Friday, November 3, 2017

पाचही मंगेशकर भावंडांना आयुष्यातील पहिले गाणे गाण्याची संधी देणारे संगीतकार दत्ता डावजेकर यांच्यावर प्रसिद्ध होतेय पहिलेवहिले मराठी पुस्तक - समीर परांजपे दै. दिव्य मराठी 3 नोव्हेंबर 2017

दै. दिव्य मराठीच्या दि. 3 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेजलिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिले आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/03112017/0/4/
---
पाचही मंगेशकर भावंडांना आयुष्यातील पहिले गाणे गाण्याची संधी देणारे संगीतकार दत्ता डावजेकर यांच्यावर प्रसिद्ध होतेय पहिलेवहिले मराठी पुस्तक
- डावजेकर यांचे सुरु आहे जन्मशताब्दी वर्ष
- समीर परांजपे
मुंबई, दि. २ नोव्हेंबर - लतादिदी, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर, हृदयनाथ मंगेशकर या पाचही मंगेशकर भावंडांना आयुष्यात पहिल्यांदा गाणे गाण्याची संधी दिली ती म्हणजे प्रख्यात संगीतकार दत्ता डावजेकर उर्फ डीडी यांनी. दत्ता डावजेकर यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. त्यानिमित्त संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा एक विशेष मराठी ग्रंथ प्रकाशित होणार आहे. दत्ता डावजेकर यांच्यावर लिहिले गेलेले मराठी साहित्यातील हे पहिलेवहिले पुस्तक आहे.  स्वरसाक्षी असे नाव असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन मात्र 11 नोव्हेंबरला आयोजिलेल्या एका कार्यक्रमात होईल.
दत्ता डावजेकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. त्यांच्या जन्मशताब्दीचा समारोप येत्या १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र त्यानिमित्तचा कार्यक्रम 11 नोव्हेंबर रोजी आयोजिण्यात आला आहे.
दत्ता डावजेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी डावजेकरांचे १९ सप्टेंबर २००७ रोजी त्यांच्या राहत्या घरी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले संगीतकार म्हणून दत्ता डावजेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे एक पुस्तक त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित करावे असा विचार नाट्यसमीक्षक रमेश उदारे व प्रा. कृष्णकुमार गावंडे यांनी केला. मात्र रमेश उदारे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे अतीव दु:ख झालेल्या कृष्णकुमार गावंडे यांनी एक निर्धार केला की, कितीही विपदा आल्या तरी आता संगीतकार दत्ता डावजेकर यांच्यावरील पुस्तक आकाराला आणायचेच. त्यानूसार त्यांनी कंबर कसली.
दत्ता डावजेकर यांच्यावरील स्वरसाक्षी हे पुस्तक कोणा एका लेखकाने लिहिलेले नाही. डावजेकरांशी उत्तम स्नेहसंबंध असलेल्या व्यक्तिंना त्यांचे `डीडी' कसे भावले, संगीतकार म्हणून डावजेकरांचे कोणते पैलू त्यांना मनोहर वाटले हे सारे या व्यक्तिंनी आपल्या लेखांमधून उलगडून दाखविले आहे. या सर्व लेखांचे संकलन करुन दत्ता डावजेकरांवरील पुस्तक तयार करण्यात आले आहे. दत्ता डावजेकरांच्या संगीतकार म्हणून बहरलेल्या सर्व कारकिर्दीचा पट या सर्व लेखांमधून उभा राहिल. या पुस्तकासंदर्भात कृष्णकुमार गावंडे यांनी सांगितले की, स्वरसाक्षी या पुस्तकात २५ नामवंतांचे लेख आहेत. संगीतकार अशोक पत्की, कवी प्रवीण दवणे, निवेदिका मंगला खाडिलकर, मधु पोतदार, रत्नाकर पिळणकर, चित्रपट समीक्षक व पत्रकार सुधीर नांदगावकर, संगीततज्ज्ञ डाॅ. मृदुला दाढे-जोशी, डॉ. चारुशीला दिवेकर, अंकुश चिंचणकर, सुराज साठे आदि नामवंतांनी डावजेकरांच्या विविध सांगितिक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. दत्ता डावजेकर यांनी ज्या चित्रपटांना संगीत दिले त्यांच्याबद्दल उत्तम संदर्भ असलेली माहिती धनंजय कुलकर्णी यांनी या पुस्तकासाठी खास लिहिली आहे. तसेच डावजेकरांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची जुनी पोस्टर्स कुलकर्णी यांनी खूप मेहनतीने मिळविली. ती या पुस्तकात छापण्यात आली आहेत. प्रख्यात गायक जयवंत कुलकर्णी यांनी दत्ता डावजेकरांसंदर्भात काही आठवणी लिहून ठेवल्या होत्या. त्या प्रथमच या पुस्तकाच्या निमित्ताने प्रकाशित होत आहेत. अनघा प्रकाशनतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या या पुस्तकात दत्ता डावजेकर यांच्या कन्या डॉ. अपर्णा मयेकर, दत्ता डावजेकरांचा सुपुत्र व डावजेकरांची नातवंडे यांनीही लेख लिहिले आहेत.
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी, कुणि बाई, गुणगुणले। गीत माझिया ह्रुदयी ठसले, गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना। गेला कुठे माझा राजा, राजा येईना, थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी । बोलणे ना बोलणे रे, ते तुझ्या हाती, जे स्वप्नि पहिले रे, गोपाला अशा एकाहून एक अवीट गाण्यांचे संगीत देणाऱ्या दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे.
‘दादासाहेब फाळके स्मृती प्रतिष्टान’ व ‘स्वरमुग्धा आर्टस्’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विविध संगीतमय उपक्रमांचे आयोजन केले जाते. २०१६ - २०१७ हे संगीतकार दत्ता डावजेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष. या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या अजरामर अवीट गोडीच्या लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाने करून त्यांचे स्मरण करावे म्हणून स्वरमुग्धा आर्ट्सचे प्रा. कृष्णकुमार गावंड आणि दादासाहेब प्रतिष्ठानच्या चंद्रशेखर पुसाळकर, श्रीकांत कुलकर्णी, आदित्य खेर यांनी पुढाकार घेत या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा येत्या ११ नोव्हेंबर २०१७ रोजी, शिवाजी नाट्यमंदिर येथे रात्रौ ८.०० वाजता,‘तुम्हे याद करते करते’ ह्या विशेष संगीत मैफिलीने केला जाणार आहे. संगीतकार दत्ता डावजेकर उर्फ "डीडी" यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमात जेष्ठ गायक रवींद्र साठे, विनायक जोशी, डॉ मृदुला दाढे- जोशी व डीडींची कन्या डॉ. अपर्णा मयेकर हिंदी व मराठी गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अजय मदन यांचे आहे. डीडी केवळ संगीतकार म्हणून नव्हे तर संगीतसाहाय्यक व अॅरेंजर म्हणूनही ख्यातकीर्त होते. दत्ता डावजेकर हे एक उत्कृष्ट वादक व तंत्रज्ञ (टेक्निशियन) म्हणूनही सुप्रसिद्ध होते. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य होते. गाण्यांच्या सादरीकरणासोबत विवेक पुणतांबेकर ऑडिओ व्हिसुअल्सद्वारे 'डीडी' च्या संगीतातील वैशिष्ट्ये सादर करणार आहेत.
डीडींशी संगीतकार आनंद-मिलिंद यांचा होता गाढ स्नेह
दत्ता डावजेकर यांनी सी. रामचंद्र, चित्रगुप्त व रोशन यांच्याकडे सांगितिक काम खूप केले. त्यापैकी चित्रगुप्त यांचे दोन पुत्र आनंद-मिलिंद हे प्रख्यात संगीतकार म्हणून नावारुपाला आले. आनंद-मिलिंद यांच्यासाठीही दत्ता डावजेकर यांनी संगीतविषयक काम केले होते. त्यामुळे दत्ता डावजेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमात आनंद-मिलिंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
लता मंगेशकर गायल्या होत्या आयुष्यातील पहिले मराठी व हिंदी गाणे डावजेकरांकडे
दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागूं कर जोरी रे व मराठी चित्रपट होता माझं बाळ. दत्ता डावजेकरांनी सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली होती.
--

No comments:

Post a Comment