दै. दिव्य मराठीच्या दि. 27 जून 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली माझी विशेष बातमी
-----
बालगंधर्वांच्या मुंबईतील अस्तित्वखुणा विस्मृतीत
सरकार तसेच रसिकांच्या स्तरावरील हा वारसा जपण्यासाठी कमालीची अनास्था
समीर परांजपे
मुंबई, दि. 27 जून
आपल्या अभिरुचीसंपन्न स्त्रीभूमिकांनी रसिकांना मन मोहविणारे नटश्रेष्ठ बालगंधर्व यांचा मृृत्यू १५ जुलै १९६७ रोजी पुणे येथे अतिशय विपन्नावस्थेत झाला. त्यांच्या निधनाच्या घटनेला येत्या १५ जुलै रोजी पन्नास वर्षे होत असल्याने फक्त काही संस्थांनाच बालगंधर्वांवर कार्यक्रम करण्याची बुद्धि सुचली असली तरी बाकी सरकारी पातळीसह सर्वच ठिकाणी याबाबत अनास्था आहे. बालगंधर्वांवर ज्यांना संशोधनात्मक, चिकित्सक अभ्यास करायचा असेल तर त्यांना बालगंधर्वांशी संबंधित सर्व जुनी संदर्भसाधने , ध्वनिमुद्रिका, पुस्तके, त्यांच्यावरील विशेषांक हे सारे सारे एकत्रित मिळेल असे एखादे हक्काचे ठिकाण नाट्यप्रेमी म्हणविणाऱ्या महाराष्ट्राला अजून स्थापन करता आलेले नाही.
बालगंधर्वांच्या नाट्यकारकिर्दीला यशस्वी वळण देण्यात मुंबई, पुणे या दोन शहरांचा मोठा वाटा आहे. बालगंधर्वांविषयी सर्वात अधिक संदर्भसाधने मुंबईत फक्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर पूर्व येथील नायगाव शाखेच्या संदर्भ विभागात उपलब्ध आहेत. मात्र या संदर्भ विभागातील कारभार इतका भीषण आहे की, अभ्यासकांना हवे असलेली संदर्भसाधने वेळेवर मिळणे खूप जिकिरीचे झाले आहे. तेथील झेरॉक्स मशिन अनेक महिने बंद अवस्थेत आहे. बालगंधर्वांची कारकिर्द उतरणीला लागली व १९४०च्या दशकात त्यांची अवस्था अधिक बिकट झाली. त्यावेळी बालगंधर्व आपल्या चाहत्यांमध्ये जो वेळ घालवत त्याचे काही संदर्भ बाळ सामंत लिखित तो एक राजहंस या पुस्तकात मिळतात. रुइया महाविद्यालय व दादर पश्चिमेला पूर्वी जिथे कोहिनूर टाॅकिज होते (आता तिथे नक्षत्र माॅल आहे.) त्याच्या समोर श्रीकृष्ण बोर्डिग हाऊस आहे त्या दोन वास्तूंमध्ये बालगंधर्वांचे जाणे होत असे. दादर पश्चिमेच्या श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊसमध्ये कलाकार गणपतराव लाडांचे पुत्र सीताकांत लाड राहात असत. सीताकांत त्यावेळी मुंबईच्या आँल इंडिया रेडिओवर प्रोगाम असिस्टंट म्हणून काम करत होते. सीताकांताच्या भेटीसाठी बालगंधर्व श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊसमध्ये जायचे. दादर पूर्वेला पाम व्ह्यू नावाच्या इमारतीत रुइया महाविद्यालयाचे पूर्वी विद्यार्थी वसतिगृह होते. १९४० च्या दशकात बाळ सामंत विद्यार्थीदशेत या वसतिगृहात राहात होते. त्यांच्या रुमवर बालगंधर्व नेहमी यायचे. तेथे प्रख्यात चित्रपट पटकथाकार ग. रा. कामत यांचीही हजेरी असायची. या रुमवर बालगंधर्व विद्यार्थ्यांच्या कोंडाळ्यात गप्पा मारत बसायचे. वाटल्यास होस्टेलवर जेवायचे किंवा बाहेर कुठेतरी जेवायचे असा त्यांचा क्रम असायचा. ' बालगंधर्वांची तब्येत शेवटच्या काळात खूप बिघडली. त्यावेळी बालगंधर्वांना रुइया महाविद्यालयाच्या मागे जे फडके नर्सिंग होम आहे तिथे दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना पुण्यात हवापालटासाठी नेण्यात आले. तिथेच १५ जुलै १९६७ रोजी त्यांचे निधन झाले. रुइया महाविद्यालय व परिसराचा बालगंधर्वांशी असाही संबंध त्यांच्या अखेरीच्या काही दिवसांपर्यंत अाला होता.
बालगंधर्वांच्या अस्तित्वखुणाही विस्मृतीच्या गर्तेत
दादर पश्चिममधील रेल्वे स्थानकासमोरचे हरीभाऊ विश्वनाथ संगीत वाद्यांचे दुकान, मामा काणे यांचे हाॅटेल, पणशीकर हाॅटेल, तांबे आरोग्य भुवन अशा ठिकाणी जिथे जिथे बालगंधर्व आवर्जून जात असत त्या संस्थांच्या बालगंधर्वांविषयी अनेक आठवणी आहेत, त्यांही विशेष उजेडात आलेल्या नाहीत. नाना चौकातील धर्मशाळेत जिथे गंधर्व नाटक कंपनी आपला मुंबईतील मुक्काम करत असे ती जागा तर आता लुप्तच झाली आहे. बालगंधर्वांवर प्रेम करणाऱ्या अनेकांना ते माहिममध्ये नेमके कुठे राहायचे याची माहितीही नाही. त्यांनी निवास केलेल्या इमारतीचे पुढे काय झाले याचा पत्ताही अनेकांना नसतो. महाराष्ट्र सरकार मराठी संस्कृती जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले जाते पण मुंबईत बालगंधर्वांसहित अनेक दिग्गजांच्या कर्तृत्वखुणा माहितीपर नीलफलकांनी जपता येतात इतकी साधी गोष्टही सरकारला सुचलेली नाही. त्यामुळे बालगंधर्वांच्या अखेरच्या काळात जी दुरवस्था त्यांच्यावर ओढवली तीच त्यांच्या निधनानंतर अद्यापही सुरुच आहे असे रसिकांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment