Monday, November 27, 2017

न्यूडचा इप्फीमध्ये पुन्हा समावेश केल्यास २० नोव्हेंबरला तो चित्रपट दाखविण्यासाठी मी तयार - रवि जाधव - मुलाखतकार - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 15 नोव्हेंबर 2017

दै. दिव्य मराठीच्या दि. 15 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी घेतलेली प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक रवि जाधव यांची मुलाखत. त्या मुलाखतीचा मजकूर, जेपीजी फाइल व वेबपेज लिंक पुढे दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/15112017/0/6/
---
न्यूडचा इप्फीमध्ये पुन्हा समावेश केल्यास २० नोव्हेंबरला तो चित्रपट दाखविण्यासाठी मी तयार - रवि जाधव
- समीर परांजपे
मुंबई, दि. १४ नोव्हेंबर
प्रश्न - `न्यूड' व एस दूर्गा चित्रपट इफ्फीच्या इंडियन पॅनोरमातून वगळले गेल्याने चित्रपटसृष्टीत नाराजी असून सुजॉय घोष यांनी आज इप्फीच्या ज्युरी प्रमुखपदाचा राजीनामा दिला. सुमित्रा भावे यांनी कासव चित्रपट इफ्फीत न दाखविता तो माघारी बोलाविण्याचा निर्णय घेतला. त्या आता महोत्सवाला उपस्थितही राहाणार नाहीत. या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटते?
न्यूड चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव - गोवा येथे आयोजिण्यात आलेल्या ४८व्या इफ्फी महोत्सवातील इंडियन पॅनोरमासाठी न्यूड व एस दूर्गा चित्रपट निवडण्यात आले होते. न्यूड हा चित्रपट तर महोत्सवातील शुभारंभाच्या चित्रपटांमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरले होते. मुळात इफ्फीची प्रक्रिया लक्षात घ्या. इफ्फी महोत्सव आयोजित करण्याच्या तीन महिने आधी ज्यांना या महोत्सवात आपले चित्रपट पाठवायचे आहेत ते इच्छुक लोक संबंधित फॉर्म भरतात. त्या फॉर्मबरोबर महोत्सवाच्या ज्युरी मंडळींसाठी आपल्या चित्रपटाची स्क्रीनर डीव्हीडी पाठवतात. या स्क्रीनर डीव्हीडीमध्ये ९५ टक्के शूट झालेला चित्रपट असतो. त्यावरुन नेमका चित्रपट काय आहे याची ज्युरीना प्राथमिक कल्पना येण्यास मदत होते. न्यूड या मराठी चित्रपटाची अशीच स्क्रीनर डीव्हीडी आम्ही इफ्फीसाठी पाठविलेली होती. त्यानंतर उरलेल्या पाच टक्के भागाचे चित्रीकरणही पूर्ण केले होते. हा चित्रपट बघण्याची इच्छा ज्युरींनी प्रदर्शित केल्यानंतर त्यांना मग फायनल प्रिंट पाठविली जाते. त्याप्रमाणे ज्युरींना तो चित्रपट दाखविला गेला. इफ्फी किंवा कोणत्याही महोत्सवात एखाद्या चित्रपटाची प्रवेशिका पाठविताना त्याला सेन्सॉर प्रमाणपत्र हवे अशी काही अट नसते. न्यूड चित्रपट इफ्फीमध्ये दाखविला जाणार नाही असे आता स्पष्ट झाल्यानंतर आम्ही न्यूड या चित्रपटाच्या सार्वत्रिक प्रदर्शनाच्या तयारीला लागलो आहोत. त्यासाठी हा चित्रपट सेन्सॉरकडून संमत करुन घेण्याची तयारीही सुरु केली आहे.
ज्युरींना अंधारात ठेवून केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने न्यूड व एस. दूर्गा या चित्रपटांना वगळण्याचा निर्णय घेतला असे तुम्हाला वाटते का?
रवि जाधव - हो. अगदी तसेच झाले आहे. इफ्फीमध्ये दाखविण्यासाठी विविध भाषांतील चित्रपट निवडण्याकरिता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ज्युरींची समिती नेमली होती. या महोत्सवासाठी ज्या चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या ते सारे चित्रपट बारकाईने पाहून ज्युरींनी त्यातील जे चित्रपट निवडले त्याची यादी केंद्र सरकारला कळविली होती. निवडलेल्या चित्रपटांची यादी ज्युरींनी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडे गेल्या सप्टेंबर महिन्यात पाठविली होती. इफ्फीसारख्या महोत्सवांमध्ये ज्युरी जे निर्णय घेतात तो अंतिम मानला जातो. या निर्णयात काही बदल करावे असे केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याला वाटत असेल तर त्यांनी ज्युरींशी त्याबाबत चर्चा करणे हे नियमांनूसार बंधनकारक आहे. मात्र या नियमांना बगल देत व ज्युरींना अंधारात ठेवून केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने इंडियन पॅनोरामा विभागातून न्यूड व एस दूर्गा हे चित्रपट वगळण्याचा निर्णय परस्पर घेतला. त्यामुळे ज्युरींना आपला अपमान झाला असे वाटणे साहजिकच आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याच्या या वर्तनाचा निषेध म्हणूनच सुजॉय घोष यांनी इप्फीच्या ज्युरी प्रमुखपदाचा राजीनामा दिला. मी खात्रीने सांगतो की माहिती व प्रसारण खात्याच्या माणसांनी न्यूड किंवा एस दूर्गा हे चित्रपट बघितलेलेच नाहीत. त्यांनी या चित्रपटांची नावे पाहून हे सगळे वरवरचे निर्णय घेतले आहेत. न्यूड चित्रपट इफ्फीतून वगळला हे ज्युरींपैकी एकाने वर्तमानपत्रात लेख लिहिला म्हणून जगाला कळले. नाहीतर ही वस्तुस्थिती इतक्या लवकर समोर आलीही नसती. दुसरी गोष्ट न्यूड चित्रपट इप्फीतून वगळला आहे असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने मला क‌ळविणे आवश्यक होते. पण तसा साधा निरोप किंवा इ-मेल मला आजतागायत आलेला नाही. समजा उद्या केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मत बदलले व त्यांनी न्यूड चित्रपटाचा पुन्हा महोत्सवात समावेश केला तर येत्या २० नोव्हेंबरला या फेस्टिवलमध्ये जे शुभारंभाचे म्हणून चित्रपट दाखविण्यात येतील त्यात न्यूड हा चित्रपट प्रदर्शित करण्याची माझी पूर्ण तयारी आहे. तशी फायनल प्रिंटही माझ्याकडे तयार आहे.
ज्युरी हे कोणत्याही चित्रपट महोत्सवांमधे खूप महत्वाचे असतात. त्यात विविध विचारसरणींचे लोक असतात. पण त्यांचे लक्ष हे चित्रपटाच्या गुणवत्तेवर केंद्रित असते. त्या अंगांचा विचार करुनच त्या चित्रपटांची निवड महोत्सवासाठी झालेली असते. अशा ज्युरींना अंधारात ठेवणे हा त्यांचा अपमान आहे. तो केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून झाला आहे. त्यामुळेच चित्रपटसृष्टीतील मंडळी नाराज झाली आहेत. बाकी काहीही विषय नाही

No comments:

Post a Comment