Monday, November 27, 2017

आयेगा आनेवाला आयेगा.... - समीर परांजपे. मुंबईच्या चोरबाजारातील लता मंगेशकरांच्या जुन्या रेकॉर्डसवरील लेख - दै. दिव्य मराठी 26 नोव्हेंबर 2017


दै. दिव्य मराठीच्या 26 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेला व मी लिहिलेला हा लेख. त्याची वेबपेज लिंक, मजकूर, जेपीजी फाइल सोबत दिली आहे. मुंबईतील चोरबाजारामध्ये हिंदी चित्रपटांच्या जुन्या रेकाँर्डवर विकणारे जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे लतादिदी मंगेशकर यांच्या गाण्याच्या कोणत्या रेकाँर्ड आह्त हे धुंडाळण्यासाठी फेरफटका मारला. निमित्त होते लतादिदी मंगेशकर यांच्या गानकीर्दीचे यंदा असलेले अमृतमहोत्सवी वर्ष. चोरबाजाराच्या भटकंतीत जे गवसले ते या लेखात दिले आहे.
https://m.divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-ar…
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/26112017/0/2/
------------------------------
आयेगा आनेवाला आयेगा....
------------------------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-----
पावलापावलांवर सोबत करणारा कोलाहल मागे टाकून मुंबईतल्या भेंडी बाजारालगतच्या गल्लीत पाऊल टाकले तसे ‘आयेगा आनेवाला आयेगा' या गाण्याचे संथ लयीतले सूर कानी पडले. क्षणात काळ झरझर मागे सरला. आठवणी-स्मृतींच्या तारा झंकारल्या. सुरांचा माग काढत गेलो, तेव्हा कळले, दर्शनी भागात वर्तुळाकार रेकॉर्ड ओळीने टांगलेल्या एका एका दुकानातल्या ग्रामोफोनवर लावलेल्या रेकॉर्डमधून ते स्वर्गीय सूर येत होते. गतकाळ जणू पुन्हा जीवंत झालेला होता. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा हा "विंटेज'स्वर कितीतरी वेळ वातावरणात भरून राहिला होता. दुर्मीळ चीजवस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या विशेषत: संगीतातल्या जाणकार आणि दर्दीसाठी अलीबाबाची गुहा ठरलेल्या ज्युबिली स्ट्रीट उर्फ चोर बाजारात आपण योग्य ठिकाणी पोहोचल्याचीच ती खूण होती...
मुंबईचा चोरबाजार म्हटले की एका विचित्र भावनेने हृदय वेगाने धडधडते पण या चोरबाजाराच्या पोटात जुन्या रेकॉर्डमधील सुरांनी आपले हृदय काबीज करणारी काही दुकाने इथे अजूनही अस्तित्व टिकवून आहेत हे पाहिल्यानंतर आपले मन सुखावते. याला अर्थातच निमित्त ठरते, लता मंगेशकर यांच्या गानकारकीर्दीचा अमृतमहोत्सव. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत "आयेगा आनेवाला'चे महत्व अनन्यसाधारण राहिले आहे. कारण, सौंदर्यवती मधुबालावर चित्रित झालेल्या या गाण्याने लता मंगेशकर यांना पार्श्वगायिका म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान बळकट करण्यास एकेकाळी खूप सहाय्य केले. गंमत म्हणजे, "महल' चित्रपटाच्या गाण्यांच्या रेकॉर्ड पहिल्यांदा जेव्हा विक्रीसाठी आल्या, तेव्हा तिच्या लेबलवर आयेगा आनेवाला आयेगा या गाण्याच्या पुढे कामिनी (मधुबालाने चित्रपटात साकारलेल्या पात्राचे नाव) असे नाव देण्यात आले होते. त्यामुळे हे गाणे जेव्हा "ऑल इंडिया रेडिओ'ला पहिल्यांदा लागले, तेव्हा हे गाणे नेमके कोणी गायले आहे, याची चौकशी करणारे फोन आले. ते गाणे प्रचंड गाजले. पुढेे "महल'च्या गाण्यांच्या रेकॉर्डचा दुसरा संच जेव्हा बाजारात विक्रीसाठी आला, तेव्हा त्या रेकॉर्डच्या लेबलवर या गाण्याच्या पुढे "प्लेबॅक लता मंगेशकर' असा उल्लेख दिमाखाने झळकत होता... ही जुनी आठवण मनात घोळवत चोरबाजारातील जुन्या रेकॉर्डसची दुकाने धुंडाळली आणि आठवणींचा खजिनाही गवसत गेला...
चोरबाजार परिसरातल्या सैफी ज्युबिली मार्गावर "हाजी इब्राहिम' अशा नावाचे दुकान आहे. जुने रेडिओ, जुन्या रेकॉर्ड, ग्रामोफोन, रेकॉर्ड प्लेयर अशा अलीकडे दुर्मीळ होऊ लागलेल्या वस्तू खरेदी करण्याचा व विकण्याचा व्यवसाय या दुकानात चालतो. त्या दुकानाचे संचालक महंमद सलीम. त्यांचे वय ६०च्या जवळपास असेल. ते जुन्या गाण्यांचे दर्दी. लतादीदींची गाणी व जुन्या रेकॉर्डविषयी ते भरभरुन बोलत होते. महंमद सलीम म्हणाले की, गेल्या काही वर्षात जग वेगाने बदलले, जगाच्या संगीतविषयक आवडीनिवडी बदलल्या, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत नवनवीन साधने बाजारात आलीत, पण आमच्याकडे आजही काही हजार जुन्या गाण्यांच्या रेकॉर्डचा संग्रह आहे. कारण, आजही जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांच्या रेकॉर्डचा संग्रह करणारे अनेक लोक देशविदेशांत आहेत. हे रेकॉर्ड संग्राहक चोरबाजारात हटकून येतात. येथील जुन्या रेकॉर्ड विकणाऱ्या एकेक दुकानांमध्ये जाऊन ते आपल्या पारखी नजरेने तेथील रेकॉर्डचा संग्रह पाहातात व हव्या त्या रेकॉर्ड विकत घेतात. त्यात स्पॉटलेस आणि मिरर कंडिशन प्रकारातल्या रेकॉर्डची किंमत मोठी असते. ७८आरपीएम प्रकारातील रेकॉर्ड या सर्वात जुन्या प्रकारच्या. त्यानंतर एलपी, इपी अशा दोन प्रकारांतील रेकॉर्डही बाजारात आल्या होत्या. विजय नाफडे, जयरामन, कमलेश, साठे असे अनेक जुन्या रेकॉर्डचे ख्यातकीर्त संग्राहक गेली अनेक वर्षे आमच्या दुकानात रेकॉर्ड खरेदीसाठी येत आहेत. इतकेच नव्हे, तर फ्रान्स, इटली, अमेरिका, ब्रिटन अशा अनेक देशांतूनही रेकॉर्ड संग्राहक मुंबईत आले की आमच्या दुकानाकडे हमखास चक्कर टाकत आहेत. आमचे एक निरीक्षण आहे. ते म्हणजे, भारतातील रेकॉर्ड संग्राहकांना १९४० ते १९७० पर्यंतच्या दशकांतील जुन्या हिंदी चित्रपटांच्या गाण्यांच्या रेकॉर्ड संग्रही ठेवणे अधिक आवडते. तर विदेशी संग्राहकांना १९६० व १९७०च्या दशकांतील हिंदी चित्रपटांच्या गाण्यांच्या त्यातही लता मंगेशकरांच्या रेकॉर्डस खरेदी करण्यात त्यांना अधिक रस असतो'
ही माहिती देत असताना, महंमद सलीम एका ड्रॉवरमधून तीन जुन्या रेकॉर्ड आपल्या पुढ्यात ठेवतात. त्या असतात, अर्थातच लता मंगेशकरांच्या. "फ्रॉम लता वुइथ लव्ह', "लता मंगेशकर प्रेझेंट्स -भगवदगीता'आणि "आॅल टाइम फेव्हरेट्स ऑफ लता मंगेशकर'.. या तीन एलपी रेकॉर्ड ज्या प्रेमाने हाताळतात ते आपल्या नजरेतून सुटत नाही. या जुन्या रेकॉर्डना आजही खूप मागणी आहे, असे सांगतानाच पुढचा धक्का महंमद सलीम देतात की, "महल' या चित्रपटाच्या गाण्यांच्या पाच रेकाॅर्ड माझ्या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एका अर्थाने माझ्याकडे पाच मौल्यवान हिरे आहेत, हेच त्यांना यातून सुचवायचे असते. ते सांगतात, देशाच्या कानाकोपऱ्यातील रेकॉर्ड संग्राहकांना कोणत्या दुकानांत कोणत्या जुन्या रेकॉर्ड आलेल्या आहेत, याची खडानखडा माहिती असते. "महल'च्या या रेकॉर्ड कधी झपाट्याने विकल्या जातील, कोण दर्दी कुठून माग काढत इथपर्यंत येईल, हे मलाही कळणारही नाही, असे त्यांनी सांगताच अचंबित व्हायची आपल्यावर पाळी येते. कारण, इंटरनेटवर सारे काही एका क्लिकवर उपलब्ध असताना, अस्सल संगीतसोने मिळ‌वण्यासाठी धडपडणारे संगीतप्रेमी आपल्या आसपास आहेत, हेच आपण गृहित धरलेले नसते. 
एखादी जुनी रेकॉर्ड कोणत्या चित्रपटाची आहे, कोणत्या सालातल्या चित्रपटातील आहे, त्या रेकॉर्डची अवस्था कशी आहे, यावर त्या प्रत्येक रेकॉर्डची किंमत ठरत असते. चांगल्या अवस्थेतील एखाद्या रेकॉर्डची किंमत ही तीनशे रुपयांपासून ते सातशे रुपयांपर्यंतही असू शकते. चोरबाजारातील दुकानांमध्ये एचएमव्हीच्या रेकॉर्ड अधिक संख्येने दिसतात. पॉलिगेअर या कंपनीच्या ७८आरपीएम प्रकारातील रेकॉर्डही इथे विक्रेत्यांकडे पाहायला मिळतात. महंमद रफी, किशोरकुमार, आशा भोसले, लता मंगेशकर, मन्ना डे, मुकेश यांच्याच जोडीने एल्विस प्रिस्ले हाअमेरिकी पॉप स्टार अशा एकाहून एक दिग्गज गायिक-गायिकांच्या रेकॉर्ड हारीने विक्रेत्यांच्या दुकानात विक्रीसाठी मांडून ठेवलेल्या असतात. संग्राहक तिथे जाऊन आपल्याला हव्या त्या रेकॉर्डचा शोध घेत आहेत, रेकॉर्डच्या किंमतीवरुन दुकानदाराशी घासाघीस सुरु आहे असेही दृश्य इथे आजही सर्रास पाहायला मिळते.
मात्र लता मंगेशकरांच्या रेकॉर्डना या दुकानांत आगळे आदराचे स्थान अाहे, हे काही लपून राहात नाही. आजही लतादीदींच्या रेकॉर्डना उत्तम मागणी असते,असा येथील विक्रेत्यांचा अनुभव आहे. पण चोरबाजारात या रेकॉर्ड नेमक्या येतात कुठून? मुंबई असो वा इतर ठिकाणी जेव्हा जुनी घरे किंवा बंगले विकले जातात किंवा त्यांच्या जागी नवी इमारत बांधायचे काम सुुरु होणार असते किंवा कोणाला आपल्या घरातील इंटेरिअर नवे करायचे असते, त्यावेळी घरातील जुने सामान विक्रीस काढले जाते. अशा ठिकाणांहून मग अनेकदा जुन्या पिढीतील लोकांनी संग्रही केलेल्या जुन्या रेकॉर्ड, चित्रपटांची पोस्टर अशा विविध प्रकारच्या गोष्टी भंगारवाल्याला विकल्या जातात. या भंगारवाल्यांकडून हा सगळा अनमोल खजिना चोरबाजारातील जुन्या वस्तूंचे विक्रेते विकत घेतात. "हाजी इब्राहिम' या दुकानाचे महंमद सलीम यांनी सांगितले की, जुन्या रेकॉर्ड मिळवण्यासाठी मी कोलकाता, दिल्ली, मद्रास (आताचे चेन्नई) या ठिकाणचे जुने बाजार स्वत: जाऊन धुंडाळतो. कोलकाता येथे धरमतला, होल्दा, चेन्नईमध्ये मोर मार्केट, दिल्लीतील चांदनी चौकातील बाजारामध्ये माझ्या आजही फेऱ्या होत असतात. तेथील दुकानांत गेलो की हमखास जुन्या हिंदी चित्रपटांतील रेकॉर्डचा मोठा साठा आम्हाला मिळतो. तो विकत घेऊन मग मुंबईत मी आणतो. 
हाजी इब्राहिम हे असं एक दुकान आहे, ज्यात लतादीदींनी जुन्या मराठी चित्रपटांसाठी जी गाणी गायली, त्या रेकॉर्डचाही संग्रह आहे. त्यामुळे जुन्या मराठी गाण्यांचे शौकिन आवर्जून या रेकॉर्ड घेऊन जातात. कारण, एलपी, इपी अशा रेकॉर्ड खूप वर्षे टिकतात. तितके आयुष्य कॅसेट, सीडी, डीव्हीडी यांना नसते. अनेकदा या जुन्या रेकॉर्ड खरेदी करुन त्यावरुन गाण्यांचे शौकिन आपल्या स्वत:साठी सीडी बनवून घेतात. अशीही उदाहरणे या रेकॉर्ड विक्रेत्यांना माहिती आहेत.
हाजी इब्राहिम या दुकानातील जुन्या गाण्यांच्या रेकॉर्डच्या जादुई नगरीतून बाहेर पडून चोरबाजारातील मटन स्ट्रीटवरील बॉलिवूड बझार या दुकानाकडे पावले वळली. त्या दुकानाचे मालक जाहिद मन्सुरी हे पस्तीशीच्या वयाचे. पदवीधर व अस्खलित इंग्रजीतून संभाषण करणारे. त्यांच्या दुकानात जुन्या हिंदी चित्रपटांची पोस्टर, रेकॉर्ड, जुन्या काळातील कंदील अशा अनेक गोष्टी मांडून ठेवलेल्या होत्या. अलिबाबाच्या गुहेत शिरल्यानंतर तेथील विविध वस्तू पाहून कसे डोळे विस्फारतील, तशी बघणाऱ्याची अवस्था होते. "बॉलिवूड बझार'च्या जाहिद मन्सुरींनी थोडी वेगळी माहिती दिली. ते म्हणाले की, आम्हा व्यापारांची मटन स्ट्रीट असोसिएशन आहे. जुन्या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डचा साठा कोणाकडे असेल तर त्याचा लिलाव होतो. जुन्या रेकॉर्ड विकणारे डीलरच या लिलावात सहभागी होऊ शकतात. हा लिलाव कोणाच्या तरी घरी किंवा एखाद्या जागी होतो.
जुन्या रेकॉर्डचा संग्रह करणारे अनेक जुन्या पिढीतले लोक असले तरी त्यात तरुण लोकांचा सहभागही लक्षणीय असल्याचे इथे आल्यानंतर आपल्याला कळते. वयाच्या पन्नाशीकडे झुकलेले किंवा त्यापुढील वयोगटाचे लोक जुन्या चित्रपटांच्या रेकॉर्डचा संग्रह करत असावेत असा जो समज आहे तो िततकासा खरा नाही असे चोरबाजारातील रेकॉर्डविक्रेते आवर्जून सांगतात. पण तरीही एक प्रश्न पुन्हा मनात उभा राहातोच. या रेकॉर्ड वाजविण्यासाठी जे ग्रामोफोन लागतात,ते आता बनवते कोण ? त्यावर या रेकॉर्ड विक्रेत्यांनी दिलेले उत्तर असे की जुने ग्रामोफोन नीट दुरुस्त करुन पुन्हा िवकणारे काही कसबी लोक जसे चोरबाजारमध्ये आहेत, तसेच चीनसारख्या देशात आता पुन्हा रेकॉर्डप्लेअर बनविले जाऊ लागले आहेत. हे रेकॉर्डप्लेअर भारतात आयात केले जातात. त्यावर जुन्या ७८आरपीएम, एलपी, इपी रेकॉर्ड लावून गानरसिकाला आपली आवडती गाणी ऐकण्याची चांगली सोय झालेली आहे.
गुलामभाई, इब्राहिमभाई आणि अब्दुल रेहमान हे एकेकाळचे चोर बाजारात उपलब्ध होणाऱ्या संगीत खजिन्याचे सर्वपरिचित मालक. या मालकांचे कान आणि डोळे सतत संगीताशी संबंधित दुर्मीळ चिजांकडे लागलेले असे. त्यामुळे दुकानात एखादा नवा दर्दी आला की, त्याला एखादी दुर्मीळ रेकॉर्ड देताना हे त्या दर्दीचा माग काढत त्याच्याही संग्रहापर्यंत पोहचून त्याच्या खजिन्याचा अंदाज घेत. जयंत कुलकर्णींसारख्या दर्दी जाणकार जेव्हा त्यांच्याकडे जात आणि समाधानकारक खरेदी-विक्रीचा सौदा होई तेव्हा हे दुकानदार त्यांना आनंदाने बिर्याणीही खावू घालत. याच जयंत कुलकर्णींनी अमेरिकेला स्थायिक होण्यासाठी जाताना त्यांच्याकडच्या हजारो रेकॉर्ड अब्दुल रहेमानला विकला आणि पुढे रेहमानने तो खजिना विकून बक्कळ नफा कमावला.
चोरबाजारातील जुन्या रेकॉर्ड विक्रेत्यांची पूर्वी तीसेक एक दुकाने होती. मात्र कालौघात अवघी दहा -पंधरा दुकाने उरली आहेत. आधीच्या पिढीने सुरु केलेला रेकॉर्ड विक्रीचा व्यवसाय पुढच्या पिढीने सुरु न ठेवल्याने काही दुकाने बंद पडली, काही मंडळी आपली दुकाने विकून दुसरीकडे निघून गेली. किंवा पूर्वीचे रेकॉर्ड विक्रीचे दुकान बंद करुन आता पुढच्या पिढीतील लोकांनी दुसराच व्यवसाय त्या दुकानात सुरु केला आहे. मात्र चोरबाजारात सध्या अस्तित्वात आहेत त्या जुन्या रेकॉर्ड विक्रीच्या दुकानांची भ्रमंती करताना एक जाणवले की, प्रत्येक दुकानाच्या शोरुममध्ये सर्वात अग्रभागी लता मंगेशकरांच्या जुन्या गाण्यांच्या रेकॉर्ड मांडून ठेवलेल्या असतात. त्यामुळे रेकॉर्ड संग्राहकाचे पहिले लक्ष तिथेच जाते. लता मंगेशकर यांच्या गानकारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण झाली असली तरी आजच्या पिढीला त्यांचा स्वर व सूर तितकेच हवेहवेसे वाटतात याचे प्रातिनिधिक चित्र या जुन्या रेकॉर्डच्या दुकानांत दिसते...
‘आयेगा आनेवाला आयेगा' हे लतादीदींच्या गाजलेल्या गाण्याचे शब्द त्यांच्या चाहत्यांची आणि चोर बाजारातल्या दुकानांतून रेकॉर्ड््स विकणाऱ्या विक्रेत्यांची आशा प्रकट करणारेच आहेत. कारण, लतादीदींच्या सुरांचा माग काढत जगभरातले रसिक स्वत:हून इथवर पोहचतातच, पोहोचतात असा रेकॉर्ड विक्रेत्यांचा आजवरचा अनुभव आहे. ही अर्थातच, चित्रपटसंगीताची आणि त्या विश्वाचे अढळपद मिळवलेल्या लता मंगेशकरांची जादू आहे...

No comments:

Post a Comment