दै. दिव्य मराठीच्या दि. २९ जून २०१७च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/b…/251/29062017/0/5/
---
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील १२ गावांमध्ये
आदिवासी उभारत आहेत नवीन देवराया
--
लोकसहभागातून होणार निसर्गराजाचे रक्षण
---
- समीर परांजपे
मुंबई, दि. 29 जून
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील बारा गावांमध्ये तेथील आदिवासींनी आपल्या गावानजिक नवीन देवराया निर्माण करण्यासाठी आता निर्धार केला आहे. त्यासाठी आपापल्या गावातील सामायिक जमिनीतील काही भाग या देवरायांसाठी तेथील आदिवासींनी राखून ठेवला आहे. याकामी त्यांना काही स्वयंसेवी संस्था मदत करीत अाहेत. लोकसहभागातून देवराई निर्माण करण्याचे प्रयत्न अजिबातच होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुरबाड परिसरातील या घडामोडी खूपच सकारात्मक आहेत.
मुरबाड तालुक्यातील बारा गावांमध्ये देवराई निर्माण करण्यासाठी आदिवासींना श्रमिक मुक्ती संघटना, वननिकेतन या संस्था सहकार्य करीत अाहेत. श्रमिक मुक्ती संघटनेच्या अॅड. इंदवी तुळपुळे यांचा या प्रयत्नांत मोठा सहभाग असून देवराई कशा निर्माण कराव्यात यासाठी आदिवासींना जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये हे मार्गदर्शन करीत आहेत. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेले वनक्षेत्र. मुरबाड तालुक्यामध्ये ज्या आदिवासी गावांमध्ये नव्याने देवराई निर्माण केली जात आहे, त्यापैकी काही गावांत देवराया होत्या. पण त्या नंतर नष्ट झाल्या. देवरायांचे महत्व लक्षात आल्यानंतर आता या आदिवासींनी पुन्हा आपल्या गावपरिसरात देवराई उभी करायचा निर्धार केला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जागतिक पर्यावरणदिनी मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावामध्ये हिरव्या देवाची यात्रा पार पडली. या यात्रेत वेगवेगळ्या स्पर्धा होत्या. रानभाज्यांची स्पर्धा सर्वात लोकप्रिय होती. पाऊस पडलेला नसताना गावांतील महिलांनी ४७ प्रकारच्या रानभाज्या शोधून, गोळा करून आणि शिजवून आणल्या होत्या. प्रत्येक गावात त्यांचं एक राखीव जंगल हवं म्हणून "गाव तिथे देवराई' या प्रकल्पांतर्गत १२ गावांनी काही क्षेत्र राखीव ठेवून जंगल वाढवायला सुरूवात केली आहे. या परिसरातील डोईफोडी नदीवर काम करून नदी बारमाही वाहती करण्यासाठी या आदिवासींनी प्रयत्न सुरु केले आहेत.
मुरबाडमधील मोहवाडी, केवारवाडी, भेऱ्याची वाडी, शिरवाडी, दुर्गापूर, शिसेवाडी, करपटवाडी, पेजवाडी, दिवानपाडा, भांगवाडी, बनाची वाडी, मासले या १२ गावांमध्ये उभ्या राहात असलेल्या देवरायांपैकी काहींचे क्षेत्र हे तीन हेक्टर किंवा पाच हेक्टरपर्यंत आहे. सामुहिक वनहक्क कायद्यातील तरतुदींमुळे आदिवासींना देवराया निर्माण करणे व त्यांचे नीट जतन करणे हे अतिशय सुलभ झाले आहे. मंदिर किंवा शाळा बांधणे या दोन गोष्टींसाठीच देवराईमधील झाडे तोडण्यास गावकऱ्यांना परवानगी असते.
मराठवाडा, पश्चिम विदर्भात देवरायाच नाहीत
१९९७ ते २००२ या कालावधीत डॉ. उमेश मुंडल्ये यांनी महाराष्ट्रातील देवरायांचा जो अभ्यास केला त्यानूसार राज्यात ३७६३ देवराया आहेत. महाराष्ट्रामध्ये नंदूरबार, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग आदी भागांमध्ये देवराया आढळून येतात. मराठवाडा व पश्चिम विदर्भात मात्र देवराई हा प्रकार आढळून येत नाही. पाणी व जंगलासारख्या नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन व संरक्षण करायचे असेल तर त्या प्रक्रियेत स्थानिक लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. अशा लोकसहभागातूनच पर्यावरण व निसर्गाचे उत्तम रक्षण होऊ शकते असे डॉ. उमेश मुंडल्ये यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment