Friday, November 3, 2017

विठ्ठलाच्या नावावर खपविलेला अर्थहीन चित्रपट - थँक्यू विठ्ठला - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी सिनेकट्टा - 3 नोव्हेंबर 2017

'थँक्यू विठ्ठला' या चित्रपटाचे दिव्य मराठी ऑनलाइनच्या मराठी कट्टा सेगमेंटसाठी मी केलेले व दि. 3 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेले हे परीक्षण. त्याची लिंकही सोबत दिली आहे.
https://m.divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-thank-you-vitthala-5736616-NOR.html?ref=ht
-----
चित्रपट - थँक्यू विठ्ठला
----
विठ्ठलाच्या नावावर खपवलेला अर्थहीन चित्रपट
--
- समीर परांजपे
---
रेटिंग - दोन स्टार
--
कलाकार - महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, मौसमी तोंडवळकर, स्मिता शेवाळे ओदक, पूर्वी भावे, दीपक शिर्के, कमलेश सावंत, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, किशोर चौघुले, अभिजित चव्हाण, मिलिंद सफई, सतीश सलागरे, याकुब सईद, अरुण घाडीगावकर, शैलेश पितांबरे, रिचा सिन्हा, तेजा देवकर, बालकलाकार - वरद सरम्बेळकर
कथा व दिग्दर्शन - देवेंद्र शिवाजी जाधव
पटकथा - एम. सलीम
संवाद - एम.सलीम व योगेश शिरसाट
संगीत - रोहन-रोहन
निर्माते - गोवर्धन नारायण काळे-गौरव गोवर्धन काळे-अंजली सिंग
चित्रपट प्रकार : फॅमिला ड्रामा
--
पंढरपूरच्या विठ्ठलाला कथेत गुंफून तीन वर्षांपूर्वी झळकलेल्या व रितेश देशमुख नायकाच्या भूमिकेत असलेल्या लई भारी या चित्रपटाने तीन वर्षांपूर्वी उत्तम व्यवसाय केला होता. त्यानंतर विठ्ठलाच्या भक्तीचा संदर्भ घेऊन मराठी चित्रपट काढण्याचा प्रवाहच सुरु झाला तो यंदाच्या वर्षीही कायम आहे. यंदा विठ्ठला शपथ हा चित्रपट झळकला पण त्याला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. विठ्ठल, थँक यू विठ्ठला हे चित्रपटही त्याच पठडीतले. त्यापैकी थँक्यू विठ्ठला हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. एखादी गोष्ट लोकप्रिय झाली की त्याचेच अनुकरण केले जाते हे या विठ्ठलमहात्म्याच्या मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. थँक यू विठ्ठला या सध्या चित्रीकरण सुरु असलेल्या नव्या मराठी चित्रपटातही विठ्ठलभक्तीचा संदर्भ आहेच. विठ्ठला शप्पथ या चित्रपट मात्र काही फारसा चालला नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची महती आजवर अनेक मराठी चित्रपटांतून दाखविण्यात आली आहे. असे असले तरीही प्रेक्षक नेहमीच सावळ्या विठुरायावर आधारित असणा-या चित्रपटांच्या प्रतीक्षेत असतात असा दावा विठ्ठला शप्पथ या चित्रपटाच्या कर्त्यांनी केला होता. पण चित्रपट एकुणच ढिसाळ असल्याने तो फारसा चालला नाही. किमान थँक्यू विठ्ठला हा विठ्ठल भक्तीशी नाळ जोडणारा हा मराठी चित्रपट तरी बरा असू दे असे साकडे ज्या मराठी प्रेक्षकांनी साक्षात विठ्ठलाला घातले असेल त्यांची निराशा होणार आहे. थँक्यू विठ्ठला हा चित्रपट अतिशय ढिसाळ बनविलेला आहे.
कथा - हरिभाऊ वाघमारे हा मुंबईतील डबेवाला. हरिभाऊला पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. तो डबेवाल्याचा आपला व्यवसाय करत असतो. पण त्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून तो अजिबात सुखी नसतो. त्याच्या तुटपुंज्या कमाईमुळे त्याला अनेकदा मनासारखे जगता येत नसते. आपल्या कुटुंबाला आपण सुखासीन आयुष्य द्यायला हवे असे त्याला वाटत असते. पण डबेवाल्याच्या व्यवसायातून ते शक्य होणार नाही हे त्याला कळत असते. त्याची बोचही हरिभाऊच्या मनाला लागलेली असते. हरीभाऊ वाघमारेची बायको ही विठ्ठलभक्त असते. तिच्या आग्रहाखातर तो पंढरपूरच्या वारीला जाऊन येतो. पण तो विठुराया आपल्यावर कधीही प्रसन्न होणार नाही याची त्याला खात्री असते. त्यामुळे तो विठ्ठलाविषयी मनात  प्रेम बाळगूनही हा देव आपल्याला कधीच उपयोगी पडणार नाही अशी खात्री बाळगून असतो. हरिभाऊ वाघमारे याला खूप पैसे मिळवायचे असतात, त्याला सत्ताही हवी असते. सत्ता, संपत्ती असेल तर आयुष्य एकदम सुखी होऊन जाईल, आपल्याला कसल्याच समस्यांचा सामना करावा लागणार नाही अशी हरिभाऊची धारणा असते. त्याचे हे स्वार्थी विचार लक्षात घेऊन साक्षात विठ्ठल त्याची परीक्षा घ्यायचे ठरवितो. एक दिवस अचानक हरिभाऊसमोर प्रकट होऊन तो त्याला त्याच्या मनातली इच्छा विचारतो की बोल तूला कोणाचा जन्म हवा आहे? यावर हरिभाऊ विचार करतो. हरिभाऊ अनेक कार्यालयांमध्ये डबा पोहोचवायला जात असतो त्या कंपनीचा मालक वर्दे हा एकदम सुखासीन आयुष्य जगतो आहे असे हरिभाऊला पहिल्यापासून वाटत असते. वर्देची एक सुंदर पत्नी असूनही तो एका चित्रपट अभिनेत्रीच्या प्रेमात असतो. वर्देकडे पैसा आहे, त्याला दोन दोन स्त्रियांचे सुख मि‌ळते आहे हे सर्व पाहून हरिभाऊ विठ्ठलाला विनंती करतो की मला वर्देचे आयुष्य जगायचे आहे. विठ्ठल त्यानूसार त्याला ते आयुष्य बहाल करतो. वर्दे जरी एका मोठ्या कंपनीचा मालक असला तरी तो स्वत: फारसे निर्णय न घेता हाताखालच्या लोकांवर अवलंबून राहात असतो. हरिभाऊने वर्देचे आयुष्य जगायला सुरुवात केल्यानंतर हाताखालचे लोक वर्देला फसवितात. त्याच्या कार्यालयावर इनकमटॅक्सची रेड पडते. वर्देची बायको त्याच्यावर पोलिसांत फसवणुकीचा व चित्रपट तारका वर्देवर बलात्काराचा गुन्हा दाखल करते. त्याचा मॅनेजर गुंडाकरवी एका झोपडपट्टीला आग लावून ती जागा ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतो व या साऱ्या कारस्थानामागे वर्दे आहे अशी जबानी तो गुंड देतो. त्यामुळे चारही बाजूंनी संकटात सापडलेला वर्दे आत्महत्या करायला जातो पण त्याला विठ्ठल वाचवितो. तरीही हरिभाऊची सत्ता व संपत्तीची हाव संपलेली नसते. मला आता कृषीमंत्र्याचे आयुष्य जगायचे आहे असे तो विठ्ठलाला सांगतो. विठ्ठल वेळोवेळी त्याला  हरिभाऊला सावध करत असतो. पण हरिभाऊ सुधारेल तर शप्पथ! कृषीमंत्रीचे आयुष्य विठ्ठलाने हरिभाऊला प्रदान केल्यानंतर तो राज्यातील शेतकऱ्यांचा आपणच कसा त्राता आहोत असे चित्र पद्धतशीरपणे उभे करतो. पण कृषी व धरणाच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करुन आपले घर कसे भरले जाईल याची तजवीज हा मंत्री पद्धतशीरपणे करायला लागतो. मंत्र्याचे आयुष्य जगताना आपल्याला हरिभाऊचे आयुष्यही आठवले पाहिजे अशी हरिभाऊने घातलेली अट विठ्ठलाने मान्य केलेली असते. त्यानूसार दोन आयुष्यांचे संदर्भ एकाच वेळी आठवून जगत असताना ही कृषीमंत्री आपली या आयुष्यातील बायको व हरिभाऊ असतानाची बायको अशा दोन बायकांची काळजी घ्यायला जातो. त्याच्या या उल्लेखांचा त्याचे हितशत्रू बरोबर फायदा घेतात व त्याची यचेच्छ बदनामी करतात. त्याचप्रमाणे या मंत्र्याने जे घोटाळे केले आहेत तेही उजेडात यायला सुरुवात होते. या सगळ्या प्रकाराने त्या मंत्र्याला हृदयविकाराचा झटका येतो. त्याचे प्राण हरण करण्यासाठी साक्षात यमराज येतात. त्यावेळी मंत्र्याचे आयुष्य जगणारा हरिभाऊ घाबरतो. त्याला मरायचे नसते. इथेही विठ्ठल पुन्हा प्रकट होतो व हरिभाऊला आपला स्वार्थ व संपत्तीबद्दलचे फाजील आकर्षण सोडून देण्यास सांगतो. पण आता हरिभाऊ हट्टाला पेटलेला आहे. त्याला यमराजाचेच आयुष्य जगायचे आहे. यमराज काही दिवसांच्या रजेवर जाऊन हरिभाऊ त्याचे आयुष्य जगू लागतो ही कृपा त्या पुन्हा विठ्ठलाचीच. जगातील तरुण, दुर्बल तसेच हव्याहव्याश्या माणसांना आपण खूप आयुष्य देणार, जे नकोसे आहेत, वाईट आहेत त्यांचे प्राण हरण करणार असे हा यमराजरुपी हरिभाऊ मनात ठरवतो. पण प्रत्येक माणसाचे आयुष्य किती हे नियतीने आधीच ठरविलेले असते. त्यात कोणतीही ढवळाढवळ करणे योग्य नाही असे देवादिकांनी समजावूनही यमराज बनलेला हरिभाऊ कोणाचेही ऐकत नाही. मग तो मृत्यू देण्याच्या यमराजाच्या साऱ्या पद्धतीत मनमानेल तसे बदल करतो. यामुळे देवलोकी चिंता निर्माण होते. साक्षात ब्रह्मदेव हस्तक्षेप करतात. हे सारे होत असताना हरिभाऊला सरतेशेवटी यमराजाचे आयुष्य मानवते का? यमराजाच्या आयुष्यातून हरिभाऊ आपल्या मूळ आयुष्यात पुन्हा परत येतो तेव्हा आपल्या हातातील सत्ता व संपत्तीने आयुष्यात सुख येईलच याची खात्री नसते ही गोष्ट त्याला पटते का? की तो आपला हेका तसाच सुरु ठेवतो? अखेर विठ्ठल आपल्या या कथित भक्ताला धडा शिकवतो का? असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी थँक्यू विठ्ठला हा चित्रपट बघायला हवा.
अभिनय - थँक्यू विठ्ठला या चित्रपटाची पटकथा ढिसाळ व संवादांचा दर्जाही कमअस्सलच आहे. त्यामुळे कथाकल्पना जरा वेगळी असूनही सादरीकरण मात्र भीषण असल्याने या चित्रपटाचा पुरता बोजवारा उडाला आहे. विठ्ठलाच्या भूमिकेतील महेश मांजरेकर हे अजिबात शोभत नाहीत. त्यांना दिलेले संवाद व महेश मांजरेकरांचा अभिनय हा कृत्रिम वाटतो. मकरंद अनासपुरे यांचा विनोदी शैलीतील अभिनय आता मोनोटोनस झाला आहे. खर सांगायचे तर प्रेक्षक आता त्याला कंटाळले आहेत. मकरंद अनासपुरे यांनी साकारलेल्या हरिभाऊ वाघमारे हे चित्रपटात चार जणांचे आयुष्य जगते. एखाद्या माणसाला आपली अभिनयक्षमता दाखविण्यासाठी किती मोठा कॅनव्हास त्यामुळे मिळू शकला असता. पण या साऱ्या शक्यता कच्च्या दिग्दर्शनामुळे या चित्रपटात वाया गेेल्या आहेत. त्यामुळे हरिभाऊ चार माणसांचे आयुष्य विठ्ठलाच्या कृपेने जगत असला तरी त्या साऱ्या व्यक्तिरेखा सपक झाल्या आहेत. मुळात कथेमध्येच सुसूत्रात नसल्याने सगळी इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आहे. मकरंद अनासपुरे यांनी केलेल्या विनोदावर धड हसवतही नाही. या दोन मुख्य पात्रांच्या अभिनयाचाच स्तर वाईट आहे. या चित्रपटात सहकलाकारांची इतकी गर्दी आहे की कोणाचीही व्यक्तिरेखा धडपणे फुलत नाही. विस्कळीत चित्रपटातला अव्यवस्थित अभिनय असेच या चित्रपटाचे वर्णन करावे लागते.
दिग्दर्शन -  थँक्यू विठ्ठला या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन देवेंद्र शिवाजी जाधव याचे आहे. दिग्दर्शकानेच एखाद्या चित्रपटाची कथा लिहिली असेल तर त्याला त्या कथेवर सुंदर चित्रपट निर्माण करायला खरेतर काहीही अडचण येऊ नये. पण या चित्रपटाला ते भाग्य लाभलेले नाही. याचे कारण दिग्दर्शनच विस्कळीत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा बांधीव नाही, संवाद काही ठिकाणी हशा वसूल करत असले तरी चित्रपटाचा आशय उंचावण्यासाठी त्यांचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे चित्रपट हिट होण्याचे स्वयंवर जिंकण्यासाठी निघालेल्या दिग्दर्शकाच्या भात्यातील बाणच बोथट आहेत. देवेंद्र शिवाजी जाधव यांची या चित्रपटातील दिग्दर्शक म्हणून असलेली कामगिरी वाईट आहे. सगळ्या व्यक्तिरेखांचा त्यांनी गुंता करुन ठेवला आहे. काही व्यक्तिरेखा येतात व अचानक त्यांचे संदर्भ गायब होतात. चित्रपटातील प्रत्येक दुवा नीट जुळवणे हे कसबकौशल्य दिग्दर्शक म्हणून न जमल्याने हा चित्रपट अजिबात चांगला झालेला नाही. हे अपयश कलाकारांपेक्षा दिग्दर्शकाचे जास्त आहे.
संगीत - या चित्रपटाला रोहन रोहन यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात तीन गाणी आहे. त्यापैकी चित्रपटाच्या प्रारंभी असलेले विठ्ठलभक्तीचे गाणे चांगले जमले आहे. बाकी दोन गाणी इतकी भीषण आहेत की ती आठवली तरी अंगावर काटा येईल. विठ्ठल व विठ्ठलभक्तीच्या नावावर सध्या जे अर्थहीन मराठी चित्रपट येत आहेत त्यांचा मुकुटमणी म्हणजे थँक्यू विठ्ठला हा चित्रपट!
---

No comments:

Post a Comment