Monday, November 27, 2017

दशक्रिया - धर्मश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या लुबाडणुकीचा पर्दाफाश - समीर परांजपे - दै. दिव्य मराठीच्या वेबसाइट - 17 नोव्हेंबर 2017

https://m.divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-marathi-movie-dashkriya-review-5748177-PHO.html?ref=ht
दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी सिनेकट्टा या सेगमेंटसाठी दशक्रिया या चित्रपटाचे मी केलेले हे परीक्षण दि. 17 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झाले आहे. त्या परीक्षणाचा मजकूर व वेबलिंक सोबत दिली आहे.
---
दशक्रिया - धर्मश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या लुबाडणुकीचा पर्दाफाश
--
- समीर परांजपे
---
रेटिंग - चार स्टार
--
कलाकार - दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, मिलिंद फाटक, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, नंदकिशोर चौघुले, आशा शेलार, उमा सरदेशमुख, संतोष मयेकर, जयंत वाडकर, आनंदा कारेकर, प्रफुल्ल घाग, उमेश मिटकरी, बालकलाकार - आर्या आढाव, विनायक घाडीगावकर, कल्पना कोठारी, शकू : अनुश्री फडणीस, पंकज चेंबुरकर, विद्यासागर अध्यापक, प्रशांत तपस्वी, रसिका चव्हाण, संदीप जुवाटकर, अनिल राबाडे
कथा - बाबा भांड (कादंबरी : दशक्रिया)
पटकथा - संवाद - गीत - प्रस्तुती : संजय कृष्णाजी पाटील 
दिग्दर्शन - संदीप पाटील
संगीत - अमितराज
निर्माती - कल्पना विलास कोठारी
चित्रपट प्रकार : फॅमिली ड्रामा
--
कथा : ही कथा आहे भानूदास उर्फ भान्या नावाच्या एका मुलाची. पैठण या तीर्थक्षेत्री राहाणारा हा मुलगा. गरीब घरातला. त्याचे वडील हे दारुडे आहेत. त्या व्यसनापायी त्यांची नोकरीतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. भान्याची आई मोलमजूरी करणारी. आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी ती खूप कष्ट करीत असते. भान्या हा शाळेत शिकत असतो. पैठणच्या नाथघाटावर एक वेगळे जग आहे. जे लोक मरण पावतात, त्यांचे श्राद्धविधी दशक्रियाविधी, तेरावे असे सगळे या घाटावर केले जाते. हे विधी किरवंत ब्राह्मण करत असतात. त्या ब्राह्मणांमध्ये केशव भटजी नावाचे एक प्रस्थ असते. त्यांनी नाथघाटावर हे विधी करण्यासंदर्भात स्वत:ची जवळजवळ मक्तेदारी निर्माण केलेली असते. एखाद्या कुटुंबातील माणूस मरण पावल्यानंतर त्यांचे दशक्रिया व तेरावे वगैरे विधी हे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे रितसर केले तर त्याला मोक्षप्राप्ती होते अशी भाबडी धर्मश्रद्धा सामान्य माणसांच्या मनात असते. नेमका या धर्मश्रद्धेचा गैरफायदा केशव भटजी घेत असतात. दशक्रिया, तेरावे, श्राद्धविधी वगैरे केल्यानंतर ते लोकांकडून भरमसाठ दक्षिणा उपटत असत. त्याचबरोबर त्या लोकांना अनेक ब्राह्मणांचे मध्यान्हभोजन करायला फशी पाडून त्यामुळे पुण्य मिळेल व मेलेल्या माणसाला मोक्ष मिळण्यास मदत होईल असेही सांगत असत. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तिचे नातेवाईक धर्मश्रद्धेच्या भावनेने असे ब्राह्मणभोजन देण्यास तयारही होत. या केशवभटजींनी धर्मश्रद्धेचा फायदा घेऊन सर्वसामान्यांची जी पिळवणूक चालविलेली आहे त्याबद्दल गावातही तीव्र नाराजी असते. केशव भटजीच्या मक्तेदारीचा नाथ घाटावरील बाकी किरवंत ब्राह्मणांनाही बसलेला असतो. त्यामुळे नारायण हा किरवंत ब्राह्मणही संतप्त आहे. भान्या हा मुलगा शाळा शिकता शिकता या नाथ घाटावर सकाळी एक चाळण घेऊन नेहमी नदीपात्रात उभा राहात असे. तो जे करतो तसे करणारी इतरही मुले त्या नाथघाटावर होती. मरण पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्या जागेवरील राखेचे विसर्जन जेव्हा त्याचे नातेवाईक विसर्जनासाठी घेऊन येत असत, त्यावेळी ती राख, अस्थी नदीच्या पात्रात सोडताना त्यांच्या मागे भान्या चा‌ळण घेऊन उभा राहात असे. ती राख, अस्थी प्रथम त्या चाळणीत पडत. त्या अस्थींमध्ये मृत व्यक्तीचा एखादा दागिना किंवा कोणी जर अस्थींबरोबर पैसे वाहिले असतील तर ते त्या चाळणीत अडकत असत. ही रोजची कमाई भान्याला दिलासादायक वाटत होती. त्या कमाईत जर कधी मृत व्यक्तीचा एखादा सोन्याचा दागिना मिळाला तर तो विकून भान्याला आपल्या भावासाठी शिलाई मशिन विकत घ्यायचे होते. अशी त्याची स्वप्ने होती. पैठणचे पत्रे सावकार यांचा नाथघाटावर काही लोकांना चाळण्या भाड्याने देण्याचा पिढीजात व्यवसाय आहे. भान्या हा त्यांच्याकडूनच चाळणी भाड्याने आणत असे. जी कमाई होईल त्यातून त्यांचे भाडे देत असे. पत्रे सावकार हे गावातले बडे प्रस्थ असल्याने ते केशव भटजीच्या मक्तेदारीबद्दल व तो लोकांची करीत असलेल्या फसवणुकीबद्दल त्याची कानउघाडणी करतात. पण केशव भटजी काही त्यांना जुमानत नाही. भान्याने नदीत अस्थिविसर्जनाच्या वेळी चाळणी घेऊन उभे राहाणे त्याच्या आईला अजिबात पसंत नसते. मात्र तिलाही कालांतराने पटायला लागते की भान्या ही सारी धडपड आपल्या घराला पैशाची मदत व्हावी म्हणूनच करीत आहे. त्यामुळे मग ती त्याला फार विरोध करीत नाही. केशव भटजीची मक्तेदारी मोडायची अशा विचाराने ग्रस्त असलेला नारायण भटजी गावातील पंचांची बैठक बोलावतो. व त्यात केशव भटजीच्या गैरवर्तनाची चिरफाड करतो. त्यामुळे दुखावलेला केशव भटजी नारायणापेक्षा पत्रे सावकारांवर डुख धरतो. कारण ते त्या बैठकीचे अध्यक्ष असतात. भान्या आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी साठविलेल्या पैशांतून नवी चाळणी बनवून घेतो. उद्देश हा की पत्रे सावकारांकडून भाड्याने चाळणी घेण्यापेक्षा स्वत:ची असलेली केव्हाही चांगली. पण केशव भटजीचा माणूस भान्याची नवी चाळणी नदीच्या पात्रात फेकून देतो व त्याला मारहाणही करतो. भान्याला त्यामुळे पुन्हा पत्रे सावकारांकडून चाळणी भाड्याने घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा वातावरणात कथानकाला कलाटणी मिळते. पत्रे सावकारांच्या विरोधात नाथघाटावरील सगळ्या किरवंत ब्राह्मणांना एकत्र करण्यात केशव भटाला यश येते. नाथघाटावरील नाभिक, चाळणी घेऊन उभी राहाणारी मुले व इतर व्यावसायिक यांच्या उत्पन्नातील अर्धा वाटा आता जबरदस्ती किरवंत ब्राह्मणांच्या घशात जायला लागतो. कारण किरवंत ब्राह्मणांमुळेच इतर व्यावसायिकांना हाताला काम मिळते असा केशव भटजीचा दावा असतो. या चालीविरोधात पत्रे सावकार व गावकरी उभे राहू पाहातात. कारण नाथघाटावर धर्मविधींच्या नावाखाली लोकांच्या होणाऱ्या लुबाडणुकीमुळे पैठणचे नाव सर्वदूर वाईट होत चाललेले असते. पत्रे सावकारांची एक समस्या असते. त्यांचा मुलगा दारुडा असतो. त्याला एक गरीब घरातील मुलगी बघून त्याचे लग्न लावून देण्यात येते. पत्रे सावकार व त्यांचे सारे कुटुंबिय दर्शनासाठी जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात होऊन पत्रे सावकार मरण पावतात. त्यांचा अंत्यविधी दुसऱ्या गावी होतो. पण त्यांची दशक्रिया व इतर विधी नाथघाटावर करण्यासाठी त्यांची पत्नी पैठणमधील सर्व किरवंत ब्राह्मणांचे उंबरठे झिजवते. पण केशव भटजीच्या दहशतीने एकही किरवंत पत्रे सावकारांचे विधी करण्यास तयार होत नाही. या वळणावर काही प्रश्न निर्माण होतात. पत्रे सावकारांचा दशक्रिया विधी मग होतो कोणाच्या हातून? भान्या हा मुलगा काही वेगळी वाट चोखाळून गावासमोर आदर्श निर्माण करतो का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी दशक्रिया हा चित्रपट आवर्जून पाहायलाच हवा.
अभिनय - दशक्रिया या चित्रपटामध्ये केशव भटजी यांचे खलनायकी छटा असलेले पात्र मनोज जोशी यांनी अत्यंत समर्थपणे साकारले आहे. नाथघाटावर दशक्रिया व इतर विधी करताना लोकांच्या धर्मश्रद्धेचा गैरफायदा घेऊन कशाप्रकारे किरवंत ब्राह्मण त्यांना लुबाडतात हे केशव भटजीच्या भूमिकेत अत्यंत मर्मज्ञपणे मनोज जोशी यांनी दाखविले आहे. किरवंत ब्राह्मण यांना समाजात फारसे मानाचे स्थान नसते त्यामुळे गावात त्या मुद्द्यावरुन पत्रे सावकार व इतर गावकरी त्यांची जी मानहानी करतात त्यावेळी चरफडणारा केशव भटजी मनोज जोशी यांनी तडफेने उभा केला आहे. पत्रे सावकाराच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर यांनी चोख कामगिरी केली आहे. या चित्रपटाची खरी कथा आहे ती भान्या या मुलाभोवती केंद्रित झालेली. भान्याचे काम करणाऱ्या आर्या आढाव या मुलाने चाळण घेऊन नदीच्या पात्रात उभा असलेला मुलगा, अस्थितून काही मौल्यवान दागिना किंवा रुपये मिळतात का याची आशाळभूतपणे वाट पाहाणारा मुलगा या भावना ज्या अदाकारीने रंगविल्या आहेत त्याला तोडच नाही. मुळात या िचत्रपटातील सारी पात्रे ही वास्तवातील वाटतात. ती कुठेही कृत्रिम अभिनय करीत नाहीत. पत्रे सावकार : दिलीप प्रभावळकर, केशव भटजी : मनोज जोशी, नारायण : मिलिंद फाटक, शांता : अदिती देशपांडे, विठ्ठल : मिलिंद शिंदे, पिराजी : नंदकिशोर चौघुले, आत्याबाई : अाशा शेलार, सावकारिण बाई : उमा सरदेशमुख, तुकाराम : संतोष मयेकर, हनुमंत : प्रफुल्ल घाग, अवधूत : उमेश मिटकरी, आणि बालकलाकार किरकिऱ्या : विनायक घाडीगावंकर, पाहुणे कलाकार - मुरलीधर : जयवंत वाडकर, गुरुजी(गाणे) : आनंदा कारेकर, केशवची बायको : कल्पना कोठारी, सहकलाकार - शकू : अनुश्री फडणीस, दिगंबर : पंकज चेंबुरकर, कीर्तनकार : विद्यासागर अध्यापक , शहाजी : प्रशांत तपस्वी, शारदा : रसिका चव्हाण, नाम्या : संदीप जुवाटकर, मामा : अनिल राबाडे या सर्व कलाकारांनी आपल्या दिलेल्या भूमिका समजून केल्या आहेत. कुठेही कोणतीही भूमिका दिग्दर्शकाच्या नियंत्रणाबाहेर जात नाही व वास्तवाचे भान सोडत नाही हे दशक्रिया चित्रपटाचे मोठे यश आहे. कारण चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद खूपच बांधीव आहेत. त्यामुळे चित्रपटाला उत्तम आकार मिळण्यात चांगला हातभार लागला आहे.
दिग्दर्शन - संदीप पाटील याने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. दशक्रिया या कादंबरीवर चित्रपट करणे तसे सोपे नव्हते. कारण त्या कादंबरीच्या कथानकात सामाजिक दाह इतका ठासून भरलेला आहे की त्यावर सवंग धाटणीचा चित्रपट बनविला असता तर संदीप पाटील यांचे दिग्दर्शन हास्यास्पद ठरले असते. पण तो धोका संदीप पाटील यांनी टाळून दशक्रिया चित्रपटाला वास्तवाच्या भूमीवर चालायला लावले आहे. संदीप पाटील, राम कोंडीलकर, किंवा संजय पाटील यांच्यात व कादंबरीकार बाबा भांड यांच्यात पहिल्यापासून उत्तम संवाद होता. कादंबरीचे चित्रपटात रुपांतर करताना माध्यमांतर होण्यासाठी आवश्यक ते स्वातंत्र्य त्यांना भांड यांनी दिलेच होते. त्यांनी लिहिलेला प्रत्येक प्रसंग बाबा भांड यांना आवडला. दशक्रियावर चांगली पटकथा होणं हे संजय पाटील यांचे कौशल्य होते. एका ठराविक वेळेचा चित्रपट करणं, मूळ कादंबरीला परिणामकारक करणं, त्यातल्या आशयाला धक्का न लावणं आणि हे सगळं दृश्य स्वरुपात मांडणं हे अवघड काम आहे. हे काम पटकथा उत्तम लिहिली गेल्यानंतर संदीप पाटील यांनी दिग्दर्शक म्हणून समर्थपणे पेलले व त्यात ते यशस्वी झाले. दशक्रिया चित्रपट सर्वच अंगांनी दर्जेदार झाला म्हणून तर त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व महाराष्ट्र राज्याचे चित्रपट पुरस्कार मिळाले. संदीप पाटील यांनी पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक म्हणून जे कौशल्य दाखविले आहे त्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटांविषयी देखील रसिकांच्या मनात उत्सुकता राहाणारच आहे.
संगीत - या चित्रपटाला अमितराज यांनी संगीत दिले असून त्यातील गाणी स्वप्नील बांदोडकर, बालशाहिर पृथ्वीराज माळी, कस्तुरी वावरे, आरती केळकर, आरोही म्हात्रे यांनी गायली आहेत. गाणी फार चांगली आहेत असे म्हणवत नाही. पण ती अगदीच टाकाऊ नाहीत. दशक्रिया चित्रपटाच्या कथानकामध्ये ती विजोड वाटत नाहीत इतकेच म्हणता येईल.

No comments:

Post a Comment