Wednesday, March 12, 2014

मराठी साहित्यविषयक नियतकालिकांची परंपरा (दैनिक दिव्य मराठी - २१ नोव्हेंबर २०१२)

मराठी साहित्यविषयक नियतकालिकांचा खप मोठ्या प्रमाणावर अाहे, असे मात्र अजिबात आढळून येत नाही. पुरेसा वाचकाश्रय नसल्याने ही नियतकालिके तगून ठेवण्यासाठी संपादक-प्रकाशकाला खूप सायास पडतात. हे चित्र बदलायला हवे. त्यासाठी मराठी वाचक अधिक सजग व्हायला हवा. तो कसा याचे विश्लेषण करणारा लेख मी २१ नोव्हेंबर २०१२ रोजी दैनिक दिव्य मराठीच्या अंकात लिहिला होता. त्या लेखाचा जेपीजी फोटो वर दिला अाहे.
-------------------------------
मराठी साहित्यविषयक नियतकालिकांची परंपरा
-------------------
- समीर परांजपे
--------------------
महाराष्ट्रात १८४०मध्ये दिग्दर्शन हे मराठीतले पहिले नियतकालिक सुरु झाले. त्यानंतर अाजपावेतो मराठीमध्ये अनेक नियतकालिके व अनियतकालिके प्रसिद्ध झाली. त्यातली काही काळाच्या प्रवाहात बंद पडली, तर काही तगून राहिली. त्यांनी अापापल्या परीने मराठी विश्व समृद्ध करण्यात निश्चित अशी एक भूमिका बजावली अाहे. मराठीमध्ये साहित्यविषयक जी नियतकालिके, अनियतकालिके प्रसिद्ध होत असत किंवा होत अाहेत, त्यांच्या स्वरुपाकडे व योगदानाकडे चिकित्सक नजरेने बघणे आवश्यक अाहे. साहित्यविषयक मराठी नियतकालिकांचा प्रवास कसा झाल, याचे चित्र मराठी विश्वकोशामध्ये दिलेल्या माहितीतून नीटसपणे कळते. मराठी विश्वकोशात म्हटले अाहे `महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापन झाल्या्नंतर काही काळाने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत प्रातिनिधीक साहित्यसंस्था उदयाला अाल्या. त्यांनी अापापल्या भागातील लेखक-संशोधकांना पुढे अाणून मराठीची विविध दालने समृद्ध करण्याचे कार्य चालू ठेवले. महाराष्ट्र साहित्य पत्रिका ( १९२८, म.सा.प. पुणे), युगवाणी (१९४६, विदर्भ साहित्य संघ, नागपूर), मराठी संशोधन-पत्रिका (१९५२, मराठी संशोधन मंडळ-मुंबई), प्रतिष्ठान (१९५३, मराठवडा साहित्य परिषद, अौरंगाबाद) या मुखपत्रांचा त्या दृष्टीने मुद्दाम निर्देश करणे अगत्याचे अाहे. साहित्यविषयक लेखनाला विशेष प्रोत्साहन देणार्या मराठी नियतकालिकांची संख्या अन्य कोणत्याही प्रकारच्या नियतकालिकांहून अधिक अाहे, हे मराठी नियतकालिकांचे एक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. महानुभाव, प्रास, ज्ञानेश्वर, नामदेव, सज्जनगड मासिक पत्रिका, माऊली इ. नियतकालिकांतून प्राधान्याने प्राचीन संत कवींच्या जीवनकार्यासंबंधी विचारमंथन होत असे, तर अभिरुची, प्रतिभा, रत्नाकर, ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा, अालोचन, वैखरी इ. मासिकांना साहित्यसृष्टीत मोठा दर्जा प्राप्त झाला. वैखरी, ऋचा इ. साहित्यविषयक नियतकालिकांनी अापला वाचकवर्ग निर्माण केला. साहित्य व कला यांपुरताच अाणखी विचार केला तर रंगभूमी (१९०७-१६), प्रतिभा (१९३३-३७), रत्नाकर (१९२५-३३), अभिरुची (१९४३-५१), छंद (१९५४-६०), ज्योत्स्ना (१९३६-४१), पारिजात व साहित्य यांचे अायुर्मान अल्पकालीन असले तरी त्यांनी त्या अवधीत मराठी भाषेला भूषणभूत ठरेल, अशी सामग्री अभ्यासकांच्या हाती दिलेली होती, तसेच नवभारत, समाजप्रबोधन पत्रिका, यांनी अनेक क्षेत्रातील घटनांचा अाणि विचारांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याचे कार्य केलेले अाहे, तर लोकशिक्षण अाणि सह्याद्री या नियतकालिकांचे कार्यही उल्लेखनीय अाहे.
मराठी साहित्यविषयक नियतकालिकांमध्ये सत्यकथेचा मोठा दबदबा होता. मौज प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध होणार्या `सत्यकथा'मध्ये १९५० नंतरचे सर्व महत्त्वाचे लेखक, कवी, समीक्षक लिहित असत. सत्यकथेमध्ये अापले साहित्य प्रसिद्ध होणे हा साहित्यिकांसाठी परमोच्च अानंदाचा भाग असायचा. या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या साहित्याला मराठी साहित्यविश्वामध्ये अापोअाप राजमान्यता मिळत असे. पण सत्यकथेमध्ये लिहिणारे बहुतांश साहित्यिक हे उच्चवर्णीय व उच्चवर्गातील होते. ते ज्या अनुभवांचे अापल्या साहित्यामध्ये चित्रण करत असत त्याचा परीघ मध्यमवर्गाय जीवनशैलीशी जोडलेला असायचा. त्यामुळे सत्यकथेत प्रसिद्ध होणार्या साहित्याने स्वत:लाच एक कुंपण घालून घेतले होते व त्यामुळेच त्यात साचलेपण अाले होते. समाजातील बहुजन, दलित समाजाच्या व्यथा मांडणारे साहित्य सत्यकथेमध्ये अभावानेच येत असे. सत्यकथेच्या या साहित्यिक बडेजावाविरोधात असंतोष उफाळून येऊन १९६०च्या दशकात भालचंद्र नेमाडे, राजा ढाले, अशोक शहाणे, वसंत अाबाजी डहाके, नामदेव ढसाळ यांनी अनियतकालिकांची चळवळ सुरु केली. बहुजन समाजातील साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशझोतात येण्यास या अनियकालिकांनाचा सिंहाचा वाटा अाहे. अाता, येरु, विद्रोह अशा काही महत्त्वाच्या अनियकालिकांची नावे या संदर्भात घेता येतील. पण काळाच्या ओघात ही अनियतकालिके अनेक कारणांनी बंद पडत गेली. मात्र दुसर्या बाजूस अस्मितादर्श, निकाय, अस्तित्व यांसारख्या नियतकालिकांतून दलितवर्गाच्या वेदनांना व बंडखोरीला शब्दरुप देण्याचा प्रयत्न दिसून अाला. दलित साहित्याच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा अाहे. मॅजेस्टिक प्रकाशनाच्या वतीने `ललित' हे मासिक गेली अनेक वर्षे प्रसिद्ध करण्यात येते. त्यात येणार्या साहित्यालाही स्वत:चे असे मोल अाहेच. या मासिकातील काही स्तंभांचे संकलन करुन त्याची पुस्तकेही प्रकाशित करण्यात अाली अाहेत. `ललित'मध्ये जयवंत दळवी `ठणठणपाळ' या टोपणनावाने लिहित असलेल्या सदराचे पुढे पुस्तकही निघाले.
मराठी नियतकालिकांमध्ये सामाजिक, साहित्यिक अशा दोन्ही अंगांनी लिखाणावर भर देणारी नियतकालिकेही प्रतिष्ठा मिळवू लागली होती. त्यामध्ये समाजप्रबोधन पत्रिका, शब्दवेध, परिवर्तनाचा वाटसरु, नवभारत, महाअनुभव, केल्याने भाषांतर, अापला परममित्र, सर्वधारा, अामची श्रीवाणी, साधना यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.
१९९० नंतर मराठीत प्रसिद्ध झालेल्या नियतकालिकांमध्ये शब्दवेध ( संपादक - दा. गो. काळे), अभिधा (हेमंत दिवटे), अभिधानंतर (हेमंत दिवटे), खेळ (मंगेश नारायण काळे), एेवजी (रमेश इंगळे उत्रादकर), नवाक्षर दर्शन (प्रवीण बांदेकर), अतिरिक्त (दा. गो. काळे) यांचा समावेश करता येईल. मनोविकास प्रकाशनचे इत्यादी, शब्द प्रकाशनचे मुक्त शब्द, अक्षरमानव, अक्षरगाथा, पाॅप्युलर प्रकाशनचे प्रिय रसिक अशी साहित्यविषयक मराठी नियतकालिकेही प्रसिद्ध होत असतात. त्यातूनही समकालीन मराठी साहित्याचे दर्शन घडत असते. मराठी साहित्यविषयक नियतकालिकांचा खप मोठ्या प्रमाणावर अाहे, असे मात्र अजिबात आढळून येत नाही. पुरेसा वाचकाश्रय नसल्याने ही नियतकालिके तगून ठेवण्यासाठी संपादक-प्रकाशकाला खूप सायास पडतात. हे चित्र बदलायला हवे. त्यासाठी मराठी वाचक अधिक सजग व्हायला हवा.
--------------------

No comments:

Post a Comment