Monday, November 27, 2017

आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकरांच्या जीवनातील अनेक अप्रकाशित पैलू आले उजेडात! - दै. दिव्य मराठी 13 नोव्हेंबर 2017- समीर परांजपे -


दै. दिव्य मराठीच्या 13 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/beed/251/13112017/0/5/
---
आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकरांच्या जीवनातील अनेक अप्रकाशित पैलू आले उजेडात!

शिल्पा सुर्वे यांनी लिहिलेले `आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर' हे संशोधनपर पुस्तक डिंपल पब्लिकेशन करणार लवकरच प्रसिद्ध,

- समीर परांजपे

मुंबई, दि. 13 नोव्हेंबर - `संगीत दामिनी', `जयद्रथ विडंबन' अशी सरस मराठी नाटके लिहिणाऱ्या हिराबाई पेडणेकरांची गणना मराठीतील आद्य महिला नाटककारांमध्ये होते. हिराबाईंनी नाटक, काव्यलेखन आदी क्षेत्रातून स्वेच्छेने निवृत्ती पत्करुन त्या अखेरीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत येथे राहात होत्या. त्या कालखंडाबद्दल इतिहासात फारशी नोंद नव्हती. मात्र शिल्पा सुर्वे यांनी `आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर' हे संशोधनपर नवे पुस्तक लिहिले असूून त्यात हिराबाईंच्या आयुष्यातील अनेक अप्रकाशित घटनांवर प्रकाश टाकलेला आहे. हे पुस्तक डिंपल पब्लिकेशन लवकरच प्रसिद्ध करणार आहे.
यासंदर्भात शिल्पा सुर्वे यांनी सांगितले की, आजच्या काळात नाट्यक्षेत्रात असा कोणताही विभाग नाही, जिथे स्त्रिया काम करीत नाहीत. वेशभूषा, नेपथ्यपासून अभिनय, निर्मितीपर्यंत सर्वच ठिकाणी स्त्रियांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. शंभर वर्षांपूर्वींची परिस्थिती यापेक्षा खूपच वेगळी होती. स्त्रियांना रंगभूमीवर प्रवेश निषिद्ध होता. स्त्री व्यक्तिरेखादेखील पुरुषच साकारत. अशा पुरुषप्रधान काळात नाटक लिहिण्याचे आणि ते रंगभूमीवर आणण्याचे धाडस केले, ते हिराबाई पेडणेकर यांनी. हिराबाईंचे 'संगीत दामिनी' हे नाटक १९१३ साली रंगभूमीवर आले. त्याआधी १९०४ साली `जयद्रथ विडंबन' नाटक त्यांनी लिहिले. एका स्त्रीने नाटक लिहिण्याचा इतिहास रचला. खरं तर नाट्यक्षेत्रासारख्या दालनात स्त्रियांना शिरकाव करण्याचा ज्ञानमार्ग दाखवला हिराबाई पेडणेकर यांनी. त्या मार्गावरून समस्त स्त्रीवर्ग आज पुढे जात आहे. मात्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचे ठरलेले हिराबाई पेडणेकर हे गोमांतकीय नाव उपेक्षित राहिले.
आद्य महिला नाटककार हिराबाई यांचे हे चरित्रात्मक पुस्तक केवळ एका स्त्रीपुरते सीमित राहत नसून त्यातून तत्कालिन स्त्रीसमाजाच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकते. हिराबाईंचा जन्म नायकीणीच्या घरात झाला. पण त्यांचे शिक्षण, लेखनकार्य उच्चवर्णीयांच्या सहवासात झाले. या अर्धशिक्षित स्त्रीच्या कपाळावरील नायकीणीचा शिक्का विसरून तिला आपल्या पंक्तीत बसवताना अनेकांनी पंक्तीभेद केला. तिचे पहिलेवहिले नाटक रंगमंचावर आणताना `किर्लोस्कर' सारख्या नाटक कंपन्यांची प्रतिष्ठा आड आली. तिचा स्त्रीसुलभ सहवास सर्वांनी उपभोगला, मात्र तिच्यासाठी प्रत्यक्ष काहीतरी करण्याची वेळ आली तेव्हा अनेकांनी पाठ फिरवली.
हिराबाईंची प्रतिमा केवळ नाट्य वा काव्यलेखनापुरती मर्यादित नव्हती. त्यांच्यात `समाजसुधारिका' हे आणखी एक महत्त्वाचे गुणवैशिष्टय होते. लेखिका शिल्पा सुर्वे यांनी हा पैलू उजेडात आणला आहे. देवदासी कुटुंबातील मुलींनी देवाला सोडलेल्या अवस्थेत राहण्याऐवजी किंवा एखाद्या यजमानाची चाकरी करण्याऐवजी शिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे, चारचौघींप्रमाणे लग्नसंसार करावा, असे हिराबाई पेडणेकरांचे विचार होते. तसे त्यांनी आपल्या मावशीला सांगून स्वतः देहविक्री करण्यास ठाम शब्दांत नकार दिला होता. मुलींना समाजात मानाचे स्थान मिळावे, यासाठी त्यांची तळमळ दिसून येते. शिक्षणाने
समाज सुधारेल यावर त्यांचा विश्वास होता. १९ व्या शतकाच्या अखेरीस आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रीसुधारणांचे जे काही वारे वाहू लागले होते, त्यात हिराबाईंचे नाव आदराने घ्यावे लागेल. आजवर हिराबाईंवर फार मोजकेच लेखन झाले. म. ल. वऱ्हाडपांडे यांचे `हिराबाई आणि कोल्हटकर' यांच्या संबंधावरील पुस्तक महत्त्वाचे ठरते. वसंत कानेटकर यांनी हिराबाईंच्या जीवनावर `कस्तुरीमृग' नाटक लिहिले. शिल्पा सुर्वे यांच्या `आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर' या पुस्तकाची भर पडली आहे.
कृष्णाजी नेने व हिराबाई
कृष्ण़ाजी नेने यांची हिराबाईंशी पहिल्यांदा ओळख १९१५मध्ये झाली. हिराबाई यांनी आधी "नायकिण' या अर्थाने जे आयुष्य व्यतीत केले होते, अशी नेने यांची जी समजूत होती, त्या आयुष्याची सावली नेने यांना नको होती. त्यामुळे मागचे सर्व आयुष्य त्यागून एक साध्या राहणीची स्त्री म्हणून हिराबाईंनी आपल्याबरोबर आयुष्य व्यतीत करावे, अशी नेने यांनी असलेली इच्छा हिराबाईंनीही मानली. नेने यांच्याबरोबर त्या सुमारे ३६ वर्षे पालशेत येथे राहात होत्या. त्यांचे गाणे, नाटक हा सर्व विसरलेला भूतकाळ झाला होता त्यांच्यासाठी. त्या आयुष्याच्या अखेरपर्यंत पालशेत येथेच राहात होत्या. कर्करोगाने त्यांचे पालशेत येथेच १८ ऑक्टोबर १९५१ रोजी निधन झाले. हिराबाईंच्या नंतर अकरा वर्षांनी ११ ऑक्टोबर १९६२ रोजी कृष्णाजी नेने यांचेही पालशेत येथेच निधन झाले. पालशेतच्या नेने वाड्यातील हिराबाईंच्या वास्तव्याच्या खुणा,
त्यांनी बांधलेली विहिर, त्यांचे घर हा ठेवा आपल्याला या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोचतो. त्याची छायाचित्रेही पुस्तकात दिलेली आहे जी आजवर कुठेच आलेली नाहीत. हिराबाईंच्या संदर्भात नेनेंनी लिहिलेल्या पत्रांचे नमुनेही पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. हा सारा नावीन्यपूर्ण दस्तावेज आहे. या पुस्तकातून १८८५ ते १९२० दरम्यानची संगीतनाट्य चळवळ जाणून घेता येते. आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर हे संशोधनपर पुस्तक केवळ एका कलावंतीणीची शोकांतिका बनून राहत नाही. हिराबाईंच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेऊन, त्यांचे काळाच्या पटलाआड दडलेले कार्यकर्तृत्व समाजापुढे आणण्याचा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment