Saturday, December 2, 2017

नव्या रुपातील `टुरटूर' नाटक सादर करणार मुंबई विद्यापीठातील अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे विद्यार्थी - दिव्य मराठी - २९ नोव्हेंबर २०१७ - समीर परांजपे



दै. दिव्य मराठीच्या दि. 29 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. तिची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/beed/251/291…/0/7/
---
नव्या रुपातील `टुरटूर' नाटक सादर करणार मुंबई विद्यापीठातील अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे विद्यार्थी
- पुरुषोत्तम बेर्डेच करणार दिग्दर्शन, २२ व २३ डिसेंबर रोजी विद्यापीठात होणार प्रयोग
- २५ कलाकारांमध्ये एका फ्रेंच युवतीचाही समावेश
- समीर परांजपे
मुंबई, दि. 29 नोव्हेंबर - लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, विजय कदम आदी कसलेल्या कलाकारांनी गाजविलेले व पुरुषोत्तम बेर्डे यांनी लिहिलेले, दिग्दर्शित केलेले `टुरटूर' हे नाटक आता मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस या विभागातर्फे नव्या कलाकारांच्या संचात लवकरच सादर केले जाणार आहे. या नव्या रुपातील टुरटूर नाटकाचे दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डेच करीत असून नव्या प्रयोगांत चक्क एक एक फ्रेंच मुलगीही भूमिका करीत आहे.
यासंदर्भात लेखक व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले की, टुरटूर हे तरुणांचे नाटक आहे. १७ फेब्रुवारी १९८३ रोजी मुंबईच्या गिरगावमधील मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शक, संगीत अशा अनेक आघाड्या मी एकट्याने सांभाळल्या होत्या. त्यानंतर पुढच्या बारा वर्षांत टुरटूर या नाटकाचे सुमारे ८०० प्रयोग तरी झाले असतील. हे नाटक खूप गाजले होते. या नाटकातील मूळ प्रयोगांत ११ कलाकार व २ गायक, वादक यांचा समावेश होता. आता मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस विभागातील मास्टर ऑफ थिएटर आर्ट््स या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे २५ विद्यार्थी नव्या रुपातील टुरटूर या नाटकात काम करीत आहेत. त्या विद्यार्थ्यांपैकी मार्गारिटा मरिन्कोला ही फ्रेंच विद्यार्थीनीही या नाटकात एक भूमिका करणार आहे. आजच्या काळातील तरुणांना ज्या गोष्टी प्रिय आहेत, त्यांचा उल्लेख नव्या रुपातील टुरटूरच्या प्रयोगांत असणार आहे. विद्यापीठातील या विद्यार्थी कलाकारांनाच घेऊन टुरटूर या नाटकाचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर करायचे की नाही हे अजून काही ठरविलेले नाही असेही पुरुषोत्तम बेर्डे पुढे म्हणाले.
मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस या विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मंगेश बनसोड यांनी सांगितले की, मास्टर ऑफ थिएटर आर्ट््सच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून टुरटूर हे नाटक करीत असले तरी त्याचे सादरीकरण आम्ही व्यावसायिक रंगभूमीवर जसा दर्जेदार प्रयोग करतात तसेच करणार आहोत. येत्या २२ व २३ डिसेंबर रोजी नव्या रुपातील टुरटूर या नाटकाचे प्रयोग मुंबई विद्यापीठातील ओपन थिएटरमध्ये करण्यात येणार आहेत.
सांस्कृतिक देवाणघेवाणीचा आगळा अविष्कार
मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट््स या विभागात सांस्कृतिक देवाणघे‌वाण हा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने फ्रेडरिको गार्सिया लोर्का याने लिहिलेल्या ब्लडवेडिंग या नाटकाच्या कोकणी रुपांतरित नाटकाचा प्रयोग गोवा कला अकादमीतर्फे मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट््समध्ये सादर केला जाईल. तर अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट््सतर्फे टुरटुरचा प्रयोग पणजी येथील गोवा कला अकादमीमध्ये २ जानेवारी सादर करण्यात येईल.

No comments:

Post a Comment