Monday, November 27, 2017

अ ते ज्ञ या सर्व मुळाक्षरांचा वापर यमकात करुन मराठी गझल लिहिण्याचा झाला पहिल्यांदाच प्रयोग - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 9 नोव्हेंबर 2017

दै. दिव्य मराठीच्या दि. 9 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/09112017/0/4/
---
अ ते ज्ञ या सर्व मुळाक्षरांचा वापर यमकात करुन मराठी गझल लिहिण्याचा झाला पहिल्यांदाच प्रयोग
- `अमृताची पालखी' या ए. के. शेख लिखित गझलसंग्रहातील २२५ गझलांचे आहे ते मुख्य वैशिष्ट्य
- नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात होणार या पुस्तकाचे प्रकाशन
- समीर परांजपे
मुंबई, दि. 9 नोव्हेंबर - गझलचा मुळ इतिहास हजार वर्षांचा असेल तर मराठी गझलचा इतिहास हा अवघ्या नव्वद वर्षांचा आहे. मराठी गझल अजून बाल्यावस्थेत असून तिच्या विकासासाठी नवनवीन प्रयोग होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्वर, व्यंजन आदिंनी मिळून अ ते ज्ञ पर्यंत जेवढी मुळाक्षरे आहेत, त्या सर्वांचा यमकामध्ये (काफिया रदिफ) वापर करुन मराठी गझल लिहिण्याचा पहिलावहिला प्रयोग मराठी साहित्यात प्रथमच ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी `अमृताची पालखी' या गझलसंग्रहातील सर्वच्या सर्व म्हणजे सव्वादोनशे गझलांमध्ये केला आहे. हे आगळेवेगळे वैशिष्ट्य असलेल्या या गझलसंग्रहाचे वाशी येथे ११ व १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात प्रकाशन होणार आहे.
`अमृताची पालखी' या ए. के. शेख यांचा गझलसंग्रह गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात गझल सागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रख्यात गझलगायक भीमराव पांचाळे यांनी सांगितले की, स्वर, व्यंजन आदिंनी मिळून अ ते ज्ञ पर्यंत जेवढी मुळाक्षरे आहेत, त्या सर्वांचा यमकामध्ये (काफिया रदिफ) वापर करुन गझल लिहिण्याचे प्रयत्न उर्दूमध्येही खूप कमी झाले आहेत. त्यामुळे या प्रकारचा मराठी गझलेमध्ये जो प्रयोग होत आहे, त्याचे रसिक व जाणकारांनी स्वागतच करायला हवे.
"गझाला' म्हणजे हरिणीचे पाडस. त्या पाडसाइतकीच सुंदर म्हणून उर्दू काव्यरचनेला "गझल' हे नाव पडले. गझल ही इराणी सुंदरी आहे. ती मराठीत रुजवण्यासाठी कवी माधव पटवर्धन (ज्युलियन) यांनी "गज्जलांजली' हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर अनेक जण गझल लिहू लागले. कविवर्य व श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांच्या काळात काही जण मराठी गझला लिहू लागले होते. या पहिल्या फळीमध्ये ए. के. शेख, इलाही जमादार, नीता भिसे आदिंचा समावेश होता.
ए. के. शेख यांच्या `अमृताची पालखी' या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रत्येक गझल कोणत्या छंदात, वृत्तात आहे त्याची माहिती त्या गझलेबरोबर दिलेली आहे. गझलेच्या पहिल्या शेरात तिचा आकृतिबंध स्पष्ट झाल्यानंतर, तिची ‘जमीन’ निश्चित झाल्यावर मग यमक उर्फ काफिया आपल्या वैशिष्ट्यांसह शेवटपर्यंत तोच कायम राहतो. काफियाचे शब्द बदलतात, पण त्याच्या अंमलबजावणीचा कायदा गझलेच्या शेवटापर्यंत तोच कायम राहतो. याचे अचूक भान या गझला लिहिताना ए. के. शेख यांनी बाळगले आहे. `अमृताची पालखी' हा गझलसंग्रह त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे आगळा ठरणार असल्याने त्याचे प्रकाशन नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात करण्याचे गझल सागर प्रतिष्ठानने ठरविले.
वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील नाट्यगृहात आयोजिलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांची निवड झाली आहे. विविध परिसंवाद, मुशायरे, गझलगायन या कार्यक्रमांनी बहरणाऱ्या नवव्या नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनामध्ये ए. के. शेख यांचे मराठी गझल लिहिण्यामध्ये पहिल्यांदाच आगळा प्रयोग केलेला `अमृताची पालखी' हा गझलसंग्रहही मानाचे स्थान राखून असणार आहे.
प्रफुल्ल भुजाडे यांच्या `मनाचा मौन दरवाजा' या गझलसंग्रहाचेही होणार प्रकाशन
ए. के. शेख यांच्या गझलसंग्रहाबरोबरच अमरावती जिल्ह्यातील प्रफुल्ल भुजाडे या मराठी गझलकाराचा `मनाचा मौन दरवाजा' हा गझलसंग्रहही या संमेलनात गझल सागर प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित करण्यात येईल. त्यामध्ये विविध प्रकारच्या गझला भुजाडे यांनी लिहिल्या आहेत.

No comments:

Post a Comment