Thursday, November 30, 2017

वर्तमानातील घटनांशी नाळ जोडणारे जुन्या मराठी नियतकालिकांतील लेख वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरु केली `पुनश्च' वेबसाइट व अॅप - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी २८ नोव्हेंबर २०१७

दै. दिव्य मराठीच्या 28 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेजलिंक व मजकूर, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/28112017/0/5/
---
वर्तमानातील घटनांशी नाळ जोडणारे जुन्या मराठी नियतकालिकांतील लेख
वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरु केली `पुनश्च' वेबसाइट व अॅप
मराठी साहित्यविश्वात होतोय प्रथमच असा अभिनव प्रयोग
- समीर परांजपे
मुंबई, दि. 28 नोव्हेंबर - मराठी साहित्यविश्वामध्ये अनेक नियतकालिके, वर्तमानपत्रे प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये तत्कालीन विषयांवर जे प्रसंगोपात लेख प्रसिद्ध झालेले असतात ते कालांतराने नजरेआड होतात. जुन्या काळातील असे उत्तमोत्तम लेख जर विद्यमान परिस्थिती किंवा घटनांनाही लागू पडत असतील तर ते लेख शोधून मराठी वाचकांसमोर आणावेत या विचाराने ठाण्याच्या किरण भिडे यांनी `पुनश्च' या नावाने अॅप वwww.punashcha.com ही वेबसाइट नुकतीच सुरु केली आहे. अशा प्रकारची संकल्पना व या संकल्पनेवरील वेबसाईट व अॅपचा प्रयोग मराठी साहित्यविश्वात प्रथमच होत आहे.
यासंदर्भात `पुनश्च'चे संचालक किरण भिडे यांनी `दिव्य मराठी'ला सांगितले की, जुने पण कालसुसंगत साहित्य जे लेखक आणि संपादक यांनी खूप मेहनतीने तयार केलेले असते ते आज कुठेतरी धुळीत, रद्दीत, ग्रंथालयांच्या कपाटात पडून आहे ते वाचून त्यातले निवडक लेख युनिकोडमध्ये टाईप करून ऑनलाईन आणणे. असे उत्तमोत्तम साहित्य जास्तीतजास्त चोखंदळ वाचकांपर्यंत वेबसाईट आणि द्वारे पोहोचवणे. लेखकांना थेट वाचकांशी जोडून देणे आणि त्यांना नुसताच `मान' नाही तर 'धन'पण मिळेल हे पाहणे. वाचकांच्या प्रतिक्रिया सरळ लेखकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांनी दिलेले उत्तर वाचकापर्यंत हे उद्देश पुनश्च ही वेबसाइट व अॅप सुरु करण्यामागे आहेत.
ते पुढे म्हणाले की, अनेकदा विद्यमान स्थितीमध्ये असे काही प्रसंग घडतात की त्या प्रसंगांशी नाळ जुळेल असे लेख पूर्वी कोणत्यातरी नियतकालिकात किंवा वर्तमानपत्रांत येऊन गेलेले असतात. उदाहरणार्थ पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला याबद्दल अलिकडेच मोठा वाद रंगला. त्या अनुषंगाने नियतकालिकांचे काही मागचे अंक चाळता प्रसाद या मासिकाचा १९६८ सालचा ऑगस्ट महिन्याचा अंक हाती आला. तो गणेशोत्सव विशेषांक होता. त्यात पहिला गणेशोत्सव असा लेख मिळाला. त्यात खूप वेगळी माहिती होती. तो लेख आम्ही `पुनश्च' या उपक्रमाच्या वेबसाइट व अॅपवर झळकवला. तो लेख जुना असूनही आजच्या परिस्थितीलाही लागू पडणारा असल्याने वाचकांनी त्याचे स्वागतच केले. बालगंधर्वांच्या बाबतचा एक लेख असाच आम्हाला विचित्र विश्व या नियतकालिकाच्या १९८५ सालच्या अंकात मिळाला. बालगंधर्वांची अखेर असे त्या लेखाचे शीर्षक होते व तो लिहिला होता वसंत वैद्य यांनी. बालगंधर्वांच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त तो लेख `पुनश्च'वर दिल्यानंतर त्या जुन्या लेखाचेही वाचकांनी भरभरुन स्वागत केले.
किरण भिडे पुढे म्हणाले की, विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्यातील जुन्या लेखांना अतिशय महत्वाचे संदर्भमूल्य असते. ताज्या घटनांशी नाळ जोडणारे हे जुने लेख त्याच वेळी वाचकांसमोर आणले तर त्याची खुमारीही वेगळी असते. जुन्या लेखांचा शोध घेतल्यानंतर त्या लेखाचे लेखक ह्यात असतील तर आम्ही त्यांचा हा लेख वेबसाइट व अॅपवर झळकविण्यासाठी लेखी परवानगी घेतो व त्यांना योग्य ते मानधनही लगेच पाठवून देतो. जर एखाद्या लेखाचा लेखक ह्यात नसेल तर त्याच्या वारसांकडून परवानगी मिळविण्याचा प्रयत्न करतो. तेही शक्य न झाल्यास तशी नोंद त्या लेखाखाली केली जाते. जर त्यातून वारसदारांचा शोध लागला तर त्यांना या लेखापोटी योग्य मानधन पोहचविले जाते. `पुनश्च'ची वेबसाइट व अॅप याचे सदस्य होणाऱ्या प्रत्येकाकडून वार्षिक शंभर रुपये एवढेच शुल्क आकारण्यात येते.
बॉक्स
लेखांच्या विषयानुरुप दिल्या जातात व्हिडिओ लिंक्स व शब्दार्थही
नव्या पिढीतील बहुसंख्य मुले मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमातून शालेय व पुढील शिक्षण घेत असतात. या युवा वर्गाला वर्तमानातील घडामोडींशी नाळ जोडणारे जुने लेख वाचायला प्रोत्साहित करावे यासाठी पुनश्च वेबसाइट व अॅपने काही नावीन्यपूर्ण गोष्टी केल्या आहेत. जुन्या नियतकालिकातील एखादा लेख जर पुनश्चवर प्रकाशित करण्यात आला तर त्यातील काही मराठी शब्दांचे अर्थ उलगडणारी लिंक या शब्दाच्या लगतच दिली जाते. त्याचबरोबर जो विषय असेल त्याच्याशी संबंधित व्हिडिओ किंवा वेबसाइटची लिंक लेखाच्या जोडीने समाविष्ट केली जाते. जेणेकरुन वाचकाला त्या विषयाचे सर्वंकष आकलन व्हावे. डिजिटल माध्यमामुळे हे सारे करता येणे शक्य असल्याने वाचकही उत्तम संदर्भमूल्य असलेले हे जुने लेख आवडीने वाचतील असे `पुनश्च'च्या किरण भिडे यांनी सांगितले.
दरवर्षी वाचायला मिळतील १०४ लेख
पुनश्च या वेबपोर्टल व अॅपवर वाचकांना वर्षभरात १०४ लेख वाचता येतील. या वेबपोर्टल व अॅपच्या माध्यमातून सभासद वाचकांना दर बुधवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून दोन लेख वाचावयास मिळतील. पुनश्चने चार आठवड्याचे म्हणजे आठ लेखांचे एक वेळापत्रक बनवलं आहे. वर्षात ५२ आठवडे असतात म्हणजे तेरा वेळा हे वेळापत्रक रिपिट होईल. पुुनश्चने मराठी ललित लेखनाचे ढोबळमानाने ८ प्रकार केले आहेत. (१) अनुभवकथन (२) चिंतन (३) व्यक्ती/संस्था परिचय (४) कविता/पुस्तक/चित्रपट/कला रसास्वाद (५) अर्थकारण/ राजकारण/ समाजकारण ( धर्म/अध्यात्म, जाती, अंधश्रद्धा, महिला इ. ) (६) कथा, स्वमदत लेख, स्थललेख, मृत्युलेख, उद्योग (७) आरोग्य/ शिक्षण/ पर्यावरण/ पालकत्व/ खेळ/ मराठी भाषा (८) खुला ( प्रासंगिक, मन/ मेंदू/ विज्ञान/ तंत्रज्ञान इ. मधील संशोधन वगैरे ).

No comments:

Post a Comment