Wednesday, November 1, 2017

आचार्य विनोबांचे जीवन व कार्याशी संबंधित १ लाख अस्सल दस्तऐवज उपलब्ध होणार खास वेबसाइटवर - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी १ नोव्हेंबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. 1 नोव्हेंबर 2017 च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/beed/251/011…/0/5/
--
आचार्य विनोबांचे जीवन व कार्याशी संबंधित १ लाख अस्सल दस्तऐवज उपलब्ध होणार खास वेबसाइटवर
- येत्या २३ नोव्हेंबरला सर्वांसाठी मोफत खुला होणार हा अक्षरखजिना
- विनोबांनी लिहिलेली तसेच त्यांच्या कार्यावर लिहिलेली ४०० पुस्तके, अनेक नियतकालिकांचे अंकही पाहायला मिळणार
- समीर परांजपे
मुंबई, दि. 1 नोव्हेंबर - भूदान व ग्रामदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी केलेल्या चळवळी व त्यांच्या कार्याशी संबंधित नियतकालिके, विनोबांनी लिहिलेली व त्यांच्यावर लिहिली गेलेली चारशेहून अधिक पुस्तके तसेच सर्व सेवा संघाच्या अधिवेशनांचे ठराव, कार्यअहवाल असा सगळा मूल्यवान ऐतिहासिक दस्तऐवजांचा खजिना परमधाम प्रकाशनने महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या www.vinoba.in या खास वेबसाइटवर येत्या २३ नोव्हेंबरपासून सर्वांसाठी मोफत खुला होणार आहे. आचार्य विनोबा यांचे जीवन व कार्य यांच्याशी संबंधित सुमारे एक लाख अस्सल कागदपत्रे स्कॅन करुन या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहेत. या दस्ताऐवजांचा फायदा सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी तसेच इतिहास संशोधकांनाही होणार आहे.
यासंदर्भात नागपूरमधील सर्वोदयी कार्यकर्ते डॉ. पराग चोळकर यांनी `दिव्य मराठी'ला यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आचार्य विनोबा भावे यांनी सुरु केलेल्या भूदान, ग्रामदान या चळवळींसहित त्यांच्या कार्याशी संबंधित १९५१ ते १९७५ या कालावधीतील सर्व अस्सल ऐतिहासिक दस्तऐवज आम्ही या वेबसाइटवर उपलब्ध करुन देत आहोत. दरवर्षी सर्वोदय अधिवेशने होतात. १९५१ ते १९७५ या कालावधीतील सर्वोदय अधिवेशनांचे अहवाल या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात येतील. सर्व सेवा संघामार्फत अधिवेशन आयोजनाचे काम चालायचे. दर सहा महिन्याला ही अधिवेशने व्हायची. त्या अधिवेशनांमधील चर्चा, ठराव तसेच आधीच्या अधिवेशनाचा कार्यअहवाल यांची अस्सल कागदपत्रे आम्ही या वेबसाइटवर पाहाता येतील.
आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याने प्रेरित होऊन देशभरात विविध भाषांमध्ये काही नियतकालिके चालविली जात होती. त्यापैकी भूदान या इंग्रजी साप्ताहिकाचे १९५६ ते १९६६ या कालावधीतील सर्व अंक, त्याचप्रमाणे भूदान यज्ञ या हिंदी साप्ताहिकाचे २० वर्षांचे अंक या वेबसाइटवर बघता येतील. भूदान यज्ञ या मराठी साप्ताहिकाचे १९५२ ते १९५८ या काळातील अंक तसेच हरिजन सेवक या हिंदी साप्ताहिकाचे १९४७ ते १९५५ या कालावधीतील सारे अंक हे www.vinoba.in या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. आचार्य विनोबा यांनी १९२३ साली महाराष्ट्र धर्म हे मराठी साप्ताहिक सुरु केले होते. या दुर्मिळ साप्ताहिकाचे १९२३ ते १९२७ या काळातील अंकही इथे दिलेले असतील. सर्वोदय हे हिंदी मासिक निघायचे. त्याचे १९३८ ते १९४२ या काळातील अंकही इथे पाहाता येतील. सर्वोदय हे मासिक काही काळ बंद पडले होते. त्यानंतर ते १९४९ साली पुन्हा प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. सर्वोदय मासिकाचे १९४९ ते १९५५ या काळातील अंकही स्कॅन करुन या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात येतील.
डॉ. पराग चोळकर यांनी गांधीविचारांवर पीएचडी केली असून त्यांनी िवनोबांच्या भूदान व ग्रामदान चळ‌वळीचा इतिहास `सबै भूमी गोपालकी' या तीन खंडातील हिंदी पुस्तकाद्वारे ग्रंथित केला आहे. याच त्यांच्या पुस्तकाचे `द अर्थ इज द लॉर्ड््स' या नावाने इंग्रजी भाषांतर लवकरच प्रसिद्ध होईल. डॉ. पराग चोळकर यांनी परमधाम प्रकाशनमार्फत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केलेल्या वेबसाइटचा उद्घाटन सोहळा पुणे येथे २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या समारंभास प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग हे उपस्थित राहातील.
`गीताप्रवचन'ची ३६ भाषांतरित पुस्तकेही एकत्र पाहायला मिळणार
आचार्य विनोबा भावे यांनी गीताप्रवचन हे मराठी पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली. गीताप्रवचन या पुस्तकाची अशी विविध भाषांतील सुमारे ३६ भाषांतरित पुस्तकेही या www.vinoba.in या वेबसाइटवर उपलब्ध असतील. आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी सुमारे ५० पुस्तके अजूनही परमधाम प्रकाशनच्यावतीने प्रसिद्ध केली जातात. ही सारी पुस्तके तसेच आचार्य विनोबांच्या कार्यावर लिहिली गेलेली अशी एकुण ४०० पुस्तके इथे पाहाता येतील. त्याचप्रमाणे भूदानासंदर्भात विविध राज्यात जे ४२ कायदे करण्यात आले तेही सारे या वेबसाइटवर देण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment