Friday, July 7, 2017

बहुपेडी व्यक्तिमत्वाचे `मामा' तोरडमल! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी ४ जुलै २०१७




दै. दिव्य मराठीच्या ४ जुलै २०१७च्या अंकात संपादकीय पानावर ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांच्यावर मी लिहिलेला व प्रसिद्ध झालेला लेख. त्या लेखाची जेपीजी फाइल, वेबपेज लिंक व मुळ लेखाचे टेक्स्ट सोबत देत आहे. 
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/ahm…/…/04072017/0/6/
---
बहुपेडी व्यक्तिमत्वाचे `मामा' तोरडमल!
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
इन्ट्रो - प्रा. मधुकर तोरडमल हे नाटककार होते. ते अभिनेते होते. ते दिग्दर्शकही होते. त्यामुळे आपणच लिहिलेल्या शब्दांना अभिनयाचे रुपडे कसे चढवायचे याची उत्तम जाण त्यांना होती. वस्तुनिष्ठ विनोदापेक्षा शाब्दिक विनोद हा त्यांचा अतिशय आवडता होता. त्याचे दर्शन त्यांच्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकातही दिसते.
---
त्र्यंबक सीताराम कारखानीस, नाना जोगळेकर, केशवराव दाते यांच्यासारख्या सुशिक्षित नटांनी नाट्यसृष्टीत प्रवेश करुन मराठी रंगभूमीला एक उत्तम वळण दिले. त्यानंतर समाजातील अनेक घटकांची मराठी रंगभूमीकडे बघण्याची नजर अधिक स्वच्छ झाली. मराठी रंगभूमी, चित्रपटांत डाॅ. श्रीराम लागू, डॉ. जब्बार पटेल यांच्यासारखे अभिनेते, दिग्दर्शक कालांतराने आपला पूर्णवेळचा व्यवसाय म्हणून सक्रिय झाले. विविध शाखांतले उच्चशिक्षित त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिकांकडे वळू लागले व ती अप्रुपाची गोष्ट राहिली नाही. 
प्राध्यापक मंडळींपैकी भालचंद्र वामन केळकर उर्फ भालबा केळकर हे नाट्य अभिनेते, मराठी लेखक व पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी पुण्यामध्ये प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन स्थापन केली होती. भालबा केळकरांप्रमाणेच मधुकर तोरडमल हे देखील प्राध्यापक होते. अहमदनगर येथील एका महाविद्यालयात ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. प्राध्यापकी करत असताना त्यांच्यात रंगकर्मी कधीही स्वस्थ बसलेला नव्हता. त्यांनी या काळात सैनिक नावाचा माणूस व भोवरा यासारखी नाटके केली होती. राज्य नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी नाटक सादर करण्याची सुरुवात नेमकी याच काळात झाली. तेव्हापासून त्यांच्या नावाची दखल मराठी व्यावसायिक रंगभूमीवर घेतली जात होती. पण व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी प्रवेश कधी करायचा याचा नेमका मुहूर्त ठरत नव्हता. मधुकर तोरडमल यांनी `तिसरी घंटा' या आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, त्यांना मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पूर्णवेळ सक्रिय होण्याची आस लागलेली होती. प्राध्यापकीची नोकरी सोडून त्यांनी हे जेव्हा धाडस करायचे ठरविले तेव्हा अहमदनगरच्या महाविद्यालयाचे प्राचार्य थॉमस त्यांना असे म्हणाले की, ` तू अवश्य जा. एक वर्षभराचा काळ स्वत:साठी घे. या कालावधीत तुला नाटकांमध्ये स्थिरावता नाही आले तर पुन्हा खुशाल महाविद्यालयात परत ये. तु इथे पुन्हा येऊन शिकवू शकतोस.' प्राचार्यांनी हा दिलासा दिल्याने मधुकर तोरडमल आश्वस्त झाले. कारखानीस, नाना जोगळेकर, केशवराव दाते यांसारख्या सुशिक्षित नटांमुळे मराठी रंगभूमीची प्रतिमा अधिक उजळ झाली होती, त्यामुळेच त्यांच्या नंतरच्या पिढीतील मधुकर तोरडमल यांच्यासारख्या सुशिक्षितांना अभिनय हा पूर्णवेळचा व्यवसाय करण्यासाठी समाजातून प्रोत्साहन मिळाले हे सत्य नाकारता येणार नाही.
मधुकर तोरडमल हे निव्वळ अभिनेते नव्हते. ते इंग्रजीचे प्राध्यापक असल्याने जगभरातील उत्तम इंग्रजी साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. जगभरातील नाट्यक्षेत्रामध्ये कोणकोणते नवीन प्रवाह येत आहेत, त्यातील कोणते प्रवाह मराठी रंगभूमीवर आले आहेत किंवा आणल्यास ते प्रेक्षक व कलाकारांसाठीही लाभदायी ठरेल याची अचूक जाण तोरडमल यांना होती. तोरडमल यांचा वाचनाचा व्यासंग अफाट होता. चरित्रे, आत्मचरित्रे, कादंबऱ्या यांच्याबरोबरच अगाथा ख्रिस्तीच्या रहस्यमयी कादंबऱ्या असा त्यांचा वाचनविस्तार होता. त्यामुळेच तर तोरडमल पुढील काळात अगाथा ख्रिस्तीच्या २७ कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करते झाले होते. विविध ज्ञानशाखांतले अमृतकण ते आनंदाने वेचत असत. त्यांच्याशी गप्पा मारताना ते नेहमी जाणवत असे. त्यांचा स्वभाव गंभीर होता. व्यक्तिमत्व करारी वाटावे असे होते. बोलणे काटेकोर, वेळेला व शब्दाला पक्के असणारे. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना लोक काहीसे वचकूनच बोलत. परंतू ज्यांच्याशी त्यांची गट्टी जमली की मग त्यांच्या इतका विनोदी, खेळकर माणूस दुसरा कोणी नसायचा. मधुकर तोरडमल हे नाटककार होते. ते अभिनेते होते. ते दिग्दर्शकही होते. त्यामुळे आपणच लिहिलेल्या शब्दांना अभिनयाचे रुपडे कसे चढवायचे याची उत्तम जाण त्यांना होती. वस्तुनिष्ठ विनोदापेक्षा शाब्दिक विनोद हा त्यांचा अतिशय आवडता. त्यामुळेच त्यांनी जेव्हा `तरुण तुर्क म्हातारे अर्क' हे नाटक लिहिले, दिग्दर्शित केले व त्यात प्रा. बारटक्के ही तुफानी भूमिका केली त्यावेळी त्यांनी या पात्राचे संवाद लिहिताना शाब्दिक विनोदावरच अधिक भर दिला होता. इरसाल वृत्तीचे प्रो. बारटक्के ह...बाराखडीच्या भाषेत जेव्हा आपले संवाद म्हणत त्यावेळी पोट दुखेपर्यंत हसण्याशिवाय प्रेक्षकांना पर्याय नसे. कोणीतरी शहाण्याने हे संवाद द्वयअर्थी वाटतात अशी आवई उठविली. सभ्य स्त्री-पुरुषांनी या नाटकाला जाऊ नये असे एका नाट्यसमीक्षकाने लिहिले. त्याचा परिणाम मात्र उलटा झाला. तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक तुफान चालले. अगदी त्याचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले. या नाटकावर नंतर कोणीही द्वयअर्थी असण्याचा ठप्पा मारला नाही. तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकामुळे मराठी प्रेक्षकांच्या विनोदबुद्धीचा स्तर वाढण्यास मदतच झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 
मधुकर तोरडमल यांच्या रंगभूमीवरील प्रारंभीच्या दिवसांत त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘एक होता म्हातारा’ या नाटकामध्ये ते ब‌ळीमामाची भूमिका करायचे. त्यामुळे त्यानंतर त्यांना मामा हीच उपाधी मिळाली. मराठी रंगभूमीवर मामा बिरुदावली मिळालेले मामा वरेरकर, मामा पेंडसे, मधुकर म्हणजे मामा तोरडमल व नंतरच्या काळात अशोक सराफ असे काही दिग्गज आहेत. या सगळ्या मामा लोकांनी मराठी रंगभूमी, चित्रपटांना विविध अंगाने समृद्ध करण्याचे काम केले आहे. तोरडमलांनाही आपल्या लोक मामा या नावाने हाक मारतात हे प्रिय होते. तिसरी घंटा हे आत्मचरित्र लिहिल्यानंतरही त्यांना आपल्या उत्तरायुष्यातील अजून काही आठवणी सांगायच्या होत्या. त्या त्यांनी `उत्तरमामायण' या पुस्तकात सांगितल्या आहेत. 
मधुकर तोरडमल यांनी रसिकरंजन नावाची नाट्यसंस्थाही स्थापन केली होती. त्याद्वारे त्यांनी त्यांची काही नाटके सादर केलेली आहेत. आश्चर्य नंबर दहा, ऋणानुबंध, काळे बेट लाल बत्ती, क्रांती, गुड बाय डॉक्टर, झुंज, तरुण तुर्क म्हातारे अर्क, बाप बिलंदर बेटा कलंदर, भोवरा, मृगतृष्णा, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, संघर्ष, सैनिक नावाचा माणूस यासारखी नाटके लिहून त्यांनी आपल्यातील नाटककाराला सतत जागे ठेवले होते. सौभाग्य, चाफा बोलेना, घरात फुलला पारिजात, गोष्ट जन्मांतरीची, अखेरचा सवाल, बेईमान, ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, चांदणे शिंपीत जा यांसारख्या अनेक नाटकांतून विविध प्रकारच्या भूमिका करुन त्यांनी आपल्यातील अभिनेत्यालाही एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. जयवंत दळ‌वी, विजय तेंडुलकर यांच्याप्रमाणेच नाटके लिहिता लिहिता इतर विषयांवर पुस्तके लिहिण्याचे व्रतही मधुकर तोरडमल यांनी जोपासलेले होते. या आसक्तीतूनच तोरडमलांनी र. धों. कर्वे यांनी लिहिलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले आहे. त्यांनी, अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या सत्तावीस इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद केला आहे. तसेच त्यांनी आयुष्य पेलताना (रुपांतरीत कादंबरी), एक सम्राज्ञी एक सम्राट (चरित्रात्मक ग्रंथ), या पुस्तकांचेही लेखन केले होते. ज्योतिबाचा नवस, सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई, आपली माणसं, आत्मविश्वास, शाब्बास सूनबाई अशा काही चित्रपटांत त्यांनी जरुर भूमिका केल्या पण त्यांचा जीव रमला खऱ्या अर्थाने रंगभूमीवरच.
नाट्यकर्मींचे प्रश्न सोडविण्यासाठी निव्वळ सरकारवर अवलंबून न राहाता कलावंत, निर्माते या साऱ्यांनी एकत्रित येऊन त्यासाठी प्रयत्न करायला हवेत या मताचे ते होते. तोरडमल यांचा कणा ताठ होता कारण ते कोणत्याच पक्षाच्या सरकारकडे काहीही मागण्यासाठी गेले नाहीत. त्यामुळे ते कोणालाही ठणकावू शकत. अहमदनगर येथे झालेल्या ८२ व्या नाट्यसंमेलनाच्या वेळी नाट्यसंमेलन संयोजकांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून अडीच लाख रुपये परस्पर कापून घेण्याच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या कृतीला विरोध दर्शविताना त्यांची संभावना `भोजनभाऊ' या शब्दांत मधुकर तोरडमल यांनी केली होती व एका धुमसत्या प्रश्नाला वाचा फोडली. संमेलनासाठी सरकारकडून त्यावेळी मिळत असलेल्या दहा लाख रुपये अनुदानातील अडीच लाखांवर हक्क गाजवून संमेलनात मिरवणाऱ्या नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या पदाधिकाऱ्यांना कुणीतरी सुनवायला हवेच होते. ते काम तोरडमलांनी केले होते. 
मधुकर तोरडमलांनी काम केलेले शेवटचे नाटक म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. हे नाटक जयवंत दळवींनी लिहिले होते व त्याचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले होते. तोरडमल यांनी शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसचे भाषांतर केले होते पण दुर्दैवाने ते कुठेतरी गहाळ झाले. अखेरच्या काही वर्षांत तोरडमल यांनी अजून दोन नाटके लिहिली होती. त्याची हस्तलिखिते विजय केंकरे यांच्याकडे आहेत. ही नाटके अद्याप रंगभूमीवर आलेली नाहीत. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले असे हे मधुकर तोरडमल. प्राध्यापक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, साहित्यिक व परखड वक्तेही...त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरचा अजून एक तेजोमय दीप आता निमाला आहे.
(लेखक हे उपवृत्तसंपादक, मुंबई)
-----

No comments:

Post a Comment