Sunday, August 24, 2014

कोंडीत सापडलेले शरीफ सरकार ! - दै. दिव्य मराठीच्या २४ अाॅगस्ट २०१४च्या रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद झालेला लेख.



पाकिस्तानातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करणारा मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या २४ अाॅगस्ट २०१४च्या रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाची लिंक व टेक्स्ट पुढे दिले आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/.../MAG-article-on...
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/.../244/24082014/0/4/


------------
कोंडीत सापडलेले शरीफ सरकार !
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-------
पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ (पीएमएल-एन) या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळून त्या पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ पंतप्रधानपदी विराजमान झाले. ही पहिलीच निवडणूक अशी होती की, आधी पाच वर्षे कारभार केलेल्या सरकारने लोकशाही मार्गाने नव्या सरकारकडे सत्तासूत्रे सोपविली. शरीफ यांचा विजय डोळ्यात खुपणारे दोन असंतुष्ट आत्मे पाकिस्तानात सध्या धुमाकूळ घालत आहेत. त्यातील एक आहे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचा प्रमुख व माजी क्रिकेटपटू इम्रान खान व दुसरे आहेत पाकिस्तानी अवामी तहरीक (पीएटी) या पक्षाचे प्रमुख मौलवी ताहिर-अल- काद्री.
शरीफ यांना सत्तास्थानावरून हुसकावून पाकिस्तानला ख-या अर्थाने ‘आझादी’ मिळवून देण्यासाठी पीटीआय व पीएटी या दोन पक्षांनी स्वतंत्रपणे दोन मोर्च्यांचे आयोजन केले होते. त्यामुळे इस्लामाबादमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कायम राहण्यासाठी ते शहर लष्कराच्या ताब्यात गेल्या 1 ऑगस्टपासून पुढील तीन महिने देण्याचा निर्णय नवाझ शरीफ सरकारने घेतला होता. त्याची निर्भर्त्सना पाकिस्तानी पीपल्स पार्टी (पीपीपी) या प्रमुख विरोधी पक्षाने केली होती. नवाझ शरीफ यांच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी गेल्या 18 ऑगस्टपासून पाकिस्तानातील सर्व विरोधी पक्ष व नागरिकांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करावी, असे आवाहन इम्रान खान याने केले होते. पण त्याचा पक्ष वगळता पाकिस्तानातील एकाही विरोधी पक्षाने त्याला प्रतिसाद न दिल्याने इम्रान खान एकाकी पडला. त्यातच आपले स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी इम्रान खान राज्यघटनेचा भंग होईल अशी कृत्ये करण्यासाठी पाकिस्तानी जनतेला भडकवत आहे, असा आरोप पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी करून इम्रान खान याला अपशकून केला होता. मौलवी ताहिर-अल-काद्री हे नवाझ शरीफ यांचे एक महत्त्वाचे विरोधक. त्यांचे वास्तव्य असते कॅनडामध्ये, पण ते सध्या पाकिस्तानमध्ये परत आले आहेत. त्यांच्या पीएटी पक्षाचे चौदा कार्यकर्ते लाहोर पोलिसांबरोबर जून महिन्यामध्ये झालेल्या चकमकीत ठार झाले होते. या कार्यकर्त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून नवाझ शरीफ यांना अटक करण्यात यावी व शरीफ यांची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करून पाकिस्तानात हंगामी सरकार स्थापन करण्यात यावे, अशी मागणी या काद्री महाशयांनी केली होती. या संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणी प्रसंगी लाहोर सत्र न्यायालयाने पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांचे बंधू व पंजाबचे मुख्यमंत्री शहाबाझ व अन्य 19 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याला लाहोर उच्च न्यायालयात पंजाब सरकारने आव्हान दिले आहे. दुस-या बाजूस आपले उद्योगसाम्राज्य विस्तारण्यासाठी नवाज शरीफ हे राष्ट्रीय संपत्तीचा गैरवापर करत आहेत, असा इम्रान खानने आरोप केला. 2013मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक गैरप्रकार करून नवाझ शरीफ यांनी विजय मिळवला असल्याचा आक्षेप इम्रान खान व मौलवी ताहिर-अल-काद्री हे वारंवार घेत असून शरीफ सरकारविरोधात दोघांनीही 14 ऑगस्ट रोजी लाहोरपासून इस्लामाबादच्या दिशेने दोन स्वतंत्र मोर्चे काढले. 17 ऑगस्ट रोजी हे मोर्चे इस्लामाबादमध्ये धडकले. जितका गाजावाजा झाला होता तितक्या प्रचंड संख्येने दोन्ही पक्षांचे समर्थक आपापल्या मोर्च्यांत सहभागी झाले नव्हते. इम्रान खान याच्या पीटीआय पक्षाचा मोर्चा लाहोरहून निघाल्यावर इस्लामाबादच्या दिशेने येत असताना पंजाब प्रांतातील गुजरनवाला या भागात नवाझ शरीफ यांच्या पीएमएल(एन) या पक्षाच्या सुमारे 400 पक्ष कार्यकर्त्यांनी या मोर्चावर दगडफेक केली, तसेच इम्रान खान याच्या गाडीच्या दिशेने गोळीबारही केला. या घटनेचाही इम्रान खान याने शरीफविरोधी वातावरण तापवण्यासाठी व्यवस्थित उपयोग करून घेतला होता. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) व पाकिस्तानी अवामी तहरीक (पीएटी) या दोन्ही पक्षांना पाकिस्तानी जनतेमध्ये फारसा पाठिंबा नाही. इम्रान खान आपला राजकीय दबदबा वाढविण्यासाठी गेली काही वर्षे प्रयत्नशील आहे, पण त्याला त्यात यश आलेले नाही. मौलवी ताहिर-अल-काद्री यांचीही तीच कथा आहे. नवाझ शरीफ यांना सत्तेवरून घालविणे वाटते तितके सोपे नाही. आपल्या राजकीय कारकीर्दीतील पूर्वीच्या टप्प्यात केलेल्या चुका पुन्हा न करण्याचे राजकीय शहाणपण शरीफ यांनी गेल्या एक वर्षात दाखविले आहे. पाकिस्तानी लष्कराशी वितंडवाद होईल इतकी परिस्थिती ताणू न देता ते सावधपणे आपला कारभार हाकत आहेत. भारत-पाकिस्तानचे संबंध फारसे सलोख्याचे नसल्याबद्दल नवाझ शरीफ यांनी अलीकडेच पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये बोलताना खंत व्यक्त केली होती. हे संबंध सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले होते. पाकिस्तानात सत्ता हाती असलेले पक्ष भारताशी सलोखा राखण्याची भाषा करतात व ज्यांना सत्ता मिळवायची असते ते भारतद्वेषाची भाषा करून पाकिस्तानी जनमानस भडकावतात, असा आजवरचा अनुभव आहे. नवाझ शरीफ हे विरोधात असताना त्यांनीही भारताविरोधात विखारी प्रचार केला होता. असे वर्तन करणा-यांत बेनझीर भुत्तो, आसिफ अली झरदारी यांचाही समावेश आहे. इम्रान व काद्री हेही आपल्या भाषणांना भारतविरोधाची फोडणी देण्यास चुकलेले नाहीत. नवाझ शरीफ सरकार हे भारताच्या कलाने वागते, असा आरोपही इम्रान खान याने अलीकडेच केला होता!
पाकिस्तानमध्ये समोरासमोर युद्ध करण्याची हिंमत नसल्यानेच त्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध आरंभले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केला. कारगिलच्या दौ-यादरम्यान त्यांनी केलेल्या भाषणातील हे वक्तव्य आहे. त्यानंतर काही दिवसांतच काश्मीरमधील फुटीरतावादी गटांच्या नेत्यांची पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी भेट घेतली होती. त्याचा निषेध म्हणून भारत-पाकिस्तान या देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये 25 ऑगस्टपासून सुरू होणारी चर्चा भारताने रद्द केली. त्यामुळे नवाझ शरीफ यांच्यापुढील समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. प्रसारमाध्यमे जितका बागुलबुवा करत आहेत तितकी नफरत नवाज शरीफ यांच्याविषयी आज तरी पाकिस्तानी जनतेत दिसत नाही, हे वास्तव आहे. इम्रान खान व मौलवी ताहिर-अल-काद्री यांचा उल्लेख पाकिस्तानच्या राजकीय अवकाशातील अशनी, असा केला जातो. त्यांनी पाकिस्तानच्या राजकीय भूमीवर जोरदार टक्कर देऊन आपले मोठे राजकीय नुकसान होऊ नये, यासाठी नवाझ शरीफ काही डावपेच लढवत आहेत. दुस-या बाजूस पाकिस्तानचे भारताशी संबंध आणखी ताणले जाऊ नयेत, म्हणून शरीफ यांना सतर्कही राहावे लागणार आहे. नवाझ शरीफ यांच्यापुढील ही आव्हाने खचितच सोपी नाहीत.

Saturday, August 16, 2014

डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांच्या आधारेच पुढची वाटचाल - डाॅ. हमीद दाभोलकर - शब्दांकन - समीर परांजपे. - दै. दिव्य मराठी- १७ अाॅगस्ट २०१४. रसिक पुरवणी.



पुरोगामी महाराष्ट्राने स्वत:चे तोंड काळे करावे, अशी क्रूर घटना 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात भरदिवसा घडली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली! या घटनेला येत्या बुधवारी एक वर्ष पूर्ण होईल. डॉ. दाभोलकर यांच्या नसण्याने या वर्षभराच्या कालावधीत आपण नेमके काय गमावले, याचा ताळेबंद मांडत आहेत त्यांचे सुपुत्र डॉ. हमीद दाभोलकर. या लेखाचे शब्दांकन मी केले अाहे. डॉ. दाभोलकरांचे व्यक्तित्व व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील स्वानुभव यांचा ऊहापोह करणारी अंनिस चळवळीचे एक प्रणेते प्रा. श्याम मानव यांची मुलाखत आणि दाभोलकरांच्या हत्येमुळे अंनिस चळवळीचे भवितव्य आता काय असेल, याबद्दल लिहिते झाले आहेत अविनाश पाटील. या सर्व लेखांच्या लिंक्स व डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विषयीच्या लेखांचे रसिक पुरवणीचे पहिले पान यांची जेपीजी फाईल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-articles-on-death-annieversary-of-dr-4715053-PHO.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/17082014/0/1/
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-about-anis-divya-marathi-rasik-4715108-NOR.html
---
विचारांच्या आधारेच पुढची वाटचाल

------
डॉ. हमीद दाभोलकर | Aug 17, 2014, 05:00AM IST
---------
डॉ. नरेंद्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली! या घटनेला येत्या बुधवारी एक वर्ष पूर्ण होईल. दाभोलकर यांची हत्या झाल्याच्या घटनेला येत्या बुधवारी, 20 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होईल. डॉ. दाभोलकर यांच्या नसण्याने आम्ही कुटुंबीय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), साधना अशा आमच्या सर्वच परिवाराने नेमके काय गमावले, याचा शोध घेत असताना काही गोष्टी समोर येतात. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व हे समाजकेंद्री होते. त्यांच्या कुटुंबातील माणसे असोत वा कार्यकर्ते; ही सारी माणसे डॉक्टरांशी समाजकेंद्री दृष्टिकोनातून जोडलेली होती. आपला फुरसतीचा वेळ कुटुंबीयांसाठी द्यावा, असे डॉ. दाभोलकरांचे प्रयत्न असायचे. पण गेली 25 वर्षे ते महाराष्ट्र अंनिस, साधना व अन्य चळवळींच्या कामात इतके गुंतलेले असायचे की, त्यांना हे फारसे शक्य होत नसे. गेल्या काही वर्षांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्र अंनिस व साधनामध्ये कामे पुढे नेऊ शकणारी सक्षम दुसरी फळी निर्माण केली होती. त्यामुळे आता त्यांना थोडे फुरसतीचे क्षण मिळतील, असे आम्हाला वाटत होते. वडील-मुलगा, वडील-मुलगी, पती-पत्नी अशा नात्यांमध्ये डॉ. दाभोलकर आता आमच्या वाट्याला अधिक येतील, असेही दिसू लागले होते. तसा बदल घडविण्यासाठी त्यांचेही जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू होते. पण त्यांच्या हत्येमुळे दाभोलकर कुटुंबीयांच्या वाट्याला अधिक वेळ देऊ इच्छिणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आता आम्ही कायमचे गमावले आहेत, ही खंत यापुढे कायमच राहील. डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून असंख्य माणसे प्रसंगी स्वत:च्या जिवाला धोका पत्करून आम्हा कुटुंबीय व चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी गेली पंचवीस वर्षे जे सुसंघटित काम उभे केले, त्याचीच ही फलश्रुती होती. या कार्यकर्त्यांच्या आधारामुळे डॉ. दाभोलकरांचे नसणे सहन करण्याचे बळ येते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर आम्हाला समाजातील प्रवृत्तींची तीव्र टोके अनुभवायला आली. सध्या समाजातील वातावरण कलुषित झालेले आहे. धर्माच्या नावावर जातीय शक्ती अधिकाधिक संघटित होताना दिसत आहेत, तर दुसर्‍या बाजूला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून असलेले सत्ताधारी शासक धर्मांध शक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास कचरत आहेत. राज्यघटनेतील तत्त्वांना अनुसरून विवेकवादाने वागण्याचा आग्रह धरणार्‍यांची गळचेपी कशी होईल, हे जास्तीत जास्त पाहिले जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी गेली 25 वर्षे महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून अथकपणे प्रयत्न केले. त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साधना परिवाराला मोठा धक्का बसणे हे साहजिकच होते. मात्र त्यामुळे आमची चळवळ खचली नाही.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंनिस या सगळ्यातून सावरली. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा झालाच पाहिजे, यासाठी आम्ही गेल्या वर्षभराच्या काळात अधिक जोमाने चळवळ चालविली. त्याच्या परिणामी या राज्यात आता तसा कायदा अस्तित्वात आला आहे. असाच कायदा राष्ट्रीय स्तरावर व्हायला हवा, अशासाठीही आम्ही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंनिससह ज्या चळवळी उभ्या केल्या, त्यामध्ये सर्व निर्णय हे लोकशाही पद्धतीने होत असत. सामूहिक नेतृत्वाची संकल्पना त्यांनी या चळवळींमध्ये राबविली होती. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या नंतरही या चळवळींचे कार्य व्यवस्थितपणे सुरू आहे. याचे कारण या चळवळींना त्यांच्या विचारांचा भक्कम पाया आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही काही स्वयंसेवी संस्था नाही. स्वयंसेवी संस्थांमध्ये अनेकदा एकखांबी तंबू असतो. मुख्य प्रवर्तक गेल्यानंतर या संस्थांमध्ये फूट पडते किंवा त्यांचा हळूहळू अस्त व्हायला सुरुवात होते.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतरच्या एक वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र अंनिस वा साधनाबाबत असे काहीही घडलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या चळवळींमध्ये जी सामूहिक नेतृत्वाची संकल्पना रुजविली, त्यामुळेच पुढच्या फळीचे कार्यकर्ते तयार झाले व त्यांच्याच बळावर महाराष्ट्र अंनिससह आमच्या इतर संस्था भविष्यातील वाटचाल करणार आहेत. महाराष्ट्रातील चळवळींच्या इतिहासातील ही वेगळी घटना असून त्याच्याकडे सामाजिक विश्लेषकांनी जितके लक्ष द्यावे तितके दिलेले दिसत नाही. सामाजिक चळवळी यशस्वी होण्याच्या दृष्टीने सभोवताली तसा व्यापक राजकीय अवकाश असणेही आवश्यक असते. पण सध्याची दुरवस्था ही आहे की, हा राजकीय अवकाश आक्रसत चालला आहे. चळवळींच्या दृष्टीने ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. 1970-80च्या कालखंडात सामाजिक चळवळींचे स्वरूप, त्याविषयीचे आकलन श्रेष्ठ दर्जाचे होते. चळवळींमध्ये झोकून काम करण्यासाठी मध्यमवर्गातून अनेक जण पुढे यायचे. आपली आयुष्यं त्यांनी या कार्याला वाहून घेतली होती. पण सध्या असे चित्र दिसत नाही. समाजातील मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग व अन्य घटकांची सामाजिक चळवळींविषयीची जाणीव कमी झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सामाजिक चळवळी चालविताना अनेक अडचणी उभ्या राहतात.
डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे, ‘सामाजिक कार्य करताना उभ्या राहिलेल्या अडचणींमुळे अस्वस्थ होऊ नका. या अडचणी ही आपले सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी मिळालेली सुसंधी आहे, असे समजून त्यांच्यावर मात करा व पुढे जात राहा.’ डॉ. दाभोलकर यांच्या या विचारांना अनुसरूनच आम्ही आमचे काम सुरू ठेवले आहे व भविष्यात ते अधिक विस्तारणार आहोत. महाराष्ट्र अंनिस ही महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यांत विस्तारलेली असून तिचे कार्यकर्ते समाजाच्या तळागाळातून आलेले आहेत. डॉ. दाभोलकरांच्या मार्गदर्शनाखाली काही जिल्ह्यांमध्ये अंनिसचे उत्तम नेतृत्व तयार झाले आहे. अंनिसचे काम हे केवळ बुवाबाबांची ढोंगे उघडकीस आणणे इतकेच नसून समाजाला विवेकवादाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणे, हा आमच्या कामाचा आत्मा आहे. त्याच तत्त्वाच्या आधारे गेली 25 वर्षे वाटचाल करीत आलेली अंनिसची चळवळ यापुढेही त्याच मार्गाने जाणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यामध्ये भरदिवसा हत्या झाली. जिथे हत्या झाली तेथपासून 50 फुटांच्या अंतरावर दोन पोलिस ठाणी आहेत. दाभोलकरांच्या हत्येनंतरच्या पहिल्या चोवीस-अठ्ठेचाळीस तासांत पोलिसांनी तपासात खूपच ढिलाई दाखविली. नाकाबंदी नीटप्रकारे करण्यात आली नाही. या गोष्टींचा परिणाम डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर नक्कीच झालेला आहे. ही दुर्दैवी घटना घडून एक वर्ष पूर्ण होत आले तरी अजून आरोपी सापडू शकलेले नाहीत. डॉ. दाभोलकरांची हत्या ही वैचारिक हत्या होती. एका सामाजिक कार्यकर्त्याचा विचार संपविण्यासाठी केले गेलेले हे कृत्य होते, हे लक्षात ठेवून महाराष्ट्रातील पोलिसांनी तपास करायला हवा होता; तसा तो झाला नाही. आता या हत्या प्रकरणाची सूत्रे सीबीआयकडे आहेत. मात्र सीबीआयदेखील विशेष लक्ष देऊन तपास करण्यापेक्षा अन्य गुन्ह्यांचा जसा तपास केला जातो त्याच पद्धतीने काम करताना दिसत आहे. त्याबद्दल समाजातून ज्या पद्धतीने तीव्र प्रतिक्रिया उमटायला पाहिजे, तशी ती आता दिसेनाशी झाली आहे.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर जो जनक्षोभ उसळला होता, त्याचे अस्तित्व काही महिने जाणवत राहिले होते. पण अनेक गोष्टी काही काळाने विस्मृतीत घालविण्याची आपल्या समाजाला सवय आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरणही समाज विसरत चालला आहे का, असे वाटण्यासारखी सध्या स्थिती आहे. डॉक्टरांची हत्या करणारे मारेकरी अजून कसे सापडत नाहीत, याबाबत समाजाने सत्ताधार्‍यांवर प्रचंड दबाव आणणे आवश्यक आहे, तरच ही यंत्रणा हलेल. परंतु समाजातून असे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. समाजात धर्मवादी शक्तींचा जोर वाढत आहे. त्यातून हिंसाचारही वाढत चालला आहे. आज हा हिंसाचार आमच्या दारापर्यंत आला. तो उद्या अन्य कोणाच्याही दारात उभा राहू शकतो, याचे भान समाजाने ठेवणे आवश्यक आहे. डॉ. दाभोलकरांनंतरच्या एक वर्षाच्या कालावधीतील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साधना, परिवर्तन यांच्या कार्याचा आढावा घेतला तर असे आढळेल की, जात पंचायतींच्या अन्याय्य वर्तणुकीविरोधात जे काम डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी काही वर्षांपूर्वी सुरू केले होते, त्या कामाला गेल्या वर्षभरात महाराष्ट्र अंनिसने अधिक गती दिली आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये गारपीट झाल्यानंतर तेथील बाधित लोकांना मदत करण्यासाठी आम्ही हाती घेतलेल्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ऑनर-किलिंगच्या विरोधात अहमदनगरमध्ये आम्ही जी परिषद घेतली, तिला प्रचंड समर्थन लाभले होते. त्याशिवाय दिवाळी, गणपतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसतर्फे जे उपक्रम गेल्या काही वर्षांपासून राबविले जात आहेत, ते आता निव्वळ संघटनेचे उरले नसून समाजाचे उपक्रम झाले आहेत. हे उपक्रम असेच यापुढेही सुरू राहणार आहेत. गेल्या वर्षभरात जे गमावले त्याचा ताळेबंद मांडतानाच जे हाती उरले आहे त्याचाही विचार सतत समोर असतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्याने आम्ही आमचा खंदा मार्गदर्शक जरूर गमावला आहे, पण त्यांच्या विचारांच्या आधारेच यापुढेही आमची अविचल वाटचाल सुरू राहील.
खंदा मार्गदर्शक गमावला
डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे, ‘सामाजिक कार्य करताना उभ्या राहिलेल्या अडचणींमुळे अस्वस्थ होऊ नका. या अडचणी ही आपले सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी मिळालेली सुसंधी आहे, असे समजून त्यांच्यावर मात करा व पुढे जात राहा.’ गेल्या वर्षभरात जे गमावले त्याचा ताळेबंद मांडतानाच जे हाती उरले आहे, त्याचाही विचार सतत समोर असतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्याने आम्ही आमचा खंदा मार्गदर्शक जरूर गमावला आहे; पण त्यांच्या विचारांच्या आधारेच यापुढेही आमची अविचल वाटचाल सुरू राहील.
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस आहेत.)
शब्दांकन - समीर परांजपे.

भाभांचे कलासमृद्ध अवकाश! - वृंदावन दंडवते - शब्दांकन - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी १७ अाॅगस्ट २०१४. रसिक पुरवणी


मी शब्दांकन केलेला वृंदावन दंडवते यांचा लेख अाज दै. दिव्य मराठीच्या १७ अाॅगस्ट २०१४च्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाच्या दोन लिंक्स व जेपीजी फाईल. वृंदावन दंडवते हे ज्येष्ठ साहित्यिक व एनसीपीए या संस्थेचे माजी असिस्टंट डायरेक्टर (प्रोग्रॅम) असून एनसीपीएचे प्रवर्तक जमशेद भाभा यांच्या २१ अाॅगस्ट रोजी असलेल्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांनी हा लेख लिहिला अाहे. वृंदावन दंडवते हे विख्यात चित्रकार, साहित्यिकही असून त्यांनी तीन पुस्तके प्रकाशित झाली अाहेत. माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांचे ते कनिष्ठ बंधू अाहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-of-vrindavan-jogdand-about-jamshed-bhabha-divya-marathi-rasik-4715072-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/17082014/0/2/
------

स्मरणगाथा : भाभांचे कलासमृद्ध अवकाश!
- ------------
वृंदावन दंडवते | Aug 17, 2014, 05:00AM IST
---
भारतातील विविध भाषांतील नाटके, भारतीय नृत्य, संगीत, चित्रकला यांचे कार्यक्रम एनसीपीएमध्ये करण्याबरोबरच पु. ल. देशपांडे यांनी आपल्या कारकीर्दीत मराठी मनाची नाळ एनसीपीएशी जुळावी म्हणूनही खास प्रयत्न केले...
जमशेद भाभा. भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचे हे धाकटे बंधू. पण जमशेद भाभा यांची याहून रेखीव व ठळक ओळख आहे ती म्हणजे, मुंबईतील नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) या राष्ट्रीय स्तरावरील ख्यातकीर्त संस्थेचे प्रवर्तक म्हणून. टाटा उद्योगसमूहाच्या विविध कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवत असतानाच समूहाच्या माध्यमातून समाजात कलात्मकतेचा, सामाजिक जबाबदारीचा दृष्टिकोनही जपला जावा, यासाठी जमशेद भाभा कमालीचे आग्रही होते. त्यांच्या या मताला जे. आर. डी. टाटा यांचा संपूर्ण पाठिंबा व सहकार्य होते. त्यातूनच एनसीपीए या संस्थेची कल्पना सत्यात उतरली.
जमशेद भाभा हे स्वत: उत्तम चित्रकार होते. भारतीय तसेच पाश्चात्त्य कलांचे भोक्ते होते. भारताच्या प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक नृत्य, नाटक, संगीत आदी कलांचे योग्य प्रकारे जतन, संवर्धन, सादरीकरण लोकांसमोर झाले पाहिजे, या विचाराने त्यांना झपाटलेले होते. 1969चा तो काळ होता. ऑल इंडिया रेडिओचे तत्कालीन डायरेक्टर जनरल डॉ. नारायण मेनन यांना भाभांनी आग्रहाने बोलावून एनसीपीएच्या संचालकपदी नियुक्त केले होते. त्याशिवाय एनसीपीएच्या सल्लागार मंडळावर पु. ल. देशपांडे, विजया मेहता, डॉ. कुमुद मेहता, सत्यजित रे, रविशंकर यांच्यासारख्या कलाक्षेत्रातील एकाहून एक दिग्गजांना आमंत्रित केले होते. मुंबईतील वॉर्डन रोड येथील भुलाभाई देसाई मेमोरियलची वास्तू पाडून तिथे ‘कांचनजुंगा’ इमारत उभी राहिली होती. त्याच इमारतीत ‘एनसीपीए’ ही संस्था बाळसे धरू लागली. कांचनजुंगाच्या दुसर्‍या मजल्यावर सुमारे सव्वाशे माणसांची आसनव्यवस्था असलेले मिनीऑडिटोरियम होते. तेथे गायन, नृत्य, नाटके असे कार्यक्रम होऊ लागले. कांचनजुंगा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जागेत ‘रंगायन’ या संस्थेच्या नाटकांची तालीम होत असे. ‘रंगायन’मध्ये मी सक्रिय असल्याने ओघाने अगदी सुरुवातीपासून ‘एनसीपीए’च्या वाटचालीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. फिल्म अर्काइव्हजच्या सहकार्याने ‘एनसीपीए’ संस्थेने फिल्म सोसायटी सुरू केली होती. परंतु गायन, नृत्य, नाटके या परफॉर्मिंग आटर््सचे माहेरघर बनलेल्या एनसीपीएला आता स्वत:च्या भव्य वास्तूचे वेध लागलेले होते.
1972मधली ही गोष्ट आहे. सरकारने मुंबईतील नरिमन पॉइंट येथे एनसीपीएला सात एकरांचा भूखंड द्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर एनसीपीएने समुद्रात स्वखर्चाने भराव टाकून त्यातून निर्माण झालेला सरकारमान्य भूखंड संपादित केला. या भूखंडावर एनसीपीएने सर्वात प्रथम एक मिनीथिएटर बांधले. ‘कांचनजुंगा’ येथे जे कलाविषयक कार्यक्रम होत असत, ते आता एनसीपीएच्या मालकीच्या स्वत:च्या जागेत होऊ लागले. या मिनीथिएटरनंतर एनसीपीएच्या प्रांगणात टाटा थिएटर उभारणीस सुरुवात झाली. अमेरिकेतील जगद्विख्यात वास्तुविशारद फिलिप जॉन्सन यांनी टाटा थिएटरचा आराखडा बनविला होता. या थिएटरचे अ‍ॅकॉस्टिक डिझाइन सिरिल हॅरिस या अमेरिकी तज्ज्ञाने केले होते. टाटा थिएटरची रचना खूपच वेधक होती. अर्धवर्तुळाकार असलेल्या या सभागृहामध्ये पडदा नव्हता. तसेच प्रेक्षकांसाठी कमळाकृती आसनव्यवस्था होती. टाटा थिएटरच्या उद्घाटन समारंभाला मोगुबाई कुर्डीकरांचे गाणे रंगले होते.
1980 मध्ये मी एनसीपीएमध्ये कार्यक्रम अधिकारी (प्रोग्रॅम ऑफिसर) म्हणून रुजू झालो. या संस्थेतर्फे ‘एनसीपीए जर्नल’ हे कलाविश्वातील घडामोडींना वाहिलेले नियतकालिक प्रसिद्ध केले जात असे. डॉ. कुमुद मेहता या नियतकालिकाच्या संपादक होत्या. मी स्वत: गाणे शिकत होतो, चित्रकार होतो, नाटकांमध्ये सक्रिय होतो. हे माहीत असल्याने कुमुद मेहता यांनी मला एनसीपीएमध्ये कार्यक्रम अधिकारी होण्याबद्दल सुचविले होते. या पदासाठी माझी मुलाखत साक्षात जमशेद भाभा यांनीच घेतली होती. एनसीपीएतील 1980 ते 1996 पर्यंतच्या माझ्या सेवाकाळात पु. ल. देशपांडे, डॉ. विजया मेहता यांनी संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून केलेले कार्य मला खूप जवळून पाहता आले. कालांतराने मी एनसीपीएतून असिस्टंट डायरेक्टर (प्रोग्रॅम) या पदावरून सेवानिवृत्त झालो. एनसीपीएमध्ये होणार्‍या कार्यक्रमांचा समाजातल्या सर्व स्तरांतील कलासक्त लोकांना आस्वाद घेता आला पाहिजे, यावर जमशेद भाभा यांचा प्रारंभापासून कटाक्ष होता. संचालक डॉ. नारायण मेननही त्याच मताचे होते. भारतातील विविध भाषांतील नाटके, भारतीय नृत्य, संगीत, चित्रकला यांचे कार्यक्रम एनसीपीएमध्ये करण्याबरोबरच पु. ल. देशपांडे यांनी आपल्या कारकीर्दीत मराठी मनाची नाळ एनसीपीएशी जुळावी म्हणूनही खास प्रयत्न केले. लावणीपासून ते मराठी काव्यवाचन, देवगाणी कार्यक्रम, नाट्यसंगीत, मराठी नाटकांचे प्रयोग आवर्जून संस्थेत सादर होऊ लागले. पुढे डॉ. विजया मेहता या कार्यकारी संचालक असताना ही परंपरा तितक्याच समर्थपणे सुरू राहिली. संगीताच्या कार्यक्रमांना डॉ. अशोक रानडे यांच्या अमूल्य संशोधनाचा स्पर्श झालेला होता. त्या काळी आम्ही दर महिन्यात होणार्‍या विविध कार्यक्रमांची पत्रिका तयार करीत असू. ही पत्रिका जमशेद भाभा नेहमी डोळ्याखालून घालत. त्यातील कार्यक्रमांविषयी संबंधित पदाधिकार्‍यांशी चर्चा करीत. कार्यक्रमात त्यांना काही बदल हवे असतील, तर तशा सूचनाही करीत. पाश्चात्त्य व पौर्वात्य कलाप्रकारांचा आस्वाद एनसीपीएच्या माध्यमातून कलारसिकांना घेता यावा, म्हणून जमशेद भाभा यांनी ‘ईस्ट-वेस्ट एन्काउंटर’ ही संकल्पना मॅक्समुल्लर भवनच्या सहकार्याने सलग चार वर्षे राबविली. जमशेद भाभा यांना पाश्चिमात्य संगीतातही रुची होती. त्यामुळे इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या संस्थेच्या माध्यमातून देशोदेशीचे उत्तम गायक, वादक हे आपली कला सादर करण्यासाठी एनसीपीएमध्ये आवर्जून येत असत. जमशेद भाभा सुमारे पाच वर्षे संगीत नाटक कला अकादमीचे अध्यक्षही होते. कलाविषयक कार्यक्रमांच्या सादरीकरणाबरोबरच जतनाकडेही जमशेद भाभा यांचे विशेष लक्ष होते. त्याचसाठी त्यांनी परफॉर्मिंग आर्ट्सचे खास ग्रंथालय एनसीपीएमध्ये स्थापन केले. या ग्रंथालयात अनेक गायक, वादकांची ध्वनिमुद्रणे तसेच व्हिडिओ चित्रफिती संग्रह करून ठेवलेल्या आहेत. देश-विदेशातील कलांचा संगम भारतात व्हावा, असे स्वप्न घेऊन जगणारे जमशेद भाभा 30 मे 2007 रोजी कालवश झाले. एक समृद्ध सांस्कृतिक वारसा मागे ठेवून एका कलाध्यायाची समाप्ती झाली...
शब्दांकन : समीर परांजपे
ashavrinda@gmail.com

Monday, August 11, 2014

सिरियाची असह्य होरपळ - दै. दिव्य मराठीच्या १० अाॅगस्ट २०१४च्या अंकामधील माझा लेख




दै. दिव्य मराठीच्या १० अाॅगस्ट २०१४च्या अंकात सिरिया या देशासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखाची लिंक.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-sameer-paranjape-article-about-syria-4709022-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/10082014/0/4/
---------
सिरियाची असह्य होरपळ
------
- समीर परांजपे.
paranjapesamir@gmail.com
-----------
इराक आणि सिरिया हे दोन्ही देश ज्वालामुखीच्या तोंडावर आहेत. या स्थितीस कारणीभूत आहे एकच दहशतवादी संघटना- ती म्हणजे आयएसआयएस. तिचे पूर्ण रूप आहे ‘इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया.’ आयएसआयएसच्या नावातच तिचे उघड उद्दिष्ट आहे. इराकवर चर्चा खूप होते, पण सिरियामधील घडामोडी तितक्याच गंभीर आहेत. सिरियातील सुमारे दहा लाख लोकसंख्या असलेल्या रक्वा प्रांतावर आयएसआयएसने आपली पकड मजबूत केली आहे. हा प्रांत आता इस्लामी राज्य झाल्याचे ही संघटना सांगू लागली आहे. सिरियामधील बुद्धिजीवी वर्गात कट्टरपंथीयांच्या या शिरजोरीमुळे खळबळ माजणे स्वाभाविकच होते. सिरियाला अनेक आर्थिक प्रश्न भेडसावत आहेत. तेथील सामान्य माणसांचे पोटापाण्यापासून पायाभूत सुविधांपर्यंतचे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे तेथील जनमानस त्रस्त आहे. कावलेल्या मनाला कब्जात घेण्यासाठी आगखाऊ व जातीयवादी धार्मिक विचारांसारखे घातक हत्यार दुसरे नाही. नेमका त्याच हत्याराचा वापर आयएसआयएसने करून सिरियाला विळखा घातला आहे.
हे होण्याआधी रक्वा शहरातील वातावरण खूप मोकळे होते. तेथील अल अमसी चौकामध्ये पूर्वी तरुण जोडपी संध्याकाळी प्रेमगुंजन करताना दिसत. मात्र आता या चौकामध्ये दिसतात आयएसआयएसचे काळे झेंडे... हेच आयएसआयएसचे लोक चोरीचा केवळ आळ असलेल्यांचे जाहीरपणे हात छाटताहेत. महिलांना बुरखा घालण्याची सक्ती केली जातेय. धार्मिक बंधनांच्या नावाखाली स्वातंत्र्यावरच गदा आणली जात असल्याने सिरियातील नागरिकांचे आतल्या आत घुसमटणे होते. पण मन शेवटी कट्टरपंथी विचारांकडेच ओढ घेते. सिरियातून अनेक जण नोकरीधंद्यासाठी विदेशांत स्थलांतर करतात. त्यातून एक नवीन समस्या उद्भवली आहे. हे नागरिक जेव्हा काही काळासाठी मायदेशात परत येतात, त्या वेळी त्यांच्याशी दहशतवादी संपर्क साधतात. त्यातील जे गळाला लागतील त्यांना घातपाती कारवायांचे प्रशिक्षण दिले जाते. असे सिरियाचे नागरिक मग विदेशात गेल्यानंतर तेथे हिंसक कृत्ये घडवतात. अमेरिकेत राहणार्‍या सिरियाच्या नागरिकांकडे तेथील तपासयंत्रणा कायम संशयाने पाहत असतात.
जगात जिथे जिथे दहशतवाद फैलावला आहे, त्यामागे अमेरिकेचा छुपा हात असतो, ही आता उघड गोष्ट आहे. सिरियातील आयएसआयएसच्या कारवायांमागे अमेरिकेचे काही हितसंबंध दडले आहेत का, याचा प्रसारमाध्यमे कायम शोध घेत असतात. सिरियामध्ये गेल्या मे महिन्यात मोनेर मोहंमद अबुसल्हा या 22 वर्षांच्या युवकाने स्फोटकांनी भरलेला ट्रक एका रेस्टॉरंटवर धडकवून भीषण आत्मघाती हल्ला केला. हा मोनेर राहायचा अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये. तेथे उत्तम बास्केटबॉलपटू म्हणून त्याने नाव कमावले होते. असे अचानक काय झाले, की मोनेर दहशतवादी बनला? अमेरिकेतून मोनेर काही महिन्यांसाठी सिरियात परतला होता. त्या वेळी त्याच्याशी नुसरा फ्रंटच्या दहशतवाद्यांनी संधान बांधून त्याला घातपाताचे प्रशिक्षण दिले. बहुतेक अमेरिकेत दहशतवादी कारवाया करणे त्याला शक्य झाले नाही, मग तो पुन्हा सिरियात परतला व तेथे त्याने आपले प्रताप दाखविले. मोनेर मोहंमद अबुसल्हा याच्यावर एफबीआयची करडी नजर होती, असे म्हणतात. पण त्याला जेरबंद करण्यात आले नाही. असे करण्यात अमेरिकेचे काही छुपे हेतू होते का, अशी चर्चा आता दबक्या आवाजात होत आहे.
सिरियात 2000 सालापासून बसर हफीझ अल असाद हे राष्ट्राध्यक्षपदी आहेत. त्यांची राजवट अमेरिका व युरोपीय देशांस फारशी पसंत नाही. असाद यांच्या सरकारच्या विरोधात आयएसआयएसने जो रक्तरंजित संघर्ष चालवला आहे, त्याबद्दल या संघटनेवर आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाई करण्याचे अमेरिकेने कधीच फारसे मनावर घेतलेले नव्हते. असाद यांच्या राजवटीत पोलिस खात्यात छायाचित्रकार म्हणून काम करणार्‍या एका गृहस्थाने काही दिवसांपूर्वी आपण काढलेल्या अनेक छायाचित्रांना उजेड दाखविला. अपघात, इमारतींना लागलेली आग, कधी कधी मरण पावलेले कैदी असे त्याच्या छायाचित्रांचे विषय असायचे. मात्र काही वर्षांपूर्वी तुरुंगात मरण पावणार्‍या कैद्यांची संख्या अचानक वाढू लागली. या मृत कैद्यांत लहान मुले, महिला, वयस्क नागरिकांचा समावेश होता. या कैद्यांना अचानक मृत्यूला का सामोरे जावे लागले असेल, त्यामागील कारणांचा हा छायाचित्रकार शोध घेऊ लागला. त्या वेळी असे आढळले की, असाद यांच्या राजवटीत तुरुंगात डांबलेल्या विरोधकांचा पद्धतशीररीत्या काटा काढला जात होता. त्यातूनच तेथील तुरुंगात मरण पावणार्‍यांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती.
असाद सरकार व आयएसआयएस यांच्या संघर्षात सर्वात अधिक परवड होतेय ती तेथील महिला व लहान मुलांची. ही व्यथा लिस डॉसेट यांनी सिरियावर बनविलेल्या एका लघुपटात अचूकपणे टिपली गेली आहे. सिरियात बालकांच्या हास्यापेक्षा गोळीबार, स्फोटांचे आवाजच वातावरणात भरून राहिलेत. सिरियातील मुलांचे बालपण या हिंसक वातावरणात करपले गेलेय. त्या देशातील किफाह हा तेरा वर्षे वयाचा मुलगा. तो या लघुपटात एकच गोष्ट सतत सांगताना दिसतो... ‘आम्हाला खायला पोटभर अन्न मिळत नाही...’ एका लहान मुलीला आपल्या अभ्यासातील गोष्टींपेक्षा सिरियामध्ये दहशतवाद्यांच्या हातात असलेल्या शस्त्रांची नावे तोंडपाठ आहेत, हे पाहून आपल्याला धक्का बसतो. असाद सरकारच्या राजवटीत सिरियातील मुलांवर जे अत्याचार सुरू आहेत, त्याबद्दल तेथील नागरिकांच्या मनात खंत जरूर आहे. ते असाद सरकारविरुद्ध दबक्या आवाजात तक्रारीचा सूर लावतात, पण आयएसआयएस या संघटनेच्या घातपाती कारवायांविरोधात काहीही बोलत नाहीत. ही विसंगती उबग आणणारी आहे. सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये असाद यांचे सैनिक व दहशतवादी यांच्यात चकमकी घडत असतात. थोड्याफार फरकाने सार्‍या देशभरातच हे चित्र आहे. असाद यांना अध्यक्षपदावरून हटवून सत्तेचे सुकाणू आपल्या हाती घेण्याची आयएसआयएसची धडपड आहे. कुणीही कुणावर ताबा मिळवला तरीही त्यांचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत सिरिया जळतच राहणार आहे.


Wednesday, August 6, 2014

स्मिता तळवलकर यांच्या स्मृतिंना आदरांजली, त्यांच्या विषयीच्या तीन वैयक्तिक अाठवणी...




स्मिता तळवलकर यांच्या स्मृतिंना आदरांजली, त्यांच्या विषयीच्या तीन वैयक्तिक अाठवणी...
---------------
प्रख्यात अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या स्मिता तळवलकर यांचे ५ अाॅगस्ट रोजी पहाटे मुंबईत निधन झाले. त्यांच्या स्मृतिंना आदरांजली. स्मिता तळवलकर यांच्या विषयीच्या तीन वैयक्तिक आठवणी मनात रुंजी घालत अाहेत.
(१) स्मिता तळवलकर या पुण्याच्या हुजुरपागा शाळेच्या माजी विद्यार्थीनी. या शाळेच्या माजी उपमुख्याध्यापिका सुशीलाताई बापट या माझ्या नातेवाईक. त्या १९४०च्या दशकातल्या राष्ट्रीय कबड्डीपटू देखील होत्या. सुशीलाताई यांना अाम्ही एबी मावशी या घरगुती नावाने हाक मारायचो. त्यांना भेटण्यासाठी पुण्यात बापट वाडीतील त्यांच्या घरी मी नेहमी जात असे. ही घटना फार जुनी नाही. २००७ सालातील असेल. असेच एकदा सुशीलाताईंकडे सकाळी गेलो असताना त्या म्हणाल्या, अाता माझी एक माजी विद्यार्थीनी येणार अाहे. थोड्या वेळाने पाहातो तर साक्षात स्मिता तळवलकर अापल्या शिक्षिकेस भेटण्यासाठी अावर्जून अाल्या होत्या. त्या दोघींच्या गप्पा रंगू लागल्या. मी फक्त श्रोत्याचे काम करीत होतो. थोड्या वेळाने सुशीलाताईंनी स्मिता तळवलकर यांच्याशी माझी ओळख करुन दिली. मी स्मिताताईंना पहिल्यांदाच भेटत होतो. त्यावेळी स्मिताताईंनी माझी विचारपूस केली. मी पत्रकार अाहे असे म्हटल्यावर त्या म्हणाल्या तुझे अावडते लेखक कोण? त्यावर मी उत्तरलो, की गो. नी. दांडेकर व त्यांच्या नंतरच्या पिढीतले भालचंद्र नेमाडे. स्मिता तळवलकरांचेही हे दोन्ही लेखक अावडते. तळवलकर यांनी गो. नी. दांडेकर यांच्या विषयी बर्याच अाठवणी मला सांगितल्या. त्यांच्या पुस्तकांची वैशिष्ट्येही त्या मला सांगत होत्या. गो. नी. दांडेकर हे प्रभावी किर्तनकारही कसे होते याविषयी स्मिताताईंनी त्यांच्या अाईकडून ऐकलेल्या आठवणीही त्यांनी समरसून सांगितल्या. आम्ही साधारण एक तास बोलत होतो. त्यानंतर त्या जायला निघाल्या. चतुरस्त्र स्मिताताईंचे त्यावेळी जवळून दर्शन झाले. सुशीला बापट या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या खास मैत्रिण. लतादिदिंच्या आठवणीही या गप्पांमध्ये सुशीलाताई व स्मिताताईंनी मला सांगितल्या. अामच्या नातेसंबंधातले श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे पाहिलेले चित्रपट व त्यांच्याशी झालेली भेट याचीही आठवण स्मिताताईंनी या गप्पांतच आवर्जून सांगितली होती. दिग्गजांच्या सांस्कृतिक जीवनाचा एक नवा पैलू त्यानिमित्ताने मला कळला होता त्यावेळी. स्मिता तळवलकर गेल्या हे वृत्त जेव्हा कानी अाले त्यावेळी मी अाज सकाळी प्रख्यात साहित्यिका तसेच गो.नी. दांडेकर यांच्या सुपूत्री तसेच मृणाल देव-कुलकर्णी हिच्या मातोश्री वीणा देव यांच्याशी दूरध्वनीवर बोललो व त्यांना बापट वाडीतील वर उल्लेखलेल्या गप्पांची अाठवण सांगितली. त्या ही या सर्वांना ओळखत असल्याने त्यांनाही एकदम भरुन अाले. स्मिताताई तुम्ही दिलेल्या सुंदर अाठवणी मी कायम जपून ठेवेन.
(२) स्मिता ताईंशी दुसरी भेट झाली ती रुईया महाविद्यालयाने सादर केलेल्या रुईया नाका या कार्यक्रमाच्या निमित्ताने. स्मिता तळवलकर या रुईया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी. रुईया नाका हा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या दिग्गज कलाकारांनी सादर केला. त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी स्मिता तळवलकर महाविद्यालयात अालेल्या असताना अामची भेट रुईया नाक्यावरच झाली. तिथे डीपी हाॅटेलच्या बाहेर असलेल्या झाडाखाली बसून अाम्ही २० मिनिटे पुन्हा गप्पा मारल्या होत्या. त्या गप्पांमध्ये त्यांचे रुईयातील दिवस, पुण्याच्या सुशीला बापट या त्यांच्या शिक्षिका अशा अाठवण निघाल्या. त्यावेळी स्मिता तळवलकर यांच्या चर्येवर अाजारपणाने अालेला थकवा काहीसा जाणवत होता. ते बघून मन चिंताग्रस्त झाले होते. अाणि अाज अखेर ती वाईट बातमी अालीच....
(३) स्मिता तळवलकर दादरला मातोश्री हाईटस या इमारतीत राहात होत्या. दादर पश्चिमेला असलेल्या डी. एल, वैद्य मार्गावर ही इमारत अाहे. याच परिसरात मी लहानाचा मोठा झाल्याने व अामच्याच इमारतीत सतीश पुळेकर हे दिग्गज अभिनेते राहात असल्याने त्यांच्याकडे येणारे कलाकार पाहाण्याची सवय तेव्हापासून होती. स्मिताताई अामच्या इमारतीत एक-दोनदा सतीश पुळेकरांकडे अाल्याचे मला चांगले स्मरते. त्या दादरकर असल्यानेही त्यांच्याविषयी वेगळा जिव्हाळा होताच. स्मिताताई तुमची आठवण सतत ताजी राहिल मनात...