Thursday, March 13, 2014

हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी ( दैनिक सामना - १५ एप्रिल २००२)

हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी या लेखाचा मुळ भाग



-----------


हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी या लेखाचा उर्वरित भाग



----------

आशिया खंडातील पहिली `आगगाडी भारतातील बोरिबंदर ते ठाणे या लोखंडी सडकेवर १६ एप्रिल १८५३ साली धावली. त्या घटनेला १६ एप्रिल २००२ रोजी १४९ वर्षे पूर्ण झाली. व भारतातील आगगाडीने १५०व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त १५ एप्रिल २००२ रोजी मी दैनिक सामनामध्ये पान क्र. १ वर आगगाडीच्या इतिहासाबद्दल एक लेख लिहिला होता. त्या लेखात आगगाडीबद्दल मराठीमध्ये जी पुस्तके आली त्यांचीही साद्यंत माहिती दिली होती.
-----------
हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी
----------  
- समीर परांजपे
---------

आशिया खंडातील पहिली `आगगाडी भारतातील बोरिबंदर ते ठाणे या लोखंडी सडकेवर १६ एप्रिल १८५३ साली धावली. विज्ञानाच्या या चमत्काराने अलम मराठी जगामध्ये प्रतिभेचे नवनवे उन्मेष साकारु लागले. `हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी असे काव्यही या घटनेवर करण्यात आले. गोविंद नारायण माडगावकर, कृष्णशास्त्री भाटवडेकरांसारख्या दिग्गजांनी `आगगाडी या विषयावर सर्वप्रथम मराठी पुस्तके लिहून वेगळी वाट निर्माण केली. आगगाडीसारख्या विषयानेदेखील मराठी साहित्यात गेल्या दीडशे वर्षांत मोलाच्या पुस्तकांची भर घातलेली आहे.
आगगाडी या विषयावर मराठीतील सर्वात पहिले पुस्तक `लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन हे होय. डाँ. लाँर्डनर यांच्या `रेल्वे इकाँनाँमी या इंग्रजी पुस्तकातील निवडक भागाचे कृष्णशास्त्री भाटवडेकर यांनी मराठी भाषांतर करुन त्यातून `लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन हे पुस्तक १८५४ साली म्हणजे आगगाडी धावू लागल्यानंतर लगेचच एक वर्षाने प्रसिद्ध करण्यात आले. दुष्काळ पडल्यास धान्याची त्वरित ने-आण करता येणे, आगगाडीचा मार्ग जेथून जाईल त्याच्या जवळपासची गावे भरभराटीला येणे, पूर्वी धनिकांना परवडू शकणार्या काशी, पंढरपूर, हरिद्वार, प्रयाग इत्यादी तीर्थक्षेत्रांची यात्रा गरीबांनाही अल्पखर्चात करता येणे असे आगगाडीचे अनेक फायदे कृष्णशास्त्री भाटवडेकरांनी आपल्या पुस्तकात सांगितले आहेत.
मुंबईचे आद्य इतिहासकार गोविंद नारायण माडगावकर यांनी युनायटेड स्टुडंटस् असोसिएशन या संस्थेपुढे `आगगाडीया विषयावर १५ मार्च १८५८ रोजी दिलेले भाषण लोखंडी सडकांचे चमत्कार या नावाने पुस्तकरुपाने त्याच वर्षी प्रकाशित झाले. माडगावकरांनी या पुस्तकात हिंदुस्थानातील आगगाडीच्या आगमनाबाबत सर्वसामान्य लोकांच्या गंमतीदार प्रतिक्रिया नोंदविलेल्या आहेत. आगगाडीला `चाक्या म्हसोबाम्हणून संबोधण्यात येत असे. मुंबई ते कल्याण-खोपोली दरम्यान आगगाडीचे रुळ बांधण्यास प्रारंभ झाला, तेव्हा कित्येक अज्ञानी लोकांनी अनेक अफवा उठविल्या. रुळ बांधण्याच्या कामात दांपत्याचे बळी दिले जातात, कुठे कुठे लहान मुलांना रेल्वे रुळाखाली गाडले जाते, खोपोलीच्या रुळांजवळ एक राक्षस लपलेला आहे, या राक्षसाला बळी देण्यासाठी ब्रिटिश सैनिक बारा दांपत्यांच्या शोधात आहेत अशा एक ना अनेक अफवा उठविल्या जात. थोडक्यात आगगाडीकडे लोक भय व कुतुहलमिश्रित नजरेनेच पाहात होते. १८५३ साली आगगाडी सुरु झाल्यानंतर तिचे महत्त्व जनमानसात रुजायला लागले. जे लोक क्षुद्रांच्या हातचे पाणीही पित नसत ते लोक आगगाडीतील प्रवासात परस्परांना पाणी व खाद्यपदार्थ देऊ लागले. अनेक जातीचे लोक, स्त्री-पुरुष हे सर्व एकत्रितपणे प्रवास करु लागले. आगगाडीने भारतीय समाजजीवनात अबोलपणे जणू क्रांतीच घडविली होती. गोविंद नारायण माडगावकर यांनी १८६६ साली लिहिलेल्या मुंबईचे वर्णन या पुस्तकातही लोखंडी सडका या शीर्षकाखाली आगगाडीवर एक स्वतंत्र प्रकरणच आहे.
कवींची प्रतिभा फुलली
आगगाडीच्या या चमत्कारांमुळे मराठी मुलुखातील कवींच्या प्रतिभाशक्तीसही उन्मेषाचे नवे अंकुर फुटले. गोविंद नारायण माडगावकर यांनी मुंबईचे वर्णन या आपल्या पुस्तकात कटाव या शीर्षकाखाली आगगाडीच्या आगमनाचे वर्णन करणारी एक कविताच दिलेली आहे. कवितेचा कर्ता म्हणतो...
हिंदुस्थानी आगीची गाडी,
तिला बांधला मार्ग लोखंडी
मनाचाही वेग मोडी
मग कैची हत्ती घोडी
पाहुनी झाले माणसे वेडी
पाऊण तासात ठाण्यास धाडी
आधी निघाली युरोपखंडी
प्रसार मोठा तिचा लोखंडी
तेथून आली भरतखंडी
अजून पसरेल पिंडी ब्रहमांडी
वृद्ध तथापि, म्हणती लबाडी
गरीबांचा व्यापार मोडी
हिंदुस्थानाला दरिद्र जोडी
ऐसे म्हणती हिंदूखंडी
तिचा महिमा अखंडदंडी
किती वाणू मी पामरतोंडी
लोखंडी रस्ता झाला, व्यापार वाढावया
लोहमार्ग आणि आगगाडी
दुसर्या एका कवीने वाफेच्या इंजिनाचे वर्णन करताना म्हटले आहे...
आता फुंकितसे तसे घडतसे पोलाद लावूनही
हातोड्या करुन अशोधित पिटी धासू परी मी नाही
लोहारादि बरे की मी दळतसे नाणेही पाडितसे,
चक्राते फिरवी न वाचित असा के वृत्त छापितसे.
आगगाडी खात्यातील कर्मचार्यांसाठी अलिबाग तालुक्यातील जिराड येथे राहाणार्या विष्णु चिमणाजी कर्वे यांनी लोहमार्ग आणि आगगाडी हे पुस्तक १८७९ मध्ये लिहिले. त्यात उपरोक्त कविता दिली आहे. या पुस्तकात इंग्लंडमधील, भारतातील रेल्वेचा इतिहास, रेल्वेच्या वाफेयंत्रांसहित सर्व बारीकसारीक यंत्रसामुग्रीची सुबोध शैलीत माहिती व आकृत्या देण्यात आलेल्या आहेत. आगगाडीची तांत्रिक माहिती देणारे हे मराठीतील बहुधा पहिले पुस्तक असावे.
११ पुस्तके प्रकाशित
मुंबईसह महाराष्ट्रात आगगाडीचा प्रसार असा पहिल्यांदा झाला तसेच आगगाडी या विषयावर देशी भाषांमध्ये सर्वात पहिली पुस्तके मराठीतच निघाली. १५ सप्टेंबर १८३०मध्ये जगातील पहिली आगगाडी इंग्लंडमध्ये धावली. १८५३मध्ये तिथे हिंदुस्थानात `चाके रोवली. त्यानंतरच्या दीडशे वर्षांत आगगाडी या विषयावर आजतागायत ११ मराठी पुस्तके निधाली. त्यामध्ये चित्रमय विज्ञान : आगगाडी आणि मोटारगाडी (लेखक विज्ञानविहारी १९६१), आपल्या आगगाड्यांची कहाणी (जगजितसिंह, १९७१) रेल्वे अभियांत्रिकी (वसंत गोवर्धनदास डिसा, १९७६), भारतीय रेल्वे (अ. ज. सहस्त्रबुद्धे, १९७८), भारतीय लोहमार्ग (अनंत शंकर आठवले, १९७८), वाहने एक वरदान (भय्यासाहेब ओंकार), कोकण रेल्वे (सतीश कामत, १९९४), कोकण रेल्वे आणि विकासाची दिशा (गोपाळ दुखंडे, संध्या म्हात्रे, १९९४) या पुस्तकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कोकण व घाटमाथ्याला जोडणार्या आगगाडीने अनेकांचे भावविश्वही फुलविले. त्यातूनच ग. दि. माडगुळकरांनी `झुकझुक आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी', रमेश अणावकर यांनी प्रेयसीला साद घालत `हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांगो चेडवा कसा दिसता कसो खंडाळ्याचो घाट' अशी मयुरपंखी गाणी लिहिली. आगगाडीवरील कुसुमाग्रजांची एक कविताही अशीच `रुळ'लेली आहे. थोडक्यात १५० वर्षांपूर्वी मुंबईत सुरु झालेली आगगाडी आता मराठी जनांसाठी `लोकल झाली आहे.
----------

No comments:

Post a Comment