Monday, November 27, 2017

छंद प्रितीचा - अस्सल तमाशापट अभिनयामुळे नव्हे तर गाण्यांमुळे बघण्यासारखा - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी - 14 नोव्हेंबर 2017

https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-chand-priticha-marathi-movie-review-5743864-PHO.html?ref=ht
दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी सिनेकट्टा सेगमेन्टसाठी दि. 14 नोव्हेंबर 2017रोजी छंद प्रितिचा या चित्रपटाचे मी केलेले परीक्षण. त्याचा मजकूर व वेबपेज लिंक पुढे दिली आहे.
---
----
छंद प्रितीचा - अस्सल तमाशापट अभिनयामुळे नव्हे तर गाण्यांमुळे बघण्यासारखा
--
- समीर परांजपे
---
रेटिंग - तीन स्टार
--
कलाकार - सुबोध भावे, सुवर्णा काळे, हर्ष कुलकर्णी, विकास समुद्रे, शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी, विशाल कुलथे
कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, दिग्दर्शन - एन. रेळेकर
संगीत - प्रवीण कुंवर
निर्माते - चंद्रकांत जाधव, प्रेमला पिक्चर्स
चित्रपट प्रकार : फॅमिली ड्रामा
--
वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक जसे आहेत तसेच ते तमाशापटांच्या दिग्दर्शनाचे बेताज बादशहा होते. मराठी माणसाला परिवारासहित तमाशापट बघायची सवय लावली ती अनंत माने यांनीच. तमाशापटांची एक खासियत असते. एक गाव, गावावर हुकमत ठेवणारा पाटील, पाटलाचे तमाशाला जाणे, तमाशातील लावण्यवतीने पाटलावर फिदा होणे, किंवा कधी सामान्य माणसावर तमाशातील लावण्यवतीने फिदा होणे आणि त्यांच्या प्रेमात पाटील खलनायक म्हणून अाडवा येणे. तमाशापटांचा फॉर्म्युला हा असा ठरून गेला होता. अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेल्या सांगत्ये ऐका या चित्रपटाने भारतीय व जागतिक स्तरावर इतिहास घडविला होता. काही विक्रमही प्रस्थापित केले होते. प्रत्यक्ष गावामध्ये पूर्वी बायकापोरांना घेऊन तमाशा बघायला गेलेला पुरुष विरळाच. जवळजवळ नाहीच. पण तमाशापटांनी मात्र ती संधी सर्वांना उपलब्ध करुन दिली. एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घराघरात अलगद पोहोचले. त्याचा फायदा पुढे लावणी महोत्सव जेव्हा विविध शहरांत होऊ लागले त्यांनाही झाला. तमाशापटांचा असर असा होता. त्या चित्रपटांतील लावण्या, सवाल जवाब, नाच्या, सोंगाड्या हे सारे सारे लोकांच्या अगदी ओळखीचे झाले होते. तमाशापटांतील वातावरण मात्र खास कोल्हापूर परिसरातीलच असे. हे सगळे आताच आठवायचे कारण असे की १९५० ते १९७० पर्यंत बोलबाला असलेल्या तमाशापटांमध्ये जसे वातावरण होते अगदी तोच तपशील, तोच माहोल घेऊन २०१७ साली एन. रेळेकर या ज्येष्ठ दिग्दर्शकाने छंद प्रितीचा हा अस्सल तमाशापट बनविला. आशयघन वगैरे म्हणविल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांत हा चित्रपट तसा वेगळा आहे. त्यामुळेच त्याची व्यवस्थित दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.
कथा - तमाशापट असल्याने त्यातील सारे वातावरण हे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातीलच आहे. या चित्रपटात पात्रे जी बोली बोलतात ती देखील सारी त्याच भागातील आहे. त्याच भागातील असेच एक खेडेगाव. तेथील रावजी पाटील याचे घर. ते घर खानदानी असते. त्या घराण्याचा गावात एक दबदबा असतो. समृद्ध शेतकरी वर्गातल्या या घरामध्ये एक फुल उमलते ते कवितेचे. या घरातील सत्यवान या मुलाला कविता, गीते, पोवाडे लिहिण्याचा छंद असतो. तो छंद वाढत्या वयानूसार वृद्धिंगत होतो. याच गावामध्ये चंद्रिका (म्हणजेच चंद्रा) नावाची एक मुलगी असते. जिची आई ही तमाशात नाचायची. ती अकाली मरण पावते. पण तिने आपल्या मुलीला सांगितलेले असते की आयुष्यात एकच गोष्ट कर की कधीही तमाशामध्ये नाचू नकोस. आईचे हे बोल त्या चंद्राला नेहमी आठवत असतात. पण नाचणे हे चंद्राच्या रक्तातच असते. ही मुलगी एका तालेवार घरात मोलमजूरी करुन आपले आयुष्य जगत असते. तिच्या आयुष्यात एक विरंगुळा असतो तो म्हणजे सत्यवानने रचलेल्या कवनांवर नृत्य करणे. सत्यवान व चंद्रा हे जसजसे मोठे होतात तसे त्यांचे छंदही आकार घेऊ लागतात तसेच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. रावजी पाटील हा सत्यवानचा नातेवाईक. त्याला या दोघांचे प्रेमसंबंध आवडत नसतात. चंद्राच्या मनात स्वत:चा तमाशाफड उभारायचा विचार येतो. पण तेवढे आर्थिक बळ तिच्याकडे नसते. ती सत्यवानला यासाठी भरीस पाडते. सत्यवान आपल्या सख्ख्या नातेवाईकांना दुखावतो. बापजाद्यांच्या मालमत्तेतील आपला वाटा घेऊन मोकळा होतो. त्या पैशातून तमाशाफडासाठी भांडवल उभे करुन सत्यवान व चंद्रा हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला फड घेऊन रसिकांची मने जिंकायला निघतात. सत्यवानच्या कवने व त्यावर दिलखेचक नृत्ये करणारी देखणी लावणीसम्राज्ञी चंद्रा यांचा बोलबाला व्हायला लागतो. पण तरीही कुठेतरी काहीतरी कमी पडत असते. ते म्हणजे या तमाशाफडात एका उत्तम ढोलकीवादकाची जरुरी असते. असा उत्तम ढोलकीवादक शोधण्यासाठी सत्यवान हे आठ दिवस गावोगाव वणवण करतो. अखेर त्याला राजाराम नावाचा अंध ढोलकीवाला व त्याचा पेटीवादक साथीदार मिळतो. राजाराम व त्याचा साथीदार गावोगाव भीक मागून जगत असतात. या दोघांमधले कलागुण पाहून सत्यवान या दोघांना आपल्या फडात आणतो. राजारामला पाहून चंद्रा आधी त्याची खिल्ली उडवते. पण त्याचे ढोलकीवादनातील कौशल्य बघून तिला त्याचे महत्व पटते. मग सत्यवानाची कवने, राजारामची ढोलकी व चंद्राचे नृत्य यांमुळे गावोगावी त्यांचा तमाशा रंगतो. त्यांचे आणखी नाव होते. पण चंद्रा ही मुळात चंचल स्वभावाची व स्वार्थी असते. तिचे सत्यवानवर प्रेम असले तरी उत्तम ढोलकी वाजवणाऱ्या अंध राजारामच्या प्रेमात ती पडते. ती काही वेळा मोका साधून तसेच शारिरिक लगट करुन राजारामला आपलेसे करु पाहाते. मात्र राजाराम आधी तिला बधत नाही. या साऱ्या घडामोडी या तमाशाफडातला सोंगाड्या पाहात असतो. तो एक दिवस सत्यवानला याबद्दल सांगून त्याला सावध करतो. जेव्हा सत्यवान चंद्राला याबद्दल जाब विचारतो तेव्हा ती त्याला सांगते की राजारामवर तिचे प्रेम आहे. या धक्क्याने सत्यवान खूप दु:खी होतो व तो तमाशाफड सोडून निघून जातो. दुसऱ्या बाजूला चंद्रा राजारामला पुन्हा दृष्टी लाभावी यासाठी डॉक्टरांच्या दवाखान्याचे उंबरठे झिजवत असते. वैद्यकीय तपासणीनंतर असे निदान होते की, मृत व्यक्तीच्या नेत्रांचे रोपण झाले तर राजारामला पुन्हा दिसायला लागेल. नेत्रपेढी तसेच अनेक ठिकाणी प्रयत्न केल्यानंतरही तसे डोळे उपलब्ध होण्याची शक्यता दिसत नाही. राजारामवर जे नेत्रतज्ज्ञ उपचार करीत असतात ते एक दिवस असे डोळे उपलब्ध झाल्याची खबर चंद्राला देतात. त्यानूसार राजारामवर शस्त्रक्रिया होते व त्याला उत्तम दिसायलाही लागते. राजारामला डोळे दान करणारी ही व्यक्ती नेमकी कोण असते? सत्यवानचा विश्वासघात करुन राजारामवर प्रेम करणाऱ्या चंद्राला जे नेमके सुख हवे असते ते मिळते का? असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहायला हवा.
अभिनय - या चित्रपटात चंद्राची भूमिका सुवर्णा काळे या अभिनेत्रीने केली आहे. तमाशा फडात नाचणाऱ्या नृत्यांगनेची भूमिका सुवर्णाने लाजवाब केली आहे. तिची लावणीनृत्याची समज, सवाल-जवाबात केलेली अदाकारी हे सारे जुन्या जमान्यातील हंसा वाडकर, जयश्री गडकर, उषा चव्हाण या अभिनेत्रींची आठवण करुन देतात. सुवर्णा ही दिसतेही लावणीसम्राज्ञीसारखीच. त्यामुळे तिची या भूमिकेसाठी झालेली निवड अतिशय योग्य आहे. तिच्या नाचामध्ये सफाईदारपणा आहे. त्यामुळे ती अस्सल लावणी कलावंत वाटते. हा एक महत्वाचा गुण लक्षात घेतला तरी तिच्या अभिनयामध्ये मात्र काहीशी कमतरता जाणवते. अभिनयाची पातळी आणखी उंचावल्यास ती एक उत्तम अभिनेत्री म्हणून पुढे येऊ शकते. सत्यवान या शाहिराची भूमिका करणारा हर्ष कुलकर्णी मात्र त्या भूमिकेत तितकासा शोभलेला नाही. त्याचा अभिनय हा मॅच्युअर वाटत नाही. अंध ढोलकीवादक राजारामाच्या भूमिकेला अनेक मर्यादा आहेत. मुळात या भूमिकेसाठी सुबोध भावेची का निवड केली हे अजिबात कळत नाही. हा ढोलकीवाला कोल्हापूर भागातील बोली बोलतो, ढोलकी वाजविताना दाखविला आहे पण त्याची भूमिका करणाऱ्या सुबोध भावेवर असलेली पुण्या-मुंबईची छाप काही तिथेही त्याला सोडत नाही. त्यामुळे त्याने आपल्या परीने ढोलकीवाल्याची भूमिका निभवायचा प्रयत्न केला असला तरी तो अजिबात त्यात फिट वाटत नाही. जैत रे जैतमध्ये नाग्या भगताची भूमिका करणाऱ्या मोहन आगाशेंना प्रत्यक्षात ढोलवादनाची दृश्ये देताना खूप त्रास झाला होता. त्यांना ते ढोलवादन कधीच जमले नाही. छंद प्रितीचा या चित्रपटात सुबोध भावे ढोलकी वाजवताना दाखविला आहे, पण ढोलकीवादनाचा अभिनय त्याला नीट जमलेला नाही हे अनेक दृश्यांतून दिसून येते. विकास समुद्रे, शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी, विशाल कुलथे या कलाकारांनी आपापली कामे दिग्दर्शकानी सांगितल्याबरहुकूम केली आहेत. मात्र ती हुकमी झालेली नाहीत. अभिनयाच्या, दिसण्याच्या अंगाने सुवर्णा काळे वग‌ळता या चित्रपटात फारसे काही पाहाण्यासारखे नाही. 
दिग्दर्शन - एक विनोदी अभिनेता म्हणून कार्यरत असणाऱ्या एन. रेळेकरांनी काही वर्षांपूर्वी छंद प्रितीचा नावाचं नाटक लिहिले, ते गाजले. या नाटकावर चित्रपट व्हावा अशी त्यांची इच्छा होती जी छंद प्रितीचा या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली. मात्र हे नाटक असेल किंवा चित्रपट एन. रेळेकरांच्या लेखन व दिग्दर्शनावर अनंत माने यांचा ठसा स्पष्टपणे जाणवतो. कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, दिग्दर्शन अशा साऱ्या आघाड्या सांभाळताना एन. रेळेकर यांनी काहीसा विस्कळीत असा हा चित्रपट बनविला आहे. या चित्रपटातील काही पात्रांचे एका क्षणानंतर संदर्भ निसटून जातात. ते पुन्हा गवसत नाहीत. दिग्दर्शनाच्या पातळीवर एक कच्चा चित्रपट त्यांनी केला आहे. मात्र त्यांचे एक वेगळे योगदान असे की, आजच्या पिढीला तमाशापट नेमका कसा हे खूप सखोलपणे माहिती असण्याची शक्यता नाही. सध्या अगदी वेगळ्या धर्तीचे मराठी चित्रपट बनत आहेत. त्या प्रवाहात एक ज्येष्ठ दिग्दर्शक उभा राहातो व संपूर्ण तमाशापट बनविण्याचे धाडस करतो. हाच विचार चित्रपटप्रेमींसाठी अभिनव ठरायला हरकत नाही. छंद प्रितीचा खूप पॉलिश्ड तमाशापटही नाही. (एक होता विदूषक हा पॉलिश्ड िचत्रपट डोळ्यासमोर आणा.) परंतू मराठी चित्रपटांच्या भाऊगर्दीत एक वेगळ्या धाटणीचा िचत्रपट प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल.
संगीत - छंद प्रितीचा या चित्रपटाचे बलस्थान ही त्याची गाणी आहेत. ही गाणी लोकसंगीताशी घट्ट नाळ जुळलेली आहेत. ही गाणी उत्तम झाली आहेत. या चित्रपटाचे संगीतकार आहेत प्रवीण कुंवर. महाराष्ट्राचं वैभव असणाऱ्या लोकसंगीताचा बाज जपण्याचा प्रयत्न करत लोकसंगीताचे एकापेक्षा एक प्रकार संगीतकार प्रविण कुवर यांनी छंद प्रितीचा चित्रपटाच्यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर आणले आहेत. यात श्रृंगारिक लावणी, शाहिरी लावणी, सवाल–जवाब, प्रेमगीत, विरह गीत यांचा समावेश आहे. पहाटेचे पाच ( बेला शेंडे ), आलं आभाळ भरून (जावेद अली, केतकी माटेगावकर), शाहिरी लावणी (आदर्श शिंदे), दारू पिणारा जाई मातीत (प्रविण कुंवर), सत्य सांगते (बेला शेंडे), सवाल जवाब (बेला शेंडे – वैशाली सामंत), कोसळली ही विज (आदर्श शिंदे), दारावर टिचकी मारा (बेला शेंडे) अशी सुमारे नऊ गाणी या िचत्रपटात आहेत. ती श्रवणीय झाली आहेत. िचत्रपट पाहाताना ही गाणी आनंद देतातच पण ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल व ही सारी गाणी स्वतंत्रपणे ऐकली तरी रसिकांना एक वेगळा आनंद मिळू शकतो.

1 comment:

  1. Is It Titanium Auctor & Iron - Tioga-arts.com
    Stainless steel, stainless steel, titanium blade copper, or bronze titanium element is used for an titanium rod alloy used for best titanium flat iron various purposes. titanium stud earrings They are used for corrosion and corrosion.

    ReplyDelete