Monday, November 27, 2017

फटकळ नाना पाटेकरने अनेकदा घेतलाय `ठाकरेंशी' पंगा ! - - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 6 नोव्हेंबर 2017


दै. दिव्य मराठीच्या दि. 6 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. त्या बातमीची जेपीजी फाइल, वेबपेज लिंक व मजकूर पुढे दिला आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/sol…/…/06112017/0/3/
---
फटकळ नाना पाटेकरने अनेकदा घेतलाय `ठाकरेंशी' पंगा !
--
- समीर परांजपे
मुंबई, दि. 6 नोव्हेंबर - फेरीवाल्यांना मारहाण करणे चुकीचे आहे असे मत व्यक्त केल्यामुळे प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बरसले. दोघेही मनस्वी व परखड बोलणारे असल्याने त्यांच्यातील वादाचा खूप धुरळा उडाला आहे. नाना पाटेकरने आपल्याला खटकणाऱ्या गोष्टींवर नेहमीच मतप्रदर्शन करुन ठाकरे कुटुंबियांशी पंगा घेतला आहे व वादही ओढवून घेतले आहेत. राज ठाकरे यांच्याशी गेल्या काही वर्षांत नानाचा झालेला हा दुसरा वादाचा प्रसंग आहे.
प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असून त्यासाठी अन्न मिळविणे हे महत्वाचे असते. त्यासाठी काम करावे लागते. रस्त्यांवरील फेरीवाले हे अशा कष्टकऱ्यांपैकी असून, मोलमजुरी करुन ते आपली रोजीरोटी मिळवत असल्याने त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे असे मत नाना पाटेकर यांनी ३ नोव्हेंबर रोजी माटुंगा येथील व्हीजेटीआय कॉलेजच्या टेक्नोव्हॅन्झा फेस्टिव्हलमध्ये व्यक्त केले. त्यावर ४ नोव्हेंबर रोजी वांद्रे येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नाना पाटेकरवर जोरदार टीका करताना म्हटले की, ज्या गोष्टीची माहिती नसेल त्यात नाना पाटेकर यांनी चोंबडेपणा करु नये. ते उत्तम अभिनेते आहेत, पण रस्त्यावर काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दात राज ठाकरेंनी त्यांना सुनावले आहे. नाना पाटेकरने थेट मनसेने फेरीवाल्यांवर छेडलेल्या आंदोलनाविरोधात निशाणा साधल्याने राज ठाकरे प्रचंड दुखावले गेले आहेत.
नाना पाटेकर व राज ठाकरे यांच्यात आधी म्हणजे २०११ सालीही वाद झाला होता. विलेपार्ले येथील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी नाना पाटेकर यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक विधान केले होते. मराठी माणसाच्या भल्यासाठी राज व उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र यावे अशा पाटेकर यांनी केलेल्या विधानावर राज ठाकरे यांनी असे प्रत्युत्तर दिले होते की, नानाने नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये. मात्र हा वाद वाढणार नाही असे राज व नाना पाटेकर या दोघांनीही कटाक्षाने पाहिले. राज ठाकरे दरवर्षी नाना पाटेकर यांच्या घरी गणेशोत्सवासाठी जातातच पण २०११ साली नाना पाटेकर यांच्या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे नाना पाटेकर यांच्या माटुंग्यातील घरी गणपती दर्शनासाठी गेले व त्यानंतर वादावर कायमचा पडदा पडला होता. २०११ साली नानाने `खुपसलेले नाक' व २०१७ साली नानाने केलेला `चोंबडेपणा' राज ठाकरे यांच्या नक्कीच जिव्हारी लागला आहे!
राज व उद्धव यांनी एकत्र यावे असे विधान करुन वाद ओढविल्यानंतरही गप्प बसेल तो नाना पाटेकर कुठला? तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक झाली त्यावेळीही नाना पाटेकर यांनी राज व उद्धवबद्दल आपली मते पुन्हा मांडलीच. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव व राज ठाकरे हे दोघे बंधू नक्कीच एकत्र येतील असे मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी ८ ऑक्टोबर २०१४ रोजी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात व्यक्त केले होते. नाना पाटेकर म्हणाले होते की, राज आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र यावे अशी माझी पहिल्यापासून मनोमन इच्छा आहे. पण ते एकत्र येत नव्हते. पण सध्या जी राजकीय स्थिती तयार झाली आहे त्यामुळे ते एकत्र येतील असे मला १०० टक्के नव्हे तर ३०० टक्के वाटते. दोघेही समंजस आहेत. पण त्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या होत्या. या दोघांतील कोण ऐकत नाही हे सांगणे कठीण आहे, कारण ऐकतील ते ठाकरे कसले? अशी फटकेबाजी नानाने केली. त्यावेळी नाना पाटेकर यांच्या वक्तव्यावर राज व उद्धव ठाकरे यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. 
नाना पाटेकर हा बाळासाहेब ठाकरे यांना मानायचा. ठाकरे यांचा मुलगा बिंदुमाधवने निर्मिलेल्या अग्निसाक्षी या चित्रपटात नानाने भूमिकाही केली होती. 1996च्या सुमारास ठाणे येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत नाना पाटेकर शिवसेनेच्या व्यासपीठावरही गेला होता. हा स्नेहबंध असला तरी फटकळ नानाने शिवसेनेलाही वेळोवेळी अंगावर घेतलेच.
उद्धव व नाना यांच्यात एकदाच झाला होता वाद
उद्धव ठाकरे व नाना पाटेकर यांच्यात कधी फारसे वाद झडले नाहीत. पण शिवेसेनेच्या कार्यशैलीबद्दल नानाने चार वर्षांपूर्वी टीका करणारे एक विधान केले होते त्यावेळी मच्छराने फार भुणभुण करु नये अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला होता. 
बाळासाहेब ठाकरे यांनाही सुनावले होते खडे बोल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्यामध्ये झालेल्या वादंगाने १९९६मध्ये महाराष्ट्र ढवळून निघाला होता. शिवसेना-भाजप युती महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार सुरू केला होता. पुलंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय युती सरकारने घेतला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या समारंभात महाराष्ट्राच्या त्या वेळच्या भयग्रस्त वातावरणाबद्दल व सामान्य माणसांच्या होलपटीबद्दल पु. ल. देशपांडे यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली होती व शिवसेना-भाजप सरकारवर टीका केली होती. पु.ल. देशपांडे यांची टीका जिव्हारी लागलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘झक मारली आणि यांना (पु. ल.)पुरस्कार दिला. हे पु. ल. की मोडका पुल’ अशी अभिरुचीहीन शाब्दिक कोटी शिवसेनाप्रमुखांनी केली होती. पुलंबद्दल अपशब्द बोलल्यामुळे शिवसेनाप्रमुखांवर टीका होत असताना त्याचसंदर्बात नाना पाटेकरही बरसला होता की, बाळासाहेब वेळीच जागे व्हा, अन्यथा एक दिवस लक्षात येईल की आपल्या मागे रांगेत एकही जण उरलेला नसेल...' नानाच्या या वक्तव्याने त्यावेळी शिवसेनाप्रमुख खूप चिडले होते. दुसऱ्या दिवशी नाना पाटेकरला त्यांनी मातोश्रीवर बोलावून घेतले व दोघांत दिलजमाई झाली.

No comments:

Post a Comment