसेच जनहित याचिकांची संख्याही कमी होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने याबद्दलही गांभीर्याने विचार करायला हवा.