Friday, July 7, 2017

अंड्याचा फंडा - दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी केलेले परीक्षण - समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी अंड्याचा फंडा या चित्रपटाचे मी केलेले परीक्षण. त्याची वेबलिंक व टेक्स्ट पुढे दिले आहे. 
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-REV-REV-movie-review-…
----
दिग्दर्शनात आणि अभिनयातही फसलेला 'अंड्याचा फंडा'
---
- समीर परांजपे | Jun 30, 2017, 14:53 PM IST
--
चित्रपट 
अंड्याचा फंडा
रेटिंग 
1 स्टार
कलावंत 
अथर्व बेडेकर, शुभम परब, मृणाल जाधव, दीपा परब चौधरी,
सुशांत शेलार, अजय जाधव, किरण खोजे, अरुण नलावडे, आरती वडगबालकर, माधवी जुवेकर, संदेश कुलकर्णी, समीर विजयन, अनिल नगरकर, प्रमोद पवार, जनार्दन कदम, श्रद्धा मुसळे, रमेश वाणी
दिग्दर्शक/ कथा 
संतोष शेट्टी
निर्माता 
विजय शेट्टी
संगीत दिग्दर्शक 
अमित राज
---
संजय दत्त व गोविंदा या धमाल जोडीचा एक हिंदी चित्रपट २००१ साली आला होता. त्याचे नाव होते `जोडी नं. १'. त्या चित्रपटाचे जे काय भलेबुरे व्हायचे ते त्या वेळेला झालेच. पण त्यातील एक गाणे होते `आओ सिखाऊँ तुम्हे अंडे का फंडा, ये नही प्यारे कोई मामुली बंदा'. हे गाणे तो चित्रपट आपटला तरी त्यानंतर काही काळ गाजत वाजत राहिले. या गाण्यातला अंडे का फंडा मनात फिट्ट बसलेल्यांनी त्याचे स्वरुप बदलून तो मराठी चित्रपटाच्या रुपाने सादर केला व त्याचे मस्त भजे करुन ठेवले आहे. अंड्याचा फंडा या मराठी चित्रपटाचे कथानक ज्याने लिहिले असेल त्यांची कल्पनाशक्ती प्रचंड भीषण आहे. याचे कारण सकृतदर्शनी या चित्रपटाला कथानक आहे पण चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येते की त्याचा प्रेक्षकांच्या मनावर होणारा परिणाम शून्य आहे.
कथा
अथर्व व फाल्गुनराव ही दोन मुले एकाच शाळेतील आणि एकाच वर्गातले एकदम घनिष्ठ मित्र असतात. अथर्व म्हणजे अंड्या आणि फाल्गुनराव म्हणजे फंड्या. ही त्यांची टोपणनावेच त्यांच्या मुळ नावापेक्षा जास्त प्रसिद्ध असतात. अथर्व हा अभ्यासात बऱ्यापैकी हुशार तर फंड्या हा अभ्यासात लक्ष नसलेला. अभ्यास सोडून उनाडक्या करण्याकडे लक्ष असलेला. फंड्याला अनेकदा काही स्वप्ने दिसत असतात. त्या स्वप्नातील घरे, गावातील जागा यांचे फंड्या जे वर्णन करायचा त्यानूसार अंड्या त्या ठिकाणांची चित्रे काढत असतो. एकदा ही चित्रे पाहून अंड्याची आई देवयानी मनोमन दचकते. एक दिवस फंड्या शक्कल लढवतो की, तो अपघातात मेला असल्याची खोटी बातमीच सर्वत्र पसरवायची. तो अंड्याला त्यात धम्माल गमतीत सामील करुन घेऊन आपले शिक्षक, इतर मित्र, पालक या सर्वांचीच गंमत करायला जातो. पण दुर्देवाने ही गंमत खरी ठरते. फंड्या एका अपघातात मरण पावतो. तो मेल्यानंतर भूत होतो व फक्त अंड्यालाच दिसत असतो. भूत झाल्यानंतर फंड्याला अनेक गोष्टी जणू काही लख्ख दिसू लागतात. तो अंड्याला हे सांगतो की, मी पूर्वजन्मी तुझ्या आईचा पती होतो व फंड्याच्या रुपात पुन्हा जन्माला आलो होतो. मीच तुझा खरा बाप असून तुझ्या आईने माझा (मी तिचा पती असताना) खून केला होता. हे ऐकून अंड्या खूप हैराण होतो. आपल्या आईने फंड्या हा पूर्वजन्मी तिचा पती असताना त्याचा खरच खून केला होता का, याचा शोध घ्यायचे ठरवतो. अंड्या या शोधमोहिमेत यशस्वी होतो का? आपली आई निरपराध आहे हे सिद्ध करणारे पुरावे त्याला मिळतात का? फंड्याच्या भूताचे नंतर काय होते? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांनी चित्रपट पाहूनच शोधावीत.
अभिनय
अंड्या व फंड्या ही दोन मुले या चित्रपटाची खऱ्या अर्थाने नायक. त्यातील अंड्या बनलेला अथर्व बेडेकर हा अभिनयात चुणचुणीत वगैरे आहे. उनाड, अभ्यासात लक्ष नसलेल्या फंड्याची भूमिका शुभम परबने बरी केली आहे. शुद्ध भाषा बोलणारा अंड्या व ग्रामीण ढंगाची तसेच काहीशी टपोरी भाषा बोलणारा फंड्या यांचे संवाद ऐकताना त्यांचा सामाजिक स्तर लगेच लक्षात येतो. परंतू या दोघांच्या भूमिकेत काडीमात्र दम नाही याचे कारण चित्रपटाचे कथानकच विस्कळीत आणि कल्पनाशून्य आहे. अंड्या व फंड्या यांची बालमैत्री दाखविताना ते प्रसंग अधिक गमतीदार करता आले असते पण इथे सगळीच सपाट दृश्ये आहेत. 
दिग्दर्शन
या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष शेट्टी यांनीच चित्रपटाची कथाही
लिहिली आहे. त्यामुळे चित्रपटात नेमके काय सांगायचे हे त्यांना नक्की माहिती असणार असे वाटत होते. पण संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या अंड्याचा फंडामधून नेमके काय सांगायचे आहे याबाबत दिग्दर्शकच प्रचंड गोंधळलेला आहे हे स्पष्टपणे जाणवते. हा चित्रपट पहिल्या दृश्यापासूनच कंटाळवाणा आहे. तो कधी एकदाचा संपतोय असे वाटते. हा बालचित्रपट असला तरी त्यातली दृश्ये बालिशहून बालिश आहेत. दिग्दर्शनाच्या दृष्टीने सपशेल फसलेला हा चित्रपट आहे.

No comments:

Post a Comment