Monday, November 27, 2017

प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, नीरजा यांच्यासह आठ मराठी लेखिकांच्या १६ कथांच्या इंग्रजी व हिंदी अनुवादाचा आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे महत्वपूर्ण प्रकल्प - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 7 नोव्हेंबर 2017

दै. दिव्य मराठीच्या दि. 7 नोव्हेंबर 2017 रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/07112017/0/4/
----
प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, नीरजा यांच्यासह आठ मराठी लेखिकांच्या 
१६ कथांच्या इंग्रजी व हिंदी अनुवादाचा आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे महत्वपूर्ण प्रकल्प
- मराठी लेखिकांचे साहित्य राष्ट्रीय स्तरावर जावे हा उद्देश
- अनुवादाची पुस्तके प्रकाशित करणार साहित्य अकादमी 
- प्रा. पुष्पा भावे व नीरजा यांनी केली कथांची निवड 
- समीर परांजपे
मुंबई, दि. 7 नोव्हेंबर - इंग्रजी, अन्य विदेशी भाषा तसेच भारतीय भाषांतील लेखिकांच्या कथा, कादंबऱ्या व अन्य साहित्य मराठीत अनुवादित होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र मराठी लेखिकांचे साहित्य इंग्रजी व अन्य भारतीय भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुवादित होत असल्याचे चित्र दिसत नाही. ही उणीव भरुन काढण्यासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राने प्रज्ञा दया पवार, प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, नीरजा यांच्यासह आठ मराठी लेखिकांच्या निवडक १६ कथांचा इंग्रजी व हिंदीमध्ये अनुवाद करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या कथांच्या अनुवादांची पुस्तके साहित्य अकादमी प्रकाशित करणार आहे.
मराठीतील समकालीन स्त्री-कथाकारांच्या कथांचे अनुवाद करून ते भारतीय पातळीवर हिंदी व इंग्रजीत प्रातिनिधिक संग्रहाच्या स्वरुपात प्रकाशित करता यावेत ज्यायोगे मराठीतील कथालेखिकांच्या लेखनाचा परिचय राष्ट्रीय स्तरावर व्हावा या उद्देशाने निवडक कथालेखिकांच्या कथा निवडण्यात आल्या. मेघना पेठे, प्रतिमा जोशी, प्रज्ञा दया पवार, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर, अभिनेत्री प्रिया तेंडुलकर, वंदना भागवत, मनस्विनी लता रवींद्र या आठ लेखिकांच्या निवडक कथा हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवादित होतील. या कथांची निवड प्रा. पुष्पा भावे आणि नीरजा यांनी केली आहे. 
या प्रकल्पासाठी कथा व अनुवादक निवडण्यासाठी व अनुवादाची प्रक्रिया ठरविण्यासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहकार्याने गेल्या २१ व २२ मार्च रोजी माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातील अनुवाद सुविधा केंद्रात एक कार्यशाळा आयोजित केली होती. या अनुवाद कार्यशाळेत मराठी लेखिकांच्या कथांच्या अनुवाद-प्रकल्पावर प्राथमिक पण सखोल चर्चा झाली. परस्पर परिचय आणि पहिल्या टप्प्याचं काम सुरु करणं हा त्यामागचा उद्देश सफल झाला असं वाटतं. कथांच्या भाषांतरांबाबत सविस्तर चर्चा होऊन सोळा भाषांतरांचे वाटप झाले. सदर प्रकल्पाचे समन्वयन करण्याची जबाबदारी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे गणेश विसपुते यांनी स्वीकारली. आता येत्या डिसेंबर महिन्यात आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र साहित्य अकादमीच्या सहकार्याने एक चर्चासत्र आयोजिणार आहे. त्यात या कथांच्या केलेल्या अनुवादावर प्रदीर्घ चर्चा करण्यात येईल. प्रांतिक संदर्भ, संस्कृतीची वैशिष्ट्ये त्या मराठी कथेचा हिंदी व इंग्रजीत अनुवाद करताना योग्य रितीने उतरली आहेत का याचाही धांडोळा या चर्चासत्रात घेतला जाईल. सांगोपांग चर्चेनंतरच या आठही लेखिकांच्या कथांचे हिंदी व इंग्रजी अनुवाद साहित्य अकादमीकडे प्रकाशित करण्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहेत. केवळ हिंदी व इंग्रजीच नव्हे तर अन्य भारतीय भाषांमध्येही मराठी लेखिकांच्या कथांचे अनुवाद व्हायला हवेत यासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र प्रयत्नशील आहे. 
या आहेत आठ मराठी लेखिकांच्या अनुवादित होणाऱ्या कथा
ज्या आठ मराठी लेखिकांच्या कथा इंग्रजीतून अनुवादित होणार आहेत त्या लेखिकेचे नाव, तिची कथा व अनुवादकाचे नाव यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. (१) मूळ लेिखका - मेघना पेठे - कथेचे नाव - `समुद्री चोहीकडे पाणी' (२) प्रतिमा जोशी - `जहन्नम' (३) प्रज्ञा दया पवार - `पेडिक्युअर', `तिघाडा' या दोन कथा (४) नीरजा - `श्रीकांत विनायक' या कथांचा इंग्रजी अनुवाद माया पंडित-नारकर या करणार आहेत. मेघना पेठेची अजून एक कथा `आस्था आणि गवारीची भाजी', मोनिका गजेंद्रगडकर यांच्या दोन कथा `आधार', `श्रद्धा' यांचा अनुवाद प्रदीप देशपांडे करतील. अभिनेत्री प्रिया तेंडुलकर हिची कथा `लग्न', वंदना भागवत यांच्या कथा `काफ्का, कामूज...', `शिट्टी' यांचा इंग्रजी अनुवाद ललिता परांजपे करणार आहेत. प्रिया तेंडुलकर यांची कथा `मा', प्रतिमा जोशी यांची कथा `नारिलता' यांचा इंग्रजी अनुवाद वंदना भागवत करतील. मनस्विनी लता रवींद्र यांच्या दोन कथा, नीरजा यांची `रत्नप्रभा जाधव वर्तमानपत्रातील बातमी होते तेव्हा' ही कथा यांचा इंग्रजी अनुवाद केट शॅलेट करतील. या आठही लेखिकांच्या १६ मराठी कथांचा हिंदी अनुवाद डॉ. दामोदर खडसे, प्रकाश भातंब्रेकर, रेखा देशपांडे आणि सुलभा कोरे हे मान्यवर करत आहेत.

No comments:

Post a Comment