Monday, November 27, 2017

विदेशात शिकून मायदेशात परतल्यानंतर भारतीयांची प्रदीर्घ काळ वैद्यकीय सेवा करणाऱ्या पहिल्या मराठी डॉक्टर रखमाबाई यांनी केले होते महिलांच्या कल्याणासाठीही महान कार्य- समीर परांजपे दै. दिव्य मराठी २३ नोव्हेंबर २०१७

दै. दिव्य मराठीच्या दि. 23 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/23112017/0/1/
---
विदेशात शिकून मायदेशात परतल्यानंतर भारतीयांची प्रदीर्घ काळ वैद्यकीय सेवा करणाऱ्या पहिल्या मराठी डॉक्टर रखमाबाई यांनी केले होते महिलांच्या कल्याणासाठीही महान कार्य
१५३ व्या जयंतीदिनी बुधवारी रखमाबाईंच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी साकारले गेले खास गुगल डुडल
- समीर परांजपे
मुंबई, दि. 23 नोव्हेंबर - आनंदीबाई जोशी या विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या पहिल्या मराठी महिला डॉक्टर असल्या तरी त्यांच्या अकाली निधनाने देशवासीयांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांच्यानंतर विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या व दीर्घायुष्य लाभलेल्या रखमाबाई राऊत या भारतात परतून इथे प्रदीर्घ वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या मराठी डॉक्टर ठरल्या. रखमाबाईंचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी झाला. त्यामुळे आज त्यांची १५३वी जयंती होती. त्यानिमित्त डॉ. रखमाबाईंच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी आज खास गुगल डुडल तयार करण्यात आले होते. रखमाबाईंच्या वैवाहिक आयुष्यात उठलेल्या वादळामुळे त्यासंदर्भातील खटला पार इंग्लंडच्या संसदेपर्यंत गाजला होता. त्यांनी डॉक्टर झाल्यानंतर जे वैद्यकीय सेवाकार्य केले ते अजोड स्वरुपाचे होते.
रखमाबाई यांचा जन्म १८६४ चा तर आनंदीबाई जोशी यांचा जन्म १८६५चा. म्हणजे आनंदीबाई या रखमाबाईंपेक्षा एक वर्षांनी लहान होत्या. आनंदीबाई जोशी या ब्राह्मण तर रखमाबाई या सोमवंशीय पाठारे जातीतील पाचकळशी ज्ञातीमध्ये जन्माला आल्या होत्या. आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी हे विक्षिप्त होते पण ध्येयासक्त होते. आपल्या पत्नीस विदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवून तिला डॉक्टर बनवायचे हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. त्यानूसार त्यांनी जीवाचा आटापीटा केला. आनंदीबाई जोशी यांना वयाच्या एकोणिसाव्या वर्षी १८८३ साली अमेरिकेतील विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हानिया या कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. गोपाळराव वेळोवेळी देत असलेला मनस्ताप सहन करायला लागत असूनही ते सारे बाजूला सारुन आनंदीबाई जोशी कष्टाच्या व जिद्दीच्या बळावर १८८६ साली एम. डी. झाल्या. त्या भारतात परतल्या. त्यांना कोल्हापूर येथील अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयातील स्त्रीकक्षाचा ताबा देण्यात आला होता. पण आनंदीबाईंना क्षयाची बाधा झाली होती. हा विकार बळावला व त्यांचे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा काहीही फायदा भारतीयांना होऊ शकला नाही.
आनंदीबाई जोशी यांच्या निधनानंतर तीनच वर्षांनी म्हणजे १८९० साली रखमाबाई राऊत यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वूमन या महाविद्यालयात प्रवेश घेतला. भारतात महिलांना वैद्यकीय शिक्षणच काय साधे शिक्षण घेणे हे देखील स्वप्नवत होते त्याचकाळात परदेशातसुद्धा महिलांनी वैद्यकीय शिक्षण घेणे हे तितकेसे सोपे नव्हते. पण प्रत्येक अडचणींवर मात करुन आपल्या चार वर्षांच्या शिक्षणक्रमात दंतशास्त्र, सुईणपण, भूलतंत्र तसेच स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्याकरिता खास प्रशिक्षणही घेतले. लंडन स्कूल ऑफ मेडिसिन या परीक्षेत बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणाच्या शस्त्रक्रिया या विषयांत विशेष प्रािवण्य मिळविले. शरीराला मालिश करण्याचे तंत्र व त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. जुलै १८९४मध्ये रखमाबाईंनी वैद्यक व्यवसायाची शेवटची परीक्षा दिली. रखमाबाईंना लंडनमध्ये पदवी मिळू शकली नाही. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणाऱ्या ह्या महाविद्यालयात `मुलींना पदवीदान करण्याची तरतूद त्या विद्यापीठाच्या कायद्यात नसल्याने तेव्हाच्या रितीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा स्कॉटलंडच्या संस्थेत दिली. त्या उत्तमरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी लिसेन्शिएट आॅफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन ही पदवी मिळाली. त्यांचे नाव इंग्लंडच्या `मेडिकल रजिस्टर'मध्ये दाखल झाले. डॉक्टर होऊन रखमाबाई राऊत या भारतामध्ये परतल्या.
भारतामध्ये केले महान वैद्यकीय सेवाकार्य
रखमाबाई राऊत यांना इंग्लंडला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी डफरिन फंडाने खूप मदत केलेली होती. या फंडातर्फे देशात त्यावेळी सात रुग्णालये सुरु करण्यात आली. त्यातील एक रुग्णालय मुंबईत सुरु करण्यात आले. त्याचे नाव होते कामा रुग्णालय. रखमाबाई राऊत या इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांनी कामा रुग्णालयात हाऊस सर्जन या पदासाठी अर्ज केला. येथे त्यांनी अवघे सहा महिने काम केले. डफरिन फंडाच्यावतीने दिल्लीत पहिले रुग्णालय स्थापन झाले. त्यानंतर बडोदा, सुरत, मद्रास अशा ठिकाणी रुग्णालये सुरु करण्यात आली होती. कामा रुग्णालयात काम केल्यानंतर रखमाबाई राऊत यांची सुरतच्या शेठ मोरारदास व्रजभूषणदास माळवी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. एक भारतीय महिला डॉक्टर आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा एतद्देशीयांना करुन देत आहे ही त्याकाळी खूप मोठी गोष्ट होती. सूरतच्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा देताना रखमाबाईंना अनेक गोष्टींची जणू पायाभरणीच करावी लागली. लक्षात घ्या हा काळ आहे १९व्या शतकाच्या अखेरीचा. त्यावेळी बहुतांशी महिलांची बाळंतपणे घरीच सुइणीही करीत असत. त्यामुळे सूरतमध्ये रुग्णालय सुरु होऊनही परिसरातील बायका प्रसूतीसाठी रुग्णालयात यायला तयार होत नसत. या इमारतीला भूताने झपाटलेले आहे अशीही वदंता पसरविली गेली होती. प्रसूतीसाठी महिलांनी रुग्णालयात यायला हवे ही मानसिकता तयार होण्यासाठी रखमाबाईंनी एक शक्कल लढविली. शे‌ळीचे सुखरुप बाळंतपण एकदा त्यांनी रुग्णालयात केले. त्याचबरोबर प्रसूतीसाठी रुग्णालयात येण्यास टाळाटाळ करणाऱ्या बायकांशी त्यांनी अखंड संवाद साधला. या त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन परिसरातील प्रसूतीसाठी महिलांची पावले सूरतच्या रुग्णालयाकडे वळू लागली. अनेक स्त्रिया उपचारांसाठी रुग्णालयात येत त्यांच्या सोबत त्यांची मुलेही असत. या मुलांकरिता रखमाबाईंनी बालक मंदिर स्थापन केले. इतकेच नव्हे तर विधवा व त्यांच्या मुलांना रखमाबाई यांनी आश्रयही दिला होता. स्त्रिया साक्षर असतील तर त्यांचे आयुष्य खूप सूकर होते. हे लक्षात घेऊन सूरतमध्ये स्त्रियांसाठी लेखनवाचनाचे वर्गही रखमाबाई राऊत यांनी सुरु केले होते. के. टी. गज्जर यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून सुरतमध्ये रखमाबाई व शिवगौरी गज्जर यांनी मिळून विधवाश्रम व अनाथाश्रम सुरु केले. १९०७मध्ये रखमाबाईंच्या प्रेरणेने सूरतमध्येच वनिता आश्रम नावाची संस्था सुरु केली. भारतातील इतर प्रांतातील सुरत येथील विधवांचे जीवनही लाजिरवाणे व खडतर होते. गुजराती नागर ब्राह्मण समाजातील शिवगौरी व बाजीगौरी या महिलांनी विधवाआश्रमाच्या कामातून सर्व जातीच्या स्त्रियांना जवळ केले. त्यांना या कामी रखमाबाईंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मोहिनी वर्दे यांनी `डॉ. रखमाबाई : एक आर्त' हे रखमाबाईंचे चरित्र लिहिले आहे. त्यातील उल्लेखानूसार रखमाबाई सूरतमधील रुग्णालयात सतरा अठरा तास काम करीत असत. तसेच दर शनिवारी आयरिश मिशनच्या दवाखान्यात मोफत वैद्यकीय सेवाकार्यही करीत असत. न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली सूरतमध्ये १९०७ साली अखिल भारतीय महिला परिषदेचे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनाच्या स्वागत समितीच्या चिटणीस होत्या रखमाबाई. १९१८मध्ये राजकोट येथील रसूलकालजी जनाना रुग्णालयामध्ये सौराष्ट्र व कच्छ प्रांताचे प्रमुख डॉक्टर म्हणून रखमाबाई यांची नेमणूक झाली. ितथेही त्यांनी महिलांच्या आरोग्याबद्दल खूप मुलभूत काम केले आहे. पहिले महायुद्ध सुरु असताना रेडक्रॉस सोसायटीतर्फे त्यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन रेडक्रॉस सोसायटीने त्यांना पदकही प्रदान केले होते. जनाना हॉस्पिटलला सरकारी अनुदान होते. भारतात केवळ रुग्णालय काढून भागत नाही तर तेथील लोकांना आरोग्यविषयक अधिक माहिती द्यायला लागते अशी त्यावेळची परिस्थिती होती. त्यावेळी पश्चिम भारताचे रेसिडेंट राजकोटमधे होते. त्यांना लंडनहून तार आली होती. त्यातील आदेशानूसार रेसिडेंटनी डॉ. रखमाबाईंना राजकोटच्या रुग्णालयात प्रथमोपचाराचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले. या प्रशिक्षण वर्गासाठी विद्यार्थीनी मिळणे कठीण होते. रखमाबाईंनी पहिली विद्यार्थीनी म्हणून विद्यालक्ष्मी या मुलीची तिच्या वडिलांच्या संमतीने निवड केली. या प्रशिक्षण वर्गासाठी महिला विद्यार्थीनी मिळणे कठीण होते. विद्यार्थीनींना लिहिण्या वाचण्यापासून सारे शिकवावे लागले. या प्रशिक्षण वर्गातल्या विद्यार्थीनी अभ्यासाच्या भितीने कालांतराने गळत गेल्या. एकट्या विद्यालक्ष्मीने हे प्रशिक्षण आठ महिन्यांत पूर्ण केले. पण या प्रशिक्षण वर्गामुळे बायकाही शिकू शकतात हा उत्तम संदेश राजकोट परिसरात गेला. १९२५मध्ये रखमाबाईंनी रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने बालकल्याण केंद्र सुरु केले. प्रथमोपचाराचे प्रशिक्षणवर्ग या केंद्राला जोडले. असे विविध प्रकारचे समाजकार्य रखमाबाईंनी अतिशय शांतपणे केले. कुठेही त्याचा गाजावाजा केला नाही. वयाच्या ६०व्या वर्षापर्यंत त्यांनी सरकारी नोकरी केली. त्यानंतर त्या निवृृत्तीचे आयुष्य मुंबईतील आपल्या निवासस्थानी समाधानाने घालविले.
निवृत्तीच्या काळात त्यांनी स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालविल्या. कामाठीपुऱ्यातील स्त्रियांसाठी अारोग्यविषयक व्याख्याने घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचं गावदेवीचे मंदिर सर्वांसाठी खुले केले. स्त्रियांना बँकांमध्ये खातं काढायला लावून बचतीचे महत्व पटवून दिले. वयाच्या ९१ वर्षी म्हणजे २५ डिसेंबर १९५५ रोजी डॉ. रखमाबाई राऊत यांचे निधन झाले.
गाजलेला रखमाबाई खटला
रखमाबाईंचे आजोबा हरिश्चंद्र यादवजी हे आधुनिक विचारांचे व इंग्रजी शिक्षण घेतलेले गृहस्थ होते. रखमाबाईंची आई जयंतीबाई वयाच्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर तिचा पुर्नविवाह डॉ. सखाराम अर्जून राऊत यांच्याशी लावून देण्यात पुढाकार घेतला तो हरिश्चंद्र यादवजी यांनीच. जयंतीबाईंना पहिल्या पतीपासून झालेली रखमाबाई ही सखाराम अर्जून राऊत यांनी दत्तक घेतली. डॉ. सखाराम अर्जून राऊत हेही पुर्नविवाहाच्या वेळी विधूर होते. रखमाबाई आता डाॅ. राऊत यांच्या घरी राहू लागल्या होत्या. रखमाबाईंचा अकराव्या वर्षी दादाजी भिकाजीशी विवाह झाला. त्यावेळच्या रुढीनंतर त्या विवाहोत्तर माहेरीच राहिल्या. दादाजींनी लग्नानंतर आठ वर्षांनी रमाबाईंना स्वत:च्या घरी बोलावले तेव्हा रखमाबाईची अापल्या सासरी राहायला जाण्याची इच्छा नव्हती. दादाजींनी काही दिवस वाट पाहून रखमाबाईला सासरी पाठवावे अशा आशयाची कायदेशीर नोटीस वकिलामार्फत डॉ. सखाराम अर्जून राऊतांना पाठविली. त्याला डाॅक्टरांनी उत्तरही पाठविले. मात्र तरीही रखमाबाई सासरी राहायला गेली नाही. तेव्हा दादाजींनी रेस्टिट्यूशन ऑफ कॉँजूगल राईट््स या कलमाखाली म्हणजे विवाह प्रस्थापित करण्यासाठी खटला भरला. दादाजी भिकाजी हा व्यसनी होता. त्याला स्वत:चे घर नसल्याने तो मामाकडे राहात होता. मामाची आर्थिक स्थितीही बेताचीच होती. दादाजी दमेकरी होता व मामावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून होता. दादाजीने दाखल केलेला खटला मुंबई उच्च न्यायालयात १८८४साली सुरु झाला. त्यावेळी हा खटला खूप गाजला. या खटल्याची देशभर खूप चर्चा झाली. रखमाबाईंच्या बाजूने सुधारक मंडळींपैकी न्या. रानडे, वामनराव मोडक, बी. एन. मलबारी, के. टी. तेलंग हे ठामपणे उभे राहिले तर सनातनी पक्षापैकी लोकमान्य टिळ‌क, झळकीकर शास्त्री यांनी रमाबाईंच्या भूमिकेवर कोरडे ओढले. रखमाबाई खटल्याची चर्चा त्याकाळी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही झाली होती. अखेर दादाजी भिकाजी व रखमाबाईंनी ५ जुलै रोजी आपसात कायदेशीर तडजोड करुन परस्परांपासून अलग झाले. या खटल्यानंतर रखमाबाईंनी आयुष्यात पुन्हा कधीही विवाह केला नाही. आपल्यामागे कोणीही काहीही चर्चा करायला नको म्हणून खाजगी पत्रव्यवहार व काही कागदपत्रे ही रखमाबाईंनी स्वहस्ते नष्ट करुन टाकली होती. रखमाबाई यांचे निधन होऊनही आता ६२ वर्षे झाली आहेत. डॉ. रखमाबाईं राऊत यांच्या जीवनावर गेल्या वर्षी डॉ. रखमाबाई हा मराठी चित्रपट तयार करण्यात आला असून त्याचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले आहे. हा चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा आहे. आता गुगलने डॉ. रखमाबाई राऊत यांच्या कार्याचे स्मरण ठेवून त्यांच्या जयंतीदिनी २२ नोव्हेंबरला त्यांचे गुगल डुडल केले ही घटना मनाला स्पर्शून जाणारी आहे.

No comments:

Post a Comment