Friday, July 7, 2017

हृदयस्पर्शी हृदयांतर - दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी दि. 6 जुलै 2017 केलेले परीक्षण - समीर परांजपे

दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी मी दि. 6 जुलै 2017 रोजी केलेल्या हृदयांतर या चित्रपटाचे परीक्षण. त्याची वेबलिंक व मुळ मजकूर इथे दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-REV-REV-movie-review-…
---
हृदयस्पर्शी हृदयांतर
---
- समीर परांजपे
---
चित्रपट - हृदयांतर
--
रेटिंग - ४.५ स्टार
--
कलावंत - सुबोध भावे, मुक्ता बर्वे, अतुल परचुरे, मीना नाईक, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य, सोनाली खरे, मेहेर आचरिया, विशाखा सुभेदार, अमोल बावडेकर
निर्माता - यंग बेरी एन्टरटेनमेन्ट, इम्तियाझ खत्री, विक्रम फडणीस प्रॉडक्शन
कथा, दिग्दर्शक - विक्रम फडणीस
संवाद – रोहिणी निनावे
संगीत दिग्दर्शक – प्रफुल कार्लेकर
श्रेणी - कौटुंबिक चित्रपट
--
`आनंद मरा नही, आनंद कभी मरते नही' हा संवाद नेहमी आठवत राहातो जेव्हा जेव्हा आनंद चित्रपटाची आठवण होते. लिम्फोमा म्हणजे आतड्याचा दुर्मिळ प्रकारचा कर्करोग झालेला नायक म्हणजे आनंद. दु:खाची सावली मनावर चुकूनही पडू न देता तो आपले उरलेसुरले आयुष्य ज्या आनंदात घालवतो व इतरांना आनंदी ठेवतो ते स्नेहक्षण दाखविणारा हा चित्रपट. आनंदची याद पुढे शाहरुखच्या कल हो ना हो
या चित्रपटाने वेगळ्या प्रकारे दिली. त्यातील शाहरुखने साकारलेला अमन हा नायक हृदयविकाराने ग्रस्त असतो. तोही फार जगणार नसतो. पण तोही साऱ्यांना सरतेशेवटी आनंदच देऊन जातो. यासारख्या चित्रपटांची प्रेरणा घेऊन नव्हे तर कुठेतरी नाळ जु‌ळत असलेली कथा आहे ती म्हणजे हृदयांतर चित्रपटाची. इथे रक्ताचा कर्करोगाने ग्रस्त आहे अकरा वर्षांची एक मुलगी नित्या. तिला आनंद देण्यासाठी तिचे आई-बाबा, लहान बहिण व सगेसोयरे जी धडपड करतात त्याची कथा हृदयांतर चित्रपटात मांडणी आहे.
कथा - शेखर जोशी हा सुस्थापित तरुण. हॉटेलिंगच्या क्षेत्रातील उच्च पदावरच्या नोकरीत त्याने उत्तम जम बसवलेला असतो. त्याच्या कर्तबगारीमुळे हॉटेलिंग क्षेत्रामध्ये त्याचे नाव अदबीने घेतले जात असते. त्याची पत्नी समायरा ही एका जाहिरात संस्थेमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करीत असते. दोघांच्याही लग्नाला १२ वर्षांहून अधिक काळ उलटून गेलेला आहे. त्यांचे अॅरेंज मॅरेज झाले आहे. या दोघांना दोन मुली आहेत. त्यापैकी एक म्हणजे नित्या व दुसरी आहे नैशा. नित्याला नृत्याची खूप आवड असते तर नैशाला स्पोर्ट््स खूप आवडते. शेखर हा त्याच्या नोकरीत, त्याच्या कामात सतत बुडालेला असतो. त्याला आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ होत नाही. त्यामुळे या गोष्टी जाणीव त्याची पत्नी समायरा त्याला सातत्याने करुन देते. संसार व मुलांना सांभाळणे ही फक्त माझीच जबाबदारी नाही, वडील म्हणून शेखरनेही ही जबाबदारी उचलली पाहिजे असे ती त्याला सांगते. नेमके याच गोष्टीवरुन त्यांचे खटके उडत असतात. कधी आपल्या मुलींसमोर, तर कधी त्यांच्या मागे. याचा परिणाम एकच होतो ते म्हणजे त्यांच्यात बेबनाव सुरु होते. त्यांच्यातील संवाद तुटक होतो. आपण एकमेकांना आता नकोसे झालो आहोत ही भावना दोघांमध्येही बळावते. त्यातून ते परस्परांपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. हे सारे होत असताना दुसऱ्या बाजूला नियती तिचा वेगळाच डाव मांडते. शेखर व समायरा यांची मोठी मुलगी नित्या हिला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान वैद्यकीय तपासणीतून होते. त्यामुळे शेखर, समायरा व त्यांच्या दोन मुली यांचे सारे आयुष्यच बदलून जाते. कॅन्सरग्रस्त लहानग्या नित्याला सावरण्यासाठी, तिला कधी एकटे वाटू नये म्हणून शेखर व समायरा मन घट्ट करुन आपल्या मुलींची घट्ट सावली बनतात. दरम्यान या दोघांतील घटस्फोटाला कायदेशीर मंजूरी मिळालेली असते. रक्ताचा कर्करोग झालेली नित्या ही या आजारातून वाचते का? आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणारे शेखर व समायरा हे परस्परांपासून कायमचे वेगळे होतात का? आपल्या आजारी मुलीला आनंदी ठेवण्यासाठी शेखर व समायरा नेमके काय काय करतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर हृदयांतर हा चित्रपट पाहायलाच हवा.
अभिनय - रक्ताचा कर्करोग झालेल्या लहानग्या मुलीची म्हणजे नित्याची भूमिका तृष्णिका शिंदे हिने ज्या समंजसपणे साकारली आहे तिला तोड नाही. तिला असलेली नृत्याची आवड ती तिच्या पदलालित्यातून जशी दाखविते तसेच कर्करोग जसजसा बळावत जातो तसतसे तिच्या वागण्यातील सुक्ष्म बदल हे देखील तृष्णिका शिंदे हिने गहिरेपणाने दाखविले आहे. तिची लहान बहिण नायशा हे पात्र साकारणारी निष्ठा वैद्य हिनेही तृष्णिकाला उत्तम साथ दिली आहे. खरेतर या चित्रपटाची खरी नायिका नित्याच आहे. सारा चित्रपट ती व तिच्या आजारपणाभोवती फिरतो. नित्या व नायशा या दोन मुलींच्या आईवडिलांची भूमिका मुक्ता बर्वे व सुबोध भावे यांनी केली आहे. या मुलींची आई समायरा ही आपल्या नवऱ्याविषयीच्या अपेक्षा व्यक्त करताना अत्यंत कणखर दाखविली आहे. तिला स्वत:च्या अस्तित्वाची नीट जाणीव आहे. त्यामुळे ती प्रसंगी आपल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याची मानसिक तयारी करते. या साऱ्या छटा मुक्ता बर्वे हिने अप्रतिम रेखाटल्या आहेत. ती एक चतुरस्र अभिनेत्री आहे हे तिने या चित्रपटातून पुन्हा एकदा दाखवून िदले आहे. शेखर हा भावनाशून्य माणूस नाही पण कामामध्ये स्वत:ला पूर्ण बुडवून घेतल्याने तो आपल्या संसाराविषयी कोरडा बनला आहे. त्याचे हे वागणे सुबोध भावे याने अचूक रंगविले आहे. नित्या हिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे कळताच समायरा व शेखरमध्ये जे बदल घडतात ते परिवर्तन हा या चित्रपटाच्या कथेचा अजून एक महत्वाचा भाग. जो उत्तमरितीने सुबोध व मुक्ताने वठविला आहे. या चित्रपटात प्रख्यात नृत्यदिग्दर्शक शामक दावर तसेच प्रख्यात अभिनेता हृतिक रोशन हे पाहुणे कलाकार म्हणून झळकले आहेत. नित्याही क्रिशची फॅन असते. क्रिशची भूमिका केलेला हृतिक रोशन जेव्हा कॅन्सरग्रस्त नित्याला भेटतो तेव्हाची दृश्ये ही विलक्षण बोलकी चित्रीत झाली आहेत. अतुल परचुरे, मीना नाईक यासारख्या इतर सहकलाकारांनी नित्या, नायशा, शेखर व समायरा या चार मुख्य पात्रांना उत्तम अभिनयसाथ दिली आहे.
दिग्दर्शन - विक्रम फडणीस हा मुळात प्रख्यात फॅशन डिझायनर. त्याचे बॉलिवूडमध्ये उत्तम बस्तान बसलेले असताना त्याने मराठी चित्रपटसृष्टीत येऊन आपला पहिलावहिला चित्रपट दिग्दर्शित करावा व सिक्सर मारावी अशी अवस्था झाली आहे. मराठी कुटुंबातील अनुबंध, तणाव या सगळ्या गोष्टींचे भान राखत विक्रमने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. कॅन्सरग्रस्त मुलीच्या अायुष्याची कथा मांडताना तिच्या आईवडिलांच्या संसाराचे चित्रही विक्रम फडणीसने फार विचारपूर्वक रेखाटलेले आहे. त्यामुळे चित्रपटातील एकही दृश्य खोटे वाटत नाही. विक्रम फडणीसच्या दिग्दर्शनातील मॅच्युरिटी त्याच्याच कथेतही दिसते. त्याने या चित्रपटाची कथा १३ वर्षांपूर्वीच तयार केली होती. त्याचे आईवडिल डॉक्टर असल्याने त्यांच्याकडून रक्ताच्या कर्करोगाविषयी सग‌ळी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यानंतरच तो चित्रपट बनविण्यासाठी मैदानात उतरला. त्यामुळे चित्रपटाच्या कथेला वास्तवाची एक किनारही मिळाली आहे. विक्रम फडणीस भविष्यात कोणते मराठी व हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणार याची चर्चाही हृदयांतरच्या निमित्ताने होऊ लागली आहे. 
संगीत - या चित्रपटात संगीतकार प्रफुल्ला कार्लेकर यांनी संगीत दिलेली गाणी श्रवणीय आहेत. या चित्रपटातील गाणी मंदार चोळेकर यांनी लिहिली असून त्यातील गाण्यांपैकी दोन गाण्यांच्या चाली उत्तम आहेत.

No comments:

Post a Comment