Wednesday, June 29, 2016

माझी प्रसिद्ध झालेली सात इ-बुक्स डेलिहंट या मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत. त्या अॅपची लिंक. इथे मराठी विभागात क्लिक केल्यानंतर व पुस्तकाचे किंवा लेखकाचे नाव टाइप केल्यानंतर तुम्हाला या पुस्तकाचा संदर्भ मिळेल.
लिंक. -
http://m.dailyhunt.in/Ebooks/?redirect=1




















Monday, June 27, 2016

‘स्टँडिंग ओवेशन’चा ‘कोडमंत्र’! नाटक. दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी २६ जून २०१६



दै. दिव्य मराठीच्या २६ जून २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या रसिक या रविवार पुरवणीत कोडमंत्र या नवीन मराठी नाटकाविषयी प्रसिद्ध झालेला हा माझा लेख. त्याची लिंक, टेक्स्ट लिंक, टेक्स्ट व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjape-article-in-marathi-5358209-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/26062016/0/6/
----
"कोडमंत्र' हे गुजराती नाटक मराठी रंगभूमीवर आणणे हे भरतभाई ठक्कर, दिनू पेडणेकर, मुक्ता बर्वे या तिघांचेही ड्रीम प्रोजेक्ट बनले होते. नाटक संपताना टाळ्यांचा कडकडाट आणि स्टँडिंग ओवेशन यासारखी प्रेक्षकांकडून मिळणारी दुसरी दाद नाही. ‘कोडमंत्र’च्या पहिल्या, दुसऱ्या व त्यानंतर सर्वच प्रयोगांना हा अनुभव निर्मात्यांसह सर्व कलाकारांनी घेतला आहे व घेत आहेत...
----
‘स्टँडिंग ओवेशन’चा ‘कोडमंत्र’!
------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-----
र्वतराजीचे भव्य नेपथ्य... त्यातच सैनिकी छावणीमधील बैठकींचा बाज समाविष्ट... नाटकात वावरणारे ११ कलाकार व त्यांना एकाच वेळी तेवढीच मोलाची साथ देणारे एनसीसीचे अठरा ते वीस कॅडेट... या कॅडेट‌्सनी साकारलेली श्वास रोखून धरायला लावणारी, थरार निर्माण करणारी युद्धदृश्ये, त्यांचे रंगमंचावर होणारे शिस्तबद्ध संचलन, नाट्यगृहात घुमणारे लष्करी इशारे, जयहिंदचा टिपेचा जयघोष या गोष्टींनी वातावरणात चैतन्य निर्माण होतेच, परंतु इतक्या कलाकारांसह नाटक नव्हे तर एक लक्षवेधी चित्रपटच पाहतो आहोत, असा भव्यदिव्य आणि मराठी रंगभूमीवर दुर्मीळ म्हणता येईल असा अनुभव आपण घेत असतो. ‘कोडमंत्र’च्या निमित्ताने आलेली ही भव्यता क्षणोक्षणी रसिकांना सुखावत राहते...
तसे पाहता मराठी रंगभूमी ही आदानप्रदानाची भूमी आहे. गुजराती, पारशी, उर्दू, हिंदी भाषांमध्ये होणारी काही उत्तम नाटके जशी पूर्वी मराठी रंगभूमीवर अनुवादित करून साजरी झाली, त्याचप्रमाणे मराठी व्यावसायिक रंगमंचावरील लोकप्रिय नाटकं गुजराती व अन्य भाषांतील रंगमंचावर नेहमीच येत राहिली आहेत. गुजराती नाटकांचे सर्वात जास्त प्रयोग अहमदाबादमध्ये नव्हे तर मुंबईत होतात. याचे कारण मुंबई ही बहुसांस्कृतिक पैलूंनी घडलेली आहे. इथे मराठीबरोबरच अनेक भाषांतील कलांनाही आपला विकास साधण्याची संधी मिळाली आहे.
गुजराती रंगमंचावर अलीकडच्या काळात जी नाटके सादर झाली, ती पाश्चात्त्य नाटकांची रूपांतरे आहेत. ऑक्टोबर २०१५ पासून गुजराती रंगमंचावर सादर होणारे ‘कोडमंत्र’ हे नाटकदेखील ‘ए फ्यू गुड मेन’ या अॅरॉन सोर्किन लिखित इंग्रजी नाटकावर बेतलेले आहे.
दोन अमेरिकन सैनिकांवर खुनाचा आरोप दाखल झाल्यामुळे त्यांचा बचाव करण्यासाठी कोर्टमार्शलच्या दरम्यान दोन वकील या प्रकरणाच्या मुळाशी जातात. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी या सैनिकांना आरोपी ठरविण्यासाठी रचलेले कारस्थान हे वकील उघडकीस अाणून न्यायालयासमोर सत्यस्थिती सादर करतात, असे ‘ए फ्यू गुड मेन’ या नाटकाचे कथानक आहे. ‘ए फ्यु गुड मेन’वरून गुजरातीत ‘कोडमंत्र’ हे नाटक लिहिताना लेखिका स्नेहा देसाई यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्य घेत काही बदलही केले. भरत ठक्कर यांची निर्मिती व राजेश जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘कोडमंत्र’ या नाटकाने गेले वर्षभर गुजराती रंगभूमी दणाणून सोडली आहे. हे नाटक मराठीत कधीतरी येणार, हे नक्कीच होते. भरत ठक्कर, दिनू पेडणेकर, मुक्ता बर्वे या तिघांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘कोडमंत्र’ हे नाटक आता मराठी रंगभूमीवरही अवतरले आहे. या नाटकातील महिला वकिलाची महत्त्वाची भूमिका मुक्ता बर्वे करीत आहे.
इथे सहज एक आठवण झाली की, ‘कानजी व्हर्सेस कानजी’ हे गुजराती नाटक काही वर्षांपूर्वी सुयोग नाट्यसंस्थेने ‘कृष्णकन्हैया’ या नावाने मराठीत आणले होते. त्यात मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत होता. त्याही आधी गुजराती नाटककार मधु राय यांच्या ‘कोई भी फुल का नाम ले लो’ या नाटकाचे मराठी रूपांतर ‘आणि म्हणून कुणीही’ या नावाने मराठीत सादर झाले होते. त्या वेळी त्याचे दिग्दर्शन दिलीप कुलकर्णी यांनी केले होते. अलीकडेच पुन्हा मधु राय यांच्या ‘कोई भी फुल का नाम ले लो’ याच नाटकावरून ‘हा शेखर खोसला कोण आहे?’ नावाने नवीन मराठी नाटक भद्रकाली प्रॉडक्शनने आणले असून त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
‘कोडमंत्र’ या मराठी नाटकाचेही रसिकांनी स्वागत केले आहे. हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणे हे दिनेश उर्फ दिनू पेडणेकर, मुक्ता बर्वे, भरत ठक्कर यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट बनले होते. त्यापैकी दिनू पेडणेकर यांनी सांगितले, “कोडमंत्र या मराठी नाटकाचा पहिला प्रयोग बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात गेल्या १८ जून रोजी झाला. नाटक संपताना टाळ्यांचा कडकडाट आणि स्टँडिंग ओवेशन यासारखी प्रेक्षकांकडून मिळणारी दुसरी मोठी दाद नसते. ‘कोडमंत्र’च्या पहिल्या प्रयोगाला हा अनुभव माझ्यासकट सर्व कलाकारांनी घेतला. मी तर दुहेरी आनंदात आहे, एक स्टँडिंग ओवेशनचा आणि दुसरा स्वप्नपूर्तीचा... भरतभाई ठक्कर हे गुजराती भाषेतील ‘कोडमंत्र’चे निर्माते. ऑक्टोबर २०१५मध्ये या नाटकाचा शुभारंभ झाल्यापासून मी हे नाटक पाहावं यासाठी भरतभाई आठवड्यातून एक तरी फोन करायचेच, पण काही कारणांमुळे नाटक पाहण्याचा योग येत नव्हता. अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘कोडमंत्र’ पाहिलं आणि मी भारावूनच गेलो. मुक्ताला नाटकाच्या मध्यंतरातच फोन करून आपण हे प्राॅडक्शन मराठीत करणार आहोत, असं सांगून तिला नाटक लवकरात लवकर पाहायला सांगितलं. त्यानंतर हे नाटक पाहिल्यानंतर मुक्ताचीही सेम रिअॅक्शन.”
दिनू पेडणेकर म्हणाले, “कोडमंत्र नाटकाची निर्मिती करण्याचं निश्चित झाल्यानंतर भरतभाईंनी आम्हाला फक्त एकच अट घातली ती म्हणजे, नाटकाचं दिग्दर्शन ज्यांनी गुजराती ‘कोडमंत्र’चं दिग्दर्शन केलंय, ते राजेश जोशीच करतील. मी आणि मुक्ताने या विषयावर कोणतीही चर्चा न करता राजेश जोशी यांच्या नावाला लगेच मान्यता दिली. गुजराती भाषेतील लेखिका स्नेहा देसाईने लिहिलेलं एक दमदार नाटक ज्या दिग्दर्शकाने फक्त तीस बाय वीस फुटाच्या रंगमंचावर ब्रॉडवेवर दाखवल्या जाणाऱ्या नाटकांसारखं बसवून दाखवलं असेल, त्या दिग्दर्शकाच्या नावाला नाकारायचं काही कारणच नव्हतं. राजेशसरांनी किमान दोन महिने तालीम करून नाटकाचा आरंभ करायचं, असं सांगितलं. पहिला अंक बसवला की सेट लावून चार दिवस आणि दुसरा अंक झाला की परत सेट लावून चार दिवस. यानंतर परत छोट्या तालीम हाॅलमध्ये आणि शेवटचे पाच दिवस एखाद्या नाट्यगृहातील रंगमंचावर रंगीत तालीम. यात राजेशसरांची शेवटची पण महत्त्वाची अट होती, निर्मितीमूल्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही. भरतभाईंना गुजराती ‘कोडमंत्र’च्या निर्मितीचा अनुभव असल्यामुळे आणि आम्हीही निर्मितीच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्यामुळे राजेशसरांच्या सर्व अटी मान्य करून मिटिंग संपवली...”
कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक ह्यामधील पातळ सीमारेषा असलेल्या ‘कोडमंत्र’मध्ये अजय पुरकर कर्नल निंबाळकर, तर मुक्ता बर्वे महिला वकील अहिल्या हिच्या भूमिकेत आहेत. लष्करातील नियम, त्या लोकांची विचारसरणी, जीवनपद्धती, कोर्टमार्शलची यंत्रणा या सगळ्याचे दर्शन या नाटकातून प्रेक्षकांना घडते. हे नाटक गुजरातीतून मराठीत आणताना काही बदल करण्यात आले. गुजराती नाटकात राजपूत रेजिमेंटचा उल्लेख आहे, त्या ऐवजी मराठा रेजिमेंटचा उल्लेख करण्यात आला. पात्रांची नावे मराठमोळी करण्यात आली. मात्र नाटकाच्या कथानकात काहीच बदल करण्यात आलेला नाही. लष्करी नियम हे सारखेच असल्याने नाट्यरूपांतर करताना भाषेचा अडसर येण्याचा प्रश्नच नव्हता. गुजरातीप्रमाणेच मराठीतील `कोडमंत्र' नाटकात एकही ब्लॅकआऊट नाही. नाटकातील दृश्यांचा प्रवाह सलग सुरू राहतो. म्हटले तर मराठी नाटकांत हा एक आगळावेगळा प्रयोगही आहे.
----
एन.सी.सी.कॅडेट्सचाही सहभाग
‘कोडमंत्र’ नाटकाच्या मराठी आवृत्तीत ११ कलाकारांसोबत डोंबिवलीच्या के. व्ही. पेंढारकर कॉलेजमधील एन.सी.सी.चे १८ ते २० कॅडेट‌्सही काम करत आहेत. ‘कोडमंत्र’ची तालीम सुरू झाल्यानंतर विलेपार्ले येथील एका कॉलेजमधील एनसीसी विभागातील मुलांनी या नाटकात भूमिका करावी, म्हणून निर्मात्यांनी बोलणे केले होते. पण काही कारणाने ते बोलणे पुढे सरकू शकले नाही. आयत्या वेळी उद‌्भवलेल्या या प्रश्नावर मात करण्यासाठी मिलिंद अधिकारी पुढे सरसावले. त्यांनीच पेंढारकर कॉलेजमधील एनसीसीचे प्रमुख लेफ्टनंट उदय नाईक यांच्याशी संपर्क साधून तेथील काही कॅडेट‌्स नाटकात काम करतील, अशी व्यवस्था करून दिली.
----

Tuesday, June 21, 2016

डॉक्टरांना जाहिरात करु द्या! (दै. दिव्य मराठीच्या २१ जून २०१६च्या अंकात प्रसिद्ध)



दै. दिव्य मराठीच्या २१ जून २०१६च्या अंकामध्ये संपादकीय पानावर प्रासंगिक या सदरात मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची वेबपेज लिंक व टेक्स्ट, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/21062016/0/6/
--------
डॉक्टरांना जाहिरात करु द्या!
-------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
वैद्यकीय व्यवसाय हा व्यापार नव्हे तर सेवाभावी स्वरुपाचा व्यवसाय समजला जातो. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टरांनी अव्वाच्या सव्वा पैसे कमावू नयेत, रुग्णसेवेकडे सर्वाधिक लक्ष द्यावे अशी आजपर्यंतची धारणा होती. मात्र आता बदलत्या काळानूसार डॉक्टरांना ही बंधने मान्य नाहीत. डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात करण्याची परवानगी द्या असे मत देशामध्ये नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ७० टक्के डॉक्टरांनी नोंदविलेले आहे. १९५६च्या इंडियन मेडिकल कौन्सिलच्या कायद्याद्वारे या कौन्सिलचे सदस्य असलेल्या डॉक्टरांना काही विशिष्ट प्रसंग वगळता अन्य वेळी स्वत:ची जाहिरात करण्यास बंदी आहे. या कायद्यात २००१ सालापर्यंत तीन दुरुस्त्या झाल्या पण ही बंदी हटविली गेली नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही अॅलोपथी डॉक्टरांची संघटना आहे. होमिओपथी व आयुर्वेद डॉक्टरांच्या संघटना वेगळ्या आहेत. आता कायदेशीर गुंता असा आहे की, एमसीआयचे सदस्य नसलेल्या व इतर पथीच्या डॉक्टरांना १९५६चा वैद्यकीय कायदाच लागू होत नाही. त्यामुळे इतर पथीचे डॉक्टर प्रसारमाध्यमांतून स्वत:ची बिनदिक्कतपणे जाहिरात करताना दिसत आहेत. यातील काही जाहिराती या बोगस उपचार पद्धतींच्या असून त्यामुळे रुग्णांची दिशाभूल होत असते. पण त्याविरोधात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. अॅलोपथीच्या डॉक्टरांपैकी ज्याने नव्याने प्रॅक्टिस सुरु केली असेल अथवा विशिष्ट कारणामुळे काही काळ त्याला प्रॅक्टिस बंद ठेवायची असेल, प्रॅक्टिसची वेळ किंवा पद्धत बदलली असेल तर ठराविक नमुन्यामध्येच हे डॉक्टर प्रसारमाध्यमांत स्वत:ची जाहिरात करु शकतात. मात्र अन्य वेळी स्वत:ची जाहिरात करण्यास त्यांना १९५६च्या कायद्याद्वारे बंदी आहे. नेमकी हीच बाब अॅलोपथी डॉक्टरांना खटकत असल्याने त्यांनी सदासर्वकाळ स्वत:ची जाहिरात करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे. विविध पथीच्या मोठमोठाल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या जाहिरातीही प्रसिद्ध होताना दिसतात. ही हॉस्पिटल्स एमएसीआयचे सदस्य नसल्याने त्यांनाही जाहिरात करण्यापासून कायद्याने रोखता येणे कठीण आहे. मात्र डॉक्टर मालक असलेल्या नर्सिंग होमने जाहिरात केल्यास ते बेकायदेशीर ठरते. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असतात. पण त्यांच्या कौशल्याची माहिती रुग्णांना न होता फक्त हॉस्पिटलचा ब्रँड मोठा होत जातो. हे देखील आपल्या क्षेत्रात असाधारण कौशल्य मिळविलेल्या डॉक्टरांना खटकू लागले आहे. त्यातूनच अॅलोपथीच्या डॉक्टरांनी जाहिरातींच्या बाजूने चढा सुर लावला आहे. विशिष्ट आजार व त्यावरचे उपाय याबाबत कौशल्य वाढविलेल्या डॉक्टरांपैकी सगळेच डॉक्टर हे काही मोठमोठाल्या हॉस्पिटलशी संलग्न नसतात. काहीजणांचे स्वत:चे रुग्णालय व प्रॅक्टिस असते. आपला ब्रँड मोठा करावा ही प्रत्येकालाच इच्छा असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विशिष्ट आजारावरील उपायांबाबतची कौशल्यवृद्धी करण्यात तसेच स्वत:चा दवाखाना थाटून प्रॅक्टिस सुरु करण्यापर्यंत मजल गाठेपर्यंत डाॅक्टर वयाची पस्तीशी नक्की गाठतो. दवाखाना सुरु करण्यासाठी येणारा भांडवली खर्चही खूप मोठा असतो. मोठमोठाल्या रुग्णालयांच्या नावाखाली स्वत:चे अस्तित्व झाकून टाकण्यापेक्षा स्वतंत्रपणे व स्वबळावर वैद्यकीय व्यवसायात पाय रोवू इच्छिणाऱ्या डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात करु देणे हे उपकारक ठरु शकेल. या जाहिरातीत आपल्या वैद्यकीय कौशल्यासंदर्भात डॉक्टर जी माहिती देईल त्यातून रुग्णांना नेमके कोणत्या डॉक्टरकडे उपचारांसाठी जावे याचेही वाढीव भान येईल. त्याशिवाय जाहिरातीत नमुद केलेल्या कौशल्याप्रमाणेच डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार न केल्यास डॉक्टरांवर कारवाई करणे अधिक सुलभ होईल. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये दशकापूर्वी झालेल्या सर्वेक्षणानूसार एकुण ५२ मेडिकल स्पेशालिटिज होत्या. आता या स्पेशालिटिजमध्ये खूपच वाढ झाली आहे. त्यातून अचूक निदान व उपायांची शक्यताही वाढली आहे. वाढलेल्या स्पेशालिटिजमुळे वैद्यकीय क्षेत्रात स्पर्धाही निर्माण झाली. सुपरस्पेशालिटिज हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढू लागला. या बदललेल्या मानसिकतेकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया तसेच संसद सदस्यांना कानाडोळा करता येणार नाही. अॅलोपथी डॉक्टरांनी स्वत:ची जाहिरात केली तर तिचा खर्च ते रुग्णांच्या फीतून वसूल करतील अशीही भीती व्यक्त होते. पण या जाहिरातींमुळे रुग्णांना डॉक्टरांचे कौशल्य समजण्यास जी मदत होते तीही नजरेआड करुन चालणार नाही. त्यामुळे अॅलोपथी डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात सर्वका‌ळ करु देण्यास परवानगी देण्याचे पाऊल आता संबंधितांनी उचलायला हवे.
----

Monday, June 6, 2016

अखेरचे दोन वार - रामन राघववरील लेख ( दै. दै. दिव्य मराठीच्या दि. ५ जून २०१६ रोजीच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध)



दै. दिव्य मराठीच्या दि. ५ जून २०१६ रोजीच्या रसिक पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा हा लेख. त्याची लिंक सोबत दिली आहे. शिवाय रामन राघव या विषयावर माझ्या सहकार्यांचे आज प्रसिद्ध झालेले लेखही दिले आहेत.
रसिक स्पेशल - एक होता रामन राघव...
-----------------------------------------------------
अखेरचे दोन वार
- समीर परांजपे
Jun 05, 2016, 00:51 AM I
------------------------------
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-artic…
२५ ऑगस्ट १९६८ची ती रात्र. मुंबईतल्या मालाड उपनगरातील चिंचोली नाक्याजवळ असलेला डॉ. पुरुषोत्तम वासुदेव उर्फ पी. व्ही. मंडलिक यांचा ‘हिरा-माणिक’ बंगला. त्या लगत असलेल्या त्यांच्याच मालकीच्या म्हशींच्या गोठ्यामध्ये झोपलेल्या दोन उत्तर भारतीय कामकऱ्यांचा एका अज्ञात व्यक्तीने खून केला होता. मंडलिक यांच्या मालकीच्या वास्तूत भाडेकरू म्हणून राहात असलेल्या इनामदार कुटुंबातील किरण हे १९६८मध्ये अवघे तेरा वर्षांचे होते. त्यांना आजही तो दिवस लख्ख आठवतो आहे... किरण म्हणाले, ‘डॉ. मंडलिक हे प्रजा समाजवादी पक्षाचे नेते. त्यांच्याच म्हशींच्या गोठ्यात दोन खून झाल्याने साऱ्या मालाडभर हा चर्चेचा विषय झालेला. लालचंद जगन्नाथ यादव व दुलार जग्गी यादव अशी दोघा मृतांची नावे. वय साधारण २० ते ३५ वर्षे दरम्यानचे. ते गोठ्यातील सारी कामे करायचे. गोठ्यातच एका मोठ्या बाजेवर झोपायचे. तेथेच त्यांचा खून करण्यात आला. २६ ऑगस्ट १९६८ रोजी या दोन्ही यादवांचे मृतदेह पंचनाम्यासाठी सकाळी नऊ-दहापर्यंत तसेच तिथे होते. एक मोठे पोलिस अधिकारी तपासासाठी आले होते. मी त्यांच्याबरोबर गोठ्याच्या परिसरात गेलो होतो. गोठ्यातून दोन माणसांच्या अस्फुट किंचाळण्याचा आवाज बाबू बापू शिंदे व त्यांचा मुलगा रमेश या दोन पहारेकऱ्यांना रात्री आला होता. त्यांनी त्या जागी धाव घेतली, तेव्हा एक माणूस तिथून घाईघाईने नाला ओलांडून पळाल्याचे त्यांनी पाहिले. आणि गोठ्यात जाऊन पहारेकऱ्यांनी बघितल्यावर सारा भीषण प्रकार समोर आला होता. पुढे जी चर्चा कानावर पडली, त्यावरून हे लक्षात आले होते की, मुंबईत एक मनोविकृत माणूस फिरतोय, जो धारदार शस्त्राने व विशिष्ट पद्धतीने माणसांचे खून पाडतो. त्याच प्रकारे मंडलिकांच्या तबेल्यातही दोघांचे खून करण्यात आलेत.’
किरण इनामदार जणू तो काळच डोळ्यांपुढे आणून पुढे झरझर सांगू लागले. ‘२७ ऑगस्ट १९६८ रोजी रामन राघव नावाच्या विकृत माणसाला पकडल्याची बातमी त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत झळकली होती... मंडलिकांच्या मालकीच्या गोठ्यात केलेले दोन खून हे रामनने केलेले शेवटचे खून. त्यानंतर तो लगेचच पकडला गेला. म्हणजे त्याचे खूनसत्र याच तबेल्यात संपले होते.’ किरण इनामदार बोलत असताना समोरच नीला पटवर्धन बसलेल्या होत्या. डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या त्या प्रमुख आहेत. त्यांची दुसरी ओळख म्हणजे, मुक्ता दाभोलकर या प्रख्यात सामाजिक कार्यकर्तीच्या त्या सासूबाई. त्या म्हणाल्या, ‘रामन राघवने मंडलिकांच्या गोठ्यात जे दोन खून केले त्या वेळी मी मुंबईतच होते. पुढे मी जळगावला गेले. मात्र १९६८मध्ये खूनसत्र झाले तेव्हा मालाडमधील या जागेत मात्र आम्ही राहात नव्हतो, इतके पक्के आठवते.’ कृष्णाकाठी कुंडल ते उरले नाही असे म्हणतात, त्या प्रमाणेच मंडलिकांच्या त्या जागेत कोणे एकेकाळी असलेला म्हशींचा गोठा, तिथे रामन राघवने घातलेले रक्तथैमान या साऱ्या साऱ्या गोष्टी काळाने जणू पुसून टाकलेल्या आहेत. मंडलिकांच्या गोठ्याच्या जागी आता सोनमर्ग नावाची भलीमोठी इमारत उभी आहे. मात्र मंडलिकांच्या बंगल्याजवळ आजही एक मोठी विहीर आहे. खोल खोल विहीर, जिचा तळ पटकन िदसत नाही. पण खून करण्यासाठी आसुसलेल्या रामन राघवने या विहिरीत त्या वेळी डोकावून पाहिले असेल का? त्याला स्वत:चे हिंसक प्रतिबिंब या पाण्यात दिसले असेल का? असेही विचार मनात येऊन गेले. मंडलिकांच्या बंगल्यावरून पुढे आलो, ते चिंचोली नाक्यावर. समोर एक पेट्रोल पंप दिसत होता. त्याच्या शेजारी प्रशस्त हनुमान मंदिर होते. रामन राघव खटल्याच्या कागदपत्रांमध्ये वाचले होते की, या पेट्रोलपंपाच्या समोर त्या वेळी म्हणजे १९६८च्या सुमारास जय हनुमान नावाचे एक उडुपी हॉटेल होते. आता तिथे वृंदावन नावाचा रेस्टॉरंट बार सुरू आहे. मात्र रामन राघव पूर्वीच्या या जागी असलेल्या जय हनुमान हॉटेलमध्ये नेहमी चहा प्यायला यायचा. रामनला पकडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या ओळख परेडमध्ये जय हनुमान हॉटेलच्या संजीवा शेट्टी या मालकाने त्याला बरोबर ओळखले होते. पुढे या शेट्टीने तशी साक्षही न्यायालयात दिली होती...
मालाडच्या चिंचोली नाक्याहून रेल्वे स्टेशनकडे परतताना मंडलिकांचा बंगला, ते वृंदावन हॉटेल असे सारे डोळ्यासमोर तरळून गेले. रामन राघवचा चेहरा तेवढा आ‌ठवत नव्हता. तसेही त्याला कधी पाहिलेही नव्हते. एरवी हिंसक, रक्ताळलेले वास्तव कुणाला आठवायला आवडेल?
paranjapesamir@gmail.com
-----------
वन टाइट स्लॅप !
- विनोद तळेकर
‘रामन राघव २.०’ येतोय... दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि गुणाढ्य नट नवाजुद्दिन सिद्दिकी त्याचे रुपेरी पडद्यावरचे कर्ता-धर्ता आहेत...
आजची पिढी एक थ्रीलर म्हणून हा सिनेमा एन्जॉय करील, पण १९६०च्या दशकाच्या अखेरीस राघव हे मुंबई शहरातलं थरकाप उडवणारं वास्तव होतं...
एका पाठोपाठ एक ४२ खून करणारा राघव मुंबई पोलिसांसाठी सर्वार्थाने आव्हान ठरला होता. त्याची केस पोलिस दल आणि कायद्याच्या दृष्टीने ‘लँडमार्क’ केस ठरली होती. आज जवळपास ५० वर्षांनंतर या सिनेमाच्या निमित्ताने जुन्या पिढीतल्या अनेकांच्या या मनोरुग्ण गुन्हेगाराशी जोडलेल्या आठवणी जाग्या झाल्या आहेत...
या पार्श्वभूमीवर रामनला जेरबंद करणारे आणि आता वयाच्या नव्वदीत असलेले निवृत्त अधिकारी अॅलेक्स फियालो, त्या वेळी बचाव पक्षाचे वकील असलेले अॅड. एस. आर. चिटणीस, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद पाटकर आणि राघवने केलेल्या शेवटच्या दोन खुनाच्या आठवणी मनात आजही ताज्या असलेले किरण इनामदार, नीला पटवर्धन यांना भेटून रामन राघवचा भूूतकाळ नव्याने जिवंत करणारी, ही स्पेशल कव्हरस्टोरी...
ते दिवसच असे होते की, फक्त पोलिसच नव्हे तर सर्वसामान्य लोकही चोवीस तास या एका सिरियल किलरचाच विचार करत. नाक्यावर-घरात-ऑफिसात लोकांच्या शिळोप्याच्या गप्पांमध्येही त्याचाच विषय असे. कुणी म्हणे त्याच्याकडे मायावी शक्ती आहे, तर कुणी म्हणे तो प्राण्याचे रूपही घेतो, आणखी कुणी तरी त्याला उंच झाडावर झोप घेताना पाहिल्याचे सांगे. एका अनामिक भीतीने संध्याकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यावर सामसूम होई. आया आपल्या मुलांना लवकर झोपा नाहीतर ‘तो’ येईल, अशी भीती घालत. तरणीताठी पोरं हातात लाठ्याकाठ्या घेऊन रात्री-बेरात्री रस्त्या-रस्त्यांवर गस्त घालत. सोबतीला शहरभरात तब्बल दोन हजार पोलिस रोज डोळ्यात तेल घालून त्याचा शोध घेत, पण पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डमधल्या फोटोतला तो काही हाती लागत नव्हता. मात्र, कुणी त्याच्याचसारखा दाढीधारी संशयास्पद हालचाली करताना आढळला की, पोलिस त्याला पोलिस ठाण्यात आणून चोप देत...
त्याने लोकांचे चश्मे चोरले, कुणाच्या तरी बिड्या चोरल्या, इतकंच नव्हे तर हातशिलाई करताना सुई टोचून इजा होऊ नये म्हणून बोटावर लावण्याची टोपणं म्हणजे अंगुस्तानंही त्याने चोरली... असा हा भुरटा चोर मरेपर्यंत तुरुंगात होता. विशेष म्हणजे, त्याला पकडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यालाही त्याची केस आपल्या पोलिस कारकिर्दीतली सर्वात मोठी कामगिरी असल्याचे वाटत होते... कारण काय, तर या चोराने या भुरट्या चोऱ्या करताना निर्घृणपणे खून केले होते. थोडेथोडके नव्हे तर चक्क ४२ खून... आणि त्या आरोपीचे नाव होते, रामन राघव... ज्याने सत्तरच्या दशकात मुंबईची झोप उडवली होती, तोच हा सिरियल किलर रामन राघव उर्फ सिंधी दलवाई उर्फ थंबी...
“माझ्या पोलिस कारकिर्दीत मी हाताळलेल्या केसेसपैकी ही सर्वांत बेस्ट. कारण ज्याच्या मागे संपूर्ण पोलिस खाते लागले होते, त्या सिरियल किलरला मी पकडले होते...’ वयापरत्वे सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील सोनेरी चश्म्याआडच्या हसऱ्या आणि चमकदार डोळ्यांचे अॅलेक्स फियालो सांगत होते... वय नव्वद वर्षे. बरेचसे विरळ झालेले पांढरे केस... ओठांच्या शेवटाकडे उतरत जाणाऱ्या पांढऱ्या मिशा... काळा-पांढरा चेक्सचा शर्ट आणि राखाडी रंगाची ट्राऊझर घातलेल्या फियालोंच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता...
२७ अॉगस्ट १९६७ची ती एक पावसाळी सकाळ होती... दक्षिण मंुबईच्या भेंडी बाजार नाक्यावर सकाळची नेहमीची वर्दळ... कामावर जाणाऱ्यांच्या गर्दीतच फूटपाथवरच्या ठेलेवाल्यांची दुकान मांडण्याची लगबग सुरू होती. ताज्या फुलांचा, गरमागरम भजीचा, कोऱ्या वर्तमानपत्रांचा, दुकानांमधील अगरबत्त्यांचा आणि कसल्याशा धुराचा, असे सगळे गंध एकमेकांमध्ये मिसळून सकाळचे वातावरण तयार झाले होते... मधूनच अंडी आणि पाववाल्यांच्या सायकलची ट्रिंग ट्रिंगही ऐकू येत होती आणि गर्दीतून वाट काढणाऱ्या हातगाडीवाल्यांचे किनाटी आवाजही…
बरेच दिवस पावसाने दडी मारल्याने सकाळी आठ वाजताही वातावरणात उष्मा जाणवत होता... अशा बाष्पयुक्त वातावरणात त्या वेळी वयाच्या चाळिशीत असणारे डोंगरी पोलिस ठाण्यातले डे पीएसआय म्हणून अॅलेक्स फियालो आपल्या बीटमध्ये सकाळच्या गस्तीला एकटेच चालत निघाले होते... एसव्हीपी रोडच्या नाक्यावरून ते मुख्य रस्त्याच्या दिशेने ‌‌वळले, तोच समोरून निळा शर्ट आणि खाकी हाफ पँट घातलेला, हातात लांबलचक छत्री धरून चाललेला इसम त्यांच्या दृष्टीस पडला. त्याने तपकिरी रंगाचे कॅनव्हास शूज घातले होते. एरवी, त्या माणसाकडे पाहिल्या न पाहिल्यासारखे करत कदाचित फियालो पुढे गेले असते; पण त्याच्या हातातील छत्रीमुळे त्यांचे कुतूहल चाळवले. गेले पंधरा-वीस दिवस पावसाने दडी मारलेली असतानाही हा इसम छत्री घेऊन का बाहेर पडला, अशी सहज शंका त्यांच्या डोक्यात येऊन गेली. आता तो अगदी दहा-बारा पावलांच्या अंतरावर येऊन ठेपला. जवळ येताच त्याची शरीरयष्टी चांगलीच मजबूत असल्याचे फियालोंच्या लक्षात आले. अखेर त्या माणसाची आणि फियालोंची नजरानजर झाली.
काही पावले पुढे भेंडीबाजार जंक्शनच्या दिशेने निघून गेलेल्या त्या माणसाकडे वळून फियालाेंनी हाक मारली... ‘अरे, भाईसाब जरा रुको’ त्यांच्या या वाक्यावर तो माणूस जागीच थबकला.. ‘जरा इधर आओ’ किंचत दरडा‌वणीच्या सुरात फियालो पुन्हा बोलले. तसा तो माणूस फियालोंच्या जवळ आला. तो ज‌वळ येताच त्याच्या शर्टवरील खांद्याच्या वर मघाशी लांबून न दिसलेला रक्ताचा एक डाग फियालोंंच्या दृष्टीस पडला. ‘चलो जरा मेरे साथ, तुमसे काम है’ असे उद‌्गारत फियालो जवळच असलेल्या आपल्या पोलिस क्वार्टर्सच्या दिशेने चालू लागले. तो माणूसही पाऊलभर अंतर ठेवून त्यांच्या मागोमाग येऊ लागला. चालता चालता फियालोंच्या मनात पुन्हा विचारांचे थैमान सुरू झाले. हा तोच आहे का? ज्याने तमाम पोलिसांची झोप उडवलीय... सिरियल किलर रामन राघव…पण त्याला तर दाढी होती… विचारांच्या तंद्रीत असताना ते आपल्या घराच्या इमारतीच्या खाली पोहोचलेसुद्धा... पाठोपाठ तो माणूसही...
कुलाब्याच्या नाजू मेन्शनमधील घराच्या प्रशस्त दिवाणखान्यात बसून फियालो आपल्या आयुष्यातील सर्वात थरारक, रोमांचक नि यशस्वी दिवसाचे वर्णन करत होते. उत्साहपूर्ण आवाजात ते पुढची कहाणी सांगू लागले... ‘माझ्या घराखाली त्या वेळी एक टेलिफोन बुथ होता. त्याच्या मागच्या बाजूला उभे करून मी त्याची अंगझडती घेतली. त्याच्या अंगझडतीनंतर त्याच्याकडे छत्री वगळता दुसरे कोणतेही हत्यार नाही, अशी माझी खात्री पटली आणि मी निश्चिंत झालो. खरे तर रामन राघवचा फोटो त्या वेळी माझ्या युनिफॉर्मच्या वरच्या उजव्या खिशात होता. तो पडताळून मी खात्री करून घेऊ शकलो असतो; पण मी त्याला अोळखले आहे, हे मी त्याला जाणवू देऊ इच्छित नव्हतो... म्हणून तसे न करता मी त्याचे नाव विचारले, त्यावर तो उत्तरला, ‘साब मेरा नाम सिंधी दलवाई है...’ बस्स... त्याने हे शब्द उच्चारताच माझी खात्री पटली... आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. मग मी त्याच टेलिफोन बुथवरून डोंगरी पाेलिस ठाण्यात फोन लावला. पोलिस व्हॅन आल्यानंतर रामन राघवला गाडीत घातला. एव्हाना रामन राघव पकडल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने पोलिस ठाण्याभोवती हजारो लोक जमले होते. आत जाताच मी ड्युटी ऑफिसरला पोलिस ठाण्याची दोन्ही गेट बंद करण्याचे आदेश दिले. कारण ठाण्याबाहेर जमलेले लोक रागाच्या भरात आत येण्याचा धोका होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ताबडतोब फिंगर प्रिंट एक्सपर्टला फोन केला. काही वेळातच एक्सपर्टने पडताळणी करत सांगितले की, ‘फियालो साब यू हॅव गॉट द राईट मॅन... हा रामन राघवच आहे.’
२७ अॉगस्ट १९६७च्या त्याच सकाळी रामन राघवला अटक केल्याच्या दोन तासानंतर दहाच्या सुमारास तत्कालीन पोलिस आयुक्त मोडक यांच्या कार्यालयातील दूरध्वनी खणाणला. क्षणाचाही वेळ न घालवता त्यांनी रामन राघव केसवर काम करणाऱ्या वाकटकर आणि पेंडसे या आपल्या दोन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तडक डोंगरी पोलिस ठाणे गाठले. तेव्हा एका लाकडी बाकड्यावर बसलेल्या रामन राघवला एक फोटो दाखवत पीएसआय फियालो काही प्रश्न विचारत होते… बोल इसको पैचानता है तुम? खरं तर तो त्याचाच फोटो होता. पण तरीही आपण त्या व्यक्तीला जणू ओळखतच नसल्याच्या आविर्भावात रामन राघव उत्तरला, पैचानता नही, मगर अपुनके माफिकीच दिखताय… हे उत्तर संपतंय ना संपतं तोवर फियालोंनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवत, ‘वन टाइट स्लॅप’ म्हणजेच खाडकन एक थप्पड त्याच्या मुस्काटीत ठेवून दिली. हा असा बोलणार नाही, हे लक्षात येताच मोडक साहेब पुढे सरसावले आणि रामन राघवच्या पुढील चौकशीसाठी त्याला सीआयडीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले… साधारण वर्षभरापूर्वी भुरट्या चोऱ्यांच्या आरोपांखाली रामन राघवला घाटकोपर पोलिसांनी तडिपार केले होते. त्या वेळी काढलेले त्याचे फोटो आणि हातांचे ठसे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये होते. त्या फोटोत रामन राघवला दाढी होती, आता मात्र त्याने दाढी कापली होती.
मुख्यालयात येताच पुण्यातल्या जोशी अभ्यंकर खून खटल्याचा यशस्वी तपास करणाऱ्या वाकटकर-पेंडसे जोडीने रामन राघवचा ताबा घेतला. ‘हे सर्व खून तू केलेस हे आम्हाला माहीत आहे. आता ते कसे केलेस, हे सांगण्यासाठी तुला आमच्याकडून काय हवे ते सांग.’ वाकटकर यांच्या या काहीशा अडनिड्या प्रश्नावर, ‘मला एक कोंबडी हवीय खायला’ असे तितकेच चमत्कारिक उत्तर त्याने दिले. कोंबडी खाऊन झाल्यावर आता मला बाई हवीय; पण तुमचा कायदा कदाचित या गोष्टीला परवानगी देणार नाही, असे स्वत:च सांगत त्याने मग केसाला लावण्यासाठी तेल, एक कंगवा आणि आरसा मागवला. मग काही वेळ त्याने साग्रसंगीत केसांना तेल लावले, बराच वेळ केस विंचरले आणि शेवटी पोलिसांकडे वळून तो म्हणाला, ‘आता बोला काय विचारायचेय तुम्हाला? मी सगळे सांगतो...’ रामन राघवच्या अटकेनंतर मुंबईतील हत्यांचे सत्र आपोआप थांबले. सोबतच ‘रामन राघवला कधी पकडणार’ अशी पोलिसांना पाहून सर्वसामान्य करत असलेली शेरेबाजीही थांबली... या धाडसी कामगिरीसाठी फियालोंना पोलिस अायुक्त मोडक यांनी त्या वेळी तब्बल एक हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले. तसेच पोलिस खात्याचे बायबल समजले जाणाऱ्या पोलिस जर्नलमध्ये एक माईलस्टोन केस म्हणून रामन राघव केसचा आणि फियालाेंच्या कामगिरीचा समावेश केला गेला...
talekarvinod@gmail.com
घटनाक्रम
१९६५ ते १९६८ :
बहिनिचा आणि एका मित्राचा खुन केल्यानंतर रामन राघवने जवळपास चाळीसएक खून हे मुंबई आणि उपनगरात केले
२५ ऑगस्ट - २६ ऑगस्ट १९६८ :
चिंचोली फाटक (मालाड-मुंबई) येथे रामन राघवकडून दुहेरी खून.
२७ ऑगस्ट १९६८ :
भेंडीबाजार येथे अॅलेक्स फियालो, पोलिस उपनिरीक्षक यांनी अटक केली.
१३ ऑगस्ट १९६९ :
गिरगाव कोर्टाने देहदंडाची शिक्षा ठोठावली. आणि या शिक्षेच्या confirmation करिता उच्च न्यायालयात पाठविले.
ऑक्टोबर १९६९ :
उच्च न्यायालयाने मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक केली आणि पॅरॉनॉइड स्किझोफ्रेनियाचे निदान झाले. आरोपीच्या विरोधात सुरू असलेला खटला आणि त्याची कार्यवाही कळत नसल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी आरोपीची येरवडा येथे रवानगी.
१९ फेब्रुवारी १९७५ :
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचे म्हणणे ग्राह्य धरले व सरकारचे अपील फेटाळले.
४ ऑगस्ट १९८७ :
सत्र न्यायालयाचा रामन राघव याच्या फाशीचा निर्णय रद्दबादल करण्यात आला. त्याऐवजी आजन्म कारावास ठोठावण्यात आला.
१९९५ :
रामन राघव याचा पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू.
क्रूरतेचा कळस
१९२९मध्ये तामीळनाडूच्या एका छोट्याशा शहरात जन्मलेल्या रामनला लहानपणापासूनच भुरट्या चोऱ्या करण्याची सवय जडली होती. क्रोबार म्हणजे सब्बल नामक ‘एल’ आकाराच्या लोखंडी भरीव रॅाडने तो झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर आठ ते दहा प्रहार करत असे. त्याने आपल्या कबुलीजबाबात एका तिहेरी खुनाचे केलेले वर्णन त्याची क्रूरता स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. त्या जबाबात राघव म्हणतो, ‘ एके दिवशी मी एक नवीन झोपडी पाहिली. आत डोकावून पाहिले तर एक बाई आणि तिचे मूल झोपले होते. बाईच्या गळ्यात सोन्याची माळ दिसली. मग मी तिच्यावर नियमित नजर ठेवून राहिलो. एके रात्री तिच्या झोपडीच्या दाराची दोरी कापून मी आत घुसलो. ती, तिचा पती आणि तिचे मूल झोपले होते. मी सब्बलने तिच्या पतीच्या डोक्यावर प्रहार करू लागलो. पाच-सहा फटक्यांत तो मेला. पण झालेल्या झटापटीमुळे ती महिला आणि तिचा मुलगा उठून आरडाओरड करू लागले. मग मी त्या दोघांनाही त्याच पद्धतीने खलास केले...
रामन राघवचे वकील...
रामन राघव तुरुंगात असताना तब्बल १९ वर्षानंतर कारागृह प्रशासनाच्या मानसिक आरोग्य केंद्राच्या अधिक्षकांनी त्याच्या मानसित स्थितीबाबत एक अहवाल दिला. ज्यात रामन राघव हा आता मानसिकदृष्ट्या ठीक असून त्याचावर उच्च न्यायालयात खटला चालवण्यास हरकत नसल्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयात पुन्हा खटला उभा राहिला. बचाव पक्षाचे म्हणजे रामन राघवचे वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस. आर. चिटणीस यांची नियुक्ती झाली. पहिल्या मुलाखतीत तो अगदी सामान्य वाटला. आपण केलेल्या सर्व हत्यांबाबत त्याने न अडखळता सर्व माहिती सांगितली. पण दुसऱ्या मुलाखतीत मात्र तो मनोरुग्ण असल्यासारखा जाणवला