Monday, November 27, 2017

मराठी नाटकांची इत्यंभूत माहिती देणारे अशा प्रकारचे राज्यातील पहिले ग्रंथालय साकारणार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबईतील वास्तूत - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 18 नोव्हेंबर 2017

दै. दिव्य मराठीच्या दि. 18 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/ahm…/…/18112017/0/3/
---
मराठी नाटकांची इत्यंभूत माहिती देणारे अशा प्रकारचे राज्यातील पहिले ग्रंथालय
साकारणार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबईतील वास्तूत
- ७ ते ८ हजार मराठी नाटकांच्या संहिता, ज्येष्ठ रंगकर्मींच्या कामगिरींच्या सीडी, मराठी नाटकांशी संबंधित असंख्य पुस्तके यांनी सज्ज असेल हे ग्रंथालय
- येत्या मार्चनंतर ग्रंथालय उभारणीचे काम सुरु होण्याची शक्यता
- समीर परांजपे
मुंबई, दि. 18 नोव्हेंबर - मराठी रंगभूमीची पालक संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबईच्या माहिम भागातील मुख्य कार्यालयात एक सुसज्ज ग्रंथालय उभारण्याची योजना आकाराला येत असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ७५ लाख रुपयेही मंजूर केले आहेत. मराठी रंगभूमीच्या इतिहासात आजवर सादर झालेल्या सुमारे सात ते आठ हजार नाटकांच्या संहिता व जुन्या पिढीतील रंगकर्मींच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या त्यांच्या मुलाखतींच्या व्हिडिओ सीडी व मराठी नाटकाशी संबंधित पुस्तके यांनी सुसज्ज असे हे ग्रंथालय बांधण्यासंबंधीच्या हालचालींना येत्या मार्चनंतर वेग येण्याची शक्यता आहे.
मराठी रंगभूमीचा उदय खऱ्या अर्थाने सांगली येथे १८४३ साली झाला. सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे विष्णू अमृत भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा संस्थानिक प्रयोग झाला. मराठीतील हे पहिले गद्य-पद्यमिश्रित नाटक जन्माला आले. त्यानंतर आजवरच्या १७४ वर्षांत मराठी रंगभूमी विविधांगाने बहरत गेली व तो प्रवाह अधिक सशक्त झाला. या काळात सुमारे सात ते आठ हजार मराठी नाटके रंगभूमीवर सादर झाली आहेत. पण या सर्व नाटकांच्या संहिता एकत्र एका ठिकाणी कुठेही उपलबब्ध नाहीत. यामुळे नाट्य अभ्यासकांची खूप गैरसोय होत होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित ग्रंथालयामध्ये या सात-आठ हजार मराठी नाटकांच्या संहितांचा संग्रह करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर या सर्व संहितांचे डिजिटलायझेशन करण्यात येईल. ज्याला या संहितांची डिजिटलाईज्ड प्रत हवी असेल ती त्याला काही शुल्क आकारुन ऑनलाइन घेता येण्याची सोयही या ग्रंथालयात उपलब्ध असेल.
त्याशिवाय मराठी रंगभूमीशी संबंधित मराठी व या रंगभूमीवर लिहिली गेलेली इंग्रजी व अन्य काही महत्वाच्या भाषांतील पुस्तकांचा संग्रहही या ग्रंथालयात करण्यात येणार आहे. त्यामुळे वाचकाला या ग्रंथालयात आल्यानंतर मराठी नाटकाविषयी परिपूर्ण माहिती मिळण्याची सोय होणार आहे. संशोधकांनाही या ग्रंथालयाचा उपयोग होईल. मराठी नाटकाचा इतिहास, वर्तमान यांच्याविषयी समग्र माहिती मिळेल असे दस्ताऐवज संग्रही असलेले एकही ग्रंथालय सध्या महाराष्ट्रात नाही. ती मोठी उणीव या ग्रंथालयाने भरुन निघेन. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने अशा आधुनिक स्वरुपाचे सुसज्ज ग्रंथालय उभारावे ही कल्पना परिषदेचे माजी प्रमुुख कार्यवाह व अभिनेता दीपक करंजीकर यांची आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य नाट्यपरिषदेच्या नव्या नियामक मंडळाच्या निवडणुका लवकरच होऊन येत्या मार्चमध्ये हे नवे नियामक मंडळ पुढील पाच वर्षांसाठी कारभाराची सूत्रे हाती घेईल. त्यानंतरच नाट्य परिषदेच्या माहिम येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाच्या परिसरात हे नवे सुसज्ज ग्रंथालय बांधण्याच्या कामाला वेग येईल असे सांगण्यात आले. या भव्य ग्रंथालयासाठी जो टीडीआर विकत घ्यावा लागेल त्यासाठी सत्तर ते ऐंशी लाख रुपये लागणार असून त्या निधीची उभारणीही नाट्य परिषदेला करावी लागणार आहे.
काळूबाळू, रमेश देव, शाहीर साबळे, जयमाला शिलेदारांसह
५० ज्येष्ठ रंगकर्मींच्या कामगिरीबद्दलच्या सीडी तयार
मराठी रंगभूमीसाठी अनेक व्यक्ती व संस्थांनी आपापले योगदान दिले आहे. त्यांच्या कामगिरीमुळेच मराठी रंगभूमीची एवढी मोठी परंपरा निर्माण झाली. हे योगदान पुढील पिढ्यांना समजावे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मींच्या आठवणी, त्यांची रंगभूमीवरील कारकिर्द, त्यांचे अनुभव जतन करण्याच्या हेतूने त्यांच्या दृकश्राव्य मुलाखती घेण्याचा उपक्रम सुरु केला. त्यानूसार आजवर ५० ज्येष्ठ रंगकर्मींच्या कामगिरीसंदर्भातील सीडी नाट्यपरिषदेने तयार केल्या आहेत. या ५० जणांमध्ये मास्टर अविनाश (गणपतराव मोहिते), बळवंत मराठे व उदयराज गोडबोले, प्रतिभा बारगीर व सेवा चौहान, चित्तरंजन कोल्हटकर, बाबुराव गोखले, प्रसाद सावकार, गणपत पाटील, यमुनाबाई वाईकर, निळू फुले, काळूबाळू, रमेश देव, लिला गांधी, प्रभाकर भावे व सरस्वती राणे, मधुकर तोरडमल, जयमाला शिलेदार, सुलभा देशपांडे, वसंत अवसरीकर, जयंत सावरकर, प्रभाकर पणशीकर, शाहीर साबळे, भालचंद्र पेंढारकर, जयमाला शिलेदार, दाजी भाटवडेकर, चंद्रकांत गोखले, आत्माराम भेंडे, श्रीकांत मोघे हे ज्येष्ठ रंगकर्मी विष्णूदास भावे नाट्य विद्यामंदिर, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पी. डी. ए.), भरतनाट्य संशोधन मंदिर यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. या सर्वांच्या कामगिरींच्या सीडी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रस्तावित ग्रंथालयात ठेवल्या जातील. त्या ग्रंथालयातील वाचकांसाठी उपलब्ध असणार आहेत. या सीडींची प्रत मिळण्याची व्यवस्थाही या ग्रंथालयात उपलब्ध असेल. मराठी रंगभूमीसंदर्भात या ग्रंथालयात नेमकी कोणती संदर्भसाधने उपलब्ध आहेत याची माहिती जगभरच्या नाट्यरसिकांना ऑनलाइन मिळण्याचीही व्यवस्था करण्यात येईल. अजून अनेक रंगकर्मींच्या कामगिरीबद्दलच्या सीडी नाट्य परिषदेतर्फे तयार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment