Friday, July 21, 2017

उमा भेंडे : सोज्ज्वळ रुपाची मराठमोळी नायिका - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी दि. २१ जुलै २०१७


अभिनेत्री उमा भेंडे यांच्यावर मी लिहिलेला विशेष लेख दि. २१ जुलै २०१७ रोजी दै. दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाचा मुळ मजकूर, वेबपेजलिंक, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
Epaper http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/241/20072017/0/10/
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-MB-uma-bhendesimpale-…
----
उमा भेंडे : सोज्ज्वळ रुपाची मराठमोळी नायिका 
--
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
--
१९६३ साल. माधव शिंदे हे थोरातांची कमळा हा चित्रपट दिग्दर्शित करीत होते. ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद भालजी पेंढारकर यांनी लिहिलेले होते. यातील थोरातांच्या कमळाच्या म्हणजे नायिकेच्या भूमिकेत वंदना यांची निवड झाली होती. पण काही कारणाने त्यांना ते काम करता आले नाही. मग ही भूमिका उमा भेंडे यांच्याकडे चालून आली आणि त्यांनी तिचे सोने केले. या चित्रपटातील माझ्या ओठांत रंगीत गाणी, झुळझुळे नदी ही बाई, माथ्यावरती ऊन किती तापले आदी गाणी जशी रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहिली तसाच लक्षात राहिला तो उमा भेंडे यांचा सहजसुंदर अभिनय. थोरातांची कमळा हा चित्रपट प्रदर्शित झाला तो कालावधीही लक्षात घ्यायला हवा. त्यावेळी कोल्हापूर हे मराठी चित्रपटनिर्मितीसाठी जणू नंदनवनच होते. १९४०च्या आधीपासून कोल्हापूर परिसरात भालजी पेंढारकर हे चित्रतपस्वी मराठी चित्रपट बनविण्यात मश्गुल होते. भालजी पेंढारकरांचा ओढा ऐतिहासिक चित्रपट बनविण्याकडे अधिक. त्यातही शिवकाळावर चित्रपट बनविणे हा तर त्यांचा निजध्यास. कोल्हापूरमध्ये भालजी पेंढारकरांच्या हाताखाली जयप्रभा स्टुडिओमध्ये अनेक दिग्गज कलाकार घडले. त्यात चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचना अशा अनेकांचा समावेश होता. त्यानंतरच्या दुसऱ्या पिढीतील जे कलाकार भालजी पेंढारकर यांच्या हाताखाली घडले त्यात उमा भेंडे यांचा समावेश होता. मराठी चित्रपटसृष्टीत सोज्ज्वळ चेहेऱ्याच्या तसेच सशक्त अभिनय करणाऱ्या नायिकांची एक परंपरा आहे. त्यामध्ये सुलोचना, जयश्री गडकर, सीमा देव, आशा काळे अशा काही अभिनेत्रींचा समावेश होतो. या परंपरेतीलच एक अभिनेत्री म्हणजे उमा भेंडे या होत्या. थोरातांची कमळा या चित्रपटातील भूमिकेमुळे उमा भेंडे यांचे सोज्ज्वळ व्यक्तिमत्व व अभिनय क्षमता ही रसिकांपुढे प्रकर्षाने आली.
उमा या मुळच्या कोल्हापूरच्या. त्यांचे वडील अत्रे यांच्या कंपनीत कामाला होते. तर आई रमादेवी प्रभात कंपनीत कामाला होती. अशा कलासक्त घरामध्ये १९४५ साली जन्म झालेल्या या मुलीला नृत्य, नाटक, मेळे यामध्ये काम करण्यास घरातून कोणी मज्जाव करणे शक्यच नव्हते. उमा भेंडे त्यांच्या लहानपणी मिरजकर यांच्याकडे कथ्थक आणि भरनाट्यमचे शिक्षण घेत होत्या. त्याच जोडीला त्यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या नृत्याच्या परीक्षाही दिल्या. वयाच्या पाचव्या वर्षी उमा यांनी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाच्या मेळ्यात केलेल्या गारुडी नृत्याचे खूपच कौतुक झाले. या बालकलाकाराला २००-३०० बक्षिसे त्या काळात मिळाली. कोल्हापूरात मेळ्यांमध्ये नाटकेही होत. त्यातही उमा यांनी बालवयात कामे केली होती. या गुणांची पारख करुन भालजी पेंढारकरांनी उमा भेंडे यांना आकाशगंगा या चित्रपटात छोट्या सीतेची भूमिका देऊ केली व त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा अशा रितीने श्रीगणेशा झाला.
आकाशगंगा हा चित्रपट करताना उमा यांचे मुळ नाव अनुसया हेच पडद्यावर झळकले होते. त्यानंतर त्यांनी अंतरीचा दिवा या चित्रपटात काम केले. हा चित्रपट लता मंगेशकर यांनी बनविला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्या तो बघायला गेल्या तर त्यात त्यांचे नाव कुठेच दिसले नाही. त्यामुळे अनुसया हैराण होणे स्वाभाविक होते. अखेर त्यांनी काहीशा दबल्या आवाजातच भालजी पेंढारकर यांच्याकडे चौकशी केली की, मी चित्रपटात काम करुनही श्रेयनामावलीत माझे नाव कुठेही दिसले नाही असे का? त्यावर भालजी पेंढारकर हसले व म्हणाले ` चित्रपटाच्या जाहिरातीत नवतारका उमा असे जे नाव झळकते आहे ते तुझेच आहे.' चित्रपटसृष्टीत नव्याने आलेल्या अनुसया साक्रीकर हिचे अनुसया हे नाव लता मंगेशकर यांना काहीसे जुने वाटले होते. त्यामुळे लतादिदिंनी ते बदलून उमा केले. 
उमा भेंडे यांच्या चित्रपट कारकिर्दीचा विचार केला तर १९५९ ते १९७९ पर्यंत त्यांनी नायिका म्हणून खऱ्या अर्थाने आपली कारकिर्द गाजवली. त्यांनी तामिळ, तेलुगु, हिंदी, छत्तीसगढी अशा भाषांतील चित्रपटांतही कामे केली. उमा भेंडे यांचा नायिका म्हणून झळकलेला पहिला चित्रपट कोणता असे विचारले तर चटकन उत्तर मिळेल ते म्हणजे थोरातांची कमळा. हे उत्तर बरोबर आहे पण वस्तुस्थिती थोडीशी निराळी होती. `यालाच म्हणतात प्रेम' या चित्रपटामध्ये त्या नायिका म्हणून झळकणार होत्या. त्यांचे नायक होते अरुण सरनाईक. पण योग असा होता की या चित्रपटाआधी त्या `थोरातांची कमळा'मधून नायिका म्हणून प्रेक्षकांसमोर आल्या. त्यानंतर क्षण आला भाग्याचा, शेवटचा मालुसरा, पाहू रे किती वाट, स्वयंवर झाले सीतेचे, आम्ही जातो आमुच्या गावा, मल्हारी मार्तंड, दैव जाणिले कुणी, मधुचंद्र, अंगाई, धरतीची लेकरं, काका मला वाचवा, भालू अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारुन रसिकांना आनंद दिला. सोज्ज्वळ व्यक्तिमत्वामुळे उमा भेंडे यांना हिंदी चित्रपटांतूनही काम करण्याची संधी मिळाली. हर हर महादेव, ब्रह्मा, विष्णू यासारख्या पौराणिक चित्रपटांतून उमा भेंडे यांनी कामे केली. त्याचप्रमाणे दोस्ती, एक दिल सौ अफसाने, खिलाडी, एक मासूम सारखे हिंदी चित्रपटही त्यांनी केले. पण त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतले वातावरण काही फारसे मानवले नाही. त्यांना खलनायिकेच्या भूमिका करायच्या होत्या पण त्यांची ती इच्छा काही पूर्ण झाली नाही.
` नाते जडले दोन जीवांचे' या चित्रपटाच्या निमित्ताने उमा यांची प्रकाश भेंडे यांच्याशी भेट झाली. आणि खरोखरच दोन जीवांचे नाते जडून ते विवाहबद्ध झाले. प्रकाश व उमा भेंडे यांनी स्थापन केलेल्या श्री प्रसाद चित्र संस्थेने निर्मिलेल्या चटकचांदणी, भालू, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार अशा अनेक चित्रपटांना उत्तम यश मिळाले. १९८० साली प्रदर्शित झालेल्या भालू या चित्रपटाची निर्मिती उमा भेंडे यांनीच केली होती तर दिग्दर्शन राजदत्त यांचे होते. कथा, पटकथा, संवाद बाबा कदम यांनी लिहिले होते. या चित्रपटातील भालू हा कुत्रा एक महत्वाचे पात्र होतेच परंतु उमा भेंडे, प्रकाश भेंडे हे दांपत्य तसेच नाना पाटेकर, निळू फुले आदी कलाकारांनी केलेल्या कसदार अभिनयाने हा चित्रपट सर्वांच्याच लक्षात राहिले. त्यामुळे उमा व प्रकाश भेंडे हे नाव घेताक्षणी रसिकांना आजही भालू हा चित्रपट चटकन आठवतो. अशा या उमा भेंडे यांना २०१२ साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 
उमा व प्रकाश भेंडे दांपत्याबद्दल अजून एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. प्रकाश भेंडे हे उत्तम चित्रकार आहेत. २००८ साली प्रकाश भेंडे यांचे `सोल ब्रिदिंग' या शीर्षकाचे एक चित्रप्रदर्शन भरले होते. त्याचे उद्घाटन त्यांनी पत्नी उमा भेंडे यांच्या हस्ते केले होते. `माझ्या चित्रकला साधनेत उमाची मला खूप मोठी मदत आजवर झालेली आहे. विविध चित्रसंकल्पनांबाबत मी नेहमी तिच्याशी सातत्याने चर्चा करत असे. त्यामुळे मी चितारलेल्या चित्रांची पहिली दर्शक व समीक्षकही तिच असते.' या शब्दांत प्रकाश भेंडे यांनी त्यावेळी आपल्या पत्नीविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. अशा कलासक्त भेंडे दांपत्याने मराठी चित्रपटसृष्टी व कलाक्षेत्राकरिता महत्वाचे योगदान दिले आहे. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओला वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी १७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली. त्यामुळे कोल्हापूरातील भालजी पेंढारकर युगातील एक दुवा आता योग्य प्रकारे जतन होईल. पण भालजी पेंढारकर युगातील दुव्यांपैकी एक असलेल्या उमा भेंडे यांचे बुधवारी निधन झाले. आता हा दुवा मात्र उमा भेंडे यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांच्या आठवणींच्या माध्यमातूनच प्रेक्षक दीर्घकाळ आपल्या मनाच्या कप्प्यात जतन करुन ठेवतील.
--

No comments:

Post a Comment