Monday, November 27, 2017

भगिनी निवेदिता - महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या... - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 14 नोव्हेंबर 2017


दै. दिव्य मराठीच्या दि. 14 नोव्हेंबर 2017च्या अंकात मी लिहिलेला हा लेख. त्या लेखाची वेबपेजलिंक, मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/256/14112017/0/10/
---
भगिनी निवेदिता - महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या...
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ रोजी झाला. गेल्या २८ ऑक्टोबरला त्यांची १५०वी जयंती होती. त्यानिमित्त मुंबईतील खार उपनगरातल्या रामकृष्ण मठ व मिशन या संस्थेच्यावतीने पुढील वर्षी २८ ऑक्टोबरपर्यंत विविध ठिकाणी भगिनी निवेदिता यांच्या कार्याची ओळख करुन देणारे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. या सच्च्या भारतसेविकेला केलेला हा मानाचा शब्दसलाम!
---
The mother's heart, the hero's will
The sweetness of the southern breeze,
The sacred charm and strength that dwell
On Aryan altars, flaming, free;
All these be yours and many more
No ancient soul could dream before-
Be thou to India's future son
The mistress, servant, friend in one.
ही आशिर्वादपर कविता दस्तुरखुद्द स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांच्यावर लिहिली होती. या कवितेतील शब्दच इतके प्रभावी आहेत की भगिनी निवेदिता यांचे सारे व्यक्तित्व त्यातून साकारते. भगिनी निवेदिता यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ रोजी झाला. गेल्या २८ ऑक्टोबरला त्यांची १५०वी जयंती होती. त्यानिमित्त मुंबईतील खार उपनगरातल्या रामकृष्ण मठ व मिशन या संस्थेच्यावतीने पुढील वर्षी २८ ऑक्टोबरपर्यंत विविध ठिकाणी भगिनी निवेदिता यांच्या कार्याची ओळख करुन देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
भगिनी निवेदिता यांचे मुळचे नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल. त्या मुळच्या स्कॉटिश आयरिश. त्या स्वामी विवेकानंद यांना लंडनमध्ये १८९५च्या नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा भेटल्या होत्या. लंडनमधील वेस्ट एन्ड ड्रॉइंग रुममध्ये स्वामी विवेकानंद वेदांत व उपनिषदांमधील तत्वज्ञानाबद्दल सांगत होते. त्यांच्या समोर पंधरा-सोळा जण बसले होते. ते सारे एकाग्रतेने स्वामी विवेकानंद यांचे विचार ऐकत होते. त्यामधील एक श्रोता होत्या मार्गारेट एलिझाबेथ नोबेल. मार्गारेट यांना त्यावेळी बुद्ध धर्माच्या तत्वांमध्ये रस निर्माण झाला होता. त्यातील काही गोष्टीही त्यांना स्वामी विवेकानंद यांच्याकडून समजून घेण्याची इच्छा होती. स्वामी विवेकानंद या बैठकीत सांगत होते `चर्च हेही सत्य आहे, मंदिर हे देखील सत्य आहे. पण त्याच्या पलीकडेही निराकार व अमर असे एक तत्व आहे. आता वेळ आली आहे की विविध देशांनी स्वत:कडील अध्यात्मिक संकल्पनांच्या ठेव्याची देवाणघेवाण केली पाहिजे. प्रेम हा सर्वोच्च सद््गुण आहे. देवाची मनापासून भक्ती करा पण त्याबदल्यात देव आपल्याला काय देईल याचा विचार करत बसू नका.' स्वामी विवेकानंद यांच्या प्रभावी विवेचनाने मार्गारेट एलिझाबेथ नोबेल या भारावून गेल्या. त्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या बनल्या. ती मार्गारेट यांच्या आयुष्यातील क्रांतिकारी घटना होती. 
मार्गारेट एलिझाबेथ नोबेल यांच्या बालपण व तारुण्यातील काही वर्षे गेली ती आयर्लंडमध्ये. त्यांचे वडिल हे मानवतावादी होते. त्यांच्याकडून व महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून मार्गारेटला मानवतेची मूल्ये शिकता आली. मार्गारेट यांचा एका वेल्श तरुणाशी विवाह ठरला होता. मात्र साखरपुड्यानंतर काही दिवसांतच तो तरुण मरण पावला. त्यानंतर मार्गारेटने लग्नाचा विचार सोडून दिला. ती पुन्हा त्या विषयाकडे कधी वळली नाही. 
स्वामी विवेकानंद यांना लंडनमध्ये भेटल्यानंतर ती कालांतराने म्हणजे १८९८ साली कोलकात्यात आली. स्वामी विवेकानंद यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर तिचे नाव त्यांनी िनवेदिता असे ठेवले. निवेदिता म्हणजे देवाशी समर्पित. स्वामी विवेकानंद हे काही विवेकी विचारवंत होते. ते परंपरावादी धार्मिक नव्हते. वेदांत तत्वज्ञान असो वा हिंदु संस्कृतीतील परंपरा, त्यातील जे त्याज्य आहे ते टाकून दिले पाहिजे असा त्यांचा रोखठोक विचार होता. धर्माचा तात्विक व व्यवहारी विचार करणारे स्वामी विवेकानंद आजही समाजाला पचणे कठीण आहे. अशा तर्ककठोर विचारवंताची शिष्या होणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. भगिनी निवेदिता या कसोटीलाही उतरल्या. २५ मार्च १८९८ रोजी भगिनी निवेदिता यांनी आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत स्वीकारले व त्यांनी समाजकार्यास स्वत:ला वाहून घेतले. 
भगिनी निवेदिता यांना स्वामी विवेकानंद यांनी भारतात का बोलावून घेतले. याचे महत्वाचे कारण म्हणजे भारतात महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी निवेदिता यांनी काम करावे अशी स्वामींची इच्छा होती. भगिनी निवेदितांच्या मनातही नेमका हाच विचार होता. शिक्षणापासून वंचित राहाणाऱ्या मुलींसाठी एक शाळा सुरु करावी असे निवेदिता यांच्या मनात घोळ‌त होते. बलराम बोस यांच्या घरी या कारणासाठी एक बैठक झाली. तिथे निवेदिता यांनी आपला विचार सांगताच स्वामी विवेकानंदांनी त्यांना प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे तर बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्वांनी आपल्या मुलींना निवेदिता यांच्या शाळेत पाठवावे असे आवाहनही स्वामी विवेकानंद यांनी केले. मात्र त्याला बैठकीतील बहुतांशी लोकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. सरतेशेवटी तेथे उपस्थित असलेल्या हरमोहन यांना विवेकानंद यांनी राजी केले. हरमोहन आपल्या मुलीला निवेदिता यांच्या शा‌ळेत पाठविण्यास राजी झाले. कोणत्याही सामाजिक सुधारणेला वा कार्याला प्रारंभी कमीच प्रतिसाद मिळतो. ते कार्य चांगले आहे हे जसजसे लोकांना पटू लागते तसतसे मग लोक ती गोष्ट अंगिकारु लागतात. कोलकाता येथील बागबझार भागामधील बोसपारा लेनमध्ये १३ नोव्हेंबर १८९८ रोजी निवेदिता यांनी मुलींची शाळा सुरु केली. या शाळेचे उद्घाटन रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदादेवी यांनी केले. त्यावेळी तिथे स्वामी विवेकानंदही उपस्थित होते. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना आपल्या शाळेत शिकण्याकरिता बोलाविण्यासाठी निवेदिता कोलकात्यातील वस्त्यांमध्ये घरोघरी जात असत. तेथील लोकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटवून सांगत. महाराष्ट्रात ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केली होती. त्यामुळे निवेदिता काही वेगळा प्रयोग करत होत्या असे नाही. पण भारतातील पुरुषप्रधान समाजामधे मुलींना शिकवणे हे जणू घोर पापकर्म आहे असेच मानले जात होते. १९ व्या शतकाच्या अखेरीस कोलकातामध्येही ही भावना प्रबळ होती. त्यामुळे निवेदिता यांना आपल्या शाळेसाठी िवद्यार्थीनी मिळविताना अनेक कुटुंबातील पुरुषांकडून नकार पचवावे लागले. पण प्रयत्नांना हळुहळू यश येत गेले. निवेदिता यांच्या शाळेत त्यांना प्रौढ महिला, विधवा अशा विद्यार्थीनी मिळाल्या. त्यांना शिवणकाम, नर्सिंग, स्वच्छतेबद्दलचे प्रशिक्षण असे शिकवता शिकवता त्यांना निवेदिता अक्षरओळखही करुन देऊ लागल्या. ही शाळा सर्व जातीजमातीच्या विद्यार्थीनींसाठी खुली होती. या शाळेसाठी निधी जमविणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी निवेदिता यांनी खूप कष्ट घेतले. विविध ठिकाणी लेखन करुन, व्याख्याने देऊन त्यातून पैसे उभे केले. शाळा चालविण्याचा खर्च त्या स्वत: पदरमोड करुन भागवत असत. हे सर्व निवेदिता ज्या भारतीय समाजातील लोकांसाठी करत होत्या त्यातील किती लोकांना या प्रयत्नांची चाड होती तर फारच कमी लोकांना. त्यावेळीही बंगाली वृत्तपत्रांतून भगिनी निवेदिता यांच्या कार्यावर काही महाभाग टीका करतच असत. पण त्या या टिकेमुळे कधी डगमगल्या नाहीत. त्या बोलक्या सुधारक नव्हत्या तर कृतीशील होत्या. कोलकातामध्ये १८९९ साली प्लेगची साथ पसरली. त्यावेळी त्या पदर खोचून प्लेगच्या रुग्णांची सेवा करु लागल्या. कोलकातातील गरीबातल्या गरीब वस्त्यांमध्ये त्या सेवाशुश्रुषेसाठी जात असत. प्लेगच्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्याची त्यांना इच्छा झाली. त्या कार्यासाठी निधी जमा करण्याकरिता त्यांनी त्याकाळच्या इंग्रजी वृत्तपत्रांना तशी निवदने धाडली. त्या आवाहनाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. धडपडही त्यांनी केली. भगिनी निवेदिता यांचा बंगालमधील बुद्धिवादी तसेच सर्वसामान्य लोकांशी उत्तम संपर्क होता. अबनिनंद्रनाथ टागोर, जगदीशचंद्र बोस, अबला बोस, रवींद्रनाथ टागोर आदी मान्यवरांनी भगिनी निवेदिता यांच्या कार्याला सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले होते.
स्वामी विवेकानंद यांच्या समवेत भगिनी निवेदिता यांनी देशातील काश्मीरसह अनेक भागांचा दौरा केला होता. भारतीय जीवनशैली व येथील परंपरा यांच्याकडे डोळसपणे कसे पाहायचे याचा वस्तुपाठ या दौऱ्यांमध्ये निवेदिता यांना मिळालेला होता. निवेदिता यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांतूनही त्यांच्या भारतीय संस्कृतीबद्दलच्या आत्मियतेची प्रचिती येते. भारतीय संस्कृतीमय झालेल्या निवेदिता त्यामुळे या देशातल्या मातीत रुजलेली मुल्ये कळली होती. त्यानूसार कुठेही कर्मकांडी न होता त्यांनी आपले समाजकार्य सुरु ठेवले होते. स्वामी विवेकानंद यांचे ४ जुलै १९०२ रोजी निधन झाले. त्यानंतरही निवेदिता यांनी आपले भारतातील कार्य सुरुच ठेवले होते. अनुशीलन समिती या संघटनेतील क्रांतिकारकांना भगिनी निवेदिता त्यांच्या कार्यात थोडेफार सहकार्य करीत असत. १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडवून आणली. त्यावेळी या फाळणीच्या विरोधात जे लोक ठामपणे उभे राहिले, त्यात भगिनी निवेदिता होत्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले ते अनमोल आहे. दार्जिलिंग येथील राॅय व्हिला येथे १३ ऑक्टोबर १९११ रोजी वयाच्या ४३व्या वर्षी भगिनी निवेदिता यांचे निधन झाले. विदेशी वंशाच्या असल्या तरी भगिनी निवेदिता संपूर्ण भारतमय झाल्या होत्या. त्या अखेरच्या श्वासापर्यंत भारतभूमीसाठी जगल्या. विदेशी व्यक्ती भारतात येऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य निरपेक्षपणे या देशात उत्तम सेवाकार्यासाठी (मिशनरी किंवा धर्मांतर घडविणाऱ्या विदेशी व्यक्ती इथे अपेक्षित नाहीत) अर्पण केले अशी काही उदाहरणे आपल्याला नक्कीच सापडतील. भगिनी निवेदिता त्याच उच्च श्रेणीतील होत्या. त्यांच्या कार्याची महती सांगणारा भगिनी निवेदिता हा बंगाली चित्रपट १९६२ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व राष्ट्रपती पदकही मिळाले. भगिनी निवेदिता यांची जीवनकथा सांगणारी पुस्तके अनेक भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात निवेदिता यांची १५० वी जयंती साजरी झाली तसेच त्यांच्या निधनाला १०६ वर्षे पूर्ण झाली. आता रामकृष्ण मिशनतर्फे पुढचे सारे वर्ष त्यांची याद जागवणारे अनेक कार्यक्रम होणार आहेत. या सच्च्या भारतसेविकेला मानाचा शब्दसलाम!

No comments:

Post a Comment