Monday, November 27, 2017

माझे लता मंगेशकर विद्यापीठ - संजिवनी भेलांडे - मुलाखतकार - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. २६ नोव्हेंबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. २६ नोव्हेंबर २०१७च्या रसिक पुरवणीत प्रख्यात गायिका संजीवनी भेलांडे यांची मी घेतलेली ही मुलाखत.
---
माझे लता मंगेशकर विद्यापीठ 
---
- संजीवनी भेलांडे
soulsanjivani@gmail.com 
---
(शब्दांकन - समीर परांजपे) 
--
लता मंगेशकर म्हणजे पवित्र, पाक, बेदाग शुद्धता. त्यांची सूरसाधना ही सर्वोत्कृष्टतेचे आदर्श उदाहरण आहे. त्या आदर्श आहेत. त्या विद्यापीठ आहेत. त्या महाग्रंथ आहेत. गाणे कसे म्हणावे या गोष्टीच्या त्या गीता, कुराण, बायबल, वेद, उपनिषद असे सारे काही आहेत. मुख्तसर सी बात है असे म्हटले तर त्या सरस्वतीचे रुप आहेत. त्या विशाल वृक्ष आहेत. त्या वृक्षाच्या छायेतली आम्ही आम्ही छोटी छोटी रोपटी आहोत. मला आठवते की लता मंगेशकरांच्या आवाज पहिल्यांदा रेडिओवरुन मी ऐकला. शनिवारी रविवारी शाळेला सुट्टी असायची. त्या िदवशी रेडिओवर रोज सकाळी साडेसात वाजल्यापासून संगीत सरिता, ठुमरी, विविध भारतीवर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, भुलेबिसरे गीत, गाणी लावून मी बसायचे. वाघ जसा टपून बसलेला असतो तसे टपून बसायचे. माझ्या मावशीने मला अमेरिकेहून एक टेपरेकाॅर्डर आणून दिला होता. लता मंगेशकर यांचे रेडिअोवर लागले की गाण की पटकन टेपरेकॉर्डचे बटन दाबायचे आणि ते गाणे रेकॉर्ड करायचे. मग ते गाणे रेकॉर्ड केलेली टेप रिवाईंड करायची, रिवाइंड करायची, मग रिवाईंड फॉरवर्ड असे करत करत त्या गाण्यामध्ये लतादिदिंनी विशिष्ट ठिकाणी जागा कशी घेतली आहे ती ऐकून त्याची प्रॅक्टिस मी करत असे. हे झाले की मग दुसरी एक ब्लँक टेप घ्यायची आणि ती टेपरेकॉर्डरमध्ये घालायची आणि मग अापण गायचे आणि ऐकायचे की ते गाणे लतादिदिंसारखे झाले की नाही झाले ते. असे करत करत मी लता मंगेशकर विद्यापीठामध्ये शिकले. त्यांचा तो खूप असा स्वच्छ स्वर नेहमी मन मोहवून टाकत असे. `ज्योती कलश झलके' या गाण्यातील लतादिदिंचा सुरुवातीचा आलाप किंवा `किस मोडसे जाते है'चा सुरुवातीचा आलाप सुरु झाला की तो सर्वांना भारुनच टाकतो. पूर्ण खोली भरुन जाते स्वरांनी. तो स्वर अत्यंत बिनचूक असतो. त्याचा असर होतोच होतो आपल्यावर. `आ जाने जा...' या गाण्यामध्ये त्या जो आ लावतात त्यात एवढी ताकद आहे की ऐकणाऱ्याचे सारे लक्ष ते स्वर वेधून घेतात. खरेतर ते आहे एक कॅब्रे गाणे. पण ते गाणे गाताना लतादिदी आपल्या आवाजातून ज्या भावना व्यक्त करतात, त्या गाणे ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोल्याच पाहिजेत. दुसरा पर्ययाच नाही. काही दुसऱ्या गाण्यांची उदाहरणे द्यायची तर `जा मै तोसे नाही बोलू' या गाण्यामध्ये लतादिदींनी सुरांचा अभिनय सादर केला आहे. `जा मै तोसे नाही बोलू' हे एक वाक्य त्या गाण्यामध्ये १५ वेळा येते. दरवेळेला त्या वाक्याच्या चालीत व एक्स्प्रेशनमध्ये खूप व्हेरिएशन आहेत. कधी ते वाक्य रुसून तर कधी विनंती करुन म्हणायचे आहे. एका वाक्याचे किती भाव प्रकट झालेत या गाण्यात. अशी लताजींची कितीतरी गाणी आहेत की ज्यांचे व्हिज्युअल्स तुम्ही बघितलेले नसले तरी त्याची ऑडिओ ऐकताना दिदिंच्या आवाजातून त्या गाण्याची दृश्यात्मकता रसिकाला सहज कळून येते. इतक्या सहजशैलीने त्यात कोणतेही गाणे खुलवितात. मी शाळेत असल्यापासून लता मंंगेशकरांचीच गाणी गात अाले आहे. तेव्हांतर लताबाई म्हणजे कोण हे कळायचेही वय नव्हते. लताबाई माझ्यासाठी मापदंड आहेत. जसा रोज सूर्य उगवतो तसे रोज लता मंगेशकरांचे गाणे ऐकणे हे नित्यकर्तव्य होते व आहे. व्यक्ति व तिची कला यांच्यात कधीही गल्लत करु नये. लता मंगेशकर यांची जी गानकला आहे तीच आम्हा रसिकांसाठी लता मंगेशकर आहे. िचत्रपटात काम करणारे कलाकार, गायक संगीतकार यांच्या कलेशी रसिक म्हणून आपला अधिक संबंध असतो. तसाच असावा. अर्थात लतािददिंना मी भेटले तेव्हा आनंद झाला मला. त्यांना पहिल्यांदा मी एका लग्नासमारंभात भेटले होते. वीस वर्षांपूर्वीची घटना आहे ही. लता मंगेशकर या लिजंड आहेत. लतादिदींचा सूर हा अत्यंत फोकसने लागतो. `आप यू फासलोंसे गुजरते रहे, दिलसे कदमोंकी आवाज आती रही' या गाण्यामध्ये आप यूँ हे शब्द म्हणताना लतादिदींनी जे स्मित केलय ते लाजवाबच आहे. गाण्याचा जो माहोल आहे त्यानूसार लतादिदी गाताना भाव प्रकट करतात. त्यांच्या गाण्यात सुरांचा अभिनय आहे. प्रत्येक कलाकाराची संगीत जाणून घेण्याची एक क्षमता असते. ही क्षमता लतादिदींकडे अफाट आहे. त्यांची शब्दांची समज अफलातून आहे. जेव्हा मी गाणी गातो तेव्हा लता मंगेशकरांकडून आम्ही काय शिकलो तर हेच शिकलो की शब्दांचा अर्थ समजून त्यांना कसे भाव ओतायचे आणि तेही खोटे खोटे नाही. त्या पूर्ण गाण्याची, शायरीची सखोलता समजण्याची क्षमता आपल्यात आली पाहिजे. मीराबाईंच्या पदांचेच उदाहरण घेऊ. मीराची ओळख ही आत्म्याची आहे. मै आत्मन हूँ शरीर नही हूँ असे ती म्हणते. त्यामुळे पाचशे वर्षानंतरही मीराबाईच्या आत्म्याचा जो सुगंध आहे तो तिच्या पदांमधून सर्वांना जाणवतो. त्यामुळे मीराबाईची पदे लताबाईंसारख्या व्यक्तिने गाणे हे अत्यंत साहजिकच आहे. लतादिदिंचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आयुष्यभर स्वत:ची आयुष्य आपली ओळख म्हणजे आपली कला अशीच ठेवलेली आहे. लता मंगेशकर आज ७५ वर्षे गात आहेत. कोणत्या प्रोफेशनमध्ये ७५ वर्षे काम करतात हो? सांगा बरं. शक्यच नाही. एखाद्या अभिनेत्रीची अॅक्युचल कामाची वर्षे १० ते १२ वर्षे धरली तर सात पिढ्यांमधील अभिनेत्रींसाठी लता मंगेशकर यांनी गाणे गायलेले आहे. केवळ कर्तृत्वाच्या जोरावर लतादिदींनी एवढे नाव, यश मिळवले ही अपूर्व गोष्टच आहे. लता मंगेशकरांनी गायलेली मीराची गाणी लहानपणापासून मी ऐकत आले आहे. मी मीराच्या पदांचा इंग्रजीत अनुवाद केला. त्याचे पुस्तक मीरा अँड मी या नावाने प्रसिद्ध झाले आहे. मीराबाईंच्या अनुवादित केलेल्या रचना मी इंग्रजीतून गायले. एखाद्या गायिकेला जी गाण्याची भूक असते ती लतादिदींची गाणी गायल्याने पूरी होते. त्या गाण्यांमध्ये भावनाप्रकटीकरणाला पूरेपूर वाव असतो. खरचं काही उत्तम गायल्यासारखे वाटते. काही काळापूर्वी मी सचिन पिळगावकर यांच्याबरोबर पिकनिक अंताक्षरी हा कार्यक्रम एका चॅनेलसाठी केला होता. दूरदर्शनवर स्वर कवितेचे हा कार्यक्रम प्रवीण दवणे यांच्या बरोबर केला. माझ्या सर्व लाइव्ह शोजचे निरुपण मी स्वत: करते. मग तो शो मराठी, इंग्लीश, उर्दू या तीन भाषांपैकी कोणतीही असो. `लता 75' हा कार्यक्रम मी सादर करते. त्यात लतादिदींची निवडक गाणी मी म्हणते. ती लोकांना आवडतात कारण मूळ गाणीच फार सुंदर आहेत. लताबाईंच्या अनेक गाण्यांचे मी िचत्रीकरण बघितलेलेच नाही. `ये दिल और उनकी निगाहों के सायें' हे त्यांचे गाणे घ्या. या गाण्याचा व्हििडओ यूट्युबवर उपलब्धच नाही. कोण नायिका पडद्यावर गात आहे याची मला काहीही माहिती नाही. पण हे गाणे ऐकल्यावर तुम्ही आपसूक काश्मिरमध्ये पोहोचता. अशी सहजरित्या तुम्हाला आपल्या कवेत घेणारी खूप गाणी आहेत. `हाये जिया रोए' या गाण्यातील रोए या शब्दांत आक्रंदनाचे भाव आहेत. ते लतादिदिंनी ज्या रितीने प्रकट केले आहेत त्याला तोड नाही. `दिलवर दिलसे दिलसे प्यारे' हे गाणे पडद्यावर अरुणा इराणी नाचत नाचत म्हणताना दिसते. त्या नायिकेच्या व्यक्तिमत्वाचा भाग होऊन पार्श्वगायन करणे हे वाटते तितके सोपे नाही. हे काम अत्यंत सहजपणे लता मंगेशकरांनी अनेक गाण्यांत केले आहे. आता आम्ही सारे जण ट्रॅक सिस्टिममध्ये गातो. आधी गाणे रेकॉर्ड होते. मग ते कुठच्या अभिनेत्रीसाठी आहे ते ठरते. पूर्वीप्रमाणे एका नायिकेसाठी खूप गाणी गाण्याची आता िचत्रपटात वेळच येत नाही. फिमेल ओरिएंटेड गाणीच सध्या फारशी नसतात. लतादिदींच्या गानकारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या संगीताचे विद्यापीठच आहेत. या विद्यापीठात प्रत्येक होतकरु गायक-गायिकेने प्रवेश घेतला पाहिजे. शास्त्रीय संगीताची घराणी आहेत. तशी सुगम संगीताची घराणी नाहीत. त्यामुळे सुगम संगीतात एकच विद्यापीठ आहे ते म्हणजे लता मंगेशकर. लता बाईंचे गाणे हे घराणे आहे. त्यांचा आदर्श ठेवून गाताना त्यांच्या आवाजाची नक्कल कोणीही करु नये. लताबाईंचा स्वर, त्यांची शैली, सूराचा लगाव या गोष्टी बारकाईने अभ्यासण्यासारख्या आहेत. त्या अतिशय बिनचूक आहेत. १०० टक्के सूर लागणे म्हणजे काय याचा अनुभव घ्यायचा असेल तर लतादिदिंचे गाणे ऐकावे. लता मंगेशकर यांच्यासारखे गाणे म्हणजे वरच्या पट्टीत गाणे असे काही जणांना म्हणजे जे त्यांच्यासारखे गाऊ पाहातात त्यांना वाटते. काळी एकच्या वरच्या पट्टीच्या गाऊन वरचा सूर लावणे म्हणजे लता मंगेशकरांसारखे गाणे असा काहींचा समज झालेला असतो पण तो अयोग्य आहे. दिदिंच्या स्वराची शुद्धता आपल्यात आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. जिच्या गळ्यात सूर आहे अशी भारतातील प्रत्येक मुलगी एकलव्यासारखे लताबाईंचे गाणे शिकते. मी पण असाच त्यांच्या गाण्याचा अभ्यास केला आहे. भक्तीचा स्वर म्हटला की लतादिदिंचे अल्ला तेरो नाम हे गाणे आठवते. लोरी म्हणजे धीरे से आजा रे अखियनमे, भूपाळी म्हणजे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, रोमान्स म्हणजे `तेरे लिए पलकोंकी चादर ओढे' अशी समीकरणे अनेकांच्या मनात तयार झाली आहेत. याचे कारण लतादिदींचा मधुर स्वर. मधुबाला ते माधुरीपर्यंतच्या कित्येक पिढ्यांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ७५वर्षे झाली तरी एखाद्या व्यक्तीचे काम कसे तरुण राहाते हे पाहायचे असेल तर लतादिदिंच्या गाण्यांकडे पाहा. लतादिदींची गाणी गाताना मला खूप समाधान मिळते. गायनाबरोबरच मी म्युझिक कंपोझिंगला सुरुवात केली. हृदयनाथ मंगेशकर हे महान संगीतकार आहेत. त्यांच्या शैलीचा माझ्या म्युझिक कंपोझिंगवर खूप मोठा प्रभाव आहे. पण गाणे हृदयनाथ मंगेशकरांसारखे बनवावे हाच माझा प्रयत्न असतो. लतादिदींचा माझ्यासारख्या गायिकांवर जो प्रभाव आहे तो अमीट आहे. लतादिदी या एकमेवाद्वितीय आहेत.

No comments:

Post a Comment