Sunday, March 30, 2014

मानवी हक्क आयोगापुढील आव्हान (दैनिक लोकसत्ता - १८ आँक्टोबर १९९३)



राष्ट्रपती डाँ. शंकर द्याळ शर्मा यांनी दि. २९ सप्टेंबर १९९३ रोजी एका वटहुकुमाव्दारे दिवाणी न्यायालयाचा दर्जा लाभलेल्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. देशातील विविध राज्यांत या मानवी हक्क आयोगाच्या विविध उपसमित्या कार्यरत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मी दैनिक लोकसत्तामध्ये १८ आँक्टोबर १९९३ रोजी लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
      
मानवी हक्क आयोगापुढील आव्हान


 -       समीर परांजपे

राष्ट्रपती डाँ. शंकर द्याळ शर्मा यांनी दि. २९ सप्टेंबर १९९३ रोजी एका वटहुकुमाव्दारे दिवाणी न्यायालयाचा दर्जा लाभलेल्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. देशातील विविध राज्यांत या मानवी हक्क आयोगाच्या विविध उपसमित्या कार्यरत होणार आहेत. आपल्या परिसरात अशा अनेक घटना घडत असतात की त्यामध्ये मानवी हक्क दडपले जातात. त्या गैरप्रकारांची चौकशी करण्याचा अधिकार मानवी हक्क आयोगाला प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग सर्वसमावेशक व्हावा यासाठी सदर आयोगावर मागासवर्गीय, अल्पसंख्याक इ. वर्गांचे प्रतिनिधी घेण्यात आले आहेत. या आठ सदस्यीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्षपद भारताचे माजी सरन्यायाधीश भूषवितील. गेल्या १६ महिन्यांच्या साधक-बाधक चर्चेतून हा आयोगाची स्थापना करण्यात आली असे सांगण्यात आले असले तरी या आयोगाच्या कार्यकक्षा व कार्यक्षमतेबाबत आत्तापासूनच शंका-कुशंका व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. सोव्हिएत रशियातील साम्यवादी राजवट कोसळल्यानंतर सर्व जगात अमेरिका ही एकच बलाढ्य शक्ती ठरली आहे. त्यामुळे नेहरुंच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या अलिप्ततावादी चळवळीलाही आता फारसा अर्थ उरलेला नाही. भारताला अमेरिका आणि आशिया खंडातील हितशत्रू राष्ट्रे यांच्याशी आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या पातळीवर आता वेगळ्या पद्धतीने लढा द्यावा लागणार आहे. या आंतरराष्ट्रीय दडपणाचा परिपाक म्हणूनच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली.
मानवी हक्क
Human rights are those conditions of social life without which no man can seek to be himself at his best. असे मानवी हक्कांचे वर्णन प्रख्यात राज्यशास्त्रज्ञ लास्कीने केले आहे. मानवी हक्कांमध्ये अन्न्, वस्त्र, निवारा तसेच प्रत्येक नागरिकास आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात समान न्याय मिळणे या गोष्टी अंतर्भूत होतात. राज्यशास्त्राच्या सिद्धांतानूसार मुलभूत हक्कांमध्येही याही गोष्टी समाविष्ट होतात. राज्यशास्त्रात मुलभूत हक्कांना घटनात्मक संरक्षण दिलेले आहे. मानवी हक्क हे नैतिकतेच्या पायावर आधारलेले असल्याने त्यांचा समावेश राज्यशास्त्रज्ञ मुलभूत हक्कांमध्येच करतात. इ.स.वि.सन १२१५मध्ये इंग्लंडच्या किंग जाँनने नागरिकांच्या दडपणामुळे मॅग्ना चार्टा ही मानवी हक्कांची जपणूक करणारी सनद प्रसृत केली. मानवी हक्कांच्या संरक्षणाचा प्रारंभ या घटनेपासून खर्या अर्थाने सुरु झाला. ४ जुलै १७७६च्या काँन्टिनेन्टल परिषदेत अमेरिकेने स्वातंत्र्याचा जाहीरनामा मंजूर केला. या जाहीरनाम्यात मानवी हक्कांसंबंघी केलेले विश्लेषण मूळ शब्दांत देणेच योग्य ठरेल. हा जाहीरनामा म्हणतो `We hold these truths to be self evident that all men are created equal that they are endowed  by their creator with certain inalienable rights that among these are life, liberty and the persuit of happiness.’ फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये सध्या समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्त्वांचा उद्घोष करण्यात आला. फ्रान्समध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या राज्यघटनेत (५ वे रिपब्लिक) या तत्वांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. मॅग्ना चार्टा ते फ्रेंच राज्यक्रांती या टप्प्याने युरोप-अमेरिका खंडात मानवी ह्क्कांच्या जपणुकीविषयी विशेष आस्था निर्माण झाली होती. या दोन्ही खंडांतील देश हे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या प्रगतीशील प्रकृतीचे असल्याने मानवी हक्कांविषयी विचार करण्याची उदारता त्यांच्यात आली होती. पण मानवी हक्कांना नैतिकतेचे बंधन असल्याने त्यांच्या जपणुकीची भाषा करणार्या ग्रेट ब्रिटनसारख्या लोकशाहीवादी राष्ट्राने आपल्या वसाहतवादी तंत्राने आफ्रो-आशियाई देशांतल्या नागरिकांची मानवी हक्कांची हेळसांड केली होती. भारतीय स्वातंत्र्यलढा हा मानवी हक्कांच्या संरक्षणासाठीच केलेला एक संघर्षमय टप्पा आहे.
भारतातील जागृती
फ्रान्स, रशियाची ब्रेझनेव्ह राज्यघटना (१९७७), चीनची राज्यघटना (१९८२), जपानी राज्यघटना (१९४७) या चार- पाच राज्यघटनांत मानवी हक्कांच्या रक्षणाचे महत्व चांगल्या प्रकारे वर्णिलेले आहे. मात्र हा आदर्शवाद व्यवहारात आणायला ही प्रागतिक राष्ट्रे फारशी उत्सुक नसतात. मॅग्ना चार्टा सनद देणार्या इंग्लंडने भारतीयांचे शोषण सुरु ठेवले होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीयांनी शत्रूराष्ट्रांविरुद्ध दोस्त राष्ट्रांना सर्व प्रकारचे सहकार्य देऊ केले होते. तरी इंग्रजांच्या दडपशाहीत काहीच फरक पडला नव्हता. सर ए. जी. ह्यूमसाहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेने १८८५ साली सर्वप्रथम भारतीयांना त्यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील हक्क यचेच्छ उपभोगू द्यावेत, अशी स्पष्ट मागणी केलेली होती. १९२० पर्यंतचा लोकमान्य टिळकांचा राजकीय प्रवास हा भारतीयांना त्यांचे मुलभूत व मानवी हक्क व्यवस्थित उपभोगता यावेत यासाठीच होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध वाक्य म्हणजे या लढ्याचे द्योतक होते असे म्हणावे लागेल.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चाललेला स्वातंत्र्यलढा हा भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या दृष्टीने अत्यंत परिणामकारक ठरला होता. अहिंसात्मक चळवळ ही जगाला नवीन होती व या चळवळीस नैतिकतेचे अधिष्ठान महात्मा गांधींनी दिल्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्यास एक आगळे परिमाण लाभले होते. हे सर्व जरी खरे असले तरी जहाल प्रतिमा लाभलेले हिंदू महासभेचे नेते स्वा. सावरकर यांचेही विचार दुर्लक्षून चालणार नाहीत. भारतीय राज्यघटनेकरिता मुलभूत हक्कांचा पर्यायाने मानवी हक्कांचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती १९४८मध्ये नेमली गेली. २२ जानेवारी १९४७ साली पं. नेहरुंनीही या हक्कांसंबंधी करणारे एक टिपण सार्वत्रिक चर्चेसाठी जनतेसमोर ठेवले होते. मुलभूत हक्कांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या १४व्या कलमात करण्यात आलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही येथील मानवी हक्क रोजच्या रोज दडपले जाण्याच्या घटना घडत असतात. त्याशिवाय फुटीर भागांतील असंतुष्ट लोक मानवी हक्क दडपले गेल्याच्या खोट्या कहाण्या प्रसृत करीत असतात. या सर्व आघाड्यांना राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कशा प्रकारे तोंड देणार आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
परराष्ट्रांचे हितसंबंध
दोन युद्धांत आपल्याकडून मार खाल्लेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीर भागातील काही दहशतवादी संघटनांचा होरा ओळखून काश्मिरी जनतेचा सुनियोजीत पद्धतीने  बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न चालविला आहे व ते त्यात बर्याच अंशी यशस्वीही झाले आहेत. आज जम्मू-काश्मीरमध्ये धर्माधर्मात विव्देष पसरला आहे. जम्मूतील बहुसंख्याकांचा गट आज तेथील अल्पसंख्याकांना काश्मीर खोर्यातून हुसकावून लावत आहे. याला संरक्षण आहे भारतीय राज्यघटनेतील ३७०व्या कलमाचे. या कलमामुळे काश्मीरला मिळालेल्या स्वायत्त दर्जाचा दहशतवादी गट उघडउघड फायदा घेत आहेत. इतर राज्यांतील रहिवाशांना काश्मीरमध्ये मालमत्ता खरीदण्याचा, निवडणुकीस उभे राहाण्याचा अधिकार या कलमामुळे नाकारला गेला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या मुलभूत व मानवी हक्कांवर उघड-उघडच टाच आणली जात आहे. पण सध्या अशी स्थिती आहे की, या कलमाविरुद्ध बोलणारा प्रतिगामी ठरविला जातो. काश्मीरी जनतेवर भारतीय लष्कर कसे अत्याचार करते याच्या कपोलकल्पित कहाण्या काश्मीरी दहशतवाद्यांना हाताशी धरुन
पाकिस्तान व चीन हे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडत असतात. त्याचा प्रभावी प्रचार आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना करीत असतात. पंजाबबाबतही पाकिस्तानचा हाच पवित्रा आहे. नेहरुकालीन परराष्ट्रधोरणाच्या जाळ्यात भारत अडकल्याने पाकिस्तानच्या प्रचाराला आपण अद्यापी मुँहतोड जवाब देऊ शकलेलो नाही. पाकिस्तानाच्या भारतातील कारवायांवर एखादी छापील पुस्तिका तयार करुन ती सर्व देशांना पाठविणे यासारखे आचरट उपाय मात्र भारतीय परराष्ट्र खाते योजत असते. अमेरिकेत भारताविषयी एक गट प्रभावीपणे कार्यरत असतो. तो व तेथल्या मानवी हक्क संघटना काश्मीरमधील भारतीय सैन्याकडून झालेल्या कपोलकल्पित अन्यायाचे भांडवल करण्यास नेहमी टपलेल्या असतात. या सर्वांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा उपयोग होईल का, असा खरा प्रश्न आहे.
मानवी हक्क आयोगाची संरचना आदर्शवादी असली तरी या आयोगासमोर दाद मागावयास आलेल्या व्यक्तींचे पूर्वचारित्र्य तपासून पाहाणे हे काम आयोगाने अग्रक्रमाने केले पाहिजे. पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून होणार्या कारवाईत निरपराधांवर अत्याचार झालेही असतील, पण देशहिताच्या दृष्टीने या निरपराध व्यक्तींवर झालेल्या अन्यायाचा फारसा गवगवा होऊ नये असे आग्रहाने सुचवायचे आहे. सुक्याबरोबर ओलेही जळते असा हा न्याय आहे. भारतीय सैन्याने . दोन्ही राज्यांत दहशतवाद्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. मात्र सैन्याने उद्या या भागातून काढता पाय घेतल्यास तेथे स्थिर राजवट व तीही भारताला अनुकूल अशी येईलच हे निश्चितपणे सांगता यायचे नाही. भारतातही अतिरेकी गटांवर निर्मम प्रेम करणार्या अतिमानवतावादी संघटनाही आहेतच. न्या. तारकुंडेंसारख्यांनी काश्मीरमध्ये दहशतवादी तेथील अल्पसंख्यांकावर अत्याचार करीत नाहीत अशा अहवाल आपल्या संघटनेच्या वतीने सादर करुन दहशतवाद्यांच्या हातात आयते कोलीतच दिले होते. त्यामुळे भारतीय सैन्याने षठम् प्रति षाठ्यम् या न्यायाने या दोन राज्यांत वागायला हवे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगासमोर फौजदारी गुन्ह्यांखाली अडकलेला एखादा दहशतवादीही मानवी हक्कांची गळचेपी झाल्याची तक्रार दाखल करु शकतो. अशांना अतिमानवतावादी संघटनांची दखल न घेता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने अशा लोकांना बाहेरची वाट दाखविली पाहिजे. राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता आयोग असे काम करील तरच त्याची घटनात्मक गरज पूर्ण होईल. परंतु राजकीय महत्वाकांक्षा बाळगणार्या फुटीरतावादी संघटना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे वळल्यास त्याचे वेगळे परिणाम संभवू शकतात. अशा संघटनांमधील नीर व क्षीऱ ओळखणे हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगापुढील मोठे आव्हान असणार आहे. देशातील महिला, दलित, पीडीत, शोषित वर्गाची केली जाणारी पिळवणूक ही मानवी हक्कांची मोठी पायमल्ली आहे. ते प्रश्न सोडविण्यास या आयोगाने प्राधान्य दिले पाहिजे. राजकीय समस्यांत हा आयोग जितके कमी अडकेल तितके चांगलेच आहे.


फिजीतील भारतीय वंशीयांचे अस्तित्व धोक्यात ( दै. सामना - २० जून २०००)

लेखाचा मूळ भाग.



लेखाचा उर्वरित भाग.




फिजीतील भारतीय वंशीयांचे अस्तित्व धोक्यात

फिजीतील राजकीय संघर्ष वांशिक वादातून निर्माण झाला आहे. फिजीच्या लोकसंख्येपैकी ४४ टक्के भारतीय वंशीय नागरिक आहेत. रोजगारासाठी व व्यापाराच्या निमित्ताने भारतीयांचे फिजीमध्ये १६व्या शतकापासून स्थलांतर सुरु झाले. फिजीयन जनता आणि हे भारतीयवंशीय यांच्यातील सामाजिक समरसता काही वर्षे टिकली. त्यानंतर मात्र वांशिक भेद उफाळून आले असून तेथील भारतीय वंशीयांचे अस्तित्व धोक्यात आले होते. या स्थितीसंदर्भात दै. सामनाच्या २० जून २०००च्या अंकात मी हा लेख लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाईल वर दिलेली आहे.

-           -समीर परांजपे
-              paranjapesamir@gmail.com

या विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक घटकाचा अंतकाळ असतो. मग तो घटक मानवनिर्मित असो किंवा निसर्गनिर्मित. जगातील आत्तापर्यंतच्या सर्व युद्धांचा इतिहास पहा – सिकंदर, नेपोलिअन बोनापार्ट, हिटलर, मुसोलिनी यासारख्यांनी जग जिंकण्याचे स्वप्न पाहिले. त्यांना प्रारंभी काही यशही मिळाले. परंतु अखेर ते आपापल्या देशापुरते मर्यादित राहिले. ही उदाहरणे समोर असूनही काही जणांची वसाहतवादी वृत्ती तसेच सम्राट बनण्याची खुमखुमी संपत नाही. आजवर जगाचा नकाशा हा भौगोलिक घडामोडींमुळे जसा बदलला तसा माणसाच्या इच्छा-आकांक्षांनीही तो बदलला. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका- रशिया असा दोन खणी जगाचाच नकाशाच रेखाटणारे आता रशियाच्या विघटनानंतर अमेरिकेच्या बाजूला कलताना दिसत आहेत. महाशक्ती होऊ घातलेल्या भारत, चीन या देशावर जसा या घटनांचा परिणाम होतो तसा तो श्रीलंका, मालदीव, अगदी फिजी यासारख्या छोट्या देशांवरही होत आहे,
जागतिकीकरणाच्या काळात जग संकुचित झाले आहे, असे आपण सातत्याने म्हणत असतो. पण व्यापार-उदीमाच्या निमित्ताने एका देशातून दुसर्या देशात स्थलांतर करणारी माणसे आपली पाळेमुळे, संस्कृतीही आपल्याबरोबर घेऊन जात असतात. सध्या वृत्तपत्रांत चर्चेचा विषय झालेला फिजी हा देशही यामुळे भारताच्या जवळ जोडला गेलेला आहे. पॅसिफिक समुद्रामध्ये आँस्ट्रेलियाच्या जवळ फिजी देश आहे. फिजी हा छोट्या छोट्य़ा बेटांचा बनलेला देश भारताच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे. भारताचा इतिहास हा बर्याचदा लढाईत हरण्याचाच असला तरीही पहिल्या व दुसर्या महायुद्धात आपल्या देशातील सैनिकांनी ब्रिटिश लष्करातून लढताना लक्षणीय कामगिरी बजावली होती. साधारणत: १६व्या शतकामध्ये फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज, स्पॅनिश व्यापारी भारतात व्यापाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर आले. व्यापार करता करता त्यांनी एकेका भूभागावर आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. सत्तेबरोबरच तिथल्या प्रदेशातील लोकांना संस्कृतीविहीन करण्याचा प्रयत्न यापैकी पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर केला.
भारताचे फार पूर्वीपासून सागरी मार्गाने अनेक प्रदेशांशी व्यापारी संबंध होतेच. परंतु युरोपातील या गोर्या बंधुंच्या व्यापारी शिस्तीमुळे अनेक नवीन प्रवाह भारतात येऊ शकले. यातून भारतातील अनेक लोक मोठ्या प्रमाणावर जुलमाने किंवा स्वखुशीने परकीय देशांमध्ये रोजगारासाठी या व्यापाराच्या निमित्ताने जाण्यास सुरुवात झाली.
पॅसिफिक महासागरातील फिजी या बेटावरील लोकसंख्या आज आठ लाखाच्या आसपास आहे. त्यातील ४४ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. म्हणजे साडेतीन लाख लोक पूर्वी तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागांतून ज्याप्रमाणे माँरिशससारख्या देशात मजूर म्हणून तेथे गेले होते तसेच फिजीमध्ये देखील असेच भारतीय लोकांचे स्थलांतर १९व्या शतकात मोठ्या प्रमाणावर झाले होते. या ठिकाणी मोलमजूरी करता करता इतक्या वर्षांनी हे भारतीय फिजीचे अविभाज्य अंग बनले होते. फिजीमध्ये मुख्य उत्पादन उसाचे आहे. साधारणत: १८८० ते १९२० या ४० वर्षांच्या काळात भारतीय नागरिक मजूर म्हणून फिजी येथे येण्याची प्रक्रिया सुरु होती.
प्रथम मजूरी करुन मग फिजी देशाचा महत्त्वाचा घटक होण्यापर्यंत भारतीय नागरिकांनी केलेला प्रवास सहजगत्या घडलेला नाही. १९१०च्या सुमारास साम्राज्यशाहीचे धोरण जेव्हा तळपत होते तेव्हा फिजीतील भारतीय नागरिकांवर तेथील ऊसमळेवाल्यांनी अनन्वित अत्याचार केलेले आहेत. पण आपल्या लोकांची प्रवृत्ती ही संग्राही वृत्तीची असते. टक्केटोणपे खाऊन देखील भारतीय नागरिकांनी फिजीमध्ये स्वतचा व्यवस्थित उत्कर्ष करुन घेतला आहे. फिजीमध्ये आज जो उच्च मध्यमवर्ग आहे त्यात मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक आहेत. फिजी देशाला जी थोडीफार समृद्धी मिळाली ती भारतीय लोकांनी दाखविलेल्या उद्यमशीलतेमुळे आहे.
जगात आहेरे आणि नाहीरे यांचा संघर्ष सुरु असतो. त्यामध्ये नाहीरे वर्ग आहेरे वर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फिजीमध्ये भारतीय नागरिक नाहीरे वर्गात मोडत होता. त्याला संपन्नतेची ओढ लागलेली होती. आज स्थिती अशी आहे की, फिजी देशाचा मूळ रहिवासी या भारतीय नागरिकांचा व्देष करु लागला आहे. हाँगकाँग, सिंगापूरमध्ये दुसर्या महायुद्धात ब्रिटिशांनी जेव्हा लढाई छेडली तेव्हा ब्रिटिश सैन्यातून लढणारे अनेक सैनिक फिजीत गेले होते. कालांतराने ते तिथेच राहिले. यातले अनेक जण व्यापारी बनले. फिजीच्या लोकसंख्येपैकी ४४ टक्के असलेले भारतीय लोक तोपर्यंत कोणालाही डाचत नव्हते. मूळची आदिवासी असलेली पण पाश्चिमात्या वळणामुळे सुसंस्कारित नागरी आयुष्य जग लागलेली फिजियन जनता व हे `विदेशी भारतीय यांच्यात हळूहळू सामंजस्याचे व्यवहार होऊ लागले. ही सामाजिक समरसता काही वर्षे व्यवस्थितपणे टिकली. याचीच परिणती म्हणून १९९१च्या निवडणूक फिजीमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरी पंतप्रधानपदी निवडून आले. आता महेंद्रसिंग चौधरी यांचे मूळ ठिकाण शोधायचेच तर हरयाणा राज्यामध्ये सापडू शकेल. फिजीमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांतूनही पूर्वी बरेचसे लोक गेलेले आहेत. पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरी यांनी चालविलेला कारभार हा केवळ भारतीय वंशीयांच्या हिताच्या बाजूने झुकतो आहे अशी फिजीतील मूळ लोकांची भावना होऊ लागलेली होती.
पहिले व दुसरे महायुद्ध असो किंवा शीतयुद्धाचा काळ, जगातील महाबलाढ्य सत्तांना आपल्या लष्करी हालचालींसाठी विविध तळांची गरज भासते. फिजीदेखील बलाढ्य राष्ट्रांचा असाच एक लष्करी तळ पूर्वीपासूनच होता. आज बदलत्या काळात आरमारापेक्षा हवाई दलाला अधिक महत्व आलेले आहे. सागरी किनार्यांचे रक्षण करणे ही महत्वाची बाब असल्याने नौदलाचे स्थान कोणालाही नाकारता येणार नाही. परंतु सागरी बेटांकडे मोक्याची ठाणी म्हणून पूर्वी जसे बघितले जात असे तसे महत्व आता राहिलेले नाही. फिजीचे जगाच्या नकाशावरील महत्व यामुळेही कमी झालेले होते. दुसर्या बाजूला फिजीचे आर्थिक सामर्थ्य आतापर्यंत ऊसाच्याच पिकावर अवलंबून होते. फिजीचा प्रदेश निसर्गसंपन्न असल्याने या बेटावर अमेरिकन पर्यटकांसहित अनेकजण सध्या येत असतात. त्यामुळे फिजीच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच हातभार लागला होता.
पण जागतिकीकरणाची प्रक्रिया ही कोणत्याही देशाची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठेवण्यास मान्यता देत नाही. फिजीमध्ये ऊसाचे विक्रमी पीक यंदा आले असून त्या ऊसाला परदेशी बाजारपेठेत फारशी मागणी नाही. याचे कारण जगातील ऊस उत्पादक देशांमध्येच ऊसाचे पीक यंदा मोठ्या प्रमाणावर आलेले आहे. त्यातून साखरेचेही विक्रमी उत्पादन झालेले आहे. याचा सरळ तडाखा ऊस न विकल्या गेलेल्या शेतकर्यांला व त्यावर अवलंबून असलेल्या मूळ फिजियन मजुराला बसला आहे. या गोष्टीमुळे भारतीय वंशीय पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरी यांना मूळ फिजियनांच्या असंतोषाला बळी पडावे लागले. मूळ फिजियन असलेल्या जाँर्ज स्पाईट या व्यक्तीने चौधरींच्या विरोधात पुंडावा केला आहे. जाँर्ज स्पाईट हा फिजीवादी व विरोधी पक्षनेते सँम स्पाईट यांचा मुलगा. जाँर्ज स्पाईटच्या पाठिराख्यांनी सशस्त्र सैनिकांच्या मदतीने चौधरी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांना संसद इमारतीतच १९ मेला जेरबंद करुन ठेवले. फिजीमध्ये आजपासून बरोबर १३ वर्षांपूर्वी भारतीय वंशीयांचे वर्चस्व असलेले सरकार फिजीवादी नेत्यांनी उलथले होते. आता नव्या बंडखोराच्या रुपात आलेल्या जाँर्ज स्पाईट यांनी फिजीमध्ये आणीबाणी लागू केली आहे.
जाँर्ज स्पाईट यांच्या समर्थक सशस्त्र रक्षकांनी संसद इमारतीत कोंडलेल्या पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरी व त्यांच्या समर्थकांना २१ मे रोजी जोरदार मारहाण केली होती. चौधरी यांच्यावर सातत्याने राजीनामा देण्यासाठी स्पाईट समर्थक दबाव आणत होते. याच्या परिणामी चौधऱींचा मुलगा राजेंद्र याने पंतप्रधानांच्या बंडखोरांचा सचिवपदाचा राजीनामा बंडखोरांकडे पाठवून दिला होता. या बंडखोरांची मजल फिजीचे राष्ट्रपती रातू सर कामिसेसे मारा यांचाही राजीनामा मागण्यापर्यंत गेली होती. भारतीय वंशीयांविरुद्ध आम्ही वांशिक युद्ध लढण्यास तयार आहोत अशी भाषाही जाँर्ज स्पाईट समर्थकांनी केली होती.
फिजीचे राष्ट्रपती रातू सर कामिसेसे मारा यांची परिस्थिती विचित्र झालेली आहे. जाँर्ज स्पाईट याने केलेल्या बंडाचा शेवट कसाही होवो, पण पदच्युत पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरी आता या पदावर पुन्हा विराजमान होण्याची शक्यता नाही हे मात्र नक्की. राष्ट्रपती रातू सर कामिसेसे मारा यांनीही फिजियन अस्मिता आठवून भारतीय वंशीयांचे असलेले सरकार पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचे नाही असा निर्धारच केला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचे मध्यस्था सितीवेनी राबुका यांनी यशस्वीपणे माघार घेऊन बंडखोरांचा प्रस्ताव जवळजवळ मान्यच केला.
सितीवेनी राबुका यांचा इतिहासही संशयास्पदच आहे. १९८७मध्ये याच राबुकांनी दोन बंडांचे नेतृत्व केले होते. १९९७मध्ये फिजीची घटना तयार झाली. पण महेंद्रसिंग चौधरींनी राबुका यांना गेल्या वर्षीच्या निवडणुकीत धुळ चारली होती. भारतीय वंशाच्या व्यक्तीस फिजीचा पंतप्रधान होऊ द्यायचे नाही अशी घटनादुरुस्ती १९९०मध्ये फिजी राज्यघटनेत करण्यात आली होती. परंतु लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या भारतीय वंशीयांनी बहुमताच्या जोरावर ही घटनादुरुस्ती रद्द केली होती. पंतप्रधानपदी चौधरी विराजमान झाले. त्यामुळे फिजीवाद्यांचा असंतोष धुमसत राहिला होता. सुवा ही फिजीची राजधानी. भारतीय वंशाच्या नागरिकांच्या घरांची, मालमत्तेची मोठ्या प्रमाणात जाळपोळ एव्हाना फिजीवाद्यांनी केलेली आहे. लष्कराने मोक्याच्या जागांवर ताबा मिळविला असला तरी जनमानसात चौधरींच्या विरोधात जणू विरोधाची लाटच उसळली आहे.
जाँर्ज स्पाईट या बंडखोराने मूळ फिजियन नागरिकांच्या हक्काचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यावर राज्यघटनेनूसार तोडगा काढला जाईल असे फिजीचे राष्ट्रपती रातु सर किमिसेसे मारा सांगत आहेत. भारतीय वंशीय नागरिक फिजीमध्ये ४४ टक्के असले तरी सध्या त्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. फिजीमध्ये १९ मेपासून पंतप्रधान महेंद्रसिंग चौधरींच्या विरोधात जे बंड झाले त्यावेळेपासून त्यांचे प्राण संकटात होतेच, शिवाय आँस्ट्रेलिया व भारत या दोन देशांनाही फिजीच्या राजकीय स्थितीच्या चिंतेचा भार वाहावा लागला आहे.
भारतीय वंशीयांचे प्राबल्य असलेले सरकार नजीकच्या काळात तरी फिजीमध्ये अस्तित्वात येणे कठीणच दिसते. पण यानिमित्ताने दोन प्रश्न उपस्थित झाले आहेत. श्रीलंकेत तामिळींचा स्वत:च्या अस्तित्वासाठी सुरु असलेला झगडा, युरोपियन देशांमध्ये भारतीय नागरिकांविरुद्ध गोरे लोक चालवित असलेली पद्धतशीर मानहानीची मोहिम, अमेरिकेत भारतीय मिळणारी सापत्नभावाची वागणूक या घटनांना आपण पायबंद घालणार कसा



Friday, March 28, 2014

देशभरात दरवर्षी एक हजार बिबळ्यांची शिकार (दै. सामना २२ व २३ आँक्टोबर २००२)

बातमीचा मूळ भाग


बातमीचा उर्वरित भाग.




सुंदर असे कातडे, नख्या, दात असे अवयव मिळविण्यासाठी देशामध्ये दरवर्षी एक हजार बिबळ्यांची शिकार करण्यात येते. शिकारीच्या या प्रमाणात अशीच वाढ होत राहिली तर २०२० सालापर्यंत देशातून बिबळ्याचे अस्तित्त्वच नष्ट झालेले असेल. वाघ, सिंह यांच्यासाठी केंद्र सरकारने खास संरक्षक प्रकल्प व अभयारण्ये उघडल्याने वनविभागाचे तुलनेने कमी लक्ष असलेल्या बिबळ्यालाच आता चोरट्या शिकार्यांनी आपले लक्ष्य केले आहे. यासंदर्भातील मी केलेली विशेष बातमी दै. सामनामध्ये दोन भागांत प्रसिद्ध झाली होती. या बातमीचा पूर्वार्ध २२ आँक्टोबर २००२ रोजी तर उत्तरार्ध २३ आँक्टोबर २००२ रोजी प्रसिद्ध झाला होता. या दोन्ही भागांच्या जेपीजी फाईल्स वर दिल्या आहेत.

देशभरात दरवर्षी एक हजार बिबळ्यांची शिकार

-          पूर्वार्ध

-        - समीर परांजपे

सुंदर असे कातडे, नख्या, दात असे अवयव मिळविण्यासाठी देशामध्ये दरवर्षी एक हजार बिबळ्यांची शिकार करण्यात येते. शिकारीच्या या प्रमाणात अशीच वाढ होत राहिली तर २०२० सालापर्यंत देशातून बिबळ्याचे अस्तित्त्वच नष्ट झालेले असेल. वाघ, सिंह यांच्यासाठी केंद्र सरकारने खास संरक्षक प्रकल्प व अभयारण्ये उघडल्याने वनविभागाचे तुलनेने कमी लक्ष असलेल्या बिबळ्यालाच आता चोरट्या शिकार्यांनी आपले लक्ष्य केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अस्तित्व संकटात आलेल्या प्राण्यांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या विभागाचे प्रमुख जाँन झेलर यांनी सामनाशी इ-मेल व्दारे दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, भारतामध्ये बिबळ्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होतेय याचे वस्तुनिष्ठ दर्शन १९९९ साली झाले. या वर्षात उत्तर प्रदेशमध्ये विक्रीकर अधिकार्यांनी पकडलेल्या एका ट्रकमध्ये १२० बिबळ्यांची कातडी, बिबळ्यांच्या ११८ नख्या, बिबळ्यांचे जननेंद्रिय, ७ वाघांची कातडी, वाघांच्या १३२ नख्या, वाघ व बिबळ्या यांची सुमारे १७५ किलो हाडे असा मुद्देमाल सापडला होता.
यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली की, उत्तर भारतातून बिबळ्याची शिकार केल्यानंतर त्यांच्या अवयवांचा चोरटा व्यापार नेपाळमार्गे तिबेटपर्यंत केला जातो. मुंबईतल्या बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूला असलेली वस्ती तसेच महाराष्ट्रातील काही खेड्यापाड्यांमध्ये बिबळ्यांनी माणासांची शिकार करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. बिबळे हे माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी सरसावले आहेत असा कांगावा काही मतलबी लोक करीत असले तरी चित्र मात्र त्याच्या अगदी उलटे आहे. भारतामध्ये सर्वत्र आढळणार्या बिबळ्याचे वर्णन प्रसिद्ध शिकारी जिम काँर्बेट याने भारतातल्या जंगलातल्या प्राण्यांमधील सर्वात सुंदर प्राणी असे केले आहे. सार्या देशभर आता जेमतेम १० हजार बिबळेच तग धरुन असावेत असा अंदाज आहे. देशातल्या पर्यावरणप्रेमींनीही बिबळ्यांच्या झपाट्याने संपणार्या अस्तित्त्वाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. चीन, जपान व पूर्व आशियाई देशांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी वाघांच्या अवयवांचा उपयोग करतात. परंतु अनेकदा चोरटे शिकारी बिबळ्यांचे अवयव हे वाघांचे अवयव म्हणून बाजारात खपवितात व वैदूंची फसवणूक करतात. आशियामध्ये बिबळ्याच्या कातडीपासून बनलेली वस्त्रे व वस्तू वापरण्याचे व्यसन आहे. या श्रीमंतवर्गाची लालसा पुरविण्यासाठीही बिबळ्यांची निर्घृणरित्या शिकार केली जाते. बिबळ्यांना खाद्याव्दारे विष घालणे, बंदुकीने गोळ्या घालून ठार मारणे असे मार्ग त्यासाठी वापरले जातात. भारतात बिबळे, वाघ यांसारख्या प्राण्यांना ठार करुन सुमारे ६० लाख डाँलरचा चोरटा व्यवसाय दरवर्षी केला जातो. त्यामुळेच भारतातील बिबळ्यांच्या सर्वच्या सर्व जातींचे अस्तित्व नष्ट होण्याचे संकट निर्माण झाले आहे.
----------------
बिबळ्यांच्या पाच जाती वाघांआधीच नष्ट होणार

उत्तरार्ध

-          -  समीर परांजपे

अस्तित्व संकटात आलेल्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी भारत सरकार दरवर्षी सुमारे ७० दशलक्ष डाँलर खर्च करुन विविध प्रकल्प राबविते पण फक्त वाघ, सिंह, हत्ती यांच्या संरक्षणावरच अधिक लक्ष केंद्रित करण्यात येते. बिबळ्यांचे अस्तित्व नष्ट होतेय याकडे कुणीही गंभीरपणे पाहात नाही. भारतातील बिबळ्यांच्या बिबळ्या, ढगाळ बिबळ्या, बिबळ्या मांजर अथवा वाघटी, हिमबिबळ्या, काळा बिबळ्या या पाचही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे सर्व इतक्या झपाट्याने होतेय की देशामध्ये वाघांच्या आधी बिबळेच नष्ट होण्याची दाट शक्यता आहे.
संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात दिसणारा बिबळ्या हा बिबळ्या प्रकारातील असून त्यालाच डोळ्यासमोर ठेवून सध्या सर्वत्र लिहिले बोलले जातेय. परंतु देशात बिबळ्यांचे अजून काही प्रकार संकटग्रस्त आहेत. त्याविषयीही जागृती निर्माण झाली पाहिजे. दिल्ली येथे राहणारे वाघांचे तज्ज्ञ वाल्मिक थापर यांनी सामनाला दूरध्वनीवरून सांगितले की, बिबळ्याला Leopard किंवा Panther Pardus (Linnapus) म्हणतात. बिबळे आकाराने वाघ व सिंहापेक्षा थोडे लहानच असतात, त्यांना कोणी कोंडीत पकडल्यास त्यांच्याशी अत्यंत क्रूरपणे लढण्यास ते समर्थ असतात. बिबळ्याची लांबी १ ते १.५ मीटर व वजन ६० किलोच्या आसपास असते. अर्धवाळवंटी, खडकाळ, वृक्षविरहित भागात जे बिबळा राहातात त्याचा कल मोठा आकार व फिकट रंगाकडे असतो. परंतु कमी उंचीवरील जंगल व डोंगराळ भागात राहाणारे बिबळे त्यामानाने लहान असतात.
भारतात बिबळ्या जंगलात
, खुरट्या झाडाझुडपात व पठारी प्रदेशात राहातात. ९२ ते ९५ दिवसांच्या गर्भवहनाच्या काळानंतर मादी बिबळ्यास एक ते चार पिल्ले होतात. पिल्ले सहा महिन्यांची होईपर्यंत आईच्या सोबत राहातात. बिबळ्यांचे आयुष्यमान २० वर्षांचे असते.
बिबळ्यांमधील ढगाळ बिबळ्या ( Clouded Leopard) ही जात अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, आसामच्या पूर्व भागातील सदाहरित दाट जंगलात आढळते. ते आपला उदरनिर्वाह छोटे सस्तन प्राणी, पक्षी, हरणे व बकरी यांची शिकार करुन करतात. ढगाळ बिबळे आकाराने लहान असतात. पण त्यांच्या शेपटीची लांबी खूप जास्त असते. त्यांच्या मानेवर तपकिरी, शरीरावर गडद किंवा जवळजवळ काळ्या रंगाचे छाप असतात. या छाप्यांमधल्या फिकट रंगामुळे त्यांना ढगाळ रुप प्राप्त होते. त्यावरुनच त्यांचे हे नाव प्रचलित झाले आहे. बिबळ्या मांजर (Leopard cat)  हा पाळीवर मांजराच्या आकाराचा व अत्यंत आकर्षक प्राणी असतो, त्यांच्या गेरुसारख्या पण राखाडीसर शरीरावर काळे अथवा गंजाच्या रंगाचे ठिपके शोभा आणतात. जंगलातील रानटी जीवनास रुळलेले बिबळ्या मांजर मानवी वस्तीतून कोंबडी तसेच इतर पाळीव प्राण्यांची लपून छपून शिकार करतो. देशात सर्वत्र बिबळ्या मांजरा सापडते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील जंगलात आढळणार्या काही बिबळ्यांची कातडी काळ्या रंगाची असल्याने त्यांना काळा बिबळ्या (Black Leopard )  म्हणतात. बिबळ्यांची ही जातही आपल्या अस्तित्त्वासाठी संघर्ष करीत आहे.
हिमबिबळ्या (Snow Leopard) हिमालयामध्ये ३ ते ४ हजार मीटर उंचीच्या प्रदेशात सापडतात. बिबळ्याच्या इतर संकटग्रस्त जातींपेक्षा जास्त संघर्ष हिमबिबळ्याला करावा लागतो. साधारण बिबळ्यांपेक्षा हिमबिबळे आकाराने जरी लहान असले तरी त्यांच्या लांब व जाड केसाळ शरीरामुळे ते जास्त मोठे वाटतात. त्यांचे जाडसर व मऊ व सुंदरसे शरीर पिवळसर पांढर्या रंगाचे असते व आजुबाजुच्या वातावरणात साजेसे असे फिक्या रंगाचे जवळजवळ असणारे ठिपके असतात. हे ठिपके फुलांसारखे दिसतात. थंडीच्या दिवसांत ते कमी उंचीच्या भागात स्थलांतर करतात. डोंगरी बकरे, ससे, मार्खोर हे प्राणी व तसेच अन्य पक्षी हे हिमबिबळ्यांचे भक्ष्य असते, देशभरात मानवी वस्त्यांच्या अतिक्रमणाने जंगलक्षेत्र कमी होऊन बिबळ्याच्या घरात माणूस वाटा मागू लागला व नैसर्गिक प्रवृत्तीने बिबळ्याने त्याच्यावर पंजा उगारला तर त्यात दोष कुणाचा हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही...
------------




काँमेडियन असावा तर मुक्रीसारखा! ( दै. सामना - १० सप्टेंबर २०००)


या लेखाचा मूळ भाग.


या लेखाचा उर्वरित भाग.



हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. मुक्रीचे ४ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले. त्याच्या चित्रपट अभिनय कारकीर्दीचा आढावा घेणारा लेख मी दै. सामनाच्या १० सप्टेंबर २०००च्या अंकात लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.

काॅमेडियन असावा तर मुक्रीसारखा!


- समीर परांजपे

आयुष्यात हास्याचे मळे फुलविणारा मुक्री या जगाचा निरोप घेताना रसिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळवून गेला. पूर्वीच्या संस्कृत नाटकांमध्ये विदूषकाचे पात्र असायचे. हसविण्याच्या उद्योगातून तो राजाला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगायचा. उंचीने ठेंगणीठुसकी, गोरी-तांबूस, गरगरीत देहयष्टी व उपजत विनोदबुद्धी असल्याचे भाव चेहेर्यावर जपणारी व्यक्तीच संस्कृत नाटकांमध्ये विदूषकाच्या भूमिकेस पात्र समजली जायची. मुक्रीकडे बघितलं की संस्कृत नाटकातील शहाण्यासुरत्या विदूषकाचीच आठवण मनात ताजी होत असे. हिंदी चित्रपटसृष्टीत विनोदी भूमिका करणार्या मुस्लिम कलावंतांची एक परंपरा आहे. नूर महंमद चार्ली, मिर्झा मुशर्रफ, जाॅनी वाॅकर, मेहमूद, जगदीप यांच्या परंपरेतील एक माणिक म्हणजे मुक्री. `अमर अकबर अँथनी' मधील आपल्या कोवळ्या कन्येवर करडी नजर ठेवणारा पिता तय्यब अली, `शराबी'मधील वीरप्पन स्टाईल मिशांचा नथ्थुलाल यांसारख्या भूमिकांमुळे मुक्री अविस्मरणीय ठरला. अोल्ड इज गोल्ड परंपरेतील अनेक चित्रपट कलावंत गेल्या काही दिवसांत परलोकी गेले. मुक्रीनेही आता त्यांचाच शिरस्ता गिरविला आहे.
मुक्री हा अस्सल महाराष्ट्रीय होता. मोहम्मद उमर अली मुक्री अशी शब्दांची आगगाडी मागे लावून घेणारी ही वल्ली ५ जून १९२२ रोजी कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील उरण गावी जन्मली. मुक्रीच्या वडिलांची मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्रीला शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. एका मुलाखतीत मुक्रीने सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस अाली. बापाने चांगला मार दिला, पण मुक्री काही सुधारला नाही. वडिलांसमोर अभ्यासाचे नाटक करायचे अाणि त्यांच्या माघारी चित्रपट बघायचे हा नेम त्याने काही चुकविला नाही.' वयाच्या दहाव्या वर्षी मुक्रीने घरातून एकदा पलायनच केले. बाप से बेटा सवाई हे अब्बाजींना कळून येताच त्यांनी मुक्रीची रवानगी आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला केली.
शाळेच्या कोंडवा़ड्यापेक्षा बाहेरचे मुक्त जग मुक्रीला अधिक प्रिय होते. मुंबईत आल्यानंतर तर त्याला मोकळे रानच मिळाले. नाना हिकमती लढवून तो सिनेमे बघायचा. त्या विश्वात रंगून जायचा. याच मंतरलेल्या अवस्थेत मुक्रीला सिनेमात काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. बोरीबंदरच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीचा सहाध्यायी होता दिलीपकुमार. पुढे दोघेही सिनेमाक्षेत्रात स्थिरावले. दिलीपकुमारची प्रतिमा `लार्जर दॅन लाईफ' असलेल्या नायकाची झाली व मुक्री विनोदी नटाच्याच पायरीवर घुटमळला. पण दिलीपकुमार आपल्या या शाळुसोबत्याला कधीही विसरला नाही. दोघांच्या जिव्हाळ्यामध्ये कीर्ती, पैसा असे लौकिक अडथळेही कधी आले नाहीत. आपल्या अखेरच्या दिवसांतही मुक्री दिलीपकुमारच्या या मनमोकळेपणाचा आदराने उल्लेख करीत असे.
कुठेतरी मुक्रीची आठवण प्रसिद्ध झाली आहे. चौथी इयत्तेत शिकणारे मुक्री नावाचे कार्टे सरोज मुव्हिटोनच्या मालकापुढे जाऊन उभे राहिले. मला चित्रपटात काम करायला द्या म्हणून त्याच्या खनपटी बसले. त्याकाळी चित्रपटात गाणार्या कलावंतांची परंपरा होती. स्टुडिअोच्या म्युझिक रुममध्ये नसीर व झेबुन्निसा या त्यावेळच्या कलावंतांसमोर मुक्रीने अत्यंत भसाड्या आवााजात शिरी फरहाद चित्रपटातले गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणताना मुक्रीने असे काही विनोदी हावभाव केले की म्युझिक रुममधील सर्व मंडळी हसून लोटपोट झाली. खरं म्हणजे मुक्रीला गाणे बजावणे यापैकी काही म्हणजे काही येत नव्हते. पण कॅमेर्यासमोर उभी राहायची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तो चक्क खोटे बोलून सरोज मुव्हिटोनच्या म्युझिक रुममध्ये गायला उभा राहिला होता. पण खोट्याचेही खरे झाले. मुक्रीला विनोदी नट म्हणून महिना ७५ रुपये पगारावर सरोज मुव्हिटोनमध्ये नोकरी मिळाली.
अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीने दिलीपकुमारबरोबर अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्या गाजविल्या. किमान शिक्षण पूर्ण करुन मुक्रीने पुन्हा चंदेरी दुनियेत पाय ठेवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीने एक वळण घेतलेले होते.` नादान' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. फुल चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या मुक्रीला देविकाराणीने हेरले. ठेंगण्याठुसक्या, भरगच्च गालांमधून हसतानाही दांत न दाखविण्याची किमया साधणार्या मुक्रीला देविकाराणीने `प्रतिमा' चित्रपटातील मालकिणीच्या विनोदी नोकराची भूमिका करण्यासाठी पाचारण केले. या चित्रपटातील दिलीपकुमार-मुक्री यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांत कायम राहिली. कोहिनूर, आन, अमर, अनोखा प्यार, राम अौर श्याम या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत मुक्रीने आपल्या विनोदी आविष्काराने अक्षरश: धमाल उडवून दिली. याचवेळी स्टंटपटांचाही बराच बोलबाला होता. स्टंटपट हे तसे दुय्यम दर्जाचेच समजले जात. पण तिथेही मुक्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखविली. दणकट पहेलवान शेख मुख्तार याच्या जोडीने मंगू दादा, दिल्ली का दादा, उस्ताद पेद्रो, कैदी नं. ९११ अशा चित्रपटांमधून मुक्रीने बहार आणली.
हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला.
त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. शिवाय तो जमानाही कथिलाचा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या लिजंड्सबरोबर काम करताना मुक्री कधीही दुय्यम कलाकार वाटला नाही. देव आनंदबरोबर असली नकली, काला पानी, राज कपूरबरोबर चोरी चोरी असे काही चित्रपट त्याने केले. त्याकाळचे लोकप्रिय नायक सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार यांच्या संगतीतही मुक्री पडद्यावर रमला. विनोदी भूमिका हे त्याचे पंचप्राण होते. तो त्यात जगला, त्याच प्रतिमेत मुक्रीचा श्वासही विरघळला. गोल्डन एरानंतर अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या बदलांशी ज्यांनी जुळवून घेतले नाही, असे अनेक कलावंत नंतर मोडीत निघाले. पण या परिवर्तनात मुक्री लव्हाळ्याच्या स्थितप्रज्ञतेने टिकला.
सुपरस्टार पदाची वस्त्रे राजेश खन्नाने खाली उतरविल्यानंतर आपला तमाम प्रेक्षकगण अमिताभच्या मनस्वी, प्रसंगी विखारी व्यक्तिरेखांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागले. अमिताभच्या प्रतिमेला खुलविण्यासाठी मुक्रीनेही यथाशक्ती प्रयत्न केले. `बाॅम्बे टू गोवा'पासून ते थेट `शराबी'पर्यंत अमिताभ व मुक्री यांच्यामधील विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजे आहेत. शराबीतील  भरघोस मिशांचा मुक्री अमिताभच्या `मुच्छे हो तो नथ्थुलाल जैसी वरना ना हो' या प्रशंसेमुळे नथ्थुलाल म्हणून ख्यातकीर्त झाला. `अमर अकबर अॅन्थनी'मध्ये अापली मुलगी नीतू सिंगच्या हालचालींवर लक्ष ठेवणारा तय्यब अली हा थेरडा मुक्रीशिवाय दुसरा कोणी साकारु शकलाच नसता. `तय्यब अली प्यार का दुश्मन' हे गाणे फक्त त्याच्यासाठीच जन्माला आले होते. मुक्रीने तब्बल सव्वाशे चित्रपटांतून विविधढंगी भूमिका केल्या. चित्रपट कारकीर्दीच्या प्रारंभी तो सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरला. जीवनाच्या अखेरीस मस्तान चित्रपटाचे दिग्दर्शन करुन हे वर्तुळ पूर्ण करण्याची तयारी मुक्रीने केलेली होती, पण त्याच्या निधनामुळे या वर्तुळालाच छेद गेली आहे.
हिंदी चित्रपटांमध्ये राजेंद्रनाथने काहीचा आचरटपणा सुरु केला. विनोदाच्या नावाखाली विचिक्ष अंगविक्षेप करण्याला त्याने प्राधान्य दिले. या वातावरणातही मेहमूद, देवेन वर्मांसारख्या अभिनेत्यांनी विनोदातील सात्विकता थोडीफार जपलेली होती. हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळात स्पेशलायझेशनचे युग होते. नायक, नायिका फक्त समरसून प्रेमच करायचे. हेलन अंग उघडे टाकत फक्त कॅब्रेच करायची. विनोदी नट फक्त हसविण्याचेच काम करायचे. खलनायक तरुण बायाबापड्यांवर वाकडी नजर ठेवायचा, शेवटी नायकाक़़डून धुलाई करुन घ्यायचा. पण नंतरच्या काळात सर्वच भेळ झाली. नायकच खलनायकीपासून काॅमेडियनपर्यंतच्या सर्व भूमिका करायला लागला. त्यामुळे काॅमेडियन हे `डिपार्टमेंट' भंगारातच निघायची वेळ आली. आता तर शक्ती कपूर, कादरखान, जाॅनी लिव्हरचे हिणकस चाळे विनोदाच्या नावाखाली खपविले जातात. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी, मेहबूब खान, राज खोसला, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाईंसारख्या दिग्ग्ज दिग्दर्शकांबरोबर काम केलेल्या मुक्रीला विनोदावर सध्या होणारे हे घाव बहुधा सोसले नसावेत. त्यामुळेच किशोरकुमार या आपल्या सहकार्याच्या पावलावर पाऊल टाकून मुक्रीने ४ सप्टेंबर रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला असावा.
paranjapesamir@gmail.com


Thursday, March 27, 2014

भारताला सर्वाधिक धोका पाकिस्तान, चीनपासूनच! - जसवंत सिंह ( दै. सामना - १६ जानेवारी १९९९)










२१ व्या शतकातही भारताला सर्वात अधिक धोका पाकिस्तान व चीन या दोन शेजारी राष्ट्रांचा आहे. चीन व पाकिस्तानने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे भारताला अापल्या संरक्षण खर्चात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन तत्कालीन केंद्रीय परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी आपल्या `डिफेन्डिंग इंडिया' या पुस्तकात केले होते. त्या संदर्भातील माझा लेख दै. सामनाच्या १६ जानेवारी १९९९च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
भारताला सर्वाधिक धोका पाकिस्तान, चीनपासूनच!
तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांचे रोखठोक प्रतिपादन

- समीर परांजपे


२१ व्या शतकातही भारताला सर्वात अधिक धोका पाकिस्तान व चीन या दोन शेजारी राष्ट्रांचा आहे. चीन व पाकिस्तानने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे भारताला अापल्या संरक्षण खर्चात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन तत्कालीन केंद्रीय परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी आपल्या `डिफेन्डिंग इंडिया' या पुस्तकात केले होते.
भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे लोटली. या कालावधीत देशाचे परराष्ट्र धोरण व संरक्षण व्यवस्था कशी प्रगत होत गेली व या वाटचालीत कसे मोठे दोष राहून गेले याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण मॅकमिलनतर्फे प्रसिद्ध झालेल्या `डिफेन्डिंग इंडिया' या पुस्तकात जसवंत सिंह यांनी केले होते. जसवंत सिंह हे संरक्षणशास्त्राचे अभ्यासक आहेत. याआधी जसवंत सिंह यांची `नॅशनल सिक्युरिटी : अॅन आऊटलाईन आॅफ अवर कन्सर्स' `शौर्य तेजो' ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
`डिफेन्डिंग इंडिया' या पुस्तकातील `डिफेन्स स्पेंडिंग अँड फोर्स स्ट्रक्चरिंग' या प्रकरणात भारत-पाकिस्तान आणि भारत - चीन या देशांदरम्यानच्या संरक्षण व्यवस्थेचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. (पृष्ठ क्रमांक २४१ ते २४७) भारताने पाच अणुचाचण्या पोखरण येथे केल्यानंतर पाकिस्तानने सहा अणुचाचण्या करुन त्याला प्रत्युत्तर दिले. या स्फोटानंतर चीन हा भारताचा मुख्य शत्रू आहे असे विधान तत्कालीन संरक्षणमंत्री जाॅर्ज फर्नांडिस यांनी केले होते. या सर्व घटनांनी आशिया खंडात तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर भारत-चीन-पाकिस्तान या `प्रेमत्रिकोणाचा' जसवंत सिंह यांनी आपल्या पुस्तकात विचार केला होता.
जसवंत सिंह यांनी पाकिस्तान -भारताच्या संरक्षण व्यवस्थांचा तौलनिक अभ्यास करताना म्हटले अाहे की, १९६२च्या युद्धानंतर १९६५मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात भारताला संरक्षणावर मोठा खर्च करावा लागला. १९६३मध्ये एकूण आर्थिक उत्पन्नातील ४.४ टक्के इतका भाग भारताने संरक्षण व्यवस्थेवर खर्च केला. पाकिस्तानचे एकूण आर्थिक उत्पन्न १९६३मध्ये २३ अब्ज डाॅलर इतके असले तरी या देशाने आपल्या संरक्षणावर एकूण आर्थिक उत्पन्नाच्या ५ टक्के इतका खर्च केलेला होता. १९६५मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळत पाकिस्तानचा त्यानंतर संरक्षण खर्च ९ टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर सर्वसाधारण स्थिती असतानाही १९८८-८९ मध्ये बेनझीर भुत्तो पंतप्रधान असतानाच्या काळात पाकिस्तानच्या एकूण आर्थिक उत्पन्नापैकी ८.५६ टक्के भाग हा संरक्षणावर खर्च करण्यात अाला. १९८०च्या दशकात संरक्षण खर्चावरील पाकिस्तानची टक्केवारी ७.५ टक्क्यांच्या दरम्यान होती. पाकिस्तानचे भौगोलिक स्थान हे भारतापेक्षा कमी आकाराचे असूनही या देशाचा संरक्षण खर्च मात्र वाढता आहे.
भारताच्या एकूण आर्थिक उत्पन्नापैकी भारताने १९६९-७०मध्ये २५.६३ टक्के इतका भाग संरक्षणावर खर्च केलेला होता. तो १९७९-८०मध्ये १९.१९टक्के तर १९९१-९२ १४.४५ टक्के इतक्या प्रमाणावर आला. १९९७-९८मध्ये फक्त १५.३ टक्के इतका भाग संरक्षणावर भारताने खर्च केलेला आहे. भारताच्या संरक्षण खर्चात ही जी सातत्याने कपात होत गेली ती पाकिस्तान व चीन यांचा संरक्षण खर्च बघता निराशाजनक आहे अशा स्पष्ट अभिप्राय जसवंत सिंह यांनी `डिफेन्डिंग इंडिया' या आपल्या पुस्तकात व्यक्त केला होता. त्यांनी म्हटले होते की, १९६२ व १९६५च्या युद्धानंतर भारताने आपली संरक्षण व्यवस्था अद्ययावत करण्याकडे लक्ष पुरविलेले असले तरी त्याच्या संरक्षण खर्चाची विभागणी ही चीन व पाकिस्तानच्या रोखाने होते. जागतिकीकरणाच्या काळात चीन सध्या शांत असल्यासारखा वाटत असला तरी आशिया खंडातील राजकारणावर पकड मजबूत करण्याची आकांक्षा चीनला स्वस्थ बसू देणार नाही. दुसर्या बाजूला पाकिस्तानने भारतालाच लक्ष्य करुन आपली संरक्षण तयारी सुरु ठेवली आहे.
भारत व चीन यांच्या संरक्षण व्यवस्थांचा तौलनिक अभ्यास करताना जसवंतसिंग यांनी म्हटले होते की, १९५६ ते १९६२ या कालावधीत चीनने आपल्या एकूण आर्थिक उत्पन्नापैकी ९.७ अब्ज डाॅलर इतका खर्च संरक्षण व्यवस्थेवर केला व नंतर तो १३.७ अब्ज डाॅलरपर्यंत वाढवत नेला. १९७०मध्ये सोव्हिएत युनियनबरोबर असुरी नदी प्रश्नावर जो संघर्ष झाला, त्याच्या परिणामी चीनचा संरक्षण खर्च १९७४मध्ये ३२.३ अब्ज डाॅलर इतका वाढला. दोन हजार सालापर्यंत चीन हा जागतिक संरक्षण व्यवस्थेत बलाढ्यतेच्या दृष्टीने चौथ्या वा पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकाविण्याची शक्यता होती व झालेही अगदी तसेच.
भारताला चीन व पाकिस्तानपासून संरक्षणदृष्ट्या असलेले धोके एकविसाव्या सहस्त्रकातही कायम राहाणार आहेत. अमेरिका ही एकविसाव्या सहस्त्रकात `डाॅमिनन्ट' घटक राहाणार असल्याचे स्पष्ट करुन जसवंत सिंह यांनी म्हटले होते की, एकविसाव्या सहस्त्रकात जागतिकीकरणाच्या काळात एखादे राष्ट्र दुसर्यावर शस्त्रास्त्रांनी हल्ला न करता माहिती-तंत्रज्ञानशास्त्राच्या आधारे युद्ध खेळून नामोहरम करु शकते. भारत आज जो संरक्षण व्यवस्थेवर खर्च करतोय त्याचे प्रमाण वाढतच राहिल. परंतु दोन राष्ट्रांमध्ये परस्परांच्या सुरक्षेची काळजी घेण्याविषयी `करार' होण्याची एखादी नवी प्रथाही अस्तित्त्वात येऊ शकते.
भारताने १९७४ साली अणुचाचण्या पोखरण येथे घडविल्या. त्यानंतर अणुशक्तीच्या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती साधली. जागतिक स्तरावर अणुशस्त्रविहिन विश्व निर्माण करण्यासाठी काही देशांनी मोहिम सुरु केली असली तरी, या क्षेत्रात काही देशांकडे प्रचंड प्रमाणात अण्वस्त्रे आहेत. काही देशांकडे अण्वस्त्रांचा कमी साठा आहे किंवा काहीच साठा नाही अशीही स्थितीही आहे. या आहे रे आणि नाही रे च्या विषम परिस्थितीत अण्वस्त्रविहिन विश्व ही संकल्पना साकार होण्यात खूपच अडथळे येतील. या संकल्पनेसाठी भारताने संपूर्ण सहकार्य द्यावे, पण त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेच्या आड जर ही स्थिती येत असेल तर कोणतीही तडजोड करु नये, असे जसवंत सिंह यांनी `डिफेन्डिंग इंडिया' या पुस्तकात `द फ्युचर' या प्रकरणात म्हटले आहे. (पृष्ठ क्रमांक २९१)
केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांनी लिहिलेले `डिफेन्डिंग इंडिया' हे भारताच्या परराष्ट्रनीती व संरक्षण व्यवस्थेचा विचार करणारे पुस्तक अभ्यासकांमध्ये वादळे निर्माण करणारे ठरले. संशोधन पद्धतीचा सुयोग्य वापर, नकाशे, सूची यांचा अंतर्भाव असलेले `डिफेन्डिंग इंडिया'हे पुस्तक मुळातून वाचण्यासारखे आहे.


प्रबोधनपुरुष न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या कर्तृत्वाचा आगळा परिचय ( दै. सामना २ मे २०००)

 लेखाचा मूळ भाग.


 लेखाचा उर्वरित भाग.



थंड गोळयाप्रमाणे पडलेल्या महाराष्ट्राला विचारांची ऊब देऊन त्यात चेतना निर्माण करणारे प्रबोधनपुरुष न्या. महादेव गोविंद रानडे यांची यंदा स्मृतिशताब्दी आहे. न्या. रानडेंचे शैक्षणिक, समाजकार्य प्रचंड विस्तारलेले होते. त्या विविधांगी कार्याची तपशीलवार ओळख करुन देणारे एक खास प्रदर्शन मुंबईतील पुराभिलेखागार कार्यालयाने ३ ते ८ मे २००० या कालावधीत आयोजिले होते. या प्रदर्शनात नेमके काय असणार आहे याची माहिती देणारी मी केलेली खास बातमी दैनिक सामनाच्या २ मे २००० रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. या बातमीची जेपीजी फाईल वर दिली आहे.

प्रबोधनपुरुष न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या कर्तृत्वाचा आगळा परिचय
- समीर परांजपे
थंड गोळयाप्रमाणे पडलेल्या महाराष्ट्राला विचारांची ऊब देऊन त्यात चेतना निर्माण करणारे प्रबोधनपुरुष न्या. महादेव गोविंद रानडे यांची यंदा स्मृतिशताब्दी आहे. न्या. रानडेंचे शैक्षणिक, समाजकार्य प्रचंड विस्तारलेले होते. त्या विविधांगी कार्याची तपशीलवार ओळख करुन देणारे एक खास प्रदर्शन मुंबईतील पुराभिलेखागार कार्यालयाने ३ ते ८ मे २००० या कालावधीत आयोजिले होते.
न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८४२ साली झाला. याच सुमारास विद्यापीठ कायदा बनविण्याच्या हालचाली सुरु झालेल्या होत्या. त्याला अनुसरुनच मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७ साली करण्यात आली. मुंबई विद्यापीठातर्फे १८५९ साली घेण्यात आलेल्या मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेत महादेव गोविंद रानडेंसह एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
पुराभिलेखागार कार्यालयाने फोर्ट येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या इमारतीत भरविलेल्या प्रदर्शनात न्या. रानडे यांच्या जीवनाशी संबंधित अनेक दुर्मिळ कागदपत्रे, विविध वृत्तपत्रांतील रानडे यांच्या संदर्भातील लेख असे बहुमोल साहित्य मांडलेले होते. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांतून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे विद्यार्थी अनेकदा पुस्तकांतील मजकुरावरच समाधान मानतात. पण इतिहासाच्या खर्या प्रेमींना न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या कार्याचे संपूर्ण दर्शन पुराभिलेखागाराच्या या प्रदर्शनातून झाले.
विद्यापीठाच्या मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेत जे २२ जण उत्तीर्ण झाले होते त्यातील रानडे यांच्यासहित सर्व विद्यार्थ्यांची यादी ३१ आँक्टोबर १८५९ला विद्यापीठ रजिस्ट्रार आर. एस. सिनक्लेअरने प्रसिद्ध केली. त्याची मूळ प्रत या प्रदर्शनात मांडलेली होती. १८६२ला न्या. महादेव गोविंद रानडे हे बी.ए. व त्यानंतर एम. ए. झाले. या पदव्यांच्या प्रमाणपत्रांच्या नोंदीही या प्रदर्शनात होत्या. विद्यापीठ परीक्षेतील यशाबद्दल रानडे यांना त्यांच्या सहाध्यायांनी जे घड्याळ भेट दिले त्याच्या खरेदीचा पत्रव्यवहारही येथे पाहायला मिळाला.
न्या. रानडे यांची एल्फिन्स्टन महाविद्यालयाशी घनिष्ठ संबंध होता. याच महाविद्यालयात शिकत असताना रानडेंनी १८५९ साली महाराष्ट्राच्या इतिहासावर एक निबंध लिहिला होता. त्याची आवृत्तीही या प्रदर्शनात होती. दक्षिणा फेलो म्हणून रानडेंनी आपली विद्यार्थीदशा कशी व्यतित केली यासंदर्भातील १८६३ ते १८६५ सालचा रानडेंनीच सादर केलेला अहवालही येथे मांडलेला होता. त्यात त्यांनी आपण अभ्यासादरम्यान कोणती महत्त्वाची पुस्तके वाचली याचाही निर्देश केलेला आहे. हा अहवाल त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे तत्त्कालीन प्राचार्य के. एस. चॅटफिल्ड यांना सादर केलेला होता.
एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिष्यवृत्ती मिळणारे विद्यार्थी वर्गात अनुपस्थित राहिल्यास त्या प्रमाणात शिष्यवृत्तीतून रक्कम कापण्यात येई. त्याचा १८६० सालचा महाविद्यालयाचा अहवालही येथे होता. त्यात न्या. रानडेंचेही नाव आहे. एल्फिन्स्टनमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासदरीबाबतचा न्या. रानडे, बाळ मंगेश, रामचंद्र विष्णू या तिघांनी सादर केलेला अहवालही या प्रदर्शनात आहे. १८६८मध्ये न्या. रानडेंची एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये इंग्रजी भाषेचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून दरमहा ४२५ रुपयांवर नेमणूक झाली. त्याचा शिक्षण खात्याने काढलेला आदेशही या प्रदर्शनात पाहायला मिळतो. त्यानंतर एल्फिन्स्टन महाविद्यालयातच न्या. रानडे यांनी प्राध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याबाबत तत्कालीन प्राचार्यांनी १८६८ साली लिहिलेले एक पत्र इथे मांडलेले आहे. न्या. रानडेंनी कोल्हापूर-मुंबई असा एक दौरा केला होता त्याचाही तपशील आहे. एल्फिन्स्टन महाविद्यालयतील प्राध्यापकांच्या वेतन तसेच उपस्थिती संदर्भातील फेब्रुवारी ते आॅगस्ट १८६८ या कालावधीत संपूर्ण अहवाल उपलब्ध आहे. त्यातही न्या. रानडे यांचे नाव आहे.
न्या. राऩडे यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ज्या विविध जबाबदार्या सांभाळल्या त्याचे वेळोवेळी निघालेले आदेशही या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयात न्या. रानडे यांची १८९३ साली न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. या नेमणूकीसंदर्भातील ब्रिटिश शासनाची अधिसूचना, विधी खात्याच्या आदेशाची मूळ प्रत येथे पाहायला मिळत होती. १६ जानेवारी १९०१ रोजी न्या. रानडे यांचे निधन झाले. त्यावेळी विधी खात्याने शोक प्रकट करणारे जे परिपत्रक काढले त्याची मूळ प्रतही त्याशिवाय `टाइम्स', `पूना आँब्झर्व्हर' यांतील न्या. रानडेंवरील प्रशंसापर लेखही येथे मुळ रुपातच मांडण्यात आलेले होते.
१९४२मध्ये न्या. रानडे यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली होती. त्यावेळी `सह्याद्री' नियतकालिकाने न्या. रानडे यांच्यावर एक विशेषांक काढला होता. रानडेंच्या विविध पैलूंचा शोध घेणारे `सह्याद्री'मधील वि. श्री. जोशी, वामन मोरेश्वर पोतदार, ध. रा. गाडगीळ, न. चिं. केळकर, रा. श्री. जोग यांचे लेख या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

न्या. राऩडे यांच्यावर जी पुस्तके लिहिण्यात आली व रानडे यांची स्वत:ची काही पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात अाली होती.`१८५७ ते १९४७ - स्वातंत्र्यसमराचा काळ' अशी संकल्पना केंद्रीभूत धरुन पुराभिलेखागार विभागाने २००० सालच्या जानेवारीपासून काही प्रदर्शने भरविली होती. सुभाषचंद्र बोस यांच्यावरही एक प्रदर्शन या विभागाने आयोजित केले होते. अस्सल दुर्मिळ कागदपत्रांतून न्या. रानडे यांचे व्यक्तित्त्व उभे करणारे प्रदर्शन पुराभिलेखागार विभागाने एल्फिन्स्टन महाविद्यालयात ३ मे  ते ८ मे २००० या कालावधीपर्यंत आयोजिले होते. त्याचे उद्घाटन तत्कालीन सांस्कृतिक राज्यमंत्री डाँ. हिराणी यांच्या हस्ते ३ मे रोजी दुपारी १२.३० वाजता झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख ज. वि. नाईक व पत्रकार डाँ. अरुण टिकेकर हे उपस्थित होते. हे प्रदर्शन रोज १०.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत जनतेसाठी खुले होते. हे प्रदर्शन आयोजित करण्यात पुराभिलेखागार विभागाचे तत्कालीन संचालक डाँ. महेश शुक्ला व अभिलेखाधिकारी अशोक खराडे यांचा सिंहाचा वाटा होता.

Wednesday, March 26, 2014

कंगोरे युक्रेन-क्रिमिया संघर्षाचे...(दिव्य मराठी - २६ मार्च २०१४ )




युक्रेन व क्रिमिया येथील संघर्षावर मी दै. दिव्य मराठीमध्ये २६ मार्च २०१४ रोजी लिहिलेल्या लेखाच्या दोन लिंक्स, मजकूर व जेपीजी फोटो सोबत दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/.../EDT-sameer-paranjape...
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/.../241/26032014/0/6/

---
कंगोरे युक्रेन-क्रिमिया संघर्षाचे...
-----------
- समीर परांजपे
--------
युक्रेनचा स्वायत्त प्रांत असलेल्या क्रिमियामध्ये १६ मार्च रोजी झालेल्या सार्वमतानुसार तेथील ९७ टक्के नागरिकांनी रशियात सामील होण्याच्या बाजूने कौल दिला. हे सार्वमत क्रिमियामध्ये दाखल झालेल्या रशियन लष्कराच्या दबावाखाली घेण्यात आल्याने ते आम्हाला मंजूर नाही, असा सूर अमेरिका व युरोपीय देशांनी लावला असला तरी त्यामागचे त्यांचे अंतस्थ हेतूही लपून राहिलेले नाहीत. सोव्हिएत रशियाचे संघराज्य अस्तित्वात असताना युक्रेन असो वा क्रिमिया हे सर्व प्रांत या देशाच्याच अधिपत्याखाली होते. २५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत रशियाचा डोलारा कोसळला व त्यातून जी अनेक नवीन राष्ट्रे निर्माण झाली ती आर्थिकदृष्ट्या फारशी प्रगत नव्हती. किंबहुना त्यातील बहुतांश देश आजही रशियाकडून मिळणार्‍या आर्थिक, सामरिक मदतीवर अवलंबून आहेत. युक्रेनही त्याला अपवाद नाही.
सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर रशियाचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील वर्चस्व हे खूपच कमी झाले. इराक, अफगाणिस्तानमधील युद्धानंतर अमेरिकेचे प्रभुत्ववादी राजकारण अधिक धारदार बनले आहे. दुसर्‍या महायुद्धातील विजयानंतर अमेरिकेने आखाती देश, आफ्रिका तसेच आशियाई देशांना आपल्या पकडीखाली आणायचा प्रयत्न चालवला होता. त्याला काटशह देण्यासाठी साम्यवादी रशियानेही कसोशीचे प्रयत्न केले, पण दोन्ही देशांतला मूलभूत फरक असा होता की, अमेरिकाही आपल्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे अधिकाधिक प्रबळ बनली होती. कालानुरूप बदल घडवत अमेरिकेची संरक्षण सज्जताही अत्याधुनिक रूप धारण करत होती. दुसर्‍या बाजूस साचेबंद अर्थव्यवस्थेमुळे सोव्हिएत रशियाच्या प्रगतीचा लगाम खेचला जात होता. सोव्हिएत रशियामध्ये अनेक प्रादेशिक, धार्मिक, वांशिक प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले होते. या पार्श्वभूमीवर तो देश एकसंघ न राहता फुटणे ही अपरिहार्य बाब होती.
आपले गतवैभव मात्र रशिया अजूनही विसरू शकलेला नाही. दांडगाई हेच ज्यांच्या राजकारणाचे सूत्र आहे ते रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना आपल्या आजूबाजूची स्वतंत्र राष्ट्रे पुन्हा आपल्या कह्यात आणायची आहेत. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या युक्रेनसह बाकीच्या देशांनी आपली प्रगती साधण्यासाठी कधी रशिया तर कधी युरोप, अमेरिका यांच्या वळचणीला आलटून पालटून जाण्याची व्यावहारिक वृत्ती दाखवली. या देशांमध्ये असलेले तेल व नैसर्गिक वायूंचे साठे हा अमेरिका, युरोपीय देश व दुसर्‍या बाजूला रशियासाठी लोभाचा विषय आहे. त्यामुळे या तेल साठ्यांवर आपले नियंत्रण राखण्यासाठी अमेरिका व रशियामध्ये साठमारी सुरू असते. युक्रेनबाबतही नेमके हेच घडले आहे. रशियाला तेलपुरवठा करणार्‍या पाइपलाइन या युक्रेनमधून जातात. जर युक्रेनवर अमेरिकेची पकड अधिक घट्ट झाली तर रशियाच्या तेलपुरवठ्यावर परिणाम होऊन त्या देशाच्या नाड्या आवळल्या जाऊ शकतात. हा धोका धूर्त पुतीन यांना लक्षात आला. त्यातच युक्रेनमधील सत्ताधार्‍यांची हकालपट्टी होऊन तेथे जे हंगामी अध्यक्ष सत्तेवर आले आहेत, तेही अमेरिका की रशियापैकी कोणाची कड घ्यायची या संभ्रमात आहेत.
या स्थितीत क्रिमिया आपल्या टाचेखाली आणून रशियाने मोठी धूर्त खेळी केली. क्रिमिया या स्वायत्त प्रांतामध्ये 57 टक्के रशियन नागरिक आहेत. मात्र त्यांना रशियाबद्दल इतकेच प्रेम होते तर क्रिमिया याआधीच रशियात सामील व्हायला हवा होता. मात्र 1991 ते आजवर असे घडले नव्हते, पण गेल्या काही महिन्यांत पुतीन यांनी युक्रेनवर अनेक सवलतींचा वर्षाव करून व विकासाची स्वप्ने दाखवून त्या देशातील जनतेला व सत्ताधार्‍यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी कंबर कसलेली होती. अमेरिका व युरोप भौगोलिकदृष्ट्या काहीसे लांब असून आपला स्वाभाविक विकास रशियाच्या मदतीनेच होऊ शकतो, अशी सध्यातरी खात्री पटल्याने युक्रेन व क्रिमियातील जनमत रशियाच्या बाजूला वळले आहे. त्यातच रशियन भाषा, प्रदेश यांचे भावनात्मक मुद्दे क्रिमियात महत्त्वाचे ठरून तो रशियात सामील झाला.
क्रिमियाचा प्रश्न पेटलेला असताना भारतापुढे आता यक्षप्रश्न पडला आहे की, रशियाची बाजू घ्यावी की अमेरिकेची. रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र असला तरी महाशक्ती म्हणून उदयाला येत असताना भारताला अमेरिकेचे सहकार्य सर्वात जास्त मोलाचे ठरणार आहे. अलिप्ततावादी चळवळीचा पुरस्कर्ता असला तरी भारताला यापुढे काठावर राहून चालणार नाही. क्रिमियावर रशियाने जी पकड घट्ट केली त्यात त्या देशाच्या लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेच्या वर्चस्ववादी राजकारणाचा निषेध करीत असतानाच भारताने रशियाच्या या हडेलहप्पी वृत्तीचा निषेधही तितक्याच तीव्र शब्दांत करायला हवा. रशियाने क्रिमियावरचा ताबा सोडावा तसेच खर्‍याखुर्‍या लोकशाही मार्गाने क्रिमियात सार्वमत घडवून आणावे, अशी मागणी भारताने रशियाकडे करायला हवी होती, पण भारताचा आवाज रशियाने गतकाळात केलेल्या उपकारांचे स्मरण करून आक्रसतो. क्रिमिया रशियामध्ये विलीन झाल्यानंतर पुतीन यांनी भारताबरोबर चीनच्या सत्ताधार्‍यांनाही दूरध्वनी करून पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली. सर्वच क्षेत्रात भारताचा कट्टर स्पर्धक असलेला चीन हा भारतापेक्षाही बलाढ्य आहे हे चतुर पुतीन यांना माहीत असल्याने त्यांनी सत्तासमतोलासाठी चीनलाही चुचकारले आहे. रशिया हा अत्यंत व्यवहारवादी आहे हे भारतीय नेते जितके लवकर ओळखतील तेवढे चांगले होईल.
पुतीन यांच्या आक्रमक राजकारणाला क्रिमियाची भूमी कमी पडत आहे म्हणून की काय आता युक्रेनच्या पश्चिम सीमेवर असलेल्या मोल्दोवा हा देशही आपल्या पंजाखाली आणण्याचा प्रयत्न पुतीन यांनी चालवला आहे. मोल्दोवामध्ये बहुसंख्य रशियन भाषिक असून ते रशियात सामील होतील, असा पुतीन यांचा होरा आहे. युक्रेनचे तुकडे पाडण्यासाठी सरसावलेल्या रशियावर अमेरिकेने युरोपियन देशांच्या संगतीने कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र या आर्थिक निर्बंधांचा रशियावर फारसा परिणाम होणार नाही व तो देश एकटा पडणार नाही, असा विश्वास भारताने व्यक्त केला आहे. हा दावा कोणत्या आधारांवर केला गेला हे स्पष्ट झालेले नाही. मुळात युक्रेनमधील घडामोडी भारताने फारच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. क्रिमियामध्ये सध्या 800 हून अधिक भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युक्रेनमध्ये सुमारे चार हजार भारतीय विद्यार्थी आहेत. युक्रेन-क्रिमियामध्ये प्रचंड राजकीय उलथापालथी घडत असताना या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटावे, अशी कोणतीही कृती केंद्र सरकारकडून झालेली नाही. युक्रेन-क्रिमियातील स्थिती अधिक स्फोटक झाली तर तेथील भारतीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सावरण्याची पर्यायी योजनाही केंद्र सरकारकडे नक्कीच तयार नाही. नेहरूवादी म्हणविणार्‍यांना असा कमकुवतपणा शोभत नाही.
मार्शल स्टॅलिनचे खर्‍या अर्थाने राजकीय वंशज शोभणारे पुतीन यांनी मिळवलेल्या क्रिमिया विजयाचा तसेच युक्रेनमधील फाटाफुटीचा भविष्यात रशियाला कितीही लाभ झाला तरीही त्यामुळे रशियाला कोणी लोकशाहीवादी म्हणेल याची शक्यता नाही. रशियाची प्रतिमा जितकी कलंकित होईल तितके अमेरिका व युरोपीय देशांना हवेच आहे. त्या देशांचे मनोरथ पुतीन आपल्या कृत्यांनी पूर्ण करीत आहेत, असेच म्हणावे लागेल!
sameer.p@dainikbhaskargroup.com
paranjapesamir@gmail.com

Monday, March 24, 2014

शिवशाहीच्या इतिहासाचा ‘निनाद’ - लोकसत्ता - १६ आॅगस्ट २००९



या लेखाचे लोकसत्ता वेबसाइटवरील पेज



इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर यांच्यासमवेत पुणे येथील सिंहगडची भ्रमंती केली तो क्षण.






छत्रपती शिवाजी महाराज व मराठेशाहीच्या इतिहासलेखनाची व इतिहासकारांची एक मोठी परंपरा आहे. त्याच प्रभावळीतले इतिहासकार निनाद बेडेकर यांच्या वयाला उद्या १७ ऑगस्ट २००९ रोजी ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानंतरच्या वर्षभरात निनाद बेडेकर महाराष्ट्रातील ६१ किल्ल्यांवर युवक व गडप्रेमींना घेऊन भ्रमंती केली तसेच गडांचे जतन, इतिहासाबद्दल जागृती निर्माण केली. कवी भूषणाने शिवरायांवर केलेल्या काव्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखविणे तसेच शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य अशा विषयांवर पुस्तके लिहिण्याचा बेडेकर यांचा मानस होता. शिवस्मरणाने भारलेले उत्तम लेखक व फर्डा वक्ता असलेले निनाद बेडेकर यांच्याशी केलेली मी मनमोकळी बातचीत केली होती. ही सविस्तर मुलाखत दैनिक लोकसत्तामध्ये १६ आॅगस्ट २००९ रोजी प्रसिद्ध झाली होती. या मुलाखतीची लिंक मी पुढे दिली आहे. तसेच हा लेख लोकसत्ताच्या वेबसाईटवर ज्या लिंकला आहे त्याच्या पानाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
 


शिवशाहीच्या इतिहासाचा निनाद


- समीर परांजपे



महाराष्ट्राला केवळ भूगोल नाही दैदीप्यमान इतिहासही आहे, असे म्हणण्याची एक परंपरा आहे. महाराष्ट्रातील मध्ययुगीन इतिहास हा विविध प्रकारच्या संघर्षाने भरलेला व भारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना, त्यांनी उभारलेले किल्ले, गनिमी काव्याचे तंत्र वापरून केलेल्या लढाया हे सर्व रोमांचकारी आहेच. शिवरायांनंतरही मराठी साम्राज्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर झाला. १८१८ साली मराठेशाही इंग्रजांनी बुडविली. त्याला कारणीभूत ठरले ते अत्यंत अत्याचारी असे पेशवे आणि सत्तेच्या कैफात राहिलेले भ्रष्ट आचारी मराठा सरदार! नव्या युगाचा मंत्र व शत्रूची चाल हीच त्यांना कळली नाही. गेल्या ४०० वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून महाराष्ट्रात अनेक आदर्श उपक्रम रचले गेले तसेच त्यांच्या नावाचा गैरवापर करून आपली तुंबडी भरणारे व मराठी माणसांना अजून संकुचित करून ठेवणारे अनेक नेतेही पैदा झाले. छत्रपती शिवराय हे फक्त मराठ्यांचेच असा प्रचार सुरू झाला तर उच्चवर्णीय इतिहासकारांनी शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालकबनवून त्यांना एका विशिष्ट जातीचे संरक्षक बनविले!
सुसंस्कृत महाराष्ट्रात हे सारे का चालले आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर इतका उत्तम आयकॉन कोणी निर्माणच झाला नाही का? छत्रपती शिवराय यांच्याबद्दल व महाराष्ट्रातील कोणत्याही घटनेबाबत इतिहासकारांना सध्या चिकित्सा करणे कठीण होऊन बसले आहे. इतिहासकार काय प्रतिपादन करतो यापेक्षा त्याची जात कोणती यातच काही जणांना रस असतो. अशाने तटस्थ इतिहास लेखन कधीही होऊ शकणार नाही. महाराष्ट्रात वा. सी. बेंद्रे, प्रबोधनकार ठाकरे, त्र्यं. ज. शेजवलकर, ग. ह. खरे, पा. वा. काणे, न्या. महादेव गोविंद रानडे, वि. का. राजवाडे, शंकर नारायण जोशी अशा अनेक महान इतिहासकारांनी परंपरा आहे. शिवाय ग्रँड डफसारखा ब्रिटिश इतिहासकारांनीही शिवाजी महाराजांविषयी लिहून ठेवले आहे. ब्रिटिश इतिहासकारांनी जेत्याच्याभूमिकेतून महाराष्ट्राचा इतिहास मांडताना शिवरायांबद्दल अनुदार उद्गार काढले असून ते क्षम्य नाहीत. परंतु राष्ट्रीयदृष्टिकोनातून इतिहासलेखन करणाऱ्या इतिहासकारांनी छत्रपती शिवरायांची थोरवी नेटकेपणाने मांडली आहे. शिवरायांनंतर मराठी साम्राज्याचा आणखी झालेला विस्तार व कालप्रवाहांनुसार या राज्यात शिरलेल्या वाईट प्रवृत्ती यांचेही परखड चित्रण केले आहे. इतिहासलेखनात सबल्टन हिस्ट्रीम्हणजे समाजातल्या तळागाळातल्या कष्टकरी- कामकरी लोकांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिणे असा एक प्रवाह आहे. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शरद पाटील यांसारख्या विद्वानांनी घेतलेला वेध हा सबल्टन हिस्ट्रीचाच प्रकार आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी शाहिरी परंपरा जोजवत शिवरायांचा इतिहास सांगितला. विद्यमान काळात गजाननराव मेहेंदळे हे इतिहासकार शिवरायांवर अतिशय परिश्रमपूर्वक ग्रंथनिर्मिती करीत आहेत.
हे सर्व इतक्या विस्ताराने सांगण्याचे कारण महाराष्ट्राच्या इतिहासकारांच्या परंपरेतील अजून एक वैशिष्टय़पूर्ण नाव म्हणजे निनाद बेडेकर. शिवरायांवरील त्यांचे चिकित्सक लेखन व उत्तम शैलीत दिलेली अभ्यासपूर्ण व्याख्याने यामुळे निनाद बेडेकर यांचे नाव दुमदुमत आहे. इंग्रजी कालगणनेनुसार १७ ऑगस्ट २००९ रोजी निनाद बेडेकर वयाची ६० वर्षे पूर्ण करून ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या पुढच्या वर्षभरात निनाद बेडेकर महाराष्ट्रातील युवा पिढीला गड-किल्ल्यांचा इतिहास समजून देण्यासाठी ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करणार आहेत. शिवाय इतिहास ग्रंथलेखनाचेही त्यांचे मनसुबे आहेत. हा वेगळ्या वाटेवरचा इतिहासकार आहे, जे शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून ते त्यावर लेखन करतात, भाषणे देतात. शिवाजी महाराज नव्या एमबीएपिढीला कळावे म्हणून शिवाजी महाराजांमध्ये व्यवस्थापकीयकौशल्य असा विषय घेऊन व्यवस्थापन संस्थांमध्ये इंग्रजीतून भाषणे देतात. नव्या युगातील मंत्र, अस्त्रांचा वापर करून शिवाजी महाराज हे व्यक्तित्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे निनाद बेडेकर हे अशाप्रकारचे वेगळे इतिहासकार आहेत.
निनाद बेडेकर सांगतात, ‘‘पेशव्यांचे नातेवाईक असलेल्या सरदार रास्ते यांच्या घराण्याशी माझे नातेसंबंध आहेत. माझ्या आजीचे नाव गिरिजाबाई रास्ते. पुण्यातील शिवपुरी व नंतर रास्तापेठ असे नामकरण झालेल्या भागातील रास्तेवाडय़ात माझे बालपण गेले. रास्ते वाडा हा सरदार रास्तेंचा असल्याने तिथे कारकुनी फड, इच्छा-भोजन असा सगळा माहोल होता. रास्ते यांचे स्वत:चे सुसज्ज असे ग्रंथालय होते. हा काळ आहे १९५० ते १९५६ या दरम्यानचा.. रास्ते वाडय़ात इतिहासकार दत्तो वामन पोतदारांप्रमाणेच अनेक इतिहासकार येत असत. त्यांच्या होणाऱ्या चर्चामधून इतिहासासंदर्भात अनेक उत्तम गोष्टी कानावर पडत होत्या. मी पहिलीत शिकत असताना बाबासाहेब पुरंदरे लिखित दख्खनची दौलतहे पुस्तक वाचनात आले. त्यातील चित्रमयी शैलीने मला आकर्षून घेतले.’’
बेडेकरांचा विचार पुढे सुरूच राहतो. ‘‘१९६१ साली पानशेतचे धरण फुटले व पुण्यात मोठा पूर आला. मला चांगले आठवते त्यावेळी शाळा तीन-चार महिने बंद होत्या. या काळात बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर कोल्हापूर भागात जाणे झाले. तेथील विशाळगड, पन्हाळगड यांचे ऐतिहासिक महत्त्व बाबासाहेबांनी समजावून सांगितले. याच दौर्यात महाबळेश्वर, प्रतापगड अशी भ्रमंती झाली. शालेय जीवनात तसेच टेक्निकल स्कूल व पुढे मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा करीत असताना बाबासाहेब पुरंदरे व गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर गड-किल्ल्यांवर विशेष भ्रमंती केली. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत होतोच पण अशा भ्रमंतीतून तो इतिहास मनात अधिक रुजत गेला. गड-किल्ल्यांवर भ्रमंती करताना तेथील अवशेष, त्यांची बांधणी याबद्दल विवेचन करण्याकडे गो. नी. दांडेकर विशेष लक्ष देत असत. १९७१-७२ साली कमिन्समध्ये नोकरी लागली. त्यानंतरही सवंगडय़ांसह गडभ्रमंती सुरूच राहिली. मी चौथीत असताना ध्रुव वाचनालय काढले होते. पानशेतच्या पुरात हे ग्रंथालयही वाहून गेले, मात्र वाचनाची ओढ भविष्यातही कायम राहिली. शिवाजी महाराज, मराठा, मुघल साम्राज्य व इतर शाह्य़ा यांच्याविषयी स्वदेशी व विदेशी इतिहासकारांनी लिहिलेले दुर्मिळ ग्रंथात १६ व्या शतकापासून महाराष्ट्रात अनेक कारणांनी आलेल्या विदेशी प्रवाशांनी शिवाजी महाराज, मुघलांविषयी मते नोंदविलेली प्रवासवर्णने, अनेक मोठमोठे राजे-रजवाडे, बादशाह यांचे पत्रव्यवहार संकलित केलेले ग्रंथ अशा प्रकारची पुस्तके जमवायचा छंदच लागला. आजच्या घडीला माझ्या वैयक्तिक संग्रहात अशी ५ हजार पुस्तके आहेत. त्यातील बहुतांश दुर्मिळ आहेत.’’
इतिहासलेखन ही काही सोपी प्रक्रिया नाही.’’ निनाद बेडेकरांनी आपले विवेचन पुढे सुरू ठेवले. ‘‘मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी पर्शियन, अरेबिक भाषा येणे अत्यंत आवश्यक आहे. त्या काळातील आपल्या येथील बहुतांश पत्रव्यवहार याच भाषेत आहे. त्यामुळे या दोन भाषा मी आधी शिकून घेतल्या. त्याचा फायदा असा झाला की अस्सल पत्रे मुळाबरहुकूम वाचून त्यांचा नीटस अन्वयार्थ लावता येऊ लागला. इतिहासकारांमध्ये गजाननराव मेहेंदळे यांचा माझ्यावर सर्वाधिक प्रभाव आहे. शिवचरित्र लिहिण्यासाठी मेहेंदळे यांनी जे अफाट परिश्रम घेतले आहेत त्याला तोडच नाही. गजाननराव मेहेंदळे हे कोणतेही विधान करताना त्याच्या पुष्टय़र्थ अनेक तळटिपा देतात. त्यांचे विवेचन करतात. ही शास्त्रशुद्ध संशोधनाची पद्धत मला अत्यंत आवडते. मेहेंदळे यांच्याबरोबर शिवचरित्रासाठी सहाय्य करीत असताना आम्ही विविध शाह्य़ांची अस्सल पत्रे वाचली. त्यांचे संदर्भ शोधले. त्यामुळे नवीन गोष्टीही या शिवचरित्रात येऊ शकल्या. औरंगजेबाच्या ७०० पत्रांचा समावेश असलेल्या अदाब-इ-आलमगिरीचा थेट उपयोग आम्ही या शिवचरित्रात केला आहे. विविध पातशाह्य़ांची पत्रे ही शिकस्त लिपीत लिहिलेली असतात. ती लिपी वाचायला अत्यंत कठीण आहे. ती लिपीही मी शिकून घेतली. अरेबिक, उर्दू लिपीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्या लिपीतील पत्रेही वाचायला शिकलो. इतिहासलेखनात प्रश्नयमरी सोर्सेस (प्रथम दर्जाची साधने) यांना फार महत्त्व असते. अशा या पत्रांच्या वाचनातून मी, गजानन मेहेंदळे, रवींद्र लोणकर या तिघांनी संयुक्तपणे आदिलशाही फर्मानहे पुस्तक साकारले. या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे या पुस्तकातील छापलेल्या अस्सल पत्रांचे डीटीपी कामही आम्हीच केले आहे.’’
‘‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्यानंतर अनेक पराक्रमी पेशवे, मराठा सरदार यांच्या युद्धकौशल्य व नेतृत्वाचा अभ्यास देशांच्या लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये केला जातो. माझ्या माहितीप्रमाणे जगभरातील २० ते २५ देशांमध्ये छत्रपती शिवरायांच्या लष्करी पैलू व नेतृत्वाचा अभ्यास होतो. अमेरिकेतील लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये दोन लढायांची मॉडेल्स ठेवली आहेत. १६६९ साली शिवरायांनी अफझलखानाविरुद्धची प्रतापगडाजवळ केलेली लढाई व १७२९ मध्ये निजाम-उल-मुल्क याच्या विरोधात दुसऱ्या बाजीरावाने पालखेड येथे केलेली लढाई अर्थात प्रत्येक देशाचा लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रम हा गोपनीय असतो. त्यामुळे शिवरायांवर आणखी कुठे व कसा अभ्यास सुरू आहे ते तपशीलवार सांगणे कठीण आहे.’’
‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांचे युद्धनेतृत्व, दुर्गबांधणी, आरमार, सैनिकी शिस्त, महसूल आकारणी अशा प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करून त्यावर लिहिणे व भाषणे करणे असा उपक्रम मी सुरू केला आहे.’’ निनाद बेडेकर सांगतात, ‘‘शिवाजी महाराजा’’चे व्यवस्थापन कौशल्य या विषयावर मी व्यवस्थापन शिक्षण संस्थांतून नव्या पिढीसमोर एमबीएसमोर भाषणे केली. शिवरायांच्या १८ ते १९ गुणांसंदर्भात आतापर्यंत अशा व्याख्यानांतून विवेचन केले. पण शिवरायांच्या व्यक्तित्वातील १०० गुणांपर्यंत आपला अभ्यास वाढविणे व त्यावर लेखन, भाषणे करणे असा माझा संकल्प आहे. शिवरायांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचे सारसूत्र मांडणारे एक पुस्तक लवकरच लिहिणार आहे. या अंगाने महाराजांसंदर्भात नव्या पिढीच्या माहितीसाठी लेखन होणे गरजेचे आहे.’’ ‘‘महाराष्ट्रातील गड-किल्ले यांच्या बांधणीत वैविध्य आहे. देवगिरीचे यादव, बहामनी, आदिलशाही, मुघल, शिवाजी महाराज, पोर्तुगीज, इंग्रजांनी बांधलेले किल्ले असे नाना प्रकार त्यात आढळतील. उद्या १७ ऑगस्टला माझ्या वयाला ६० वर्षे पूर्ण होतील. त्यानंतरच्या वर्षभरात महाराष्ट्रातील ६१ किल्ल्यांवर युवा मंडळी व गडप्रेमींना घेऊन मी भ्रमंती करणार आहे. या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगणार आहे. माझ्या सुहृदांनी स्थापन केलेल्या निनाद बेडेकर मित्रमंडळया संस्थेच्या माध्यमातून हा सर्व उपक्रम होईल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातला एक तरी किल्ला या भ्रमंतीत असावा, असा कटाक्ष ठेवण्यात आला आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या समस्येमुळे चंद्रपूर, गोंदियासारख्या चार जिल्ह्यांतील किल्ले आम्हाला या यादीतून वगळावे लागले. नाशिक व ठाणे जिल्ह्यांत सर्वाधिक किल्ले आहेत. राज्यातील सर्वच किल्ल्यांचे उत्तम पद्धतीने कसे जतन व्हावे यावर नव्या पिढीचे लक्ष केंद्रित करण्याचा या किल्लेभ्रमंतीतून माझा प्रयत्न राहणार आहे.’’
‘‘नव्या पिढीतील अनेक मुले मला इतिहास संशोधनाच्या कामी मदत करतात. इंटरनेटवर शिवाजी महाराज यांच्यासंदर्भातील तसेच मराठा,मुघल साम्राज्य आणि अन्य पातशाह्यांबद्दल अनेक पुस्तके डाऊनलोड केलेली आहेत. अशा ६०० पुस्तकांची यादी एका मुलाने माझ्या हाती दिली. अशा इतिहासप्रेमींचे काही गट आम्ही तयार केले आहेत. ते शिवरायांच्या इतिहासाच्या विविध पैलूंवर काम करीत असतात. माझ्यावर शंकर नारायण जोशी यांच्या इतिहासलेखनाचाही प्रभाव आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लेखन कसे करावे हे त्यांच्या ग्रंथांतून मी शिकलो. त्यातूनच मी शर्थीचे शिलेदार, दुर्गकथा, शिवाजी महाराजांच्या ४० लढाया, समरांगण, साक्ष इतिहासाची, ऐतिहासिक कथा, थोरले राजे गेले सांगून, गजकथा, विजयदुर्गचे रहस्य आदी पुस्तके लिहिली. कवी भूषणाने शिवरायांची महती गायलेले काव्य मला मुखोद्गत आहे. या काव्यातील सौंेदर्य व अन्वयार्थ स्पष्ट करणारे एक पुस्तक लिहिण्याचा माझा विचार आहे. ते पुस्तकही लवकरच प्रकाशित होईल.’’ ‘‘शिवाजी महाराज व त्यांच्यानंतरच्या मराठा साम्राज्याबद्दल जर्मन, फ्रेंच, इटली, इंग्रजी, स्पॅनिश भाषेतील कागदपत्रांत अशा अनेक नोंदी आहेत की, ज्या अजून अनुवादित झालेल्या नाहीत. मध्यमयुगीन काळात या भाषांतील क्लिष्टता लक्षात घेता अनुवादाचे हे काम इतके सोपे नाही. भारतीय इतिहास संशोधन मंडळातर्फे मोडी लिपीचे वर्ग चालविले जातात. त्याला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यातून दुर्मिळ कागदांचे वाचन, संशोधन मोठय़ा प्रमाणावर होऊ शकेल. मिर्झाराजेंनी शिवरायांकडून पुरंदर तहाच्या वेळी ताब्यात आलेल्या २३ किल्ल्यांचे बनवून घेतलेले नकाशे अशाच प्रयत्नांतून आमच्या हाती लागले.
त्यामुळे सर्व २३ किल्ल्यांची नावे नक्की करणे शक्य झाले. इतिहासलेखन करणाऱ्यांपैकी सध्या विशिष्ट गटाच्या लोकांवर टीका केली जात आहे. ज्ञानाची भांडारे हल्ला करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो आहे. माझ्या मते ऐतिहासिक साधनांची अधिकाधिक माहिती मिळवून त्यांचे कठोर परीक्षण करून जो निष्पक्षपणे इतिहास लिहितो तो खरा इतिहासकार. त्याला कोणत्याही वर्ग, जाती, जमातीच्या बंधनात अडकवू नका.’’ निनाद बेडेकर कळकळीचे आवाहन करतात. आंतरराष्ट्रीय अभ्यास पद्धतीचा, नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून छत्रपती शिवराय व मराठेशाही संदर्भात इतिहासाचे परिशीलन गेली अनेक वर्षे करणारे निनाद बेडेकर यापुढेही भावी पिढय़ांना असेच मार्गदर्शन करीत राहतील. शिवशाहीच्या इतिहासाचा हा निनादसह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत यापुढेही असाच घुमत राहील!
paranjapesamir@gmail.com