Monday, November 27, 2017

लिअोनार्दोच्या चित्रात दडलंय काय? - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 18 नोव्हेंबर 2017


दै. दिव्य मराठीच्या दि. 18 नोव्हेंबर 2017च्या अंकात संपादकीय पानावरील प्रासंगिक या सदरासाठी मी लिहिलेला हा लेख. त्याची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/18112017/0/6/
----
लिअोनार्दोच्या चित्रात दडलंय काय?
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
लिओनार्दो दि सेर पिएरो दा विंची हे लांबलचक नाव असलेल्या १५ व्या शतकातील इटालियन महाशयांच्या नावाचे लघुरुप म्हणजे लिओनार्दो दा विंची! त्याच्याकडे कोणी फक्त विख्यात चित्रकार म्हणून पाहू लागेल तर फसगत होईल. लिओनार्दो दा विंची हा चित्रकार असण्याबरोबरच वास्तुविशारद होता. त्याला विज्ञान, संगीत, गणित, अभियांत्रिकी, साहित्य, खगोलशास्त्र, लेखन, इतिहास, शरीररचनाशास्त्र, नकाशारेखाटनशास्त्र अशा अनेक विषयांत विलक्षण गती होती. या सर्व गुणांचे सम्यक दर्शन लिओनार्दो याने चितारलेल्या चित्रांतून दिसते. हा व्यापक दृष्टिकोन बाळगूनच त्याच्या `साल्वादोर मुंडी' या चित्राकडे रसिकजन व सर्वसामान्यांनीही पाहायला हवे. ख्रिस्ती या जगप्रसिद्ध लिलाव संस्थेने न्यूयॉर्क येथे आयोजित केलेल्या लिलावात साल्वादोर मुंडी (म्हणजे जगाचा संरक्षक) हे लिअोनार्दो दा विंचीचे सुमारे ५०० वर्षे जुने चित्र २९४० कोटी रुपयांना विकले गेले. कोणत्याही चित्रासाठी जगात आजवर लागलेली ही सर्वात मोठी बोली ठरली. लिओनार्दो दा विंची, पाब्लो पिकासो, गिओट्टो बाॅन्डोने, पॉल सेझान, दिएगो वेलाझक्वेझ, कॅराव्हॅगिओ, अल्बर्ट ड्यूरर अशी जागतिक स्तरावरील काही चित्रकारांची नावे आहेत की ज्यांच्या कलाकृती या अजरामर मानल्या जातात. हे चित्रकार विविध कालखंडातील असले तरी आजच्या काळातही त्यांच्या कलाकृतींना रसिकजनांमध्ये एकमताने एकमान्यता मिळते. त्यामुळे जगभरात होणाऱ्या विविध लिलावांत या चित्रकारांच्या कलाकृती सतत चढ्या किंमतीने विकल्या जात असतात. भारतीय चित्रकारांतील अग्रगण्य नाव वासुदेव गायतोंडे यांचे एक चित्र २०१३ साली एका लिलावात तब्बल ३.७ दशलक्ष डॉलरना विकले गेले. अर्थात कोणते चित्र किती किमतीला विकले गेले यावरुन चित्रकारांची तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक चित्रकाराचा व त्याने चितारलेल्या चित्राचा एक काळ व शैली असते. त्यावरुन त्याची महत्ता ठरत असते. कालातीत कलाकृती निर्माण करणाऱ्या चित्रकारांच्या चित्रांना सद््बी किंवा ख्रिस्ती वा तशाच अन्य संस्थांमार्फत जगभरात होणाऱ्या लिलावांमध्ये अभूतपूर्व अशी किंमत मिळते हे वारंवार दिसून आले आहे. लिओनार्दो दा विची याने साल्वादोर मुंडी या चित्रामध्ये जो येशू ख्रिस्त चितारला आहे त्याची वेशभूषा ही युरोप खंडामध्ये जो प्रबोधनकाळ (रेनेसाँ पिरिएड) होता त्या काळात जी वेशभूषा प्रचलित होती त्याप्रमाणे आहे. फ्रान्समध्ये १५०६ ते १५१३ या कालावधीत लुईस १२ व्या याच्या राजवटीदरम्यान साल्वादोर मुंडी हे चित्र चितारल गेले असावे असा अभ्यासकांचा कयास आहे. त्यामुळे या काळातील वेषभूषा व चालीरिती यांचे संदर्भ लक्षात घेऊनच या चित्राकडे पाहाणे आवश्यक आहे. साल्वादोर मुंडी हे चित्र इंग्लंडच्या चार्ल्स पहिला या राजाच्या संग्रही होते. त्याच्या कलासंग्रहाबद्दल जी १६४९ साली जी अधिकृत नोंद झाली त्यात या चित्राचा उल्लेख आहे. त्यानंतर ड्युक ऑफ बकिंगहॅमच्या मुलाने जेव्हा १७६३ साली जेव्हा या चित्राचा लिलाव केला तेव्हा ते पुन्हा जगासमोर आले होते. १९०० साली फ्रान्सिस कुक या ब्रिटिश संग्राहकाने हे चित्र खरेदी केले होते. ते कुकच्या वंशजांनी १९५८ साली विकून टाकले. २००५ साली हे चित्र कलावस्तूविक्रेत्यांच्या संस्थेच्या हाती आले. त्यातील एक पुराणवस्तुतज्ञ रॉबर्ट सायमन याने त्यावेळी साल्वादोर मुंडी हे चित्र पाहिले असता त्याला असे आढळले की या चित्रावर चार दशकांत काही वेळा रंगलेपन करण्यात आले होते. त्यामुळे ती मूळ चित्राची वेगळीच आवृत्ती दिसू लागली होती. लिओनार्दो दा विंची काढलेल्या या चित्राचे मूळ स्वरुपात नीट जतन होणे आवश्यक होते. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने सायमनने या चित्राचे जतनीकरण केले. त्यानंतर हे चित्र रशियाचा कलाप्रेमी दमित्री ई रयाबोलोव्लेवने १२.७ कोटी डॉलरना चार वर्षांपूर्वी विकत घेतले होते. हे चित्र न्यूयॉर्कमधील लिलावात एका गृहस्थाच्या मालकीचे झाले आहे. हा तपशील इतक्यासाठीच दिला की, एखाद्या चित्राला जसा इतिहास असतो तसा ते चित्र जगभरात नंतर कुठेकुठे जाते त्या गोष्टीचीही नोंद तेवढीच महत्वाची असते. अशा विषयांवर इंग्रजीत काही पुस्तकेही निघाली आहेत. साल्वादोर मुंडी या मुळ चित्राच्या कालौघात सुमारे २० नकलाही करण्यात आल्या. लंडनच्या नॅशनल गॅलरीमध्ये नोव्हेंबर २०११ ते फेब्रुवारी २०१२ या कालावधीत `लिओनार्दो दा विंची : पेंटर अॅट द कोर्ट ऑफ मिलान' या नावाने जे प्रदर्शन भरले होते त्यात या २० नकलाही मांडण्यात आल्या होत्या. मोनालिसासारखे प्रख्यात चित्र चितारणाऱ्या लिओनार्दो दा विंचीच्या बहुतेक चित्रांनी जगन्मान्यता मिळविली आहे. लिओनार्दोच नव्हे तर युरोपीय, अमेरिकेतील बहुसंख्य चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृती निगुतीने जतन केल्या जातात. ख्रिस्तीच्या लिलावात लिअोनार्दोच्या चित्राला मिळालेल्या विक्रमी किंमतीबद्दल टाळ्या वाजवताना युरोप, अमेरिकेतील कलाजतनबुद्धीही भारतीयांनी अंगी बाणवायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment