Monday, November 27, 2017

दशक्रिया' चित्रपटाला कोणीही कितीही विरोध केला तरी आम्ही घाबरणार नाही! - संदीप पाटील - मुलाखतकार - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 15 नोव्हेंबर 2017


दै. दिव्य मराठीच्या दि. 15 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी घेतलेली प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक संदीप पाटील यांची मुलाखत. त्या मुलाखतीचा मजकूर, जेपीजी फाइल व वेबपेज लिंक पुढे दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/241/15112017/0/10/
--
दशक्रिया' चित्रपटाला कोणीही कितीही विरोध केला तरी आम्ही घाबरणार नाही!
चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील यांचे `दिव्य मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रतिपादन
- समीर परांजपे
मुंबई, दि. १४ नोव्हेंबर - दशक्रिया हा चित्रपट प्रख्यात लेखक बाबा भांड यांनी लिहिलेल्या दशक्रिया या कादंबरीवरच आधारित आहे. या चित्रपटाची संहिता तसेच हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने संमत केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही संघटनेने या चित्रपटाला कितीही विरोध केला तरी आम्ही त्यांना घाबरणार नाही. सेन्सॉर बोर्ड असताना प्रतिसेन्सॉर बोर्ड उभे राहाणे ही महाराष्ट्र व देशासाठी धोक्याची घंटा ठरु शकते असे परखड प्रतिपादन दशक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील यांनी `दिव्य मराठी'शी बोलताना केले.
पद्मावती या चित्रपटावरुन वादंग माजलेले असतानाच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दशक्रिया या चित्रपटािवरोधात आज वाद उकरुन काढला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दशक्रिया चित्रपटात ब्राह्मण व हिंदू प्रथा-परंपरांची बदनामी व कुचेष्टा केली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी मागणी या महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. त्यामुळे आज दशक्रियाविरोधात वादंगाचे वातावरण निर्माण झाले.
त्या पार्श्वभूमीवर संदीप पाटील पुढे म्हणाले की, कलाकर व दिग्दर्शक म्हणून आम्हाला कोणत्याही समाजाच्या भावना दुखवायच्या नाहीत. मी माणूस म्हणून जगतो. माणुसकीने वागतो. कोणत्याही एका जातीबद्दल कधीही पक्षपाती भूमिका घेतलेली नाही. माणुसकीला कुठेही इजा पोहोचणार नाही याची संपूर्ण काळजी मी व संपूर्ण दशक्रियाच्या टीमने हा चित्रपट बनविताना घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही संघटनांना घाबरायचे आम्हाला कारण नाही. देशात हिटलरशाही नाही तर लोकशाहीचे राज्य आहे. घटनेने प्रत्येक माणसाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचा वापर करुन आम्ही आमच्या मनाला भावेल, रुचेल अशी कलाकृती निर्माण केली आहे. त्यात आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केलेला नाही. कोणत्याही समाजाला दुखावण्याचा आमचा तिळमात्रही हेतू नाही.
संदीप पाटील पुढे म्हणाले की, ज्या संघटना दशक्रिया चित्रपटाच्या विरोधात बोलत आहेत. त्या संघटनांच्या लोकांनी १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट पहिल्याच दिवशी पाहावा. त्याच्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया द्यावी. दशक्रिया चित्रपटाच्या विरोधात वादंग माजले असले तरी आम्ही अजून हे प्रकरण पोलिसांकडे किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यायचा विचार केलेला नाही. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार आहेत. ११ राज्य पुरस्कार आहेत. कान्स चित्रपट महोत्सवातही दशक्रियाचा गौरव झालेला आहे. अशा चित्रपटाबद्दल जर एखादी संघटना दडपशाही करत असेल तर योग्य यंत्रणांनी त्यात लक्ष घातले पाहिजे.
माझे वडिल हे समाजसुधारक व शिक्षक होते. ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्कारात शिकून माझे वडिल मोठे झाले होते. कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर माझे वडील नसते. माझे वडिल नसते तर मी शिकू शकलो नसतो व मी शिकलो नसतो तर हा चित्रपट बनवू शकलो नसतो. त्यामुळे मनात एक प्रखर सामाजिक भावना, सामाजिक कृतज्ञता नेहमीच असते. त्यामुळे सामाजिक जाणिवेचाच चित्रपट बनवावा असा मी मनात पहिल्यापासून ठाम निर्धार केलेला होता. त्यामुळेच दशक्रियासारखा पहिला चित्रपट मी दिग्दर्शित केला असेही संदीप पाटील यांनी पुढे सांगितले.
पहिला झटका आणि चित्रपटातील झटका पापड
दशक्रिया हा मी दिग्दर्शित केलेला पहिलाच िचत्रपट आहे. कोणीही कितीही वादंग निर्माण केले तरी आम्ही तयार केलेला चित्रपट अत्यंत संतुलित आहे हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला? या पहिल्याच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच एखाद्या संघटनेच्या विरोधाचा झटका मला मिळाला आहे. माझ्यासाठीही हा पहिलावहिला अनुभवच आहे. चित्रपटात पापड बनविणाऱ्या एका संस्थेची दृश्ये आहेत. त्या पापडाचे नाव आहे `झटका पापड'. त्या संस्थेची प्रमुख आत्याबाई नावाचे पात्र आहे. आत्याबाई गावात दडपशाही किंवा हिटलरशाही करणाऱ्यांना झटका देण्याचे तंत्र अवलंबत असते. त्या आत्याबाईप्रमाणेच ज्यांनी जात, धर्माचा खेळ मांडलेला आहे, सामाजिक विषमतेला जे कारणीभूत आहेत अशा सर्वांना आमचा दशक्रिया िचत्रपट असाच झटका देईल.

No comments:

Post a Comment